August 31, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३१ ऑगस्ट २०१४

३१ ऑगस्ट

"ज्याच्या घरात समाधान तेथे मी आहे."

  


मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो, त्याच्या इतर गोष्टी मी पाहात नाही. पण तुम्ही त्याची श्रीमंती, विद्या, मान, यांवरून तो सुखी आहे की नाही हे ठरवता. भगवंतावाचून मनुष्य कसा सुखी होईल ? लोकांना श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो. लोकांना विद्वान आवडतो, तर मला अडाणी आवडतो. असे माझे सगळे जगाच्या उलट आहे. पण म्हणूनच जगाच्या उलट माझ्याजवळ समाधान आहे. समाधान कशात आणि कुठे आहे याचा मी शोध लावला. मी समाधानरूपी आहे. ज्याच्या घरात समाधान आहे तिथे मी आहे. जो माझा आहे पण समाधानी नाही, त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होतात. मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्हीसुद्धा अत्यंत समाधानी राहा की झाले ! आजपर्यंत मी एकच साधन केले: कुणाचे मन दुखवले नाही, आणि एका नामावाचून दुसर्‍या कशाचीही आठवण ठेवली नाही. माझ्याजवळ काय आहे ते सांगा ! विद्या नाही, पैसा नाही, किंवा कला नाही. पण सर्वांवर मी अत्यंत निष्कपट प्रेम करतो, त्यामुळे लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो.
जगाचा स्वभाव मला पक्का माहीत आहे; म्हणून आजपर्यंत मला कोण काय म्हणतो हे मी पाहिले नाही, मी त्याला काय सांगायचे एवढेच मी पाहिले. माझे सांगणे ऐकल्यानंतर पुनः तुम्ही ऐकायला येता, याची तीन कारणे असू शकतील. एक, मला चांगले सांगता आले नसेल; दुसरे, तुम्हाला ते समजले नसेल; किंवा तिसरे, सांगितलेले तुम्ही विसरला असाल. तुम्ही माझ्याशी अगदी स्वाभाविक रीतीने बोलावे; आपण आपल्या घरातल्या माणसांशी जसे बोलतो तसे अगदी आपलेपणाने माझ्याशी बोलावे. पण माझ्याशी कुणी कसाही आणि काहीही बोलला तरी मला जे सांगायचे तेच मी त्याला सांगत असतो. मी एखाद्याला सांगत असताना, 'याने माझे ऐकले तर याचे कल्याण होईल' असे आपोआपच माझ्या मनात येते. माझे जो ऐकेल त्याचे खास कल्याण होईल याची मला खात्री असते. पण कल्याण म्हणजे प्रपंचातली सुधारणा नसून, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहणे होय. माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असे नाही; पण त्याचा प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मी मदत करणार नाही. अशी केली नाही तर तो रडेल, त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल, पण तो जगेल हे मात्र निश्चित होय; आणि जगल्यावर आज ना उद्या तो नाम घेईल. रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयोग आहे ? मी एकदा बीज पेरून ठेवतो. आज ना उद्या त्याचे झाड झाल्याशिवाय राहणार नाही.

२४४. आजपर्यंत मी नामाशिवाय दुसरे काही सांगितलेच नाही. जो मला
भेटायला येतो त्याच्या तोंडातून नाम घेववण्याचे माझ्याकडे लागले.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 30, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० ऑगस्ट २०१४

३० ऑगस्ट

समाधानाचें स्थान । एका रामावांचून नाहीं जाण ॥ 

 

विषयी गुंतले सर्व जन । चित्त मन तेथे केले अर्पण ।
तेथे कोणास न येई समाधान । पावे सुखदुःख समसमान ॥
विषयाचा केला कंटाळा । परि मनावर बसला त्याचाच थारा ॥
पैका हाती खेळवला । त्याने हात काळा झाला ।
हा दोष नाही पैक्याला । आपण त्याला सत्य मानला ॥
एका मानापोटी दुःखाचे मूळ । हे जाणती सर्व सकळ ॥
वैभव-संपत्तीचा सहवास । हाच दुःखास कारण खास ॥
व्यवहाराच्या चालीने चालावे । वेळ प्रसंग पाहून वर्तावे । चित्ती समाधान राखावे ॥
जोवर जरूर व्यवहारात राहणे । तोवर त्याला जतन करणे ॥
ज्याचा घ्यावा वेष । तैसे वागणे आहे देख ॥
व्यवहारात जैसे जगाने वागावे आपल्याशी । तैसेच वर्तन ठेवावे आपण दुसर्‍यापाशी ॥
ज्याचा जो जो संबंध आला । तो तो पाहिजे रक्षण केला ॥
आपलेकडून न कोणाचे दुखवावे अंतःकरण ।
तरी व्यवहारात जे करणे जरूर ते करावे आपण ॥
संगत धरावी पाहून । बाह्य भाषणावर न जावे भुलून ॥
मिष्ट भाषण वरिवरी । विष राहे अंतरी । असल्याची संगत नसावी बरी ॥
ज्याचा त्यास द्यावा मान । लहानाचे राखावे समाधान ।
मोठ्याचेपुढे व्हावे लीन । वागत जावे जगी सर्वास ओळखून ॥
मनाने व्हावे श्रेष्ठ । बाह्यांगी राहावे कनिष्ठ ॥
न करावा कोणाचा उपमर्द । गोड भाषण असावे नित्य ॥
आळसाला न द्यावा थारा । सगळ्या जीवनाचा घात ज्याने केला ॥
पराधीनता अत्यंत कठीण हे खरे असे । पण त्याच्याशिवाय जगतात कोणी नसे ॥
तरी व्यवहारात मिंधेपणे न राहावे । आळशीपण नसावे ॥
देह आळशी न ठेवावा हे जरी खरे । तरी त्याची परिस्थिति ओळखून वागणे बरे ॥
मागे काय झाले हे न पाहावे । उद्या काय होईल हे मनी न आणावे ।
आज व्यवहारात योग्य दिसेल तसे वागावे । प्रयत्नाचा कंटाळा न करावा ॥
आज जे मिळाले ते घ्यावे । पुढे जास्त मिळवण्याचा प्रयत्‍न करावा ॥
बिना केले काम । न मिळत असे दाम ॥
धन संग्रही राखावे । सर्वच खर्चून न टाकावे ॥
थोडे थोडे लोकांचे देणे देत जावे । आणखी जास्त न करावे ॥
नोकरी ज्याची करणे जाण । त्याचे मानावे प्रमाण ॥
व्यवहारात असावी दक्षता । अचूक प्रयत्‍न करावा सर्वथा ॥
प्रपंचात असावे दक्ष । सत्याचा धरावा पक्ष ॥
जो जो प्रसंग येईल जैसा । प्रपंचात वागेल तैसा । याचे नाव प्रपंचात दक्षता ॥
व्यवहार करावा ऐसा जपून । कोणाचे नुकसान न होऊ द्यावे चुकून ॥
भगवंताचे आहो आपण । ही मनी ठेवावी ओळखण ॥
समाधानाचे स्थान । एका रामावाचून नाही जाण ॥
म्हणून राम ठेवील त्यात मानावे समाधान । राखून नामाचे अनुसंधान ॥


२४३. प्रयत्‍नावाचून व्हावे हित । ऐसे न आणावे चित्तात ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 29, 2014

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा


श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ ऑगस्ट २०१४

२९ ऑगस्ट

धर्म म्हणजे नीति आणि अध्यात्म यांचा संयोग.

 द्वैत आणि अद्वैत ही काय भानगड आहे ? भगवंतापासूनच सर्व झाले. एकापासून दोन झाले. आपण मूळ स्वरूपापासून बाजूला झालो म्हणून द्वैत आले. मायेमध्ये सापडले नाही म्हणजे अद्वैतात राहता येईल. माया कल्पनेचीच झाली; तिला कल्पनेनेच मारावी. एकच करावे: अद्वैतात जे राहिले त्यांच्या नादी आपण राहावे. भगवंताचे होण्याकरिता, ज्याने मी वेगळा झालो ते सोडावे. ज्याच्यापासून माया निर्माण झाली, त्यालाच शरण जावे. माया तरी भगवंतामुळेच झाली. जो भगवंताचा होतो, त्याला माया नाही बाधत. मायेचा जोर संकल्प-विकल्पात आहे. अखंड स्मरणात राहावे म्हणजे नाही माया बाधत. भगवंताचे नाम हे स्थिर आहे, पण रूप मात्र सारखे बदलते. प्रत्यक्ष साकाररूप हे काही रूप नव्हे; जे जे आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते ते सर्व रूपच होय. भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही, म्हणून ते पूर्ण आहे. समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव होय. म्हणूनच, जे पूर्ण नाही ते असमाधान. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय, आणि हेच पूर्णपण आहे. जे शास्त्र समाधान देते तेच शास्त्र खरे होय, आणि ज्याने शांती आणि समाधानाचा लाभ होतो तोच खरा धर्म होय. धर्म म्हणजे नीति आणि अध्यात्म यांचा संयोगच.
जो दुसर्‍याच्या हिताकडे न पाहता आपल्या हिताकडेच पाहतो तो स्वार्थीच होय. सुख व्हावे ही मनुष्याला इच्छा असल्यामुळे अस्वस्थपणा येतो. या अस्वस्थतेमधून तळमळ निर्माण होते. या तळमळीमुळे जगाच्या सर्व सुधारणा बाहेर पडतात. पण ह्या सुधारणा जितक्या जास्त होतात, तितके मनुष्याला दुःख जास्तच होते. जी विद्या केवळ नोकरीचे साधन आहे, ती अपूर्णच असते. असली विद्या पोटापुरतीच समजावी. ती समाधान देऊ शकणार नाही. समाधान देणारी विद्या निराळीच आहे. म्हणून लौकिक विद्येला फार महत्व देऊ नये. एखादे वेळी आपल्याला असा संशय येतो की, जगात कुठे सुख, समाधान, आणि आनंद आहे का ? पण तो संशय बरोबर नाही. कारण ज्या गोष्टी जगात नाहीत त्यांचे नावच कसे निघेल ? असमाधान याचा अर्थच 'समाधान नाही ते.' यावरून असे स्पष्ट दिसते की, आधी समाधान असलेच पाहिजे. दिवाळीमध्ये, सुखाचे जे असेल ते आज करतो आणि दुःखाचे जे असेल ते आपण उद्यावर टाकतो. ह्याचा अर्थ असा की आपली काळजी नाहीशी झालेली नसूनही आपण आजचा दिवस चांगला म्हणजे काळजीविरहित घालवितो. उद्या पुन्हा काळजी आहेच ! पण जो भगवंताचे स्मरण ठेवील त्याला काळजी केव्हाच नसते.२४२. ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणात होते तोच खरा रामराज्यात राहतो.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 28, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ ऑगस्ट २०१४

२८ ऑगस्ट

आनंदापासून दूर करते ती माया.

 वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया होय. माया म्हणजे जी असल्याशिवाय राहात नाही, पण नसली तरी चालते; उदाहरणार्थ, छाया. माया ही नासणारी आहे. ती जगते आणि मरते. मला विषयापासून आनंद होतो; पण तो आनंद भंग पावणारा आहे. आनंदापासून मला जी दूर करते ती माया. आपल्याला विषयापासून शेवटी दुःखच येते. हा आपला अनुभव आहे. माया आपल्याला विषयात लोटते; विषयांचे आमिष दाखवून चटकन निघून जाते. आहे त्या परिस्थितीत चैन पडू न देणे, हेच तर मुळी मायेचे लक्षण आहे. पैसा हे मायेचे अस्त्र आहे. मायेचे थोडक्यात वर्णन करायचे म्हणजे, भगवंतापासून मला जी दूर करते ती माया. भगवंताची शक्ती जेव्हा त्याच्याच आड येते, तेव्हा आपल्याला ती माया बनते, आणि तिचे कौतुक जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा ती लीला बनते. एक भगवंत माझा आणि मी भगवंताचा, असे म्हटले म्हणजे मायेचे निरसन झाले. मायेचा अनर्थ माहीत असूनही तो आपण पत्करतो, याला काय करावे ?
जगाचा प्रवाह हा भगवंताच्या उलट आहे. आपण त्याला बळी पडू नये. जो प्रवाहाबरोबर जाऊ लागला तो खडकावर आपटेल, भोवर्‍यात सापडेल, आणि कुठे वाहात जाईल याचा पत्ता लागणार नाही. आपण प्रवाहात पडावे पण प्रवाहपतित होऊ नये. आपण प्रवाहाच्या उलट पोहत जावे; यालाच अनुसंधान टिकवणे असे म्हणतात. भुताची बाधा ज्या माणसाला आहे त्याला जसे ते जवळ आहे असे सारखे वाटते, तसे आपल्याला भगवंताच्या बाबतीत झाले पाहिजे. परंतु बाधा ही भितीने होते; त्याच्या उलट, भगवंत हा आधार म्हणून आपल्याजवळ आहे असे वाटले पाहिजे. मनात वाईट विचार येतात, पण त्यांच्यामागे आपण जाऊ नये, मग वाईट संकल्प-विकल्प येणार नाहीत. सर्वांना मी 'माझे' असे म्हणतो, मात्र भगवंताला मी 'माझा' असे म्हणत नाही; याला कारण म्हणजे माया. वकील हा लोकांचे भांडण 'माझे' म्हणून भांडतो, पण त्याच्या परिणामाचे सुखदुःख मानत नाही, त्याचप्रमाणे, प्रपंच 'माझा' म्हणून करावा, पण त्यामधल्या सुखदुःखाचे धनी आपण न व्हावे. खटल्याच्या निकाल कसाही झाला तरी वकिलाला फी तेवढीच मिळते. तसे, प्रपंचात प्रारब्धाने ठरवलेलेच भोग आपल्याला येत असतात. आपले कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो, त्याप्रमाणे कर्तव्य म्हणूनच आपण प्रामाणिकपणे प्रपंच करावा. त्यामध्ये भगवंताला विसरू नये, अनुसंधान कमी होऊ देऊ नये, कर्तव्य केल्यावर काळजी करू नये, म्हणजे सुखदुःखाचा परिणाम आपल्यावर होणार नाही. हे ज्याला साधले त्यालाच खरा परमार्थ साधला.२४१. दुःखाचे मूळ कारण । जगत सत्य मानले आपण ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 27, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ ऑगस्ट २०१४

२७ ऑगस्ट

समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. 

 सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहील त्यालाच समाधान मिळेल. ज्या घरात समाधान, तेथे भगवंताचे राहणे जाण. जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते, अशा खर्‍या भावनेने एक वर्षभर जो राहील, त्याला समाधान हे काय ते खात्रीने कळेल. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा, आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असे वाटते. त्याच्या मागे सारे जग लागेल. जगामध्ये आपल्याला समाधान कुणी देत नाही. समाधानाला निष्ठेची अत्यंत जरूरी आहे. पांडवांना वनवासात जे समाधान होते, ते राज्यपदावर असणार्‍या कौरवांना नव्हते. म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये सुखी राहावे. 'ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ती असो द्यावे समाधान ॥' हेच संतश्रेष्ठ तुकारामबुवांचेही सांगणे आहे. भगवंताची देणगी सर्व बाजूंनी गोड असली पाहिजे. पैसा ही भगवंताची देणगी नव्हे; त्याने तळमळ आणि अतृप्ती होते. खरोखर, समाधान हीच भगवंताची देणगी होय. मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही. आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानले की, जे आहे ते पुरेल. ज्याचे मन समाधानात आहे, त्याचे शरीर कसेही असले तरी चालेल. समाधानालाच खरे महत्व आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे. शिवाय, घेण्याला काही अंतच नाही. कितीही मिळाले तरी आपली मागण्याची बुद्धी कायम राहते. पण आपले सर्व काही दिले की देण्याला अंत आला, म्हणून त्यामध्ये समाधान आहे. आपण उपाधीने झाकले गेलो आहोत. एक एक उपाधी टाकीत गेले तर आपले खरे स्वरूप प्रकट होईल. तिथे खरे समाधान होते.
'राम कर्ता आहे' ही भावना होणे हे वासनेचे मरण होय. मनुष्य काही तरी हेतू ठेवून कर्म करतो. पण प्रत्येक ठिकाणी 'भगवंताच्या इच्छेने काय व्हायचे आहे ते होऊ दे', असे अनुसंधान असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही. आपल्याला सगळे कळते, पण आयत्या वेळेला आपण विसरतो. आलेली ऊर्मी आपण सहन करावी. दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो. तसे अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा, म्हणजे आपण आपल्या ऊर्मींना आवरू शकू. प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे, ते म्हणजे अनुसंधान. हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतले, तरी रोग्याला पथ्ये सांभाळावीच लागतात. शास्त्राने, सद्धर्माने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणे जरूर आहे. अनुसंधानाने जे साधेल, ते शतकोटी साधनांनी साधणार नाही. असे अखंड नामानुसंधान म्हणजेच खरी भक्ती.


२४०. इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते, हाच या युगाचा महिमा आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 26, 2014

लालबागचा राजा २०१४

( चित्र सौजन्य : दै. लोकसत्ता )

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ ऑगस्ट २०१४

२६ ऑगस्ट

कारणावाचून आनंद, तो खरा. 

 जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणे हे आनंददायक आहे, मग आपल्याला दुःख का होते ? म्हणजे, मनुष्य आनंदासाठी जगतो, आणि दुःख करतो. याचे कारण असे की, आपण कशाकरिता काय करतो हेच विसरतो. मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो.
मी आनंदात राहावे असे प्रत्येकाला वाटते; म्हणजेच भगवंताकडे जावे असे वाटते, कारण भगवंत आनंदस्वरूपच आहे. आपल्याला अशी एक सवय लागली आहे की, काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगूच शकत नाही. प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचे राज्य उत्पन्न करतो, आणि त्यापासून आनंद भोगतो. आनंद मिळवण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे; पण कारणावर अवलंबून असणार्‍या आनंदाची वाट दुःखामधून आहे, आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो. म्हणून, कोणतेही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी. कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अर्थात अशाश्वत असणार, म्हणून तो खरा आनंद नाही. कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावे. हे 'काहीही न करणे' ही फारच उच्च अवस्था आहे. काहीतरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे. भगवंताशी अगदी अनन्य होणे, आपले कर्तेपण पूर्ण मारणे, ही ती अवस्था आहे. आनंद पाहिजे असेल तर तुम्ही आनंदातच राहा ! कशाही परिस्थितीत आनंद राहावा. आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटावे. कुणीही मनुष्य स्वतःसाठीच सर्व करतो. समजा, आपल्याला त्रास देणारा कुणी आहे; आपल्याला त्रास दिला तर त्याला बरे वाटते; म्हणजे आपल्याला दुःख दिले तर त्याला आनंद होतो, म्हणून तो नुसता स्वतःसाठीच माझ्याशी तसा वागतो; हे जसे खरे, तसेच, त्याने दिलेला त्रास मी का घ्यावा ? त्याने काहीही केले तरी आपला आनंद का बिघडू द्यावा ? असे आपण वागावे. काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये, उद्या काय होणार याची काळजी करू नये, आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करावे आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे. यातच सर्व आले.२३९. भगवंताची प्राप्ती व्हावी असे वाटणे हे जन्माचे सार्थक आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 25, 2014

गणेश पूजा

या  संकेतस्थळाच्या वाचकांसाठी  ' गणेश पूजा '  ध्वनिफीत खालील  लिंक वरून उतरून घ्यावी 


१) पुजा सहित्य आणि मांडणी - ( वेळ ३ मिनीटे )
 http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xOTY4NjI0N190SE44Ml8xZjAz/01%20-%20Puja%20Sahitya%20ani%20Mandani%20-%20Mp3Marathi.Com.mp3 
२) प्राण प्रतिष्ठापना - ( वेळ २७ मिनीटे)
http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xOTY4NDA1N19tZEw3Q19lOGEx/02%20-%20Pran%20Pratishthapana%20-%20Mp3Marathi.Com.mp3


३) षोडशोपचार पूजा - भाग १ ( १५ मिनीटे)
http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xOTY4MzgwOV94MlpUSl9iOWNi/03%20-%20Shodashopchar%20Puja%20-%20Part%201%20-%20Mp3Marathi.Com.mp3


४) षोडशोपचार पूजा - भाग २ ( २५ मिनीटे)
http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xOTY4MzEyM19wUktRc182YmJj/05%20-%20Shodashopchar%20Puja%20-%20Part%202%20-%20Mp3Marathi.Com.mp3


