६ सप्टेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ६ सप्टेंबर २०१४

६ सप्टेंबर

' राम कर्ता ' या भावनेने समाधान मिळते. 

 

 



पहाटेची वेळ खरोखर फार चांगली. ह्या वेळी कोणी मानसपूजा करीत असतील तर फारच उत्तम. दुसरे कोणी या वेळी झोपेत असतील, तर आणखी कोणी मनोराज्येही करीत असतील. पहाटेपासून तो रात्रीच्या झोपेपर्यंत, मग तो राजा असो किंवा रंक असो, सर्वांची एकच धडपड चालू असते, आणि ती म्हणजे समाधान मिळवायची. प्रत्येकाच्या जीवनाला समाधानाची ओढ लागलेली असते. वास्तविक, खरे समाधान हे कशावरही अवलंबून नाही. ते ’राम कर्ता’ ही भावना बाळगल्यानेच मिळू शकते. समाधान मिळवायचे एक अत्यंत सोपे साधन सर्व संतांनी स्वतः अनुभव घेऊन आपल्याला सांगितले आहे, आणि ते म्हणजे नामस्मरण. खरी तहान लागली म्हणजे सहजपणे कोणत्याही नदीचे पाणी प्याले तरी तहान भागते. त्याचप्रमाणे खरी तळमळ असली, म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होते. पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होतो असे म्हणतात. तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासाला आपण पहाटेपासून सुरूवात करू या. काकड आरती झाली म्हणजे देवाचे स्मरण संपवावे असे नाही, किंवा सारखी काकड आरतीच करावी असेही नाही. भगवंताचे अखंड स्मरण आणि भाव पाहिजे, यात सर्व काही आले. मला खात्री आहे, तुम्ही आवडीने आणि तळमळीने हा अभ्यास चालू ठेवाल, तर राम तुमचे कल्याण करील.
नाम घेत असताना इतर विचार मनात येत राहतात, अशी सर्वांचीच तक्रार आहे, परंतु असे पाहा, एखादा मनुष्य रस्त्याने चालला असला की, ’तुला रस्त्यात कोण कोण भेटले ?’ तर तो म्हणतो, ’माझे लक्षच नव्हते.’ त्याप्रमाणे आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावे. त्यांच्या पाठीमागे जाऊ नये, किंवा त्यांच्याबद्दल विचार करीत वेळ फुकट घालवू नये. ’मला विचार विसरला पाहीजे, विसरला पाहीजे,’ असे म्हणून का त्याचे विस्मरण होणार आहे ? नामाकडेच जास्त लक्ष द्यावे, म्हणजे विचारांचा आपोआप विसर पडतो, आणि पुढे ते येईनासे होतात.
एकदा वाट चुकल्यावर ती चुकीची वाट परत उलट दिशेने चालावी लागते; आणि मग योग्य रस्ता आल्यावर त्या रस्त्याला लागायचे, हाच अभ्यास; आणि हे सर्व ध्येय गाठेपर्यंत चालू ठेवणे हीच तपश्चर्या, ब्रम्हानंदबुवांनी खरी तपश्चर्या केली. ते एवढे विद्वान, परंतु त्यांनी आपली सर्व बुद्धी रामचरणी लावली. जगातल्या इतर गोष्टींपेक्षा हे केल्याने आपले खचितच कल्याण होईल असे वाटले, म्हणून त्यांनी हा मार्ग पत्करला, आणि त्याला सर्वस्वी वाहून घेतले. तेव्हा, मोठे साधक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण संशयरहित होऊन चालावे, त्यात आपले कल्याण आहे.

२५०. नामात राहा आणि राम कर्ता ही भावना दृढ करा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

५ सप्टेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ५ सप्टेंबर २०१४

५ सप्टेंबर

नाम म्हणजे जादूचा दिवाच. 

 

 



एकदा एक बाई सोवळे नेसून स्वयंपाक करीत होती. बाईचे मूल झोपून उठल्यावर, अंथरूणातच ’आई, मला घे,’ म्हणून रडू लागले. आई म्हणाली, ’बाळा, मी तुला घ्यायला आतुर झाले आहे रे, पण तू कपडे तेवढे काढून ये’. परंतु मुलगा कपडे काढायला तयार होईना, आणि ’आई, आई’ म्हणून रडू लागला. तेव्हा शेजारच्या बाईने येऊन मुलाचे कपडे काढले, आणि मग आईने मुलाला पोटाशी घेतले. आपलेही त्या लहान मुलाप्रमाणे झाले आहे. वासना, विकार, अहंभाव इत्यादींचे कपडे न काढताच आपण परमेश्वराला भेटायची इच्छा करतो, मग त्याची नि आपली भेट कशी होणार ? परमेश्वर मातेप्रमाणेच अत्यंत प्रेमळ आणि ममताळू आहे, त्याला आपल्याला भेटायची अतिशय इच्छा आहे; परंतु जोपर्यंत आपण आपल्या अंगावरची अपवित्र आवरणे काढून टाकीत नाही, तोपर्यंत परमेश्वर आपल्याला जवळ घेत नाही.
संत आपल्याला परमेश्वराकडे जायचा रस्ता सांगतात. त्या मार्गाने गेलो तर आपल्याला खचितच भगवंताची प्राप्ती होईल. आपण पुराणात वाचलेच असेल की, श्रीकृष्णाकडे दुर्योधन आणि अर्जुन गेले असताना, श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितले की, ’ज्याला मी हवा असेन त्याला माझे सैन्य आणि इतर गोष्टी मिळणार नाहीत’. हे ऐकून, दुर्योधनाने त्याचे सर्व सैन्य मागून घेतले. अर्जुनाला खरा आनंद झाला की आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळते आहे, कारण तो हे जाणून होता की, एका परमेश्वरावाचून बाकी सर्व व्यर्थ आहे. प्राणावाचून हजारो शरीरांचा काय उपयोग ?
कोणी आपल्याला सांगतीलही की परमेश्वर साता समुद्रापलीकडे आहे, तो शेषशायी आहे. तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो प्राप्त होणे अत्यंत कठीण आहे. परंतु संतांनी आपल्यावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत. त्यांनी नामरूपी जादूचा दिवाच आपल्या हाती दिला आहे; त्यात सत्संगतीचे तेल घातले म्हणजे झाले. हा दिवा विझू नये म्हणून फार काळजी घ्यावी लागते. मी त्रिवार सत्य सांगतो की, नीतीने वागून जो नामात राहील त्याला नामाचे प्रेम लागल्याशिवाय राहणार नाही. नीती हा सर्वांचा पाया आहे. त्या पायाशिवाय इमारत टिकू शकणार नाही. तीन गोष्टी अत्यंत जपा : परस्त्री मातेसमान माना, परधन आणि परनिंदा विष्ठेसारखी माना, आणि कशाही परिस्थितीत नामस्मरणाला सोडू नका; तुम्हाला भगवंताचे प्रेम खात्रीने लागेल.

