६ डिसेंबर, २०१४

दिगंबरा दिगंबरा , श्रीपाद वल्लभ दिगंबरा


श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ६ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ६ डिसेंबर २०१४

निरासक्ति आणि शरणागति 

 



एखाद्याची सुरी असली, तिची लाकडी मूठ बदलून लोखंडाची केली; दुसर्‍याने चांदीची केली, कुणी सोन्याची केली; पण मारल्यानंतर परिणाम एकच ! तसा, प्रपंच चांगला असला, कसाही असला, तरी तो सुरीच आहे, त्याचा घात सगळीकडे सारखाच ! प्रपंचाची आसक्ति म्हणजे सुरीची धार आहे. म्हणून, आपला धंदा, नोकरी, सगळे उत्तम करावे,त्यात मागेपुढे पाहू नये; पण त्यासाठी मी आहे असे नाही समजू कधी. नोकरी ही सुखाकरिता नसून पोट भरण्यासाठी आहे अशा वृत्तीने जो ती करील त्याला तिची आसक्ति आणि अभिमान राहणार नाही. सावधगिरीने वागावे, भगवंताचे स्मरण ठेवावे, त्याचे नाम घ्यावे; बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर ठेवाव्या. यानेच समाधान मिळेल. भगवंताशिवाय समाधान मिळणे शक्य नाही. 'मी समाधान राखून चाललो' असे म्हणणारा, तो जगात धन्य आहे खरा ! ही धन्यता यायला भगवंताची अत्यंत आवश्यकता आहे. रामाच्या इच्छेने सर्व चालले आहे, राम कर्ता आहे, ही भावना ठेवून आपण प्रपंच करू या. प्रयत्‍न आटोकाट करावा, पण फळ देणारा भगवंत आहे ही भावना ठेवून समाधान टिकवावे.
भगवंताची प्राप्ति व्हायला दुसरे काही नको, शरणागती पाहिजे. मी उपाधिरहित बनणे ही शरणागती आहे. माझेपणाची जी उपाधी आहे ती नाहीशी करायची असेल तर साधन तसेच पाहिजे. इतके उपाधीरहित साधन नामाशिवाय दुसरे कोणतेही नाही. ते साधन तुम्ही करा. भगवंताच्या नामाचे प्रेम यायचे असेल तर अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण द्वेषाने, मत्सराने, अभिमानाने भरलेले असू नये. एकमेकांवर प्रेम करा, घरातून सुरुवात करा. मुलगा आपल्याला सुख देतो म्हणून नाही, पण माझे कर्तव्य म्हणून मी त्याच्यावर प्रेम करीन. निःस्वार्थीपणाने प्रेम करणे हाच परमार्थ आहे खरा. त्यासाठी, राम दाता आहे, पाठीराखा भगवंत आहे, ही जाणीव ठेवून तुम्ही रहा. ही जाणीव निर्माण करण्याकरिता भगवंताच्या नामाची खरी गरज आहे. मनाची शांति मिळवायला हाच मार्ग आहे. दैन्यवाणे कधीच नसावे. अगदी राजाचे वैभव तुम्ही भोगा, पण त्या वैभवाने मी सुखी आहे असे न म्हणता, मी रामाचा आहे म्हणून सुखी आहे ही भावना ठेवून वागा. वैभव आज आहे, उद्या नाही; वैभवावर विश्वास ठेवू नका. मी रामाचा आहे या भावनेत तुम्ही रहा. त्यासाठी रामाचे नाम तुम्ही घ्या, राम कल्याण करील हा माझा भरवसा तुम्ही ठेवा.


३४१. सुख कशात आहे ? सुख हे समजुतीमध्ये आहे, आणि भगवंताचे होणे ही समजूत तेवढीच खरी आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

५ डिसेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ५ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ५ डिसेंबर २०१४

नाम सहजपणे येणे याचे नाव 'अजपाजप.' 

 



एक चांगला गृहस्थ होता. त्याला कसलेही व्यसन नव्हते. त्या गावात एक दिवस एक बुवा आला. या सद्‌गृहस्थाला भविष्याचा नाद होता. त्याला कुणीतरी सांगितले की, हे आलेले बुवा भविष्य अति उत्तम सांगतात. तो त्यांना भेटायला गेला, परंतु ते गांजा ओढीत होते. त्याला काही तो वास सहन झाला नाही. तरीही, भविष्य ऐकण्यासाठी म्हणून तो एका कोपर्‍यात बसून राहिला. असे बरेच दिवस गेले. होता होता त्याला बुवा फार आवडू लागले. त्याप्रमाणे तो रोज तिथे जात असे. एक दिवस बुवांनी सांगितले म्हणून चिलमीत निखारा ठेवला; दुसरे दिवशी फडके ओले करून दिले. पुढे त्याला एकदा बुवांनी सांगितले म्हणून त्याने एक झुरका घेऊन पाहिला; आणि हळूहळू सवयीने तो इतका तरबेज झाला की त्याने गांजा ओढण्यात गुरूलाही मागे टाकले ! असा हा संगतीचा परिणाम फार मोठा होत असतो. ज्याची संगत केली असता भगवत्प्रेम प्रकट होते, तो संत जाणावा. अशाची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी.
श्रीरामप्रभूला आवडणारे 'नाम' घेऊन मारुतिरायांनी त्याला आपलासा करून घेतला. ते नाम तुम्ही अत्यंत श्रद्धेने घ्या, भगवंताला आपलासा करून घेणे तुम्हालाही अगदी शक्य आहे. नाम कुठेही घ्या, कोणत्याही वेळी घ्या, कितीही हळू घ्या, पण ते श्रद्धेने घ्या, म्हणजे ते भगवंतापर्यंत खात्रीने पोहोचू शकेल. परमेश्वराच्या प्राप्तिसाठी प्राणायाम, योगासने इत्यादि साधने सांगितलेली आहेत. परंतु त्याहून जास्त महत्त्वाचे म्हणजे परमेश्वराची सहजभक्ति. भगवंताचे नाम सहजपणे येणे याचेच नाव 'अजपाजप' होय. हा भक्तिचा प्रकार अत्यंत श्रेष्ठ आहे. यात मीपणाचा शेवट आहे. मीपणा जाणे हीच भगवंताची खरी अनन्यता होय. भगवंताची पूर्ण कृपा म्हणजे भगवंताची एकरूपताच होय. परमार्थ म्हणजे आपली 'सहजावस्था' झाली पाहिजे; आणि तशी व्हायला अंतरंगाची ओळख करून घ्यायला पाहिजे, म्हणजेच अंतर्मुख बनायला पाहिजे. भगवंताच्या नसतेपणाने उठलेले वारे म्हणजे काळजी होय. मनुष्याच्या सर्व दुःखांवर, आजारांवर, आनंद आणि समाधान हेच खरे औषध आहे. जो सदाचरणात आणि भगवंताच्या नामात राहतो, त्याला हे औषध सहजी लाभत असते. या औषधाचा परिणाम नकळत आणि सहजी होत जाऊन तो शेवटपर्यंत टिकून राहतो. आनंदमय राहण्याकरिता भगवंत हवा. भगवंताकडून येणारी शांति हेच समाधान होय. मन आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे नाम. या नामात आपले सर्वस्व गुंतवले तर आपल्याला भगवंतापर्यंत सहज जाता येईल.


