७ जुलै, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ७ जुलै २०१४
या जगात कर्माशिवाय कोण राहतो ? पण कर्म यथासांग होत नाही याचे कारण, आपण कर्म कशाकरिता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला. अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही. मालक पाठीशी असला की कर्म करणाऱ्याला जोर येतो. काही चांगली कर्ममार्गी माणसे भक्तिमार्गी लोकांना नावे ठेवतात. भक्तिभावाने जो राहतो तो दुसऱ्याला नावे ठेवीत नाही. 'मी कोण' हे जाणायला ज्ञान आणि भक्ति लागतेच. तसेच, 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या' म्हटले तरी त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावेच लागते. उपासना भगवंताला ओळखून करावी. लहान मूल आईकडे डोळे करून मुकाट्याने दूध पिते, त्याप्रमाणे समर्थांसारख्यांनी जे सांगितले ते आम्ही निमूटपणे करावे. डोळे मिटून जितके काम होईल, अंधश्रद्धेने जे होईल, ते अभिमानाने, ज्ञानाचे डोळे उघडे ठेवूनही नाही होणार. मूल होऊन भगवंताला ओळखावे. याला अडचण एकच असते; माझे 'शहाणपण' आड येते. भक्त मुलांसारखे वागतात देव त्यांचे लाड पुरवितो. कुणी असे म्हणतील की, "भगवंताची आणि आमची ओळख नाही, तर त्याची आम्ही कशी पूजा करावी ?" "त्याला ओळखल्या शिवाय मी भजन करणार नाही" असे म्हणणे वेडेपणाचेच आहे. भगवंताला पुष्कळ मार्गांनी ओळखता येईल. पांडुरंगाकडे जाण्यासाठी काही मार्ग आधी आक्रमणे जरूर आहे. संतांनी अखंड जागृत राहण्याचा मार्ग सांगितला; तो असा की, देहाने प्रपंच करा, पण मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा. मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय इतर काहीही करून उपयोग नाही.
ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता होत नाही. पण सत्य अशा ध्येयावर अगोदर पूर्ण श्रद्धा पाहिजे. प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे. 'देव माझा आहे' असे म्हणण्या‍ऐवजी 'मी देवाचा आहे' असे म्हणावे, म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते. समुद्राचा तरंग असतो, तरंगाचा समुद्र असतो असे नव्हे समाधानात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे; म्हणून साधन श्रद्धेने करीत जावे. जशी श्रद्धा तशी फळे. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे. प्रपंचात कधीच धीर सोडू नये. ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की तिच्यामागे असणाऱ्या हजारो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात, त्याचप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली, की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्प नाहीसे होतात. या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय.

१८९. भक्तिमार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे. प्रपंचाकडचे प्रेम भगवंताकडे वळविले की भक्ति येते.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

६ जुलै, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ६ जुलै २०१४
वेळप्रसंग येईल तसे वागणे उचित आहे, आणि त्याबद्दल मनावर परिणाम होऊ देऊ नये. परमात्म्याच्या चिंतनात मन गुंतले असताना अवांतर गोष्टींचा परिणाम त्यावर होत नाही. जेवढे झेपेल तेवढेच करावे. अभ्यास करावा पण काळजी न करता. सर्वस्वी भार भगवंतावर ठेवून निवांत असावे. आपल्या मनाचे स्वास्थ्य बिघडू न देता आनंदात रहावे. वृत्ती आवरून आवरत नाही; ती परमात्म्याकडे लावली म्हणजे आवरते. राम‍इच्छेने सर्व चालते असे लक्षात ठेवावे. संकट, आनंद, दोन्ही भगवंताला सांगावीत. ज्या स्थितीत भगवंताने ठेवले त्या स्थितीत समाधान मानावे.
अंतःकरणात सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागते. तीर्थयात्रा आणि साधुसंतांची भेट हेच ते निमित्त होय. श्रीरामचंद्रही तीर्थयात्रेला जाऊन अनेक संतांची दर्शने घेऊन आले. संतांच्या अहंकाराला जिवंत राहताच येणार नाही. कारण 'परोपकार' करायला लावणार 'पर'च ठिकाणावर नाही, तर मग 'दुसर्‍याकरिता मी काही केले' ही भावना व्हायला आधारच कुठे राहिला ? विषयाच्या लालसेने सत्समागम करणे हा खरा सत्समागम नव्हे. संत कधीकधी आपल्याला विषय देतात खरे, पण एकंदरीत आपल्याला विषयाचा वीट आणण्याचाच त्यांचा प्रयत्‍न असतो. संताच्या घरी नुसते पडून राहिल्यानेही शुद्ध भाव येईल. भगवंताच्या नामातच संतसंगती आहे, कारण नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे. विषयाची ऊर्मी हे मायेचे स्मरण होय, आणि नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय. तपश्चर्येचे सर्वांत शेवटचे फळ काही असेल तर परमेश्वराच्या ठिकाणी अनन्यभावाने शरण जाण्याची बुद्धी होय. ती बुद्धी आपल्याला झाली पाहिजे. एकदा शरण गेल्यावर आपण उरूच शकत नाही; त्यालाच शरणागती म्हणतात; आणि हीच परमार्थातली अत्यंत श्रेष्ठ गती आहे. आपण आपल्या सद्‍गुरूचे आहोत असे छातीठोकपणे सांगत चला. काही नाही केलेत तरी चालेल, पण आपले सद्‍गुरू आपल्या मागेपुढे आहेत अशी दृढ भावना असावी. मला सुखदुःख दोन्ही नाहीत. पण तुम्ही दुःखी झालात तर मला दुःख होते. तेव्हा तुम्ही मनाला दुःखच होऊ नये असे वागा. प्रपंची माणसाच्या दुःखाची मला पूर्ण जाणीव आहे. ती जाणीव ठेवूनच 'भगवंताचे नाम घ्या' असे मी सांगतो. जे मी सुरुवातीला सांगितले तेच शेवटी सांगतो; तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका.

