२९ डिसेंबर, २०२१

गोंदवले

हृदयी नित्य 'रामनाम'
जिथे मनावर गोंदले
तेच पुण्यपवित्र
ग्राम वसे गोंदवले

ब्रह्मचैतन्याचे प्रतिक
गोंदवलेकर महाराज
शतकोटी वंदन त्यांना
पुण्यतिथी निमित्य आज 🙏🌺

📝 मार्गशीर्ष कृष्ण दशमी
२९/१२/२०२१




१४ डिसेंबर, २०२१

निघालो घेऊन दत्ताची पालखी

गोष्ट छोटी आहे पण अनुभूती मोठी मिळाली म्हणून सांगतोय/लिहितोय. पारायणाचा आज ४ था दिवस. योगींच्या आशीर्वादाने, जमेल तेवढे आवश्यक  नियम पाळून पुढे  जाणे क्रमप्राप्त आहे. दिनक्रमात थोडासा आवश्यक बदल ही झाला आहे.

तर नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी ८ ला बेलापूर बसस्थानकात आलो. ८:०३ ची नेहमीची ठरलेली ठाणे बस आली. सगळा नित्यक्रम. बस मधे चढणारे प्रवासी तेच, बस तीच. नेहमीच्या माझ्या जागेवर म्हणजे चालकाच्या लगेचच मागे असणाऱ्या सिटवर बसलो.
फक्त एक गोष्ट नव्हती ती म्हणजे नेहमीचे चालक, वाहक

बस पनवेल- सायन महामार्गावर लागल्यावर बेलापूरखिंड गेल्यावर अचानक ऐकू यायला लागले 'निघालो घेऊन दत्ताची पालखी'. 

चालकाने आपल्या मोबाईलवर दत्तप्रभूंची गाणी लावली होती. मी लगेचच मागे असल्याने मला ही त्याचा लाभ झाला होता. नेहमीचा उतरायचा थांबा येईपर्यंत ३०-४० मिनिटात अनेक गाणी ऐकता आली.

उतरल्यावर एक गोष्ट आठवली ती अशी की गुरूचरित्र पोथी वाचन करतानाच्या नियमात असा उल्लेख केला गेलाय की दत्त गुरुंना संगीत प्रिय आहे तेंव्हा शक्य असेल त्या पद्धतीने अभंग / भक्ती गीते म्हणावीत. 

रोजच्या दिनक्रमात जी गोष्ट माझ्याकडून  राहून गेली ती गुरुंनीच घडवून आणली यात शंका नाही.
 म्हणून सुरवातीला म्हणल्याप्रमाणे गोष्ट छोटी आहे, अनुभूती मात्र मोठी आहे.

सातजन्मांची ही लाभली पुण्याई
म्हणून जाहलो पालखीचे भोई
शांत मायामूर्ति पहाटेसारखी
निघालो घेऊन दत्ताची पालखी..

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌺

#मोक्षदा_एकादशी 📝
१४/१२/२१ 

९ डिसेंबर, २०२१

दत्तजयंती

.
दत्तजयंतीच्या आधी अनेकजण श्री गुरु चरित्राचे पारायण करतात. श्री दत्त जयंती १८ डिसेंबरला ( शनिवारी)  आहे म्हणजे १२ डिसेंबर रविवार पासून सुरु करुन शनिवारी दत्त जयंतीला सप्ताह पूर्ण करता येईल

पोथीत जे नियम दिलेत त्यात असे म्हणले आहे की पारायणाची  सुरुवात शक्यतो 'शनिवारी ' करावी. 
योगायोगाने शनिवारी ११ डिसेंबरला गुरुचेच पूर्वा-भाद्रपदा नक्षत्र आहे.  ज्यांना पारायण करायचे आहे त्यांनी अवश्य ११ डिसेंबर ते १७ डिसेंबर करावे आणि १८ ला श्री दत्त जयंती साजरी करावी.

श्री गुरूदेव दत्त 🙏🌺

देवा तुझ्या द्वारी आलो 📝
www.kelkaramol.blogspot.com
 

२३ सप्टेंबर, २०२१

ज्योतिष शास्त्र "- बाण लागला तर लागला

. ."ज्योतिष शास्त्र "- बाण लागला तर लागला 🏹

अगदी अशीच  एक प्रतिक्रिया मध्यंतरी मला  मिळाली. त्यावर मनात आलेले हे विचार.

हे एक दैवी शास्त्र आहे.कुणी कितीही याचे ज्ञान घेतले / अभ्यास केला तरी तो कमीच आहे कारण याची व्याप्ती समुद्रा सारखी  प्रचंड आहे. त्यामुळे मी " अगदी प्रत्येक वेळी, कुठल्याही प्रश्णाचे अगदी अचूक भविष्य सांगू शकतो " असा गर्व कुठलाही ज्योतिषी करत नाही/कुणी करत असेल तर तसा करु नये. 
त्यामुळे या शास्त्राबद्दल एखाद्याला ' बाण मारणे ' असे वाटणे चुकीचे नाही. कारण एवढ्या व्यापक असलेल्या या शास्त्रात एखाद्या प्रश्णाबाबत दोन ज्योतिषी त्यांच्या पद्धतीने वेगळे नियम लावू शकतात ,जसे एखाद्या कोर्ट केसमधे दोन वकील कायद्याचे अनेक बाण सोडतात. पण विजय एकाचाच होतो. मग हरलेला पुढच्या न्यायालयात जातो तिथे कदाचित परत कायद्याचे अनेक बाण सोडले जातात.
साधारण तसेच

मग तरीही ज्योतिषांकडे मार्गदर्शनासाठी का जावे?  किंवा का जातात.

बाण अचूक लागेल हे जरी सांगता आले नाही तरी निदान कुठल्या दिशेला बाण सोडायचे हे कळले तरी आयुष्याच्या वाटचालीत खूप फरक पडतो.

खरं म्हणजे काही कुलकर्णी / जोशी * घराण्याचा हा परंपरागत व्यवसाय , उदरनिर्वाहाचे साधन हे होते.  अजूनही खेडेगावात  लोकं यांच्याकडे मार्गदर्शन मिळावे म्हणून जातात. यात त्यांना फार दक्षिणा मिळते असेही नाही पण चरितार्थ चालू शकतो. आज त्यांची पुढची पिढीच ( अपवादात्मक)   चार पुस्तकं  शिकली काय या शास्त्राला नावे  ठेऊ  लागली हे दुर्देव.

तर जोपर्यंत लोकांना
१) अमेरिकेत/ परदेशात  २४ तासाच्या आत जन्मलेल्या बाळाचे नाव ठेवण्याची अद्याक्षर पाहिजे असतील
२) नवीन गाडी,घर, पायाभरणी, दुकान चालू करणे ,वस्तू खरेदी करणे या करता लागणारा मुहुर्त माहिती पाहिजे असेल
३) शेतकरी बंधूंना पावसाळी वाहन समजून घ्यायचे असेल
४) अनेक धार्मिक गोष्टींसाठी,  लग्न- मुंज यासाठी मुहूर्त लागणार असतील
५) आपल्या मुला-मुलींचे / बेसिक शिक्षण/ परदेश शिक्षण/ नोकरी-का व्यवसाय  / लग्न / संसार असे प्रश्ण मनात येत असतील  आणि याबाबत सल्ला हवा असेल
६) कोट्यावधी फी वकिलाकडे भरून ही मला जामीन मिळेल का / माझी आरोपातून सुटका होईल का / मला शिक्षा होईल का? हे जाणण्याचा प्रयत्न करु असे वाटेल
७) मी  कुठल्या दैवताची  उपासना करावी ? हे जाणून घ्यायची इच्छा होत असेल
८) सध्याचा वाईट काळ केंव्हा बदलेल?  हे जाणून घ्यायची इच्छा होईल, आणि असेच इतर अनेक प्रश्ण पडतील तेंव्हा

जगाच्या अंतापर्यत कुलकर्णी/ जोशी*  ( प्रातिनिधीक नावे * ) आपले  बाण सोडण्याचे काम इमाने इतबारे करतच राहतील यात शंका नाही .

