२० डिसेंबर, २००८

किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी !

किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी !
काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी !
उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनो~यात !
अन् लावा ह्रुदयात सख्यांनो आशेची वात !
-
कुसुमाग्रज
वरील ओळी टॅरो कार्ड मधील मेजर कार्ड नं ९ हर्मीट कार्ड ला चपखल लागू होतात. नाताळ बाबा सांताक्लॉझ आणि हे कार्ड याच्यात बरेच साम्य आहे. नाताळाच्या आदल्यारात्री सांताक्लॉझ बच्चे कंपनी ला खूप खेळणी आणि आवडत्या गोष्टी देतो असे म्हणतात. त्याच्प्रमाणे हर्मीट आपल्याला जिवनात जेंव्हा केंव्हा निराशेने ग्रासलेले असेल तेंव्हा आपल्या मनातील अंधःकार दूर व्हावा यासाठी मदत करतो. यादृष्टीने जणू तो आपल्या साठे देवदूतच आहे.
टॅरो कार्ड मधील हे अनुभवाने संपन्न ( अनेक पावसाळे पाहिलेला ) असे आहे. हे कार्ड जेंव्हा रिडिंग मधे येते तेंव्हा असे समजावे की एक अतीशय अनुभवी व्यक्ती आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभणार आहे जी आपल्याला सध्याच्या अंधःकारात प्रकाशाचा मार्ग दाखवण्यास मदत करेल.
क्वचित प्रसंगी ती व्यक्ती आपण स्वतःही असू शकतो. आपल्या मागील चुका/ अनुभवांच्या जोरावर आपण स्वतःशी अंतरमग्न होऊन सारासार विचार करुन प्राप्त परिस्थितीत काय करता येईल याचा स्वनिर्णय घ्यावा असा ही अर्थ हे कार्ड सुचित करते.

८ डिसेंबर, २००८

प्रेमभंग / अपेक्षाभंग - ३ ऑफ स्वॉर्ड टॅरो कार्ड

३ ऑफ स्वॉर्ड हे कार्ड प्रेमभंग / अपेक्षाभंग दर्शवते. व. पु. काळे यांचा प्रेमभंग झालेल्यांसाठी दिलेला हा सल्ला फार चांगला आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------
प्रेमभंग झालेल्या तमाम मित्र-मैत्रिणींनो माझ्या अशाच एका मित्राला त्याच्या प्रेयसीनं जे सांगितलं, ते सुत्र हे -
संसार हा धीरगंभीर, उदात्त रागदारीसारखा असतो. तासतास चालणारा. केंव्हा केंव्हा फार संथ वाटणारा. आणि मध्येच तुझ्यासारख्या मित्राची आठवण , ही मोठा राग आळवून झाल्यानंतर ठुमरीसारखी असते. दहा मिनिटात संपणारी; पण सगळी मैफल गुंगत ठेवणारी, मरगळ घालवणारी. पण त्याचं काय असतं, की काही काही स्वर वर्ज्यच असतात. त्याला काय करणार ? - म्हणून तुझ्या आठवणीत, सहवासात माझा नवरा बसू शकत नाही आणि एकमेकांच्या संसारात आपणा एकमेकांना स्थान नाही. वर्ज्य झालेला स्वर वाईट नसतो, वगळायचा असतो, तर एक राग उभा करायचा असतो, त्यासाठी आपण तो खुषीनं विसरायचा असतो. वाद्यातल्या तेवढ्या पट्ट्या उपटून फेकून द्यावयाच्या नसतात. त्यांना गाता - गाता , वाजवता फक्त चुकवायचं असतं
हे सूत्र तुम्हाला पेललं, तर संसाराची तुमची मैफल, रागदारीप्रमाणे बहरेल.
- वपुर्झातून

-----------------------------------------------------------------------------
प्रेमभंग झालेल्यांनी वरील सुत्र लक्षात ठेवून पुढील जिवनात वाटचाल करावी.





२७ नोव्हेंबर, २००८

श्रध्दांजली !!

मुंबईत अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याचा प्रतिकार करताना शहीद झालेल्या पोलिस दलातील अधिकारी, पोलिस शिपाई तसेच या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले परदेशी नागरिक व सामान्य मुंबईकर यांना विनम्र आदरांजली ~
या कठिण प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

२० नोव्हेंबर, २००८

टॅरो कार्ड - सल्ला

सर्वांनाच ठाऊक आहे की कोणतीही परिस्थिती ही कायम नसते. सुखानंतर - दु:ख आणि दु:खानंतर सुख हे चक्र कायम चालू असते.