१८८. तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

५ जुलै, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ५ जुलै २०१४

तुम्ही सर्वजण छान सेवा करता आहात याबद्दल शंका नाही. अशीच सेवा अखंड चालू ठेवा, त्यातच कल्याण आहे. त्यानेच आपण तरून जाऊ. जरी कुणी काहीही सांगितले, 'ह्यात काय आहे, त्यात काय आहे, ह्याने काय होणार आहे,' असे म्हटले, तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे. तो फार मोठा आहे, अमर्याद आहे, त्याला पहायला तशीच सेवाही फार मोठी करायला पाहिजे. त्याला पाहण्यासाठी तशी मोठी शक्तीही आपल्याला लागेल. अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्याने दिव्य दृष्टी देऊन दर्शन घडविले. ती दिव्य दृष्टी आपल्याजवळ नाही, पण ती मिळविण्याची शक्ती आपल्याजवळ आहे. भक्तीची प्रगती ही खरी शक्ति; आणि त्याकरिता अखंड नामस्मरण हेच खरे साधन. श्रीरामप्रभू आपल्या घरातला कुणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. त्याला तुम्ही आपली सुख-दुःखे सांगा. दिवसाकाठी एकदा तरी रामापुढे उभे राहून त्याला अनन्यभावाने शरण जा; दिवस आनंदात जाईल आणि तुमचे दुःख दूर होईल. आपले ज्ञान, शक्ति, वैभव, सत्ता, त्याच्यापुढे काहीच नाहीत. तेव्हा या सर्वांचा विसर पाडून, त्याला शरण जा, आणि त्याच्याजवळ प्रेम मागा. "देवा ! आम्ही जे तुझे दर्शन घेतो ते सर्व बाह्य स्वरूपाचे; तुझे आम्हाला खरे दर्शन घडव. आम्ही अवगुणसंपन्न असू, तुझे दर्शन व्हावे एवढी सेवा आमच्याजवळ नाही, परंतु तू आता आम्हाला क्षमा कर. यापुढे देवा, कितीही संकटे येवोत, आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही तुझ्या नामात आनंदाने भोगू. जे काही व्हायचे असेल ते होऊ दे, आमचे समाधान टिकून तुझ्या नामात आमचे प्रेम राहील एवढी तुझी कृपा असू दे."
खरोखर, परमेश्वर भक्ताचे मन पाहतो, त्याचा भाव पाहतो; एरव्ही तो त्याच्याजवळच असतो. जो श्रद्धेने परमेश्वराचे चिंतन करतो त्याला, परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते. आपल्याला दोन मार्ग आहेत; एक श्रद्धेचा, आणि दुसरा अनुभवाचा. एका गावी पायवाटेने गेले तर फक्त तीन मैलांचे अंतर, आणि मोटारच्या रस्त्याने गेले तर दहाबारा मैलांचे अंतर. श्रद्धा ही त्या पायवाटेसारखी आहे. तिने चालले तर अंतर कमी पडेल. मोटारीचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग. मोटार कुठे रस्त्यात बिघडली, किंवा वाटेत कुठे अडथळा आला, की प्रगती थांबते; त्याप्रमाणे अनुभवात काही चुकले की प्रगती खुंटते. तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा. सद्‍गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेने आणि प्रेमाने नाम घ्यावे.

१८७. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वांत मोठा उपकार होय.

 
 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

४ जुलै, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ४ जुलै २०१४

देह हा देवाच्या प्राप्तीकरता आहे.


