१० नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १० नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- 

१० नोव्हेंबर २०१४

शेजार असतां रामाचा । दुःखाची, काळजीची, काय वार्ता ॥

  


ज्याला म्हणावे मी 'माझे' । त्यावर माझी सत्ता न गाजे ॥
स्वतःचा नाही भरंवसा हें अनुभवास येई । परि वियोगाचे दुःख अनिवार होई ॥
तुम्ही विचारी, सुज्ञ आहांत । थोडासा करावा विचार ॥
सर्व सत्ता रामरायाचे हाती । तेथे मानवाची काय गति ? ॥
विचाराने दुःख सारावें । सर्वांचे समाधान राखावें ॥
सर्व केले रामार्पण । हा नव्हे शब्दांचा खेळ जाण ॥
अर्पण केल्याची खूण । न लागावी काळजी तळमळ जाण ॥
परमात्म्याचे रक्षण, कोणतेही स्थळी, कोणतेही काळी, असते हा भरंवसा ।
याचा अनुभव प्रत्येकास आहे खासा ॥
ठेवा रामावर पूर्ण विश्वास । न करावे उपासतापास ॥
उपास हा शब्द अलिकडील जाण । त्याच्यापुढे एक पाऊल टाकून ।
उपासनेत राहावे आपण । तेथे आहे निर्धास्तपण ।
उपासनापुढील ठाण । उपासना मुख्य जाण ॥
उपासनेंत राहावे आपण । हेंच रामाचें सान्निध्य जाण ॥
शेजार असतां रामाचा । दुःखाची, काळजीची काय वार्ता ॥
जैसा सूर्य प्रकाशतां । काळोखाचा नाश होईल तत्त्वतां ॥
एवढें आता ऐकावे माझे । राम उतरील सर्व ओझें ॥
स्मरतां रामाला । तो देईल समाधानाला ॥
देवाकडे करावी विनंति । देहदुःख अति फार । होई रामाचा विसर ।
आता द्या नामाचे अखंड स्मरण । देवा, देह केला तुला अर्पण ॥
परमात्मा दयाळू फार । आपलें हित करील हा ठेवावा निर्धार ॥
मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा विश्वास । न सोडावा आता धीर ।
सदा घ्या भगवंताचे नाम । जेणें कृपा करील रघुनंदन ॥
राम कृपाळू दीनांचा नाथ । तो सर्व कांही पाहात ॥
आपले प्रारब्धाने आलेले कर्म । ते त्यास न विसरतां करावे अर्पण ।
सुखाने घ्या नामस्मरण । कृपा करील रघुनंदन ॥
हा करावा उपाय । तोच समाधानाला नेईल खास ॥

मागील गोष्टींची आठवण । पुढील गोष्टींचे चिंतन । हेंच दुःखाला खरे कारण ॥
स्वार्थ म्हणजेच आपलेपण । म्हणून माझा मीच दुःखाला कारण ॥
आपण आपलेपणानें वागत गेलें । सुख, दुःख, चिंता, शोक यांचे मालक व्हावे लागलें ॥
सुखदुःखांत चित्ताची न राहे स्थिरता । तीच त्याची खरी अवस्था ॥
सुखदुःख परिस्थितीवर नसते । आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते ॥
दुःखाचें मूळ कारण । जगत् सत्य मानलें आपण ॥



३१५. जोपर्यंत 'देही मी' ही भावना । तोपर्यंत दुःखाच्या यातना ॥
सारांश, देहातादात्मक । याचेंच नांव दुःख ॥




( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

९ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ९ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ९ नोव्हेंबर 
लोकांचे मन दुखविणे ही हिंसाच !