३४०. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल आणि जगालासुद्धा विसरेल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

४ डिसेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ४ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ४ डिसेंबर २०१४

गोंदवल्याचे महत्त्व नामाच्या प्रेमात आहे. 

 



ज्याप्रमाणे एखादा बाप बॅंकेत पैसे ठेवतो आणि त्याचे व्याज आपल्या मुलाला आपल्या पश्चात् मिळण्याची व्यवस्था करतो, त्याचप्रमाणे, ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांना, निदान अंतकाळी तरी, सद्‌बुद्धीचे व्याज मिळण्यासाठी भरपूर भांडवल मी गोंदवल्यास ठेवले आहे. मनुष्य कितीही भ्रष्ट बुद्धीचा झाला तरी गोंदवल्याला आला की त्याच्या बुद्धीचा पालट झालाच पाहिजे. निदान अंतकाळी तरी तो तिथे येऊन चांगला मरेल. अभिमान म्हणून नव्हे, परंतु गोंदवल्याचे महत्त्व कशात असेल तर ते नामाच्या प्रेमात आहे. राम किती दयाळू आहे ! त्याच्या नामाचा प्रसार व्हावा म्हणून त्याच्या नावाने मी हा बाजार मांडला. पहिल्याने वाटले, आपला माल खपेल की नाही कुणास ठाऊक ! पण रामाने मोठी कृपा केली, आणि पुष्कळ लोक नामाला लागले. आपण पाहतो, प्रत्येक गावाला निरनिराळे नाव असते. तसे पाहिले तर सर्व गावे सारखीच; घरेदारे, भिंती, शाळा, धर्मशाळा, चावड्या या प्रत्येक गावात असतात. परंतु प्रत्येक गावाचे महत्त्व काही वेगळे असते. गोंदवल्यास पैशाचे महत्त्व नाही, परंतु तिथे नामाचे पीक भरघोस आहे. मी नेहमी हेच सांगत असतो की, 'जिथे जे उगवेल तेच तुम्ही पेरा.' इथला कोणताही भक्त कुठेही जरी दिसला, तरी त्याच्या वागण्यावरून कळून आले पाहिजे की, हा गोंदवल्याचा भक्त असला पाहिजे. त्याचे तोंड सारखे हलते आहे, तोंडाने रामाचा जप चालू आहे, त्याअर्थी हा अमक्या गुरूचा शिष्य असला पाहिजे, असे कळून यायला हवे. म्हणतात ना, की आपल्या वडिलांचे महत्त्व सांगु नये, ते मुलाच्या कृतीवरून कळले पाहिजे. म्हणून आता एकच करा, रामाला हात जोडून मनापासून सांगा, " रामा ! तुझे प्रेम असू दे, आम्ही अखंड नामात राहू. प्रारब्धाचे भोग आम्ही आनंदाने भोगू, आणि तू ठेवशील त्यात आनंद मानू. तुझे गोड नाम आम्ही हृदयात सतत जतन करून ठेवू." राम खात्रीने कृपा केल्यावाचून राहणार नाही. खरोखर, या नामामध्ये आपला प्रपंच आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी सुखाचा होईल !
लढाई करणे हे अर्जुनाचे कर्तव्य असल्याने, 'तू माझे स्मरण ठेऊन लढाई कर,' असे भगवंतांनी सांगितले. आज नोकरी किंवा प्रपंच करणे हे आपले कर्तव्य आहे; तेच आपण भगवंताच्या स्मरणात करू. नीतिधर्माचे आचरण, आणि प्रारब्धाने आलेली कामे भगवंताच्या स्मरणात करणे, हेच सर्व धर्माचे, शास्त्रांचे सार आहे. आपण साखर खाल्ली तर आपल्याला गोड लागते, त्याचप्रमाणे आपण गोड शब्द बोललो की आपल्याला गोड शब्द ऐकायला मिळतात. आपल्या सर्व गोष्टी जर भगवंताच्या नामात झाल्या, तर भगवंताचे प्रेम आपल्याला का बरे मिळणार नाही ? आपण भगवंताचे नाम घ्यायला सुरुवात करू या. तेच नाम भगवंताची प्राप्ति करून द्यायला समर्थ आहे याची खात्री बाळगा. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव खासच आनंदमय आहे.


३३९. जो माझा म्हणवतो त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

३ डिसेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३ डिसेंबर २०१४

नाम हे रामबाणासारखे आहे. 

 

    

बाळांनो ! ज्याच्यावर कुणाची सत्ता चालत नाही, जो कुणापासून लाच घेत नाही, जो जात असताना कुणाला कळत नाही, जो किती गेला आणि किती उरला हे कुणाला सांगता येत नाही, जो गेलेला कधी परत येत नाही, आणि जो भगवंताशिवाय कुणाला भीत नाही, असा हा काळ आजपर्यंत कुणालाही चुकला नाही. ज्या काळाच्या सत्तेने वस्तू आकार धरते, त्याच काळाच्या सत्तेने ती अकस्मात मोडली जाते. सर्व दृष्य वस्तूंना हा नियम लागू आहे. मग आपला देह त्यातून कसा सुटेल ? पण ज्याने भगवंत घट्ट धरून ठेवला, त्याचा देह राहिला किंवा गेला, तरी त्याच्या अवस्थेमध्ये फरक पडला नाही.
यापुढे कुणी सांगणारा भेटो वा न भेटो, तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये. जो भगवंताचे नाम घेईल त्याचे राम कल्याण करील. हे माझे सांगणे खरे माना. प्रपंच लक्ष देऊन करा, परंतु त्यामध्ये भगवंताला विसरू नका. हाच माझा अट्टाहास आहे. त्याच्या स्मरणात सर्वांनी आनंदात दिवस घालवा. नाम रामबाणाप्रमाणेच आहे. रामबाण म्हणजे बरोबर काम करणारा बाण; आपल्या लक्ष्यावर अचूक जाणारा तो बाण पुनः परत येऊन भात्यामध्ये बसत असे. रामनाम हे रामाच्या जवळ राहणारे आणि अचूक रामाकडे नेणारे एक साधन आहे. खरोखर, नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीने फार सोपा आहे. त्याला कोणतीही उपाधी लागत नाही, त्याला काळवेळ नाही, त्याला स्थलाचे आणि देहाच्या अवस्थेचे बंधन नाही. जोपर्यंत जीवाला शुद्ध आहे, तो पर्यंत नाम घेता येते. पण दुसर्‍या दृष्टीने नामस्मरणाचा अभ्यास कठीण आहे. उपाधी असल्याशिवाय आपल्या मनाला चैन पडत नाही. उपाधीमध्ये मन रमते. नामाला स्वतःची अशी चव नाही, म्हणून जरा नामस्मरण केले की त्याचा कंटाळा येतो. यासाठी, नामात रंगणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. ज्याचे मन नामात रंगू लागले त्याला स्वतःचा विसर पडू लागला असे समजावे. ज्याचे चित्त पूर्णपणे नामात रंगेल तो स्वतःला पूर्णपणे विसरतो, आणि त्याला भगवंताचे दर्शन घडते. नामाची चटक लागली पाहिजे. ती चटक एकदा लागली म्हणजे जगामधली सर्व ऐश्वर्ये तुच्छ वाटतील. हा बाजार मांडून मी बसलो आहे तो त्यासाठीच आहे. प्रत्येकाला नामाची चटक लागावी म्हणून माझा प्रयत्‍न सारखा चालू आहे. कुणीतरी त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा. राम त्याच्या पाठीमागे उभा आहे याची खात्री बाळगा, आणि सर्वांनी मनापासून नाम घ्या, हाच माझा सर्वांना आशिर्वाद.


