५ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ५ जून २०१४

५ जून

वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे. 

 

   

पक्ष्यांची पिले त्यांच्या पंखाखाली वाढतात, त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे. आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल, त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही. रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते; कारण शक्ति येणे हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे, अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत. कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे; आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्‍न करील, त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल. आपण आपले मन भगवंताच्या अनुसंधानात मोठ्या काळजीपूर्वक ठेवले असताना त्याच्यावर आघात करायला विषय अगदी टपलेला असतो. मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की पुरे, विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय.
प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तिने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. परमार्थाच्या आड काय येते ? धन, सुत, दारा, वगैरे आड येत नाहीत, तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते आड येते. वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे; ती वस्तू नसणे हे वैराग्य नव्हे. एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त, असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तो विरक्त. आहे ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे, असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही, तो वैरागी. वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते. आज खरी भक्ति नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही, आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ति येत नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता, भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही, आपले आप्त कुणी नाहीत, जिथे आपल्याला कुणी मान देत नाही, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा. जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला चांगले असते.


१५७. बाह्यांगाने करावी प्रपंचाची संगति । चित्ति असावा एक रघुपति ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

४ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ४ जून २०१४

४ जून

परमार्थात अभिमान आड येतो. 

 



शास्त्रात दोन गोष्टी सांगितल्या आहेत; इहलोक आणि परलोक कसे साधावेत हे दोन्ही स्पष्ट केले आहे. परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो. या दोन्ही गोष्टींत जाणत्याची संगत लागते. परलोक साधून देणार्‍याला सद्‍गुरु म्हणतात. जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो, त्यालाच सद्‍गुरुकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो. आपण भगवंताला शरण जात नाही, कारण आपला अभिमान या शरण जाण्याच्या आड येतो. गंमत अशी की, व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून, ज्याला जे समजते त्याच्याकडे जातो. इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा, अशी आपली कल्पना असते. पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही, मग 'परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करीत नाही' हे म्हणणे लबाडीचे आहे. 'प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही, मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला ?' असे काहीजण विचारतात. प्रपंच सचोटीचा असला, तरी त्यात अभिमान असेल तर तो परमार्थ होणार नाही. 'राम कर्ता' म्हटल्याशिवाय, म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय, परमार्थ नाही साधणार. 'मी देही' म्हणू लागलो यात अभिमान आला. देहबुद्धीला कारण म्हणजे वासना. वासना हे सर्वांचे मूळ आहे. 'माझा जन्मच जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू ?' असे वाटते. जो या वासनेचा खून करतो, तोच परमार्थाला लायक होतो. अंती जी मती, ती जन्माला कारण होते. हे सगळे ज्ञानाचे बोलणे झाले, पण प्रचीतीने हे सर्व जाणावे.
बायकोपोरांचा त्रास होतो, मन एकाग्र होत नाही, म्हणून बुवा झाला; मठ केला. लोक येऊ लागले, त्यांना जेवायला घालण्याकरिता भिक्षा आणू लागला. पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला ! छप्पर गळू लागले ते नीट करण्याची काळजी करू लागला. मग घरादारांनी काय केले ? असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचात राहिलेले काय वाईट ! थोडक्यात म्हणजे, परमार्थ समजून जो त्याचे आचरण करील, त्याला तो लवकर साधेल. त्या माणसाला प्रपंच सोडून जायचे कारणच उरणार नाही. जगातले आपले समाधान अगर असमाधान, ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून आहे. परमार्थात महत्त्व, बाहेरचे ऐश्वर्य किती आहे याला नसून, वृत्ती स्थिर होण्याला आहे, आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे.


१५६. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

३ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३ जून २०१४

३ जून
परमार्थ कसा साधेल ? 




ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली, त्याला शरण जावे. त्याला शरण जाण्याच्या आड काय येते ते पाहावे. कर्तेपण टाका म्हणजे शरण जाता येते. माझेपणाने मिरविता आणि अभिमान कायम ठेवता, मग भगवंताला शरण कसे जाता येईल ? आपण संतांच्या दर्शनाला जातो, आणि बायकोचे दुखणे बरे व्हावे असे म्हणतो; मग ते दर्शन खरे झाले म्हणायचे का ? पोराबाळांकरता, बायकोकरता, संतांकडे नाही जाऊ. संतांनी नामस्मरण करायला सांगितले, परंतु मुलगा वाचत नाही असे पाहिले की आपली रामावरची, नामस्मरणावरची, श्रद्धा उडते. म्हणजे मी विषयाकरता नाम घेतो असेच झाले ! विषय सुटावेत असे वाटते, पण ते सुटतच नाहीत. याचे कारण आमची अशी बलवत्तर इच्छाच नसते. संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोर घेऊन आडवी येते; तिला दूर सारून निघाला, पण पुढे मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते ! माणूस व्यसनाकरतां हे सर्व करतो, परंतु परमार्थाकरिता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटले, तर निरनिराळ्या सबबी आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. चोवीस वर्षे अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही, मग परमार्थ मात्र दोन वर्षात साध्य व्हावा असे कसे म्हणावे ?
शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे. परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही. बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही. त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्यानेच जास्त फायदा होईल. काही खेळ जसे एकट्यानेच खेळायचे असतात, तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे. तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे. खेळात काही बाह्य साधन तरी लागते, पण या अभ्यासात त्याचीही जरूरी नसते. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल, तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे, हा तर मोठा घात आहे. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्‍न करणे, याचेच नाव परमार्थ. 'जग काय म्हणेल' म्हणून वागणे याचे नाव व्यवहार, आणि 'भगवंत काय म्हणेल' म्हणून वागणे हाच परमार्थ.


