August 6, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ६ ऑगस्ट २०१४

६ ऑगस्ट

भगवंताचा आनंद हा निरुपाधिक असतो. 

 



प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते, कारण त्याला आनंद हवा असतो. मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही. पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे. तो काही खरा आनंद नाही. उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो, पण ते सुख क्वचितच मिळते. ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहीजे. जगणे जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दुःख का होते ? वास्तविक आपण कशाकरीता काय करतो हेच विसरतो. म्हणजे मनुष्य जगतो आनंदासाठी, पण करतो मात्र दुःख ! दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे तोपर्यंतच असतो, त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद, तो विषय भोगीत असेपर्यंतच टिकतो. दृष्य वस्तू ही सत्य नसल्यामुळे, ती अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. आपण जगामध्ये व्याप वाढवितो, तो आनंदासाठीच वाढवितो. पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने, ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावे. खरा आनंद दृष्य वस्तूंमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. चिरकाल टिकणारा आनंद वस्तूरहितच असतो. म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे बरोबर नाही. विषयाचा आनंद परावलंबी असतो, तर भगवंताचा आनंद निरूपाधिक असतो. स्वानंद स्मरणाव्यतिरीक्त जे स्फुरण तोच विषय समजावा.
खरी आनंदी वृत्ती हीच दसरा-दिवाळीची खूण आहे. हास्य हे आनंदाचे व्यक्त स्वरूप आहे. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद, तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य, आणि आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाव विवेक होय. आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधानच होय. जो निस्वार्थबुद्धीने प्रेम करतो, त्याला आनंद खास मिळतो. घेणरा 'मी' जेव्हा देणारा होतो त्याच वेळेस त्याला खरा आनंद होतो. ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हॄदयात स्वयंभू आहे. वृत्ति वळवून तो चाखला पाहिजे. एकांतात स्वस्थ बसावे, रामाला आठवावे, त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याला म्हणावे, "रामा, माझे मन शुद्ध कर. देहबुद्धी देवू नको. तुझे चरण, तुझे हास्य, मला सदा पाहू दे. तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेव". रामाला प्रेमाने आळवून, राम परमानंदरूप आहे असे जाणून, त्याच्याशी अनन्य होऊन राहावे. मी कुणीच नाही, सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे, या गोड भावनेत आनंदाने असावे.



२१९. मनात प्रत्येक संकल्प उठताच त्यावर रामनामाचा शिक्का असावा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या