९ ऑगस्ट, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ९ ऑगस्ट २०१४

९ ऑगस्ट

ज्याला समाधान तो भाग्यवान. 

 



ज्याचे 'हवेपण' जास्त असते तो गरीब जाणावा, आणि ज्याचे हवेपण कमी असते तो श्रीमंत जाणावा. परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते, त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही. ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत. आमचा आधार पैशाचा; तो आज आहे अन उद्या नाही. पायाच जिथे डळमळीत तिथे इमारत कुठे पक्की होईल ? श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असा होऊ नये, याची श्रीमंतानी काळजी घ्यावी. खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरे भाग्य, आणि हेच खरे ऐश्वर्य होय. ज्याला समाधान जास्त, तो जास्त भाग्यवान समजावा. समाधान हे आपले आपल्याला घ्यायचे असते, दुसरा कोणी ते आपल्याला देवू शकत नाही. खरोखर, समाधानासारखे औषधच नाही. ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो. पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता, त्याला विचारले तर तो म्हणाला, "अहो, मला मधुमेह झाला आहे; मी आतून पोखरला गेलो आहे ! त्यापेक्षा तुम्ही बरे." खरोखर, त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणार्‍या ऐश्वर्याची अवस्था आहे. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे. ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झोपडीमध्येही नसेल. असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळे रोगांच्या यादीतून त्याचे नावच निघून गेले आहे ! सध्या जगात पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत. पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेले नाही. जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळे हुरहुर लागते ती सुधारणा कसली ? व्यक्ती काय किंवा समाज काय, यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झाले पाहिजे. चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणे शक्य नाही. हल्लीचे तत्वज्ञान नुसते अभ्यासी आहे, अनुभवाचे नाही; म्हणून त्याने खरे समाधान लाभणार नाही.
खरोखर, प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे. भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुखदुःख येते; आणि सुख तरी काय, दुःखाची कमतरता ते सुख ! राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावेसे वाटते; म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे. पण कुणी असा विचार करीत नाही की, जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का ? याचे उत्तर 'नाही' असेच मिळते. ताजी जिलबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. बुद्धिचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे, भगवंताचा आनंद हा उपाधीरहीत आहे. हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन नामात राहणे हा एकच उपाय आहे.



२२२. नामस्मरणाच्या योगाने आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो यात शंकाच नाही.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

८ ऑगस्ट, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ८ ऑगस्ट २०१४

८ ऑगस्ट

समाधान ही आंतरिक सुधारणेची खूण आहे. 



 

 

प्रपंचात काय किंवा परमार्थात काय, काही पथ्ये पाळायला लागतातच. नेहमी 'राम कर्ता' ही भावना मनात जागृत ठेवा. शोक, चिंता, भिती, आशा, तृष्णा, ह्या सर्व 'राम कर्ता' म्हटल्याने नाहीशा होतात. ज्या अर्थी त्या अजून नाहीशा होत नाहीत, त्या अर्थी रोग कायमच आहे असे म्हटले पाहिजे. तरी आजपासून, ह्या घटकेपासून नामात राहण्याचा निश्चय करा, आणि 'राम कर्ता' ही भावना दृढ करा. कुणी आपल्याला बरे म्हटले की तेवढ्यापुरते बरे वाटते; ते समाधान म्हणता येईल का ? जे मिळाल्याने दुसरे काही हवेसे वाटणार नाही, ते समाधान. समाधान ही आंतरिक सुधारणेची खूणच आहे. ते मिळवण्यासाठी प्रपंच सोडण्याची जरूरी नाही. प्रपंच सोडून कितीही लांब गेले तरी त्याची आठवण येतेच. तेव्हा तसा तो सोडता येत नाही; तो एक 'राम' म्हटल्यानेच सुटू शकेल. कोणतेही कर्म करताना भगवंताच्या नामात करा. त्यामुळे समाधान मिळून, मनुष्य सुखदुःखाच्या द्वंद्वात गुरफटला जाणार नाही. जो कोणी स्वतःचा उद्धार करून घेईल तो खरा ज्ञानी; काही न करणारा हा खरा अडाणी होय.
वासनेचे परिणत स्वरूप म्हणजे बुद्धी होय. जी बुद्धी बंधनामध्ये काम करते ती खरी स्वतंत्र बुद्धी होय. बंधनाला न जुमानता वागणारी, ती स्वैराचारी बुद्धी होय. वासना नष्ट होणे म्हणजे देह्बुद्धी नष्ट होणे होय. प्रापंचिक मनुष्याला विषय टाकता येतील हे शक्य नाही. त्याचे विषयाचे प्रेम रक्तात इतके भिनले आहे की ते काढून टाकायला सूक्ष्म अस्त्र पाहिजे. नाम हे अतिशय सूक्ष्म अस्त्र आहे. ते घेतल्याने विषयाचे प्रेम नष्ट होईल. खरोखर, थोडा मनापासून निश्चय करा. तो परमात्मा फार दयाळू आहे, तो खात्रीने आपल्या निश्चयाच्या पाठीशी उभा राहील. दोष न पाहताही जो दुसर्‍याला जवळ करतो तो दयाळू खरा. भगवंत अत्यंत दयाळू आहे. त्याच्या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम नष्ट होईल, आणि देहावरचे प्रेम नष्ट झाले की संसारावरचे प्रेम कमी होईल, आणि आपल्याला सर्वत्र राम दिसू लागेल. प्रत्येक जीवाची ओढ चिरंतन समाधानाकडेच असते. ती ओढ परमेश्वरप्राप्तीनेच पुरी होऊ शकते. ही प्राप्ती व्हायला अत्यंत सुलभ साधन जर कोणते असेल, आणि त्याचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल, तर एका नामानेच. ज्याने नाम हृदयात अखंड बाळगले, त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल. इतर साधनामध्ये उपाधीमुळे थोडी तरी चलबिचल आहे, नाम हे स्थिर आहे. हे भगवंताचे नाम आवडीने घ्या, श्रद्धेने घ्या, मनापासून घ्या.


