२० सप्टेंबर
प्रपंचाची आठवण । हेंच दुःखाचें कारण ॥
आपण रामापाशी मागावे एक । 'तुझे इच्छेने सर्व जगत चालते देख ।
त्यातील मी एक पामर । रामा, तुला कसा झालो जड ? ॥
रामा, अन्यायाच्या कोटी । तूच माय घाली पोटी ॥
मातेलागी आले शरण । त्याला नाही दिले मरण ।
ऐसे ऐकिले आजवर । कृपा करी तू रघुवीर ॥
दाता राम हे जाणून चित्ती । म्हणून आलो दाराप्रति ॥
आता रामा नको पाहू अंत । तुजवीण शून्य वाटे जगत ॥
ज्याचा ज्याचा मी केला स्वार्थ । ते ते झाले दुःखाला कारण ।
आता, रामा, कोठे जाऊ । तुला टाकून कोठे राहू? ॥
ऐसे कोठे पाहावे स्थान । जेथे होईल समाधान ? ॥
आता असो नसो भाव । मी रामा ! तुझा झालो देख ॥
आता कसे तरी करी । मी पडलो तुझ्या दारी ॥
आता लौकिकाची चाड । नाही मला त्याची आवड ।
हे ठसावे चित्ती । कृपा करी रघुपति ॥
आता मनास येई तसे करी । माझे मीपण हिरोनि जाई ॥
जोवर देहाची संगति । तोवर मी-माझे ही वृत्ति ।
राहील अभिमानाला धरून । तेथे न राहे कधी अनुसंधान ॥
काळोख अत्यंत मातला । घालवायला उपाय न दुजा सुचला ॥
होता सूर्याचे आगमन । काळोख जाईल स्वतः आपण ॥
प्रपंचातील संकटे अनिवार । माझ्या बोलण्याचा करावा विचार । आता कष्टी न व्हावे फार ॥
प्रपंचाची आठवण । हेच दुःखाचे कारण ॥
तेच घोकीत बसल्याने । न होई आनंदरूप स्मरण ॥
सुखदुःखाची उत्पत्ति । आपलेपणात आहे निश्चित ॥
स्वार्थ म्हणजेच आपलेपण । म्हणून माझे मीच दुःखाला कारण ॥
आपण आपलेपणाने वागत गेले । सुखदुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले ॥
अमुक व्हावे, अमुक होऊ नये, । याचे कसे होईल, त्याचे कसे होईल, ।
ही चित्ताची अस्वस्थता । याचे नाव चिंता ॥
सुखदुःखे चित्ताची न राहे स्थिरता । तीच त्याची खरी अवस्था ॥
सुखदुःख परिस्थितीवर नसते । आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते ॥
ज्यात एकाला सुख वाटते । तेच दुसर्याला दुःखाला कारण होते ॥
दुःखाचे मूळ कारण । जगत सत्य मानले आपण ॥
देहाने कष्ट केले फार । त्यातील फळाचा घेऊन आधार ॥
फळ नाही हाती आले । दुःखाला कारण ते झाले ॥
आपले चित्त झाले विषयाधीन । नाही दुःखास दुसरे कारण ॥
मागील गोष्टींची आठवण । पुढील गोष्टींचे चिंतन ।
हेच दुःखाला खरे कारण । याला एकच उपाय जाण ।
अखंड असावे अनुसंधान ॥ प्रपंच न मानावा सुखाचा । तो असावा कर्तव्याचा ॥
वृत्ति होऊ द्यावी स्थिर । चित्ती भजावा रघुवीर ॥
२६४. रामा, सुखदुःख दोन्ही । केले अर्पण तुझे चरणी ॥
आता मनास येई तैसे ठेवी । याविण दुजे न मागणे काही ॥
( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )
No comments:
Post a Comment