१५५. कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचे सार.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २ जून २०१४

२ जून
भगवंतावर अकारण प्रेम करावे. 



खरोखर, जगात आणि लौकिकांत आपण अडाणी राहिलो तर काही वाईट नाही. भगवंताच्या मार्गामध्ये त्याचा फायदाच होईल. आपण अडाणी झाल्याशिवाय, म्हणजे आपली विद्या आणि मोठेपण विसरल्याशिवाय, परमार्थ साधत नाही. मुलगा गावाला जाताना ज्याप्रमाणे आई त्याला फराळाचे देते, त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला ज्या परिस्थितीत जन्माला घालतो त्या परिस्थितीत राहण्यासाठी लागणारे समाधानही तो आपल्याला देत असतो. ते घ्यायची आपली लायकी मात्र पाहिजे. जिथे असमाधान फार, तिथे दुष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो. याच्या उलट, जिथे खरे समाधान आहे, तिथे चांगल्या शक्ति मदत करतात. आपण नामाला चिकटून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती बाधणार नाही. देहाचा मनाशी संबंध आहे, आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे; म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे, म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल.
स्वार्थ सुटताना पहिल्या पहिल्याने मनुष्य व्यवहाराच्या चौकटीत बसणार नाही. जो येईल त्याला तो आपलाच म्हणेल. पण परमार्थ मुरला की तो व्यवहार बरोबर करून शिवाय निःस्वार्थी राहील. खरोखर, परमार्थ हे एक शस्त्र आहे; त्यामध्ये सुसूत्रपणा आहे. व्यवहार न सोडावा; पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते, म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे. भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे. भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ. परमार्थाला डोके शांत पाहिजे. एका गृहस्थाला सगळीकडे रामाची मूर्ति दिसू लागली. झाले ! त्याला वाटले की देव आपल्याला भेटला. पण हे काही खरे भगवंताचे दर्शन नव्हे. तो सर्व ठिकाणी आहे अशी भावना झाली पाहिजे. परमार्थाची काळजी करू नये; ती काळजीच प्रगतीच्या आड येते. वय वाढू लागले की आपले सर्व अवयव जसे प्रमाणात आपोआप वाढतात, तसेच परमार्थाला लागणार्‍या गुणांचे आहे. आपण साधन करीत असताना, आपली प्रगती किती झाली हे सारखे पाहू नये. समजा, आपण आपल्या परसात एक झाड लावले, आणि ते किती वाढले हे पाहण्यासाठी रोज त्याच्या मुळ्या उपटून आपण जर पाहू लागलो, तर ते झाड वाढेल का ? अगदी तसेच परमार्थाच्या प्रगतीचे आहे. मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून आणि दृष्टीवरून ओळखता येते.


१५४. परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही. तो निव्वळ स्वतःकरिता आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १ जून २०१४

१ जून

कर्तेपणा टाकणे हाच परमार्थ ! 

 



दोरीला जो साप म्हणून समजला तो बद्ध; पण दोरीला दोरी म्हणून ज्याने ओळखले, तो मुक्त समजावा. 'देही मी नव्हे' हे ज्याला समजले तो मुक्तच. सत्यज्ञान करून घेणे म्हणजेच मुक्तावस्था आहे. बद्धदशा आमची आम्ही निर्माण केली. काळजी, तळमळ आणि दुःख ही बद्धपणाची लक्षणे होत, तर कोणत्याही परिस्थितीत आनंदाने राहणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे. जागे होणे म्हणजे मुक्तदशेला येणे आहे. माझे माझ्याजवळच आहे, पण ठाऊक नाहीसे झाले आहे. भगवंताला विसरल्याने 'मी देही' असे म्हणू लागलो आहे. देह तर माझ्या ताब्यात नाही, तेव्हा मी देही नाही हे सिद्ध झाले. आपण कर्तेपण आपल्याकडे घेतो, आणि त्याबरोबर सुखदुःखही आपल्याकडे घेतो. मला सुख नाही आणि दुःखही नाही असे ज्याला वाटेल, तो मुक्त समजावा.
कर्तेपण घातुक असते. मी एवढा मोठा वाडा बांधला, प्रपंच चांगला केला, असा प्रापंचिकाला अभिमान वाटतो, तर संन्यासी मठाचाच अभिमान धरून बसतो ! म्हणजे कर्तेपणाच्या बाधेतून दोघांचीही सहजी सुटका होत नाही. हे कर्तेपण सोडावेसे वाटले तरी ते आपल्याला सुटत नाही, याचा आपल्याला नेहमी अनुभव येतो. भगवंताचे अस्तित्व पटल्यानेच कर्तेपणा कमी होतो. म्हणून, भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे, आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानावे. भगवंताच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख होते, तो विषय समजावा. विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच, आणि परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचेच नाव परमार्थ.
फळाची अपेक्षा ठेवून आपण जी कृती करतो ते कर्म होय; पण फळाची काहीही अपेक्षा न ठेवता आपण जे कर्म करतो ते कर्तव्य ठरते. आणि असे कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करीत राहणे हाच परमार्थ. हे करीत असताना भगवंताला दृष्टीआड न होऊ देणे, याचेच नाव अनुसंधान होय. समजा, आपण एखादे चांगले पुस्तक वाचीत बसलो आहोत, इतक्यात आपल्या पायाला एक मुंगी चावली; त्याची जाणीव आपल्याला कशी चटकन होते ! ती जाणीव सर्व शरीरभर व्यापून असते, त्याचप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानाने प्रपंचाला व्यापून ठेवले पाहिजे. प्रपंचातला कोणताही उद्योग करताना अनुसंधान टिकवावे. अनुसंधानाचा अभ्यास करावा. भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा.