२२१. अखंड नामस्मरणात राहा, किती समाधान राहील !

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

७ ऑगस्ट, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ७ ऑगस्ट २०१४

७ ऑगस्ट

रूपाची ओळख नामानेच होते. 

 

   

नुसत्या शास्त्रपठणामुळे होणार्‍या ज्ञानापेक्षा भक्ती ही नक्कीच श्रेष्ठ आहे. भक्ती म्हणजे परमात्मस्वरूपाचे परमप्रेम होय. कर्म, ज्ञान, योग ही साधने असून भक्ती हे साध्य आहे. कर्ममार्गामध्ये, नुसते कर्म बरोबर करण्याच्या हिशेबात मन अडकून जाते; म्हणून नुसता कर्ममार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो. योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होते. वृत्ती आवरणार्‍याला भगवंताचे प्रेम असेलच असे सांगता येत नाही. ज्ञानमार्गामध्ये आत्मानात्मविचाराला प्राधान्य असल्याने तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो. पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे, साधकाला ती केव्हा फसवील याचा नेम नसतो. ज्ञानमार्ग फार कठीण आहे. ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते. माझे मतच तेवढे खरे असे तो धरून चालतो. ज्ञानी मनुष्य जगताला मायाकार्य मानतो; म्हणजेच जगत मिथ्या आहे असे तो समजतो. परमात्मा जर सर्वव्यापी आहे, तर हे जगत त्याच्यामध्येच असले पाहीजे, म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो. त्याला या सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी भगवंताचा महिमा, त्याचे विभूतिमत्व, आणि त्याचा आनंद भरलेला दिसून येतो.
सृष्टीमधले सौंदर्य, माधुर्य, मनोहर भाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो. पण सृष्टीमधल्या विभूतिरूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही, कारण विभूती हे साक्षात् भाव नाहीत. म्हणून भगवंताच्या साक्षात् गुणांची आणि भावांची जरूरी लागते. त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते. मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले हे भगवंताचे रूप आहे हे समजायला त्याला भगवंताचे नाम देणे जरूर आहे. कारण त्या रूपाला भगवंताचे नाम दिले नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचे देखील ठरेल. कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली; प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरे काहीच नाही, तरी प्रत्येक भांड्याचे नाव निराळे ! तुकारामबुवा एवढे मोठे संत बनले, पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला 'राम' म्हणाले नाहीत, किंव दत्ताला 'महादेव' म्हणाले नाहीत. जगत् हे भगवंतापासून भिन्न नाही. जगतात आढळणारी सर्व रूपे भगवंताची आहेत, पण रूपाची ओळखण नामानेच होते. प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपे नाहीशी झाली तरी त्यांचे नाव टिकून राहाते. म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेपलीकडे असते. म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य होय; आणि जे सत्य आहे, ते श्रेष्ठ असलेच पाहिजे. सत्य वस्तू ओळखणे हाच परमार्थ होय.



२२०. भगवंताची रूपे जेथून येतात, तेथे 'नामा'चे वास्तव्य आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

६ ऑगस्ट, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ६ ऑगस्ट २०१४

६ ऑगस्ट

भगवंताचा आनंद हा निरुपाधिक असतो. 

 



प्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते, कारण त्याला आनंद हवा असतो. मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही. पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे. तो काही खरा आनंद नाही. उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो, पण ते सुख क्वचितच मिळते. ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहीजे. जगणे जर आनंददायक आहे तर मग आपल्याला दुःख का होते ? वास्तविक आपण कशाकरीता काय करतो हेच विसरतो. म्हणजे मनुष्य जगतो आनंदासाठी, पण करतो मात्र दुःख ! दारूचा आनंद हा दारूची धुंदी आहे तोपर्यंतच असतो, त्याचप्रमाणे विषयापासून होणारा आनंद, तो विषय भोगीत असेपर्यंतच टिकतो. दृष्य वस्तू ही सत्य नसल्यामुळे, ती अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. आपण जगामध्ये व्याप वाढवितो, तो आनंदासाठीच वाढवितो. पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने, ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. यासाठी तो आनंद अशाश्वत होय. म्हणून खरा आनंद कुठे मिळतो ते पाहावे. खरा आनंद दृष्य वस्तूंमध्ये नसून वस्तूच्या पलीकडे आहे. चिरकाल टिकणारा आनंद वस्तूरहितच असतो. म्हणून आनंदासाठी वस्तूच्या मागे लागणे बरोबर नाही. विषयाचा आनंद परावलंबी असतो, तर भगवंताचा आनंद निरूपाधिक असतो. स्वानंद स्मरणाव्यतिरीक्त जे स्फुरण तोच विषय समजावा.
खरी आनंदी वृत्ती हीच दसरा-दिवाळीची खूण आहे. हास्य हे आनंदाचे व्यक्त स्वरूप आहे. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसताना होणारा जो आनंद, तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. आनंदाला जे मारक आहे ते न करणे म्हणजे वैराग्य, आणि आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाव विवेक होय. आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधानच होय. जो निस्वार्थबुद्धीने प्रेम करतो, त्याला आनंद खास मिळतो. घेणरा 'मी' जेव्हा देणारा होतो त्याच वेळेस त्याला खरा आनंद होतो. ब्रह्मानंद हा प्रत्येकाच्या हॄदयात स्वयंभू आहे. वृत्ति वळवून तो चाखला पाहिजे. एकांतात स्वस्थ बसावे, रामाला आठवावे, त्याच्या पायावर मस्तक ठेवून त्याला म्हणावे, "रामा, माझे मन शुद्ध कर. देहबुद्धी देवू नको. तुझे चरण, तुझे हास्य, मला सदा पाहू दे. तू माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेव". रामाला प्रेमाने आळवून, राम परमानंदरूप आहे असे जाणून, त्याच्याशी अनन्य होऊन राहावे. मी कुणीच नाही, सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे, या गोड भावनेत आनंदाने असावे.