२४९. मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

४ सप्टेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ४ सप्टेंबर २०१४

४ सप्टेंबर

अभिमानरहित राहिल्याशिवाय भक्ति करता येत नाही. 

 



बाह्य जगाचे आघात आपल्यावर होतात त्यामुळे आपली जी प्रतिक्रिया होते, मग ती सुखाची, दुःखाची, अभिमानाची, कामाची, लोभाची, कसलीही असो, तिचे नाव वृत्ती. ही वृत्ती स्थिर ठेवणे हा खरा परमार्थ होय. परमात्म्याकडे वृत्ती वळविणे म्हणजेच भक्ती करणे होय. भगवंताच्या भक्तीने विषय बेमालूम नाहीसा होतो. भक्ती ही अत्यंत स्वाभाविक आहे, ती प्रत्येकाला हवीच असते; कारण भक्ती म्हणजे आवड; आणि कसल्यातरी आवडीशिवाय मनुष्यच सापडणार नाही. मात्र अभिमानरहित राहिल्याशिवाय भक्ती करता येणार नाही, आणि भक्तीविणे भगवंत नाहीच प्राप्त होणार. भगवंताचे प्रेम भगवंतावाचून इतर कुणाला देता येत नाही, तोच ते देऊ शकतो. भक्त आणि भगवंत हे दोन नाहीतच. म्हणून भगवंत हा जसा सर्व ठिकाणी आहे, तसा भक्तही सर्व ठिकाणी असतो. भक्त भगवंतमय होतो, म्हणून त्याला सर्व जगतात आनंद दिसतो. ’मी नाही आणि तू (म्हणजे भगवंत) आहेस,’ किंवा ’मी तोच (म्हणजे भगवंत) आहे’ असे जाणणे, आणि तसेच कृतीत घडणे, हेच परमार्थाच्या तत्वज्ञानाचे सार आहे, आणि हे साधायला भगवंताचे अनुसंधान हेच मुख्य साधन आहे.
आज आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय आहे; भगवंताच्या नामात राहावे. नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. वहात आलेले नाले तिच्यात मिसळले तरी गंगामाईचे पवित्रपण जसे कायम राहाते, त्याचप्रमाणे आमचा प्रपंच कितीही गढूळ असला तरी भगवंताची आठवण त्यात ठेवली तर त्याचे गढूळपण मग कुठून राहील ? भगवंताचे स्मरण तर सर्व तीर्थांचा राजा आहे. नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होते ते टाकणे किंवा सोडणे हे वैराग्य, आणि भगवंताचे स्मरण होईल अशा गोष्टी करणे हा विवेक होय. रामरायाचे अंतःकरण खरोखर जितके कठोर आहे तितकेच भक्ताला ते अत्यंत कोवळे आहे. कर्तव्यासाठी त्याने सीतामाईला अरण्यात सोडली, तर भक्तप्रेमापोटी त्याने भरताला सांभाळले. माझे सांगणे आचरणात आणाल तेवढेच कामाला येईल. सगळ्यांनी नामस्मरण करा, नामस्मरणासारखा दुसरा कल्याणाचा मार्ग नाही. जे सहज आपल्याजवळ आहे, अत्यंत उपाधीरहीत असून कुणावर अवलंबून नाही, असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे. शुद्ध मनाने आणि शुद्ध अंतःकरणाने जो ते घेईल त्याचे राम खरेच कल्याण करील.



२४८. सर्व सृष्टी रामरुप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

३ सप्टेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३ सप्टेंबर २०१४

३ सप्टेंबर

साधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे. 