काही वेळा आपण भयानक परिस्थितीत असतो। त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी/ योग्य सल्ला घेण्यासाठी टॅरो कार्डसचा योग्य प्रकारे वापर करता येतो.


समजा आपला काही गोष्टीत अपेक्षाभंग झाला आहे। तर ती परिस्थिती हाताळण्यासाठी टॅरो कार्ड्स पासून कसा सल्ला घ्यायचा ते पाहू.



चित्रातील उदा.१ मधे दाखवल्याप्रमाणे १ ले कार्ड आपण निवडून ( ३ ऑफ स्वॉर्ड जे अपेक्षाभंग दाखवते ) चित्रात दाखवल्याप्रमाणे ठेवावे. माझी सध्याची स्थिती ते कार्ड दाखवते . आता मला ही परिस्थिती बदलून चांगली स्थिती व्हावी असे वाटते आहे , माझ्या मनासारखे व्हावे असे वाटते त्यासाठी ९ ऑफ कप हे कार्ड निवडून चित्रात दाखवल्याप्रमाणे ठेवावे. आता राहिलेल्या ७६ कार्डांपैकी कुठलेही एक कार्ड सिलेक्ट करुन चित्रात दाखवल्याप्रमाणे मधल्या जागी ठेवावे. त्यानंतर या कार्डाचे सखोल विश्लेषण करुन प्राप्त परिस्थितीत आपण काय करायला पाहिजे याचा सल्ला घेता येतो. पराजय, दु:ख यावर मात करण्यासाठी उदा.२ मधे दाखवल्याप्रमाणे २ चित्रे निवडावित. आणि मधले कार्ड सल्ला घेण्यासाठी काढावे।

अशाप्रकारे अवघड परिस्थितीत सल्ला / मार्गदर्शन म्हणून टॅरो कार्डचा चांगल्या प्रकारे उपयोग करता येऊ शकतो.

५ नोव्हेंबर, २००८

कामाचा ताण

अनेक मित्रांनी / हितचिंतकानी आवर्जून विचारणा केली आहे की सध्या तुमचे ब्लॉग वरचे लखाण नियमीत होत नाही का ?
अहो काय सांगावे. अगदी या चित्रातील ( १० ऑफ वॉन्ड ) माणसासारखी आमची अवस्था झाली आहे.
ऑफिस मधे दररोज नवी कामे नुसती येऊन आदळत आहेत त्यामानाने कामाची उरक कमी आहे. ऑफीस मधून निघायला रोज उशीर होत आहे. ब्लॉगवर लिखाण तर दूरच साधे अंतरजालावर नुसता फेरफटका मारणे ही अवघड गोष्ट झाली आहे.
जागतीक मंदीच्या बातमीने मन स्थिर राहणे अवघड झाले आहे. स्टील एक्स्पोर्ट कंपनीत काम करत असल्याने नाही म्हणले तरी त्याचा अप्रत्यक्ष फटका बसण्याची चिन्हे आहेत. फॉरेन कस्टमर हात धुऊन मागे लागलेले आहेत. डिस्काउंट मागत आहेत. थोड्क्यात काय दुष्काळात तेरावा महिना अशी काहिसी आमची अवस्था झाली आहे.
बघुया पुढील वर्षापासून काही परिस्थितीत सुधारणा होते आहे का आणि नियमित लिखाण करायला जमते का ते ?

काही अवांतर -
या कामाच्या प्रेशर मधेही सुदैवाने सहेबाने ३ दिवसाची सुट्टी दिल्याने आज सांगलीला जात आहोत. सांगली ही माझी जन्मभुमी .
पटवर्धन संस्थानचे पसिध्द गणपती मंदिर हे सांगलीकरांचे आराध्य दैवतच. सांगलीला गेलो की न चुकता तेथे भेट देतोच. यावेळी नरसोबावाडीचे दत्त मंदिर आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचा आशिर्वाद घेण्याची इच्छा आहे. परत एकदा फ्रेश होऊन जेंव्हा पुढील आठवड्यात मुंबईत येईन तेंव्हा नवीन आव्हाने स्विकारण्याचे बळ नक्किच येईल.
जाता जाता - पनवेलहून प्रसिध्द होणार्‍या ' किल्ले रायगड' या दिवाळी अंकात टॅरो कार्ड विषयी लेख प्रसिध्द झाल्याची माहिती आईने दिली.
किल्ले रायगडचे मालक, संपादक, प्रकाशकांचे या निमित्याने मी आभार मानतो.
दिवाळी अंकातील हे माझे प्रकाशित झालेले पहिले लेखन मी माझ्या आई वडिलांना समर्पीत करतो।