३३८. नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावे, रंगला की नाम सुटणारच नाही.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२ डिसेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २ डिसेंबर २०१४

अखंड नामस्मरणात राहणे म्हणजेच उपासना. 

 



देवाच्या आड काय येत असते ? आपल्याला देवाची प्राप्ति होत नाही याला वास्तविक आपणच कारण असतो. आपण लोकांना त्याबद्दल दोष देत असतो, पण इतर लोक त्याच्या आड येत नसून आपण स्वतःच आड येत असतो, हे थोडा विचार केला असता समजुन येईल. ज्याला आपले म्हणायला पाहिजे होते त्याला आपले न म्हणता, आपण दुसर्‍या कोणाला तरी आपले म्हणत असतो. आपला मुलगा, बायको, भाऊ, या सर्वांना आपले म्हणत असतो. हे सर्वजण काही मर्यादेपर्यंत आपले असतात. परंतु देवाला जर आपले म्हटले, तर तो सदासर्वकाळ आपलाच असतो, आणि आपल्याला तो मदत करायला तयार असतो. तुम्हा सर्वांना द्रौपदीची गोष्ट माहीत आहे ना ? आपले भ्रतार आपले रक्षण करतील असे तिला वाटत होते. परंतु त्या कोणाकडून काही होणे शक्य नाही असे तिला दिसले, तेव्हा तिने अनन्यतेने श्रीकृष्णाचा धावा केला आणि तेव्हांच कृष्ण तिच्याकरिता धावून आले. म्हणजे काय, की आपण ज्याला आपले म्हणत असतो ते खरे आपले नसतात. आपण परमात्म्याला आपले म्हणावे, 'मी त्याचा आहे' अशी सदासर्वकाळ आठवण ठेवावी, आणि जे जे घडत असते ते ते सर्व त्याच्या इच्छेने होत असते ही भावना ठेवावी. अशी भावना होण्याकरिता आपण त्याची उपासना करायला पाहिजे. उपासना करणे म्हणजे तरी काय ? आपण देवाचे आहोत, आपण नेहमी त्याच्या सान्निध्यात आहोत, असे वाटणे. असे वाटण्याकरिता त्याच्या नामस्मरणात राहणे जरूर आहे.आपण त्याच्या नामस्मरणात राहिलो म्हणजे तो सदासर्वकाळ आपल्या जवळ राहतो. तुम्ही कोणाचे नाव घेतले म्हणजे त्याची मूर्ति जशी तुमच्या ध्यानात येते, त्याप्रमाणे देवाचे नाव घेतले म्हणजे तो तुमच्याजवळ असतो. देव कसा आहे हे विचारले तर कसे सांगता येईल ? तो नामात आहे हे प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी सांगितले आहे. नाम हे त्याचे रूप, म्हणून नामस्मरण केले म्हणजे देवाला तुमच्याजवळ येणे भागच पडते. हे नामस्मरण कसे करावे ? समर्थांनी सांगितले आहे की, 'काहीच न करूनि प्राणी ॥ रामनाम जपे वाणी । तेणे संतुष्ट चक्रपाणी । भक्तालागी सांभाळी ॥' आपण नाम घेताना काहीच करीत नाही का ? आपण त्या वेळी संसाराची काळजी करीत असतोच ना ? म्हणजेच त्या वेळी आपण मीपणा ठेवून नामस्मरण करीत असतो ! मीपणारहित जो नामस्मरण करील त्यालाच देव सांभाळित असतो; आणि जो स्वस्थ राहील त्याचा योगक्षेम चालवीत असतो.



३३७. आपण कोणाचे तरी होऊन राहावे.; गुरूचे तरी किंवा देवाचे तरी.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

१ डिसेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १ डिसेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १ डिसेंबर २०१४

देहसुखाची अनासक्ति म्हणजे वैराग्य. 

 