आधी उल्लेख केल्याप्रमाणे या बाणांना योग्य दिशा देण्याचे काम मात्र सर्वच ज्योतिषांनी प्रयत्नपूर्वक केले पाहिजे

शहाण्या माणसाने
" कोर्टाची पायरी चढू नये " असे म्हणले गेले आहे, पण ज्योतिषाच्या घरची ( किंवा कार्यालयाची)   पायरी चढू नये असे कधी ऐकलंय?

फरक स्पष्ट आहे

तर  या ना त्या कारणाने मार्गदर्शनासाठी माझ्या घरची पायरी चढलेल्या, पायरीवर असणा-या आणि पुढेही येणा-या सर्वांना सदर लेखन कृतज्ञतापुर्वक समर्पित. 📝 🙏

( 🎣) अमोल
भाद्रपद. कृ द्वितीया, रेवती नक्षत्र
२२/०९/२१
kelkaramol.blogspo

१० सप्टेंबर, २०२१

लालबागचा राजा, मुंबईचा राजा २०२१

ही शान    कुणाची ??
लालबागच्या राजाची
मोरया  

( दर्शन घेण्यासाठी व्हिडिओ चालू करा) 



मुंबईचा राजा २०२१
( दर्शन घेण्यासाठी व्हिडिओ चालू करा) 

https://youtu.be/

९ सप्टेंबर, २०२१

हे क्षण माझे मला जगू द्या

.साधारण २ वर्षांपूर्वी  'मुंबई मेट्रो'  ची एक जहिरात लागायची, त्यातील एक वाक्य फारच लक्षवेधी होते

   "     हे क्षण माझे मला जगू द्या  "


२०२० आणि आता २०२१ च्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, आज गणपती बाप्पाला हेच मागणे मागावेसे वाटते

बाप्पा, 
ते गणेशोत्सवातील सर्व क्षण  परत आम्हाला मिळवून द्या

मिरवणूक, मंडळांचे देखावे, लांबचलांब रांगा, एकमेकांच्या घरी जाऊन दर्शन, सामुहिक आरत्या, प्रसाद, सहस्त्रावर्तन, विविध कलाकारांचे कार्यक्रम आणि बरच काही

ढोल, लेझीम , ताशा
निनादू देत ही आशा
भाग्याची येऊ दे दशा
तुझ्याच कृपा दृष्टीने 

सर्व कलाकारांना तुझी सेवा करायची संधी सतत मिळू दे अशी मनापासून प्रार्थना 

तुज नमो 🙏🌺

#तूच_गणेशा_दैवत_माझै
भाद्रपद शु.तृतीया
०९/०९/२१

kelkaramol.blogspot.com 📝 

८ सप्टेंबर, २०२१

गणेश पूजा

गणेश चतुर्थी निमित्य अनेकांना पूजेसाठी गुरुजी मिळत नाहीत. कालनिर्णय ने हे खास अँप तयार केले आहे.

 प्ले स्टोर वरुन घेऊ शकता



३० ऑगस्ट, २०२१

श्रीकृष्ण जन्माष्टमी

.आज श्रीकृष्ण जन्माष्टमी 🌷

आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे आज चंद्र वृषभ राशीत रोहिणी नक्षत्रातच असणार आहे. जे श्रीहरींचे  जन्म नक्षत्र आहे.

आज अनायसे श्रावणी सोमवार, त्यामुळे सोमवारचा मालक चंद्र संपूर्ण दिवस रुलिंग मधे. 


शुक्राची रास, चंद्राचे नक्षत्र यामुळे हे नक्षत्र रसिकता देते जी श्रीकृष्णाच्या जीवनात ही दिसून येते. चंद्राचे पण हे सगळ्यात आवडते नक्षत्र.

गोकुळाष्टमीच्या सर्वांना ग्रह-नक्षत्रांकित शुभेच्छा 
💐💐🙏

#गोकुळाष्टमी 📝 

२७ ऑगस्ट, २०२१

राशी भविष्य - सप्टेंबर २०२१ ( मेष रास)

.श्री गणेशाय नम: !

राशी भविष्य -सप्टेंबर २०२१ 
( येणारा महिना कसा जाईल) 


रास - मेष
कार्ड: व्हिल आँफ फाँरच्यून ( wheel of fortune) 


( टिप: याठिकाणी चित्रावरून या राशीच्या लोकांनी आपल्या मनात जो विचार येतोय त्याची नोंद  करावी. महिन्याच्या शेवटी तसे झाले का ते कळवावे. 

एका राशीची लाखो लोक असतात. प्रत्येकाचे भविष्य एकाच साच्यात काही शब्दांत  ठेवणे योग्य नाही. पण चित्र बघून प्रत्येकाच्या मनात विचार वेगळे येऊ शकतात आणि त्या प्रमाणे त्यांच्या आयुष्यात तसे घडते का हे पाहण्याचा हा प्रयत्न)

इतर राशीच्या व्यक्ती ज्यांना आपल्या राशीचे कार्ड पहायचे असेल आणि अगामी महिना कसा जाईल याचा अंदाज घ्यायचा असेल तर खालील नंबर वर व्हाटसप करा.

अमोल केळकर 
९८१९८३०७७०
a.kelkar9@gmail.com 📝

#Tarot_card_reading
 

२७ जुलै, २०२१

भक्ती


कस्टडीतल्या देवळा बाहेर
फूल जास्वंदीचे वाहिले 
भक्तीला नसते कुंपण
अख्या शहराने पाहिले

मोरया 🌺🙏
अंगारकी संकष्टी
२७/०७/२१ 📝

( फोटो सौजन्य: श्री गिरीश देशपांडे, सांगली)

२० जुलै, २०२१

आषाढी एकादशी


दिंड्या नव्हत्या, पालख्या नव्हत्या
जयघोष नव्हता नामाचा
मार्गावरच्या दगड-धोंड्याना
स्पर्शही नव्हता पावलांचा

वर्तुळातून धुळ न उधळली
रिंगणातल्या अश्वांची
चलबिचलता तशी जाहली
वारक-यांच्या श्वासांची

कमरेवरती हात ठेऊनी
'श्रीहरी' पाहतोय हे सगळं
पुढल्या वेळी मात्र देवा,
काहीतरी घडू दे रे वेगळं

'अवघी दुमदुमदे पंढरी
'अवघा होऊ दे एक रंग'
हेची दान देगा बा विठ्ठला
पांडुरंग, पांडुरंग ,पांडुरंग
🙏🌷🙏🌷🙏🌷

📝 २०/०७/२१
आषाढी एकादशी
"देवा तुझ्या द्वारी आलो"

२ जुलै, २०२१

शुभ्र बुधवार व्रत

."शुभ्र बुधवार व्रत"

आपल्याकडे काही प्रापंचिक  हेतू पूर्ण करण्यासाठी काही अनुभवसिद्ध  उपाय / व्रत सांगितले आहेत. ब-याचदा ते सोपे वाटतात पण करायला गेलं की कळतं सोपे नाहीत. उदा. अमावस्येनंतर येणा-या द्वितीयेला ' चंद्र दर्शन ' हा धनप्राप्तीचा एक प्रकार सांगितला आहे. ' अरे यात काय फार मोठं आहे, घेऊ दर्शन ' असं ठरवून ही शु. द्वितीयेच्या चंद्राचे दर्शनही सोxपी गोष्ट नाही हे अनेकांनी अनुभवलं असेलच. 
धनप्राप्तीसाठीचा आणखी एक उपाय सविस्तर इथे देत आहे. इच्छूकांनी अवश्य करावा. 