 

   

आपल्या स्वभावानुसार प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तर्‍हेने भगवंताची ओळख करून घेता येईल. मारूतीने दास्यत्वाने भक्ती केली. दशरथाने पुत्राप्रमाणे देवाला मानले. भगवंत माझा कसा होईल याचा आपण विचार करावा. भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वात श्रेष्ठ साधन सांगितले आहे. मनुष्य जे जे प्रेम व्यसनात लावतो ते प्रेम भगवंताकडे लावले तर सर्व काम होते. हट्टी आणि व्यसनी माणसे एक प्रकारे चांगली. त्यांचे मन त्यांना सांगत असते की व्यसनापायी आपल्या मुला-बाळांचेही नुकसान होते आहे. पण आपले व्यसन ते हट्टाने सोडीत नाहीत. हाच हट्ट किंवा निश्चय भगवंताकडे लावला की परमार्थ झाला ! माझे गुणदोष मी देवाला वाहिले की अर्पणभक्ती होते. आपण देवाची भक्ती करतो. परंतु त्या भक्तीत खरे प्रेम येत नाही; याचे कारण म्हणजे आपली दृष्टी चारी दिशांना फाकलेली असते. ती प्रथम एकाग्र करावी. थोडे करावे, पण एकाकार होऊन करावे.
परमार्थ कंटाळवाणेप्रमाणे करू नये. आपल्या भावनेला व्यक्त व्हायला योग्य दिशा कशी मिळेल इकडे लक्ष द्यावे. परमात्मा पंढरपुरात आहे असे साधुसंत म्हणत आले, परंतु आपल्याला तो दगडच दिसतो, हा दोष कुणाचा ? आपल्या भावनेचाच. जशी भावना ठेवू तशी कृती होते. भगवंताजवळ आपला पूर्ण भाव ठेवावा. दिवा थोडा बाजूला झाला की वाट चुकते; म्हणून सतत भगवंताकडे नजर ठेवून वागावे. साधनावर सतत जोर द्यावा. तालासुरावाचून प्रेम येत नाही असे थोडेच आहे ? मी ज्याच्यापुढे भजन म्हणतो, तो ते ऐकतो या समजुतीने म्हटले म्हणजे झाले. भगवंताचाच मी आहे असे म्हणवून घ्यावे, त्याची कृपा केव्हा होईल ही तळमळ बाळगावी, आणि मी जे करतो ते मनापासून करतो की नाही हे पाहावे. झाल्यागेल्याचे दुःख करू नका, उद्याची काळजी करू नका, आणि आजचे अनुसंधान चुकवू नका. भगवंत साक्षात पुढे उभा आहे असे समजून नामस्मरण करावे. प्रत्येक नामात ’भगवंत कर्ता’ असे म्हणावे, म्हणजे अभिमान वाट अडवणार नाही. लाभहानीचे सुखदुःख न वाटणे ही खरी भक्तीची प्रगती होय. देहाच्या कर्तुत्वाच्या मर्यादा सांभाळून, विषयातली वृत्ती भगवंताकडे लावणे, हेच खरे सीमोल्लंघन होय. जो अत्यंत आकुंचित आणि स्वार्थी आहे, तसेच जो ’माझ्या सुखाकरीता सर्व जग आहे’ ही बुद्धी ठेवतो, तो मनुष्य अभिमानी समजावा. मनुष्य जितका स्वार्थी, तितका तो पराधीन असतो. पाचजणापासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे प्रपंच, आणि एकापासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ होय.



२४७. ’भगवंत आहे’ या भावनेपासून साधकाने सुरूवात करावी,
आणि ’भगवंत आहेच’ या भावनेमध्ये समाप्ती करावी.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२ सप्टेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २ सप्टेंबर २०१४

२ सप्टेंबर

नामात राहणे म्हणजे मरणातीत होणे. 

 



मुलगा आजारी पडला तर माणूस देवाला नवस करून त्याला जगवायचा प्रयत्‍न करू लागतो; ’जगला तर देवाला अर्पण करीन’ म्हणतो. अर्पण करणार म्हणजे आपलेपणा सोडणार; मग तो आज मरण पावला तरी कुठे बिघडले? मुलगा जगावा असे वाटते ते आमच्या सुखाकरीताच. एक दिवस हा जाणारच हे ज्याला खरे पटले, तो नाही देवाजवळ असे मागणार. जन्ममरणाच्या फेर्‍यातून सुटावे हे मागून घेण्यापेक्षा, मरण चुकवावे हे म्हणणे किती वाईट आहे ! खरा भक्त तोच की ज्याला संताजवळ किंवा देवाजवळ काय मागावे हे बरोबर समजते. मरणाला जे कारण झाले ते चुकवावे. मरण येणार हे नक्की ठरलेलेच आहे; मग ते चांगले यावे असे नाही का वाटू ? ज्यानंतर पुन्हा जन्म नाही ते चांगले मरण. जो मरतो त्याचा आपण शोक करतो. ’देव आज लोपला’ असे म्हणतो, ते आपल्या स्वार्थापोटीच. स्वतःला विसरणे, ’मी कोण’ हे न जाणणे, हे मेल्याप्रमाणेच आहे. याकरिता, आलेली संधी वाया जाऊ देऊ नये. बुद्धी जोवर स्थिर आहे तोवर कार्य साधून घ्यावे. आजची बुद्धी उद्याला टिकत नाही असे आपले चालले आहे. संकल्पविकल्पांनी आपण बेजार होतो. तेव्हा, ज्या वासनेत आपला जन्म होतो ती वासनाच भगवंताच्या नामाने मारून टाकावी. नामात राहणे म्हणजेच वासना मारणे, म्हणजेच मरणातीत होणे. भगवंताचे होऊन राहणे हाच मरण टाळण्याचा खरा उपाय आहे. काळाचाही जो काळ, त्याला ओळखल्यावर मरणाची भीती कसली ! ज्ञानी नाही मरणाची काळजी करीत. नुसते जिवंत राहणे हे काही खरे नव्हे. जगणे हे काहीतरी हेतूसाठी, ध्येयासाठी असावे. जगून भगवंताच्या अनुसंधानात राहावे. भाग्याचा दिवस तोच की ज्या दिवशी नामस्मरणामध्ये देहाचा अंत झाला.
वास्तविक, आम्ही दररोज जगतो आणि मरतो. एकदा निजला आणि पुन्हा जागा नाही झाला की तेच मरण ! झोप हे एक प्रकारचे मरणच आहे. एवढ्याकरिता, झोपी जाताना नामस्मरण करीत करीत झोपी जावे, म्हणजे उठतानाही नामस्मरणातच जाग येईल. पण झोपेच्या वेळी नाम येण्यासाठी, त्याचा अगोदर अभ्यास करणे जरूर आहे. जागृतीत अभ्यास केला नाही, तर झोपेच्या वेळी दुसरेच विचार येतील. नामस्मरण बाजूलाच राहील, आणि भलत्याच विचारात पटकन झोप लागून जाईल. सदोदित नामस्मरण केले नाही तर ते अंतकाळी कसे येईल ? अभ्यास अगोदर केला नाही तर परिक्षेच्या वेळी तो कसा येईल ? तेव्हा नामस्मरणाच्या अभ्यासाला आजपासूनच सुरूवात करू या.