भगवंत असण्याची जी स्थिति तिचे नाव भक्ति; आणि हा सर्व विस्तार माझा नाही या बुद्धीने राहणे याचे नाव वैराग्य. सर्व काही रामाचे आहे असे समजणे, म्हणजे सर्वस्व रामास अर्पण करणे होय. परमार्थाच्या आड काय येते ? धन, सुत, दारा वगैरे आड येत नाहीत, तर त्यांच्यावरचे जे ममत्व, ते आड येते. वस्तूवर आसक्ति न ठेवणे हे वैराग्य आहे, ती वस्तूच नसणे हे वैराग्य नव्हे. एखाद्याची बायको मेली किंवा नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त, असे म्हणता येणार नाही. बायको असून लंपट नसेल तर तो विरक्तच आहे. आहे ते परमात्म्याने दिले आहे, आणि ते त्याचे आहे, असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी. संसार हा नश्वर आहे हे ओळखून वागायचे आहे. तो टाकता येत नाही; त्यात राहून आसक्ति न ठेवली की तो टाकल्यासारखाच नाही का ? फळाची आशा न करता सत्कार्य करणे हे भक्तिचे लक्षण आहे, आणि कर्तव्याच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट बाजूला सारणे हे वैराग्याचे लक्षण आहे. आसक्ति न ठेवता कर्तव्याच्या गोष्टी करणे ही तपश्चर्या होय. देहसुखाची अनासक्ति किंवा हवेनकोपण टाकणे म्हणजे वैराग्य. खरोखर, विचार करा, प्रपंचात मनासारख्या गोष्टी मिळतात कुठे ? त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसते. अमुक हवे अथवा नको, असे कशाला म्हणावे ? असे न म्हणता, रामाचेच होऊन राहावे म्हणजे झाले. जो रामाजवळ विषय मागतो, त्याला रामापेक्षा त्या विषयाचेच प्रेम जास्त आहे असे सिद्ध होते. विषय बाधक नाही, पण विषयासक्ति बाधक आहे. भगवंताला प्रसन्न करून घेऊन नाशिवंत वस्तु मागितली तर काय उपयोग ? नामावर प्रल्हादाने जशी निष्ठा ठेवली, तशी आपण ठेवावी. त्याने नाम श्रद्धेने घेतले आणि निर्विषय होण्याकरिता घेतले. आपण ते विषयासाठी घेऊ नये.
जगातले सर्व लोक सुखासाठी प्रयत्न करीत आहेत. शास्त्रांचे पुष्कळ संशोधन होऊन इतकी सुधारणा झाली. त्यामुळे देहसुख पुष्कळ वाढले; पण मानव सुखी झाला नाही. आजारी माणसाचा ताप जोपर्यंत निघत नाही तो पर्यंत त्याचा रोग बरा झाला नाही. त्याचप्रमाणे मानव सुखी झाला नाही, तो पर्यंत खरी सुधारणा झाली नाही असे समजावे. सध्या जगाला सुधारण्याचा आणि जगावर उपकार करण्याचा काळ राहिलेला नाही. प्रत्येकाने आपल्याला तेवढे सांभाळावे. यासाठी भगवंताचे अनुसंधान चुकू देऊ नये; मग धोका नाही. सगळ्यांनी असा निश्चय करा की, भगवंताच्या नामापरत्या गोष्टी ऐकायच्या नाहीत. जे मिळेल त्यात समाधान मानायला शिका. 'मी भगवंताचा आहे' असे म्हटल्यावर सर्व जगत् आपल्याला भगवत्स्वरूप दिसू लागेल यात शंका नाही. ही केवळ कल्पना नाही, आपण अनुभव घेऊन पाहात नाही. त्यासाठी नामस्मरणात आपण राहू या.


३३६. जगात भगवंतावाचून सत्य वस्तू नाही ही ज्याची निष्ठा तोच खरा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

३० नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० नोव्हेंबर २०१४

लोभाच्या चित्तीं धन । तैसें राखावें अनुसंधान ॥

 



मंगलांत मंगल, शुद्धांत शुद्ध जाण । एक परमात्म्याचें अनुसंधान ॥
हें बीज लावले ज्यांनी । धन्य धन्य झाले जनीं ॥
अचूक प्रयत्‍न तोच जाण । ज्या प्रयत्नांत न चुकतें अनुसंधान ॥
सत्य करावें भगवंताचे अनुसंधान । जेणें दूर होईल मीपण ॥
'मी माझे' म्हणून सर्व काही करीत जावें । परि भगवंतापासून चित्त दूर न करावें ॥
मारुतिरायाचे घ्यावे दर्शन । त्याच्याच कृपेने राखावे अनुसंधान ॥
लोभ्याच्या चित्तीं धन । तैसे राखावे अनुसंधान ॥
दूर गेला प्राणी । परत येण्याची वेळ ठेवी मनीं ।
तैसे राहणे आहे जगांत । मी परमात्म्याचा होण्याचा ठेवावा हेत ॥
म्हणून न सोडावे अनुसंधान । कशापेक्षांही जास्ती करावें जतन ॥
कोणाचेंच न दुखवावें अंतःकरण । व्यवहार करीत असावा जतन ।
व्यवहारांतील मानअपमान । हे टाकावे गिळून ॥
अखंड राखावें रामाचें अनुसंधान । जेणें सदाचरणाकडे लागेल वळण ॥

माझें नातेगोतें राम । हा भाव ठेवून जावें रामास शरण ॥
हें ऐका माझें वचन । मनानें व्हावे रामार्पण ॥
अनन्य व्हावें भगवंती । जो कृपेची साक्षात् मूर्ती ॥
आपले कर्तेपण टाकावें । म्हणजे शरण जातां येते ॥
ज्याने धरलें भगवंताचे पाय । तोच त्याला झाला उपाय ॥
मी आता झालों रामाचा । त्याला अर्पावी सर्व चिंता ॥
मी ज्याचा झालो त्याला माझी काळजी । हा ठेवावा भाव चित्तीं ॥
माझे हित तो जाणे । हें जाणून स्वस्थचि राहणें ॥
विषयवासना सुटण्यास उपाय जाण । आपण जावें रामास शरण ॥
जें जें करणें आपलें हाती । तें करून न झाली शांति । आतां शरण जावें रघुपति ॥
जावें रघुनाथास शरण । तोच दुःख करील निवारण ॥
एक राम माझा धनी । त्याहून दुजें आपले न आणी मनीं ॥
अभिमानरहित जावें रामाला शरण । त्यानेंच राम होईल आपला जाण ॥
आतां जगांत माझे नाही कोणी । एका प्रभु रामावांचुनी ॥
निर्धार ठेवा मनीं । शरण जावें राघवचरणीं ॥
जें जें केले आजवर आपण । तें तें करावें रामास अर्पण ॥
जें जें होते तें राम करी । ते स्वभावें होय हितकारी ।
म्हणून जी स्थिति रामाने दिली । ती मानावी आपण भली ॥
गंगेच्या प्रवाहांत पडले । गंगा नेईल तिकडे गेले ॥
गंगा जाते योग्य ठिकाणी । याचे जाणे सहजासहजी ॥
तैसे असावे भगवंताचे स्मरणात । राम ठेवील त्यांत मानावें हित ॥
सर्व जगत् ज्यानें जाणले मिथ्या । हे जाणून शरण जावे रघुनाथा ॥
कारण परमात्म्याला जाणे शरण । याहून दुजा मार्ग न उरला जाण ॥
धन्य तो व्यावहारिक जाण । जेणे केलें रामास स्वतःला अर्पण ॥

३३५. रामापरतें सत्य नाही । श्रुतिस्मृति सांगतात हेंच पाही ॥
रामसत्तेविण न हाले पान । हें सर्व जाणती थोर लहान ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२९ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ नोव्हेंबर २०१४

वेळीच जागे होऊन योग्य रस्त्याला लागा. 