१५३. आपले कर्तव्याला न विसरावे । भगवंताचे अनुसंधान राखावे ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

३१ मे, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३१ मे २०१४

३१ मे

भगवंताला शरण जावे. 

 



मी जे जे करतो ते ते भगवंताकरता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. भगवंतप्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे, हे भक्ताचे लक्षण आहे. चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते. याकरिता, कोणतेही कृत्य भगवंताला स्मरून करावे. भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसे म्हणावे ? जो काळ भगवंत स्मरणात जातो, तोच काळ सुखात जातो. विषयासाठी आपण स्वतःला विसरतो. मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू ? मला सगुणात प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते, तो पर्यंत सगुणभक्ति करावी. गुरूच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो, म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली ? यामध्ये अभिमान अनायासे मारला जातो. मीपणा टाकल्याशिवाय गुरुआज्ञा नाही पाळता येत. गुरुआज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरीसुद्धा ती आपले डोके मधून मधून वर काढतेच. पण तिला एकदा कळले की हा ऐकत नाही, की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते. देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली, तरी गुरुआज्ञा मोडू नये. देहातीत व्हायला, गुरुआज्ञेप्रमाणे वागणे यापरते दुसरे काय आहे ? 'मी देही नाही' असे म्हणत राहिला, तर माणूस केव्हातरी देहातीत होईल.
आपला धर्म आणि नीति सांभाळावी, आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्‍न करावा. संत आणि प्रापंचिक, दोघेही प्रपंच करतात; पण प्रापंचिक, कर्तेपणा आपल्याकडे घेतात, तर संत 'राम कर्ता' असे म्हणून प्रपंच करतात. कर्तेपण तुम्ही आपल्याकडे घेतलेत तर सुखदुःख भोगावे लागेल. बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वतःला विसरतो, मग भगवंताकरिता नाही का तसे करता येणार ? तळमळ असली पाहिजे मग सर्व काही होते. 'किती दिवसात मुक्ति मिळेल ?' याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे. 'ज्या क्षणी भगवंतस्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ति मिळेल.' स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे. कृती करणार्‍याचाच वेदांत खरा असतो. मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते. याकरिता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा, सहवासाने माणसाचेसुद्धा प्रेम जर वाढते, तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचे प्रेम नाही का येणार ? भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे, यातच सर्व धर्माचे आणि शास्त्रांचे सार आहे.


१५२. देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत, म्हाणून नाम घेत,
तसे वेगळे राहण्याचा प्रयत्‍न करावा. जे कशानेही साधले नाही ते नामाने साधेल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

३० मे, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० मे २०१४

३० मे

सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा. 

 

 