ही जी सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे तिची नक्कल म्हणजे चित्रकला होय. चित्रकाराने रंगविलेले चित्र खोटे असून जे खर्यासारखे भासते, त्याला उत्तम चित्र असे म्हणतात. भगवंताचे होऊन जी कला येईल ती खरी. भगवंताने आपल्याकडून जे करवून घेतले ती कला समजावी. जे कर्म भगवंताकडे न्यायला मदत करते ती कलाच होय. या कलेमध्ये मनाला गुंतविणे आणि उद्योगात राहणे ही भगवत्सेवाच आहे. मन म्हणजे कल्पनांचे मूर्त स्वरूप. मन चंचल आहे तोपर्यंत देहालासुद्धा स्वस्थता नाही. मनाची चलबिचल होते म्हणूनच अभ्यास करायला पाहिजे. मनाला शिक्षण देणे याचे नाव अभ्यास करणे. मनाची विश्रांती हीच खरी विश्रांती होय. सृष्टीमध्ये सर्व ठिकाणी वैचित्र्य आढळते. प्राण्यांच्या कितीतरी जाती आहेत. माणसेसुद्धा एकासारखी एक कुठे असतात ? पण सर्वांमध्ये भगवंत मात्र सारखाच ओवलेला आहे. जगामध्ये प्राणी एकमेकाला मारक असूनदेखील कसे जगतात, हे पाहिले म्हणजे आश्चर्य वाटते. जगामध्ये माणूस आणि वाघ दोघेही राहतात. परंतु दोघांनाही एकमेकांची भिती असते, म्हणून एक दुसर्याला सहसा मारीत नाही. ज्याच्यामुळे दुसर्याच्या हिताचा घात होतो, अशी कृती करणे म्हणजे हिंसेचे लक्षण समजावे. भगवंताच्या आड येणार्‍या वस्तूंची हिंसा करणे ही अहिंसाच होय. पण आपल्या स्वार्थाकरिता आणि बडेजावाकरिता लोकांचे मन दुखविणे, ही हिंसाच समजावी. दुसर्याचे मन दुखविणे म्हणजे भगवंताचे मन दुखविणे होय. आपल्या मनात आलेली गोष्ट आपल्या हातूनसुद्धा होत नाही, तर मग इतरांनी आपल्या मनासारखे वागावे असे म्हणणे हे काही बरोबर नाही. आपल्याकडे बायका चातुर्मासामध्ये नियम करतात. उदाहरणार्थ, रोज एक वात लावायची, उजव्या हाताने पाणी प्यायचे, वगैरे. वास्तविक हे नियम कसले ! तुम्ही एक वात लावली काय आणि दोन वाती लावल्या काय, शेवटी दिवा लावावा लागतोच ! त्यापेक्षा, ' कुणाचे अंतःकरण दुखविणार नाही' असा नियम करावा. प्रथम चार महिने करावा आणि मग वर्षभर पाळावा आणि नंतर जन्मभर ठेवावा. काही बायका चातुर्मासात मीठ सोडतात. असे अळणी खाणारी बाई जेवायला बसली असताना मीठ वाढायला आलेल्या बाईला दुरूनच ' नको नको ' म्हणते; कारण न जाणो, चुकून मीठ किंवा मिठाचा पदार्थ पानात पडायचा ! हे जसे ती सांभाळते, त्याचप्रमाणे आपण कुणाचे अंतःकरण न दुखविण्याचा नियम केला की, आपण किती बेताने बोलू आणि कोणी आले तर आपण किती काळजीपूर्वक वागू ! भगवंत चोहोकडे आहे असे आपण म्हणतो, पण त्याप्रमाणे वागत नाही, याला काय करावे ? भगवंताचे होऊन त्याच्या नामात राहणे हाच एक उत्तम मार्ग आहे.

 ३१४. अंतःकरण न दुखवता बोलणे, हे वाचेचे तप आहे असे म्हणतात. 

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

८ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ८ नोव्हेंबर २०१४

८ नोव्हेंबर

कर्तव्य करावे, मग व्हायचे ते होऊ द्यावे. 

 



जगामध्ये आणि जीवनामध्ये दुःख आहे यात शंका नाही. पण त्यापैकी पंचवीस टक्के दुःखच बाहेरून येते. युद्ध, महागाई, दुष्काळ, चोर्‍यामार्‍या, दारिद्र्य इत्यादिंचे दुःख बाहेरून येते. पण पंचाहत्तर टक्के आपले दुःख आपल्यामधूनच निर्माण होत असते. आपले शरीर, मन आणि हृदयस्थ भगवंत मिळून आपण बनतो. भगवंत आनंदरूप असल्याने तो दुःख निर्माण करू शकणार नाही. देहाचा स्वभाव झिजणे, क्षीण होणे, असमर्थ होत जाणे, हा असल्याने तो आपल्या मार्गाने जात असतो. तो दुःख निर्माण करू शकत नाही. जे जडच आहे ते सुखही देऊ शकत नाही आणि दुःखही निर्माण करू शकत नाही. उरले आपले मन. कुठेतरी चिकटणे हा मनाचा स्वभावधर्म असल्याने ज्याला ते चिकटते त्याचे गुणधर्म अंगिकारते. भक्ताचे मन भगवंताला चिकटते म्हणून त्याच्या मनातून दुःख निर्माण होऊच शकत नाही. ज्याचे मन देहाला चिकटते, त्याचे मन दुःख निर्माण करीत असले पाहिजे. भगवंताहून वेगळेपण आणि देहाशी एकपण, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देह लहान आहे, आकुंचित आहे, तात्पुरता आहे, सान्त आहे, तोच मी आहे अशा घट्ट भावनेने जिकडेतिकडे दोनपण दिसू लागते आणि त्यातून भयरूपी समंध साकार होतो आणि तो जीवाला छळतो. भगवंताच्या स्मरणात आनंदाची मस्ती भोगायला जन्मलेला माणूस, भयापोटी चिंता आणि चिंतेपायी दुःख निर्माण करतो. भगवंताने आपल्या संकल्पाने जग निर्मिले. त्यात घडणार्‍या घटनांचा आराखडा त्या संकल्पात असतो. कालचक्र जसे फिरते तशा घटना आकार घेत जातात. त्यात भगवंताचा हात असतो. त्याचा विसर पडला की आपण गोंधळून जातो, आणि आपली कल्पना भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे, कारण भगवंताने स्वतःतूनच हे जग निर्माण केले. आपण अंतर्यामी त्याच्या नामात गुंतून राहिलो, तर त्याचे साहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआप येईल. भगवंत नामस्वरूप आहे, म्हणून त्याच्या नामात राहाणार्‍याला देहाचे काय होईल याचे भय उरत नाही.
आपल्या प्रयत्‍नाने जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या करा. त्या होतच असतात, प्रयत्‍नाने फक्त आपला हात लागतो. आपल्या मनासारखे व्हावे असे म्हणणे म्हणजे ज्या होणार्‍या गोष्टी आहेत त्या मी बदलाव्या, असे म्हणण्यासारखे आहे. त्या कधी बदलल्या जात नाहीत, आणि आपल्याला आनंद कधी मिळत नाही. म्हणून म्हणतो, रामावर निष्ठा ठेवावी. माझे कर्तव्य मी केले आहे ना ? ते करीत असताना मी अनीति, अधर्माने वागलो नाही ना ? आता जे व्हायचे ते होऊ दे; कुठे काळजी करा ! ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना, तोच मनुष्य सुखी होईल.