२४६. ’आपुले मरण पाहीले म्या डोळा’ म्हणजे माझ्या देखत वासना संपूर्ण क्षीण झाली हा अनुभव येणे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१ सप्टेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १ सप्टेंबर २०१४

१ सप्टेंबर

आपले ज्ञान हे देहबुद्धीचे. 

 

  


प्रापंचिक लोक म्हणतात की, विषयाचा अनुभव तात्काळ येतो, पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे. हे त्यांचे म्हणणे मला पटते. प्रापंचिक लोक प्रपंच सोडीत नाहीत याचे मला नवल वाटत नाही, पण ते सुख चिरकाल टिकणारे आहे ही समजूत करून घेऊन त्यामध्ये रमतात, याचे मला वाईट वाटते. मी असे म्हणतो की, तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरे आहे तेवढेच तुम्ही खरे माना, पण ते तुम्ही करीत नाही. भगवंताचा आनंद मिळाला नाही तरी हरकत नाही, पण कायम टिकणारे सुख विषयामध्ये नाही एवढी जरी खात्री झाली तरी पुष्कळ काम होईल. त्यामधुनच भगवंताचा आनंद उत्पन्न होईल. भगवंताचा आनंद बाहेरून कुठून आणायचा नसून तो आपल्यामध्येच उत्पन्न होणारा आहे.
सध्याच्या सुधारणेने देहाचे सुख पुष्कळ वाढविण्याचा प्रयत्‍न केला, पण ते शेवटी दुःखालाच कारण झाले. समजा, देहाचे पुष्कळ सुख समोर आहे, पण ते भोगण्याची जर आपल्याला शारीरिक शक्ती अथवा सांपत्तिक सुबत्ता नसेल तर त्याच्या प्राप्तीमुळेसुद्धा दुःखच पदरात पडेल. सगळ्यांना सगळे सुख मिळणे केव्हाच शक्य नसल्यामुळे प्रत्येकजण धडपड करून शेवटी दुःखीच राहतो. सुख आणि दुःख ही दोन्ही वस्तुतः उत्पन्न झालीच नाहीत. ती आपण आपल्या भ्रमाने उत्पन्न केली आहेत. मनाच्या सुलट झाले की सुख होते, आणि मनाच्या उलट झाले की दुःख होते. मुळात सुखही नाही आणि दुःखही नाही. ’मी देही’ ही भावना जोपर्यंत आहे, तोपर्यंत अनुभवाच्या बरोबर भ्रम असायचाच. सृष्टी ही आनंदमय असूनही तशी ती आपल्याला दिसत नाही, हा आपला भ्रम आहे; त्या भ्रमाचे मूळ आपल्या आतमध्ये आहे. भगवंत तिथे माया, काया तिथे छाया, हे जसे खरे, त्याप्रमाणे अनुभव तिथे भ्रम असायचाच हा नियम आहे. पाचजण मिळून प्रपंच बनतो. त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो; मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे?
एका गावाहून दुसर्‍या गावी बदली झालेला मनुष्य आता दोनतीन वर्षे तरी आपली बदली होत नाही म्हणून निश्चिंत असतो. या प्रपंचामध्ये आपली आयुष्याची तितकीसुद्धा निश्चिंती नाही. याकरिता, आपण आयुष्याचा एक क्षणसुद्धा फुकट न घालविता सत्कर्मात, म्हणजेच भगवंताच्या अनुसंधानात व्यतीत करावा. आपला शत्रू भेटून त्याच्याशी भांडण झाल्यामुळे गाडी चुकली काय, किंवा कोणी मित्र भेटून त्याच्याशी प्रेमाने बोलण्यात गाडी चुकली काय, दोन्ही सारखेच. त्याप्रमाणे प्रपंचामध्ये आघात झाल्यामुळे भगवंताला विसरले काय, आणि प्रपंच अत्यंत अनुकूल असून त्यामध्ये गुंतून राहिल्यामुळे भगवंताला विसरले काय, दोन्ही सारखेच; नुकसान एकच.

२४५. भगवंतावाचून जगात दुसरे सत्य नाही असे मनापासून
वाटल्यावर, जो काही प्रपंच घडतो तो परमार्थ समजायचा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

३१ ऑगस्ट, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३१ ऑगस्ट २०१४

३१ ऑगस्ट

"ज्याच्या घरात समाधान तेथे मी आहे."