अकर्तेपणे करीत राहावे कर्म । हाच परमात्मा आपला करून घेण्याचा मार्ग ॥ न करावा कोणाचा द्वेष मत्सर । सर्वांत पाहावा आपला रघुवीर ॥ परनिंदा टाळावी । स्वतःकडे दृष्टी वळवावी ॥ गुणांचे करावे संवर्धन । दोषांचे करावे उच्चाटन ॥ जेथे जेथे जावे । चटका लावून यावे ॥ याला उपाय एकच जाण । रघुनाथावांचून न आवड दुजी जाण ॥ देहाचे दुःख अत्यंत भारी । रामकृपेने त्याची जाणीव दूर करी ॥ मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम । हे पूर्ण जाणून, की माझा त्राता राम ॥ अभिमान नसावा तिळभरी । निर्भय असावे अंतरी ॥ जे दुःख देणे आले रामाचे मनी । ते तू सुख मानी ॥ देह टाकावा प्रारब्धावर । आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर ॥ मी असावे रामाचे । याहून जगी दुसरे न दिसावे साचे ॥ प्रपंचातील सुखदुःख ठेवावे देहाचे माथा । आपण न सोडावा रघुनाथा ॥ आपण नाही म्हणू कळले जाण । ज्ञानाचे दाखवावे अज्ञान ॥ दोष न पाहावे जगाचे । आपले आपण सुधारून घ्यावे साचे ॥ कोणास न लावावा धक्का । हाच नेम तुम्ही राखा ॥ एक रामसेवा अंतरी । सर्वांभूती भगवद्‌भाव धरी ॥
राम ज्याचा धनी । त्याने न व्हावे दैन्यवाणी ॥ नका मागू कुणा काही । भाव मात्र ठेवा रामापायी ॥ वाईटांतून साधावे आपले हित । हे ठेवावे मनी निश्चित ॥ भगवंताचे विस्मरण । हे वस्तूच्या मोहाला कारण ॥ म्हणून भक्ति व नाम । याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान ॥ परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाणे । त्यातच त्यास पाहावे आपण ॥ सर्व कर्ता राम हा भाव ठेवता चित्ती । खर्‌या विचारांची जोडेल संगति ॥ व्यवहारातील लाभ आणि हानि । मनापासून आपण न मानी ॥ मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी । सुखाने वर्तत जावे जनी ॥ एकच क्षण ऐसा यावा । जेणे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा ॥ रामाविण उठे जी जी वृत्ति । त्यासी आपण न व्हावे सांगाती ॥ मी रामाचा हे जाणून । वृत्ति ठेवावी समाधान ॥ धन्य मी झालो । रामाचा होऊन राहिलो । ही बनवावी वृत्ति । जेणे संतोषेल रघुपति । वृत्ति बनविण्याचे साधन । राखावे परमात्म्याचे अनुसंधान ॥ शरीरसंपत्ति क्षीण झाली । तरी वृत्ति तशी नाही बनली ॥ विषयाधीन जरी होय वृत्ति । तरी दुरावेल तो रघुपति ॥ संतांची जेथे वस्ती । तेथे आपली ठेवावी वृत्ति ॥ सतत विवेक अखंड चित्ती । रामनामी मनोवृत्ति । हेचि तुम्हा परम प्राप्ति ॥ नामामध्ये ऐसी सत्ता । जेणे जोडे रघुनाथा ॥ नामापरते न मानावे हित । हेच आजवर सांगत आलो सत्य ॥ भगवंताला आपले होणे आवडते फार । श्रीरामनामी राहावे खबरदार ॥

१५१. रघुनाथस्मरणात असावे आनंदात । तेथे न चाले कोणाची मात ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२९ मे, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ मे २०१४

२९ मे

भगवंताची तळमळ लागायला पाहिजे. 

 

    

ज्याला जे आवडते ते आपण केले तर त्याला गोडी लागते. भगवंताला प्रेमाशिवाय दुसर्‍या कशाचीच गरज नसते. भगवंताचे प्रेम यायला त्याच्याशी आपलेपणा लावून ठेवावा. भगवंत जोडल्याशिवाय नाहीच राहणार, असे ठरवावे. भगवंत जोडावा हे ठरल्यावर, मला लोक नावे ठेवतील याचा कशाला विचार करावा ? निश्चय आहे तिथे सर्व काही सुचते. तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो. साधुसंत मार्ग दाखवायला सतत तयार असतात; मात्र आपण आपली देहबुद्धी बाजूला ठेवून त्यांना शरण जावे.
सर्व जग जर भगवंताचे आहे तर मग काळजीचे कारण काय ? उपाधी कोणी लावून घेतली ? माझी मीच ! मी निर्दोष होईन तेव्हाच लोक मला तसे दिसतील. आपल्या सर्व अवगुणांना कारण म्हणजे 'मी रामाला विसरलो' हेच आहे. परमात्म्याचा विसर पडतो हेच खरे पाप. कोणी पाहात नसेल तिथे वाईट कर्म आपण करतो; पण भगवंत चोहोकडे पाहतो आहे अशी जाणीव ठेवली, म्हणजे असे पाप घडणार नाही. कोणतेही कर्म करताना फळाची आशा धरली तर ते घातुक होते. ज्याने भगवंत जवळ आणला जातो तेच चांगले कृत्य. स्नानसंध्या केली आणि व्यवहार खोटा केला, तर त्या संध्येचा काय उपयोग ? मनात कोणताही हेतू न धरता परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वागावे. मन परमेश्वराला अर्पण करावे, व दुसरीकडे गुंतवू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुनः विषयाचा आनंद झाला, तर ते अर्पण झाले नाही असे समजावे. माझा प्रयत्‍न व्हायचा असेल तसा होवो, पण तुझा विसर पडू देऊ नको, असे अनन्य भावाने भगवंताला म्हणावे. प्रत्येक कृतीत, 'मी भगवंताचा आहे' ही जाणीव ठेवावी. पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भिती नाही वाटत. पांडवांच्याजवळ प्रत्यक्ष भगवंत असताना त्यांना कितीतरी संकटे सोसावी लागली ! संकटे येऊ देऊन मग त्यातून बाहेर काढण्यापेक्षा भगवंताने संकटे टाळलीच का नाहीत, याचे उत्तर देणे सोपे आहे. पुष्कळ वेळा, आपल्यावर येणारे संकट कुणी टाळले, तर ते संकट येणारच नव्हते असे आपण समजतो. खरे सांगायचे म्हणजे संकटे ही आपल्या कर्माचीच फळे असतात. संकटांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्याला समाधान देते. ज्यांना सर्व अनुकूल आहे त्यांनादेखील समाधान हे नसतेच; म्हणून ज्यांना तितकी अनुकूलता नाही त्यांनी त्याबद्दल असमाधान ठेवण्याचे कारण नाही, कारण समाधान हे त्यामध्ये नाहीच नाही. असमाधान हा रोग सर्वांचा एकच आहे, आणि भगवंताचे स्मरण हे औषधही सर्वांना एकच आहे.