एकदा असे झाले, की एका साधूकडे चोरांनी चोरी केले. ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिले, तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोप दिला. हे त्यांचे करणे गुरूला समजले, तेव्हा त्या चोरांना आणून, गुरूने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातले, आणि त्यांना पंचपक्वान्नांचे भोजन दिले. हे असे काय करता ? म्हणून शिष्यांनी गुरूला विचारले, तेव्हा त्याने शिष्यांना सांगितले की, "तुम्ही तरी काय करता ? सर्वचजण देवाच्या घरी चोरी करीत आहेत; कारण आपल्याला त्याने हा जो देह दिला तो देवाची प्राप्ती करून घेण्याकरिता म्हणून दिला, परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चोरतो आहोच की नाही ! म्हणून, विषयात आसक्ति न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ति करावी. आपण सर्वांनी 'मी भगवंताकरिता आहे' असे मनाने समजावे. सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर, मग द्वैत आपोआप नाहिसे होऊन जी एकाग्रता साधते, तीच खरी समाधी होय.
संत काय करतात ? आपण चुकीची वाट चालत असताना, 'अरे, तू वाट चुकलास' अशी जागृती आपल्याला देतात आणि खरा मार्ग दाखवितात. ते सदासर्वदा समाधिसुख भोगीत असतात, आणि नेहमी भगवंताविषयी सांगत असतात. भगवंताच्या लीला पाहणार्‍यांनाच खरा आनंद मिळतो. आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल हजार दाणे घ्यावे, ही भगवंताची लीला आहे. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे. जसा मारुतीमध्ये देव-अंश होता, तसा तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलविला, आपण तो झाकून विझवून टाकला. मारुतीचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवावे. त्याचे ब्रह्मचर्य, भक्ति, दास्य आणि परोपकार करण्याची तऱ्हा या गोष्टी आपण शिकाव्यात. मारुती हा चिरंजीव आहे. ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल. मारुतीला सर्व सृष्टी रामरूप दिसली. हेच खरे भक्तिचे फळ आहे. उपासक देहाला विसरला की उपास्यमूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. 'माझ्या देवाला हे आवडेल का ?' अशा भावनेने जगात वागावे. हाच सगुणोपासनेचा मुख्य हेतू आहे. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझे कल्याण करणारा आहे, ही जाणीव झाली, की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेने मिळाले ही भावना होऊन, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल. समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय. आपली वृत्ती अशी असावी की, कुणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही.

१८६. वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे.

















( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

३ जुलै, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३ जुलै २०१४



सद्‍गुरूची कामगिरी कोणती ? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्‍गुरू सांगतात; आपले चुकते कुठे ते सद्‍गुरू सांगतात. सद्‍गुरू आपल्याला मार्गाला लावतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला ! सद्‍गुरू जागे करण्याचे काम करतात. मला करायचेच काही उरले नाही असे ज्याने म्हटले, त्याने सद्‍गुरू खरोखर केला असे म्हणावे. एखादा सुखवस्तू गृहस्थ 'मी स्वस्थ आहे' असे म्हणतो, पण ते काही खरे नाही. मन जोवर गिरक्या मारते तो पर्यंत तो स्वस्थ आहे असे नाही म्हणता येणार.

शिष्याच्या भावनाच गुरूला गुरुपद देतात. जो शरण जातो त्याचा कार्यभार सद्‍गुरू उचलतो. ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरू. जे चिरकाल टिकते ते गुरुपद समजावे. खरोखर, सद्‍गुरु म्हणजे मूर्तिमंत नामच होय. गुरूने सांगितलेले अक्षरशः पाळणे हेच खरे साधन. संत कुणालाही देहाने कायमचे लाभले नाहीत. संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्त्वाचा आहे. पुष्कळांना संतांची गाठ पडते, परंतु सत्संगतीचे महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही. आपली जी कर्तव्ये ठरली आहेत ती आपण बरोबर करावीत. व्यापार थोडक्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो, त्याप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फळाची आशा आपोआपच सुटेल. आपले कर्तव्य कोणते ते सद्‍गुरू आपल्याला दाखवून देतात.

रथ आहे खरा, पण जर त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल, तर रथ कुठेतरीच जाईल. केवळ 'गाडी माझी आहे' म्हणून ती मालकाला चालविता येणार नाही. साधी बैलगाडी सुद्धा चालविता येणार नाही. आपला देह मनुष्य आपल्या मनाने चालवितो, आणि खड्ड्यामध्ये पडतो. सद्‍गुरू हे गाडीवानाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्यावरून नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानात मग्न असावे आणि गाडीवानावर विश्वास ठेवून निर्धास्त असावे, मग कसलाच धोका उरणार नाही; आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार, अशी वृत्ती बनून आपले हवेपण कमी होईल.मनाची ही वृत्ती झाली की, जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागेल. असे वाटू लागले की समाधान चालत घरी येईल. पण हे सगळे होण्यासठी आपल्या अंतःकरणाची शुद्धता हा पाया आहे.


१८५. संतचरणी विश्वास । त्याने भगवंत जोडला खास ॥

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२ जुलै, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २ जुलै २०१४

२ जुलै

गुरुसेवा करणे म्हणजे काय ? 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन

 




साधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची ? जप, तप, नेम, याग, वगैरे आपण कशाकरिता करतो ? तर देवाची प्राप्ति व्हावी म्हणून. तोच देव जर आपल्या घरी आला, तर साधनाची आटाआटी कशाला करायची ? म्हणून, साधनाची आटाआटी करण्याचे कारण नाही; नाहीतर त्याचाच अभिमान होतो, आणि मिळवावयाचे ते बाजूलाच राहून उलट तोटा होतो. जे जे घडत असते ते माझ्या इच्छेने झाले असे समजत जा आणि त्यात आनंद माना. तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा. गुरुभक्ति करायची म्हणजे काय ? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरूची सेवा असे तुम्हाला वाटते का ? त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरूची खरी सेवाच होत नसते. गुरू सांगेल तसे वागणे, हीच त्याची खरी सेवा होय. माझ्याजवळ जे येतात, ते कुणी मुलगा मागतो, कुणी संपत्ती मागतो, कुणी रोग बरा व्हावा म्हणून मागतो; तेव्हां माझी सेवा करायला तुम्ही येता, का मीच तुमची सेवा करावी म्हणून येता ? माझ्याजवळ येऊन, मनुष्यदेहाचे खरे सार्थक होईल असे करा. तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी थोडेसे देणार नाही असे नाही; पण ते काढा घेण्याकरिता गुळाचा खडा देण्यासारखे आहे.
'मला सर्व कळते' असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता, पण ते मनापासून नव्हेच. कारण ज्याला असे खरोखर वाटत असेल त्याच्या हातून पापकर्म होणारच नाही. ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच कळेल की, मला सर्व कळते आहे. गुरूला अनन्य शरण जाणे म्हणजे इतके की, त्याचे मन आणि आपले मन एकच झाले पाहिजे. म्हणजे दैववशात जरी आपण गुरूपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्यापाशीच असू. आपण आपल्या आईशी जसे बोलतो तसे माझ्यापाशी बोलावे, आपले सर्व दुःख मला सांगत जावे. तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता, पण तुम्हाला रिकामे परत जाताना पाहून मला फार वाईट वाटते. माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हांला मिळायचे नाही; ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय. सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे. ज्याला मी भेटावा असे वाटते, जो माझा म्हणवितो, त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे.

