August 29, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ ऑगस्ट २०१४

२९ ऑगस्ट

धर्म म्हणजे नीति आणि अध्यात्म यांचा संयोग.

 



द्वैत आणि अद्वैत ही काय भानगड आहे ? भगवंतापासूनच सर्व झाले. एकापासून दोन झाले. आपण मूळ स्वरूपापासून बाजूला झालो म्हणून द्वैत आले. मायेमध्ये सापडले नाही म्हणजे अद्वैतात राहता येईल. माया कल्पनेचीच झाली; तिला कल्पनेनेच मारावी. एकच करावे: अद्वैतात जे राहिले त्यांच्या नादी आपण राहावे. भगवंताचे होण्याकरिता, ज्याने मी वेगळा झालो ते सोडावे. ज्याच्यापासून माया निर्माण झाली, त्यालाच शरण जावे. माया तरी भगवंतामुळेच झाली. जो भगवंताचा होतो, त्याला माया नाही बाधत. मायेचा जोर संकल्प-विकल्पात आहे. अखंड स्मरणात राहावे म्हणजे नाही माया बाधत. भगवंताचे नाम हे स्थिर आहे, पण रूप मात्र सारखे बदलते. प्रत्यक्ष साकाररूप हे काही रूप नव्हे; जे जे आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते ते सर्व रूपच होय. भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही, म्हणून ते पूर्ण आहे. समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव होय. म्हणूनच, जे पूर्ण नाही ते असमाधान. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय, आणि हेच पूर्णपण आहे. जे शास्त्र समाधान देते तेच शास्त्र खरे होय, आणि ज्याने शांती आणि समाधानाचा लाभ होतो तोच खरा धर्म होय. धर्म म्हणजे नीति आणि अध्यात्म यांचा संयोगच.
जो दुसर्‍याच्या हिताकडे न पाहता आपल्या हिताकडेच पाहतो तो स्वार्थीच होय. सुख व्हावे ही मनुष्याला इच्छा असल्यामुळे अस्वस्थपणा येतो. या अस्वस्थतेमधून तळमळ निर्माण होते. या तळमळीमुळे जगाच्या सर्व सुधारणा बाहेर पडतात. पण ह्या सुधारणा जितक्या जास्त होतात, तितके मनुष्याला दुःख जास्तच होते. जी विद्या केवळ नोकरीचे साधन आहे, ती अपूर्णच असते. असली विद्या पोटापुरतीच समजावी. ती समाधान देऊ शकणार नाही. समाधान देणारी विद्या निराळीच आहे. म्हणून लौकिक विद्येला फार महत्व देऊ नये. एखादे वेळी आपल्याला असा संशय येतो की, जगात कुठे सुख, समाधान, आणि आनंद आहे का ? पण तो संशय बरोबर नाही. कारण ज्या गोष्टी जगात नाहीत त्यांचे नावच कसे निघेल ? असमाधान याचा अर्थच 'समाधान नाही ते.' यावरून असे स्पष्ट दिसते की, आधी समाधान असलेच पाहिजे. दिवाळीमध्ये, सुखाचे जे असेल ते आज करतो आणि दुःखाचे जे असेल ते आपण उद्यावर टाकतो. ह्याचा अर्थ असा की आपली काळजी नाहीशी झालेली नसूनही आपण आजचा दिवस चांगला म्हणजे काळजीविरहित घालवितो. उद्या पुन्हा काळजी आहेच ! पण जो भगवंताचे स्मरण ठेवील त्याला काळजी केव्हाच नसते.



२४२. ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणात होते तोच खरा रामराज्यात राहतो.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

No comments:

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या