हा उपाय मुद्दाम आज शुक्रवारी देत आहे. याची दोन कारणे आहेत. सगळ्यात महत्वाचे आणि मुख्य कारण म्हणजे आज बुधाचे 'रेवती' नक्षत्र आहे.
 दुसरे आज देण्यास कारण की हे वाचून ज्यांना 'शुभ्र बुधवार व्रत ' करायचे आहे त्यांना तयारी साठी ( मनाच्या ) थोडा वेळ मिळेल

व्रतविधी:-
११ पांढरे बुधवार करणे हा बुध उपासनेचा महत्वाचा भाग आहे.या दिवशी उपवास ठेवावा व उपवासाचे फक्त पांढरेच पदार्थ खावेत. तसेच हे पदार्थ पूर्णपणे अळणी करावेत म्हणजे त्यात तिखट- मीठ अजिबात घालू नयेत. पहिल्या बुधवारी जो पदार्थ खाल तोच पदार्थ पूर्ण अकरा बुधवारी खावा.

या व्रतात पांढऱ्या रंगाचे महत्व फार आहे. महत्वाची गोष्ट अशी की बुधवार हा महालक्ष्मीचा खास वार आहे. महालक्ष्मीची पूजा ही बुधाची पूजा म्हणून करावयाची असते.

बुधवारी प्रात: काळी उठून नित्यकर्मे उरकावीत. नंतर जमीन सारवून अथवा फरशी असल्यास स्वच्छ पुसून त्यावर पाट मांडावा. पाटावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा तसेच पाटाभोवती रांगोळी काढावी.कलशावर श्रीलक्ष्मीची मुर्ती/ तसबीर ठेवावी व शेजारी बुधाची मूर्ती अथवा चित्र ठेवावे.

" श्री लक्ष्मी देव्यै नम: " या मंत्राने श्री लक्ष्मीची पांढरी फुले वाहून पूजा करावी.देवीला दूध - साखर या पांढऱ्या वस्तूंचाच नैवेद्य दाखवावा.पूजा करताना मन एकाग्र व भक्तिपूर्ण ठेवावे.

बुध हा वाचेचा ग्रह असल्याने त्या दिवशी जरूरीपेक्षा जास्त बोलू नये. त्यादिवशी आचरण अत्यंत शुध्द ठेवावे. दिवसभर पांढरीच वस्त्रे नेसावीत. संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करुन उपवास सोडावा.उपवास सोडताना तिखट- मीठ न घातलेला दहीभात अथवा ताकभात खावा.
सकाळ संध्याकाळ देवीची पूजा झाल्यावर आरती म्हणून बुधाचा हा मंत्र म्हणून प्रार्थना करावी

बुधं त्वं बुद्धीजनको बोधद: सर्वदा तृणाम्!
तत्वावबोधं कुरुषे सोमपुत्र नमो नम:!
🙏🌼

उद्यापन: १२ व्या बुधवारी व्रताचे उद्यापन करावे. सुवासिनीला जेवावयास बोलवावे. जेवणात पक्वान्न म्हणून दुधातील गव्हल्यांची अथवा शेवयांची खीर करावी. स्वयंपाक आखणी न करता नेहमी सारखा करावा. सुवासिनीला पांढरे कापड, पांढ-या फुलांची वेणी, दक्षिणा द्यावी.
 हे व्रत करताना अनेक अडचणी येतात, मनस्ताप होतो, तरीही श्रद्धेने व निष्ठेने हे व्रत पूर्ण करावे. हे व्रत म्हणजे एक तपश्चर्याच असल्याने ती पूर्ण झाल्यावर तिचे इष्ट फळ मिळतेच.
व्रत करताना स्त्रियांना अडचण आल्यास तो बुधवार जमेस न धरता पुढचा धरावा.

विद्याप्राप्तीसाठीही श्री गणपतीचे ११ बुधवार करतात. या व्रताने श्रीगणपती बुधाच्या रुपात प्रसन्न होतात व विद्येतीस भरभराट होते.

माहिती: 'श्री शुभ्र बुधवार व्रतकथा' पोथीतून साभार 📝

२ जुलै २०२१
'रेवती' नक्षत्र   

दिनविशेष - २ जुलै

सिध्दयोगी स्वामी राम - जन्मदिवस

पाश्चात्य वैज्ञानिकांना आपला आणि आपल्या क्षमतांचा अभ्यास करू देण्यास परवानगी देणार्‍या मोजक्या योग्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. १९६०च्या दशकात मेनिंगर क्लिनिकमधील वैज्ञानिकांना त्यांनी आपली तपासणी करण्यास अनुमती दिली. हृदयाची गती, रक्तदाब, शरीराचे तापमान नियंत्रित करणार्‍या प्रक्रिया अनैच्छिक (व्यक्तीच्या ताब्यात नसणार्‍या) मानल्या जातात; स्वामी रामांचे या प्रक्रियांवर नियंत्रण कसे आहे याचा अभ्यास मेनिंगर क्लिनिकमधील वैज्ञानिकांनी केला.

फकिरप्पा हलक्टी - जन्मदिवस 

१ जुलै, २०२१

निघालो घेऊन संतांची पालखी

.निघालो घेऊन 'संतांची पालखी' 🚩

महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा अभूतपूर्व सोहळा म्हणजे अनेक संत महात्म्यांच्या दिंडी आषाढी एकादशी साठी पंढरपूर कडे प्रस्थान होणे. जिथून पालखी निघते ते ठिकाण आणि पंढरपूरला पोहोचायला लागणारे दिवस यानुसार पालखी प्रस्थानाची " तिथी " ठरलेली असते.

त्यानुसार आज संत तुकाराम महाराजांची पालखी देहू मधून निघायचा तिथीप्रमाणे दिवस. 

 त्याच्या दुस-या दिवशी निघते देहू पासून जवळच असणा-या आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी.

 तसेच महाराष्ट्रातील अनेक प्रमुख पुण्यभूमीतून जसे शेगाव, नाशिक, सज्जनगड इथून निघालेल्या पालख्या पंढरपूर कडे त्या त्या तिथीला निघतात आणि आषाढी एकादशीच्या आधी सुनियोजित वेळेत पोहोचतात.
वारकरी भक्तांची मनस्थिती जणू

मागे पुढे अवघा दिसे रिता ठाव
ठेवूनि पायी भाव वाट पाहे!

अशी होते.

अनेक वर्षाची ही परंपरा. लहान मुले खेळायला बाहेर पडली की, एकमेकांना भेटल्यावर जसे आनंदित होतात तसेच हे भक्त ही

खेळ मांडियेला, वाळवंटी  घाई
नाचती वैष्णव भाई रे!

विठूरायाच्या गजरात हे सगळे इतके रममाण होतात की त्यांचा
क्रोध अभिमान गेला पावटणी
एक एका लागतील पायी रे !

सगळ्यांच्या उद्देश एकच,
जाऊ देवाचिया गावा
घेऊ तेथेचि विसावा! 
देवा सांगे सुख दु:ख
देव निवारील भूक!

हाच विश्वास वारक-यांना पुरेसे ठरतो पुढच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी

मुंबईतील डबेवाल्यांचे जसे मँनेजमेंट उत्तम तसेच या दिंडीचेही. व्यवस्थापनाचा उत्तम नमुना इथेही दिसून येतो

 देहू, आळंदीच्या दिंड्या या पुण्यापासून दोन वेगळ्या मार्गाने पंढरपूरला पोहोचतात. हे मला महाबळेश्वरला उगम पावलेल्या कृष्णा - कोयना जशा वेगळ्या मार्गाने निघून कराडला जसा त्यांचा 'प्रिती संगम' होतो अगदी तसे वाटते. 