५) उत्तर पूजा - ( विसर्जना पुर्वीची ) - ( वेळ ६ मिनीटे )
http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xOTY3OTEyMl9BYmdla184YmJl/11%20-%20Uttar%20Puja%20-%20Visarjana%20Purvichi%20Puja%20-%20Mp3Marathi.Com(1).mp3

http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xOTY3OTQ0MV91SEpmdl85ZTMw/Shrimant%20Dagdusheth%20Ganpati%20Aarti%20-%20Mp3Marathi.Com.mp3


७) सिध्दीविनायक, प्रभादेवी मंदीरातील - आरती ( वेळ २१ मिनीटे )
http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xNzgyNjM2OV90bjRBbV8xN2Qy/Siddhivinayak_Temple_Aarti.mp3

८) अथर्वशीर्ष पाठ ( वेळ - ६ मिनीटे १६ सेकंद )
http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xOTY4Mzg2MV8yZFRXc18wN2Vj/04%20-%20Atharvashirsha%20paath%20-%20Mp3Marathi.Com.mp3

९) गणपतीची आरती -
http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xOTY4MjI1M192SWFjc19mYTEw/06%20-%20Aarti%20-%20Sukhakarta%20Dukhaharta%20-%20Mp3Marathi.Com.mp3

१०) मंत्र पुष्पांजली
http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xOTY3OTI1NV8zTkVVVV80N2Rm/10%20-%20Mantra%20Pushpanjali%20-%20Mp3Marathi.Com.mp3

११) गणेश गायत्री मंत्र
http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xNjM0ODg2MF9xZDJEQl82M2M3/24Ganesh-Gayathri.mp3


अमोल केळकर श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २५ ऑगस्ट २०१४

५ ऑगस्ट

आपण भगवंतासाठी आलो आहोत. 

 

   

आपण स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्नच खरे आहे असे वाटते. त्याचप्रमाणे जोपर्यंत भगवंताचे सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही, तोपर्यंत हे सर्व मिथ्या असणारे जग आपण भ्रमाने सत्यच मानीत असतो. जे चिरकाल राहते तेच खरे सत्य होय. आपला मार्ग चुकला आहे एवढे जरी समजले तरी सत्याकडे जाता येते. मन विषयाकडे लावून नाही समाधानाचा अनुभव येणार. समाधान जिथे भंगते तो मार्ग खास चुकीचा आहे. मुंगळा गुळाच्या खड्याला चिकटतो, मान तुटली तरी सोडीत नाही. त्याचप्रमाणे, आपण विषयसुख सोडीत नाही, याला काय करावे? जे अनुभवाने खरे शहाणे होतात ते या विषयसुखाचा त्याग करतात; आणि ज्यांची ही विषयाची आसक्ती सुटली त्यांनाच ते मिथ्या आहे हे प्रत्ययाला येते.
आपले समाधान का बिघडते ? आज आहे त्यापेक्षा निराळे असावे असे वाटते म्हणून ! जो जिन्नस जिथे ठेवला आहे ती जागा सोडून आपण त्रिभुवन जरी शोधले तरी तो सापडत नाही; त्याचप्रमाणे ह्या वस्तूमध्ये समाधान नाहीच त्यामध्ये कितीही शोधले तरी ते आपल्याला मिळत नाही. समाधान फक्त भगवंताजवळ आहे. खरे म्हणजे आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्यामुळे ती स्थिर राहात नाही; म्हणून आपल्याला समाधान नाही. मनुष्य आहे त्या स्थितीला कंटाळून, सुख मिळावे यासाठी जे करायला जातो ते शेवटी दुःखाचेच होते. म्हणून, आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावे.
आपण ज्या कार्यासाठी आलो, ते कार्य झाले की समाधान होते. मग जोपर्यंत आपल्या कृतीने आपल्याला समाधान होत नाही तोपर्यंत, आपण त्या कार्यासाठी आलो नाही असे म्हणायला काय हरकत आहे ? आपण भगवंतासाठीच आलो आहोत आणि त्याच्या प्राप्तीमध्ये आनंद आहे. जगातली कोणतीही दृश्य वस्तू आपल्याला मनाचे स्वास्थ्य देऊ शकत नाही, किंवा ते नेऊ शकत नाही. मन भगवंताजवळ गुंतेल तेव्हाच स्वास्थ्य मिळेल. त्याकरिता नेहमी भगवंताचे नामस्मरण करावे, त्याचे गुणवर्णन ऐकावे, त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट काढूच नये. मिथ्या समजून प्रपंच करावा आणि भगवंताचे होऊन राहावे. नामाच्या उलट सांगतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. कोरडा वेदान्त ऐकू नये. प्रत्येक नामागणिक भगवंताची आठवण होते. म्हणून नामच सर्वस्व मानावे. नामात काय आहे हे, ते घेतल्यानेच सर्व काही कळून येते.तीर्थक्षेत्रात किंवा संतांच्याकडे जाऊन वस्तू मिळवायची नसून समाधान मिळवायचे असते, आणि हे नामस्मरणाच्या योगानेच घडून येते.

२३८. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 24, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ ऑगस्ट २०१४

२४ ऑगस्ट

जेथे संत तेथे आनंद व समाधान असणारच. 

 काही संत वरून अज्ञानी दिसतात पण अंतरंगी ज्ञानी असतात. खरोखर, संतांची बाह्यांगावरून पुष्कळदा ओळख पटत नाही. संतांचे होऊन राहील्याने, किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानेच त्यांना नीट ओळखता येईल. मनातले विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रचीती येईल. आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाहीत, किंवा लोकांचे दोष दिसणे जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत संतांची पूर्ण ओळख आपल्याला होणार नाही. संताचे दोष दिसणे, म्हणजे आपलेच दोष बाहेर काढून दाखविण्यासारखे आहे. संत हा हिरव्या चाफ्याच्या फूलाप्रमाणे असतो; सुंदर वास तर येतो, पण हिरव्या पानात ते फूल शोधून काढता येत नाही. त्याप्रमाणे जिथे संत आहे तिथे आनंद आणि समाधान असते, पण तो सामान्य माणसासारखाच वागत आणि दिसत असल्यामुळे आपल्याला ओळखता येत नाही. वेदान्त आपण नुसता लोकांना सांगतो, पण संत तो स्वतः आचरणात आणतात. त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत. संत हे निःसंशय असतात तर आपण संशयात असतो. त्यामुळे त्यांना समाधान मिळते, तर आपल्या पदरात असमाधान पडते. संशय नाहीसा करायला आपली वृत्ती बदलली पाहिजे.
संतांना जे आवडते ते आपल्याला आवडणे म्हणजेच त्यांचा समागम करणे होय. 'मी करतो' हे बंधनाला कारण असते; ते नाहीसे करणे म्हणजे 'गुरूचे होणे' समजावे. कधी चुकतो आणि कधी बरोबर असतो, तो साधक समजावा, आणि जो नेहमी बरोबर असतो तो सिद्ध समजावा. नुसते इंद्रियदमन हे सर्वस्व मानू नये; ते ज्याच्याकरिता आहे, त्याचे अनुसंधान पाहिजे. ज्याला काहीतरी करण्याची सवय आहे, त्याने काही काळ मुळीच काही करू नये; आणि नंतर भगवंताचे अनुसंधान ठेवायला शिकावे. आपण परीक्षा एकदा नापास झालो तर पुन्हा परीक्षेला बसतो, पण भगवंताचे अनुसंधान ठेवण्यात एकदा प्रयत्‍न करून यश आले नाही तर ते मात्र आपण सोडून देतो, हे बरे नाही. देवाचे बोलणे हे बापाच्या बोलण्यासारखे आहे, त्याच्याजवळ तडजोड नाही. पण संत हे आईसारखे आहेत, आणि आईपाशी नेहमीच तडजोड असते.
जो भगवंताविषयी सांगेल तोच संत खरा. संत जो बोध सांगतात त्याचे आपण थोडेतरी आचरण करू या. भगवंताचे अधिष्ठान ठेवून प्रत्येक कर्म करावे. जिथे भगवंताचे स्मरण तिथे माया नाही; जिथे माया, अभिमान आहे, तिथे भगवंत नाही. दानाचेही महत्व आहे. पैसा आणून गळ्यापाशी बांधला तर तो बुडवील; त्याचे यथायोग्य दान केले तर तो तारील. भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे. त्याचेच होऊन आपण राहिलो तर तो आपल्याला दीनवाणे कसा ठेवील ?

२३७. संत हे भगवंतावाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत. म्हणूनच ते संत झाले, म्हणजे देवस्वरूप बनले.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 23, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २३ ऑगस्ट २०१४

२३ ऑगस्ट

वाचनाची आवश्यकता आणि मर्यादा. 