२७ ऑक्टोबर, २००८

दिपज्योती नमोस्तु ते

उधळे आनंदाचे रंग
हा दारिचा कंदिल
दारापुढची रांगोळी
सुखाचे गीत गाईल
शतदीप चैतन्याचे
पसरवू दे प्रकाश समृध्दिचा
नांदू दे मांगल्य
आपल्या घरी
याच शुभेच्छा दिवाळीच्या


दिवाळीचा उत्सव हा प्रकाशाचा उत्सव, आनंदाचा दिपोत्सव. सुख समाधान , समृध्दी देणारा उत्सव.
टॅरो कार्डे मधील सन कार्ड ही सुख , समाधान, भरभराट दर्शवते. तसेच प्रकाशाचा मुख्य प्रेरणास्त्रोत आहे सूर्य। या कार्डाची स्पंदने ( ऍनर्जी ) आज आपल्याला मिळो ही प्रार्थना

२३ ऑक्टोबर, २००८

२० ऑक्टोबर, २००८

स्पर्धा / परीक्षा / मतभेद

काल दिवसभरातील सर्व न्यूज चॅनलवर एकच चर्चा ( ब्रेकिंग न्यूज) होती ती म्हणजे रेल्वे भरती बोर्डाच्या परीक्षेत परप्रांतीय विद्यार्थांना केलेली मारहाण.



हे योग्य / अयोग्य यावर भाष्य न करता ही परिस्थिती दाखवणारे टॅरो डेक मधील हे कार्ड
५ ऑफ वॉन्ड
हे कार्ड जेंव्हा रिडिंग मधे येते तेंव्हा वैचारिक मतभेद घडण्याची शक्यता असे दर्शवते तसेच स्पर्धा , प्रतिस्पर्धी , अडचणी इ. अर्थ यातून सुचीत होतो.
ऍस्ट्रोलॉजीकली या कार्डाला सिंहेतील शनी असे म्हणले आहे.
अर्थात स्पर्धा ही एका दृष्टीने चांगली ही असते. यामुळे आपल्या सुप्त, अंतरीक शक्तींचा विकास होतो
थोड्क्यात कोणताही विजयाचे संकेत मिळण्यासाठी ( जे ६ ऑफ वॉन्ड के कार्ड दर्शवते ) आधी आपण ५ ऑफ वॉन्डचा ( अडचणी ) ट्प्पा यशस्वी/खंबीरपणे पार पाडणे आवश्यक आहे.

१४ ऑक्टोबर, २००८

टॅरो कार्ड द्वारे मेडिटेशन

टॅरो कार्डचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे यातील काही महत्वाची कार्डे मेडिटेशन ( चिंतन ) साठी वापरली जातात.
या कार्डांचा उपयोग करुन आपण आपल्यात जाणिवपुर्वक महत्त्वाचे बदल घडवून आणू शकतो.
आज आपण मून कार्ड मेडिटेशन साठी कसे वापरले जाते ते पाहू.
यासाठी मुख्यतः पोर्णिमेचा दिवस निवडावा. आपल्या डेक मधील मून कार्ड काढून त्यावर लक्ष केंद्रित करावे.
पोर्णिमेच्या चंद्रप्रकाशात ( घराच्या बाहेर, गच्चीत, शांत जागी ) मेडिटेशन करता आले तर फारच छान
मून कार्ड हे मनातील भीती, शंका, मानसिक अस्थिरता दर्शवते.
आता या कार्डावर लक्ष केंद्रित करुन आपल्या मनात ज्या काही भीतीदायक गोष्टी आहेत, अशा गोष्टी की ज्यामुळे आपले मन विचलीत आहे अशा गोष्टी आठवाव्यात. एक एक करुन मनाला असे समजवावे की या पोर्णिमेच्या चंद्राचे शितल चांदणे माझ्या मनात प्रवेश करत आहे आणि मला जी भीती वाटत आहे ती आता हळू हळू कमी होत आहे. असे विचार करुन , या कार्डावर थोडावेळ ध्यान करावे. आपल्या मनातील भीती, शंका दूर होण्यास मदत होते.
अर्थात हा ज्याचा त्याचा विश्वासाचा प्रश्न आहे.

एक विचार मात्र सर्वाना लागू होतो तो म्हणजे


मन के हारे हार हुई है, मन के जिते जित सदा !
सावधान मन हार न जाये, मन से मानव बना सदा
!!