कृष्णा कोयना - भगिनी
तुकोबा- ज्ञानेश्वर - बंधू

प्रिती- भक्ती संगमाचे खूप छान उदाहरण यात बघायला मिळते. 
इतर पालख्या यात सामील होणे म्हणजे इतर नद्या कृष्णा- कोयनेला मिळण्यासारखे

"भेटी लागे जीवा, लागलीस आस"
अशी अवस्था होऊन जेंव्हा माऊलीच्या भेटीचा क्षण येतो तेंव्हा सगळ्यांना अगदी धन्य झाल्यासारखे वाटते.

आणी शेवटी उरते ते नतमस्तक होणे

काय तुझे उपकार पांडुरंगा
सांगो मी या जगामाजी आता!

जतन हे माझे करोनि संचित
दिले अवचित आणूनियां !

घडलिया दोषांचे न घाली भरी
आली यास थोरी कृपा देवा!

नव्हते ठाऊकें आइकिलें नाही
न मागता पाही दान दिले!

तुका म्हणे याच्या उपकारासाठी
नाही माझें गाठी काहीं एक!
//

'मानस पूजे' सारखी यंदाही परिस्थितीमुळे आषाढीपर्यत 'मानस वारी ' करावी लागतीय. हरकत नाही तरीपण

'विठ्ठल आवडी प्रेमभावो " 🚩🙏🌺

देवा तुझ्या द्वारी आलो 📝
ज्येष्ठ कृ. सप्तमी
१ जुलै २०२१
www.kelkaramol.blogspot.com 

दिनविशेष- १ जूलै


(साभार: तत्वमसी यूथ क्लब) 

३० जून, २०२१

दिनविशेष - ३० जून

. .

दादाभाई नौरोजी ( स्मृती दिन)

दादाभाई नौरोजी (1825-1917) ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये निवडून येणारे पहिले आशियाई नेते होते. पण त्यांची ओळख एवढीच नाही. महात्मा गांधी यांच्याआधीचे ते देशातील प्रमुख नेते होते. जगभरात त्यांना जातीयवाद आणि साम्राज्यवादाविरोधात लढणारे नेते, म्हणूनही मान होता.

भारत रत्न सी.एन.आर.राव - जन्मदिवस

चिंतामणी नागेश रामचंद्र राव, ऊर्फ सी.एन.आर. राव हे एक कन्नडभाषक भारतीय रसायनशास्त्रज्ञ आहेत. घन-स्थिती रसायनशास्त्र व संरचनात्मक रसायनशास्त्र हे त्यांचे अभ्यासाचे प्रमुख विषय आहेत. त्यांचे आजपर्यंत चौदाशे शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांनी एकूण ४५ पुस्तके लिहिली आहेत.

( माहिती संग्रहित, चित्र साभार तत्वमसी यूथ क्लब)


२९ जून, २०२१

ज्योतिष अभ्यासकास पत्र

. .
 'ज्योतिष पदवीसाठी' प्रवेश घेऊ इच्छिणा-या  अभ्यासकास  माझ्याकडून  एक पत्र: -📝

ज्योतिष पदवी आता घेता येईल  अशी  आशा निर्माण  झाली असली , अजून अभ्यासक्रम काय आहे  , काय काय विषय समाविष्ट होणार याबाबत अजून विस्तृत माहिती नसली   , नेहमीप्रमाणे  विषय समजवून न घेताच  अनेक संस्था विरोधासाठी उभ्या ठाकल्या असल्या, तरी या विषयात पदवी घ्यायची तुझी इच्छा झाली याबद्दल  सर्वप्रथम अभिनंदन 💐
 ज्योतिष या विषयाची व्याप्ती एवढी  प्रचंड आहे की दोन वर्षाच्या अभ्यासक्रमात आपण जेवढे ज्ञान घेऊ ते कमीच असणार आहे  आणि  हे मनात सुरवातीपासूनच पक्के ठेवावेस असे सांगावेसे वाटते  . 

खगोल शास्त्र , गणित ,  विज्ञान  यातील  अनेक सिध्दांत शिकून जेव्हा तुला पदवी मिळेल  ती  मात्र ' आर्ट'/ किंवा 'कला' शाखेची  ( MA ) .  ही गोष्टच मला  विशेष वाटते  आणि  या शास्त्रासंबंधीचे  अगदी संक्षिप्त   वर्णन करायला  पुरेसी ठरते .  

असं म्हणतात की " सुखी सोनाराकडे आणि दु:खी ज्योतिषाकडे " . तेव्हा आपल्याकडे आलेल्या  जातकाची मुळातच  मनस्थिती ठीक नसते . अशावेळी मार्गदर्शनासाठी आलेल्या जातकाची अडचण समजवून घेणे ,संभाषणातून त्याला बोलते करणे  ही एक कला आहे  आणि यात प्राविण्य मिळवणे तसे सोपे नाही . अर्थात येणारा जातक इतके ज्योतिष  असताना  आपल्याकडेच येणे ही पण एक नियतीची योजना असते . कारण त्यावेळी त्या जातकाला भेडसावणा-या प्रश्नाचे योग्य उत्तर ( होकारार्थी किंवा नकारार्थी  जे प्रत्यक्षात घडणार असेल ते  )  आपणच योग्य प्रकारे देऊ शकणार असतो. तो जातक ही ज्या  ग्रहस्थितीवर येतो , त्यावेळची ग्रहांची स्थिती प्रश्नाचे उत्तर शोधायला   मदत करत असते. अर्थात हे सगळे तू  शिकशीलच. 

आणखी एक महत्वाची गोष्ट  जस जस अधिक अधिक पत्रिका सोडवायला लागशील  तसतस तुझ्या  लक्षात येईल  की पत्रिकेतील ग्रह ही आपल्याशी बोलत असतात. अर्थात ते सांकेतिक भाषेत. ती  भाषा अवगत करणे ही पण एक ' कला आहे ' .  पत्रिकेत  दिसताना  फक्त १२ राशीत , १२ स्थानात  , १२ ग्रह  असले  तरी  ग्रहांची  एकमेकांशी असलेली केमेस्ट्री , कुणाची  युती, कुणाची आघाडी , कोण कुणावर लक्ष ठेऊन आहे ? कोण   कुणाच्या घरात  भाड्याने आहे  , वरवर न दिसणा -या  नवमांश कुंडलीत  हेच ग्रह कशा पध्द्तीने भूमिका पार पाडत आहेत  ,  पत्रिकेतील निर्णायक घटक कोणता , वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात कोणता ग्रह महत्वाचा ठरणार हे सगळं 
' कले कलेने'  तुझ्या लक्षात येईलच.

तुझा जातक तुझ्याकडून  योग्य मार्गदर्शन घेऊन  समाधानाने जाऊन  तू  त्याच्यासाठी "फॅमिली ज्योतिष"  होशील या सदिच्छा 

हे शेवटचं सांगणं.वेळोवेळी तुला  अनेक गोष्टीकडे  दुर्लक्ष  करावे लागेल. त्या गोष्टी कुठल्या  हे मी तुला आता सांगणार नाही कारण त्या गोष्टींचा तू स्वतः सामना करून अनुभसिद्ध व्हावेस आणि अशा प्रसंगाला तोंड देण्यास तू  खंबीर व्हावेस असे मला वाटते. 

आता तुझ्या मनात आलेला सगळ्यात महत्वाचा प्रश्न.  मी  कोण  हे सगळं लिहिणारा ?

तर  मित्रा मी पण  एक ज्योतिषी अभ्यासकच. आजपर्यत  तरी  कुठलीही  ज्योतिष उपाधी/ पदवी नसणारा . 

