२५ मे, २०१७

संक्षिप्त शनिमाहात्म्य

शनैश्चर जयंती निमित्य शनि भक्तांसाठी ' संक्षिप्त शनिमाहात्म्य ' 🌺🌼🌸
  ( श्लोक १ ते ९१)

ॐ नमोजी गणनायका। सरस्वती सिध्दीदायिका। 
गुरु संत श्रोते पाठका। अखिलांसी नमो नम : ।१

मुळ कथा गुर्जर भाषेची। नवग्रहांच्या श्रेष्ठत्वाची।
 आणि महाराजी विक्रमांची। उज्जायिनी नगरिच्या।२

एके दिवशी प्रभातकाळी। नवग्रहांची चर्चा रंगली।
 पंडितांनी महती वर्णली। स्वबुध्दीपरत्वे सभेमाजी।३

राजा विक्रमाने प्रश्ण केला।ग्रहश्रेष्ठत्वाचा द्या दाखला।
सांगुन स्थिती-गतीमतिला।रुप पूजा वर्णावी।४

एकाच्या मते रवि महान ।दुजा म्हणे चंद्रमा गहन।
तिस-याचे निश्चित वचन। मंगळ वरिष्ठ मानावा।५

चौथा म्हणे बुध बळवंत।गुरु श्रेष्ठ पाचव्याचे मत।
शुक्राचा महिमा त्रिलोकात। सांगे विद्वान सहावा।६

पुढे राहू - केतू कथिला। अंती एकजण उटीला। 
शनि श्रेष्ठत्व सांगू लागला। साकल्ये करोन।७

तो म्हणे शनि सर्वश्रेष्ठ। बलाढ्य एवं कोपिष्ठ। 
करितो कोणासही भ्रष्ट। दृष्टि चमत्कारे ।८

भाविकांचे करितो रक्षण। दुर्जनास टाकतो ठेचून। 
जातीचा तेली पंगू चरण। कृष्ण वर्णी आहे जो.।९

काळभैरव त्याचे दैवत। जयावरी करी दृष्टीपात। 
करितो नामशेष उदध्वस्त। जीवन तो त्या जीवांचे।१०

रविराजाचा पुत्र शनि। पाहे पिता जन्मताक्षणी।
 उठतो कष्ट देही झणी। पित्याच्या सर्वांगी.। ११

पितृरथीचां सारथी। पांगुळा झाला निश्चिती।
अश्वांचिया नेत्रापती। आले पूर्ण अंधत्व।१२

थकले उपाय अनंत। जाहले धन्वंतरी त्रस्त। 
कृपा दृष्टी होता समस्त। आरोग्य पावले। १३

हे  ऐकोनी राजा विक्रम। हसून बोलला सप्रेम। 
हा नाही सुपुत्राचा धर्म। जनकास छळण्याचा। १४

या समयी यानी बसोनी। चालले होते क्रोधी शनी। 
विक्रमाचे वचन ऐकोनी। तत्काळ सभेसी पातले। १५

राजा अश्चर्यचकित जाहला। शनिचरणी प्रसादा धावला। 
परी शनिश्चरे अव्हेरिला। कठोर वाक् ताडनाने।१६

यमग्राज म्हणे रे वाचाळा। निंदका खळा मस्त टवाळा। 
कन्याराशी आलो तुझ्या मुळा। करीन मी गर्वहरण। १७

राजा झाला नतमस्तक। हरपला त्याचा विवेक। 
शनिदेव दावोनि धाक। सत्वर विमानकंपनीची बैसले। १८