  


मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो, त्याच्या इतर गोष्टी मी पाहात नाही. पण तुम्ही त्याची श्रीमंती, विद्या, मान, यांवरून तो सुखी आहे की नाही हे ठरवता. भगवंतावाचून मनुष्य कसा सुखी होईल ? लोकांना श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो. लोकांना विद्वान आवडतो, तर मला अडाणी आवडतो. असे माझे सगळे जगाच्या उलट आहे. पण म्हणूनच जगाच्या उलट माझ्याजवळ समाधान आहे. समाधान कशात आणि कुठे आहे याचा मी शोध लावला. मी समाधानरूपी आहे. ज्याच्या घरात समाधान आहे तिथे मी आहे. जो माझा आहे पण समाधानी नाही, त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होतात. मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्हीसुद्धा अत्यंत समाधानी राहा की झाले ! आजपर्यंत मी एकच साधन केले: कुणाचे मन दुखवले नाही, आणि एका नामावाचून दुसर्‍या कशाचीही आठवण ठेवली नाही. माझ्याजवळ काय आहे ते सांगा ! विद्या नाही, पैसा नाही, किंवा कला नाही. पण सर्वांवर मी अत्यंत निष्कपट प्रेम करतो, त्यामुळे लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो.
जगाचा स्वभाव मला पक्का माहीत आहे; म्हणून आजपर्यंत मला कोण काय म्हणतो हे मी पाहिले नाही, मी त्याला काय सांगायचे एवढेच मी पाहिले. माझे सांगणे ऐकल्यानंतर पुनः तुम्ही ऐकायला येता, याची तीन कारणे असू शकतील. एक, मला चांगले सांगता आले नसेल; दुसरे, तुम्हाला ते समजले नसेल; किंवा तिसरे, सांगितलेले तुम्ही विसरला असाल. तुम्ही माझ्याशी अगदी स्वाभाविक रीतीने बोलावे; आपण आपल्या घरातल्या माणसांशी जसे बोलतो तसे अगदी आपलेपणाने माझ्याशी बोलावे. पण माझ्याशी कुणी कसाही आणि काहीही बोलला तरी मला जे सांगायचे तेच मी त्याला सांगत असतो. मी एखाद्याला सांगत असताना, 'याने माझे ऐकले तर याचे कल्याण होईल' असे आपोआपच माझ्या मनात येते. माझे जो ऐकेल त्याचे खास कल्याण होईल याची मला खात्री असते. पण कल्याण म्हणजे प्रपंचातली सुधारणा नसून, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहणे होय. माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असे नाही; पण त्याचा प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मी मदत करणार नाही. अशी केली नाही तर तो रडेल, त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल, पण तो जगेल हे मात्र निश्चित होय; आणि जगल्यावर आज ना उद्या तो नाम घेईल. रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयोग आहे ? मी एकदा बीज पेरून ठेवतो. आज ना उद्या त्याचे झाड झाल्याशिवाय राहणार नाही.

२४४. आजपर्यंत मी नामाशिवाय दुसरे काही सांगितलेच नाही. जो मला
भेटायला येतो त्याच्या तोंडातून नाम घेववण्याचे माझ्याकडे लागले.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

३० ऑगस्ट, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० ऑगस्ट २०१४

३० ऑगस्ट

समाधानाचें स्थान । एका रामावांचून नाहीं जाण ॥ 

 





विषयी गुंतले सर्व जन । चित्त मन तेथे केले अर्पण ।
तेथे कोणास न येई समाधान । पावे सुखदुःख समसमान ॥
विषयाचा केला कंटाळा । परि मनावर बसला त्याचाच थारा ॥
पैका हाती खेळवला । त्याने हात काळा झाला ।
हा दोष नाही पैक्याला । आपण त्याला सत्य मानला ॥
एका मानापोटी दुःखाचे मूळ । हे जाणती सर्व सकळ ॥
वैभव-संपत्तीचा सहवास । हाच दुःखास कारण खास ॥
व्यवहाराच्या चालीने चालावे । वेळ प्रसंग पाहून वर्तावे । चित्ती समाधान राखावे ॥
जोवर जरूर व्यवहारात राहणे । तोवर त्याला जतन करणे ॥
ज्याचा घ्यावा वेष । तैसे वागणे आहे देख ॥
व्यवहारात जैसे जगाने वागावे आपल्याशी । तैसेच वर्तन ठेवावे आपण दुसर्‍यापाशी ॥
ज्याचा जो जो संबंध आला । तो तो पाहिजे रक्षण केला ॥
आपलेकडून न कोणाचे दुखवावे अंतःकरण ।
तरी व्यवहारात जे करणे जरूर ते करावे आपण ॥
संगत धरावी पाहून । बाह्य भाषणावर न जावे भुलून ॥
मिष्ट भाषण वरिवरी । विष राहे अंतरी । असल्याची संगत नसावी बरी ॥
ज्याचा त्यास द्यावा मान । लहानाचे राखावे समाधान ।
मोठ्याचेपुढे व्हावे लीन । वागत जावे जगी सर्वास ओळखून ॥
मनाने व्हावे श्रेष्ठ । बाह्यांगी राहावे कनिष्ठ ॥
न करावा कोणाचा उपमर्द । गोड भाषण असावे नित्य ॥
आळसाला न द्यावा थारा । सगळ्या जीवनाचा घात ज्याने केला ॥
पराधीनता अत्यंत कठीण हे खरे असे । पण त्याच्याशिवाय जगतात कोणी नसे ॥
तरी व्यवहारात मिंधेपणे न राहावे । आळशीपण नसावे ॥
देह आळशी न ठेवावा हे जरी खरे । तरी त्याची परिस्थिति ओळखून वागणे बरे ॥
मागे काय झाले हे न पाहावे । उद्या काय होईल हे मनी न आणावे ।
आज व्यवहारात योग्य दिसेल तसे वागावे । प्रयत्नाचा कंटाळा न करावा ॥
आज जे मिळाले ते घ्यावे । पुढे जास्त मिळवण्याचा प्रयत्‍न करावा ॥
बिना केले काम । न मिळत असे दाम ॥
धन संग्रही राखावे । सर्वच खर्चून न टाकावे ॥
थोडे थोडे लोकांचे देणे देत जावे । आणखी जास्त न करावे ॥
नोकरी ज्याची करणे जाण । त्याचे मानावे प्रमाण ॥
व्यवहारात असावी दक्षता । अचूक प्रयत्‍न करावा सर्वथा ॥
प्रपंचात असावे दक्ष । सत्याचा धरावा पक्ष ॥
जो जो प्रसंग येईल जैसा । प्रपंचात वागेल तैसा । याचे नाव प्रपंचात दक्षता ॥
व्यवहार करावा ऐसा जपून । कोणाचे नुकसान न होऊ द्यावे चुकून ॥
भगवंताचे आहो आपण । ही मनी ठेवावी ओळखण ॥
समाधानाचे स्थान । एका रामावाचून नाही जाण ॥
म्हणून राम ठेवील त्यात मानावे समाधान । राखून नामाचे अनुसंधान ॥