१८४. नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१ जुलै, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १ जुलै २०१४


१ जुलै

गुरु कशाला हवा ? 

 




व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरू करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरू नको असे म्हणून कसे चालेल ? प्रपंचात सुखदुःख झाले, समाधान मिळाले नाही, तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवील, अशी ज्याला तळमळ लागेल तोच गुरू करील. प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न. शिकावे असे ज्याच्या मनात येते तो शिष्य, आणि जो शिकवितो तो गुरू. मला काही कळत नाही असे ज्याला वाटतो तोच गुरू करील. मी 'राम राम' म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरू कशाला हवा, असे काहीजण म्हणतात. 'मी' केले ही जाणीव आड येते, म्हणून सद्‍गुरूची आवश्यकता आहे. सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही का पडला ? अभिमान गेल्याशिवाय राम नाही भेटणार. देवाजवळ गेला तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला, म्हणून भगवंतांनी त्याला 'गुरू कर' म्हणून सांगितले.
संतांच्या कृपेने दुखणे बरे झाले म्हणून त्याला मानणे हे खरे नव्हे. जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरू कसे म्हणावे ? जो काही चमत्कार करून दाखवील त्याला आम्ही बुवा म्हणतो. संताची परिक्षा आम्ही बाह्यांगावरून करतो. सर्वांभूती भगवंत ज्याला पाहता येईल त्याला संताची खरी ओळख होईल. संताच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो, त्यावरून आपण संताची परिक्षा करावी. माझे चित्त जिथे निर्विषय होईल तिथेच संताची खरी जागा म्हणता येईल. ज्याला भगवत्प्राप्तीची तळमळ लागली आहे, त्यालाच शिष्य म्हणावे. जो गुरू‍आज्ञेबाहेर जात नाही, आणि गुरू हेच भगवंतप्राप्तीचे साधन मानतो, तो सच्छिष्य होय. गुरूपरता देवधर्मच नाही मानू.
काही कानडी माणसे महाराष्ट्रात आली. त्यांना मराठी येत नव्हते. त्यांनी एक दुभाषी गाठला आणि त्याच्या मागोमाग ती पुष्कळ हिंडली. त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या दुभाष्यावर पडली. तशी आपण दुभाष्याची म्हणजे सद्‍गुरूची संगत केली पाहिजे. तो म्हणेल तिथे जावे, तो सांगेल तसे करावे, मग परमात्मा मिळेलच. शास्त्रे आणि वेद अनंत आहेत; ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे ? सद्‍गुरूंनी नवनीताप्रमाणे सर्व साधनांचे सार असे जे नामसाधन सांगितले, ते आपण करावे, म्हणजे भगवंताचे प्रेम लागेलच. बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा, त्याप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनांत आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हेच एक उत्तम साधन आहे; तेच करावे आणि आनंदाने रहावे.

१८३. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर संताला आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

३० जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० जून २०१४

३० जून

ऐसा करावा काही नेम ।
जेणे जोडेल आत्माराम ॥ 

 