खिन्नवदने सभा भंगली I राजा विक्रमास ग्लानी  आली I
मानसी कृष्णछाया दाटली I अंतरंगी सर्वांच्या  I  १९
एक मास उलटून गेला I  विक्रमा बारावा शनी आला I
सर्वत्र हाहाकार माजला I अभाविक गांजले I २०
या समयी पंडिता सांगती  I शनैश्चर पूजन पध्द्ती  I
आग्रहे विक्रमास म्हणती  I व्रतपालन असे करावे  I २१
प्रथम करावे अभ्यगस्नान  I मग करावे एकाग्रचितंन I
अश्वनाल प्रतिमेचे  जून पूजन I करावे विधीवत I २२
मृत्तिकेचा कुंभ स्थापावा I तयावरी नाल ठेवावा I
तेलअभिषेक करावा I काळी फुले व्हावी I २३
उडीद मीठ शनीस अर्पावे I सत्पात्रा-सोने-लोह-नील द्यावे I
वा काळे घोगडें दान करावे I किंवा अन्न -गुळ -तेल I २४
निलाजनं समाभासम रवी पुत्रम यमाग्रजम I
छाया मार्तंड संभुतं तन्नमामी शनैश्चरम I २५
हा जप करावा तेवीस सहस्त्र I प्रतिवारी वाचावे शनीस्तोत्र I
संतुष्ट करावे धार्मिक सत्पात्र I एकभुक्त रहावे शनिवारी I २६
राजाने उपदेश ऐकिला I अंतरी फार कष्टी जाहला I
शनी कृपेवरी विसंबला I उदास होऊन I २७
पुढे एक दिनी दोन प्रहरी I व्यापारी सौदागर आला नगरी I
घोडे विकावया आणिले भारी I त्याने बहुलक्षणी I २८
राजाही मैदानी प्रवेशाला I अभ्यास पाहून हरकला I
एका वारूवरी स्वार झाला I स्वतः च परीक्षा करावया I २९
आरूढ नृप  दृष्टीआड झाला I तुरंग तात्काल  गगनी उडाला I
निबीड दरी जाऊन उतरला I आणि जाहला अदृश्य I३०
सौदागर वेशी शनीने I शोधावया लावली राने I
न मिळे राजा म्हणोनी त्याने I केला पैका वसुल I ३१
राव चिंताग्रस्त घोर रानी I पश्चिमेस बुडे दिनमणी I
धरती ग्रासतसे रजनी I तेव्हा तो तेथेच विसावला I ३२
रात्र सारे पसरे रवितमा I पाऊले नेती राजा विक्रमा I
पोहोचला तामलिंदा ग्रामा I अंत्यत थकून भागून I ३३
त्या नगरी एक वैश्य होता I ज्याची अग्नीत मालमत्ता I
त्याची अलौकिका नामे दुहिता I इच्छांवर शोधतसे I ३४
त्या धनिके देखाला अतिथी I राजलक्षणे मदनाकृती I
नाम ग्रामादि घेई माहिती I आणि सुस्वागत करितसे I ३५
विसावला वैश्यगृही विक्रम I आवरी नित्यनैमित्यिक कर्म I
सेविली पंचपक्वांन्नी उत्तम I अति आग्रह अत्यादरे I ३६
उज्जयिनी स्वामीस कन्या द्यावी I असा हेतू धरोनी मनोभावी I
ही सुवर्ण संधी न दवडावी I एवं कथिले दुहितसे I ३७
लाडक्या पुत्रीच्या इच्छेनुसार I सावकारे धाडीला नृपवर I
पार्कही युक्ती उपवर I राजास शयनमंदिरी I ३८
पथिक निद्रागृही प्रवेशला I पाही सुशोभित रंगमहाल I
शृगांर साधने नटविलेला I नवदांपत्यासाठी I ३९
विक्रम मनी संशय उपजला I  कोणे हेतू रसरंग सजविला I
सावकारे पाठविले येथे मला I कोणत्या कारणे I ४०
नृपती सावधान अंतरी I गाढ निद्रेचे सॉंग पांघरी I
इतक्यात पावली सुन्दरी I सोळा शृगार करून I ४१
अलौकिक भाषण चतुर I यौवन शिखरी उपवर I
मधुमीलना झाली आतुर I ऐतदर्थ  पुरुषा जागवी I ४२
इशारे करून थकली I रंभा निद्राधीन झाली I
सन्मुख दृश्ये थरारली I चित्तवृत्ती राजाची I ४३
भित्ती चित्रातील हंसांने I उड्डाण करोनि लीलेने I
हाराची मौत्यें चचुने I भक्षण केली सत्वर I ४४
मदनिका जागी झाली I प्रेमभंगे संतापलेली I
खुंटीवरी पाहो लागली I ठेवलेला मौक्तिक हार I ४५
भूमीवरी करोनी पद प्रहार I म्हणे अरसिका देई माझा हार I
 आणि आपुल्या पंथे जावे सत्वर I कृष्णमुख घेवोनि I ४६
परी  तो उत्तरे हार लाभला नाही I ऐकून कोपली  लवलाही I
जनका सांगे तुम्ही स्वगृही I शर्विलक आणला I ४७
सावकार अविचारे पेटला I नृपा वाक्ताडन करू लागला I
सेवकी निर्दयपणे ताडिला I हारप्राप्तीसाठी I ४८
मारमारून चाकर थकले Iराजदरबारी घेऊन गेले I
चंद्रसेन राजाने ऐकिले I सर्व कथन वैश्याचे I ४९
चंद्रसेने  पथिका आज्ञा केली I मुक्ताहार डावी याच पाउली I
नहून सांभाळी त्वचा आपली I चौर्यकर्म शिक्षा म्हणून I ५०
विक्रम सांगे वास्तविकता I राजा कोपे कथा न ऐकिता I
आणि दूता म्हणे तोडा आता I हातपाय याचे सत्वरी I ५१
हस्तपादरहित शरिर। भुमिशैय्या निलाकाशावर। जलासाठी तळमळे फार। तुषार्त राजा विक्रम। ५२
या घटनेस उलटला मास। सोशी अनंत व्यथा प्रार्थीप्रहार। दयार्द्र शनिने चंद्रसेनास। द्रवविले अन्नोदक देण्या। ५३
अन्नोदक मिळतसे विक्रमा। मनी स्मरे तो उज्ज्ययिनी महिमा। एके दिनी दिसे स्नुषा उत्तमा। तेलीयाची त्या मार्गी।५४
तिचे माहेर नगरी उज्जयिनी।शश्वुर गृहासी जातसे कामिनी। खंडीत देही नृपास ओळखोनी। व्यथित मने थांबली। ५५
परस्परांच्या संभाषणातून। अघटीत घडलेले जाणून। आधरे भरपाई यानी बैसवून। आणिले तिने स्वगृही। ५६
तया ठका पाहोनी शश्वुर। राज भये कांपे थरथर। हा विक्रम राजा नरवर। स्नुषा सांगे निश्चये.। ५७
ऐकोनी दावे चंद्रसेनाकडे। म्हणे आणू कां तस्कर बा पुढे। अनाथा पाहोनि ह्दय रडे। माझे धर्मबुध्दीने। ५८
भक्तीचा हुंकार ऐकोनी। तेलकट परतला तिष्ठत मनी। चौरंगी बसोनि हाके घाणीं। सांगे विक्रम राजाला। ५९
चंद्रसूर्य उगवतो मावळती। सप्त संवत्सरे उलटून जाती। लीलया दीपराग स्वर स्फुरती। एकदा विक्रम कंठातून। ६०
अहो तो सायंकाळ शुभसमय। पेटवून लक्ष ओळी दीप वलय। उचंबळे राजकन्येचे हृदय। जाज्वल्य संगीत ऐकोनी। ६१
चंद्रसेन कन्या पद्मसेना। पाठवी शोधावया दासींना। तया पुरुषासी झणी आणा। पतीरुपे पुजीन मी। ६२
एकस्तंभाच्या राजमहाली। रंगती संगिताच्या मैफली। तेल्याघरची सेवा संपली। येथे विक्रम राजाची। ६३
रागरंग ऐकोन निशीदिनी। चंद्रसेन म्हणे यावे पाहोनी। उधळतो रंग कोणे करणी। कन्येच्या प्रासादी। ६४
दासी म्हणती हे राजराजेश्वर। आम्हास न कळे कन्येचे अंतर। बोले राजन समजेल प्रकार। आणि निद्राधीन जाहला। ६५
इकडे विक्रममन चिंताग्रस्त। केव्हा उज्जायिनी होईल प्राप्त। त्याचवेळी शनिदेव अकस्मात। दिसले साडेसात वर्षांनी.।६६
शनीदर्शने विक्रम हरपला। प्रणाम करण्या पुढे सरकला। विनवी न छळे मानवाला। अति असह्य होतसे। ६७
उत्तरी ग्रहस्वामी बोलले। मी अनेक गर्विष्ठां छळिले। गुरुग्रहा सुळापाशी नेले। अभिमान करताच.।६८
म्या भिवविले शिवशंकरा। धाडी वनी राजा रामचंद्रा। पाठविली सिता लंकापुरी। दशानन मारिला। ६९
कौशिके छळीले हरिश्चंद्रा। पिडीली दमयंती सुंदरा। भगें पडली  इंद्रशरीरास। कलंकीत झाला चंद्रमा।७०
आणि माझी दृष्टी पडता।क्षय झाला वशिष्ठपुत्रा। केली पराशरे भ्रष्टता। मस्यगंधे कारणे। ७१
श्रीकृष्ण कौरव पांडव। कितीतरी देव दानव। त्रासिले मी महामानव। एकाच दृष्टिक्षेपात.। ७२
विक्रम विनवू ग्रहश्रेष्ठा। न देई मानवा  देहाला कष्टा। नको नकोत हाल अपेष्टा। कोणाही प्राणीमात्रास.।७३
शनैश्वरे ठेविले वरदहस्त। नृप झाला दिव्यदेही पुर्ववत। म्हणे नाही छळणार मी समस्त। व्रतधारक मानवा। ७४
शनिदेव गेले निजस्थानास। चंद्रसेन आला कन्या गृहास। पाही सन्मुख तेजस्वी नरास। जणु मदन अवतरला। ७५
चंद्रसेन विचारी विनयप्रभावे। महाराज आपण कोण वदावे। कोणता देश नामगोत्र सांगावे। कोणत्या प्रयोजने या स्थानी। ७६
विक्रम हासून उद्गारला। तुम्ही होता जो तस्कर दंडिला। बोलवावे श्रीपती वैश्याला। मज ओळखण्यासाठी। ७७
ऐक माझे नामगोत्रादि आता। मी असे उज्जायिनी भाग्यविधाता। क्षत्रिय कुलीन जनीन पिता नाम माझे विक्रम। ७८
ऐकोनी घालतसे दंडवत। म्हणे केवढा घडला अनर्थ।
कोणते महत्तम प्रायश्चित्त।  घ्यावे मी चंद्रसेनाने। ७९
अहो महासमर्था दंडक पामरा। कोणत्या शासने तयाचा उध्दार। क्षमा मागण्या निरलस अधिकार। गहन गती कर्माची। ८०
यावरून विक्रम सांत्वन करी। राजन चंद्रसेना अवधारी। शनीची कृपा झाली आम्हावरी। म्हणोनि घडले अघटित हे.। ८१
चंद्रसेन पाचारी सावकार। हस्त जोडीने आला सामोरा। खिन्नवदने करी मुजरा। आर्जवी स्वगृही चलण्यास। ८२
मनी ना ये विक्रमाच्या। सार्वभौम नृपतीच्या। चंद्रसेन वैश्य आघवे। दास आणि पौरजन.। ८३
प्रवेशले अलौकिकेच्या मंदिरी। चित्रीचा हंस होता निर्जीव जरी। उगाळी मोतीहार सर्वांसमोरी। स्वमुखातून लीलेने।८४
सकळजण आश्चर्य पावले । म्हणती श्रेष्ठा दूषणे लाविले। शनिच्या अवकृपेने सोसले। भोग साडेसात वर्ष। ८५
असे पद्मसेना राजकन्या। आणि अलौकिका रुपांगना। अर्पिती विक्रमाच्या चरणा। जीवन सर्वस्व आपुले । ८६
चंद्रसेन आणि सावकार। विवाही ओतती  भारंभार। मोत्ये, पोवळी, रत्नें अपार।
जामाता तुष्ट कराया। ८७
राजा विक्रम त्या तेलियास। देतसे एक संपन्न देश। आणि दाने देई याचकांस। सर्वांच्या इच्छा पूर्ण करी.।८८
पुढे आजन्म शनिव्रत। पाळी विक्रम सज्ज नीत। श्रोते हो तुम्हीही समस्त। शनिव्रत आचरावे.।८९
तात्याजी महिपतीची मुळकथा। शनिदेवचरणी ठेवोनी माथा। संक्षिप्तरुपे निवेदिली तत्वता। सर्वांच्या कल्याणासाठी.।९०
द्विजवंशी जिचा जनक। ती संक्षेपी हे कथानक। सुखी व्हावा हा तिहीलोक।
*शनैश्वरार्पणमस्तु* ।।९१
इति श्री शनैश्वर माहात्म्य समपूर्णम्
। शनिमहाराज की जय ।