३१३. देहाचा लगाम भगवंताच्या हातात द्यावा आणि नामस्मरणात मजेत दिवस घालवावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

७ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ७ नोव्हेंबर २०१४


७ नोव्हेंबर

साधन निष्कामबुद्धीने आणि सावधानपणे करावे. 

 



भगवंतापासून जो निराळा राहात नाही तो मुक्तच. 'मी भगवंताचा' म्हटले की तिथे बद्धपणा संपला. 'मी' नसून 'तो' आहे हे जाणणे म्हणजे मुक्तता प्राप्त करून घेणे. देहात असून देहातीत राहतो तो मुक्त. 'राम कर्ता' हे जाणतो तो मुक्त. 'माझे माझे' म्हणून आपण बद्धावस्था लावून घेतो, बद्धाचे आवरण काढून टाकले की आपण मुक्तच आहोत. माझ्या मनावर कशाचाही परिणाम झाला नाही आणि समाधान कायम राहिले, की मुक्तावस्था. 'माझ्यासारखा पापी मीच' असे आपण मनानेच ठरवतो आणि दुःख करीत बसतो. मी एक भगवंताचा झालो, आता नाही कोणाचा, असे म्हणावे, आणि जगात नटासारखे वागावे. वास्तविक, आपण मायेकडून पछाडले गेलो आहोत. भगवंताजवळ माया ही छायेप्रमाणे आहे. आपण मायेचा नियंता जो भगवंत, त्याचे होऊन राहावे; मग माया खरी नाही हे समजते. मायेला ओळखणे म्हणजे विवेक, आणि भगवंत ठेवील त्यात समाधान मानणे, हे वैराग्य.
पापपुण्य हे मनाचे धर्म आहेत, मी आता नाम घेतो, माझी सर्व पापे त्यामुळे नाहीशी झाली आहेत अशी दृढ भावना झाली की तो निष्पाप झाला हे समजावे. चारचौघे करतात म्हणून साधन करून नाही चालणार. साधनात दृढ भाव पाहिजे. साधन करायचे ते योग्य मार्गाने झाले पाहिजे. ते अगदी निष्काम असावे. बुद्धिभेद करणारे लोक जगात नेहमी असणारच; पण साधकाने आपला बुद्धिभेद होत नाही इकडे जागृत असावे. काही पुरुष किंवा स्त्रिया यांना आपला स्वतःचा असा काही प्रपंच राहिलेला नसतो, तरीही हे लोक उगीचच जगाचे दोष काढीत बसतात; दुसर्‍यांच्या घरी जाऊन उठाठेव करतात; हे फार मोठे पाप आहे. साधकाने ते कटाक्षाने टाळावे. ज्या लोकांना आपल्यामध्ये दोष आहेत हे कळतच नाही, ते लोक अगदी खालचे समजावेत; ज्यांना आपला दोष कळतो ते दुसर्‍या प्रतीचे समजावेत; आपण प्रय‍त्न करूनसुद्धा भगवंताच्या आड येणारा दोष जात नाही म्हणून तळमळ असणारे लोक हे सर्वांत चांगले; साधकाने तसे बनले पाहिजे. परमार्थमार्गामध्ये अर्ध्यापर्यंत गेल्यावर, मग पुढे जाणारे साधक फार थोडे असतात. खरे म्हटले म्हणजे साधन आणि वाचन असले की साधक कधी मागे पडायचा नाही. ब्रह्मचारी साधकाने प्रपंचातल्या उठाठेवी करू नयेत, कारण तशाने प्रपंचाचे प्रेम त्याला लागेल. त्याने प्रपंचापासून चार पावले दूर रहावे, नाही तर तोच हवा असे वाटू लागते. जगात किती पोथ्या आणि किती मते आहेत ! एवढे पाहायला वेळ कुठे आहे ? म्हणून साधकाने गीता, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, किंवा दासबोध, असा एक ग्रंथ प्रमाण मानून त्याप्रमाणे साधन करावे.


३१२. मुंगी डोंगरावर चढण्याचा प्रयत्‍न करते आणि कालांतराने का होईना पण
वर पोहोचल्याशिवाय राहात नाही, हे ध्यानात घेऊन आपण प्रयत्‍नाला लागू या.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

६ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ६ नोव्हेंबर २०१४

६ नोव्हेंबर

भगवंताची कृपा. 