२४३. प्रयत्‍नावाचून व्हावे हित । ऐसे न आणावे चित्तात ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२९ ऑगस्ट, २०१४

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा


श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ ऑगस्ट २०१४

२९ ऑगस्ट

धर्म म्हणजे नीति आणि अध्यात्म यांचा संयोग.

 



द्वैत आणि अद्वैत ही काय भानगड आहे ? भगवंतापासूनच सर्व झाले. एकापासून दोन झाले. आपण मूळ स्वरूपापासून बाजूला झालो म्हणून द्वैत आले. मायेमध्ये सापडले नाही म्हणजे अद्वैतात राहता येईल. माया कल्पनेचीच झाली; तिला कल्पनेनेच मारावी. एकच करावे: अद्वैतात जे राहिले त्यांच्या नादी आपण राहावे. भगवंताचे होण्याकरिता, ज्याने मी वेगळा झालो ते सोडावे. ज्याच्यापासून माया निर्माण झाली, त्यालाच शरण जावे. माया तरी भगवंतामुळेच झाली. जो भगवंताचा होतो, त्याला माया नाही बाधत. मायेचा जोर संकल्प-विकल्पात आहे. अखंड स्मरणात राहावे म्हणजे नाही माया बाधत. भगवंताचे नाम हे स्थिर आहे, पण रूप मात्र सारखे बदलते. प्रत्यक्ष साकाररूप हे काही रूप नव्हे; जे जे आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते ते सर्व रूपच होय. भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही, म्हणून ते पूर्ण आहे. समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव होय. म्हणूनच, जे पूर्ण नाही ते असमाधान. भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय, आणि हेच पूर्णपण आहे. जे शास्त्र समाधान देते तेच शास्त्र खरे होय, आणि ज्याने शांती आणि समाधानाचा लाभ होतो तोच खरा धर्म होय. धर्म म्हणजे नीति आणि अध्यात्म यांचा संयोगच.
जो दुसर्‍याच्या हिताकडे न पाहता आपल्या हिताकडेच पाहतो तो स्वार्थीच होय. सुख व्हावे ही मनुष्याला इच्छा असल्यामुळे अस्वस्थपणा येतो. या अस्वस्थतेमधून तळमळ निर्माण होते. या तळमळीमुळे जगाच्या सर्व सुधारणा बाहेर पडतात. पण ह्या सुधारणा जितक्या जास्त होतात, तितके मनुष्याला दुःख जास्तच होते. जी विद्या केवळ नोकरीचे साधन आहे, ती अपूर्णच असते. असली विद्या पोटापुरतीच समजावी. ती समाधान देऊ शकणार नाही. समाधान देणारी विद्या निराळीच आहे. म्हणून लौकिक विद्येला फार महत्व देऊ नये. एखादे वेळी आपल्याला असा संशय येतो की, जगात कुठे सुख, समाधान, आणि आनंद आहे का ? पण तो संशय बरोबर नाही. कारण ज्या गोष्टी जगात नाहीत त्यांचे नावच कसे निघेल ? असमाधान याचा अर्थच 'समाधान नाही ते.' यावरून असे स्पष्ट दिसते की, आधी समाधान असलेच पाहिजे. दिवाळीमध्ये, सुखाचे जे असेल ते आज करतो आणि दुःखाचे जे असेल ते आपण उद्यावर टाकतो. ह्याचा अर्थ असा की आपली काळजी नाहीशी झालेली नसूनही आपण आजचा दिवस चांगला म्हणजे काळजीविरहित घालवितो. उद्या पुन्हा काळजी आहेच ! पण जो भगवंताचे स्मरण ठेवील त्याला काळजी केव्हाच नसते.



२४२. ज्याची प्रत्येक कृती रामाच्या स्मरणात होते तोच खरा रामराज्यात राहतो.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२८ ऑगस्ट, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ ऑगस्ट २०१४

२८ ऑगस्ट

आनंदापासून दूर करते ती माया.