१५०. ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे, त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२८ मे, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ मे २०१४

२८ मे

प्रपंच भगवंताचा मानून करावा. 

 



अमुक एक हवे किंवा अमुक एक नको असे न वाटणे याचे नाव वैराग्य. संकटकाळी, हे संकट नसावे असे न वाटता, परमेश्वराचे स्मरण असावे आणि त्याच्याजवळ हे मागावे की, 'देवा तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा देऊ नको.' देहाला मुद्दाम कष्ट देऊ नयेत, पण जेव्हा ते आपोआप येतात, तेव्हा मात्र ते आनंदाने सोसावेत. पुरूरव्याने दुष्कृत्य केले आणि त्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त झाले; तेव्हा त्याला दुष्कृत्य म्हणावे की सत्कृत्य ? तरीही, वैराग्यप्राप्तीचा वास्तविक हा काही मार्ग नव्हे हे खरेच. आपण शास्त्रविरुद्ध कर्म करू नये. आणि दुसर्‍याने केले तर नावे ठेवू नयेत. न जाणो, परमात्म्याची इच्छा असेल तर त्यातूनच चांगले होण्याचा संभव आहे. प्रपंच मिथ्या मानावा आणि जो मिथ्या तो बरा असे वाटण्यात काय अर्थ ? तो जसा असेल तसा असू द्यावा. नाटकात नट जसे काम करतो, त्याप्रमाणे प्रपंचात आपण आपले काम करावे. तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही; सद्‍गुरूच तो तुमच्याकरिता करीत असतात; तेव्हा तुम्ही कशाचीही काळजी करू नये. जे होईल त्यात आनंद मानीत राहावे. सद्‍गुरुदर्शनाने पूर्वकर्मे, पापे, जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्‍गुरू घेतात. तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसून नये आणि काळजी करू नये, समाधानात आणि आनंदात असावे.
प्रपंच देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ. परमेश्वराचे स्मरण ठेवून तोच कर्ता आहे असे मानणे, आणि सर्व काही त्याच्याकरिता करणे, म्हणजे देवाला अर्पण केल्यासारखेच आहे. फक्त कर्माच्या शेवटीच कृष्णार्पण म्हणणे, म्हणजे इतर वेळ त्याला विसरला असे नाही का होत ? देवापाशी 'मला तू आपला म्हण. हे मन तुझ्या चरणी अर्पण केले. मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न होवो.' असे मागावे. नाही तर, जो राज्य द्यायला समर्थ आहे त्याच्याजवळ केरसुणी मागितल्याप्रमाणे होईल. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे, मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते. 'तू जे देशील ते मला आवडेल,' असे आपण भगवंताला सांगावे, आणि भगवंताचे अखंड स्मरण ठेवावे. यापेक्षा भगवंताजवळ जायला दुसरा मार्ग कोणता असणार ?


१४९. ज्याच्या प्रपंचामधे पाठीराखा परमात्मा आहे,
त्याचा तोच परमार्थ होतो; ज्याचा पाठीराखा अभिमान आहे तो प्रपंच समजावा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२७ मे, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ मे २०१४

२७ मे
निरभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच. 

 