थोडक्यात  मी  जरा  
'  लिटील - जास्त - अभ्यासक ' तुझ्यापेक्षा 

आता ते लिटिल चँम्प डायरेक्ट परीक्षक बनू शकतात तर

एवढा  सल्ला देऊच शकतो ना भौ मी तूला 😜 

( अजूनही लिटिलच पण चॅम्प नसणारा  ज्योतिष अभ्यासक )  अमोल  केळकर 📝

ज्येष्ठ कृ.पंचमी
२९ जून २१  

दिनविशेष - २९ जून

। 
कॅप्टन  विजयंत थापर -बलिदान दिन
 कारगिल युध्दात वीरमरण

क्रांतिकारी राजेंद्रनाथ लाहिरी- जन्म दिवस
काकोरी कट आणि दक्षिणेश्वर बॉम्बस्फोटामागील सूत्रधार. ते हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे सक्रिय सदस्य होते


स्वामी ध्रुवानंद सरस्वती पुण्यतिथी - आर्य समाजाचे सदस्य, गोहत्या बंदी साठी विशेष आंदोलन केले

प्रशांतचंद्र महालनोबिस - जन्मदिवस ( २८ जून स्मृतीदिन)
प्रसिद्ध भारतीय संख्याशास्त्रज्ञ





२८ जून, २०२१

दिनविशेष २८ जून

वह धन्य देश की माटी है, जिसमें भामा सा लाल पला।
उस दानवीर की यश गाथा को, मेट सका क्या काल भला॥

२७ जून, २०२१

रविवारची संकष्टी भाग २

. .रविवारची संकष्टी - भाग २

गेल्या वर्षी १० मे ला रविवारी संकष्टी होती. तशी ती ३१ जानेवारी २१ ला आली ,त्यानंतर आता रविवारी २७ जून ला आहे आणि परत यावर्षी आँक्टोबर २४ ला येत आहेत


एकंदर निभावण्यास कठिण अशी रविवारची संकष्टी असते हे नक्की. या बाबतचे माझे मनोगत भाग-१ मधे लिहिले आहे. त्याची लिंक सोबत दिली आहे. इच्छूकांनी अवश्य वाचावे.

आज या रविवारच्या संकष्टी निमित्य थोडे वेगळे अनुभव. श्री गणेश हे संकष्टीचे ( कृ. चतुर्थी) उपास्य दैवत. मात्र रविवार आणि गणेश दर्शन हे समीकरण मात्र ब-याच वेळा, अनेकांनी  अनुभवलं असणार.
लहानपणी सांगलीत असताना रविवारी संकष्टी असली की बागेतला गणपती का संस्थानच्या गणपतीला ? असा प्रश्ण पडायचा आणि मग दोन्ही ठिकाणचे दर्शन घेणे हा मार्ग काढला जायचा. मात्र रविवारी संकष्टी नसली आणि जरी कारखान्याहून सांगलीत येणे झाले की दोन पैकी एका मंदिरात जायचेच हे हळूहळू इतके पक्के झाले की शिक्षण, नोकरी निमित्य सांगली सोडून गेल्यावर सुट्टीला कधी येणे झाले तर यापैकी एका बाप्पांचे दर्शन घेणे हे 'मस्टच' असा पक्का निर्धार झालेला आहे.

गाव सोडून नोकरीसाठी चिपळूणला गेल्यावर रविवारी कधी गणपतीपुळे तर कधी हेदवी च्या सिध्दीविनायकाचे दर्शन घ्यायचा योग आला. इंजिनिअरिंगचा एक मित्र वाईचा असल्याने ब-याचदा रविवारी त्याच्याकडे गेल्यावर ढोल्या गणपतीचे दर्शन झाले. पुणे हे अजोळ असल्याने लहानपणापासून तळ्यातला गणपती ( सारसबाग), पेशवे पार्क, पर्वती हा रविवारचा कार्यक्रम फिक्स्ड असायचा. आजकाल मात्र दशभूजा गणपती पर्यतच जाणे होते.

मुंबईत स्थाईक झाल्यावर अर्थातच रविवारी प्रभादेवीचा सिद्धीविनायक होतोच. आलेल्या पाहुण्यांना सिद्धीविनायक दर्शन घडवण्याचा योग रविवारीच ठरवला जायचा. दोन चार वेळेला कंपनी तर्फे आयोजित सिध्दीविनायक पदयात्रेत सामील होता आले जी शनिवारी रात्री कंपनीतून निघायची आणि रविवारी पहाटे काकड आरतीला मंदिरात पोहोचायची.

मुंबई परिसरात भ्रमंतीसाठी / नातेवाईक / मित्र परिवार यांच्याकडे जाण्यासाठी रविवार हा हक्काचा दिवस. याच रविवार मुळे टिटवाळा महागणपती, खोपोलीचा वरदविनायक, डोंबिवलीचा सिद्धीविनायक, चिरनारचा गणपती, पालीचा गणपती आणि 
माथेरानच्या कड्याच्या गणपतीचे अनेक वेळा दर्शन झाले. 

मंडळी,  आज रविवारच्या संकष्टी निमित्याने कसे वाटले हे गणेश दर्शन ?  हे वाचताना तुम्हालाही तुमचे रविवार- गणेश दर्शन नक्की आठवले असेल.

हे लिहून होईपर्यंत १० दिवसाच्या खंडानंतर परत मस्त पाऊस पडायला लागलाय. उपवासाची मिसळ असते,
 ' उपवासाची भजी ' कशी करतात कुणाला काही कल्पना?

असेल तर नक्की कळवा. परत भेटू रविवारची संकष्टी भाग- ३ मधे एक वेगळा विषय घेऊन २४ आँक्टोबरला

मोरया 🙏🌺

"देवा तुझ्या द्वारी आलो" 📝
संकष्टी चतुर्थी ( २७/०६/२१ )

पहिल्या भागाची लिंक👇🏻
https://poetrymazi.blogspot.com/2020/05/blog-post_10.html 

२२ जून, २०२१

दिल चाहता है

.दिल चाहता है ....❤️

या की , दुकानं संपली की जी कमान आहे तिथं  पर्यत सोडतात, तिथून दर्शन घ्या,  मंगळवारी विशाखा नक्षत्र आणि दशहरा पण चालू आहे. वाडीच्या गुरुजींशी हे बोलणे झाले आणि विचार पक्का केला.


सांगलीला गेलोय आणि वाडीला देऊळ बंद म्हणून जायचं नाही ?  हे काही पटत नव्हतं. पण गुरुनेच मार्ग दाखविला आणि गुरुच्याच नक्षत्रावर एक रम्य दृश्य अनुभवता आलं जे आजपर्यंत कधीच अनुभवंल नाही नरसोबावाडीला जाऊन.

असं म्हणतात की मंदिरातील देवाचे दर्शन घेता नाही आले तरी निदान कळसाचे दर्शन घ्यावे. आणि हे घेण्यासाठी आम्ही सकाळी पोहोचलो ते औरवाडच्या कृष्णेच्या पूलावर

एरवी 'संथ वाहणारी कृष्णा -माई ' पावसाळ्यात काही महिने दुथडी भरून वाहते. इथून मंदिराकडे म्हणजे उत्तर दिशेकडून वाहत येत,  गुरूंच्या पादूकांवर जलाभिषेक करुन दक्षिण दिशेला, पंचगंगेला कवेत घेऊन पुढे जाते. 

हाच तो दक्षिणद्वार सोहळा , आणि हे कृष्णेचे विराट स्वरूप 

परब्रह्म भेटी लागे..।

देवा तुझ्या द्वारी आलो 🙏🌹

📝 २२/०६/२१  

१० जून, २०२१

श्री शनैश्चर जयंती

.
"कर्माधीन आहे जगती पुत्र मानवाचा !"

