२७ ऑगस्ट
समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे.
सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहील त्यालाच समाधान मिळेल. ज्या घरात समाधान, तेथे भगवंताचे राहणे जाण. जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते, अशा खर्या भावनेने एक वर्षभर जो राहील, त्याला समाधान हे काय ते खात्रीने कळेल. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा, आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असे वाटते. त्याच्या मागे सारे जग लागेल. जगामध्ये आपल्याला समाधान कुणी देत नाही. समाधानाला निष्ठेची अत्यंत जरूरी आहे. पांडवांना वनवासात जे समाधान होते, ते राज्यपदावर असणार्या कौरवांना नव्हते. म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये सुखी राहावे. 'ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ती असो द्यावे समाधान ॥' हेच संतश्रेष्ठ तुकारामबुवांचेही सांगणे आहे. भगवंताची देणगी सर्व बाजूंनी गोड असली पाहिजे. पैसा ही भगवंताची देणगी नव्हे; त्याने तळमळ आणि अतृप्ती होते. खरोखर, समाधान हीच भगवंताची देणगी होय. मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही. आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानले की, जे आहे ते पुरेल. ज्याचे मन समाधानात आहे, त्याचे शरीर कसेही असले तरी चालेल. समाधानालाच खरे महत्व आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे. शिवाय, घेण्याला काही अंतच नाही. कितीही मिळाले तरी आपली मागण्याची बुद्धी कायम राहते. पण आपले सर्व काही दिले की देण्याला अंत आला, म्हणून त्यामध्ये समाधान आहे. आपण उपाधीने झाकले गेलो आहोत. एक एक उपाधी टाकीत गेले तर आपले खरे स्वरूप प्रकट होईल. तिथे खरे समाधान होते.
'राम कर्ता आहे' ही भावना होणे हे वासनेचे मरण होय. मनुष्य काही तरी हेतू ठेवून कर्म करतो. पण प्रत्येक ठिकाणी 'भगवंताच्या इच्छेने काय व्हायचे आहे ते होऊ दे', असे अनुसंधान असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही. आपल्याला सगळे कळते, पण आयत्या वेळेला आपण विसरतो. आलेली ऊर्मी आपण सहन करावी. दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो. तसे अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा, म्हणजे आपण आपल्या ऊर्मींना आवरू शकू. प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे, ते म्हणजे अनुसंधान. हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतले, तरी रोग्याला पथ्ये सांभाळावीच लागतात. शास्त्राने, सद्धर्माने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणे जरूर आहे. अनुसंधानाने जे साधेल, ते शतकोटी साधनांनी साधणार नाही. असे अखंड नामानुसंधान म्हणजेच खरी भक्ती.
२४०. इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते, हाच या युगाचा महिमा आहे.
( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )
No comments:
Post a Comment