 



वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया होय. माया म्हणजे जी असल्याशिवाय राहात नाही, पण नसली तरी चालते; उदाहरणार्थ, छाया. माया ही नासणारी आहे. ती जगते आणि मरते. मला विषयापासून आनंद होतो; पण तो आनंद भंग पावणारा आहे. आनंदापासून मला जी दूर करते ती माया. आपल्याला विषयापासून शेवटी दुःखच येते. हा आपला अनुभव आहे. माया आपल्याला विषयात लोटते; विषयांचे आमिष दाखवून चटकन निघून जाते. आहे त्या परिस्थितीत चैन पडू न देणे, हेच तर मुळी मायेचे लक्षण आहे. पैसा हे मायेचे अस्त्र आहे. मायेचे थोडक्यात वर्णन करायचे म्हणजे, भगवंतापासून मला जी दूर करते ती माया. भगवंताची शक्ती जेव्हा त्याच्याच आड येते, तेव्हा आपल्याला ती माया बनते, आणि तिचे कौतुक जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा ती लीला बनते. एक भगवंत माझा आणि मी भगवंताचा, असे म्हटले म्हणजे मायेचे निरसन झाले. मायेचा अनर्थ माहीत असूनही तो आपण पत्करतो, याला काय करावे ?
जगाचा प्रवाह हा भगवंताच्या उलट आहे. आपण त्याला बळी पडू नये. जो प्रवाहाबरोबर जाऊ लागला तो खडकावर आपटेल, भोवर्‍यात सापडेल, आणि कुठे वाहात जाईल याचा पत्ता लागणार नाही. आपण प्रवाहात पडावे पण प्रवाहपतित होऊ नये. आपण प्रवाहाच्या उलट पोहत जावे; यालाच अनुसंधान टिकवणे असे म्हणतात. भुताची बाधा ज्या माणसाला आहे त्याला जसे ते जवळ आहे असे सारखे वाटते, तसे आपल्याला भगवंताच्या बाबतीत झाले पाहिजे. परंतु बाधा ही भितीने होते; त्याच्या उलट, भगवंत हा आधार म्हणून आपल्याजवळ आहे असे वाटले पाहिजे. मनात वाईट विचार येतात, पण त्यांच्यामागे आपण जाऊ नये, मग वाईट संकल्प-विकल्प येणार नाहीत. सर्वांना मी 'माझे' असे म्हणतो, मात्र भगवंताला मी 'माझा' असे म्हणत नाही; याला कारण म्हणजे माया. वकील हा लोकांचे भांडण 'माझे' म्हणून भांडतो, पण त्याच्या परिणामाचे सुखदुःख मानत नाही, त्याचप्रमाणे, प्रपंच 'माझा' म्हणून करावा, पण त्यामधल्या सुखदुःखाचे धनी आपण न व्हावे. खटल्याच्या निकाल कसाही झाला तरी वकिलाला फी तेवढीच मिळते. तसे, प्रपंचात प्रारब्धाने ठरवलेलेच भोग आपल्याला येत असतात. आपले कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो, त्याप्रमाणे कर्तव्य म्हणूनच आपण प्रामाणिकपणे प्रपंच करावा. त्यामध्ये भगवंताला विसरू नये, अनुसंधान कमी होऊ देऊ नये, कर्तव्य केल्यावर काळजी करू नये, म्हणजे सुखदुःखाचा परिणाम आपल्यावर होणार नाही. हे ज्याला साधले त्यालाच खरा परमार्थ साधला.



२४१. दुःखाचे मूळ कारण । जगत सत्य मानले आपण ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२७ ऑगस्ट, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ ऑगस्ट २०१४

२७ ऑगस्ट

समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. 

 



सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहील त्यालाच समाधान मिळेल. ज्या घरात समाधान, तेथे भगवंताचे राहणे जाण. जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते, अशा खर्‍या भावनेने एक वर्षभर जो राहील, त्याला समाधान हे काय ते खात्रीने कळेल. समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हे. प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा, आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटावा असे वाटते. त्याच्या मागे सारे जग लागेल. जगामध्ये आपल्याला समाधान कुणी देत नाही. समाधानाला निष्ठेची अत्यंत जरूरी आहे. पांडवांना वनवासात जे समाधान होते, ते राज्यपदावर असणार्‍या कौरवांना नव्हते. म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये सुखी राहावे. 'ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ती असो द्यावे समाधान ॥' हेच संतश्रेष्ठ तुकारामबुवांचेही सांगणे आहे. भगवंताची देणगी सर्व बाजूंनी गोड असली पाहिजे. पैसा ही भगवंताची देणगी नव्हे; त्याने तळमळ आणि अतृप्ती होते. खरोखर, समाधान हीच भगवंताची देणगी होय. मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही. आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानले की, जे आहे ते पुरेल. ज्याचे मन समाधानात आहे, त्याचे शरीर कसेही असले तरी चालेल. समाधानालाच खरे महत्व आहे. घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे. शिवाय, घेण्याला काही अंतच नाही. कितीही मिळाले तरी आपली मागण्याची बुद्धी कायम राहते. पण आपले सर्व काही दिले की देण्याला अंत आला, म्हणून त्यामध्ये समाधान आहे. आपण उपाधीने झाकले गेलो आहोत. एक एक उपाधी टाकीत गेले तर आपले खरे स्वरूप प्रकट होईल. तिथे खरे समाधान होते.
'राम कर्ता आहे' ही भावना होणे हे वासनेचे मरण होय. मनुष्य काही तरी हेतू ठेवून कर्म करतो. पण प्रत्येक ठिकाणी 'भगवंताच्या इच्छेने काय व्हायचे आहे ते होऊ दे', असे अनुसंधान असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही. आपल्याला सगळे कळते, पण आयत्या वेळेला आपण विसरतो. आलेली ऊर्मी आपण सहन करावी. दिवा बरोबर नेला की अंधार नाहीसा होतो. तसे अनुसंधानाचा दिवा बरोबर न्यावा, म्हणजे आपण आपल्या ऊर्मींना आवरू शकू. प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे, ते म्हणजे अनुसंधान. हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतले, तरी रोग्याला पथ्ये सांभाळावीच लागतात. शास्त्राने, सद्धर्माने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणे जरूर आहे. अनुसंधानाने जे साधेल, ते शतकोटी साधनांनी साधणार नाही. असे अखंड नामानुसंधान म्हणजेच खरी भक्ती.