प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरूर आहे. पण तो कुणाला शक्य आहे आणि कुणी करावा, याचा विचार करायला पाहिजे. ज्या शेतात पाणी भरपूर पुरून उरत असेल त्याच शेतातले पाणी बाहेर टाकता येते, आणि ते हितावहही होते. इतर शेतांच्या बाबतीत ते होत नाही, अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचाच आधी विचार करणे जरूर आहे. हीच दृष्टी परोपकार करणार्‍या व्यक्तीने ठेवावी. ज्या महात्म्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला, जगाच्या कल्याणाकरिताच जन्म घेतला, त्यांनाच परोपकाराचा अधिकार. मग प्रश्न येतो की, इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये आणि तसा प्रयत्‍नही करू नये की काय ? तर तसे नाही. परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्‍न असणेच जरूर आहे. परंतु परोपकार म्हणजे काय, आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल, हे पाहणे आवश्यक आहे. भगवंताची सेवा या भावनेने दुसर्‍याकरिता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल, आणि त्यापासून नुकसान होण्याची भिती नाही. परंतु हे वाटते तितके सोपे नाही. कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की, थोडेसे काही आपल्या हातून झाले की, "ते मी केले, मी असा चांगला आहे," अशा तर्‍हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो. सबब, ज्या ज्या वेळी दुसर्‍याकरिता काही करण्याची संधी मिळेल त्या त्या वेळी तिचा फायदा घेऊन मनाला शिकवण द्यावी की, "देवा, तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही कृपा झाली. अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करवून घे." ही विचारसरणी जागृत राहिली नाही, तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही. म्हणून अत्यंत जपून वागणे जरूर आहे. परोपकार याचा सरळ अर्थ पर-उपकार; म्हणजे दुसर्‍यावर केलेला उपकार. यावरून असे लक्षात येईल की, परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते. एक उपकार करणारा, आणि दुसरा उपकार करून घेणारा. जगातल्या सर्वसामान्य व्यक्ति पाहिल्या, तर आपल्या स्वतःवरून असे दिसते की, मी एक निराळा, आणि प्रत्येक व्यक्ति आणि वस्तुमात्र गणिक सर्व जग निराळे. मनाच्या या ठेवणीमुळेच जर आपल्या हातून दुसर्‍याचे कधीकाळी एखादे काम होण्याचा योग आला, तर 'मी दुसर्‍याचे काम केले' ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो. म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे. नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होते.



१४८. जगात परोपकारी म्हणून नावाजलेले, पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले
मोठेमोठे लोकसुद्धा मानाबिनात कोठेतरी अडकल्यावाचून राहणार नाहीत.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२६ मे, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ मे २०१४

२६ मे
भगवंताचे स्मरण ही सद्‍बुद्धी. 




परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे, सर्व विश्व व्यापून आहे. मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही ? ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल, त्यालाच परमेश्वराचे अस्तित्व जाणवेल, इतरांना नाही. म्हणून तशी भावना असणे जरूर आहे, आणि ती उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे. मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो, तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते; कारण जी व्यक्ति नामस्मरण करते, ती स्वतःचा उद्धार करून घेत असते, म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करीत असते.
बुद्धिवाद्यांना एक शंका अशी येते की, परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे, तर मग दुर्बुद्धी झाली तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल ? याला उत्तर असे की, बुद्धिदाता परमेश्वर आहे हे अगदी खरे; पण त्या बुद्धीची सद्‍बुद्धी किंवा दुर्बुद्धी का होते हे पाहणे जरूर आहे. प्रकाश-काळोख या दोहोलाही कारण सूर्यच असतो. सूर्याचे अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे. तसे भगवंताचे स्मरण हे सद्‍बुद्धीला आणि विस्मरण दुर्बुद्धीला कारण आहे. म्हणून, बुद्धीदाता परमेश्वर हे जरी खरे असले, तरी सद्‍बुद्धी वा दुर्बुद्धी ठेवणे हे मनुष्याच्या हातात आहे. भगवंताचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही. म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावे; आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण. सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे. परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवणे, हे त्याहीपेक्षा श्रेष्ठ होय. भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावणे जरूर आहे. भगवंताचे अनुसंधान ठेवले म्हणजे दिवस त्याच्याकडे लागतो. अशा रीतीने आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधानात घालविला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे. अनुसंधानात स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब, हे भेद नाहीत. इतर साधनांनी जे साधायचे, ते नुसत्या अनुसंधानाने साधते. हाच या युगाचा महिमा आहे. इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र करणे, याला अनुसंधान असे म्हणतात. भगवंताचे अनुसंधान हेच खरे पुण्य होय, आणि हीच आयुष्यात मिळविण्याची एकमेव गोष्ट आहे. एक भगवंताचे अनुसंधान ठेवा, म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील. भगवंताला अनन्यभावे अशी प्रार्थना करावी की, "देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नको."


१४७. नाम व अनुसंधान चोवीस तास चालायला पाहिजे.
तेथे दुसरी एखादे गोष्ट वेळेवर न झाली तर त्याचा आग्रह नसावा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२५ मे, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २५ मे २०१४

२५ मे
आनंद मिळविण्यासाठी वासना भगवंताकडे वळवावी. 