कोजागिरीच्या सर्वांना शुभेच्छा !






i

११ ऑक्टोबर, २००८

माझ्याविषयी

नमस्कार मी मुळचा सांगलीचा . सध्या नवी मुंबईला स्थाईक. खाजगी कंपनीत नोकरी. क्षेत्रः मार्केटींग
भविष्य शास्त्राविषयी प्रचंड उत्सुकता . संकेत स्थळावर भटकंती करताना टॅरो कार्ड विषयी माहिती मिळाली आणि पहिल्यांदा छंद म्हणून सुरवात करता करता या विषयाचा कसा नाद लागला ते कळलेच नाही.
सुरवातीला स्वतःबद्द्ल रिडिंग घेणे चालू केले. आणि जसजसे रिडिंग बद्दल बरोबर अनुभव यायला लागले तसा विश्वास वाढत गेला।


आयुष्यात पुढे काय घडणार आहे याचीउत्सुकता माणसाला सतत असते।(TAROT ) द्वारे भविष्य.भविष्याची चाहुल घेणार्‍या या एका नवीन आणी आपल्याकडेही हळुहळु प्रसिध्दहोत असलेल्या पध्दतीचीओळख करुन देण्याचा हा प्रयत्न.

अजुन ही खूप गोष्टी शिकायच्या आहेत।

८ ऑक्टोबर, २००८

विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा


श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी समर्थ !श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी समर्थ ! श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी समर्थ ! श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी समर्थ ! श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी समर्थ ! श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी समर्थ ! श्री स्वामी समर्थ , जय जय स्वामी समर्थ !
विजयादशमी हा असुरी शक्तींवर मिळवलेला विजय म्हणून आपण साजरा करतो
प्रभू श्री रामांनी याच दिवशी रावणाचा वध केला
विजयादशमीच्या निमित्त्याने आपण ही आपल्या मनातील सुप्त राक्षसाचा ( डेविल ), दुर्गुणांचा नाश करुया. एकमेकांचा द्वेश, मत्सर टाळून एक नवे आयुष्य घडवूया.


विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा !!


७ ऑक्टोबर, २००८

स्प्रेड - अनेक मार्गातून एक मार्ग निवडणे.

दैनंदीन जिवनात आपण असंख्य वेळा अशा परिस्थितीत असतो की आपल्यापुढे अनेक पर्यायातून एक पर्याय निवडायचा असतो.
उदा. - गावाला जाताना बसने जावे की रेल्वेने ? ( दोन्ही पर्याय उपल्ब्ध आहेत हे गृहीत धरुन ) यासरखे २ आणि २ पेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असताना त्यातल्या त्यात कुठला पर्याय जास्त चांगला आहे हे पहाण्यासाठी खालील प्रकारे स्प्रेड ( पत्त्यांची मांडणी करावी )

चित्रात दाखवल्याप्रमाणे पर्याय 'अ 'आणि 'ब 'यातील कुठला जास्त चांगला ते पाहू
टॅरो डेक पिसून रॅन्डमली ४ पाने पर्याय 'अ' साठी काढावीत आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे मांडावित. अशीच ४ कार्डे 'ब'पर्यायासाठी मांडावीत.
( जितके अधिक पर्याय त्याप्रमाणात ४ - ४ कार्डे प्रत्तेक पर्यायासाठी काढावित. )

पहिली ३ कार्डे पर्याय अ स्विकारला तर काय घटना / परिस्थिती घडू शकेल ते सांगतात. तर कार्ड ५,६,७ पर्याय ब स्विकारला तर काय घटना / परिस्थिती घडू शकेल ते सांगतात.
कार्डे ४ - पर्याय अ चा अंतीम विश्लेषण सांगते तर कार्ड ८ - पर्याय ब चा अंतीम विश्लेषण सांगते

चित्रातील उदाहरण पाहिले असता जे काही दोन पर्याय आहेत ( कुठल्याही विषयातील ) त्यातील अ पर्याय अधिक चांगला दर्शवतो
याचे कार्ड कार्ड ४ आणि कार्ड ८ चे विश्लेषण केले तर कार्ड ४ ( ३ ऑफ कप ) - हे आनंदायी घटना, सेलिब्रेशन, सोहळा दाखवते
कार्ड ८ - दुखः, पश्चाताप व्यक्त करते.
स्प्रेड कळण्यासाठी केवळ प्रतिकात्मक म्हणून वरील कार्डे निवडली आहेत.