२१९. मनात प्रत्येक संकल्प उठताच त्यावर रामनामाचा शिक्का असावा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

५ ऑगस्ट, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ५ ऑगस्ट २०१४

५ ऑगस्ट

'देहच मी' हा भ्रम. 

 



आपण कोण, आपले कर्तव्य काय, हे कळणे जसे व्यवहारात जरूर असते, तद्वतच परमार्थात सुद्धा मी कोण हे कळले पाहिजे. ज्याला मी 'माझे' म्हणतो तो मी नव्हे खास. माझा देह म्हटल्यावर 'मी' त्याहून निराळाच नव्हे का ? देहाला ताप आला तर 'मला' ताप आला, देह वाळला तर 'मी' वाळलो, असे म्हणतो तीच चूक, हाच भ्रम. वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली. म्हणून मी सुखदुःख अनुभवू लागलो. दुःख नको, सुख हवे, असे मला वाटते, याचा अर्थ माझे मूळचे स्वरूप हे नित्यसुख-रूपच असले पाहिजे.
नदीच्या पात्रातले पाणी आणि तिथूनच भांड्यात आणलेले पाणी, दोन्ही एकच; पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल, तर भांड्यात घाण आहे असे आपल्याला समजते. तसे, सुख-रूप असणार्‍या आत्म्याचाच अंश असलेला जीव दुःखरूप झाला याचे कारण देहसंगती. एका गॄहस्थाची बायको बाळंत झाली, तेव्हा त्याच्या मित्राने डॉक्टरची मदत आणि अशा अनेक बाबतीत धावपळ केली, पण त्याने सोयर मुळीच पाळले नाही, त्या मित्राप्रमाणे आपण देहाबाबत वागले पाहिजे.
एखादे झाड काढायचे असेल, आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली, तर त्याची पालवी वरवर खुडून काम होत नाही, त्याच्या मुळाला पाणी घालणे बंद केले पाहिजे. तद्वतच संसाररूपी वॄक्षाला आम्ही अभिमानाचे पाणी वारंवार घातल्यामुळे तो इतका फोफावला आहे, तो अभिमान नष्ट केला पाहिजे. 'मी कर्म केले' हा भ्रम टाकून दिला पाहिजे. खरा कर्ता ईश्वर असताना जीव विनाकारणच 'मी' कर्ता असे मानतो. कर्तुत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुखदुःख भोगतो. तेव्हा 'मी कर्ता नसून राम कर्ता' ही भावना वाढवणे, हीच खरी उपासना होय. आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाही. ज्याची खरी अशी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते. अशा माणसाला अचल समाधान लाभते; किंबहुना, हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे. हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट असते.
खरोखर, तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो की, सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा, आणि नीतिला धरून राहा; त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल. परमार्थात नीतिला, शुद्ध आचरणाला, फार महत्व आहे. जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन, नामस्मरण करतो, त्याला साहाय्य करायला परमेश्वर सदैव तयार असतो. आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागू या. दीनदयाळ भक्तवत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा.

२१८. नामस्मरण 'समजून' करावे; समजून म्हणजे 'राम कर्ता' या भावनेत राहून.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

४ ऑगस्ट, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ४ ऑगस्ट २०१४

४ ऑगस्ट

वासनेला कसे जिंकता येईल ? 

 