 



कोणत्याही कर्माची सुरुवात हेतूपासून म्हणजे वासनेपासून होत असते. जन्म हा देखील वासनेतून निर्माण होतो. गंगेचा उगम अत्यंत पवित्र आणि लहान असला तरी स्वच्छ असतो. त्याप्रमाणे, आपला जन्म वासनेत झाला असला तरी सुरुवातीला मूळ स्वरूप निर्मळ असते. याच वेळी आई लहान मुलाला शिकवते, ’ देवा चांगली बुद्धी दे, ’ पुढे या निर्मळ मनावर निरनिराळ्या बर्‍यावाईट वासनांचे पगडे बसू लागतात. गंगेचे पाणी पुढे पुढे वाहात गेल्याने गढूळ होते. आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे तुरटी लावतो, त्याप्रमाणे वासनेचा गढूळपणा घालविण्यासाठी ’राम कर्ता’ ही भावना दृढ करायला पाहिजे. भगवंताच्या नामाची तुरटी फिरल्याने वासनेचा साका खाली राहून शुद्ध अंतःकरण प्रकट होईल. ’ गेल्या जन्मात मी जी काही पापे केली असतील ती आता भोगतो आहे, ’ असे नुसते म्हणून जगण्यात अर्थ नाही, कारण त्यामुळे आपण पुढच्या जन्माची तयारीच करीत असतो. जर पुढचा जन्म चुकवायचा असेल तर या जन्मीच त्यासाठी कार्य करायला पाहिजे; म्हणजे ती वासना नष्ट केली पाहिजे.
सत्तावान्, श्रीमंत, वैभववान् माणसे सुखी असतात, हा नुसता भ्रम आहे. जोपर्यंत यांना भगवंताचा आधार नसतो तोपर्यंत या सर्व गोष्टी कुचकामाच्या आहेत. आपले प्रापंचिक सुख आहे ते दिसायला वरवर बाळसेदार दिसते, परंतु ती सूज आहे, हे काही खरे बाळसे नव्हे. म्हणून आपल्याला प्रपंचात सुख लागत नाही. आपले वय जसजसे वाढत जाते, तसतसे आपले व्याप वाढतात आणि परमेश्वराकडे दुर्लक्ष होते. वासना कमी होण्याऐवजी वाढत जाते, आणि तीच पुढल्या जन्माची अधिष्ठात्री ठरते. तेव्हा यातून काहीतरी मार्ग वेळेलाच काढणे आवश्यक आहे. हा मार्ग अगदी सरळ आणि सोपा आहे. संतांनी तो अनेक वेळा दाखवून दिला आहे. त्या मार्गाने पावले टाका, भगवंत पुढला मार्ग दाखवायला उत्सुक आहे. तुम्हाला हे सर्व पटले असे म्हणता, परंतु पटले असून करीत नाही. बरे, पटले नाही म्हणावे, तर का पटले नाही तेही सांगत नाही, याला काय करावे ? मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणीमात्रापेक्षा जर काही जास्त असेल तर ते म्हणजे चांगलेवाईट कळण्याची बुद्धी. तेव्हा तुमच्या बुद्धीला पटूनही जर तुम्ही तसे वागला नाही किंवा नुसता प्रयत्नही केला नाही, तर तो दोष सर्वस्वी तुमचाच नव्हे का ? म्हणून मला पुनः सांगावेसे वाटते की, वेळेलाच जागे होऊन योग्य रस्त्याला लागा. भगवंताच्या नामात राहून सर्व काय ते करा, हेच माझे शेवटचे सांगणे आहे.

३३४. नामावर बळकट श्रद्धा ठेवून परमार्थ करू या. नाम न सोडता इतर गोष्टी करू.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२८ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ नोव्हेंबर २०१४

भगवंताला पाहण्यास स्वांतर शुद्ध करावे. 

 



'अंते मतिः सा गतिः' असे एक वचन आहे. जन्माचे खरे कारण शोधून पाहिले तर हेच आढळेल की, वासनेमुळे जन्माच्या फेर्‍यात आपण सापडलो. जन्माच्या पाठीमागे मरण हे ठेवलेलेच असते. जन्ममरणाचा ओघ सतत चाललेला आहे. वासना आधी का जन्म आधी, या वादात पडणे म्हणजे बीज आधी का झाड आधी यासारख्या, जगाच्या अंतापर्यंत कधी न सुटणार्‍या प्रश्नाबद्दल काथ्याकूट करणे होय. आपल्याला नडते कुठे ते पाहावे. विषयांतच आम्ही गुंतून राहतो ते सोडावे. असत्यातूनच सत्य कसे जाणता येईल ते पाहावे. इथून कुणीतरी गेले, असे सावलीवरून आपण म्हणतो. त्याप्रमाणे ही जगत्‌रूप सावलीच आहे. तिला असणारे खर्‍याचे अधिष्ठान जो ईश्वर, त्याला आपण जाणून घेण्याचा प्रयत्‍न करू या. आपल्या डोळ्यांवर विषयाची धुंदी असल्यामुळे, सर्व ठिकाणी भरलेला भगवंत आपल्याला नाही पाहता येत. त्याला पाहण्यासाठी दृष्टी निराळी करावी लागते. आपण आपले अंतरंग साफ केले तर तशी दृष्टी येते. आपण कोणा स्त्रीकडे पाहू लागलो तर आपली जशी वृत्ति असेल तशी ती दिसते; कामी असेल त्याला ती तशी दिसू लागेल, आणि सात्त्विक असेल त्याला ती मातुःश्रीच दिसू लागेल. म्हणून काय, की जोपर्यंत आपले अंतःकरण शुद्ध नाही तोपर्यंत आपल्याला सर्वत्र भगवंत दिसणार नाही. भगवंत सर्व ठिकाणी पाहताना तो आपल्यातही आहे हे पाहिले पाहिजे. जोपर्यंत भगवंत आपल्यात आहे हे दिसून येत नाही, तोपर्यंत तो इतरांत असलेला आपल्याला दिसणार नाही. म्हणून भगवंत सदासर्वकाळ आपल्यात आहे हे पाहू लागले पाहिजे.
सद्‌गुरु सांगेल तसे वागावे. त्यामुळे आपला अभिमान नाहीसा होतो. संतांचा थोडासा कटाक्ष जो कर्ममार्गावर आहे तो याचकरिता की, कर्म करण्याने अभिमान येतो, आणि त्याउलट, गुरुआज्ञेत वागल्याने तोच अभिमान नाहीसा होतो. इथे शंका वाटेल की, गुरू तरी नामस्मरण करायलाच सांगतात, म्हणजे कर्म आहेच ना ! वैद्याने एका रोग्याला सांगितले की तू काही खाऊ नकोस. त्याला वैद्याने औषधाच्या तीन पुड्या दिल्या, आणि त्या तीन वेळा घे म्हणून सांगितले. त्यावर तो रोगी म्हणाला, " तुम्ही काही खाऊ नको म्हणता, आणि या पुड्या घ्या म्हणून सांगता, हे कसे ? " त्यावर वैद्याने सांगितले, "पूर्वी जे अजीर्ण झाले आहे त्याचा नाश करण्यासाठी या पुड्या उपयोगी आहेत." त्याप्रमाणे, गुरू आपल्याला नामस्मरण करायला सांगतात ते पूर्वीचा विषयाचा अनुभव नष्ट करण्यासाठी. जो आपली विषयवासना कमी करून आपल्यामध्ये नामाचे प्रेम उत्पन्न करील तोच खरा सद्‌गुरू होय.