-----------------------------------------
देवा तुझ्या द्वारी आलो 🙏🏼🌺

२३ मे, २०१७

भविष्याच्या अंतरंगात भाग - ६( शनि महिमा)

येत्या गुरूवारी शनी जयंती आहे. प्रस्तृत लेखनमालेत या निमित्ताने *झुंजार शनी*( लेखक : पद्माकर जोशी) व *शनि महिमा* ( लेखिका: वसुधा वाघ) यांच्या पुस्तकातील संकलित माहिती देत आहे. झुंजार शनी या पुस्तकात लेखकाने सर्व जोतिषांसाठी एक सुरेख विवेचन लिहिले आहे. ते म्हणतात, ' 

जोतिषशास्त्र हे मनोरंजक असून भविष्याचे ज्ञान समजावून देणारे म्हणजे ईश्वराच्या अगदी जवळचे शास्त्र आहे. जितके हे शास्त्र सुगम व पवित्र आहे तितकेच हे शास्त्र जो शिकेल त्याला अपवित्र करणारे आहे. याचे कारण नकळत त्याला गर्व येतो आणि गर्वाचे घर नेहमी खालीच असते. म्हणून कुणाचे ही वर्म दुस-यास सांगू नका. एखाद्याच्या कुंडलीचा व्यवहारात उपयोग करु नका, नाहीतर तुमचे भाग्य नष्ट होईल, तुमच्या वाणिचे तेज नष्ट होईल.

 खूपच छान विचार आहेत हे.🏻 आणि सर्व जोतिषांना याचा नक्की फायदा होईल

 शनी संबंधि काही ठळक सिध्दांत देताना लेखक म्हणतात

 १) शनी समोर रवी प्रथम स्थानी असेल तर बाप लेकाचे पटत नाही २)शनी समोर रवी जर धन स्थानात असेल तर नेत्रदोष, अंधत्व येते ३) शनी समोर रवी तृतीयात असेल तर भावंडांबाबतीत एखादी वाईट घटना घडू शकते ४) शनी समोर बुध लाभात असेल तर परदेशात फायदा होतो 

 *शनी महिमा* या वसुधा वाघ यांच्या पुस्तकातही अनेक गोष्टींची विस्तृत माहिती आहे.यात त्यांनी एका वेगळ्या प्रकारे पत्रिकेतील प्रत्तेक स्थानात शनी असता व्यक्तीचे जीवन कसे असते हे समजावून सांगितले आहे 

 प्रथम स्थानात शनी - त्या व्यक्तीचे जीवन चारुदत्ता सारखे असते

 शनी द्वितीयस्थानात - धुतराष्ट्राचे जीवन वाट्याला येते

 तृतीय स्थानात - द्रोणाचार्य 

चतुर्थात शनि - गांधारीचे जीवन 

पंचमात शनी - उर्मिला

 षष्ठात शनी - पंडू राजा ( निरोगी आयुष्य कमी)

 सप्तमात शनि, - अंबे सारखे जीवन वाट्याला येते 

अष्टमात शनि - भीष्म 

नवमात शनि - दुर्योधन 

दशमात शनि - श्रीकृष्ण ( चकीत करणारे जीवन)

 लाभात शनि - कर्ण 

व्ययात शनी - पांडव 

 शनिच्या प्रसन्नतेसाठी हनुमानकवच, हनुमान चालीसा, शनी महात्म्य अवश्य वाचावे. शनिच्या देवळात जाऊन मनोभावे प्रार्थना करुन दर्शन घ्यावे.

 निलांजन समाभासं रवीपुत्रं यमाग्रजं

 छायामार्तंड संभूतं त्वं नमामिम् शनैश्चरम् !! 

( नीलवर्ण व अंजनाप्रमाणे कृष्ण कांती असलेला, सूर्याचा पुत्र, यमाचा अग्रज तसेच छाया व आदित्य यांच्यापासून जन्मलेला जो शनैश्चर त्याला माझा नमस्कार  असो) 

 सदर संकलन शनिचरणी अर्पण 

२१ मे, २०१७

भविष्याच्या अंतरंगात भाग ५



डॉ श. म .साठ्ये  यांच्या आरोग्य कुडंली  या पुस्तकातील काही उपयुक्त माहिती देत असताना या भागात पाहूया, षष्ठ स्थानात  सिंह, कन्या , तुळ, वृश्चिक रास असता घ्यावयाची काळजी
👇🏻

*सिंह रास* : - ही राशी उष्ण आहे.

जर या राशीत  बुध  असेल तर अतीशय अभ्यास त्रासदायक होऊ शकतो

शुक्र असेल तर कपड्यातील अनियमित पणा धोकादायक ठरतो

मंगळ  असेल तर घाई व भावनांचा क्षोभ टाळावा

गुरु असेल तर आहारातील अनियमितपणा आणी अतियोग टाळावा

शनी असता खुप शारिरिक श्रम टाळावेत

नेपच्यून असता चुकीची औषधे घेत नाही ना हे पहावे

*कन्या रास* - ही राशी पचनाशी संबंधित आहे

या राशीत बुध  असता  मानसिक ताण टाळून नियमित सवयी लावून घेतल्या पाहिजेत

या राशीतील शुक्र अयोग्य खाण्याकडे कल दर्शवतो

मंगळ असता पोषण अयोग्य असते

गुरु असता आहाराच्या अतीयोगापासीन जपावे

शनी असता मल प्रवृत्ती साफ राहील याची दक्षता घ्यावी

युरेनस - घाईघाईने जेवण टाळावे

*तूळ रास* : ही उबदार राशी आहे

या राशीत बुध असता - खुप वेळ उभा राहणे, उभे राहून अभ्यास करणे टाळावे

शुक्र असता गोड पदार्थ जास्त खाऊ नयेत

मंगळ असता सांसर्गीक रोगापासून स्वतः:चे रक्षण करावे

गुरु असता : उच्च दर्जाची राहणी आजाराला कारणीभूत होते

शनी असता : थंडी पासून कमरेला जपावे

नेपच्युन असता अतिप्रमाणात औषध घेण्यापासून काळजी घ्यावी

*वृश्चिक रास*

या राशीत बुध असता सर्वप्रकारचा निष्काळजीपणा आणी विसराळूपणा याबाबत दक्ष राहिले पाहिजे

शुक्र असता: नैतिकता जपावी

मंगळ असता : जननेंद्रियांचे रोग होण्याची शक्यता

गुरु असता चरबीयुक्त खाणे यामुळे विकार दर्शवतो

शनि असता, बेताचेच थंड पदार्थ सेवन करावे

पुढील भागात - धनु, मकर, कुंभ, मीन राशीबद्दल



For blog article on whatsapp contact on 9819830770

१९ मे, २०१७

भविष्याच्या अंतरंगात - भाग ४



डॉ श म साठ्ये  यांच्या आरोग्य कुडंली  या पुस्तकातील काही उपयुक्त माहिती सध्या आपण वाचत आहोत . षष्ठ स्थानात मेष राशीत काही ग्रह असताना  काय काळजी घ्यायची हे आपण पाहिले . या भागात आपण वृषभ, मिथुन , कर्क या राशी बद्दल  माहिती  घेऊ

तत्पूर्वी  एक गोष्ट नमूद करावीशी वाटते . या पुस्तकाचे लेखक  स्वतः: डॉक्टर आहेत .
व्यवसायाने   प्रतिथयश डॉक्टर असूनही  अनेकांना जोतिषशास्त्र अवगत होते किंबहुना  वेळोवेळी शस्त्रक्रिया वगैरेंच्या आधी  हे डाँक्टर आवर्जून  या शास्त्राची मदत घेत असत . याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंबइचे स्त्रीरोगतद्न्य डॉ  पुरंदरे . यांच्या कार्याविषयी परत केव्हातरी .  पण उठसुठ हे शास्त्र  म्हणजे  फेकाफेकी आहे असे मानणारे अनेक डाँक्टर  दवाखान्याची , स्वतः: च्या घराची अगदी विधीवत वास्तुशांत करण्यासाठी मुहूर्त वगैरे पाहताना  दिसून आले आहेत . असो ..