 पोथ्या आणि संतांचे ग्रंथ आपण मोठ्या प्रेमाने वाचतो आणि सांगतो, पण तशी कृती करीत नाही म्हणून आपण देवाला अप्रिय होतो. संतांचे ग्रंथ हे अगदी प्रिय व्यक्तीच्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत. हा ग्रंथ माझ्याचकरीता सांगितला आहे. तो कृतीत आणण्याकरिता आहे, ही भावना ठेवून वाचन करावे. ग्रंथ लिहीणाराची तीव्र इच्छा असते की, त्याप्रमाणे लोकांनी आचरण करावे. त्यावरची टीका वाचताना मूळ ग्रंथातला मथितार्थ लक्षात आणावा. भाषांतरकार हा भाषांतरामध्ये आपले थोडे घालतोच; मूळ ग्रंथ वाचणे हे केव्हाही चांगले. संतांचे ग्रंथ हे आईच्या दुधासारखे, तर टीका अणि भाषांतर हे दाईच्या दुधासारखे आहेत, हा फरक जाणून घ्यावा.
कित्येकांच्या बाबतीत वाचन हे सुद्धा एक व्यसन होऊन जाते. उगीच वाचीत बसण्यात फायदा नाही. नुसत्या वाचनाने काही साधत नाही. जितके वाचावे तितका घोटाळा मात्र होतो. वाचावे कुणी ? तर ज्याला पचविण्याची शक्ती आहे त्याने. बाकीच्या लोकांनी फार वाचू नये; त्यातही, वर्तमानपत्र वाचीत वेळ घालविणे, म्हणजे आपण होऊन जगाला घरी बोलावणे होय. वाचनाचे मनन झाले पाहिजे. मनन झाले की ते आपल्या रक्तामध्ये मिसळते. वाचन आणि साधन बरोबर चालावे. मग साधकाला वाचनापासून खरा अर्थ कळतो आणि आनंद होतो. साधन आणि वाचन असले की साधक कधीही मागे पडायचा नाही. उपनिषदे, गीता, योगवसिष्ठ, यांसारखे ग्रंथ वाचणे आणि समजावून घेणे, आपल्या उपासनेला आवश्यक असते. गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे. प्रवृत्ती आणि निवृत्ती, कर्मयोग आणि कर्मसंन्यास, यांचे एकीकरण करण्यासाठी गीता सांगितली आहे, हे लक्षात ठेवून ती वाचावी. वेदान्त हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही. हितकारक गोष्ट आचरणात आणलीच पाहिजे. समजा, आपण एका गावाला जायला निघालो आहोत आणि मोठ्या रस्त्याने जातो आहोत. वाटेत एक माहीतगार इसम भेटला आणि त्याने आपल्याला जवळची एक पायवाट दाखविली. त्या पायवाटेने आपण आपल्या गावी लवकर पोहोचतो. तसे उपासनेच्या मार्गामध्ये स्वतःचा दोष स्वतःला कळत नाही, आपले मन ताळ्यावर रहात नाही. अशा वेळी गीतेसारख्या ग्रंथांच्या वाचनाने आपला दोष आपल्याला कळतो. आणि आपली चूक आपल्याला कळली तर आपण लवकर सुधारतो.

२३६. पोथी वाचायची ती कशाकरीता ? साध्य काय, साधन काय,
हे जाणून घेऊन त्याप्रमाणे कृती करण्यासाठी.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 22, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २२ ऑगस्ट २०१४

२२ ऑगस्ट

समाधान ही परमेश्वराची खरी देणगी. 

 प्रत्येकाला असे वाटते की, मी कुणाची निंदा करीत नाही, धर्माने वागतो, तरी मी दुःखी, आणि वाईट माणसे सुखात वावरताना दिसतात, हे कसे काय? अगदी कितीही सात्विक मनुष्य असला, तरी त्याच्या हे मनात आल्यावाचून रहात नाही. नामाचा विटाळ ज्याने मानला तो सुखी दिसावा, आणि नाम ज्याने कंठी धरले त्याला दुःख व्हावे, यावरून भगवंताला न्यायी कसे म्हणावे, अशीही पुष्कळांना शंका येते. खरोखर, याचे मर्म जर आपण पाहिले तर आपल्याला असे आढळून येईल की, बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतर्यामी दुःखात बुडलेले असतात. विषय त्यांना पुष्कळ मिळाले, पण त्यामुळे मनाची शांती लाभली तर उपयोग! दोन रस्ते लागले, त्यातला एक चांगला दिसला पण तो आपल्या गावाला नेणारा नव्हता, आणि दुसरा खडकाळ आणि काट्याकुट्यांचा होता पण तो आपल्या गावाला नेणारा होता; तर कोणता रस्ता आपण धरायचा ? भगवंताकडे जाणार्‍या लोकांचे गीतेमधे दोन वर्ग सांगितले आहेत; एक सांख्यमार्गी आणि दुसरे कर्मयोगी. ज्यांची स्वभावतःच वासना कमी असून ज्यांचा इंद्रियांवर ताबा चालतो, जे जन्मापासून तयार असतात, ते सांख्यमार्गी होत. ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात, पण ज्यांना भगवंत असावा असेही वाटते, म्हणजे आपल्यासारखे सामान्य जन, ते कर्मयोगी होत. सांख्यांचा साधनमार्ग अर्थात सूक्ष्म आणि उच्च प्रतीचा असतो; आपला मार्ग जड, सोपा आणि सुखकारक असतो. सांख्य हा भगवंताकडे चट्‌दिशी पोहोचतो, पण आपण क्रमाक्रमाने जातो. सामान्य माणसाचा मग मार्ग कोणता ? तो मार्ग असा - वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा, पण सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्यामुळे आपल्या प्रयत्नांचे फळ ईश्वरावर अवलंबून आहे, हे ध्यानात बाळगून समाधान ठेवावे.
दहा माणसांना त्यांच्या असमाधानाचे कारण विचारले तर ती माणसे दहा निरनिराळी कारणे सांगतील. यावरून असे दिसते की जगातील कोणतीही वस्तू समाधान देणारी नाही. समाधानाचे शास्त्र निराळेच आहे. ते प्रपंचापासून शिकता येत नाही. ज्याच्याजवळ अगदी थोडे आहे त्याच्यापासून, तो ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत, प्रत्येकाला काही तरी कमी असणारच. पण मजा अशी की प्रत्येकाची समजूत मात्र अशी असते की, आपल्याजवळ जे कमी आहे त्यामध्ये समाधान आहे; म्हणून त्याचे दुःख कायम राहते. भगवंतावाचून असणारे वैभव आणि ऐश्वर्य हे कधीच सुखसमाधान देऊ शकत नाहीत. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे, ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय.

२३५. प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो, म्हणून जे आहे त्यात समाधान मानावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 21, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २१ ऑगस्ट २०१४

२१ ऑगस्ट

सुख स्वतःवरच अवलंबून आहे.सुखाचा उगम आपल्यातच आहे. ते जगाकडून मिळत नसते. मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्‍न करतो, पण ते त्याला मिळत नाही. याचे कारण असे की, सुख बाहेरून मिळवायचे नसून स्वतःकडून मिळवायचे असते. आपण आहो तिथपर्यंत जग आहे अशा अर्थाची म्हण आहे. जगाचे अस्तित्व आपल्या अस्तित्वावर् अवलंबून असते. समजा, आपल्या घरात विजेचे दिवे आहेत ; ते बटण दाबल्याबरोबर लागतात. पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटण दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्‍न केला, तरी मूळ ठिकाणच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्येच सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. समुद्र सर्व पृथ्वीच्या पाठीवर दूरवर पसरलेला आहे, पण असे कधी झाले आहे का, की अमुक एका ठिकाणचे पाणी कमी खारट आहे ? तसे, जगात कुठेही गेले तरी सुखाच्या बाबतीत अनुभव सारखाच येणार. म्हणजे, सुख जगावर अवलंबून नसून स्वतःवरच आहे. त्याला उपाय म्हणजे स्वतःचीच सुधारणा करणे हा आहे. आता ही सुधारणा कशी करायची ? ईश्वराने मनुष्याला बरेवाईट जाणण्याची बुद्धी दिलेली आहे. ती इतर प्राण्यांना नाही. त्या बुद्धीचा पुरेपूर उपयोग करून, आपण वाईट गोष्टी करण्याचे टाळावे आणि चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्‍न करावा. वाईट गोष्ट टाळणे प्रत्येकाला शक्य आहे, कारण त्यात कृती न करणे एवढेच काम असते, आणि ते कृती करण्यापेक्षा केव्हाही सोपेच. चांगल्या गोष्टी सर्वांनाच करता येतील असे नाही. सारांश, सुखी होण्याचा मार्ग म्हणजे वाईट गोष्टी करण्याचे विचाराने टाळावे आणि चांगल्या गोष्टी शक्यतेनुसार करीत राहाव्या; आणि हे सर्व करताना सर्वकाळ भगवंताचे चिंतन करावे. असे केल्यानेच सुख मिळेल. जगाकडून सुख मिळेल, ही कल्पनाच चुकीची आहे. 'तुझे आहे तुजपाशी । परि जागा चुकलासी ॥' आपण स्वतः जगासारखे वागत नाही, मग जगाने आपल्यासारखे वागावे असे आपण का म्हणावे ?
गीतेमध्ये भगवान सांगतात की, 'मन हे मीच आहे.' भगवंतावाचून मनाची तयारी होणार नाही. म्हणून आपण भगवंताला घट्ट धरावे, आणि मग समाधानात राहावे. भगवंताचे सदासर्वकाळ स्मरण ठेवावे आणि वृत्ती स्थिर राखावी. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच येते.

२३४. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून,
असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 20, 2014

अविवाहित मुलींसाठी तोडगा

अविवाहित  मुलींसाठी  तोडगा : -
एका वडाच्या झाडाची छोटी फांदी ( शुक्रवारच्या आधी १-२ दिवस ) आणून ठेवावी . विवाह इच्छूक मुलीने  शुक्रवारी लवकर उठून स्नान करून आपली नित्यसेवा करून देवा समोर बसावे . समोर एक पाट ठेवावा , त्यावर पिवळे कापड ठेवावे. वडाची  फांदी त्यावर ठेवावी , सोबत एक पांढरी सुपारी ठेवावी . 
प्रथम सुपारीची मनोभावे  पूजा करावी . षोडोपचार पूजा करीत असताना ' ॐ महालक्क्षमीच विघ्महे , विष्णू पत्नीच धीमही , तन्नो लक्ष्मी प्रचोदयात !  या मंत्राने नमस्कार करावा व सदर मंत्राचा १०८ वेळा जप करावा . सुपारी व फांदीस हळद , कुंकू व इतर साहित्य वहावे.  श्री नारायणाची व लक्ष्मीची आरती करावी .  नेवेद्य दाखवावा . सदर सुपारीची पूजा झाल्यावर  पुन्हा सुपारी उजव्या हातात घ्यावी . या सुपारीवर : ॐ नमो: लक्ष्मी नारायणाय ! असे १०८ वेळा जप करावा . आपल्या भावी पतीचे प्रतिक समजून  सदर सुपारी नित्य  आपले जवळ ठेवावी .  तत्काळ विवाह जुळेल , मनासारखा पती मिळेल 
सदर सुपारी प्रथम अपत्य होईपर्यंत आपले जवळ ठेवावी . अपत्य प्राप्तीनंतर विसर्जित करावी . 