 

घरामधे कसे हसूनखेळून मजेत असावे. आपली वृत्ती अशी असावी की, ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ति कितीही दिली तरी पुरे पडत नाही. पण वृत्तीचा आनंद देऊन कधी संपत नाही. जीवन हे मूलतः आनंदमय आहे; सृष्टिक्रमावर सोडले तर ते सुखी होईल. आनंद अत्यंत विशाल आहे. देहबुद्धी मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते. आनंद मिळविणे हे सोपे आहे. पण हे समजून, आपण सोपे झाले पाहिजे. आपण उपाधीने जड झालो आहोत, म्हणून आपण हलके झाले पाहिजे. सर्व जगाला आनंद हवा असतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा. आनंद हा शाश्वत आहे. पण आपण विषयातच आनंद मानतो, त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही. फोड आला म्हणजे खाज सुटते, आणि खाजवल्यावर रक्त आले तरी एक प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो. पण म्हणून खाजवतच राहणे योग्य होईल का ? कुत्र्याच्या तोंडात हाड असताना, स्वतःच्या तोंडातले रक्तच तो चघळत असतो. त्यातले काही रक्त जमिनीवर पडून कमीही होत असते. परंतु तो हाडूक काही सोडीत नाही. विषयाचा आनंद हा असाच असतो. कोणतीही वस्तु अस्तित्वात नसतानाही होणारा आनंद, ते परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे.
वासना भगवंताकडे वळविली की मग आनंदाशिवाय दुसरा कोणता लाभ होणार ? खरोखर, वासना ही विस्तवासारखी आहे. ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कढत आणि ताजे अन्न खायला मिळते, तोच विस्तव जर घरावर ठेवला, तर घर जाळून टाकतो. त्याप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरूप बनविते; पण ती जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते. वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखविते. म्हणजे खेळ जुनेच असतात, पण आपली वासना मात्र नवी असते. वासना म्हणजे अभिमान किंवा मीपणा, हा मनुष्याचा शत्रु असून तो त्याच्या आनंदावर विरजण घालतो. वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कळत असूनसुद्धा, वासनेचा जोर इतका विलक्षण असतो की तो शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही. ज्याने वासनेला जिंकले, त्याच्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून समजावे. वासनेला जिंकायला भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा उपाय नाही. वासना न ठेवता कर्म करणे याचेच नाव संन्यास. जिथे वासना संपली तिथे आनंदच आहे.


१४६. चिरकाल टिकणारा आनंद हा वस्तुरहित असतो.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२४ मे, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ मे २०१४

२४ मे

नाम प्राणाबरोबर सांभाळावे. 

 



आपल्याला जिव्हा दिली आहे ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगले होईल का ? जे करण्याने देवाची प्राप्ती होते, ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालविला तर कसे चालेल ? तुम्ही अभ्यास करता; अभ्यासाकरिता जी पुस्तके घेतली ती जर नुसती उशाला घेऊ लागलात तर अभ्यास होईल का? म्हणून म्हणतो, आपल्याला जिव्हा दिली आहे, तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरिता करा. प्रकृती चांगली सुदृढ आहे; चांगले धट्टेकट्टे पाय आहेत; ते जर देवाच्या प्राप्तीकरिता वापरले नाहीत, तर पाय नसलेले काय वाईट ? तुमच्यापुढे ब्रह्मानंदबुवांचे प्रत्यक्ष उदाहरण असून असे का करता ? त्यांनी काय केले पाहा! त्यांनी नामस्मरणरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही. त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळले. तुम्हाला तितके जरी करता आले नाही तरी, जसे देहावर प्रेम करता तसे तरी नामावर ठेवा. आताच्या दिवसांत तर कलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालवायला कारण होतो; तरी ह्या वेळेस सांभाळा. अश्रद्धा उत्पन्न झाली तर आपले पापच आड येते असे समजा; आणि त्या वेळेस नामस्मरण करीत जा. माझ्यावर व्यवहाराबाबत पाहिजे तर विश्वास ठेवू नका, पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर विश्वास ठेवा.
नाम व्यवहाराकरिता उपयोगांत आणू नका. नामस्मरण नामाकरताच करीत जा; आणि काही वेळ तरी नामांत घालविण्याचा निश्चय करा; म्हणजे विश्वास वाढत जाईल. खरे समाधान तुम्हाला नामांतच मिळेल. भगवंताचे नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे. नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे. सर्व संशय आपोआप नाहीसे होतील. खरोखर, भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे. वेळप्रसंगी ते खास उपयोगी पडते. विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे नाम होय. भगवंताला अनन्य शरण जाऊन `तुझ्या नामाचे प्रेम मला दे' अशी काकुळतीने त्याची प्रार्थना करावी, म्हणजे नामाचे प्रेम आपोआप वाढेल आणि भगवंताचे खरे दर्शन घडेल.
वासनेमुळे माझ्या आनंदाचा भंग होतो; म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरीच करते. ज्या समाधानाकरता माझी खटपट चाललेली असते, ते समाधानच वासना हिरावून नेते. नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते. म्हणून, सदासर्वकाळ नामात राहिले, तर हळूहळू तिचा अंत हो‍ऊन केवळ आनंदच आपल्याजवळ राहील.

१४५. आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा.
पहिल्या पहिल्याने विसरेल, पण सवयीने आपोआप आठवेल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२३ मे, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २३ मे २०१४

२३ मे

देवाकरिता स्वतःला विसरावे. 