 



खरोखर, भगवंताच्या कृपेशिवाय बाकी गोष्टी असून वा नसून सारख्याच आहेत. एखादी मुलगी लग्न होऊन सासरी गेली; तिथे सासू, सासरा, दीर नणंद, जावा वगैरे सर्व लोकांशी तिचे चांगले आहे पण नवर्याशी मात्र पटत नाही, तर तिला खरे सुख समाधान मिळणार नाही. परंतु, समजा, नवर्याशी चांगले आहे पण इतरांशी तितकेसे ठीक नाही, तर तिचे अडणार नाही. तसेच एकाद्याच्या आजारात पैसा, डॉक्टर, औषधे, माणसांची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत, पण त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर सर्व व्यर्थ आहे. याच्या उलट, भगवंताची कृपा आहे, पण इतर गोष्टींचा अभाव आहे, तरी काम भागते. म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे; आणि ती मिळविण्याकरिता, त्याचे स्मरण हाच एक मार्ग आहे. समजा, एखादी कुरूप मुलगी आहे. पुष्कळ ठिकाणी तिला दाखविली पण ती नापसंत झाली; नंतर एकाने तिला पाहिली आणि एकदम पसंत आहे म्हणून सांगितले. ती पसंत झाली की सौभाग्याचे सर्व गुण जसे तिच्यामध्ये येतात, त्याप्रमाणे ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याचे काम पूर्ण झाले; मग त्याने किती पाप आणि पुण्य केले आहे हे कोण पाहतो !
भगवंताची कृपा सर्वांवर, अर्थात् आपल्यावरही आहेच. आपल्यावर कृपा आहे अशी आपली खात्री झाली की ती प्रकट होते. कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच. ' मी पिईन तर आईचेच दूध पिईन ' असे म्हणून वासरू गाईला ढुसण्या मारते आणि गाय त्याला पाजते; त्याप्रमाणे आपण भगवंताशी अनन्यतेने वागले आणि त्याचे नामच मागितले तर तो कृपा करतोच करतो. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून, असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय. 'भगवंता ! तू माझ्यावर कृपा कर,' असे सांगणे म्हणजे 'मी कृपेला लायक नाही त्या माझ्यावर तू कृपा कर' असे म्हणण्यासारखेच आहे. जो लायक नाही त्याच्यावर कृपा कशी होईल ? ज्याप्रमाणे डोंगरावर आपण शब्द काढला तर त्याला उत्तर म्हणून आपलाच शब्द प्रतिध्वनिरूपाने येतो, त्याप्रमाणे भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी त्याच्या कृपारूपाने येतो. भगवंताच्या कृपेनेच त्याचे नाम आपल्या मुखात येते. भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असे म्हणावे. ती काम करीत असतेच, आपणच आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये. पुष्कळ केलेले देखील शंकेने व्यर्थ जाते. आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरले की आपली वृत्ती निःशंक होते. जे भगवंताचे आहेत ते अहेतुक नाम घेतात.


३११. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही काळात आणि वाटेल
त्या अवस्थेत घेण्यासारखे एक भगवंताचे नामच तेवढे आहे.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

५ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ५ नोव्हेंबर २०१४

५ नोव्हेंबर

भगवंत हाच एकमेव आधार वाटला पाहिजे.




एक भगवंत सत्य आहे. आपले कुठे चुकत असेल तर ते हेच की, आम्ही प्रपंच सत्य मानतो. फणस कापायला ज्याप्रमाणे हाताला तेल लावावे लागते त्याप्रमाणे, राजकारण घ्या, किंवा प्रपंच घ्या, हरिप्रेमाचे तेल आधी हाताला लावावे. समर्थांनी 'मुख्य हरिकथानिरूपण' असे सांगितले; म्हणजे बाकीच्या गोष्टी आपोआप मागे येतील. आम्ही कर्तेपण मिरवू पाहतो इथेच सर्व बिघडते. हरीचे अधिष्ठान ठेवण्याआधी आम्ही कर्तेपणाचेच अधिष्ठान ठेवतो. लग्नाच्या आधी देवाला नमस्कार करतो, पण पुढे प्रपंचात देवाला विसरतो, हे चुकते. नुसते विषय घातक नाहीत; त्यांच्यात आम्ही आपल्या आवडीने जीव घालतो हे घातक आहे, विषयाच्या ताब्यात जाणे हे घातुक आहे. पण पायाच जर चांगला नाही घातला तर देऊळ कसे टिकावे ?
अमुक एका कार्याला कुणाची मदत नको म्हटले, तर आपण जे म्हणू ते व्हायला पाहिजे. ते होत नाही. तेव्हा मदत कोणाची तरी घ्यायचीच, तर मग आपल्यासारख्या बुडत्याचीच घेऊन काय उपयोग ? भगवंताचीच घेतली पाहिजे. आम्ही जर भगवंताजवळ विषय मागितले तर त्याचे फळही घ्यावे लागेल. दुर्योधन आणि अर्जुन भगवंताची मदत मागायला आले. एवढे सैन्य सोडले आणि अर्जुनाने भगवंताला मागितले. दुर्योधनाने जे मागितले तेच नाही का आम्ही आज प्रपंचात मागत ? आमचे कार्याकडे लक्षच नसते, सर्व लौकिकाकडेच असते. 'मी दुसर्‍या कशाचाही नाही' असे म्हटले म्हणजे भगवंताला अनन्य शरण होता येते. 'परमात्मा हवा' ही नाही आम्ही जाणीव करून घेत, 'जग हवे' असे म्हणतो; आणि तिकडे, सर्व जग मला नावे ठेवते असेही म्हणतो ! मी म्हणतो, जगाला नावे ठेवू द्या, पण राम काय म्हणतो इकडे पाहणे जरूर आहे. आपण परमेश्वराचे परमेश्वरालाच दिले तर कुठे बिघडले ? जो दिसत नाही, भासत नाही, त्याचे हे सर्व आहे असे म्हणण्यात कुठे बिघडते ? ते म्हणण्यात जे समाधान मिळते ते नाही आम्हाला समजत. खरोखर परमात्मा साक्षात कल्पवृक्ष आहे. आपण नेहमी चिंता वाहतो, म्हणून तो आपल्याला चिंताच देतो. आपण जर त्याच्याकडे आनंद मागितला तर तो आपल्याला आनंदच देईल. भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचे महत्त्व नाही.
राम हा त्रैलोक्याचा स्वामी आहे, आपण त्याचे सेवक आहोत. पण आम्ही नोकरी दुसर्‍याची करतो आणि पगार मात्र रामाजवळ मागतो ! तसे करू नये. खरे-खुरेच रामाचे दास व्हावे. ज्ञान, योग, प्राणायाम वगैरे भगवंतावाचून येऊ शकेल, पण भक्ति मात्र भगवंतावाचून येणार नाही. भक्ति ही भगवंताची देणगी आहे.