षष्ठात   वृषभ, मिथुन , कर्क रास असताना घ्यावयाची काळजी 👇🏻

*वृषभ रास* : - ही राशी रुक्ष आणि थंड आहे.

जर या राशीत  बुध  असेल तर आवाजाचा वापर जपून करावा मोठ्यांदा बोलणे टाळावे .

शुक्र असेल तर मानेचे संरक्षण करावे

मंगळ  असेल तर स्वरयंत्रावर त्राण येणार नाही याची काळजी घ्यावी

गुरु असेल तर सर्वच बाबतीत ' अति 'वर्ज्य करावे

शनी असता मान व घसा याचे योग्य त-हेने विशेषतः थंडी पासून रक्षण करावे

*मिथुन रास* - ही राशी मज्जासंस्थेला  बिघडवते

या राशीत बुध  असता  फुफुस्साच्या आरोग्यासंबंधी काही व्यायाम घेतला पाहिजे

शुक्र असता रक्त चागले राहील याची काळजी घ्यावी

मंगळ असता घशाच्या विकाराची तत्पर चिकित्सा करावी

गुरु असता अन्नातील अनियमित पणा त्रासदायक ठरू शकतो

शनी असता श्वसनाचा  व्यायाम ( प्राणायाम , योग्य ) अवश्य करावा

युरेनस - मज्जासंस्थेवरील ताण टाळावा

*कर्क रास* : या राशीचा परिणाम अन्नपचनाशी संबधीत अवयव व मन यावर होतो

या राशीत बुध असता - अनावश्यक चिंता टाळाव्यात

शुक्र असता आहारातील अनियमितता टाळावी

मंगळ असता सांसर्गीक रोगापासून स्वतः:चे रक्षण करावे

गुरु असता : खाण्यातील अतिरेक टाळावा

शनी असता : आहारात जास्त थंड पदार्थ घेऊ नयेत

क्रमश:
पुढील भागात - सिंह , कन्या , तुळ, वृश्चिक राशीबद्दल


For blog article on whatsapp contact on 9819830770

१८ मे, २०१७

भविष्याच्या अंतरंगात - भाग ३


आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र यांचा जवळचा संबंध आहे. दोन्ही शास्त्रांची उद्दिष्टे शारीरिक, मानसिक आणी आत्मिक दु:खातून मानवाला मुक्त करणे ही आहेत.  तेंव्हा या दृष्टीने एखादी व्यक्ती,  तिचे शरिराची घडण, मनाची घडण यामुळे तिला होऊ शकणारे विकार व त्यासाठी करावी लागणारी उपाययोजना यासाठी जोतिष शास्त्राचा उपयोग कसा करता येईल हे डाँ श.म साठ्ये यांनी त्यांच्या *आरोग्य कुंडली* या पुस्तकात केले आहे

ज्योतिशास्त्र म्हणजे ज्योति:शास्त्र.  ह्या ज्योति आकाशातील आहेत. त्या म्हणजे सूर्य,  चंद्र इ
आकाशस्थ ग्रहादिंचा जो परिणाम प्राण्यांवर घडतो त्या संबंधी जे शास्त्र विचार करते त्याला फलजोतिषशास्त्र असे म्हणतात, याचाच एक विभाग वैद्यकिय ज्योतिष हा आहे

साधारणत: पत्रिकेतील ६ वे स्थान, त्यातील राशी,  त्या स्थानात असणाऱ्या ग्रहांवरून जातकास कुठला आजार होणार हे कळते. यात लग्न राशी, रवि, चंद्र यांचा ही अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. यासंबंधी उपयुक्त माहिती या पुस्तकात दिली आहे

या पुस्तकातील १२ वा भाग आहे  *कुंडली व आरोग्याची काळजी*हे प्रकरण सविस्तर इथे ( तीन - चार भागात)  देत आहे

तुमच्या पत्रिकेत सहाव्या स्थानात *मेष* रास असेल तर घ्यावयाची काळजी:-

मेष ही राशी उष्ण व भडक स्वभावाची आहे.

 ह्या राशीत बुध असता खूप वाचन करणे टाळावे, खुप मानसिक बौध्दिक कामे करु नयेत

शुक्र असता सौंदर्य प्रसाधने व चेहऱ्यावर,  केसांना लावण्याची लोशन्स टाळली पाहिजेत

मंगळ असता रँश अँक्शन टाळाव्यात, डोक्याला जपावे

गुरु असता वरचेवर रक्त तपासणी करावी

शनी असता थंडी पासून जपावे

युरेनस असता डोळ्यांची काळजी घ्यावी

नेपच्यून असता आपले विचार हे भ्रामक समजुती पासून दूर ठेवावेत

क्रमश:

( पुढील भागात सहाव्या स्थानात वृषभ, मिथुन कर्क रास आणि त्यात ग्रह असता घ्यावयाची का


For blog article on whatsapp contact on 9819830770

१४ मे, २०१७

भविष्याचा अंतरंगात - भाग२


उपासना आणि जातकशास्त्र
( संदर्भ : संचित दर्शन, लेखक - म.दा भट)
जातकशास्त्राच्या अभ्यासासाठी उपासनेची बैठक असावी असे म्हणले जाते. काहीही जातकशास्त्र अवगत नसताना केवळ उपासनेमुळे लाभलेल्या अंतर्ज्ञानशक्तिमुळे उत्तम शास्त्र जाणणा-या व्यक्तींपेक्षाही बरोबर भविष्य सांगणारी अनेक मंडळी आपण पाहतो
म्हणूनच शास्राच्या अभ्यासाबरोबरच उपासनेची जोड अवश्य द्यावी
*सातत्याने केलेल्या उपासना,  जप तप इ आचारांनी फल-जोतिषशास्त्र अभ्यासासाठी आवश्यक असणा-या एकाग्रता आणी अंतर्ज्ञान इ गुणांची प्राप्ती होत असतेच शिवाय संतोष, मनप्रसन्नता, आनंद आणी तृप्ती इ गोष्टींचा ही लाभ होतो*
*गणपती अथर्वशीर्ष*
ॐ कार स्वरूप मंगलमूर्ती - गणेश सर्व विद्यांचे मूळ आहे. कुठल्याही विद्येला गणेश वरदानाशिवाय जय नाही, गणेश वरदानाशिवाय वाचेला शक्ति नाही आणी सत्यता स्वरूप अभय नाही
निरंतर स्वरूपात विद्या संपादन करणा-या सच्छिष्यांचे गणपती रक्षण करतो. अशा हिरण्यगर्भ गणपतीचे पूजन आणि उपासना फलजोतिषशास्त्र अभ्यासणा-या व्यक्तीस आवश्यक आहे.
गणपतीच्या निरनिराळ्या उपासना उपलब्ध असतील पण " गणपती अथर्वशीर्ष " ही राजमान्य उपासना आहे.  ही उपासना करणाऱ्यांच्या वाचेत एक प्रकारची निष्ठा आहे त्यांच्यात एक प्रकारचे तेज ही पहावयास मिळते
वेदाध्यायी विनित: ग्रहवर्धेनपटु: सत्यवादी सुवृत्त:!
जोतिश्शास्त्रप्रवीण:ग्रहगणितपटु: सोsत्रदैवज्ञ उक्त:!
*आज संकष्टी चतुर्थी दिवशी हे संकलित लेखन झाले ही गजाननाची कृपा*
मोरया 🌺🙏🏼
पुढील भागात डाँ श म साठ्ये यांच्या *आरोग्य कुंडली* ( आयुर्वेदाद्वारा वैद्यकीय जोतिष) या पुस्तकातील संग्रहीत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे

१३ मे, २०१७

भविष्याच्या अंतरंगात


Whatsapp  वरील  जोतिष समूहावर सुरु केलेले  सादर इथे संग्रहित स्वरूपात ठेवत आहे 
---------------------------------------------------------------------------------------
मोरया 🙏🏼🌺
नमस्कार मंडळी🙏🏼,  आपल्या या जोतिष समुहामधे चर्चेसाठी सध्या वाचत असलेल्या जोतिष संबंधी पुस्तकातील उपयुक्त माहिती संकलित करून ठराविक कालावधीत द्यायचा विचार करत आहे. जेणेकरून आपण सगळे एखाद्या नियमावर चर्चा करु, इतरांचे अनुभव ही वाचू.
तर आज १३ मे २०१७ ला बुधाच्या *जेष्ठा* नक्षत्रावर याची सुरवात करत आहे. असं म्हणतात की बुध ग्रह हा पुनरावृत्तीचा कारक ग्रह आहे ( याबाबतीतही जाणकारांची मते वाचायला आवडतील) तसेच बुध हा लेखनाचा ही कारक ग्रह आहे,  म्हणूनच पुस्तक प्रकाशन, लेखन इ गोष्टी बुधाच्या नक्षत्रावर कराव्यात जेणेकरून ती ( चांगली ) गोष्ट  परत परत घडेल आणी एकंदर पुस्तकाचा, लेखनाचा TRP. वाढण्यास मदत होईल.😊
जेष्ठा नक्षत्रावर धान्यमळणी, राज्याभिषेक,  शपथविधी,  नवीन कार्यकारिणी जाहीर करणे, शस्त्रांना धार लावणे, युद्धाचीपुर्व तयारी करणे- इ. गोष्टी करतात
या नक्षत्रावर वस्तू हरवल्यास पश्चिम दिशेस शोधावी परंतु ती सहसा सापडत नाही
(संदर्भ: नक्षत्रे आणि जोतिष - मधुसुदन घाणेकर)
बुध, जेष्ठा नक्षत्र, लेखन  या वर समुहातील इतर मंडळींच्या माहितीचे स्वागत 🙏🏼
(क्रमशः)
📝

२१ एप्रिल, २०१७

श्रध्देचे व्यवस्थापन

श्रध्देचे व्यवस्थापन   हा श्री. श्रीकांत कुलकर्णी  यांनी लिहिलेला  शेगाव संस्थानवरचा एक छान लेख त्यांच्या परवानगीने  आहे तसा ' देवा तुझ्या द्वारी आलो' या  अनुदिनीवर देत आहे .
त्यांना अनेक धन्यवाद 