ही दृष्टी / जाणिव करुन देणारा ग्रह म्हणजे शनी

आज वैशाख अमावस्या म्हणजेच " शनैश्चर जयंती "
 🙏🌹



पत्रिकेत प्रत्येक स्थानात शनी असता आपल्याला जीवनात कसा अनुभव येऊ शकतो याची माहिती ' शनी महिमा ' या वसुधा वाघ यांच्या पुस्तकातून साभार इथे देत आहे

पत्रिकेतील. 
१ ले लग्न स्थान - चारूदत्त
२ रे - धृतराष्ट्र
३ रे - द्रोण
४ थे - गांधारी
५ वे - उर्मिला
६ वे - पंडू
७ वे - अंबा
८ वे - भीष्म
९ वे - दुर्योधन
१० वे - श्रीकृष्ण
११ वे - कर्ण
१२ वे - पांडव

उदा. अष्टमातील शनी भीष्माचे आयुष्य देतो. या व्यक्ती चांगल्या दीर्घायू असतात,पण जीवनात अखेरीस त्यांच्या नशिबी शरपंजरच असतो.
अशाप्रकारे आडाखे मांडता येतात.

द्विभुजां दीर्घदेहायाम दंडपाशधराय च
पींगाक्षीं यमरुपाय शनिदेवाय नमो नम:!
🌹🙏

शनिदेवा शामलांगा,सूर्यपुत्रा जटाधरा
महांकाळ,भयानक शनैश्चरा नमो नम:!
🌹🙏

#शनैश्चर_जयंती
#देवा_तुझ्या_द्वारी_आलो
#वैशाख_अमावस्या
१०/०६/२१

 

काकड आरती- गोंदवलेकर महाराज

.देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी
तेणे मुक्ती चारी साधिलिया !!.


ज्ञानेश्वर माऊलींच्या हरीपाठाची सुरवातच या ओवीने आहे. परिस्थितीने  तो ' क्षण ' मात्र आज हिराऊन घेतलाय. सरकारने नवीन 'अनलाँक दान ' जाहीर केले असले तरी अजूनही  ज्या क्षणासाठी भाविक / भक्त उत्सुक असतो म्हणजेच मंदिरात जाऊन दर्शन घेणे याबद्दल मात्र अजूनही उल्लेख नाही. 

या सगळ्या भावनेतूनच मध्यंतरी गोंदवल्याला
' काकड आरतीला' जायची इच्छा व्यक्त करणारे मनोगत   लिहिले होते. शनिवारी आँफीस मधून निघायचे, मुक्कामाला गोंदवले आणि रविवारी पहाटेची आरती असा पुर्वी एकदा घडलेला कार्यक्रम परत घडावा अशी इच्छा व्यक्त केली होती.

गुरु / परमेश्वर/ माऊली तुमच्या मनातील इच्छा केंव्हा आणि कशा पध्दतीने पूर्ण करेल हे सांगता येत नाही.

जायला मिळालं गोंदवल्याला ?  
नाही, मग? 



तर आज वैशाख कृष्ण एकादशीला म्हणजेच ६ जूनला गोंदवलेकर महाराजांची काकड आरती झुम अँप द्वारे अनुभवण्याचा एक आगळावेगळा योग आला.  *ते ही रविवारीच*

श्री अनंत लेले आणि इतर काही जण दर एकादशीला हा उपक्रम करतात. आपल्या घरीच केलेली ही 'काकड आरती',  झुम अँप द्वारे अनेकांना उपलब्ध करुन देऊन एक आगळी वेगळी सेवा ते देत आहेत.

यात मला आज सहभागी होता आले हे माझे भाग्य. याबद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद, खूप छान पद्धतीने  हा  धार्मिक सोहळा सादर केला गेला. सर्वांनी खूप छान भक्ती गीते सादर केली.🙏

दर एकादशीला अशी झुम अँप द्वारे आरती अनुभवता येते हे कळणे, श्री लेलेंशी  संपर्क होणे,  त्यांनी त्यांच्या समुहात समावेश करुन घेणे, ते आज काकड आरतीला उपस्थित राहता  येणे आणि हे इच्छा व्यक्त केल्यानंतर काहीच दिवसात घडणे  "

धन्य ती माऊली 🙏

*काकड आरती ब्रह्मचैतन्य नाथा,स्वामी चैतन्यनाथा*
*प्रेमानंदे सद्गुरू चरणी,प्रेमानंदे सद्गुरू चरणी, ठेवीला माथा*!!🌺

मनोगत आवरता घेताना परत एक आठवण, "नाम सदा बोलावे घ्यावे " हा सुबोध गुरुंनी सांगितलाच आहे तसा आजच्या परिस्थितीत वैद्यांनी सांगितलेला सुबोध लक्षात असू द्या. कारण अजूनही संकट टळलेले नाही

*मास्क' सदा घालावे,*
*जावे भावे, जनांसि सांगावे |*
*हाचि सुबोध वैद्यांचा,*
' *मास्का' परते न सत्य मानावे!*😷

#स्वामी माझा पाठीराखा माणगंगा तिरी " 🙏🌹
#अपरा एकादशी 🚩
६/६/२१

#देवा_तुझ्या_द्वारी_आलो
www.kelkaramol.blogspot.com  

३ जून, २०२१

पाऊस आणि ज्योतिष शास्त्र

. .#पाऊस आणि ज्योतिष  शास्त्र  ☔

गुढीपाडव्याला  पंचांग  पूजन करून  संवत्सर फल  वाचले जाते.  त्यात या वर्षी पडणा-या  पावसाविषयी  विवेचन असते . साधारण मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरवातीला  भारतीय हवामान खाते आणि आजकाल खाजगी संस्थाही पावसा विषयीआपले अनुमान जाहीर करत असतात . याची मदत अर्थातच शेतकरी बांधवाना होत असते 

याचप्रमाणे आपल्या शास्त्रात ही पावसाळी वाहन या संकल्पनेचा उल्लेख आढळतो. या वाहनां वरुन पाऊस कसा पडेल याचा अंदाज घेता येतो.  आजकाल दिनदर्शिकेत वाहन ज्या तारखेला लागते त्या तारखेचा   ऊल्लेख ही केलेला आढळतो .  


वाहन लागणे हे कसे ठरते ?????

तर  रवीचा मृग नक्षत्र प्रवेश  म्हणजे पावसास सुरुवात  असे समजतात.  साधारण पणे ७ जूनला रवी मृग नक्षत्रात प्रवेश करतो ( यंदा ८ जूनला मृग नक्षत्र प्रवेश आहे) .  रवीच्या मृग नक्षत्र प्रवेशावेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते नक्षत्र  बघतात . दोन्ही  नक्षत्रातले अंतर मोजून त्याला ९ ने भागले जाते आणि राहणा-या बाकीचा  नंबर जो येतो त्यावरून वाहन ठरते . अधिक माहिती वरील चित्रात दिलेली आहे  त्यावरून प्रत्येक रवी नक्षत्र बदलानंतरचे  वाहन कोणते हे सहज काढता येते 


हत्ती , म्हैस , बेडूक  - खूप पाऊस 

गाढव , कोल्हा  - कमी पाऊस 

मोर , घोडा ,  मेंढा  -  मध्यम पाऊस 


आता हे वाहन साधारण दर १३ - १४ दिवसांनी बदलते कारण एक नक्षत्र  १३ अंश २० कलेचे असते आणि रवी रोज एक अंश पुढे जातो , म्हणजे १३ - १४ दिवसाने पाऊस वेगळे वाहन घेऊन येतो .  या  सगळ्या गोष्टींचा  शेतकरी बांधवाना  शेतीची कामे ठरवण्यासाठी उपयोग होऊ शकतो.