३१०. प्रपंच करणे हा आपण स्वार्थ म्हणतो. पण तो खरा स्वार्थ नाही;
खरा स्वार्थ भगवंताचे होण्यात आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

४ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ४ नोव्हेंबर २०१४

४ नोव्हेंबर

भगवंत सगुणात आले म्हणजे काय ? 

 



एक गृहस्थ मला भेटले. ते म्हणाले, "हिंदू धर्मासारखा धर्म नाही; पण देव सगुणात आले हे नाही मला कबूल. म्हणे निरनिराळ्या उपासना सांगितल्या ! देव जर निर्गुण निराकार, तर राम, कृष्ण, शिव, दत्त अशा या एवढ्या निरनिराळ्या उपासना कशाला ?" पुढे एक दिवस त्यांच्याविषयी एका गृहस्थाने त्यांच्या घरी चौकशी केली, तेव्हां प्रत्येकजण निरनिराळे नाव घेऊन सांगू लागले. कोणी 'दादा' घरी नाहीत असे म्हणाले, तर कोणी 'दामोदर' घरी नाही म्हणाले, कोणी 'रावसाहेब' नाहीत म्हणाले. हे सर्व जरी म्हटले तरी त्या योगे भेटणारा मनुष्य ज्याप्रमाणे तो गृहस्थ एकच, त्याप्रमाणे हे भगवंताच्या निर्गुणाचे सगुणात आले. भगवंत सगुणामध्ये आला की, जे नियम आपल्याला लागू असतात तेच नियम त्यालाही लागू होतात. सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो म्हणतो, त्याला त्याचे मर्मच नाही कळले. खरी तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्याला नाही ते कळत. आपले वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, आणि त्यावरची भाष्ये यांनी निर्गुण स्वरूपाची रूपरेषा काढून दिली. संतांनी तिच्यामध्ये रंग भरला आणि भगवंताचे सुंदर चित्र तयार केले; ही सगुणभक्ति होय. सगुणोपासनेवाचून मोक्ष मिळणार नाही.
उपासना याचा अर्थ अगदी निकट असणे, उपास्याचा गुण अंगी आणणे. तुळशीदासांनी रामोपासना अशी केली की ते स्वतः रामरूप बनले. तुळशीदासांचे रामायण ऐकत असता मनुष्य तल्लीन होऊन जातो. रामरूप होण्यासाठी रामासारखे निःस्वार्थी बनले पाहिजे. रामाने 'जग माझ्याकरिता आहे' असे न म्हणता, 'मी जगाकरिता आहे' असे म्हटले. हा खरा परमार्थ. एकपत्‍नीव्रत, सत्यभाषण हे रामाचे दोन प्रमुख गुण होते. इतर अवतारातही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, परंतु सर्वांत रामचरित्र प्रापंचिकांना अत्यंत आदर्शरूप आहे. रामचरित्र सर्वांना सर्वकाळी आदरणीय आणि अनुकरणीय होय. रामचरित्र वाचताना, सांगताना अथवा ऐकताना, आपण रामप्रेमात स्वतःला विसरून जाणे ही फार उच्च अवस्था होय.
भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. भगवंत हवासा वाटणे किंवा त्याची तळमळ उत्पन्न करणे हे भगवंताच्या हाती नाही, ते संतांच्या हाती आहे; म्हणून सत्संगतीने ते साधते. 'साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा' असे आपण म्हणतो. संत दसरा आणतात, मग दिवाळी आपोआप मागे येते. आमची वृत्ती विषयाकार झालेली आहे, ती काढून संत सन्मार्गाला लावतात, तोच खरा मुहूर्त की ज्या दिवशी आमची वृत्ती भगवंताकडे होऊ लागली.

३०९. भगवंताच्या प्रेमामुळे ज्याला समाधान मिळाले तोच खरा भाग्यवान.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

३ नोव्हेंबर, २०१४

कार्तिकी एकादशी

आज कार्तिकी एकादशी , पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाने आजचा दिवस सार्थकी घालवू या 





अमोल केळकर 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३ नोव्हेंबर २०१४

३ नोव्हेंबर

विषय मनात आले की भगवंताची आठवण करावी. 