कितीही विद्वान पंडित जरी झाला तरी त्याला स्वतःला अनुभव आल्यावाचून ज्ञान सार्थकी लागले असे होत नाही. पोथी ऐकून ज्याला वैराग्य आले त्यालाच पोथी खरी कळली असे म्हणावे. पोथीत सांगितलेले ऐकून ते जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता होय. वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे, तर त्याचा उपयोग. म्हणूनच सर्व प्रचीतींमध्ये आत्मप्रचीती ही उत्तम होय. जो भगवंताला शरण गेला त्याच्यापाशी शब्दज्ञान नसले तरी, त्याला मिळवायचे काहीच उरत नाही. जो शब्दज्ञानाच्या मागे जातो त्याचा अभिमान बळावतो. जो शब्दज्ञानी नसतो त्याला अभिमान नसेलच असे नाही. अज्ञानी माणसालाही अभिमान असतो, परंतु तो घालविणे सोपे असते. 'सद्‍गुरूला शरण जा' म्हटले, तर अज्ञानी माणूस मुकाट्याने शरण जाईल, त्याला शंका येणार नाही.
काशीला जाणारे पुष्कळ रस्ते आहेत; पण कोणत्याही रस्त्याने जायचे तरी आपले घर सोडल्याशिवाय जाता येत नाही. हे जसे खरे, तसे कोणत्याही साधनात वासना बाळगून, किंवा ती देवापासून निराळी ठेवून भागणार नाही. ती देवाची करायला, तिला मारायला, देवाचे स्मरण पाहिजे. भगवंताचे होणे हे माझे या जन्मातले मुख्य काम आहे असे समजावे. मी भगवंताचा कसा होईन याचा सारखा रात्रंदिवस विचार करावा. मी दुसर्‍या कोणाचा नाही ही खात्री असली म्हणजे भगवंताचे होता येते. आपले मन वासनेच्या अधीन होऊन तात्पुरत्या सुखाच्या मागे गेल्यामुळे थप्पड खाऊन परत येते. लोक समजतात तितके वासनेला जिंकणे कठीण नाही. आपली वासना कुठे गुंतते ते पाहावे. आपल्या अंगातले रक्त काढून ते तपासून, आपल्याला कोणता रोग झाला आहे हे डॉक्टर पाहातात, त्याचप्रमाणे आपले चित्त कुठे गुंतले आहे हे आपण पाहावे; तो आपला रोग आहे. जी गोष्ट आपल्या हातात नाही तिच्याविषयी वासना करणे वेडेपणाचे आहे, हे ध्यानात ठेवावे. म्हणूनच विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल. मग आपले कर्तेपण आपोआप मरून जाईल. हिमालयावर ज्या वेळी आकाशातुन बर्फ पडते त्या वेळी ते अगदी भुसभुशीत असते, पण ते पडल्यावर काही काळाने दगडापेक्षाही घट्ट बनते. त्याचप्रमाणे, वासनाही सूक्ष्म आणि लवचिक आहे, पण आपण तिला देहबुद्धीने अगदी घट्ट बनवून टाकतो. मग ती काढणे फार कठीण जाते. भगवंताची वासना ही वासना होऊच शकत नाही. ज्याप्रमाणे कणीक अनेक वेळा चाळून गव्हाचे सत्व काढतात, त्याप्रमाणे विषयाची सर्व वासना नाहीशी झाल्यावर जी उरते, ती भगवंताचि वासना होय.


२१७. वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय होय.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

३ ऑगस्ट, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३ ऑगस्ट २०१४

३ ऑगस्ट

भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे. 

 



भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही. जिथे दुखःच नाही तिथे आनंद हा शब्द तरी सांगायला कोण असणार ? अनन्य भक्त व्हावे आणि तो आनंद पाहावा. भक्ताला सर्वच ठिकाणी आपण आहोत असे दिसते; म्हणजे सर्व चराचर वस्तू तो भगवद्‌रूपच पहात असतो. एखाद्या खोलीत सर्व बाजूंनी आरसे ठेवलेले असले, तर कुठेही पाहिले तर आपल्याला काय दिसेल ? आपल्या स्वतःशिवाय दुसरे काहीच दिसणार नाही. म्हणजे सर्व ठिकाणी एकभाव झाला तिथे दुःखाचे कारणच नाही. तिथे सर्वच आनंद असतो. त्याप्रमाणे भक्त भगवंताशी एकरुप झाला तिथे आनंदाशिवाय दुसरे काय असणार ? जे याप्रमाणे जगात वावरतात, ते आपल्या आनंदात राहूनही इतर लोकांप्रमाणे वागत असतात. तुकारामांनी अशा स्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखविला. समर्थांनीही ती स्थिति सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेले. आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही. म्हणून, ज्यांनी तो आनंद पाहिला आहे आणि जे सदैव त्या आनंदात राहतात, त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे; म्हणजेच गुरुआज्ञेप्रमाणे वागावे. आपल्याला वाटाड्या भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो, त्याप्रमाणे गुरुंच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे म्हणजे आपले हित होते.
एखाद्या आंधळ्या माणसाने साखर समजून मीठ खाल्ले, तर ते खारट लागल्यावाचून राहणार नाही. त्याप्रमाणे, आनंद मिळेल या कल्पनेने आपण विषयाची संगत धरली, पण त्यापासून दुःखच प्राप्त झाले. पुष्कळ वस्तू मिळाल्या म्हणजे त्याने पुष्कळ सुख मिळते असे मानणे हा भ्रम आहे. खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे, सनातन सुख होय. ते सनातन वस्तूपाशीच, म्हणजे भगवंतापाशीच असते. भगवंताचे आपण झाल्यास सुखी होऊ. तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते, तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते. आपण प्रपंच दुसर्‍याचाच करतो, आपला करीतच नाही. एखाद्या शेतापेक्षा कुंपणालाच जास्त खर्च यावा, त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधींचीच जास्त आरास करतो. आपण सर्व मिळवितो, पण सर्व ठेवून जावे लागते. आपल्या फायद्याचे केले तरच आपला प्रपंच; भगवंताचे स्मरण तेवढाच आपला प्रपंच. आपण आई-बापांवर, नवराबायकोवर, मुलांवर, नातेवाईकांवर, शेजार्‍यापाजार्‍यांवर सुखासाठी अवलंबून राहीलो तर सुखी होणार नाही. आपले दुःख किंवा यातना जर कोणी नाहीशा करीत नाही तर मग दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी खरी ठरेल ?


२१६. परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा, मी त्याचा व्हावे, ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२ ऑगस्ट, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २ ऑगस्ट २०१४

२ ऑगस्ट

आपल्या 'मी'चे स्वरूप आनंदमय आहे. 

