June 16, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १६ जून २०१४


१६ जून

परमार्थ श्रद्धेने करावा. 

     


आपण मनुष्यजन्माला आलो, ते भगवत्प्राप्तीकरिताच आलो. आतापर्यंत मी पुष्कळ योनी हिंडलो, भगवंताने आता मला मनुष्य योनीत आणले. 'भगवंता, आता नाही तुला विसरणार' असे कबूल करूनही, आपण जन्माला आलो नाही तर लगेच 'तू कोण ?' असे म्हणू लागलो ! संत आपल्याला 'तोच मी' असे भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात. पण संतांनी जागे केले तरी आम्ही मात्र पुनः तोंडावरून पांघरूण ओढून घेतो, याला काय करावे ? झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे कठीणच जाते. पुष्कळ तीर्थयात्रा केल्या पण होतो तसाच राहिलो; यात दोष गंगेचा का माझा ? 'गंगेच्या काठी कितीतरी लोक येतात, स्नान करातात, पूजाअर्चा करतात, मग हे कलियुग आहे असे कसे म्हणावे ?' असे एकाने म्हटले. त्यावर दुसरा म्हणला, 'याचे प्रत्यंतर समोरच दाखवितो. समोर एक रक्तपिती माणूस बसला आहे. त्याला जो पापी नसेल त्याने कवटाळावे म्हणजे त्याची रक्तपिती जाईल. पण एवढे होईल की जर कवटाळणारा माणूस पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपिती होईल.' असे समजल्यावर जो तो हळूहळू तिथून पसार होऊ लागला ! म्हणजे एवढे नेमनिष्ठ, विद्वान, गंगामाईचे रोज स्नान करणारे, तरी आपले अंतःकरण शुद्ध झाले आहे असे त्या कुणालाच वाटले नाही ! तेवढ्यात वर्‍हाडकडला एक गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातातली काठी टेकीत टेकीत येत होता. त्याची निष्ठाच अशी की गंगेत स्नान केले की सर्व पापे नष्ट होतात. त्याने गंगेत बुडी मारली आणि वर येऊन त्या रोग्याला कडकडून भेटला; आणि आश्चर्य म्हणजे त्या रोग्याचा रोग बरा झाला ! असे हे जे गोरगरीब, भोळेभाळे लोक, त्यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे येते, ते मोठ्या विद्वानांनाही साधत नाही. आपण व्यवहारात पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो. घरुन कचेरीला निघताना वेळेवर आपण पोहोचू अशी अंधश्रद्धा आपली असतेच. कधी कधी आकस्मिक कारणाने आपण कचेरीला पोहोचू शकत नाही, तरीपण आपण भरवसा ठेवतोच ! व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवतो, तेवढी जरी भगवंतावर ठेवली, तरी भगवंत आपल्याला समाधान देईल. परमार्थ पूर्ण समजून तरी करावा, किंवा अडाण्यासारखा श्रद्धेने करावा. पण आपण आहोत अर्धवट; म्हणजे, पूर्ण कळलेले नसून आपल्याला ते कळले आहे असे वाटते. अशा माणसाला शंका फार, आणि त्याचे समाधान करणेही फार कठीण जाते. अमुक एक खरे आहे असे कळूनसुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही, तो मनुष्य खरा अज्ञानी. जे अनुभवाने सुधारले तेच शहाणे भले !




१६८. परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही. पण तेथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या