 



' भगवंता, माझा भोग बरा कर, ' असे आपण जर त्याला म्हटले नाही, तर त्याच्या स्मरणाची जाणीव आपल्याला होईल. भगवंताच्या स्मरणात आनंद आहे. आनंदाची जाणीव झाली की दुःखाची जाणीव कमी होईल. अनुसंधानाने जे काय साधायचे ते हेच. भगवंताचे अनुसंधान सोडू नये. घरादाराला रात्रीच्या वेळी आपण पहारा ठेवतो, चोर येतील त्या वेळेस सावध राहतो; तसेच संधीच्या वेळेस भगवंतापासून दूर होऊ नये म्हणजे झाले. वेळेला सावध राहणे ज्याला जमत नसेल त्याने अखंड सावधान राहावे. विषय मनात आले की तिथे भगवंताची आठवण ठेवून द्यावी. 'अंते मतिः सा गतिः' अशी आपल्यात एक म्हण आहे. जन्मात जे केले नाही ते मृत्युच्या वेळेला कसे आठवता येईल ? एवढ्याकरिता भगवंताच्या अखंड स्मरणात राहावे. भगवंताचे नाम हे औषध समजावे; भगवंताची प्राप्ती हे त्याचे फल. औषध मात्र थेंब थेंब आणि सतत पोटात गेले पाहिजे. नामस्मरण जर शेवटपर्यंत चालू राहिले तर तो 'योगच' आहे; आणि त्या 'एकाशी' योग साधणारा तो योगी समजावा.
एकच ठिणगी कापसाचा नाश करायला समर्थ असते, त्याप्रमाणे भगवंताचे नाम सर्व पापांचा नाश करायला समर्थ असते. आपण ते आवडीने, तळमळीने, भावाने घेत नाही, त्यात नामाचा काय दोष ? नामाची भावना वाढविणे हीच उपासना. एखाद्या आईला सांगितले की, 'तू मुलाला जवळ ठेव पण त्याच्यावर प्रेम करू नकोस,' तर ते जसे शक्य नाही, त्याप्रमाणे नाम घेणार्‍याला सत्कर्म टाळू म्हटले तरी टाळता येणार नाही. एकवेळ भजनाला देहबुद्धीची झळ लागेल, पण नामाला ती नाही, हे लक्षात ठेवावे. मरणाच्या मागे स्मरणाचा ससेमिरा चालू ठेवावा, म्हणजे मरणाची भिती नाहीशी होईल. खरोखर, भगवंताच्या नामाची तळमळ मनापासून लागायला हवी. तेरा कोटी जपामध्ये अंतःकरणाची तळमळ ही जास्त उपयोगी पडते, यात शंकाच नाही. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण होऊ न देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे, यांतच खरे समाधान, शांति आणि सुख आहे. खरे सांगतो मी, मनुष्याने जन्माला येऊन एकच करावे; आपण नामात राहावे आणि दुसर्‍याला नामात लावावे. संसारात न्यून पडू देऊ नये, पण भगवंताला विसरू नये, भगवंताच्या स्मरणात स्वतःस विसरावे. सर्वांभूती नम्र होणे हाच अभिमान घालविण्याचा उपाय होय. इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते हाच या युगाचा महिमा आहे.


३०८. मायेने आपल्यावर विषयास्त्र सोडले की आपण त्यावर भगवंताच्या
नामाचे अस्त्र सोडावे, म्हणजे विषय आपोआप नाहीसा होईल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२ नोव्हेंबर, २०१४

’ धनु’ राशीस साडेसाती

दिनांक २ नोव्हेंबर रोजी शनी वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे. कन्या राशीची साडेसाती संपून’ धनु’ राशीस साडेसाती लागतआहे.तुळेचीअडीचवर्ष आणि वृश्चिकेची५ वर्ष बाकीआहे


साडेसातीचे प्रारंभ, मध्य आणि अंत यांची राशीनुसार शुभाशुभ विभागणी पुढीलप्रमाणे


राशी
पूर्वार्ध
मध्य
उत्तरार्ध
मेष
सामान्य
अशुभ
सामान्य
वृषभ
अशुभ
सामान्य
सामान्य
मिथुन
सामान्य
सामान्य
अशुभ
कर्क
सामान्य
अशुभ
अशुभ
 
सिंह
अशुभ
अशुभ
सामान्य
कन्या
अशुभ
सामान्य
सामान्य
तुळ
सामान्य
सामान्य
अशुभ
वृश्चिक
सामान्य
अशुभ
सामान्य

 
धनु
अशुभ
सामान्य
सामान्य
मकर
सामान्य
सामान्य
सामान्य
कुंभ
सामान्य
सामान्य
सामान्य
मीन
सामान्य
सामान्य
अशुभ


संदर्भ : शनिमहिमा - वसुधा वाघ



श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २ नोव्हेंबर २०१४

२ नोव्हेंबर


आसक्ति भगवंताची असावी. 