ऐसा करावा काही नेम । जेणे जोडेल आत्माराम ॥
नेम असावा शाश्वताचा । जेणे राम कृपा करील साचा ॥
नेम असावा वाचा मन । जेणे संतुष्ट होईल रघुनंदन ॥
कर्तव्यात गुंतवावे शरीर । जेणे संतोषे रघुवीर ॥
सतीला नसे दुजे दैवत जाण । तिला पति एकच प्रमाण ॥
न पाहावे त्याचे दोष गुण । आपले कर्तव्य करावे जतन ॥
पतिव्रताधर्म श्रेष्ठ भारी । वंदिताती संत महामुनि ॥
पति‍आज्ञा प्रमाण । हेच मुख्य साध्वीचे लक्षण जाण ॥
न बोलावे उणेपुरे । जे परमात्म्यास न आवडेल खरे ॥
संतति वा संपत्ति । भगवत्कृपेने ज्याची प्राप्ति ॥
त्याचे करावे रक्षण । पण न गुंतू द्यावे मन ॥
जे आवडेल पतीला पाही । तो तो आपला धर्मच राही ॥
मनाने करावे भगवंत स्मरण । जेणे चुकेल जन्ममरण ॥
अखंड राखावे समाधान । चुको न द्यावे अनुसंधान ॥
काया गुंतवावी प्रपंचात । मन असावे रघुनाथात ॥
प्रपंचात राखावी खबरदारी । मन लावावे रामावरी ।
त्याचा राम होईल दाता । न करावी कशाची चिंता ॥
मुखी असावे नामस्मरण । हृदयात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ।
शुद्ध राखावे आचरण । पवित्रतम अंतःकरण ।
मुखाने भगवंताचे स्मरण । त्यावर कृपा करील रघुनंदन ।
हा ठेवावा विश्वास । अनुभव येईल नक्की खास ॥
पतीस करावे एकदा तरी नमन । रामरूप जाणून ।
त्याचे जाणावे मनोगत । तैसे वर्तणे हे आपले हित ॥
ऐसा नेम ज्याचे घरी । राम उभा त्याचे दारी ॥
आल्या अतिथा अन्न द्यावे । कोणास विन्मुख न पाठवावे ॥
राम कर्ता हा ठेवा भाव । कमीपणाला नाही ठाव ॥
सर्वांचे उगमस्थान एक । हे धरावे चित्ती । त्याला नाही कशाची भीति ॥
रामाविण न पाहावे जग । समाधानाची खूण हीच सत्य ॥
जे जे काही यावे । ते ते रामापासून आले । हा ठेवावा भाव ॥
साक्षित्वाने देहाचा प्रपंच पाहावा । अंतरी रघुनाथ भजावा ॥
देहाची गति प्रारब्धाचे हाती । ऐसे शास्त्रे सांगती ।
परि न येई हे चित्तीं । एकच जगती माझा रघुपति ॥
मुखाने घ्यावे रामनाम । हृदयी परमात्म्याचे प्रेम ।
याहून दुजा न करावा विचार । हा ठेवावा निर्धार ॥
चातुर्मासांत करावी सुरुवात । अखंड चालवावा हा हेत ॥
थोडा नेम सांगतो कांही । तो करूनिया पाही ॥
घ्यावें भगवंताचें नाम । खात पीत, करीत असता काम ।
होईल तेवढे करावे जतन । परमात्मा पुरे करील हे जाणावे ॥
सर्वांस सांगावे आशीर्वाद । सर्वांनी जोडावा भगवंत ॥


१८२. मागणे तुम्हा एकच पाही । नामावाचून दूर कधी न राही ॥


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२९ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ जून २०१४

२९ जून

पुण्यतिथी कशी साजरी करावी ? 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन

 

 

सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल ? या दिवशी जो नेम कराल तो सतत टिकण्यासारखा असतो. म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचे नाही असे आधीच ठरवा. नामांत राहण्याचा प्रयत्‍न करा, म्हणजे इथे आल्यासारखे काही केल्याचे श्रेय तरी मिळेल. इथे जो जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावे असे मला वाटते, पण तुम्हीच दार लावून ठेवले तर मी काय करणार ? पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलेच नाही, तर तो काय करणार ? तसे विषयात राहून दारे बंद करून ठेवू नका. नामाचा उच्चार कंठी ठेवा, म्हणजे विषयाचा घाला होणार नाही. आता कली मातत चालला आहे; त्याचा घाला चुकवायचा असेल तर नामावर विश्वास ठेवा. कोणीही काहीही सांगितले तरी नाम सोडू नका. जसे पाण्याचा मोठा लोंढा चालू झाला की एखाद्या स्थिर झाडाला दोराने बांधून ठेवलेली वस्तू वाहून जात नाही, तसे तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काही करू शकणार नाही.
समर्थांनी नामाच्या समासात सांगितले आहे तसे, नाम हेच रूप असे समजून घेत चला, म्हणजे रूप दिसेल. भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे, नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रकट होत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते. डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे, काहीतरी तेज दिसणे, दृष्टांत होणे, इत्यादि गोष्टी तात्पुरत्या असतात. एखादा अशक्त, हाडकुळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी 'अंगाला सूज येऊ दे' असे म्हणाला तर ते वेड्यासारखे होईल; याच्या उलट, त्याने नीट औषध घेतले तर तो कदाचित लठ्ठ होणार नाही, पण त्याचे शरीर मात्र घट्ट होईल. तसेच परमार्थाच्या अनुभवाचे आहे; आणि हा अनुभव वाढीला लागावा याकरिताच पुण्यतिथी साजरी करावी. नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच येईल. प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्यासाठी उत्सव, सण, पुण्यतिथ्या, वगैरे असतात. खरोखर, प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत ! पैसा, लौकिक, मुले, मित्र, आप्त, वगैरे सर्व पाशच आहेत. अशा अनेक पाशांमध्येही नाम आवडीने घेणे किती कठीण आहे ! त्यामध्ये टिकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे. नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे. म्हणून नामात सत्संगतीही आहे. मोबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचे आजच्या दिवसापासून ठरवा.


१८१. संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२८ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ जून २०१४

२८ जून

परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे. 