२४०. इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते, हाच या युगाचा महिमा आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२६ ऑगस्ट, २०१४

लालबागचा राजा २०१४













( चित्र सौजन्य : दै. लोकसत्ता )

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ ऑगस्ट २०१४

२६ ऑगस्ट

कारणावाचून आनंद, तो खरा. 

 



जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणे हे आनंददायक आहे, मग आपल्याला दुःख का होते ? म्हणजे, मनुष्य आनंदासाठी जगतो, आणि दुःख करतो. याचे कारण असे की, आपण कशाकरिता काय करतो हेच विसरतो. मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो.
मी आनंदात राहावे असे प्रत्येकाला वाटते; म्हणजेच भगवंताकडे जावे असे वाटते, कारण भगवंत आनंदस्वरूपच आहे. आपल्याला अशी एक सवय लागली आहे की, काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगूच शकत नाही. प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचे राज्य उत्पन्न करतो, आणि त्यापासून आनंद भोगतो. आनंद मिळवण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे; पण कारणावर अवलंबून असणार्‍या आनंदाची वाट दुःखामधून आहे, आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो. म्हणून, कोणतेही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी. कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अर्थात अशाश्वत असणार, म्हणून तो खरा आनंद नाही. कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावे. हे 'काहीही न करणे' ही फारच उच्च अवस्था आहे. काहीतरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे. भगवंताशी अगदी अनन्य होणे, आपले कर्तेपण पूर्ण मारणे, ही ती अवस्था आहे. आनंद पाहिजे असेल तर तुम्ही आनंदातच राहा ! कशाही परिस्थितीत आनंद राहावा. आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटावे. कुणीही मनुष्य स्वतःसाठीच सर्व करतो. समजा, आपल्याला त्रास देणारा कुणी आहे; आपल्याला त्रास दिला तर त्याला बरे वाटते; म्हणजे आपल्याला दुःख दिले तर त्याला आनंद होतो, म्हणून तो नुसता स्वतःसाठीच माझ्याशी तसा वागतो; हे जसे खरे, तसेच, त्याने दिलेला त्रास मी का घ्यावा ? त्याने काहीही केले तरी आपला आनंद का बिघडू द्यावा ? असे आपण वागावे. काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये, उद्या काय होणार याची काळजी करू नये, आज मात्र आनंदात आपले कर्तव्य करावे आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे. यातच सर्व आले.



२३९. भगवंताची प्राप्ती व्हावी असे वाटणे हे जन्माचे सार्थक आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२५ ऑगस्ट, २०१४

गणेश पूजा

या  संकेतस्थळाच्या वाचकांसाठी  ' गणेश पूजा '  ध्वनिफीत खालील  लिंक वरून उतरून घ्यावी 


१) पुजा सहित्य आणि मांडणी - ( वेळ ३ मिनीटे )
 http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xOTY4NjI0N190SE44Ml8xZjAz/01%20-%20Puja%20Sahitya%20ani%20Mandani%20-%20Mp3Marathi.Com.mp3 
२) प्राण प्रतिष्ठापना - ( वेळ २७ मिनीटे)
http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xOTY4NDA1N19tZEw3Q19lOGEx/02%20-%20Pran%20Pratishthapana%20-%20Mp3Marathi.Com.mp3


३) षोडशोपचार पूजा - भाग १ ( १५ मिनीटे)
http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xOTY4MzgwOV94MlpUSl9iOWNi/03%20-%20Shodashopchar%20Puja%20-%20Part%201%20-%20Mp3Marathi.Com.mp3


४) षोडशोपचार पूजा - भाग २ ( २५ मिनीटे)
http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xOTY4MzEyM19wUktRc182YmJj/05%20-%20Shodashopchar%20Puja%20-%20Part%202%20-%20Mp3Marathi.Com.mp3


५) उत्तर पूजा - ( विसर्जना पुर्वीची ) - ( वेळ ६ मिनीटे )
http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xOTY3OTEyMl9BYmdla184YmJl/11%20-%20Uttar%20Puja%20-%20Visarjana%20Purvichi%20Puja%20-%20Mp3Marathi.Com(1).mp3

http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xOTY3OTQ0MV91SEpmdl85ZTMw/Shrimant%20Dagdusheth%20Ganpati%20Aarti%20-%20Mp3Marathi.Com.mp3


७) सिध्दीविनायक, प्रभादेवी मंदीरातील - आरती ( वेळ २१ मिनीटे )
http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xNzgyNjM2OV90bjRBbV8xN2Qy/Siddhivinayak_Temple_Aarti.mp3

८) अथर्वशीर्ष पाठ ( वेळ - ६ मिनीटे १६ सेकंद )
http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xOTY4Mzg2MV8yZFRXc18wN2Vj/04%20-%20Atharvashirsha%20paath%20-%20Mp3Marathi.Com.mp3

९) गणपतीची आरती -
http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xOTY4MjI1M192SWFjc19mYTEw/06%20-%20Aarti%20-%20Sukhakarta%20Dukhaharta%20-%20Mp3Marathi.Com.mp3

१०) मंत्र पुष्पांजली
http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xOTY3OTI1NV8zTkVVVV80N2Rm/10%20-%20Mantra%20Pushpanjali%20-%20Mp3Marathi.Com.mp3

११) गणेश गायत्री मंत्र
http://amolkelkar.opendrive.com/files/MV8xNjM0ODg2MF9xZDJEQl82M2M3/24Ganesh-Gayathri.mp3


अमोल केळकर 



पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या