 




कोणत्याही धर्माची आपण कधीही निंदा करू नये. प्रत्येक धर्मात निरनिराळे विधी लावलेले असतात. धर्माला विधींची फार जरूरी असते. विषयसुद्धा आम्ही विधीने भोगतो. आम्ही गंगेवर स्नानाला जातो असे म्हणतो. खरोखर, मनाने आपण गंगेवर गेलो तरी चालू शकते. तेव्हा गंगेला स्नानाला जाऊन अपवित्र मनाने परत आलो तर त्या स्नानाचा काय उपयोग ? नाम घेऊन विषयाचा धंदा केला तर काय उपयोग ? कर्माची बंधने तुटावीत म्हणून शास्त्राची पाळावी लागतात. देवाला पैसा देण्याचा हेतू हाच की, माझा लोभ कमी व्हावा. खरे म्हणजे, आपल्याला कर्म केल्याशिवाय करमतच नाही. पण आपण फळाची आशा उगीचच करीत बसतो; इथेच आपले चुकते. काहीही न करता राहणे मनुष्याला शक्य नसते. उदाहरणार्थ, एकाला सांगितले की, हातपाय न हलवता, काही न करता, स्वस्थ रहा, तर ती त्याला शिक्षाच होईल. जर काहीतरी करणे जरूरच आहे, तर उचितच गोष्ट करावी. जी गोष्ट बंधनाला कारण होते ती विपरीतच असते. कर्तेपणाच्या अभिमानाने केलेले कर्म हे असे विपरीत कर्म होय. ज्ञानावस्थेत झालेले कर्म पूर्णच असते. त्या अगोदरचे कर्म पूर्ण होत नाही. धर्म तरी काय सांगतो ? तर प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे. पण कर्तव्य तरी कशासाठी करायचे ? तर ते भगवंतासाठी होय. भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून कर्तव्य करावे, तरच मानव सुखी होईल.
सुधारणांनी सोई केल्या, म्हणजे देहसुख वाढविले. त्याने परावलंबित्व मात्र आले; आणि परावलंबनात खरे सुख नाही. लौकिक विद्या ही खरी विद्या नव्हे, अविद्याच ती. विद्येने एक समाधान तरी मिळाले पाहिजे, किंवा हमखास पैसा तरी मिळाला पाहिजे. या दोन्ही गोष्टी तिने साधत नाहीत. विद्वानालासुद्धा 'मला नोकरी द्या' म्हणून अर्ज करावा लागतो; ,म्हणजे ती विद्या स्वयंप्रकाशी नाही. जीवनाला हवा, पाणी, अन्न या वस्तू आवश्यकच आहेत. त्या कशाही मिळवाव्यात. पण बाकीच्या वस्तू काही आवडीखातर, तर काही लौकिकात जरूर म्हणून पाहिजेत. पैसा असेल तर दैन्यवाणे राहू नये, पण त्यामध्ये आसक्ति असू नये. आसक्ति भगवंताच्या ठिकाणी असावी, आणि इतर प्रापंचिक वस्तूंबद्दल उदास असावे. ' कुणी शत्रु नाही आणि मित्र नाही ' अशी ज्याची खरी वृत्ती तो सुखी. जो कशावरही अवलंबून नाही, ज्याच्या आड काही येत नाही, तो मुक्त समजावा. देहाला कुठेही लागले तरी आपल्याला जाणीव होते; त्याप्रमाणे मनाच्या सर्व वृत्तींमध्ये भगवंताचे स्मरण असणे हेच अनुसंधान होय. हीच विद्या होय, हाच खरा धर्म होय, आणि हेच परमार्थाचे सार होय.


३०७. ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे, तो प्रपंचच त्याचा परमार्थ होतो.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१ नोव्हेंबर, २०१४

शनी शिंगणापूर - दर्शन


शनी शिंगणापूर - दर्शन 

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १ नोव्हेंबर २०१४

१ नोव्हेंबर

गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे. 

 

 

गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. वेद हे देवाच्या निःश्वासातून निघाले, तर गीता ही त्याच्या मुखातून निघाली. गीतेचा विषय कोणता ? गीतेचा विषय म्हणजे मोहाचा नाश करण्याचे तत्त्वदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या विवेचन, हा होय. गीतेची सुरुवात म्हणजे अर्जुनाला मोह झाला; याचा अर्थ असा की, त्याला कर्तेपणाच्या अभिमानाने असमाधान उत्पन्न झाले, आणि त्यामुळे काय करावे आणि काय न करावे याची शंका त्याला उत्पन्न झाली. गीतेचा शेवट म्हणजे अर्जुनाचा मोह नाश पावला. याचा अर्थ असा की, कर्ता परमात्मा आहे हे निश्चित झाल्यामुळे जीवाच्या कर्माचे सुखदुःख संपले. खरोखर, गीतेचे रहस्य सांगावे ज्ञानेश्वरमहाराजांनीच. भारतीय युद्धामध्ये परमात्मा पीतांबर नेसून, अर्जुनाच्या रथावर बसून, रणांगणावर अर्जुनाला गीता सांगते झाले. पुढे हजारो वर्षांनी, भगवंत कपडे बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाणी होय. त्यात सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करावे. ' मी मागे आहे, तू पुढे चल.' हेच भगवंतांनी आपणा सर्वांना सांगितले आहे.
एखादी उपवर झालेली मुलगी जर आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली, तर तो समारंभ पाहून तिच्या मनामध्ये स्वतःच्या लग्नाचे आणि त्यातल्या सोहळ्याचे विचार येतील; त्याचप्रमाणे, आपण पोथी ऐकत असताना त्यामध्ये वर्णन केलेल्या अवस्था आपल्याला कशा येतील याचा विचार करावा. आत्मनिवेदन म्हणजे मी कोण आहे हे कळणे होय. प्रारब्धाच्या गतीने देहाला जी सुखदुःखे भोगावी लागतात, त्यांमध्ये आपण असल्यासारखे दिसावे, पण खरे मात्र नसावे. अशिलाचा खटला स्वतःचाच आहे असे समजून वकील कोर्टामध्ये भांडतो, पण खटल्याचा निकाल कसाही लागला तरी त्याचे सुखदुःख मानीत नाही, वरून मात्र अशिलाजवळ दुःख दाखवितो; अगदी असाच व्यवहार मी करतो. व्यवहार सत्य मानणार्या लोकांत वावरायचे असेल, तर बाहेरून त्यांच्यासारखे वागणे जरूर आहे. असे वागत असताना आपले भगवंताचे अनुसंधान चुकू न दिले की व्यवहार हा खेळ बनतो. कधी हार तर कधी जीत. खेळात आपण हरलो काय आणि जिंकलो काय, खर्या जीवनाच्या दृष्टीने सारखेच. तरी खेळ खेळतांना मात्र तो जिंकण्याचा चांगला प्रयत्न करावा. भगवंताचे नाम घेतले की ही युक्ती आपोआप साधते. म्हणून रात्रंदिवस माझ्या माणसांना मी सांगतो की, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका.