Add caption

 



एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला, आणि आपण आल्याची वर्दी त्याने राजाला पाठविली. 'आता राजा आपली पूजा करील' असे त्याच्या मनात आले. हा त्याचा भाव समजून जनक राजाने निरोप पाठविला की, 'आपण एकटेच यावे.' त्याप्रमाणे, आपण अभिमानाचे गाठोडे बाहेर ठेवून मगच रामाकडे जावे; तसेच सद्‍गुरूच्या घरीही आपले भांडवल बाजूला ठेवूनच जावे. 'मी कोण' याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत दुजेपण आलेच. अभिमान वाढविण्याकरिता देवाकडे नाही जाऊ. दुसर्‍याचे वाईट व्हावे असे आपल्याला वाटले की आपला अभिमान वाढीला लागला आहे असे जाणावे. पोराबाळांवर जितके प्रेम करता तितके प्रेम भगवंतावर करावे. आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणे, हे परमार्थाचे सूत्र आहे. भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी, आणि आनंदात राहावे. अगदी निःस्वार्थबुद्धीने केलेले कर्तव्य कधी वाया जात नाही. एखाद्या सावकाराकडे कोणाचे दागिने गहाण असले, तर त्याने आपल्या घरच्या लग्नामध्ये ते वापरणे हा अन्याय आहे. त्याचप्रमाणे, आपली मुलेबाळे ही देवाने आपल्याजवळ दिली आहेत, त्यांचे रक्षण करावे; ते कर्तव्य होईल. पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणे हे मात्र पाप आहे.
संन्याशाने भगवे वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतोच. त्याचप्रमाणे आपण भजनपूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे. जो शहाणा असेल त्याने समजून आणि जो अडाणी असेल त्याने श्रद्धेने, बंधने पाळावीत. स्वतःच्या मताबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी, त्यात घोटाळा असू नये. मनाने आपण खंबीर झाले पाहिजे. ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो, त्याप्रमाणे सत्कर्माला विघ्ने फार येतात; त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावे. आचार आणि विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच येतो.
नारळात पाणी जितके गोड तेवढी खोबर्‍याला चव कमी; तसे, जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी. फार वाचू नका; जे काही थोडे वाचाल त्याचे मनन करा; आणि ते कृतीत आणा. जसे वडिलांचे पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो, तशी ग्रंथ वाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी. परमार्थ हे सर्वस्वी कृतीचेच शास्त्र आहे. समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचे साध्य आहे. भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो.

१८०. सर्व काही करावे । पण खरे प्रेम साधनावर असावे ॥

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२७ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ जून २०१४


२७ जून

शाश्वतचे सुख कसे लाभेल ? 

 



असे पाहा, एखादा प्रवचन करणारा घ्या; किंवा मोठा वैदिक कर्मे करणारा घ्या; त्याला त्यापासून समाधान मिळते असे नाही, तो असमाधानातच असतो. कळू लागल्यापासून आपण सदाचाराने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही, याचे कारण काय ? तर आपले ध्येय निश्चित झालेले नसते. आपण नीतिने वागतो ते लोकांच्या भितीने; कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावे ठेवतील. लौकिकासाठी केलेले कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही. पापकर्म करणार्‍यालाही समाधान लाभत नाही, कारण त्यालासुद्धा आपण करतो हे वाईट आहे असे वाटतच असते. एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला, "देवापाशी काही न्याय नाही; तो अगदी अन्यायी आहे." मी त्याला विचारले, "असे झाले तरी काय ?" त्यावर तो म्हणाला, "मी कधी कोणाचा पैसा खाल्ला नाही, सदाचरणाने वागलो; पण मी फक्त एकमजली घर बांधू शकलो, आणि माझ्या हाताखाली काम करणार्‍या एका भिकारड्या कारकुनाने पैसा खाऊन माझ्या घरासमोर दुमजली घर बांधले !" मी त्याला विचारले, "मग तुम्ही का नाही पैसा खाल्ला ?" त्यावर तो म्हणाला, "मला तसे आवडत नाही; लोक नावे ठेवतील." तेव्हा, जे कर्म लौकिकासाठी केले त्याने कधीही समाधान मिळू शकणार नाही. प्रपंचात सुख लाभावे म्हणून आपण देवाचे करतो, आणि लौकिकासाठी नीतिधर्माने वागतो; मग त्यातून शाश्वतचे सुख कसे लाभेल ? अंगावर चांगले दागिने घातले, उत्तम लुगडे नेसले, परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर या सर्वांची काय किंमत ? तसेच, जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही. या‍उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असूनसुद्धा जर नीतिधर्माचे आचरण नसेल, तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही.
खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे, विद्वान लोक तो उगीचच अवघड करून सांगतात. चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थ तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल : एक, देहाने साधूची संगत; दुसरी, संतांच्या वाङ्‍मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण; आणि तिसरी, भगवंताचे नामस्मरण. नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी, आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने, आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे.