 



इच्छित वस्तू मिळणे यात समाधान असतेच असे नाही. ती इच्छाच नाहीशी करणे यात समाधान आहे. हाव संपेल तेव्हाच समाधान होईल. याकरिता वासनाक्षय कसा होईल ते पहावे. कशात सुख आहे, कशाची कास धरावी, इकडे लक्ष द्यावे. खरा आनंद आणि समाधान भगवंताचे होण्यातच आहे. 'भगवंता, तुझ्यावाचून मला कोणी नाही' हे ज्या दिवशी मनाने पक्के ठरेल, त्याच दिवशी समाधान मिळेल. जितकी विषयाची आवड धरावी, तितके दुःखच पदरात येते. विषयसुख न मागताही येते; परंतु जे परमार्थाच्या आड येणार आहे, ते मागत कशाला राहायचे ? माझ्या मागे राम आहे म्हटले, म्हणजे प्रपंचातल्या विषयात जरी राहिलो तरी भिण्याचे कारण नाही. भगवंताचा आधार कायम ठेवला की मग विषयांची नाही भिती वाटत. नेहमी अनुसंधानात राहिले म्हणजे मग सावधच राहिल्यासारखे आहे.
दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो, पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसांसारखाच असतो. इतकेच नव्हे, तर आदल्या दिवसाची परिस्थिती, संकटे आणि अडचणी त्या दिवशीही कायम असतात. याचा अर्थ असा की, परिस्थितीत बदल होत नाही. दिवाळीचा दिवस हा दिवस या नात्याने निराळा नाही. पण काल आपण जे केले, ते दिवाळीच्या दिवशी आपण करीत नाही, हाच मुख्य फरक होय. आपणच दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो. हे जर खरे, तर तसा तो आपण नेहमीच का करु नये? आपल्याला नेहमीच दिवाळी असावी; आपण नेहमीच आनंदात असावे; आणि त्या करिता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा. आपण दिवाळीच्या सणाचा आधार घेऊन आनंदी-आनंद करतो. मग आनंद जो निर्माण करतो त्या भगवंताच्या आश्रयाला नेहमी का न जावे ? भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो याला कारण, भगवंताला प्रकट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आडकाठी करीत असतो. आपल्या आतमध्ये भगवंत तर आहेच, पण त्याच बरोबर 'मी' सुद्धा आहे. हा 'मी' कोण हे जाणण्याकरिता, इंद्रियांची गडबड शांत करुन आतमध्ये आपण आनंदाचा शोध करावा; म्हणजे आपल्याला या 'मी'चे स्वरूपही आनंदमय असल्याचे प्रत्ययाला येईल. अशी परमात्म्याची ओळख करुन घेणे ही खरी जीवनाची सुरुवात आहे; आणि परमात्म्यात विलीन होणे हेच जीवनाचे सर्वस्व होय.



२१५. ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य दिवाळी आहे.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१ ऑगस्ट, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १ ऑगस्ट २०१४

१ ऑगस्ट

आनंद कशामुळे मिळतो ? 

 



सॄष्टी शून्यापासून निर्माण झाली. आपलीही मूळ स्थिति तीच आहे, म्हणून आपण शून्याकडे जाण्याचा प्रयत्‍न करावा; म्हणजेच स्वानंदात स्वस्थ रहावे. पण ते आपल्या हातून होत नाही, कर्म करीतच रहावे असे वाटते. प्रपंचाची दगदग झाली म्हणजे आपण दूर जाऊन बसतो; पण मनाची तळमळ त्यामुळे नाहीशी झाली नाही, तर काय उपयोग ? या करीता मनाची स्वस्थता कशाने येईल ते पहावे. आनंद कुणाला नको आहे? आपल्याला आनंद हवा आहे खरा, परंतु तो मिळवण्याकरीता जे करायला पाहिजे ते आपण करीत नाही. नोकरी नको आणि खायला हवे, हे कसे शक्य आहे ? खरोखर प्रपंचाच्या या अगणित उपाधींतून सुटून जो स्वास्थ्याकडे जातो तो धन्यच होय. मनाच्या विरुद्ध गोष्टी झाल्या की लगेच आपल्या आनंदात बिघाड येतो; याकरिता, आपल्या इच्छेविरुद्ध घडले तरी माझे स्वास्थ्य बिघडणार नाही, इकडे पाहावे. याला एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे माझी इच्छाच मी नाहीशी करणे. कोणतीही वस्तू मिळावी किंवा अमुक एक गोष्ट घडावी, ही बुद्धीच ठेवू नये. जो पर्यंत हाव आहे तो पर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहोत असे समजावे. महत्वाकांक्षा खुशाल धरावी, पण त्यामुळे मनाला त्रास होऊ देवू नये. भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असे म्हणावे, आणि अभिमान सोडून कर्म करीत राहावे. प्रयत्‍न करून जे काही होते, ते रामाच्या इच्छेने झाले असे म्हणावे. कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वास्थ्य लाभते. मागे घडलेल्या चांगल्या-वाईट गोष्टी आठवत राहणे यामुळे आनंदात बिघाड येतो. तसेच उद्याची काळजी करीत राहाणे यामुळेही मनाच्या स्वास्थ्यात व्यत्यय येतो. होते-जाते ते भगवंताच्या इच्छेने होते, हे मनाने पक्के ठरविल्यावर मग विनाकारण काळजी का करावी ?
दुखः करणे अथवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे, ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे, तो प्रत्यक्ष दुखणे भोगीत असताही आनंदात राहू शकेल. म्हातारपणी तर आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषध आहे. ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो; आणि ज्याला असा आनंदाचा लाभ झाला, त्याच्यावर रामाने कृपा केली असे खचितच समजावे. भगवंतासाठी एकच दान खरे आहे, आणि ते म्हणजे आत्मदान होय. सतत भगवंताच्या नामात राहून देहाचि विस्मृति होणे हा आत्मदानाचाच प्रकार आहे.