३०६. भगवंताच्या इच्छेने सर्व घडत आहे, ही भावना
ठेवून आपले कर्तव्य करणे, हे गीतेचे सार आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

३१ ऑक्टोबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३१ ऑक्टोंबर २०१४

३१ ऑक्टोबर

मनुष्यमात्र भगवंताच्या प्राप्तीसाठीच जन्माला आला आहे. 

 



भगवंत एकच ओळखतो : जो त्याची भक्ति करतो, तो त्याला आवडतो. तिथे जातीचे, वर्णाचे, बंधन नाही. आपण भाग्यवान कुणाला म्हणतो ? ज्याच्याजवळ पैसा अधिक असतो त्याला; पण तो काही खरा भाग्यवान नव्हे. ज्याला भगवंत भेटला तो खरा भाग्यवान. भगवंत आपल्याला भेटणे हे प्रत्येकाने जीवनातले मुख्य कार्य समजावे. पैसा भगवंताच्या आड येत नसतो; आपला अहंकार, मीपणा, हाच मुख्यतः भगवंताच्या आड येतो. 'मी सेवा करतो' असे जो म्हणतो त्याची खरी सेवाच होत नाही. कर्तेपणा आपल्याकडे घेतो तोपर्यंत सेवा नाही घडली. भगवंताची आठवण ठेवून जे जे कर्म आपण करतो ते ते पुण्यकर्म होते. भगवंत माझ्याजवळ आहे अशी श्रद्धा ठेवून वागा. श्रद्धेने जो करील त्याला फळ येईल खास. पण म्हणून श्रद्धेवांचून केलेले भजनपूजन वाया जाते असे नाही समजू. भगवंताची भक्ति उत्पन्न व्हावी म्हणूनच भजनपूजन करावे, मनाचे रंजन म्हणून करू नये. सत्कर्म करणारे पुष्कळ असतात, पण पुष्कळ वेळा त्यात स्वार्थबुद्धी असते. फळाची आशा न ठेवता सत्कर्म करणे हीच खरी भक्ति.
सर्वांभूती भगवद्‌भाव ठेवावा हेच परमार्थाचे खरे सार आहे. माझ्यामध्ये भगवंत आहे हे मी ओळखले म्हणजे इतरांच्या ठिकाणी त्याला पाहता येईल. 'मी कोण' हे न ओळखल्यामुळेच आपले सर्व चुकते आहे. माझ्यात भगवंत आहे हे दोन प्रकारे पाहता येते. सर्व चेतना त्याकडून मिळते हे एक. दुसरे म्हणजे, 'देह ठेवला' असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा ठेवणारा कोणी दुसरा असला पाहिजे; म्हणजे देह हा 'मी' नव्हे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, यांचा सा़क्षी कुणीतरी आहे हे खास. 'मी कोण' हे जाणायला सा़क्षीरूपाने वागावे. सर्व जगाला मी माझे म्हणतो, पण जो खरा माझा त्याला तसे म्हणत नाही. भगवंत माझ्यात आहे ही जाणीव उत्पन्न करून घ्यावी. अनुमानाने आणि अनुभवाने पाहिले तर भगवंत माझ्यात आहे हे खात्रीने पटेल. वर्षाचा आनंद पाडव्यापासून, आयुष्याचा आनंद वाढदिवसापासून, आणि दिवसाचा आनंद सकाळपासून सुरू होतो, म्हणून भगवंताच्या भक्तीला आपण त्याच्या नामाने सुरुवात करावी; म्हणजे त्यामुळे होणारा आनंद लगेच आपल्याला मिळेल; सुरुवात गोड आणि शेवटही गोडच होईल. आकाश हे जसे सर्वांना सारखे आहे, त्याचप्रमाणे मानवजन्माचे ध्येय हे सर्वांना सारखेच आणि एकच आहे. कोणत्याही जातीतला, धर्मातला किंवा देशातला मनुष्य असो, तो भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणजे परमार्थासाठीच जन्माला आला आहे.


३०५. आपण भगवंताला शरण गेलो, तर तो आपल्याला हातचा कधी सोडणार नाही.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या