१७९. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार;
भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव परमार्थ.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२६ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ जून २०१४

२६ जून

नियम थोडा करावा, पण तो शाश्वताचा असावा. 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन

 



ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते, त्या झाडाला आपण पाणी घालतो, त्याची मशागत करतो, त्या झाडाकडे लक्ष पुरवितो. परंतु जे झाड वाढू नये असे वाटते, किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही, त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो. तसे, जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल, त्याची जोपासना करावी. देहाकडे, विचारांकडे, विषयांकडे दुर्लक्ष करावे, म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना, त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्याभोवती कुंपण घालावे लागते, त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा; तो जितका गुप्त राहील तितका चांगला. त्याचे प्रदर्शन झाले तर त्याला दृष्ट लागते. म्हणून परमार्थ हा कोणाच्या न कळत, परंतु अत्यंत आवडीने करावा. झाड लावल्यावर ते किती वाढले आहे हे कुणी रोज उकरून पाहात नाही, त्याप्रमाणे अनुभवाच्या, प्रचीतीच्या मागे लागू नका; त्यामुळे प्रगती खुंटेल.
हट्टी आणि व्यसनी माणसे एका दृष्टीने मला आवडतात; कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावला की झाले. परमार्थात नियम थोडाच करावा, पण तो शाश्वताचा असावा; म्हणजे, जेणेकरून भगवंताचे प्रेम लागेल याबद्दलचा असावा, आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा. जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यानमार्ग साधतो. हा मार्ग फार थोरांचा आहे. ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो; त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण वर्षेसुद्धा जातील, पण त्याच्या देहाला काही होणार नाही. आपल्यासारख्याला साधनांत साधन म्हणजे भगवंताचे नाम; दानांत दान म्हणजे अन्नदान; आणि उपासनांत उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय; या तिन्हींमुळे देहाचा विसर पडतो. म्हणून शक्य तो या तीन गोष्टींची कास धरा. मनुष्याची साहजिक प्रवृत्ती व्याप वाढविण्याकडे असते. द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो हेही खरे. साधे मधमाश्यांचे उदाहरण घ्या. त्या अनेक झाडांवरून मध गोळा करतात आणि नंतर पोवळ्यात एकत्र करतात. असा एकत्र केलेल्या मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो बरे ! अशा रीतीने सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत, म्हणजे एक राम, पहायला शिकावे; आणि ज्याला सर्वत्र राम पाहणे असेल त्याने स्वतःमध्येच राम पाहून, प्रत्येक कृती ही रामाची समजावी. स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही. तेव्हा स्वतःचा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही, आणि हा देहाचा विसर राममय झाल्यानेच होईल. म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा.


१७८. परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२५ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २५ जून २०१४

२५ जून

सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन

 



राम सहज हाती लागेल म्हणून जी काही साधने समर्थांनी सांगितली आहेत, त्यामध्ये चांगल्या ग्रंथांचे वाचन हेही एक आहे. परंतु कोणत्याही ग्रंथाचे अगर पोथीचे वाचन करताना, केवळ काहीतरी वाचायचे म्हणून वाचन करू नये. अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखे नाही होणार; तसेच जितका त्याचा अर्थ कळला तितके तरी कृतीत आणण्याचा प्रयत्‍न करावा. आपण जे करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी. भाराभर वाचले आणि कृती केली नाही, तर काय उपयोग ? चार मैलांचा रस्ता असला तर सबंध रस्ता एकदम दिसावा असे म्हटल्याने कसे होईल ? एक मैल रस्ता चालावा, म्हणजे पुढचे दिसेल. जसजशी मजल मारावी तसतसे पुढचे दिसू लागेल. परमार्थाचेही असेच आहे. बापासारख्या मिशा मला याव्या म्हणून लहान मुलाने हट्ट धरला तर कसे होईल ? त्याचप्रमाणे, आजच मला देवदर्शन व्हावे म्हटले तर कसे होईल ? सद्‍गुरूची आज्ञा पाळावी, साधन करू लागावे, म्हणजे सर्व काही होते. जेवायला बसले म्हणजे पोट भरायचे राहते का ?
खरोखर परमार्थाची वाट अगदी सरळ आहे; प्रपंचाचा रस्ता मात्र डोंगराळ असून काटेकुटे यांनी भरलेला आहे. आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असायला पाहिजे. पण याच्या उलट, आपला परमार्थच मुळी आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी आपण केला आहे. कुंपणाने शेत खावे तसे आपले झाले आहे. शेताला कुंपणाची जरूरी आहे; नाहीतर ढोरे आत येऊन शेत फस्त करतील. पण कुंपणच जर बेसुमार वाढले, तर त्यामुळे शेताचे नुकसान होते हे जाणले पाहिजे.
ज्याने व्यवहार तपासून केला, त्याला परमार्थ साधलाच. परमार्थ हा साखरेसारखा आहे. आपण साखरेचे कारले जरी केले तरी ते खायला गोड लागते, तसे प्रपंचातसुद्धा परमार्थ केला तरीही तो गोडच असतो. परमार्थ हा आपल्यासाठीच असल्याने तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करून पाहावे; आणि तो आपल्याला शक्य आहे असे जर पटले, तर मात्र केल्याशिवाय राहू नये.
पोटात अन्न घालण्यासाठी जसे तोंड, त्याचप्रमाणे परमार्थाला सदाचरण आवश्यक आहे. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. पाया म्हणजे काही घर नव्हे; परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे, हे देखील तितकेच खरे. आपण स्वतःच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा; आणि दुसर्‍याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा. भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणे हाच खरा परमार्थ, आणि ज्याची वृत्ती सुधारून भगवंताकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला.