( संदर्भ : - अनुभवी तोडगे - सुधीर काळे )

ग्रहयोग

ग्रहयोग 

मुळ कथा - भविष्यफल 
मुळ लेखक - खान हफीज 
अनुवाद : उज्ज्वला केळकर 

(प्रसिद्धी : खजाना पुरवणी , 

          तरुणभारत , २० ऑगस्ट २०१४)श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २० ऑगस्ट २०१४

२० ऑगस्ट

दास विषयाचा झाला । सुखसमाधानाला आंचवला ॥
सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय ॥
त्यातच देहाला दुखणे । म्हणजे दुःखाचा कळस होय ॥
मिठाचे खारटपण । साखरेचे पांढरेपण ।
यांस नसे वेगळेपण । तैंसे देह आणि दुःख जाण ॥
देहाने जरी सुदृढ् झाला । तेथेही दुःखाचा विसर नाही पडला ॥
सांवली जशी शरीराला । तैसा रोग आहे शरीराला ॥
रामकृष्णादिक अवतार झाले । परी देहाने नाही उरले ॥
स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई । परि वियोगाचे दुःख अनिवार होई ॥
देहदुःख फार अनिवार । चित्त होई अस्थिर ॥
देहाचे भोग देहाचेच माथी । ते कोणास देता येत नाहीत । कोणाकडून घेता येत नाहीत ॥
आजवर जे जे काही आपण केले । ते ते प्रपंचाला अर्पण केले । स्वार्थाला सोडून नाही राहिले ॥

अधिकार, संतति, संपत्ति । लौकिकव्यवहार, जनप्रीति, ।
या सर्वांचे मूळ नाही स्वार्थापरते । अखेर दुःखालाच कारण होते ॥
जो जो प्रयत्‍न केला आपण । तेच सुखाचे निधान समजून ।
कल्पनेने सुख मानले । हाती आले असे नाही झाले ॥
ज्याचे करावे बहुत भारी । थोडे चुकता उलट गुरगुरी ।
ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन । हे ओळखून वागावे आपण ॥
प्रपंचात आसक्ती ठेवणे । म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे ।
म्हणून आजवर खटाटोप खूप केला । परि कामाला नाही आला ॥
विषयातून शोधून काढले काही । दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही ॥
म्हणून प्रपंचाने सुखी झाला । ऐसा न कोणी ऐकिला वा देखिला ॥
ज्याची धरावी आस । त्याचे बनावे लागे दास ॥
दास विषयाचा झाला । तो सुखसमाधानाला आचवला ॥
ज्या रोपट्यास घालावे खतपाणी । त्याचेच फळ आपण घेई ॥
विषयास घातले खत जाण । तरी कैसे पावावे समाधान ? ॥
प्रपंचातील संकटे अनिवार । कारण प्रपंच दुःखरूप जाण ॥
आजवर नाही सुखी कोणी झाला । ज्यानी विषयी चित्त गुंतविले ॥
कडू कारले किती साखरेत घोळले । तरी नाही गोड झाले ।
तैसे विषयात सुख मानले । दुःख मात्र अनुभवास आले ॥
प्रपंचातील उपाधि । देत असे सुखदुःखाची प्राप्ति ॥
संतति, संपत्ति, वैभवाची प्राप्ती, । जगांतील मानसन्मानाची गति, ।
आधुनिक विद्येची संगति, । न येईल समाधानाप्रति ॥
प्रपंचातील सुखदुःखाची जोडी । आपणाला कधी न सोडी ॥
नामातच जो राहिला । नामापरता आठव नाही ज्याला ।
परमात्मा तारतो त्याला । हाच पुराणीचा दाखला ॥२३३. नका करू आटाआटी । राम ठेवावा कंठी ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 19, 2014

गणेश पूजाविधी ध्वनिफीत

गणेश चतुर्थी निमित्य  संपुर्ण पूजाविधीची  ध्वनिफीत  पाहिजे असल्यास  कृपया  खालील इमेल वर संपर्क साधावा


अमोल केळकर 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १९ ऑगस्ट २०१४

१९ ऑगस्ट

आपल्याला देवाची नड वाटते का ? 

 एक मनुष्य प्रवासाला निघाला. त्याने सर्व सामान घेतले. तो पानतंबाखू खाणारा होता, त्याने तेही सर्व साहित्य बरोबर घेतले होते. गाडी सुरू झाल्यावर थोड्या वेळाने त्याने पानाचे साहित्य काढले, तेव्हा त्याच्या ध्यानात आले की आपण चुन्याची डबी विसरलो आहोत. त्याने पुन्हा पुन्हा सामान हुडकले. त्याला मोठी चुटपुट लागली. कुठे काही पडल्याचा आवाज झाला, की त्याला वाटे चुन्याची डबीच पडली. कुणी त्याच्याशी बोलले की त्याला वाटे, आपल्याला हा चुना हवा का म्हणून विचारील. ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्या गोष्टीची आपल्याला नड लागते; ती नसेल तर हळहळ वाटते. तशी आपल्याला देवाची नड कधी लागली आहे का ? आपण आपल्या घरातल्या सर्व वस्तू आपल्या म्हणतो. बायको, मुले आणि घरातल्या इतर वस्तूंची आपल्याला इत्यंभूत माहिती असते; परंतु देवघरातला देव, ज्याची आपण रोज पूजा करतो, तो कधी आपलासा वाटला आहे का ? आपली जर ही स्थिती आहे तर आपल्याला देवाचे प्रेम कसे लागेल ? देवाचे प्रेम लागायला हवे असेल तर जगताची आशा सोडली पाहिजे. व्यवहार न सोडावा, पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते, म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे. भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे. देवावाचून आपले नडते असे वाटले पाहिजे.
ज्याचा आपण सहवास करतो त्याचेच आपल्याला प्रेम लागते. ज्याचे प्रेम लागते त्याचीच आपल्याला नड भासते. आपण पाहतोच, सहवासात किती प्रेम आहे. प्रवासात आपल्याला कुणी चांगला माणूस भेटला, त्याच्याशी आपण बोललो, बसलो, की त्याचे प्रेम आपल्याला लागते. तो त्याच्या स्टेशनवर उतरून जाताना आपण त्याला म्हणतो, "तुमच्याबरोबर वेळ किती आनंदात गेला ! तुम्ही आणखी बरोबर असता तर बरे झाले असते." थोड्याश्या सहवासाने जर एवढे प्रेम उत्पन्न होते, तर मग भगवंताचा अखंड सहवास ठेवल्यावर त्याचे किती प्रेम मिळेल ! म्हणून त्याच्या नामाचा सतत सहवास ठेवा. भगवंताच्या सहवासात राहायचे म्हणजे अहंपणा विसरून, कर्ता-करविता तो आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. होणारे कर्म त्याच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल. 'नामाने काय होणार आहे' असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पाहा. ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले यात शंका नाही.


२३२. नामस्मरण करता करता मनुष्य क्रमाक्रमाने प्रथम मुमुक्षू, मग् साधक, व पुढे सिद्ध होतो.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 18, 2014

गणेश पूजाविधी ध्वनिफीत


गणेश चतुर्थी निमित्य  संपुर्ण पूजाविधीची  ध्वनिफीत  पाहिजे असल्यास  कृपया  खालील इमेल वर संपर्क साधावा

a.kelkar9@gmail.com

अमोल केळकर

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १८ ऑगस्ट २०१४

१८ ऑगस्ट

रामाला अनन्यभावे शरण जा. 

 प्रपंचात देवाची आवश्यकता आहे हे सांगायला नको. प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीचा अनुभव जर पाहिला, तर खचित् असे आढळून येईल, की आपले हे सर्व वैभव केवळ रामाच्या कृपेचेच आहे. जो काही पैसाअडका, मानमरातब मिळतो आहे, तो सर्व भगवंताच्या कृपेमुळेच आहे हे प्रत्येकजण जाणून आहे. म्हणून जे जे कर्म आपल्या हातून घडत असते ते त्याच्याच सत्तेने होत असते याची खात्री बाळगून, कोणत्याही बऱ्यावाईट कर्माचा अभिमान धरू नका, किंवा खेदही करू नका. गर्व झालाच तर रामाची आठवण करा, तो तुमचा अभिमान नष्ट् करील. नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याच्या वेळी दैव आठवते; म्हणून दोन्ही प्रसंगी अभिमान नसावा. माझे कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करू या. 'राम कर्ता' म्हणेल तो सुखी, 'मी कर्ता' म्हणेल तो दुःखी. लहान मुलाप्रमाणे निरभिमान असावे. रामालाच सर्व समर्पण करू आणि समाधान मानून घेऊ. रामाला शरण जावे आणि मजेने असावे; आनंदाने संसार करावा. 'तुझ्या नामस्मरणाची गोडी दे' हेच मागावे.
प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होत आहे हे समजून, समाधानात रहा. वाईटाबद्दल कंटाळा किंवा सुखाबद्दल आसक्ती नको. असे वागल्याने हवे-नकोपण नाहीसे होते, आणि अहंपणाला जागाच उरत नाही. तेव्हा आता एक करा, रामाला अनन्यभावे शरण जा. 'रामा, तू ठेवशील त्यात आनंद मानीन,' अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा. तो तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे. आपण अभिमानामुळे मदतीकरिता हातच पुढे करीत नाही, त्याला तो काय करणार ? तुम्हाला खरोखर परमेश्वराजवळ काय पाहिजे ते मागा, तो तुम्हाला खचित देईल. पण जे मागाल ते मात्र हिताचे मागा. समर्थ रामदास हे मनोभावे रामाचे दास झाले, म्हणून ते 'समर्थ' होऊ शकले. ज्याने जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली, तो जगाचा स्वामी होईल. म्हातारे असतील त्यांनी भगवद्‌भजनात आपला वेळ घालवावा, आणि तरूण असतील त्यांनी भगवत्‌स्मरणात कर्तव्याला चुकू नये, हाच समाधानाचा मार्ग आहे; यातच सर्वस्व आहे. जो भगवंताच्या प्रेमात निमग्न राहतो, त्याला उपदेश करण्याची जरूरी नसते. भगवंताने गोपींना उपदेश केल्याचे ऐकिवात नाही. त्या सदैव त्याच्या प्रेमातच रंगून गेल्या होत्या. भगवंताचे प्रेम एक त्याच्या नामानेच साधेल. म्हणून नेहमी भगवंताच्या नामात राहून आयुष्य घालवा. भगवंत कृपा करील हाच माझा आशीर्वाद.२३१. राम कर्ता आहे अशी ज्याची दृढ श्रद्धा, त्यालाच आस्तिक म्हणावा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 17, 2014

गण गण गणात बोते , हे भजन प्रिय सद्गुरु ते

गण  गण गणात बोते , हे भजन प्रिय सद्गुरु ते

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १७ ऑगस्ट २०१४

१७ ऑगस्ट

निष्ठेचा परिणाम फार आहे. 

 भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही. आमच्याकडे आठवड्याचा बाजार असतो. एक नवरा-बायको असे बाजाराला गेले होते. संध्याकाळ झाली. त्यांचे घर फार लांब होते. ती दोघे आपसात बोलत होती की, "आता उशीर झाला आहे, रात्रीचे जाणे नको. तेव्हा आज इथेच राहू आणि सकाळी जाऊ" त्यांचे बोलणे दोन लबाड माणसांनी ऐकले. ते त्यांना म्हणाले, "तुम्ही का घाबरता ? आम्ही बरोबर आहोत ना ! आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचे आहे. आम्ही रामासाक्ष सांगतो आहो; तेव्हा आपण जाऊ या." या नवराबायकोला ती माणसे वाईट आहेत असे वाटले नाही. पुढे एका दरीत गेल्यावर, त्या लोकांनी त्या बाईच्या नवर्‍याला झाडाला बांधले आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने काढून घेतले. पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करून म्हणाली, "रामा ! मी या लोकांच्या विश्वासावर आले नाही, त्यांनी तुझी साक्ष ठेवली, तुझी शपथ वाहिली, त्या शपथेच्या विश्वासावर मी आले. माझे रक्षण करणारा आता तूच आहेस !" एवढ्यात बंदुकीचे आवाज झाले, आणि दोन शिपाई तिथे धावत आले. तेव्हा चोर पळून गेले आणि त्या शिपायांनी त्यांना मुक्त केले. त्यांचे दागिने आणि सामान त्यांना दिले, आणि त्यांना घरी पोहोचवले. घरी गेल्यावर ती बाई म्हणाली, "तसे जाऊ नका, थोडे गूळपाणी घेऊन जा." ते म्हणाले, "नको, आम्हाला फार कामे आहेत." ती म्हणाली, "थांबा जरा, मी आत्ता आणतेच." म्हणून ती आत वळली, तेवढ्यात ते गुप्त झाले. निष्ठा ही अशी पाहिजे. आजवर कितीकांच्यावर किती बिकट प्रसंग आले असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले.
सगुणभक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर तो हा की, जेव्हा रामाच्या पायावर डोके ठेवतो तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात. अशा वेळी आपण रामाला सांगावे, "रामा, आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही. मला तू आपलासा करून घे. मी अवगुणी असेन, पण तू माझा अव्हेर करू नकोस, मी तुला शरण आलो आहे." आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धिमेपणा म्हणजे धीर पाहिजे. जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर सार्‍या जगाची निष्ठा बसेल. लोक देवालासुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भजतात. निष्ठेचा परिणाम फार आहे.


२३०. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा, तो खात्रीने सुखाचा होईल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 16, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १६ ऑगस्ट २०१४

१६ ऑगस्ट

नामाशिवाय कशानेही समाधान नाही. 

 मनुष्य चूक करतो, अणि 'देवा, क्षमा कर' म्हणतो; पण पुन्हा पुन्हा चुका करीतच रहातो. हे काही योग्य नव्हे. अशाने काही त्याला देव क्षमा करणार नाही. 'देवा, क्षमा कर' हे म्हणणे इतके सहज होऊन बसले आहे, की त्याचा अर्थच आपल्या ध्यानात येत नाही. तो जर ध्यानात येत असता तर मनुष्य त्या चुका पुन्हा पुन्हा न करता. अशा रीतीने आपण आपल्या बुद्धीच्या बळावर परमेश्वराला फसवू शकणार नाही. बुद्धीच्या जोरावर जर आपण माणसालाही फसवू शकत नाही तर परमेश्वर कसा फसेल ? आपण आपल्या बुद्धीच्या जोरावर परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ, असे म्हणणे कदापीही योग्य होणार नाही. तेव्हा शरणागतीशिवाय मार्ग नाही. ते तुम्ही करा.
समाधान काही परिस्थितीवर अवलंबून नाही. कितीही पुराणे वाचली, ग्रंथ मुखोद्‍गत केले, प्रवचने ऐकली, तरी मनाला समाधान लाभणार नाही. त्याप्रमाणे थोडे तरी आचरण केले पाहिजे. नामात राहिले पाहिजे. नामाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीने पूर्तता येऊ शकत नाही. नामाशिवाय खरे समाधान मिळणार नाही. तेव्हा तुम्ही भगवंताला अनन्यभावाने शरण जाऊन, त्याचे नाम आवडीने आणि सतत घ्या.
एक गरीब वारकरी पंढरपूरला चालला होता. मोठ्या कष्टाने तो पायी चालला होता. वाटेत एक रेल्वेचे फाटक लागले, ते बंद होते म्हणून तो थांबला. इतक्यात तिथे एक मोटार येऊन उभी राहिली. आत एक मोठा श्रीमंत माणूस बसला होता. तोही पंढरपूरला चालला होता. वारकर्‍याच्या मनात आले, 'देवा, तुझी एवढी निस्सीम भक्ती मी करतो, परंतु माझी ही दशा; आणि हा लबाड व्यापारी, याला मात्र तू ऐश्वर्य देऊन आरामात पंढरपूरची यात्रा घडवतोस. काय तुझा हा न्याय !' एवढ्यात मोटारीचे दार उघडून दोन नोकरांनी त्या माणसाचे हात आपल्या खांद्यावर घेऊन त्याला खाली उतरविले. तो पांगळा होता ! वारकर्‍याने विचार केला, पांगळा होऊन आरामात पंढरपूरला जाण्यापेक्षा गरिबीत पायी जाणे बरे. आपल्याजवळ जे नाही ते ज्याच्यापाशी आहे तो सुखी असला पाहिजे, हे आपण धरून चालतो, पण तसा तो नसतो. त्याचे दुःख आपल्याला माहीत नसते. आणि तो स्वतःला जर सुखी समजत असेल, तर तो दारूच्या मदाप्रमाणे मद समजावा. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणे हाच विषयाची पकड ढिली करायचा उपाय आहे. आपली परिस्थिती ही परमात्म्याच्या इच्छेने आली आहे असे आपण म्हणू या. असे जर आपण केले तर दुःखाचा आवेग कमी होईल.

२२९. ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 15, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १५ ऑगस्ट २०१४

१५ ऑगस्ट

वृत्तिचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण. 

 आपला देह पंचमहाभूतांचा आहे. यामधला 'मी' कोण हे पाहावे, जे नासणार ते 'मी' कधी असणार नाही; म्हणजे पंचमहाभूतांचा 'मी' नाही हे ठरले. जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो. मी भगवंतस्वरूप व्हावे अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रगट इच्छा असते; तेव्हा त्यापैकी थोडा तरी 'मी' असल्याशिवाय मला असे वाटणार नाही. भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे, आणि आपण सर्व लोक आनंदात राहावे असे म्हणतो. मी या आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकले असे समजावे. अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंताने आपल्या अंशरूपाने केली. आपल्या आनंदात व्यत्यय आणणारे विषय जाणून घेतले, म्हणजे मग आनंदात बिघाड नाही येणार. या वाटेने चोर आहेत असे समजले, म्हणजे त्या तयारीनेच आपण जातो. जो भक्त झाला त्याला विघ्ने येत नाहीत. भगवंताचे म्हणून कोणतेही काम केले म्हणजे त्रास नाही होत.
आनंदाचा साठा कुठे निश्चित असेल तर तो भगवंताजवळ आहे. नाटकात राजाचे काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारीच आहे हे ओळखून काम करतो, त्याप्रमाणे आपण आपले खरे स्वरूप ओळखून प्रपंच करावा. नाशवंत वस्तूवर आपण प्रेम करतो, तसेच लहानसहान गोष्टीत अभिमान धरतो, इथेच तर आमचे चुकते. मी जे नाही ते व्हावे यात सुख आहे, असे वाटते. कामधेनूजवळ आपण विषय मागतो, आणि मग दुःख झाले म्हणून रडत बसतो, याला काय करावे ? जो परमार्थात जाणता, तोच खरा जाणता होय. परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल ? अनेक बुद्धिमान, विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचे असते, तिथे बावळटपणाला वावच नाही.
विद्वान लोक वेदान्त अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात. मग सामान्य माणसाला असे वाटते की, 'अरे, हा वेदान्त आपल्यासाठी नाही.' परंतु ही चूक आहे. वेदान्त हा सर्वांसाठी, सर्व मनुष्यमात्रासाठी आहे. वेदान्ताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात, त्याप्रमाणे वेदान्तात इतर सर्व शास्त्रे येतात. शास्त्राचे मार्ग हे वृत्तीला भटकू न देण्यासाठी आहेत. ते वृत्तीला हलू देत नाहीत; त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते. आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो आहोत. म्हणून, आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा, दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधानात राहावे. समाधान ही वस्तू फक्त भगवंताजवळ मिळते, आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही.

२२८. वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूण आहे,
आणि त्याकरिता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 14, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १४ ऑगस्ट २०१४

१४ ऑगस्ट

शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळच. 