३३३. प्रपंच व परमार्थ यांचा छत्तिसाचा आकडा पाहून, संतांनी तडजोड
करण्याचा प्रयत्‍न केला, नामस्मरण करीत करीत प्रपंच करा, हीच ती तडजोड.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२७ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ नोव्हेंबर २०१४

निर्गुणाची जाणीव ठेवून सगुणोपासनेत राहावे. 

 

 

समजा आपल्या एका गावाला जायचे आहे. त्या गावाला जाणारी आगगाडी धरून आपण तिची संगती करतो. आपले गाव आले की आपण गाडी सोडतो. हे जसे खरे, त्याचप्रमाणे, निर्गुण हे आपले साध्य असले तरी आज आपल्याला सगुणच खरे मानून त्याची संगती केली पाहिजे. निर्गुणाशिवाय सगुण खरे नाही ही गोष्ट खरी; पण सगुण खरे धरून चालल्याशिवाय निर्गुणापर्यंत पोहोचता येणार नाही हेही तितकेच खरे. सगुणोपासनेत स्वतःचा विसर पडला की, एकीकडे ’ मी ’ नाहीसा होतो आणि दुसरीकडे देव नाहीसा होतो, आणि शेवटी परमात्मा शिल्लक राहतो. म्हणूनच, आपण निर्गुणाची ओळख करून घेऊन सगुणात राहावे. स्वतःचा विसर जर रामाच्या पूजनात पडू लागला, तर निर्गुण आणखी कोणते राहिले ? परंतु ताप आलेल्या माणसाला ज्याप्रमाणे सर्व कडूच लागते, त्याप्रमाणे आपली वृत्ती विषयाकार झालेली, तिला सगुण, निर्गुण, दोन्ही कुठे गोड लागतात ? ’सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो’ म्हणतो, त्याला त्याचे मर्मच नाही कळले. वस्तुतः तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्याचे त्यालाच नाही कळत. स्थलात आणि कालात जे देवाला आणतात, त्यांनी त्याला सगुणात नाही आणले या म्हणण्यात काय अर्थ आहे ?
परमार्थाविषयी आपल्याला विचित्र कल्पना असतात. अगदी अडाणीपणा पत्करला, पण हे विपरीत ज्ञान नको. सूर्य हा आपल्या आधी होता, आज आहे आणि पुढेही राहणार आहे. तो नेहमीचाच असल्यामुळे त्याचे अस्तित्व आपल्या ध्यानात येत नाही, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. भगवंताच्या बाबतीत आपले तसेच घडते. एखादा नास्तिक जर म्हणाला की, ’देव नाहीच; तो कुठे आहे हे दाखवा, ’ तर त्याला असे उत्तर देऊन अडविता येईल की, ’देव कुठे नाही ते दाखवा. ’ पण हा उत्तम मार्ग नव्हे. देव नाही असे म्हणणारालासुद्धा, त्या स्वरूपाचे काहीतरी आहे ही जाणीव असतेच; फक्त तो त्याला निरनिराळी नावे देतो. निसर्ग, शक्ति, सत्ता, अशी नावे देऊन त्यांचे अस्तित्व मान्य करतो, पण ’ देव ’ नाही असे तो म्हणतो. जे आहे असे त्याला वाटते तोच देव समजावा. मनुष्याला जितके ज्ञान असते तितके लिहिता येत नाही; जितके लिहिलेले असते तितके वाचणार्‍याला समजत नाही; त्याला जितके समजलेले असते तितके सांगता येत नाही; आणि ऐकणार्‍याला, तो जितके सांगतो तितके कळत नाही. म्हणून, मूळ वस्तूचे वर्णन स्वतः अनुभव घेऊनच समजावे. परमात्मा कर्ता आहे असे समजून, आपण आजचे कर्तव्य करीत राहावे.

३३२. निर्गुण हे दिसत नाही, कळत नाही. म्हणून ते अवताररूपाने, अथवा संतरूपाने, सगुणरूप घेऊन येते.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२६ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ नोव्हेंबर २०१४

भगवंताशी आपले नाते जोडावे. 

 



भगवंताचे नाम मुखातून न येण्यापेक्षा मुकेपण बरे नाही का ? दृष्टी जर भगवंताची मूर्ती पाहात नसेल तर ती दृष्टी काय कामाची ? आपले कान जर त्याची कीर्ति ऐकत नसतील तर ते कान काय कामाचे ? डोळ्यांनी भगवंताची मूर्ती पाहणे, मुखाने भगवंताचे नामस्मरण करणे, कानांनी त्याचेच गुणानुवाद ऐकणे, हाच खरा अभ्यास आहे. भगवच्चरित्र ऐकायचे कशासाठी ? तर त्याप्रमाणे वागण्यासाठी.
भगवत्प्राप्तीसाठी एक सुलभ उपाय आहे. भगवंताशी आपले नाते जोडावे. कोणते तरी नाते लावावे. भगवंत हा माझा स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे; तो माता, मी लेकरू; तो पिता, मी पुत्र; तो पती, मी पत्‍नी; तो पुत्र, मी आई; तो सूत्रधार, मी बाहुले; असे काही नाते लावावे. मुलगा दत्तक घेतल्यावर मग त्याच्याशी पुत्रप्रेम लावतो की नाही ? लग्न होण्यापूर्वी कोण नवरा आणि कोण बायको ? पण लग्न होताच ते नाते लावतो, आणि सहवासाने प्रेम वाढवितो. प्रेम केल्याने प्रेम वाढते. तसे भगवंताविषयीचे प्रेम कोणचे तरी नाते लावून वाढवावे. किंबहुना तो स्वभावच व्हावा, म्हणजे भगवद्प्राप्ती सुलभ होते. हनुमंताने दास्यभक्ति केली, रामाला आपल्या हृदयातच ठेवले. गुहकाचे रामावर तसेच प्रेम होते. रावणाने शत्रू म्हणून, भरताने भाऊ म्हणून, सीतामाईने पती म्हणून, बिभीषणाने मित्र म्हणून, हनुमंताने स्वामी म्हणून, भगवंताला आपलासा करून घेतलाच.
ज्या गावात मारुती नाही त्या गावात राहूच नये. मारुती गावात नसेल तर निदान आपल्या घरी तरी ठेवावा. घरात देवाची उपासना करावी. घर हे मंदिराप्रमाणे असावे. परान्न म्हणजे दुसर्‍याने मिळविलेले अन्न. आपण घरी जे अन्न खातो ते देखील परान्नच आहे, कारण अन्नदाता परमात्माच आहे. त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे. चवीला बळी न पडता, जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे, याचे नाव सात्त्विक आहार होय. मुख्य म्हणजे, प्रत्येक गोष्टीत भगवंताची आठवण राहिली पाहिजे. मग ते खाणे, पिणे, गाणे, बजावणे, हिंडणे, काहीही असो. गायनामध्ये ठरलेल्या सुरात शब्द म्हणायचे असतात, त्यामध्ये भगवंताची आठवण राहणे कठीण असते. गायन हे करमणुकीकरिता असले तरी भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यांत पाणी यावे. राम आपल्या जरूरीपुरते कुठेही देतो, म्हणून भगवंत देईल त्यात समाधानाने राहायला शिकावे. प्रपंचात दुःखप्रसंग आले म्हणजे मग रामस्मरण होते; तसे ते सर्व काळी करावे. रामावर श्रद्धा पूर्ण असावी, म्हणजे आपली काळजी त्याला वाटते.