श्रध्देचे व्यवस्थापन करणारे विश्वस्त

“मी महाराजांची पोथी वाचते आणि तुला महाराज बोलावतात. हे काय चाललं आहे?” बायकोला कामानिमित्त मी शेगावला जाणार आहे, असे सांगितल्यावर तिने सात्विक राग व्यक्त केला. मग म्हणाली “जा जा तुम्हाला महाराज बोलावतायत दर्शन करून या.” क्षेत्राच्या ठिकाणी बोलावणे यावे लागते, ही मनाची घट्ट धारणा. अर्थात या समजुतीला चॅलेंज करण्यात काहीही अर्थ नसतो. व्यवसायात देखील कस्टमर शोधता शोधता दमछाक होणारे आपण, जर कस्टमरने आपण होऊन बोलावले तर त्यासारखे भाग्य नाही असे समजतोच की. व्यवसायात असे भाग्य नेहमी नेहमी मिळत नाही पण क्वचित आणि अवचित घडून येते. इथे तर  श्री. संत गजानन महाराज इंजिनीरिंग कॉलेजने आम्हाला आमचं software घेण्यासाठी बोलावले आणि त्यातच महाराजांचे दर्शन हा अलभ्य लाभ. दुधात साखर म्हणा वा सुनेपे सुहागा म्हणा पण हा योग जुळून आला होता. हा योग जुळून आला श्री.उमेश कौल या महाराजांच्या भक्तामुळे. त्यांची ७-८ महिन्यांपूर्वी अशीच अवचित ओळख झाली. एका Multinational मध्ये उच्चपदस्थ असलेले उमेश कौल महाराजांचे नावाने स्थापन झालेल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या १९८७च्या पहिल्या batchचे विद्यापीठात पहिले आलेले विद्यार्थी. काश्मीरमध्ये मूळ असलेले कौल पूर्ण महाराष्ट्रीय झालेत. शेगांवशी ऋणानुबंध जुळले. SAP या जगप्रसिद्ध software प्रणालीचे तज्ञ असलेले आणि त्या निमित्त जग फिरलेले कौलसाहेब महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात आणि इथे वारंवार येण्यासाठी संधी मिळावी म्हणून त्यांनी स्वत:ला कॉलेजशी आणि गजानन महाराज संस्थानशी जोडून घेतले आहे. त्यांच्या या भेटीचा योग त्यांचेच एक सहकारी श्री.मिलिंद निघोजकर यांच्यामुळे आला त्यांची ओळख देखील अगदी अलीकडची. तर या दर्शनाचा योग येण्याच्या मागच्या योगायोगाची ही कहाणी. आयुष्यातील काही चांगले योग देखील योगायोगाने घडून येतात हे मान्य करावेच लागेल. असो. हा लेख लिहिण्याचा उद्देश केवळ महाराज दर्शनयोग नसून एक अतिशय उत्तम इंजिनीरिंग शिक्षण संस्था व देवस्थान संस्थान बघावयास, अनुभवयास मिळाले हा आहे.   
वर उल्लेख केलेल्या कौलसाहेब यांनी संस्थेचे विश्वस्थ श्री.श्रीकांत पाटील यांची शनिवारची वेळ घेतली.  मी स्वत:, निघोजकरसर, कौलसाहेब आणि magic softwareचे नितीन भोसले यांनी शेगांवला शुक्रवारी दुपारी २ वा प्रयाण केले व मजल दर मजल करत रात्री ११चे दरम्यान कॉलेजच्या गेस्टहाउसवर पोहचलो. एव्हड्या रात्रीदेखील गेस्टहाउसचा स्टाफने मनापासून स्वागत केले. जेवण तयारच होते. फ्रेश होऊन जेवण घेतले आणि आपापल्या गेस्टरूममध्ये विश्रांती घेतली. एखाद्या कॉलेजचे गेस्टहाउस इतके स्वच्छ, सुंदर आणि  सुविधायुक्त असेल हा विश्वासच बसणार नाही. पण ९ तासाचा अखंड प्रवासाचा शिणवटा आल्याने आणि रूम AC असल्याने  लगेच झोपलो. म्हटले सकाळी बघू काय आहे ते. पहाटे सहा वाजतातच सातभाईंच्या कलकलाटाने जाग आली. म्हणून बाहेर आलो. २०-२५ सातभाई जमिनीवर उड्या मारताना दिसले. एकदम त्यांना काय वाटले कुणास ठाऊक सगळे ओरडत उडाले आणि झाडावर जाऊन बसले. फक्त पाच मिनिटेच काय ते स्थिरावले तोच परत कोलाहल करत जमिनीवर आले. उड्यामारणे सुरु झाले परत झाडावर बसले. झाडावर मग जमिनीवर असा १०-१५ वेळा हाच उद्योग चालला होता. मी मनापासून बघत होतो. असे करण्याचा त्यांचा काय उद्देश असेल हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पण काही हाती आले नाही. बहुदा तो त्यांचा खेळ असावा किंवा उगवत्या सूर्याचे स्वागत करण्याची त्यांच्यातली पद्धत असावी. पुण्यात सकाळी उठल्याउठल्या जी व्यवधानं सुरु होतात पक्षी बघायला कुठे वेळ आणि सातभाई तर पुण्यात दुर्मिळच झाले आहेत. गेस्ट हाउसच्या लाउंजमधून पक्षी बघता बघता हातात न मागता चहाचा कप आला. स्वर्गीय सुख म्हणजे काय ते हेच.
चहा घेऊन कॉलेजच्या आवारात एक चक्कर मारली. ४६ एकरांचे प्रचंड आवार. जागोजागी अतिशय जाणीवपूर्वक लावलेली आणि जोपासलेली विविध झाडे. सिमेंटचे उत्तम आणि रुंद रस्ते. संताची नावे दिलेल्या वेगवेगळ्या विभागाच्या इमारती. संत श्री गुलाबराव महाराजांच्या नावाने असलेली लायब्ररीची प्रचंड मोठी इमारत. पलीकडे उत्तम जोपासलेली हिरवळ असलेले क्रिकेटचे मैदान. टेनिस, व्हॉलीबॉल इत्यादीची अतिशय सुव्यवस्थित राखलेली मैदाने, संत रामदासांच्या नावे असलेले भव्य इनडोअर स्टेडीयम. १२०० खुर्च्यांचे एक आणि ४०० खुर्च्यांचे एक अशी दोन Auditoriums. डोळ्यांना सुखावणारी इमारतींची रंगसंगती. हे सगळं सकाळच्या फेरीत बघून घेतले. कॉलेजचे वेगळेपण जाणवले. ८ वाजता फिरून परत गेस्ट हाउसला आलो. कॉलेजचे एक जुने विद्यार्थी जे तिथेच उतरले होते त्यांची ओळख झाली. AIRTEL मध्ये अधिकारी असलेले मनीष कामानिमित्त अमरावतीस आले होते, या भागात आले की, इथे महाराजांचे दर्शन आणि कॉलेजला भेट देणे हा आवडीचा कार्यक्रम. इथे आले की मनास समाधान मिळते असे म्हणाले. त्यांचे सहाध्यायी असलेल्या श्रीकांत पाटलांना भेटून आणि श्रीदर्शन घेऊन मुंबईस जाणार होते. व्हरांड्यात सर्वजण जमले. तेव्हड्यात विश्वस्त श्री.श्रीकांत पाटील आले. ओळख करून देण्याचे सोपस्कार झाले. ते स्वत: याच कॉलेजचे विद्यार्थी आणि गजानन महाराज संस्थानाचे मुख्य विश्वस्त श्री शिवशंकर पाटील यांचे धाकटे चिरंजीव. अतिशय साधे, पण बोलके आणि अभ्यासू व्यक्तिमत्व. आमचे स्वागत करून आमच्या दिवसभराच्या आमच्या रुपरेखेची कल्पना दिली. ब्रेकफास्ट झाल्यावर कॉलेजची गाडी आणि संजय हा वाटाड्या बरोबर दिमतीला दिला आणि मंदिराकडे प्रयाण केले. मंदिरात सकाळपासूनच गर्दी होत असल्याने गर्दी व्यवस्थापन करणारे सेवक कार्यरत होते. संजयमुळे आम्हाला महाराजांचे दर्शन अतिशय सुलभ झाले. बाहेर देणगी स्वीकारणारे वेगवेगळे Counters होते. उत्साही उमेश कौल संस्थानविषयी भरभरून माहिती पुरवत होते. २००६ पासून संस्थानचे आर्थिक आणि इतर व्यवहार SAP या software प्रणालीशी जोडलेले आहेत. जगातले श्री गजाननमहाराज संस्थान हे अशी software प्रणाली वापरणारे पहिले NGO. संस्थानचे व्यवहार चोख आणि पारदर्शक असावेत म्हणून मुख्यविश्वस्त श्री शिवशंकर पाटील यांनी ही प्रणाली बसवून घेतली. मी पण देणगी देऊन रीतसर computerised पावती घेतली. आपल्याला पुण्यात संगणकावर काम करणारे कोट टाय घालून दिसतात. मंदिराच्या अकौंटस विभागात साधा पांढरा शर्ट, लेंगा व टोपी घातलेले अनेक कर्मचारी SAP प्रणालीवर काम करताना दिसत होते. हे चित्र डोळ्यांना जरा वेगळे दिसले. श्रीदर्शन झाल्यावर पुन्हा कॉलेजमध्ये आलो. छोट्या सभागृहात २५०-३०० विद्यार्थी जमले होते. नितीन भोसलेंनी तिथे जमलेल्या IT व computer विषयाशी संबधित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना Magic software या प्रणालीविषयी दीड तास माहिती दिली. हे सर्व करताना एक इतर कॉलेजमध्ये अभावाने आढळणारी शिस्त तिथे अनुभवत होतो.
प्रेझेन्टेशन झाल्यावर विश्वस्त श्री. श्रीकांत पाटील आणि प्रिन्सिपॉल डॉ.सोमाणी यांनी कॉलेजचे वेगवेगळे विभाग दाखवले. १ लाख पुस्तके आणि ७०० मुले एकावेळी बसू शकतील एव्हडी मोठी लायब्ररी इथे आहे. या लायब्ररीची इमारत इकोफ्रेंडली आहे. बाहेर कितीही उन्हाळा असला तरी आत नैसर्गिक गारवा राहील याची व्यवस्था केलीय. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संख्येने लायब्ररीचा वापर करतात. विविध विषयांची टेक्नीकल मासिके, catelog इथे उपलब्ध आहेत. IT व computer विभागात संस्थेचे आणि संस्थानचे web server, SAP servers आहेत. बाराही महिने आणि २४ तास कॉलेज व्यवस्थापन स्वत: त्यांची निगा राखते. संस्थानचा पैसा म्हणजे भक्तांचा पैसा ही धारणा असल्याने प्रत्येक बाबतीत स्वनिर्भर राहण्याचा प्रयत्न दिसून आला. महागडी AMC देण्यापेक्षा शिक्षकांनी स्वत:च शिकून घेणें cost effective ठरते याची जाणीव प्रत्येकास आहे. विदर्भात कमालीची उष्णता असल्याने प्रत्येक इमारतींच्या उभारणीत आत नैसर्गिकरीत्या गारवा राहील अशी व्यवस्था केली आहे. विश्वस्थ श्रीकांत पाटील यांनी प्रत्येक ठिकाणी अभ्यासपूर्वक संस्थेची उभारणी केली आहे हे जाणवते. विदर्भासारख्या भागात चांगले शिक्षक यावेत यासाठी कॉलेजच्या आवारातच त्यांना सहकुटुंब राहता येईल अशा क्वार्टर्स बांधल्या आहेत.
