२८ सप्टेंबर
अनुसंधानात राहिल्यावर अभिमान गळून जातो.
अभिमान सोडून जो गृहस्थाश्रम पाळील तोच खरा परमार्थी. अभिमान सोडल्याने गृहस्थाश्रम चांगला होतो. 'मी म्हणेन तसे होईल,' असे कधीही म्हणू नये. अभिमानाच्या पायावर उभारलेली इमारत डळमळीत होणारच. अभिमान हा देहाचा आणि तत्संबंधी विषयांचा असतो. अभिमानाचे मूळच काढून टाकावे; म्हणजे, मी देहाचा आहे म्हणतो, हेच काढून टाकावे. हा देह माझा नाही हे आपल्याला पटते, पण अखंड सहवासाने आपले त्यावर प्रेम जडते. एकदा देहावर प्रेम जडले मग अभिमान आला. त्याच्या पाठोपाठ लोभ, क्रोध येणारच. अभिमान म्हणजे 'मी कर्ता' ही भावना असणे. ही भावना टाकून काम केले, तर् व्यवहारात कुठे नडते ? आपल्या देहाचा आणि मनाचा फार निकटचा संबंध आहे. पण देह केव्हातरी जाणार असल्याने त्याला इतके महत्व नाही. नुसता जाडजुड देह कामाचा नाही. आपले मन तयार झाले पाहिजे. 'मी भगवंताचा आहे' हे एकदा मनाने जाणून घेतले, म्हणजे मग अभिमानरहित होता येते. नेहमी भगवद्भजनात राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अभिमान शिवणार नाही. डोळ्यात पाणी आणून भगवंताला आळवावे, त्याला शरण जावे; भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्या मर्यादा ओळखून वागावे. अमुक एक गोष्ट अमक्या तर्हेने घडावी असे जोपर्यंत आपल्याला वाटते आहे, तोपर्यंत व्यवहाराच्या मार्गाने जो योग्य प्रयत्न आहे तो आपण केला पाहिजे. पण प्रयत्न केल्यावर मात्र त्याचे फळ भगवंतावर सोपवावे, आणि जे काही घडेल त्यामध्ये समाधान मानावे.
आपले अंतःकरण नेहमी शुद्ध ठेवावे. रात्री निजण्यासाठी अंथरूणावर पडले असताना आपले अंतरंग शोधून पाहावे की, 'मी कुणाचा द्वेष-मत्सर करतो का ?' तसे असेल, तर ते मनातून जबरीने काढून टाकावे; ते थोडे जरी शिल्लक राहिले, तरी आपल्या परमार्थाच्या आड येणार आहे; आपल्या मनाने आपल्याला निश्च्ययाने असे सांगितले पाहिजे की, 'मी कुणाचाही द्वेष करीत नाही.' आपले अंतःकरण इतके शुद्ध आणि सरळ असावे की, आपण तर कुणाचा द्वेष-मत्सर करू नयेच नये, परंतु दुसरा कुणी आपला द्वेष करीत असेल ही कल्पनासुद्धा आपल्याला येता कामा नये. 'मी भगवंताचा आहे, या देहाचा नाही,' असे अखंड अनुसंधान् ठेवून, आपल्याला भगवत्स्वरूप का होता येणार नाही ? जो आतबाहेर भगवंताने भरून राहील किंवा त्या ज्ञानाने भरून राहील तोच खरा ज्ञानी होय' आणि जाणीव ज्याप्रमाणे देहाला व्यापून असते, त्याप्रमाणे भगवंताचे स्मरण ज्याचे मन व्यापून टाकील तोच खरा साधक, तोच खरा अनुसंधानी, आणि तोच खरा मुक्त समजावा.
२७२. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे.
( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )
No comments:
Post a Comment