गेली काही वर्षे प्रत्येक वाहन आणि पडलेला पाऊस याची मी नोंद केलेली आहे. (  १ जून पासून हवामान खात्याच्या संकेतस्थळावर रोज पडलेल्या पावसाची नोंद होते ) . यात एक गोष्ट लक्षात येत आहे की  वरील नियम अगदी अचूक लागू पडत नाही आहेत. 

अगदी २०१९ चे उदाहरण द्यायचे झालं तर   जुलै शेवटचा आठवडा  ते ऑगष्ट  पहिला आठवडा (  २० जुलै ते ३ ऑगष्ट )  'गाढव'  वाहन  असताना  पश्चिम महाराष्ट्रात महाभयंकर पूर आला होता, आणि त्यापुढच्या 'बेडूक' वाहनात  तुलनेने कमी पावसाची नोंद दिसून आली.

यासाठी थोडा वेगळा अभ्यास करायची गरज आहे असे वाटते.  रवीच्या  पावसाळी नक्षत्र प्रवेशा बरोबरच  चंद्र , रवीचे   कर्क , वृश्चिक , मीन  ( जल तत्वाच्या  राशी )  या  नवमांशातून/ राशीतून    होणा-या भ्रमणांचा  ही संयुक्तिक विचार होणे आवश्यक आहे.  यानुसार पावसाचा अधिक चागला अंदाज वर्तवता येईल  असे मला वाटते

यासंदर्भातले एक उदाहरण २६  जुलै २००५  चे पाहू 
त्यादिवशी ची ग्रहस्थिती

चंद्र - मीन राशीत - जलतत्व 
रवी- कर्क राशीत - जलतत्व
 
त्या दिवशी च्या नवमांश कुंडलीत
शुक्र, केतू, हर्षल - कर्क नवमांश. - जल राशीत

थोडक्यात पावसाळी वाहन बरोबरच ग्रहांचा जलतत्वाच्या राशी/ नवमांशातून होणारा प्रवास आणि पडणारा पाऊस हे अभ्यासनीय असेल

अमोल केळकर 📝
३/६/२१
वैशाख कृष्ण नवमी  

२९ मे, २०२१

नित्य पूजा - संगमेश्वर मंदीर ( हरिपूर)

.संगमेश्वर मंदीर, हरीपूर ( सांगली)   इथल्या नित्य पूजेचे फोटो आमचा शाळेतला मित्र पाठवतो. दिनविशेषा नुसार गुरुजी इथे मधे दिसणारी  चंदन/ गंधाची मूर्ती बनवतात.  ती मूर्ती पाहूनच मन प्रसन्न होते. काय मस्त भाव उतरतात त्या शिल्पात. 



🙏🌺

#संगमेश्वर_मंदीर_हरिपूर
#देवा_तुझ्या_द्वारी_आलो
#देव_संगमेश्वर_नित्य_पूजा

 

२४ एप्रिल, २०२१

क्विन आँफ पेनटँकल

. Queen of pentacle

११ एप्रिलचा रविवार, सुट्टी असल्याने तस निवांतच होतं. मात्र आज लँपटाँप घेऊन ती १२५- १५० जणांची लिस्ट ५० वर आणायलाच पाहिजे हा विचार पक्का केला. बातम्या बघायचा कंटाळा आला होता. शनिवार-रविवार विकेंड लाॅकडाऊन डिक्लेअर झालाच होता. एका गोष्टीचे समाधान वाटत होते की आपले कार्य शुक्रवारी असल्याने यात आपण अडकलेलो नाही. सगळीकडे चर्चा मात्र सुरु होती. ८ दिवसाचा लाॅकडाऊन, १५ दिवसाचा लाँकडाऊन लागू शकतो, कडक निर्बंध लागू शकतात. पण केंव्हा पासून, केंव्हा पर्यत ,पाडवा झाल्यावर का आंबेडकर जयंती झाल्यावर?  १५ पासून ८ दिवस धरले तर २२ तारखेपर्यत. म्हणजे २३ तारीख ( शुक्रवार ) परत मिळेल पण मग लगेच शनिवार-रविवार वीकेंडसाठी लाँकडाऊन मग १ दिवस सूट कशी मिळेल?  लाॅजिकलच नाही. १५ दिवसाचा लाँकडाऊन/ कडक निर्बंध  होणार अशी मनाची तयारी होत चाललेली.
           अशाच टेंशन मधे दिवस गेला. जी काही ठरवलेली कामे उरकायची ती उरकली. रात्री क्रिकेटचा सामना सुरु होता पण तिकडे ही फारसे लक्ष नव्हते
त्याचवेळेला डाँ कविता जोशी , सानपाडा यांचा फोन आला. एका जोतिष विषयक गृपवर आम्ही एकत्र आहोतच पण आमची ओळख खूप आधीपासूनची जेंव्हा पारंपारिक जोतिषाच्या आधीही मी जेंव्हा 'टँरो कार्ड रिडिंग " घ्यायचो तेव्हापासून. यानिमित्ताने त्या माझ्या घरीही येऊन गेल्या होत्या मात्र बरीच वर्ष प्रत्यक्ष संपर्क किंवा बोलणे झाले नव्हते.

त्यांनी फोन केला होता तो जोतिष समूहात जी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा सुरु होती त्याच अनुषंगाने. जवळ जवळ २० एक मिनिटे आम्ही बोललो. सध्याचे ग्रहयोग, एकंदर ठाम उत्तर न मिळणे यावरून आमची चर्चा थोडी टॅरो कार्ड रिडींग कडे सरकली. त्यांनी त्यांचे सध्याची वेगवेगळ्या परिस्थितीची घेतलेली रिडिंग, मुलांची मानसिक अवस्था, आँन लाईन शाळा,  पुढचे व्यवसाय, एकंदर सगळाच बदल आणि परिस्थिती यासंबंधी भरपूर चर्चा केली. तसेच टॅरो कार्डचा सकारात्मक ( +ve) affirmation म्हणून कसा वापर करता येईल यावर ही बोललो.

 मी काही रिडींग घेतले का परत असे त्यांनी विचारले. कारण मागच्या एप्रिल / मे मधे कोविड महामारीवरचे घेतलेले कार्ड रिडिंग त्यांनी पाहिले होते. त्यांना नम्रपणे सांगितले की सध्या टॅरो कार्ड रिडिंग घेणे होत नाही मात्र आज तुमच्याशी बोलणे झाल्यावर मला प्रेरणा मिळाली. निदान आठवड्यातून एकदा तरी रिडिंग घेत जाईन असे सांगून चर्चा संपवली.

नंतर विचार केला सध्याच्या परिस्थिती वर रिडिंग घेण्यापेक्षा सध्या आपल्या समोर जो प्रश्ण उभा आहे  की 
' ठरलेले कार्य सुरळीत होईल का?  ' यावर उद्या सकाळी रिडिंग घेऊ. सकाळी पूजा करुन झाल्यावर मनात वरचा प्रश्ण धरुन एक कार्ड काढले,  ते कार्ड होते "Queen of Pentacle"

कार्ड जरी चांगले निघाले तरी माझ्या प्रश्णाचे सरळ उत्तर मला मिळाले नाही. पण कार्ड +ve निघाले त्यामुळे जरा बरे वाटले. संदर्भ पुस्तकात लिहिले होते
Emotional centre , security
Affirmation : I have what I need to feel secure.

गुढीपाडवा झाल्यानंतर ३०  तारखेपर्यंत कडक निर्बंध, लग्नासाठी २५ जण वगैरे नियम आले. आमच्या कार्यासाठी सांगलीहून पौराहित्य करण्यासाठी येणारे पटवर्धन गुरूजींचा फोन आला आणि त्यांनी सध्याच्या परिस्थितीत येणे शक्य होणार नाही असे सांगितले.  अर्थात त्यांचे बरोबरच होते. त्यांना हरकत नाही म्हणून सांगितले.