३३१. भगवंताच्या नामात राहिल्यावर त्याला आपलासा
करून घ्यायला निराळे काही करण्याची जरूरी नसते.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२५ नोव्हेंबर, २०१४

मार्गशीर्ष गुरुवार

मार्गशीर्ष  गुरुवार 

( सर्व माहिती इतर  संकेतस्थळावरुन साभार ) 


मार्गशीर्ष महिना मध्ये चारही गुरुवार सकाळी उपवास व संध्याकाळी गोड जेवण करतात.
सवाष्ण बायका वैभव लक्ष्मीव्रत करतात.


सुख, शांती, वैभव सवाष्ण रुप राहण्याकरता हे वैभव लक्ष्मीव्रत करतात. तांबा च्या तांबा मध्ये पाणी घालून आंबा याची पान ठेवतात.लक्ष्मी ठेवतात. सवाष्ण बायका बोलावून वैभव लक्ष्मीव्रत पुस्तक वाचतात.हळद कुंकू लावून खणा नारळांनी तांदूळ ह्यांनी ओटी भारतात. शिरा गव्हा ची खीर असे कांही गोड देतात.
वाटल्यास जेवण देतात.वैभव लक्ष्मीव्रत पुस्तक देतात.असे हे मार्गशीर्ष महिना त चार गुरुवार करतात.
मनाला खूप चांगल वाटत.हे वैभव लक्ष्मीव्रत केल्यामुळे .म्हणून वैभव लक्ष्मीव्रत करतात.

श्रीमहालक्ष्मी व्रतकथा
श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी,सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्रीमहालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वांभूती असलेल्या श्रीमहालक्ष्मीची ध्यानी घ्यावी, अशी ही कहाणी आहे. द्वापार-युगातली. आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता प्रजादक्ष होता. चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकून आठ अपत्ये होती. सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा-राणीने कन्येचे नाव शामबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रासादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल; प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले, तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले, फाटकी वस्त्रे ल्याली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत-टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, "कोण गं बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय ? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्रीमहालक्ष्मी म्हणाली, "माझं नाव कमलाबाई. द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आलेय. कुठे आहे ती? दासी म्हणाली, "राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले, तर त्या माझ्यावरच रागावतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब." म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली. "तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्‍नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी-तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणार्‍या श्रीमहालक्ष्मी-व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती, समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे पती-पत्‍नी लक्ष्मी-लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे." म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, " मला सांगाल ते व्रत? मी करीन ते नेमाने. उतणार नाही, मातणार नाही; घेतला वसा टाकणार नाही."


म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत निघणार, तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, "कोण गं तू थेरडे? इथे कशाला आलीस ? जा इथून." तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती, हे राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार, तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला नि कळवळून म्हणाली, "आजी, रागावू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते." राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्रीमहालक्ष्मीला तिची दया आली. तिने शामबालाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता.


पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या शामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीव्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले.


लवकरच शामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा-समाधानाचा चालू लागला. पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव, ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती; ती स्थिती आता बदलली. अन्न-पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे; पण तो तरी काय करणार? एकेक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता.


एक दिवस भद्रश्रवाला वाटले, मुलीकडे जावे, तिला पहावे आणि चार-आठ दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून-चालून तो खूप दमला होता; म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शामबालालाही ते समजले. शामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान-सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली.


भद्रश्रवा परत जायला निघाला, तेव्हा शामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे, हे ऐकून सुरतचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय? हंड्यात धन नव्हतेच. होते फक्त कोळसे ! महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्र्श्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता.


दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सुरतचंद्रिकेला एक-एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सुरतचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सुरतचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली. तेव्हा शामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. शामबालाने आईकडूनही महालक्ष्मी-व्रत करवून घेतले. चार दिवस मुलीकडे राहून सुरतचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसांतच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई-वडिलांना भेटण्यासाठी म्हणुन शामबाला माहेरी आली. पण 'बाप' भेटायला गेला असताना त्याला शामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता; पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही,' हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण शामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली.


स्वगृही आल्यावर मालाधराने शामबालेला विचारले, " माहेराहून काय आणलंस?" शामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून आत पाहिले, तर हंड्यात मिठाचे खडे ! मालाधराने चकित होत पत्‍नीला विचारले, "हे काय? या मिठाचा काय उपयोग? शामबाला म्हणाली, "थोडं थांबा, म्हणजे कळेलच." त्या दिवशी शामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अळणी. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग शामबालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्न-पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. "हा मिठाचा उपयोग!' शामबाला पतीला म्हणाली. मालाधरलाही तिचे म्हणणे पटले


थोडक्यात, जे कुणी महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये, नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन-चिंतन करावे; म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील; तुमची कामना पूर्ण करील.


महालक्ष्मीची ही कथा, कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ॥


ॐ महालक्ष्मी नमः । ॐ शांतिः शांतिः शांतिः शांतिः ।

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २५ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २५ नोव्हेंबर २०१४

विषय, वासना, इत्यादि सोडून भगवंताला शरण जावे. 