उत्तम उद्योजक निर्माण करण्यासाठी कॉलेजनेच स्वत:चे भव्य Incubation center काढले आहे. अतिशय देखणे असे हे सेंटर सर्व अत्याधुनिक सुविधायुक्त आहे. इथे नवउद्योजकास जागेपासून संशोधनाच्या सर्व सोयी दिल्या जातात. यासाठीचा सर्व खर्च संस्था आपल्या अंगावर घेते. संशोधन पूर्ण झाले तर उद्योजकास मार्केटिंगसाठी देखील मदत करते. तो लवकरात लवकर स्वनिर्भर होईल हे बघते. या ठिकाणी सोलर सिस्टीम वर संशोधन करून अनेक उत्तमोत्तम Products बनवली आहेत जी ग्रामीण भागात सहज वापरली जाऊ शकतात. यात सोलर lighting, सोलर पंप अशी अनेक products आहेत. ५-६ तरुण उद्योजक त्यांचे संशोधन इथे करत असताना दिसले. Mechanical विभागात २५ CNC machine simulators बसवले आहेत. हे simulators खास अमेरिकेतून आणले आहेत. याविभागात साधारण १० वी-१२ वी पास मुलांना CNCचे ट्रेनिंग दिले जाते. अशी ३५०० मुले शिकून तयार केली आहेत. त्यातील ७०% मुलांना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. इथेच एक workshop आहे. तिथे प्रेस्ड पार्टस साठी लागणारे डाय बनवले जातात. अशा प्रकारच्या डाय बनवण्यासाठी अत्यंत काटेकोरपणा लागतो. हे त्या विषयातील तज्ञ मंडळींना माहित असते. ह्या सुविधेचा फायदा अनेक मोठे उद्योग घेतात. हे सर्व विद्यार्थ्यांकडून करून घेतले जाते. इतर कॉलेजमध्ये शिक्षण-उद्योग नात्याची केवळ चर्चा होते. इथे ते प्रत्यक्षात आणले आहे, ते देखील पुण्या-मुंबईपासून दूर आडजागी. अभियांत्रिकी पदवी व्यतिरिक्त गरीब व कमी शिकलेल्या मुलांसाठी कुशलता निर्मिती हा मोठा कार्यक्रम कॉलेज व्यवस्थापन चालवते. कॉलेजमधील सुविधा इंजिनीरिंगच्या मुलांसाठी असल्या तरी, त्या वापरून इतर गरीब मुलांचा स्तर कसा उंचावता येईल हे विश्वस्त या नात्याने श्री पाटील  स्वत: बघतात. कॉलेजचे आवर फिरताना मुले मुली मोकळेपणाने हिंडत होती पण कुठेही पुण्यामुंबईत दिसणारा पोशाखी वाह्यातपणा दिसला नाही. हे वेगळेपण मुद्दाम नमूद करणे जरुरी आहे.  
दुपारी श्रीकांत पाटील यांच्याशी पुन्हा मीटिंग झाली. त्यात त्यांनी आमच्या software मधील बारकावे समजून घेतले. अतिशय नेमके प्रश्न विचारून स्वत:च्या सर्व शंकांचे निरसन करून घेतले. समोरच्यावर कोणतेही दडपण येणार नाही अशी त्यांची एकंदर कामाची शैली जाणवली. पाच वाजता त्यांनीच आठवण केली आणि संस्थानचे स्वयंपाकघर आणि आनंदसागर बघून या असे सुचवले. शेगाव संस्थानचे स्वत:चे अत्याधुनिक किचन बघण्यासारखे आहे. दर ताशी ४०००० पोळ्या करणारे मशीन इथे आहे. हे मशीन जर बंद पडले तर तशी १०००० पोळ्या बनवणारी २ मशिने standby म्हणून आहेत. एका बाजूने कणिक घातली की दुसर-याबाजुने भाजलेली पोळी बाहेर पडते. एकावेळी १०० किलोचा भात, ७५ किलो भाजी, ५०किलो डाळ, १०० डीशेस शिरा, पोहे, उपमा ई. सर्व करणारी अवाढव्य मशीन्स अव्याहत भक्तांना अन्न पुरवतात. सर्व मशिनरी स्टेनलेस स्टीलमध्ये बनवली आहे. इथे कमालीची स्वच्छता आहे. अन्नगृहाला अव्याहत शुद्ध पाणी मिळण्यासाठी प्रचंड मोठे RO plants उभारले आहेत. इथे बनवलेले पदार्थ संस्थानच्या स्पेशल गाड्यातून गावातील वेगवेगळ्या भोजनगृहात, भक्त निवासात, कँटीन इत्यादी मध्ये तत्परतेने पोचवले जाते. या ठिकाणी येणाऱ्या भक्तांचा अंदाज घेऊन वेगवेगळ्या ठिकाणावरून डिमांड स्वयंपाकघरास मोबाईल वरून कळवली जाते. आणि त्या अंदाजाने अन्न बनवून पुरवले जाते. या कामाची अवाढव्यता वर्णन करता येण्यासारखी नाही. पण ही द्रौपदीची थाळी अव्याहत अन्नदान करत असते. इथले व्यवस्थापन भल्याभल्यांना (म्हणजे व्यवस्थापन तज्ञांना) तोंडात बोट घालायला लावणारे आहे. कुठेही गोंधळ नाही, अन्नाची नासाडी नाही, कुणीही उपाशी राहणार नाही. स्वयंपाकघराला लागून मोठी Laundry आहे इथे संस्थानाच्या भक्त निवासातील बेडशीटे, अभ्रे, सेवकांचे युनिफार्म धुवून वाळवून इस्त्री केले जातात. मोठमोठी वॉशिंगमशीन इथे आहेत. इथे देखील कमालीची स्वच्छता. मुख्य म्हणजे कोणताही कामगार (खरे म्हणजे सेवक) अवांतर टाईमपास करताना दिसला नाही. ३५०० सेवक व स्टाफ असलेले हे संस्थान आहे. सर्वजण आपले काम महाराजांची सेवा या भावनेतून करत असल्याने त्यात ओलावा  आहे. कुठेही मदत लागली तर हे सेवक आनंदाने, आत्मीयतेने मदत करताना दिसतात. आपल्या स्टाफ व कामगारांना शिस्त लावताना दमछाक झालेल्या उद्योजकांना संस्थानचा HR हा अभ्यास विषय आहे.
आता आनंदसागरकडे प्रस्थान केले. शेगावला गेलात की आनंदसागर बघाच असे अनेकांनी सांगितले. मनात एखादी बाग असेल अशी कल्पना केली. तिथे गेलो तर आपली कल्पनाशक्ती किती खुजी आहे याची जाणीव झाली. एका प्रचंड मोठ्या कृत्रिम तलावात कृत्रिम बेटं बनवली आहेत. रात्री दिव्यांची रोषणाई डोळ्याचे पारणे फेडते.  त्यातील एका टेकडीसदृश बेटावर देखणे ध्यानमंदिर केवळ अप्रतिम. मनोहारी landscape आणि waterscape  डोळ्याचे पारणे फेडते. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या भागात अडवलेल्या पाण्यातून साकारलेले हे लेणे बघण्यासारखे तर आहेच, पण अचंबित करणारे आहे. स्वच्छता तर शेगावला ठाईठाई आहे तशीच इथे देखील आहे. श्रीकांत पाटलांचे थोरले बंधू नीलकंठ पाटील यांनी हे साकारले आहे. आनंदसागराचे वर्णन मी करण्यापेक्षा ते बघणेच जास्त श्रेयस्कर ठरेल. आनंदसागर सागर बघितल्यावर परत दर्शन योग होता त्यामुळे महाराजांचे दर्शन झाले.
रात्री परत गेस्टहाउसवर आलो. श्रीकांत पाटील परत आमची खुशाली समजून घेण्यास आले. काही त्रास झाला नाहीना अशी विचारणा केली. फार लाजवतात हो ही मंडळी त्यांच्या अगत्याने आणि वर विचारतात काही त्रास तर झाला नाही ना? त्रास होण्यासारखे काही नाहीच आहे. शेगावचे पाणी आणि माती वेगळी आहे हे नक्की. संध्याकाळी पाटीलसाहेबांचे काही मित्र आले होते. शेगावच्या ‘श्री’ टॉकीजचे मालक श्री मोहंमद असिफ (आडनाव कदाचित वेगळे असेल) आले होते त्यांची ओळख झाली. ते देखील कॉलेजचे माजी विद्यार्थी व  विश्वस्त. त्यांच्या आजी महाराजांची भक्त. तिने महाराजांना प्रत्यक्ष बघितले होते. मशिदीत ते येत असत असा उल्लेख त्यांनी केला. गजानन महाराजांविषयी भरभरून बोलत होते. श्री गजानन महाराज फकिरी आयुष्य जगले. ही अवस्था सन्याश्याच्या पलीकडची. (आता तर काय संन्यासी राज्यकर्ते बनू लागलेत . असो.) इथे अंगावरचे कपडे देखील ‘विषय’ ठरतो. म्हणून त्याज्य.  माझं काहीच नाही अशी ही अवस्था. हे शरीर देखील त्याने दिलंय तो म्हणेल तोपर्यंत वापरणार. अशा फकिराच्या पश्चात त्याच्या नावे एव्हडे भावनेचे, श्रद्धेचे साम्राज्य उभे रहाते. खरचं अनाकलनीय आहे. जगात प्रत्येकाला आयुष्यातल्या कोणत्यातरी अनाकलनीय भीतीने ग्रासले आहे. माझं आज ठीक चाललं आहे, पण महाराज पुढे देखील माझे असेच सुरळीत चालू द्या. काही विघ्न नको. तर  काहींना काहीतरी विघ्न आहे, आजारपण आहे, धंद्यातली आर्थिक खोट आहे, मुलांचे प्रश्न आहेत आणि हे मलाच का? माझ्याच वाट्याला का? ह्या प्रश्नांची  उत्तरं मिळत नाही. महाराज उत्तर नाही दिले तरी चालेल पण सुटकेचा मार्ग दाखवा. मी १९८१ साली इथे आलो होतो. मंदिर तेंव्हा अतिशय लहान होते. जेमतेम रांग होती ५-१० मिनिटात दर्शन झाले. आता नेहमीच्या दिवशी एखादा तास लागू शकतो. सुबत्ता आली, technology आली तशी आयुष्यातली अनाकलनीयता, आकस्मितता,  अस्थिरता कमी न होता,  वाढली आहे. काही जण आपलं दुख: सांगण्यास इथे येतात. काही जण मनास बरे वाटते म्हणून येतात, काही संकटांशी सामना करण्यास शक्ती मागण्यासाठी येतात. काहींना काहीतरी मिळाले असते म्हणून महाराजांचं दर्शन हव असत. एकंदर आम्ही ‘विषयातच’ राहणार, पण हे फकीरा आम्हाला सुखी कर ही थोडी विसंगती आहे. पण एक लक्षात घ्या सामान्य माणूस असेच करणार त्याला संसारपण हवाय, विषयपण हवाय आणि सुख देखील हवंय. महाराज त्यासाठी मार्ग दाखवतात ही श्रद्धा. ज्या प्राण्याला बुद्धी आहे त्याला श्रद्धा असणारच. अगदी हार्डकोर नास्तिक कम्युनिस्टाची  देखील फक्त मार्क्सचच तत्वज्ञान माणसाला सुखी करेल अशी श्रद्धा असतेच की. पण एक सांगतो श्रद्धा ही इथली शक्ती आहे, Motivation आहे, भविष्याची आशा आहे. गजानन महाराज संस्थान हे अव्याहत चालणारे मशीन आहे. इथे श्रद्धेचा बाजार नाही तर इथे तुमच्या श्रद्धेचे व्यवस्थापन केले जाते. देशात आणि परदेशात आज अनेक महाराज आपले पॉश ५ स्टार आश्रम थाटून बसलेत. तुम्हाला मन:शांती हवीय मग मोजा पैसा, आम्ही तुमच्या श्रद्धेचे, सुखाचे आनंदाचे एकमेव एजंट आहोतच, आमच्या मोहमयी बोलण्यातून तुम्हाला आनंदाचा मार्ग दाखवतो. पण इथे असे मोहमयी बोलणारं कुणी नाही. महाराजांचं केवळ दर्शन आत्मिक आनंद देतं. देणगी देणे केवळ ऐच्छिक. पैसा न दिला तरी प्रसाद मिळेलच त्या बरोबर दर्शन आनंदही मिळेल अगदी फुकट. हे वेगळेपण आहे इथले.    