पण मग आता?  पुढे काय

आणि मग एकदम लक्षात आलं आपल्या बेलापूर मधील गोखले काकू ( Queen of Pentacle) . तसं त्याना आधी जुजबी बोलून ठेवलेच होते की काकू काहीही झालं तरी प्रणवची मुंज करायचीच,  समजा आमचे गुरुजी नाही येऊ शकले तर तुम्ही व्रतबंध सोहळा पार पाडायचा

काकूंना फोन करुन सांगितले,  त्या लगेच तयार झाल्या. सध्याच्या परिस्थितीत मुंज बाहेर हाॅल मधे न करता घरीच करु असे ही ठरले आणि २३ ला ठरल्या प्रमाणे गोखले काकू आणि कुलकर्णी काकू यांनी पौराहित्य करुन व्रतबंध संस्कार संपन्न झाला

साधारण १५ दिवसा आधी  ग्रामदैवत गणपतीला ( बेलापूरचा राजा)  पत्रिका निमंत्रण पत्रिका ठेवायला जाताना मंदिराच्या आधी एका पक्षाची घाण अंगावर पडली.  त्यावेळी घरच्या Queen ने सांगितले की शुभ शकुन झाला आहे. गुढीपाडव्याला  कुलदैवत रामेश्वराला ( आचरा, कणकवली)  पत्रिका ठेऊन कार्य व्यवस्थित होण्यासाठी नारळ ठेवला आहे हे स्नेही बापटांनी ही सांगितले होतेच




तरी देखील Queen of pentacle चा एका ठिकाणी असलेला उल्लेख
This lady really has her life in order. Nothing rocks or shakes her. She is the stable centre of her family and group of friends

हा प्रत्यय आमच्या घरच्या 'क्विन'  ने सार्थ करुन दाखवला.

आजूबाजूला जी भयानक परिस्थिती आहे त्यात ही ठरलेले कार्य निविघ्न पार पडण्यात परमेश्वरा बरोबरच या  नारी शक्तीचा ही मोठा वाटा होता

आणि हेच ते कार्ड सांगत होते, पण लक्षात उशीरा आले 🙏

अमोल केळकर 📝
२४/०४/२१

२१ एप्रिल, २०२१

चला राम घडवू या

.
" चला राम  घडवूया " 🚩🚩

मंडळी एक वेगळा विषय मांडतोय. उद्या रामनवमी आहे. यानिमित्यानेच मध्यंतरी एका संस्थेने निबंध स्पर्धेच आयोजन केले होते, त्यात खुल्या गटातील अनेक  विषयांपैकी हा एक विषय होता. यानिमित्याने माझे काही विचार इथे मांडतोय. 


//

निबंध स्पर्धेसाठी  त्यातही खुल्या गटा साठी हा  एक विषय . सहज इतर गटांसाठीचे ही  विषय बघितले त्यात  लहानगटा साठी  विषय होता 
 " चला राम बनूया "

संकेत स्पष्ट आहेत , काय करायचे  आहे दिशा स्पष्ट आहे . त्यांना  ' राम बनण्यासाठी' आपणास  सक्रिय सहभाग घ्यायचा आहे , त्यांना सहकार्य , मार्गदर्शन करायचे  आहे आणि त्यासाठी आपल्याला स्वतः ला आधी राम तर बनायचे आहेच पण  परिस्थतीनुसार /  भूमिकेनुसार  कधी  राजा दशरथ ( वडील ) , कौसल्या  ( आई ) , विश्वामित्र  ( गुरु ) ,  प्रेमळ बंधू  ( लक्ष्मण ) , निष्ठावान पत्नी  ( सीता माई ) , अन्याया विरुध्द्व साथ देणारा सहकारी ( हनुमान )  तर वेळ प्रसंगी नितीमत्ता जागृत असणारा  शत्रू (  बिबिषण )  या वेगवेगळ्या भूमिका  समोरच्या व्यक्तीशी आपल्या नात्यानुसार निभावायच्या आहेतच. 

प्रभू  श्री रामचंद्राचे  विशेष गुण , त्यांचे  चरित्र  याची जाण ठेऊन सध्याच्या जीवन पध्द्तीत  ते कशा प्रकारे आचरणात आणता येतील  / इतरानाही प्रवृत्त करता येईल हे पहाणे महत्वाचे. 
 एकनिष्ठ राम,  एकबाणी राम, एकवचनी राम होणे म्हणजेच   आजच्या काळातले  शब्द जसे कमिटमेंट, इन्व्हॉलमेंट , फोकस  होणे आहे . माझे  आयुष्याचे ध्येय काय आहे ?  त्यादृष्टीने माझी वाटचाल आहे का ?  मी कुठे विचलीत तर होत नाही आहे  ना ?  माझे जे ध्येय आहे  त्याचा मला फायदा होईलच  पण त्याचा समाजाला पण फायदा आहे का  ?  माझे लक्ष मूळ ध्येयापासून विचलीत होत आहे का ?  असे लक्षात आल्यास  योग्य उपाययोजना काय  करायची  हे मी समजून घेऊन तसे  मी  माझ्या सानिध्यात येणा-यांसाठी ही अमलात आणीन आणि ' राम घडवण्याचा ; मनापासून प्रयत्न करेन 


राष्ट्रकार्याच्या यज्ञात  जर कुणी असुरी शक्ती विघ्न आणत असतील तर  त्याला प्रतिकार करण्याचे सामर्थ्य  माझ्या रामात यावे, तशी त्याला बुध्दीयावी  यासाठी चे बाळकडू  मला  त्याला द्यावे लागेल. 

   पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला स्वत: ला जे अपेक्षित राम राज्य आहे त्यातील  एक नागरिक  म्हणून आपण कुठे कमी पडतोय हे बघायचं आहे . स्वतःत सुधारणा घडवून आणायची आहे आणि दुस-याला ही त्या साठी मदत करायची आहे .  व्यवस्थेने घालून दिलेले नियम , सद्विवेकबुधदी चा वापर  मला करायचा आहे 
  
रामराज्य  येणे म्हणजे काय ?  

जिथे सर्व प्रजानन सुखी समाधींनी आहेत, एकोप्याने रहात आहेत.  कुणी कुणावर जबरदस्ती  करत नाही आहे . तशी जबरदस्ती झाली गुन्हा झाला तर लवकरात लवकर  न्याय  मिळत आहे , गुन्हेगाराला शासन  होत आहे . प्रजाजन आणि राज्यकर्ते यांच्यात सुसंवाद होत आहे 

वरील जर चित्र रेखाटले तर मी स्वतः यासाठी काय करतोय ? मी स्वतः जे कायदे आहेत , नियम आहेत  ते काटेकोर पणे बजावतो का ? का पळवाट काढतोय ? माझी कर्तव्य करतोय का ?  का फक्त हक्क सांगतोय? 


  हा सगळा विचार करुन आपण चांगला नागरिक बनू या आणि इतरांनाही  चांगला  नागरिक बनण्यास सहकार्य करु या  . घरोघरी असे प्रजानन  म्हणजेच राम आणि त्यांना तयार करणारे  पालक, गुरु, सहकारी , बंधू   निर्माण  झाले तर  रामराज्य ख-या अर्थाने  निर्माण होणार नाही का ?????  

तेंव्हा चला 


एकबाणी  होऊ या , एक वचनी होऊ  या 🚩
राष्ट्रप्रेम जागवू या , बंधुभाव वाढवू या 🚩
आधी राम होऊ या, असंख्य राम घडवूया 🚩

अंती राम राज्य आणू या 🚩🚩

जय श्रीराम 🙏

 अमोल केळकर

 

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या