 जगात प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडतो आहे. किंबहुना, आनंद नको असे म्हणणारा मनुष्य मिळणारच नाही. म्हणजे मनुष्याला आनंद हवाच असतो. मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद, समाधान, का बरे न मिळावे ? याला कारण असे की, हा शाश्वत आनंद एका भगवंतावाचून दुसर्‍या कुठेही मिळणे शक्य नसल्याकारणाने त्याचे प्रयत्‍न व्यर्थ आहेत. त्या आनंदासाठी, मला भगवंत पाहिजे असे मनापासून वाटले पाहिजे; आणि त्यासाठीच, आपण सर्वांनी नाम घेणे आवश्यक आहे. आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावे, आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील तर कधी दुःखात राहील; कधी तो बरेच दिवस सरळ जाईल, तर कधी मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल; पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील. तुम्ही सर्व माणसे फार चांगली आहात, भगवंताचे नाम घेता, हे मला माहीत आहे. परंतु नामाचे प्रेम तुम्हाला येत नाही हे पाहून मला फार वाईट वाटते. तुमच्यापैकी प्रत्येकाने मनापासून विचार करून ठरवा, की मला नामाचे प्रेम येण्याच्या आड काय येत असेल बरे ? तुमची परिस्थिती आड येते का ? इथे मंदिरात राहणार्‍या माणसांनी तरी नामाचे प्रेम यायला परिस्थिती आडवी येते असे म्हणणे बरोबर नाही. तुम्ही इथे आनंदाने राहा, मंदिरात जेवा, आणि 'राम, राम' म्हणा असे मी सांगतो. पण या लोकांनीसुद्धा नामाचे प्रेम यायला परिस्थिती आड येते असे म्हटले तर बाहेरून येणार्‍या लोकांना मी काय सांगू ?
खरोखर मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो असेच म्हणावे लागते. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. खरा आनंद हा वस्तूमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. आपण भगवंताजवळ आनंद मागावा. त्याने वस्तू आणि आनंद दोन्ही दिले तर फारच बरे. मात्र चिरकाल टिकणारा आनंद हा नेहमी वस्तूरहितच असतो. एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एकजण गाडीतून खाली उतरला; तो पेरू घेण्याच्या नादी किती लागेल, तर आपली गाडी न चुकण्याइतका ! हे जसे खरे, त्याप्रमाणे आनंदाच्या आड येणार्‍या वस्तूंच्या मागे लागणे बरे नाही. आनंद जोडणार्‍या गोष्टींचा आपण विचार करू या, आणि नामस्मरणात राहू या. काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये; उद्या काय होणार याची काळजी करू नये; आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करावे.


२२७. वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पागोष्टीत न घालविता नामस्मरण करावे.
( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 13, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १३ ऑगस्ट २०१४

१३ ऑगस्ट

देहाचे भोग आणि आनंद 

 तुम्हाला आपल्या हिताकरीता दुसर्‍याच्या उपयोगी पडणे जरुर आहे. तुम्ही असे नाही म्हणता कामा की, परमात्म्यानेच याला अशा स्थितीत ठेवला आहे, त्याच्या विरुद्ध कसे जावे ? तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणे शक्यच नाही. पण आपल्या हिताकरीता, म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी, दुसर्‍याच्या उपयोगी पडणे जरूरी आहे. जसे लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्या यजमानाला पोहोचतो, तद्वत लोकांच्या उपयोगी पडले म्हणजे परमात्म्याला पोहोचते.
परमात्म्याने पाठवलेली दुखणी, संकटे, यांत आनंद मानला पाहिजे. एखाद्या आजारी माणसाची देहकष्ट घेऊन शुश्रूषा करायला मी जर सांगितली, तर ते काम तुम्ही आनंदाने कराल. सदगुरुंनी आपल्याला हे काम सांगितले याचा आनंदच वाटेल. मग परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुखणी, संकटे यांचाही तुम्ही का नाही मानू आनंद ? पण परमात्मा आपला सर्वस्वी हितकर्ता आहे असा तुमचा विश्वास आहे कुठे ? परमात्म्यानेच धाडलेली संकटे त्यालाच दूर करायला कशी सांगावीत ? दुसरे असे की भोग हा भोगलाच पाहिजे. आता जर भोगला नाही, तर पुढे तरी भोगावा लागणारच ना ?
देह सुस्थितीत असला म्हणजे देहाचा विसर पडतो असे तुम्ही म्हणता; पण तुम्हाला देहाचा असा विसर कधीही पडत नाही. त्याची आठवण सामान्यपणे असतेच. दुखणे वगैरे आले म्हणजे ती विशेषपणे भासते इतकेच. दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे, दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल. ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल; म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे, आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे.
अनुसंधान कशाला म्हणावे ? उठणे, बसणे, जप करणे, गप्पागोष्टी करणे, चेष्टा-मस्करी करणे, वगैरे क्रियांमधे भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा, हेच अनुसंधान. भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते. 'मी अनुसंधान टिकवीन' असा मनाचा निश्चय करावा. जगाच्या प्रवाहात उलट पोहणे म्हणजे भगवंताचे अनुसंधान टिकवणेच होय. भगवंताचे होऊन प्रपंच करणे ही सर्वश्रेष्ठ कला आहे. भक्ताला ही कला अवगत झाल्याने भक्त भगवंतमय होऊन त्याला सर्व जगतात आनंद दिसतो.

२२६. देहाची सुखदुःखे प्रारब्धावर टाकू या आणि नामस्मरण प्रयत्नाने व प्रेमाने करू या.
( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 12, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १२ ऑगस्ट २०१४

१२ ऑगस्ट

शांति परमात्मस्मरणाने मिळते. 

 नवविधा भक्तीत जशी श्रवण ही पहिली भक्ती, तद्वतच अनेक संतलक्षणात शांती हे पहिले लक्षण आहे. वास्तविक संतांची लक्षणे सांगता येणे कठीण. तरी पण असे म्हणता येईल की शांती हे संतांचे मुख्य लक्षण आहे. पृथ्वी ही क्षमा-शांतिरूप आहे. त्याप्रमाणेच संत असतात. शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतःस्थिती हीच कारण आहे. जिथे स्वार्थ तिथे अशांती. भगवंताहून मी निराळा अशी जिथे द्वैत-भावना, तिथे खरी शांती नाही. अनन्येतेने शांती प्राप्त होते, आणि तीच परमार्थाचा पाया आहे. पैसा आणि लौकिक अशाश्वत आहेत. त्यांच्यात चित्त ठेवल्याने अशांतीच येणार. शांती बिघडायला दोन कारणे आहेत: एक: गत गोष्टींचा शोक, आणि दुसरे: पुढची चिंता. आपल्या बाबतीत घडणारे मागले आणि पुढले हे दोन्ही ईश्वराधीन आहेत अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे सदाचरण. सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही; पश्चाताप करण्याची पाळी येईल. म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीने करावे. भगवंताला साक्षी ठेवून कर्म केले तर हातून दुष्कर्म होणार नाही. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे.
आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी. एका साधूला कुणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवले. तो तेथे स्वस्थ बसून नामस्मरण करीत असे. तिथे लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले. लोकांची ये-जा वाढल्यामुळे त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला, म्हणून त्याने त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवले. साधुची शांती पूर्वीच्या स्थळी होती, तशीच दुसर्‍या ठिकाणीही कायम होती. शेतमालाकाला आश्चर्य वाटले. ज्याचे मन शांत आणि चिंतारहित असते त्याला कुठेही ठेवा, तो शांतच राहणार. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावे. त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा. कर्तेपण आपल्याकडे घेऊ नये. अकर्तृत्वभाव ठेवावा. अशाने शांती येईल. जगच्चालक राम आहे ही भावना दृढ झाली तर शांती येईल. एकनाथांची शांती अगाध होती. नाथांसारखी शांती यायला परमभाग्य पाहिजे. राजेरजवाडे आले आणि गेले, पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले, कारण ते शांतीची मूर्ती होते. ही शांती काय केले असताना मिळेल ? भगवत्स्मरणावाचून अन्य उपायाने ती साधणार नाही. जे जे घडते ते ते भगवद्‌इच्छेने घडते ही दृढ भावना असणे, हेच शांतीचे लक्षण आहे. कर्तृत्वाभिमान शांतीच्या आड येतो. विद्या, वैभव, कला, संपत्ती, संतती, याने शांती येतेच असे नाही. निरपेक्षता हे शांतीचे मूळ आहे. मनाविरूद्ध गोष्ट घडल्यानंतर लगेच भगवंताची आठवण करावी म्हणजे आपोआप शांती येईल. मनातली शांती कायम ठेवून रागावता येते. तसे केल्यास हातून प्रमाद घडत नाही.२२५. शांती परमात्मस्मरणाने मिळते. ते स्मरण अखंड ठेवावे आणि खुशाल प्रपंच करावा.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 11, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ११ ऑगस्ट २०१४

११ ऑगस्ट

समाधान भगवंताशिवाय कोठेही नाही. 

 खरोखर, जे आपल्या बुद्धीला पटते आणि अनुभवाला येते, ते सत्य आहे असे धरून चालायला हरकत नाही; मग त्याच्या आड कोणीही येत असेल तरी त्याची पर्वा आपण करू नये. पण सत्य अनुभवाला यायला आपली बुद्धी स्थिर पाहिजे. हल्ली जगात बुद्धीभेद फार झाला आहे; अशा वेळी माणसाची बुद्धी स्थिर राहाणे फार कठीण झाले आहे. अगदी अत्यंत सदाचाराने वागणार्‍या माणसाचीसुद्धा बुद्धी केव्हा फिरेल हे सांगता येणार नाही. केवळ शास्त्र सांगते म्हणून अमुक एक सत्य आहे असे धरून चाला, असे मी म्हणत नाही; मी सांगतो तेच सत्य आहे असे तुम्ही म्हणा, असेही मी म्हणत नाही; तुम्ही आपल्या स्वतःच्या विचारानेच ठरवा की, जीवनात तुम्हाला समाधान पाहीजे ना ? ते समाधान भगवंताशिवाय दुसरे कोठेही आपल्याला मिळणार नाही हे अगदी निश्चयाने ठरवा. एकदा तुमचा निश्चय कायम झाल्यावर तुमच्या आड कुणीही येऊ शकणार नाही, निश्चय मात्र कायम पाहिजे. या निश्चयाचे बळ किती विलक्षण असते म्हणून सांगू ! एका गावात एक पन्नास-साठीच्या वयाचा बुद्धीमान पण कुत्सित वृत्तिचा माणूस राहात होता. वेडेवाकडे प्रश्न विचारून टवाळकी करण्यात त्याचा हातखंडा होता. एकदा एका साधुचे प्रवचन अगदी रंगात आले असताना एकदम मध्येच उभा राहून तो म्हणाला, "अहो बुवा, ती तुमची भक्तीबिक्ती ती बाजूला ठेवा, देशाला स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगा !" त्यावर साधु शांतपणे बोलला, ते मी सांगतो; पण आता तुमचे उतार वय झाले. काळ केव्हा झडप घालील याचा नेम नाही, तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाधी, देहाची व्याधी, आणि मृत्यूची मगरमिठी, यांतून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार, प्रयत्‍न, तुम्ही केला आहे का ?" हा मार्मिक प्रतिप्रश्न ऐकून टवाळखोर चूप बसला, पण त्याचे विचारचक्र सुरू झाले. दुसर्‍या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला, "आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही. पण आता मी काय करू ते मला सांगा." साधु बोलला, "दोन वर्षे मौन धरून नामस्मरण करावे" त्या दिवसापासून त्याने दृढ निश्चयाने मौन धरले आणि नामजपाचा तडाखा लावला. मौनाचा अवधी संपल्यावर साधुची पुन्हा गाठ पडली तेव्हा तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला, महाराज, मला सर्व मिळाले ! मला नामाने जे समाधान मिळाले त्यापुढे इतर सर्व गोष्टी रद्द आहेत. निश्चयपुर्वक नामस्मरणाचे असे विलक्षण सामर्थ्य आहे !
२२४. नामी ठेवावे चित्त । तेच मानावे सत्य ।
हा निश्चय ठेवा मनात । मन होईल निभ्रांत ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 10, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १० ऑगस्ट २०१४