१७७. भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२४ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ जून २०१४

२४ जून

ज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे. 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

 



लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय; वाचनात आलेले आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता होय; आणि सांगितलेले आचरणात आणतो तोच खरा श्रोता आणि साधक होय. अलीकडे ज्ञानप्रसाराची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत.त्यामुळे नको त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्याने होतो आहे. ज्ञान हे एक प्रकारचे दुहेरी शस्त्र आहे. कोणत्याही ज्ञानाचा बरावाईट उपयोग, तो करणार्‍यावर अवलंबून असतो. ज्ञान हे मुळात पवित्र आहे. जे ज्ञान नीति आणि धर्म यांच्या पायावर उभे असते ते जास्त प्रभावी ठरते. सर्वांचे एकमेकांवर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्र येतील असे ज्ञान असावे. श्रीमंत-गरीब, विद्वान-अशिक्षित, लहान-थोर, स्त्री-पुरुष या सर्वांना एकमेकांबद्दल प्रेम, आदर आणि आपुलकी वाढेल, असे ज्ञान व्यक्त झाले पाहिजे. द्वेष-मत्सर वाढवील, नीतिधर्माला फाटा देईल, असे ज्ञान पुस्तकात नसावे. विद्वान शास्त्रज्ञ नवीन शोध लावून जगाला स्वार्थी आणि लोभी बनवितात, आणि त्यामुळे सर्वनाश होतो. जे ज्ञान समाधान देत नाही ते खरे ज्ञान नव्हे. जगाचे खरे स्वरूप ज्याने कळते ते खरे ज्ञान होय.
देहासंबंधी जे ज्ञान ते व्यावहारिक ज्ञान जे असे आहे तसे ओळखणे हे तत्त्वज्ञान. मी देहाला 'माझा' म्हणतो, अर्थात मी देह नव्हे. 'माझे घर' म्हणणारा 'मी', घराहून वेगळा ठरलो ! जडत्व म्हणजे काय ? देहाच्या ठिकाणी ममत्व हे जडत्व. पदार्थाचे यथार्थ ज्ञान ज्याला आहे तो शहाणा. व्यवहाराचे गूढ ज्याला कळते तो प्रपंची; जगाचे गूढ ज्याला कळते तो तत्त्वज्ञानी. सूक्ष्माचे ज्ञान होणे यात सुख आहे. आत्मा हा समुद्र आहे, तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्त्वज्ञान आहे. 'ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या' अशा ज्ञानाच्या गोष्टी कळायला कठीण असल्या, तरी अभ्यासाने दीर्घ काळानंतर कळतील; पण नामाचे महत्त्व कळणार नाही; ते एक संतकृपेनेच कळते. नामावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे; त्यानेच समाधान लाभेल.
ज्या ग्रंथाच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते; ज्याच्या योगाने विरक्ति उत्पन्न होते, अनीतिचे वर्तन टाकून नीतिमार्ग, धर्ममार्ग याचा अवलंब करावासा वाटतो, तो सद्‍ग्रंथ; उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथभागवत, हे ग्रंथ वाचून सदोदित त्यांचे मनन करणे, हेच फार जरूरीचे आहे. त्याने ईश्वरप्रेम उत्पन्न होते.

१७६. अत्यंत कठीण प्रमेये असलेले जगातले ग्रंथ वाचावेत,
पण शेवटी अत्यंत सोप्यातले सोपे असे नामच घ्यावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२३ जून, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २३ जून २०१४

२३ जून

हेतू शुद्ध ठेवावा. 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन

 



मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्‍न करावा. हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरुप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते. हेतू हा विहिरीत असणार्‍या झर्‍याप्रमाणे आहे. झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचे पाणी स्वाभाविकच गोड असते. म्हणून हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी, आणि त्याकरिता रामाची प्रार्थना करावी. माणसाला देहरक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही. 'नको दैन्यवाणे जिणे भक्ति उणे' हेच रामराया जवळ मागावे. पर्वकाळात भगवंत कामधेनूचा अवतार घेतो; जे ज्याला पाहिजे ते त्याला देतो. पर्वकाळात सज्जन तसेच दुर्जनही आपली कामे करून घेतात. जारण-मारण ही देखील पर्वकाळांतच शीघ्र साध्य होतात. आपण मात्र भगवंताचे कसे व्हावे हे पहावे. शुभेच्छा धरावी, भावना जागृत करावी. 'काहीही कर, पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस.' असे भगवंताजवळ मागावे. 'आजवर कळत नकळत जे पाप झाले असेल ते नाहीसे कर. पुढे पुनः नाही करणार,' असे म्हणावे, म्हणजे मागली पापे नष्ट होतात. ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत. त्यांना 'मीच काय तो शहाणा, मोठा' असा अभिमान असतो. पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे ते जाणत नाहीत. ते खालच्या लोकांकडे पाहतात आणि त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे असे म्हणतात. माझे चुकते आहे एवढे कळले तरी चालेल. विषयी लोकांना 'मला कुठे दुःख आहे' असे वाटते. पण दारूप्रमाणे विषयाची धुंदी उतरली म्हणजे पश्चात्ताप होतो.
'देव आहे' असे खर्‍या अर्थाने वाटणारे जगामध्ये थोडेच असतात. सद्‌विचार, सच्छास्त्र आणि सद्‍बुद्धि हे प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहेत. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते. पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही, त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे, ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते, त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे. भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येत नाही.
खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते, तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातली माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते, त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपण 'मी' पणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो.

१७५. शुद्ध असावे आचरण । तसेच असावे अंतःकरण ।
त्यात भगवंताचे स्मरण । हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन ॥

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या