२१४. वाणीने नाम घ्यावे व मनाने स्मरण करावे, आणि या दोन्हीचा मेळ असावा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

३१ जुलै, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३१ जुलै २०१४

३१ जुलै

आपण भगवंताचे झालो तरच सुखी होऊ. 

 

 



आपल्याला साधायचे काय हे ध्यानात धरले पाहिजे. परमात्मा साधायचा आहे, आणि शरीर आणि प्रपंच ही साधने आहेत, हे पक्के समजावे. आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो, म्हणून आपले चुकते. एका गृहस्थाला मुलाबाळांसह मुंबईला जायचे होते. आता आगगाडीत बसायला मिळेल या आनंदात मुले गाडीत बसली, पण मुंबईस जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला. गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटले, त्या गृहस्थाला नाही तसे वाटले.
वसिष्ठांनी रामाला सांगितले की, "रामा, तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निःसंग रहा." 'मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे, निःसंग आहे,' ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा. जमीन सोडून कुणाला राहता येत नाही, त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही. पण त्यात 'राम कर्ता' मानून वागणारा तो पारमार्थिक, 'मी कर्ता' असे मानून वागणारा तो प्रापंचिक. 'मी कर्ता' असे म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो, सुखरूप होत नाही, तर त्याचा कर्ता मी नाही हे सिद्ध झाले ! प्रपंच हा अर्धवट आहे, पूर्ण फक्त राम आहे. मिठाचे पोते कितीही धुतले तरी त्याचा खारटपणा जात नाही, तसे प्रपंचाचे आहे. म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असे साधन जे नामस्मरण, ते अखंड करावे. प्रपंचात आपण किती कष्ट करतो ! तितका मोबदला मिळत नाही, तरीही कष्ट करतो. परमार्थात तसे नाही. परमार्थ जितका जितका करावा तितके तितके समाधान अधिकाधिक असते. आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्युमुखीही प्रपंचच आठवेल. म्हणून प्रपंचाचा हव्यास धरू नये. प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून, त्यांच्याबाबत अलिप्तपणाने वागावे. ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचाराने वाढवावी. प्रपंचात, प्राप्त झाले त्याचा हर्ष न करावा, गेल्याचा शोक न करावा. देह प्रारब्धावर टाकावा. हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ति आहे; आपण रामाचे व्हावे. राम ठेवील तसे समाधानाने राहावे. हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे; तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळे व्हावे.
सर्व ईश्वराचे आहे, माझे काही नाही, असे समजणे म्हणजे ईश्वरार्पण करणे आहे. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ, नाहीतर दुःखी होतो. धान्यातले दगड, माती, पाकड, निवडून बाजूला काढून, धान्य जे सार, ते घ्यावे; त्याचप्रमाणे, अहंकाराचे खडे, ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड, आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखरूप प्रपंच होतो. ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल ते सारे सुखच !

२१३. 'रामा, सर्व तुझेच आहे, तू देशील ते घेईन.' अशी भावना ठेवावी. यानेच अत्यंत समाधान होते.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

३० जुलै, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० जुलै २०१४

३० जुलै

राम कर्ता हे जाणून चित्तीं । जगांत संत ऐसें वर्तती ॥

 




जेथे मीपणाचे ठाणें । तेथें दुःखाचें साम्राज्य असणे ।
हा आहे नियम । म्हणून मी सांगतो राखावा नेम ।
सर्वस्वी व्हावें भगवंताचें । 'मी, माझें' सोडून साचें ॥
बाह्य मीपणानें जरी सोडलें । पण अभिमानानें वृत्ति बळावली । तेथें घाताला सुरुवात झाली ॥
बुद्धि करावी स्थिर । नामीं असावें प्रेम अनावर ।
राम कर्ता जाणूनि चित्तीं । जगांत संत ऐसें वर्तती ॥
साधनीं सावधान जाण । हेंच साधकाचे मुख्य लक्षण ॥
बाह्य वेषानें कसाहि नटला । जगाला भुलविता झाला ।
तरीं जोंवरी नाहीं चित्त स्थिर । कसा पावेल रघुवीर ? ॥
आजवर केल्या गोष्टी फार । भल्या बुर्‍या असतील जाण ।
त्याचा न करावा विचार । पुढें असावें खबरदार ॥
मानावी परस्त्री मातेसमान । दुसर्‍याचें न पाहावें उणेपण ।
परनिंदा टाळावी । स्वतःकडे दृष्टी वळवावी ॥
गुणांचे करावें संवर्धन । दोषांचे करावें उच्चाटन ।
याला एकच उपाय जाण । अखंड असावें अनुसंधान ॥