२ ऑक्टोबर, २००८

दुर्गामाता - टॅरो कार्ड स्ट्रेन्थ

सिंहावर किंवा वाघावर आरुढ असलेली माता दुर्जनांचा, वाईट गोष्टींचा नाश करते आणि चराचर सृष्टीला सुख, समृध्दीचे वरदान देते हा अर्थ आपल्याला दुर्गामातेच्या चित्रातून अभिप्रेत आहे।

टॅरो कार्ड मधील स्ट्रेन्थ हे ८ नंबरचे महत्त्वाचे कार्ड आहे. आपल्याला दिसेल की या चित्रात एक स्त्री व्यक्तिमत्व सिंहाला काबूत ठेवत आहे।

या कार्डाचा अर्थ असा की आपण कितीही कठिण परिस्थिती आली तरी डगमगुन न जाता आपल्या अंतरिक शक्तीच्या जोरावर, सर्व परिस्थिती हाताळू शकतो. साक्षात सिंह ( भरपुर अडचणी ) जरी समोर आला तरी ती स्त्री न घाबरता ( साक्षात दुर्गाच जणू ) सिंहाला शांत करण्यात यशस्वी झाली आहे।


हे कार्ड रिडिंग मधे आल्यास असे समजावे पुढील काळात आपल्याला काही अडचणींशी सामना करावा लागणार आहे परंतू अनुभव, ज्ञान, अंतरिक शक्ती, कणखरता या गुणांमुळे आपण त्यातून मार्ग काढण्यात यशस्वी होणार आहोत।



३० सप्टेंबर, २००८

नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा !

-------------------------------------------------------------------

सर्व मंगल मांगल्ये

शिवे सर्वार्थ साधिके ।

शरण्ये त्र्यम्बके गौरि

नारायणि नमोऽस्तु ते ...!!


------------------------------------------------

( सौजन्यः इ-सकाळ आवृत्ती )

२९ सप्टेंबर, २००८

आजचा दिवस आणि टॅरो कार्ड

टॅरो कार्ड शिकायला लागून आज एका वर्षाहून अधिक काळ झाला आहे. सुरवातीला टॅरो कार्डस शिकताना अनेक जाणकारांनी सांगितले की सकाळी रोज एक कार्ड स्वतःसाठी काढावे जे आजच्या दिवसाचा सारांश सांगेल. थोडक्यात आजचा दिवस कसा जाइल ते सांगेल.
दिवसाच्या शेवटी दिवसभराच्या घटना आठवूण , सकाळी काढलेले कार्ड याच्यात काही साम्य आहे का ? घडलेल्या घटना आणि कार्डावरील चित्र यांच्यात काय साम्य आहे ? याचा अभ्यास करावा.
आजतागायत दररोज सकाळी एक कार्ड काढायचे या नियमात काही अपवाद वगळता खंड पडलेला नाही. याचा मुख्य उपयोग कार्डाचा अगदी खोलवर जाऊन अभ्यास करण्यासाठी होतो. एकच कार्ड किती वेगळ्याप्रकारे प्रकारे अर्थ ( जो आपण लक्षात घेतलेला नसतो ) सांगत असते ते शिकायला मदत होते.
आता आजचे उदाहरण ।



आजचा माझा दिवस कसा जाईल ? ऑफीसला जाण्याआधी मी कार्ड काढले - ८ ऑफ वॉन्ड
याचा अर्थ आहे- प्रवास योग,चांगली बातमी कळणे ( खाली मायनर कार्ड -१ मधे पहा )
ऑफीस मधे आल्यावर सोमवार सकाळची कामे सुरु करण्याआधी महाजालावर फेरफटका मारला तेंव्हा आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
ज्योतिषशास्त्राचे गाढे अभ्यासक आदरणीय धोंडोपंत आपटे यांनी '
धोंडोपंत उवाच' या त्यांच्या ब्लॉगवर ' भविष्याच्या अंतरंगात ' या ब्लॉगचा टॅरो विषयाची मराठीतून माहिती देणारा एक चांगला ब्लॉग म्हणून उल्लेख केलेला आढळला. आणि जगभरातील वाचकांनी हा ब्लॉग पहावा अशी विनंती ही त्यांनी केलेली आढळली. अतीशय आनंद झाला.
पंतांचे मी या बद्दल आभार मानू इच्छितो . त्यांनी दिलेल्या शाबासकीने आणखी काम करण्याची स्फुर्ती मिळाली आहे. यापुढे ही जास्तिजास्त चांगल्या प्रकारे या विषयाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.
असो. आणखी एक
८ ऑफ वॉन्ड कार्डाने ने दाखवून दिले की आज चांगली बातमी मिळणार होती ती मिळाली आहे.
आपला
( रोजच्या दिवसावर अवलंबून असणारा ) अमोल केळकर

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या