 



तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही ? हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरिता विसरतो. स्वतःला विसरावे, पण ते विषयाकरिता विसरू नये. एखादे वेळेस असे होते की, एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपले आपल्यालाच समजत नाही. अशा वेळी देह भानावर नसतो हेच खरे. त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे होते. थोडक्यात म्हणजे, आपण जेव्हा विषयाच्या आधीन होतो, तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो. त्याचप्रमाणे क्रोधाचे होते. विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच; परंतु देवाकरिता जर आपण आपल्याला विसरलो, तर ते फारच उत्तम. भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे. आपण आता तसे करतो का ? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो; ते खरे भजन होत नाही. म्हणून भजन करावे आणि तशी सवय ठेवावी, म्हणजे देहभाव विसरता ये‍ईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा; म्हणजेच, विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वतःची आठवण ठेवून प्रंपच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही.
व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावे, पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता, त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे; म्हणजे देहभाव आपोआप नष्ट हो‍ऊन जाईल. हे सर्व साधायला, परमेश्वराला शरण जाणे हा एकच सोपामार्ग आहे; आणि त्याकरिता नामस्मरणात राहणे हेच साधन आहे. कोणी बारा अन बारा चोवीस वर्षे साधनात राहूनही काही काम झाले नाही असे म्हणतात, आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात; तेव्हा अशा लोकांतच अर्थ नसतो, की गुरूत काही नसते ? तर आपले आपणच याला कारणीभूत असतो हे पक्के समजावे. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का ? त्याप्रमाणे, विषय बरोबर घेऊन गुरूकडे गेलो, तर गुरूची खरी भेट होईल का ? ती शक्य नाही. याकरिता, ते सांगतील ते साधन आधी करावे म्हणजे चित्त शुद्ध होते, आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरे समाधान मागावे. आणि ते मिळाल्यावर आणखी काय मिळवायचे राहते ? मग तो ज्या स्थितीत ठेवील त्यातच समाधान होते. देहभोगाची अशा वेळी काहीच किंमत राहात नाही, आणि मग त्याला कंटाळण्याचेही कारण उरत नाही.


१४४. परमात्म्याचे स्मरण । यातच विषयाचे विस्मरण ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२२ मे, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २२ मे २०१४

२२ मे

गुरूवर अत्यंत श्रद्धा ठेवावी. 

 



कुस्त्या खेळून, झगडून, शरीरबळ वाढते; अवघड उदाहरणे सोडवून बुद्धिबळ वाढते; तसेच, आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढते. आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुद्धी कमी होणे; आणि ते करण्याकरिताच परमेश्वर संकटे धाडतो; पण तुम्ही त्यांना भिता याला काय करावे ? अशा परिस्थितीत, संकटे परत घेणे म्हणजे तुमचे अनहित करणे होय. त्याला तुमचे हित कशात आहे हे उत्तम कळते. भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे. दुखणे आले असता औषध घ्यावे. पण औषधात गुण तरी परमात्म्यानेच ठेवला ना ? औषधाने तरी गुण हमखास येतोच असे थोडेच आहे ? एकाला येतो, एकाला नाही. ज्याचे ज्यात हित होणे असेल तसे तो परमात्मा करतो हे लक्षात ठेवावे. तुम्ही एकच करावे, परमात्म्याला शरण जाऊन, "हा भोग भोगण्याची मला ताकद दे, समाधान भंगू देऊ नकोस, तुझे सतत स्मरण व्हावे." असे मागावे. दुखणे भोगायचे आहे तर ते समाधानाने का नाही भोगू ? प्रारब्धाचे तुमच्या डोक्यावरचे ओझे, कर्ज, तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार ? दुखणे आले असता त्याची उपेक्षाच करावी, म्हणजे आपोआप ते कमी होईल.
मी म्हणजे अमुक एक, अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते, तशी देव आहे अशी खात्री पाहिजे. आपले सद्‌गुरू देवच आहेत अशी आपली खात्री झाली, म्हणजे आपल्या सद्‍गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल. माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली, तुम्हाला जे पसंत तसे तुम्ही केले. वास्तविक, माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे, माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्वांभूती भगवद्‍भाव ठेवून कुणाचे मन न दुखवणे, परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे, माझ्या सांगण्याचा परिणाम न होण्याची दोन कारणे असतील. एक कारण असे की, तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्तीच माझ्यामध्ये नसेल; किंवा दुसरे कारण असे की, तुम्ही अभ्यास करीत नसाल. पण परमार्थात एकदम फरक होणे बरे नव्हे. समजा, एखाद्याला आज १०५ ताप आहे आणि उद्या तो एकदम ९५ झाला, तर ते बरे नाही. तसेच, मनुष्य आज रागीट आणि उद्या एकदम शांत झाला तरे तेही बरे नव्हे. आपल्यामधे हळूहळू परिवर्तन व्हावे, आणि ते विवेकाने घडवून आणावे.


१४३. भजन, पूजन, नामस्मरण इत्यादि आपण जे करतो. ते आपल्या
मनापर्यंत पोहोचले पाहिजे. तरच त्याचा योग्य परिणाम लवकर दिसू लागेल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या