प्रपंच न मानावा सुखाचा । तो असावा कर्तव्याचा ॥
वृत्ति असावी स्थिर । चित्तीं भजावा रघुवीर ॥
असा करा कांही नेम । जेणें जवळ येईल राम ॥
प्रपंचाची धरितां कांस । दुःखचि पावे खास ॥
प्रपंच हाच आधार । प्रपंचाविण निराधार ।
ऐशी होई ज्याची वृत्ति । समाधान न ये त्याचे हातीं ॥
तुम्ही सुज्ञ भाविक जाण । एवढें ऐकावें माझें वचन ॥
दुष्ट मतीची उत्पत्ति । ही दुर्जनाची संगति ।
भावें धरितां रघुपति । सर्व संकटें दूर जाती ॥
वृत्ति असावी खंबीर । ज्याचा आधार रघुवीर ॥
दुर्जनांचे जैसें मन । पाषाणास न फुटे द्रव जाण ।
तैसें प्रपंची इच्छी जो सुख । जें आजवर कोणास न मिळाले देख ॥
प्रपंचाचे दुःख जाण । तें मीपण असल्याची खूण जाण ॥
जगांत वर्तावें, घरांत असावें । व्यवहारांत व प्रपंचांत वागावे । परि न कोठे गुंतावें ॥
फार दिवसांचा वृक्ष झाला । घरांतील घडामोडी दिसती त्याला ।
जैसें तो न सोडी आपलें स्थान । तैसें वागावें आतां आपण ॥
ज्याचें घरी रामाचा वास । तेणें न राहावें कधीं उदास ॥
सदा राखावें समाधान । मुखीं भगवंताचें नाम ॥
आतां प्रेम ठेवा नामीं । कृपा करील चक्रपाणी ॥
आतां करा चित्त स्थिर । हृदयीं धरा रघुवीर ॥
रामावांचून न आणावा विचार । हाच माझा आशिर्वाद ॥


२१२. जेथे नाम तेथे राम । हा ठेवावा विश्वास । कृपा करील रघुनाथ खास ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२९ जुलै, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ जुलै २०१४

२९ जुलै

मला कुणाचे दुःख पाहवत नाही. 

 



पुष्कळ मंडळी यावीत, आलेल्याला खायला घालावे, आणि भगवंताचे नाम घ्यावे, ह्या तीन गोष्टी मला फार आवडतात. त्या जो करील त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही. जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो, त्याच्या प्रपंचात मी आहे. माझ्या माणसाने प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडायची नाही. उलट, इतरांच्यापेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे. कमी आहे त्याची काळजी न करता, जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता, जो येईल तसा खर्च करतो, तो मनुष्य ते सर्व मला देतो. मला विकत-श्राद्ध घ्यायची सवय आहे. मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही; पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो. माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसे खूप होती; पण मी कधीही काळजी केली नाही. मी आजपर्यंत पैशासाठी कुणापुढे जीभ विटाळली नाही. उद्या जर कोणी एक लाख रुपये माझ्या नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले, तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमाचे चार आणे मिळवून पोट भरीन. मला आवडते की, एक लंगोटी घालावी, मारुतीच्या देवळात राहावे, भिक्षा मागावी, आणि अखंड नाम घ्यावे. हे करायला कोण तयार आहे ? मी आपला नामाचा हट्ट कधी सोडला नाही. मी जरी जास्त गरीबांचा आहे, तरी मला प्रपंचांत कधी दैन्यपणा आवडत नाही. दुसर्‍याकरिता निःस्वार्थीपणाने भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही.
व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे की, मला कुणाचे दुःख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही. माझ्यातले प्रेम काढले तर मग 'मी' नाहीच ! मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणार्‍या माणसाला माहेरी आल्यासारखे वाटले पाहिजे; तो परत जाताना त्याच्या डोळ्यांत पाणी आले पाहिजे. दुसर्‍याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही; ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात. पण आपण असण्यात एक आधार आहे असे इतरांना वाटावे. माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊक ! मी पुढे असो वा नसो, जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटीही सांगतो : तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका. रामरायाने तुम्हा सर्वांवर कृपा करावी, ही माझी त्याला प्रार्थना आहे. तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची जाणीव मला आहे. या कष्टांचा मोबदला रामरायच तुम्हाला देईल. तुम्ही सर्वजण आनंदात राहा, हा माझा तुम्हा सर्वांना आशिर्वाद आहे.


२११. माझा असा अनुभव आहे की, जो मनुष्य
आपले आहे ते रामाला देतो त्याला राम पुरवतो.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२८ जुलै, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ जुलै २०१४

२८ जुलै

नाम घेणार्‍याच्या मागेपुढे मी उभा आहे. 

 

 

गूढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते. कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात. ते कुठून येतात हे कळत नाही. म्हणजे, केवळ दृश्यामध्ये असणार्‍या गोष्टींचेदेखील मूळ आपल्याला उकलत नाही. मग जे अदृश्यच आहे त्याचे मूळ आपल्याला कसे कळणार ? मो बोलतो कसा, माझे मन कुठून येते, हे देहबुद्धीत राहणार्‍यांना कळणे कठीण आहे. नामामध्ये जे स्वतःस विसरले त्यांनाच मी खरा कळलो. स्वतःच्या प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता. पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो, त्याप्रमाणे प्रपंचामधे कसेही केले तरी दुःखच पदरात पडते. आपण समजून उमजून ज्या चुका करतो, त्यांचा दोष आपल्याकडे असतो. न समजता जी चूक होते त्याचा दोष येत नाही. प्रपंचाच्या आसक्तिने दुःखपरंपरा येते हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ति ठेवतो, हा दोष नव्हे काय ? आपले कुठे चुकते ते पाहावे आणि जे चुकते ते सुधारावे. प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात ? त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसते. मग अमुक हवे किंवा नको असे कशाला म्हणावे ? रामाचेच होऊन राहावे म्हणजे झाले ! जो रामाजवळ विषय मागतो, त्याला रामापेक्षा त्या विषयाचेच प्रेम जास्त असते असे सिद्ध होते.
मी तुमच्याकडे येतो. पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवीत नाही. मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा; म्हणजे सतत नामस्मरणात रहा. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच. मला रामावाचून दुसरे जिवलग कोणी नाही. देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे यापलिकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही. रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका. जो माझा म्हणतो , त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे. जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका, आणि घ्यायचे झाले तर नामच घ्या. माझा नियम असा आहे की, परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल. माझ्या गावी पैसा पिकत नाही. पण भक्ति मात्र खास पिकते. ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागेपुढे मी उभा आहे. मी तुमच्याजवळ आहेच; तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो. शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे, मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे; ती मी सांभाळीन.