 

 

भगवंताचे अस्तित्व जिथे पाहावे तिथे आहे. भगवंताचे मर्म ओळखायला, मी कसे वागावे हे प्रथम पाहावे. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिता आपल्याला बुद्धी दिलेली आहे. भगवंत निश्चित आहे हे काहींना अनुभवाने कळले. आपण त्यांचे आप्तवाक्य प्रमाण मानले. भगवंताचे अस्तित्व जर निश्चित आहे तर त्याची ओळख तरी कशी करून घ्यावी ? बीजगणितामध्ये उदाहरण सोडविताना एक अज्ञात 'क्ष' घ्यावा लागतो. उदाहरणाचे उत्तर येईपर्यंत त्या 'क्ष' ची खरी किंमत काय आहे हे आपल्याला कळत नाही. पण तो घेतल्याशिवाय चालत नाही. त्याप्रमाणे, जीवनाचे कोडे सोडविण्यासाठी आज अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहीत धरलाच पाहिजे. त्या भगवंताचे खरे स्वरूप, जीवनाचे कोडे सुटेल त्यावेळी आपल्याला कळेल. खरोखर, जन्ममरणातून मुक्त होण्याचा मार्ग जो आपल्याला दाखवितो तो खरा आप्त. भगवंताला सर्वात अधिक काय आवडते हे संतांनी सांगून टाकले. ते म्हणजे ' आपण विषय, वासना इत्यादि सर्व काही सोडून भगवंताला शरण जावे. ' आपण नेहमी विषयांनाच शरण जातो. भगवंताला जो शरण गेला त्याला जगाची भितीच नाही उरत. सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणे फार कठीण आहे.
आपण जिना चढतो ते जिन्यासाठी नसून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असते. वरच्या मजल्यावर जाणे हे साध्य असून, जिना हे त्याचे साधन आहे. त्याप्रमाणे तीर्थयात्रा, व्रते, नेमधर्म ही साधने असून, परमेश्वरप्राप्ती हे आपले साध्य आहे. पण परमेश्वरप्राप्ती बाजूलाच राहिली आणि आपण साधनालाच घट्ट धरून बसलो आहोत याला काय करावे ? मूळ भगवंत हा निर्गुण, निराकार आणि अव्यक्त आहे, पण मनुष्य त्याला आपल्या कल्पनेमध्ये आणतो. आपल्या ठिकाणी असणारे गुण पूर्णत्वाने त्या भगवंताच्या ठिकाणी आहेत अशी आपण कल्पना करतो. याचा अर्थ असा की, आपण प्रथम भगवंताला जडामध्ये पाहतो, आणि मग त्याच्या नामाकडे जातो. भगवंताने केलेली ही सृष्टी, आहे तशीच सर्व जरूर आहे. तिच्यामध्ये बदल करायला नको, बदल आपल्यामध्ये करायला हवा. आपले सगळे जीवन जर भगवंताच्या हातामध्ये आहे, तर मग जीवनातल्या सर्व घडामोडी त्याच्याच हातात आहेत यात शंका कोणती ? झाडाच्या मुळांना पाणी घातले की त्याच्या सर्व भागांना ते पोहोचते, तसे, भगवंताचा विसर पडू न दिला म्हणजे सर्व काही बरोबर होते. भगवंत हवासा वाटणे, यामध्ये सर्व मर्म आहे. आत्मा हा समुद्रासारखा आहे; त्याचा अगदी लहान थेंब, त्याप्रमाणे हा जीव आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे, हेच खरे तत्त्वज्ञान आहे. या आत्म्याचे नित्य स्मरण ठेवून आनंदात असावे.


३३०. संतांनी नामस्मरणरूपी नाव आपणास दिली आहे.
त्यात विश्वासाने बसू. संत हे कर्णधार आहेत, ते आपणास पैलपार नेतील.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

२४ नोव्हेंबर, २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ नोव्हेंबर २०१४ 

उत्कट भावनेने भगवंताची उपासना करावी.

 


विस्तव माहीत नसला, तरी तो हाताला चुकूनही लागला तरी हात भाजतो; किंवा हा परीस आहे हे माहीत नसूनही, लोखंडाचा घण त्यावर मारला तरी त्याचे सोने व्हायचे रहात नाही. त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय नुसते भक्तीने जरी भगवंताकडे गेले तरी काम होते. परंतु दुसर्‍या विषयांची आसक्ति जोवर आपल्याला सुटत नाही, तोवर मनापासून भगवद्‌भक्ति होत नाही. जिथे उत्कट भावना आहे तिथे सगुण मूर्तीला मनुष्यधर्म प्राप्त होतील. उपासक देहाला विसरला की उपास्यमूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. शिवाय, जे इतर लोक थोडे तन्मय झाले आहेत, त्यांनादेखील तो अनुभवाला येईल. परंतु उपासकाची किंवा भक्ताची भावना नेहमी उत्कट राहीलच असा नेम नाही. म्हणून अशा उपासकाला मूर्तीमधल्या चैतन्याचा अनुभव येऊन देखील पारमार्थिकदृष्ट्या फायदा होईलच असे निश्चित नाही.
एका मुलाने काही खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली. त्याबरोबर त्या मुलाने मोठे भोकाड पसरले आणि त्या बाईला शिव्या देऊ लागला. ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगलाच झोडपला. परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊनसुद्धा तो मुलगा फार ओरडला नाही, आणि त्याने आईला उलट शिव्यापण दिल्या नाहीत. हे जसे खरे, त्याप्रमाणे आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत अशी निष्ठा असेल, तर आपल्याला त्यांचा त्रास होईल, पण त्यांनी आपली शांति बिघडणार नाही. भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांति बिघडते. ज्या दातांनी सिंह मोठाले प्राणी मारतो त्याच दातांनी तो आपल्या पिल्लांना इजा न करता उचलतो, हे लक्षात असू द्यावे. आपण निःपक्षपाती बुद्धीने विचार केला तर भगवंताचे सान्निध्य लाभले त्यालाच निर्भयता आणि निर्वासनता येईल. प्रत्येक माणसाला आधार लागतो. पण आपण अपूर्णाचा आधार धरल्यामुळे आपल्याला निर्भयता येत नाही; यासाठी भगवंताचा आधार धरावा. बुद्धीने निश्चय करावा आणि मन भगवंताकडे लावावे, की इंद्रिये तिकडे बळजबरीने जातीलच, राम उपाधिरहित आणि त्याचे नामही उपाधिरहित आहे. म्हणून, ज्याप्रमाणे खडक किंवा वाळू पाण्याशी मिसळत नाहीत, साखर किंवा मीठच विरघळते आणि समरस होते, तद्वत् रामाशी त्याचे नामच समरस होते.


३२९. सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या