संस्थानचे इथे अनेक भक्त निवास आहेत. तिथे शेकडो खोल्या AC सारख्या सुविधांसकट आहेत. अत्यंत सवलतीच्या किमतीत इथे राहण्याची सुविधा मिळते. सुविधा इतकी की, कुठेही तक्रार करण्यास वाव नाही. येणाऱ्या भक्तास खात्रीने समाधान मिळते. कुठेही भक्तांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली जाते. शेगाव हे खऱ्या अर्थाने तीर्थक्षेत्र आहे हे जाणवते. यात प्रचंड मोठा वाटा श्रीकांत पाटील यांचे पिताश्री श्री. शिवशंकर पाटील यांचा आहे. ते आज नव्वदीच्या घरात आहेत. त्यांची गाठ पडू शकली नाही. पण लोकांच्या बोलण्यातून जे कळले ते असे की, शेगावचा हा कायापालट शिवशंकर पाटलांनी त्यांच्या कल्पनेतून साकारला. महाराजांच्या पोथीत उल्लेख असलेल्या भक्त श्री. महादजी पाटलांचे हे वंशज. त्यांना भेटू शकलो नसलो तरी श्री शिवशंकर पाटील यांच्या पुढे नतमस्तक झाल्याशिवाय रहावत नाही. खऱ्या अर्थाने विश्वस्त असलेले शिवशंकर आणि त्यांचे कुटुंबीय हे निस्वार्थीपणाची कमाल आहेत. लोकांनी श्रद्धेने दिलेल्या देणग्यांचे व्यवस्थापन “इदं न मम’ म्हणत करणे अवघड  आहे. इथे लोकांनी दिलेल्या प्रत्येक पैशाचा विनियोग केवळ लोकांसाठी केलेला आहे. मग गावातील रस्ते असोत, भक्त निवास असोत, शाळा-कॉलेज असो, भोजन व्यवस्था असो की आनंदसागर सारखे सौदर्यस्थळ असो. विश्वस्त कसे असावेत याचा वस्तुपाठ म्हणजे श्री. शिवशंकर पाटील व त्यांचे कुटुंबीय. आमचे स्नेही श्री. उमेश कौल सांगत होते की, शिवशंकर पाटील त्यांच्या ऑफिसमध्ये पाणी आणि चहाचा थर्मास देखील घरून घेऊन येतात. आधुनिक शेगावच्या या निर्मात्याचा किती हा निर्मोहीपणा. ‘गण गण गणात बोते.’ या महाराजांच्या उक्ती प्रमाणे गणांचा (भक्तांचा) पैसा गणात बोणाऱ्या (रुजवणाऱ्या) ह्या महाराजांच्या भक्तास त्रिवार नमस्कार. श्री गजानन महाराजांच्या आशीर्वादाने ही पाटील घराण्याची ही पाटीलकी अव्याहत चालू राहो, अशी इच्छा व्यक्त करून हा लेख इथेच संपवतो.
आवडला तर पुढे पाठवा.

श्रीकांत कुलकर्णी
९८५००३५०३७

२८ मार्च, २०१७

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

देवा तुझ्या  द्वारी आलो संकेतस्थळा तर्फे सर्वांना  गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 

चालू  हेमलंबी नाम संवत्सर आपणा सर्वास भरभराटीचे जावो 



२७ जानेवारी, २०१७

देव पावला

देव  पावला 

सरकारी कार्यालयात देव देवतांचे फोटो यापुढे लावता येणार नाही हा राज्य सरकारने घेतलेला आदेश मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली. 
परिपत्रक मागे घेण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज सकाळी १० वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तेव्हा ' हा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला नसून तो ग्रामविकास खात्याने काढला आहे. या बाबतीत चौकशी करून या विभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार येईल' असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे देसाई यांनी सांगितले. 
सरकारी कार्यालयात विविध धर्मांच्या देवांची प्रतीके, छायचित्र वा धार्मिक चिन्हे भिंतीवर लावण्यास मनाई करणारे परिपत्रक काढण्यात आले होते.


http://www.lokmat.com/storypage.php?catid=10&newsid=18267134

११ जानेवारी, २०१७

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या