२१०. जेथे नाम तेथे मी । हा भरवसा बाळगून असावे तुम्ही ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२७ जुलै, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ जुलै २०१४

२७ जुलै

आपण मागावे फक्‍त एका रामाजवळ. 

 



आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्याकरिता व्हावी. आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे. किंबहुना, लहान मुलाला जशी आई, मोठ्या मुलाला जसा बाप, बाईला जसा प्रेमळ नवरा, मुनीमाला जसा सज्जन मालक, नोकराला जसा त्याचा स्वामी, एखाद्याला जसा विश्वासू मित्र, तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने गोंदवल्यास यावे. भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन, त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा, हे सगुणोपासनेशिवाय सामान्य स्त्री-पुरुषाला समजणे अशक्य आहे. जगात घडून येणार्‍या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाची इच्छा काम करीत असल्याचे आपण जाणले पाहिजे. इतकेच नव्हे, तर व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्‍न केल्यानंतर जे चांगले वाईट फळ मिळेल, ते रामाच्या इच्छेनेच मिळते अशी श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते, त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही. सर्व काही राम करतो, खरे कर्तेपण रामाचे, हे नीट लक्षात आणून, भगवंताकडे कर्तृत्व द्यावे आणि आपण मीपणाने नाहीसे व्हावे. खरोखर, आपल्या रामाला काय कमी आहे ? आपण मागावे फक्त एका रामाजवळ ! तो देईल अथवा न देईल. जे देईल त्यांत समाधान मानावे. दुसऱ्या कोणाच्याही जवळ आपण कधी मागू नये. त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे. मात्र देणार्‍याने स्वखुशीने दिले तर ते टाकू नये.
माझ्या आयुष्यात मी नामाशिवाय दुसरे साधन केले नाही. माझ्या गुरूंनी मला नामच दिले, तेच नाम मी सर्वांना देत आहे. तुम्ही ते नाम घ्या, तुम्हाला राम खात्रीने भेटेल. तोंडाने नेहमी 'राम राम' म्हणत जा. भगवंताच्या नामामध्ये जीवाचे कल्याण आहे असा माझा अनुभव आहे. म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री-पुरुषांनी घ्यावे. कोणत्याही कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचे बळ ठेवा. गाईचे रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी, फक्त भगवंतासाठी असावी. आपण जे काही करीत आहोत ते सर्व भगवंतासाठी करीत आहो, जी जाणीव राहण्यासाठी त्याचे नाम सतत घेत असावे. ज्या वेळी समाजातली पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात, त्या वेळी कलियुग सुरू झाले असे समजावे. सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात. विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते. अशा वेळी, भगवंताच्या नामाचे माहात्म्य जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यायचेच; पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील, तो प्रत्येक संकटातून सहीसलामत पार पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिकटून असावे. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा.

२०९. राम कर्ता म्हणेल तो सुखी, मी कर्ता म्हणेल तो दुःखी.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२६ जुलै, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ जुलै २०१४

२६ जुलै

साधन - चतुष्टय. 

 



कोणतीही इमारत बांधीत असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्राने चार प्रकारचे साधन सांगितले आहे. प्रथम, नित्यानित्यवस्तुविवेक करावा. अनित्य जो विषय त्याच्या वाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे. नंतर, या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी. हे दुसरे साधन होय. आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते; तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे. आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे, गुरूच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा, हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावे; हे तिसरे साधन होय. शेवटी, भगवंताच्या भेटीची खरी तळमळ लागावी. ही सर्व साधनसामग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते. पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे. मनामधली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे. मोहाला बळी पडता कामा नये. नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्यजन्माचे ध्येय नव्हे. जनावरेदेखील आपापला प्रपंच करतातच. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही. खरोखर, भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठविलेले आहे. त्याचे नाव घेऊन जो जगात वावरेल, त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखील यात शंका नाही. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे. रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावे लागते, पण हे आपल्याला सर्वाच्या शेवटी आठवते, म्हणून सुखदुःख बाधते. म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू. यासाठी त्याच्या नामाची गरज आहे. प्रपंचाची तर्‍हा अशी असते की, आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले, की लगेच उद्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते. म्हणून, एका डोळ्यात सुखाचे अश्रू, तर दुसर्‍या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते, तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे ? शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे, आणि बरावाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे. जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे. नाम घेणार्‍याचे राम कल्याण करतो, एवढे माझे सांगणे शेवटर्यंत विसरू नका.

२०८. अती प्रेमाने नाम घ्यावे. नामात तल्लीन
झाल्यावर देहाची सुखदुःखे बाधणार नाहीत.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या