१० ऑगस्ट

अनुसंधानीं चित्त । सर्वांभूतीं भगवंत ।
हाच माझा परमार्थ ॥   

ज्यास पाहिजे असेल हित । त्याने ऐकावी माझी मात ॥
जो झाला रामभक्त । तेथेच माझा जीव गुंतत ॥
मला रामभक्तावीण काही । सत्य सत्य जगी कोणी नाही ॥
जीवाचे व्हावे हित । हाच मनाचा संकल्प देख ॥
तुम्हास सांगावे काही । ऐसे सत्य माझेजवळ नाही ॥
पण एक सांगावे वाटते चित्ती । रघुपतीवीण शोभा नाही जगती ॥
मुलगी सासरी गेली । तिची काळजी सासरच्याला लागली ।
तैसे तुम्ही माझे झाला । आता काळजी सोपवावी मला ॥
सदा राखा समाधान माझा आशीर्वाद पूर्ण ॥
मी तुमची वेळ साधली । हा ठेवा मनी विश्वास । आनंदाने राहावे जगात ॥
अंतकाळची काळजी । तुम्ही कशाला करावी ? ॥
व्यवहार मी सांभाळला । तरी पण रामाला नाही दूर केला ॥
राम सखा झाला । नामी धन्य मला केला ॥
मी तुम्हास म्हटले आपले । याचे सार्थक करून घेणे आहे भले ॥
नामापरते न माना सुख । हाच माझा आशीर्वाद ॥
मला माझे बोल सत्य । कृपा करील खास भगवंत ॥
मी असो कोठे तरी । मी तुम्हापासून नाही दूर । याला साक्ष रघुवीर ॥
तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण । दुःखी होऊन न करावे अप्रमाण ॥
तुम्ही माझे म्हणविता । मग दुःखी कष्टी का होता ? ॥
उपाधीवेगळे झाला । ऐसे ऐकू द्यावे मला ॥
माझे ज्याने व्हावे । त्याने राम जोडून घ्यावे ॥
दृश्य वस्तूचा होतो नाश । याला मीही अपवाद नाही खास ॥
शेवटी मागणे तुम्हा एकच पाही । नामावाचून दूर कधी न राही ॥
अनुसंधानी चित्त । सर्वांभूती भगवंत ।
नामी प्रेम फार । त्याला राम नाही दूर ॥
मी सांगितल्याप्रमाणे वागावे । राम कृपा करील हे निश्चित समजावे ॥
आता आनंदाने द्यावा निरोप । हेच तुम्हा सर्वांस माझे सांगणे देख ॥
सदा राहावे समाधानी । नको सुखदुःख काळजीचा लेश । माझा झाला जगदीश ।
हा भाव ठेवा निरंतर । राम साक्षी, मी तुम्हापासुन नाही दूर ॥
सर्वांचे करावे समाधान । जे माझे प्राणाहून प्राण जाण ॥
सर्वांनी व्हावे रामाचे । हाच माझा आशीर्वाद घेई साचे ॥
जगाचे ओळखावे अंतःकरण । तैसे आपण वागावे जाण ॥
नामापरते दुजे न मानावे । एका प्रभूस शरण जावे ॥
हा करावा उपाय । तोच समाधानाला नेईल खास ॥
विवेक-वैराग्य संपन्न । सदा असो अंतःकरण ॥
अखंड घडो भगवद्‍भक्ति । आत्मज्ञानप्रतीति ।
ब्रह्मस्वरूपस्थिती । नामी निरंतर जडो वृत्ती ॥
मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा निर्धार । न सोडावा आता धीर ॥
सुखाने करा नामस्मरण । कृपा करील रघुनंदन ॥
२२३. काया गुंतवावी प्रपंचात । मन असावे रघुनाथात ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 9, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ९ ऑगस्ट २०१४

९ ऑगस्ट

ज्याला समाधान तो भाग्यवान. 

 ज्याचे 'हवेपण' जास्त असते तो गरीब जाणावा, आणि ज्याचे हवेपण कमी असते तो श्रीमंत जाणावा. परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते, त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही. ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत. आमचा आधार पैशाचा; तो आज आहे अन उद्या नाही. पायाच जिथे डळमळीत तिथे इमारत कुठे पक्की होईल ? श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असा होऊ नये, याची श्रीमंतानी काळजी घ्यावी. खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरे भाग्य, आणि हेच खरे ऐश्वर्य होय. ज्याला समाधान जास्त, तो जास्त भाग्यवान समजावा. समाधान हे आपले आपल्याला घ्यायचे असते, दुसरा कोणी ते आपल्याला देवू शकत नाही. खरोखर, समाधानासारखे औषधच नाही. ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो. पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता, त्याला विचारले तर तो म्हणाला, "अहो, मला मधुमेह झाला आहे; मी आतून पोखरला गेलो आहे ! त्यापेक्षा तुम्ही बरे." खरोखर, त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणार्‍या ऐश्वर्याची अवस्था आहे. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे. ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झोपडीमध्येही नसेल. असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळे रोगांच्या यादीतून त्याचे नावच निघून गेले आहे ! सध्या जगात पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत. पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेले नाही. जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळे हुरहुर लागते ती सुधारणा कसली ? व्यक्ती काय किंवा समाज काय, यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झाले पाहिजे. चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणे शक्य नाही. हल्लीचे तत्वज्ञान नुसते अभ्यासी आहे, अनुभवाचे नाही; म्हणून त्याने खरे समाधान लाभणार नाही.
खरोखर, प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे. भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुखदुःख येते; आणि सुख तरी काय, दुःखाची कमतरता ते सुख ! राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावेसे वाटते; म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे. पण कुणी असा विचार करीत नाही की, जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का ? याचे उत्तर 'नाही' असेच मिळते. ताजी जिलबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. बुद्धिचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे, भगवंताचा आनंद हा उपाधीरहीत आहे. हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन नामात राहणे हा एकच उपाय आहे.२२२. नामस्मरणाच्या योगाने आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो यात शंकाच नाही.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

August 8, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ८ ऑगस्ट २०१४

८ ऑगस्ट

समाधान ही आंतरिक सुधारणेची खूण आहे.  

 

प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, काही पथ्ये पाळायला लागतातच. नेहमी 'राम कर्ता' ही भावना मनात जागृत ठेवा. शोक, चिंता, भिती, आशा, तृष्णा, ह्या सर्व 'राम कर्ता' म्हटल्याने नाहीशा होतात. ज्या अर्थी त्या अजून नाहीशा होत नाहीत, त्या अर्थी रोग कायमच आहे असे म्हटले पाहिजे. तरी आजपासून, ह्या घटकेपासून नामात राहण्याचा निश्चय करा, आणि 'राम कर्ता' ही भावना दृढ करा. कुणी आपल्याला बरे म्हटले की तेवढ्यापुरते बरे वाटते; ते समाधान म्हणता येईल का ? जे मिळाल्याने दुसरे काही हवेसे वाटणार नाही, ते समाधान. समाधान ही आंतरिक सुधारणेची खूणच आहे. ते मिळवण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरूरी नाही. प्रपंच सोडून कितीही लांब गेले तरी त्याची आठवण येतेच. तेव्हा तसा तो सोडता येत नाही; तो एक 'राम' म्हटल्यानेच सुटू शकेल. कोणतेही कर्म करताना भगवंताच्या नामात करा. त्यामुळे समाधान मिळून, मनुष्य सुखदुःखाच्या द्वंद्वात गुरफटला जाणार नाही. जो कोणी स्वतःचा उद्धार करून घेईल तो खरा ज्ञानी; काही न करणारा हा खरा अडाणी होय.
वासनेचे परिणत स्वरूप म्हणजे बुद्धी होय. जी बुद्धी बंधनामध्ये काम करते ती खरी स्वतंत्र बुद्धी होय. बंधनाला न जुमानता वागणारी, ती स्वैराचारी बुद्धी होय. वासना नष्ट होणे म्हणजे देह्बुद्धी नष्ट होणे होय. प्रापंचिक मनुष्याला विषय टाकता येतील हे शक्य नाही. त्याचे विषयाचे प्रेम रक्तात इतके भिनले आहे की ते काढून टाकायला सूक्ष्म अस्त्र पाहिजे. नाम हे अतिशय सूक्ष्म अस्त्र आहे. ते घेतल्याने विषयाचे प्रेम नष्ट होईल. खरोखर, थोडा मनापासून निश्चय करा. तो परमात्मा फार दयाळू आहे, तो खात्रीने आपल्या निश्चयाच्या पाठीशी उभा राहील. दोष न पाहताही जो दुसर्‍याला जवळ करतो तो दयाळू खरा. भगवंत अत्यंत दयाळू आहे. त्याच्या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम नष्ट होईल, आणि देहावरचे प्रेम नष्ट झाले की संसारावरचे प्रेम कमी होईल, आणि आपल्याला सर्वत्र राम दिसू लागेल. प्रत्येक जीवाची ओढ चिरंतन समाधानाकडेच असते. ती ओढ परमेश्वरप्राप्तीनेच पुरी होऊ शकते. ही प्राप्ती व्हायला अत्यंत सुलभ साधन जर कोणते असेल, आणि त्याचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल, तर एका नामानेच. ज्याने नाम हृदयात अखंड बाळगले, त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल. इतर साधनामध्ये उपाधीमुळे थोडी तरी चलबिचल आहे, नाम हे स्थिर आहे. हे भगवंताचे नाम आवडीने घ्या, श्रद्धेने घ्या, मनापासून घ्या.


२२१. अखंड नामस्मरणात राहा, किती समाधान राहील !

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या