२० जानेवारी, २०२६

प्रार्थना

*🍁 प्रार्थना 🍁*                     

( what's App साभार ( माघ शु. द्वितीया, २० जाने २६)

एकदा एका शिष्याने समर्थ रामदासांना विचारले , "गुरुजी ,प्रार्थनेचे अनंत प्रकार आहेत. कोणी वाद्य वाजवून 
कोणी गाऊन ,ओरडून
कोणी करूणा भाकून
कोणी डोळे मिटून तर कोणी मौन प्रार्थना करतात. पण प्रार्थना मौन असली तरी ओठ हलतात ,चर्येवर भाव उमटतात, आपण मात्र अगदी निश्चल राहून प्रार्थना करता, असे का ?"

*रामदास स्वामी हसले,म्हणाले, "एकदा मी असा प्रसंग पाहिला की, एका राजवाड्याच्या दारात एक भिकारी उभा होता.अत्यंत कृश, पोट खपाटीला गेलेलं, अंगावर चिंध्या, आत्ता पडेल की मग पडेल अशी स्थिती. डोळे आशाळभूतासारखे सर्वांवरून फिरत होते.थोडा वेळ वाट पाहून राजाने त्याला बोलावले.विचारले, "बोल, काय पाहिजे तुला?"*

"माझ्याकडे पाहून मला काय पाहिजे असेल हे जर समजत नसेल, तर मला काहीच मागायचे नाही. मी तुमच्या द्वारी उभा आहे !माझ्याकडे नीट पहा, माझं असं असणं, माझी अवस्था, हीच माझी प्रार्थना आहे. या वेगळं शब्दात काय सांगू?"

*समर्थ म्हणाले, "त्या दिवसापासून मी प्रार्थना बंद केली. मी परमेश्वराच्या दारी उभा आहे. तो अंतर्यामी आहे, माझ्या मनात काय आहे ते तो जाणतो. या परते शब्दात काय मागू ?  'तो' बघून घेईल. जर माझी 'स्थिती' काही सांगू शकत नसेल तर शब्द काय सांगणार? जर माझी 'अवस्था' त्याला समजत नसेल, तर शब्द काय समजणार?*

म्हणून 

*अंतःकरणातले भाव आणि दृढ विश्वास हेच खर्‍या परमेश्वर प्रार्थनेचे लक्षण आहे. तिथे 'मागणं' काही उरत नाही.तुम्ही प्रार्थनेत 'असणं' हेच पुरेसं असतं*

*।।।जय जय रघुवीर समर्थ।।।*
                    ...🙏....

५ जानेवारी, २०२६

सद्गुरू प्रार्थना

🙏🙏 "सद्गुरू प्रार्थना" 🙏🙏




सद्गुरु नाथा, हात जोडीतो अंत नको पाहू |
उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू
 ||धृ||

निशीदिनी श्रमसी,मम हितार्थ तू,किती तुज शीण देऊ |
ह्रदयी वससी,परी नच दिससी,कैसे तुज पाहू ||१||

उत्तीर्ण नव्हे,तव उपकारा, जरी तनु तुज वाहू |
 बोधूनि दाविसी,इहपर नश्वर, मनी उठला बाऊ ||२||

कोण,कुठील मी,कवण कार्य मम,जनी कैसा राहू |
करी मज ऐसा,निर्भय निश्र्चल,सम सकला पाहू ||३||

       अजाण हतबल,भ्रमित मनिची,तळमळ कशी साहू |
       निरसूनी माया,दावी अनुभव,प्रचिती नको पाहू ||४||

सद्गुरु नाथा,हात जोडीतो, अंत नको पाहू |
उकलुनी मनीचे,हितगुज सारे,  वद कवणा दावू
 ||धृ||

 🙏 🌹श्री स्वामी समर्थ🌹 🙏


३ जानेवारी, २०२६

श्री शंकर महाराज स्तवन

श्री शंकर महाराज स्तवन:




संतवर्य श्री योगिराज प्रभु शंकरमहाराज
वंदन करुनी चरणि अर्पितो भक्तीचा साज।।१।।

अतर्क्यलीला, अगाध महिमा, अमर्याद करणी
सदैव आम्ही नतमस्तक हो, आपल्याच चरणी।।२।।

इष्टदेवता ग्रामदेवता स्थानदेवताही
सर्व देवता आमच्या अगदी आहेत हो तुम्ही।। ३।।

सकलहि देवांच्या रूपात तुम्ही दर्शन देत
अधिकार हा प्रचंड तुमचा कळूनिया येत।।४।।
अशक्य जे जे जगी, सहज ते तुम्हालाच शक्य
तुम्ही कोण? हे ओळखणे ही मानवा न शक्य।।५।।

जी जी इच्छा मनी धरावी पूर्ण तुम्ही करता
जे जे तुमच्या मनात येईल, करून दाखविता।।६।।

भूत भविष्य नि वर्तमान हे तुमच्या हातात
महाकाळ हा तुम्हापुढे हो होई भयभीत।।७।।
तुम्हा पाहणे, तुम्हांस स्मरणे, घेणे दर्शन
भाग्यविण या गोष्टी साऱ्या, येती ना घडुन।।८।।

तुमच्या चरणी सतत आमची वाढावी निष्ठा
अयोग्य गोष्टी आम्हाला हो वाटाव्या विष्ठा।।९।।

धरले आम्ही भावे तुमचे, जगी घट्ट चरण
सोडणार कधि नाही आम्ही, आले जरी मरण।।१०।।

नित्य घडावे स्मरण नि पूजन, देहच रंगावा
शंकर महाराजांचा जयजयकार मुखी व्हावा।।११।।

अकरा कवनांचे हे स्तोत्र पठण करता दिनरात
विजयी होईल सर्वत्र कामना पूर्ण होतील।।१२।।

।। संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज शंकर महाराज की जय !!

( From whatsapp group forward )

श्री क्षेत्र नृसिंहवाडी भूपाळी





गोंदवलेकर महाराज नित्य काकड आरती


हम गया नही जिंदा है.

Whatsaap Forward 

 श्रीस्वामी समर्थांसारखी असामान्य विभूती या ग्रहगोलांच्या कधीच अधीन नसतात उलट ग्रहगोलच त्यांच्या अधीन असतात. स्वामींच्या हातातली गोटी हे अखिल ब्रह्माण्डस्वरूप आहे. ज्यांना अखिल ब्रह्माण्ड एका गोटीसमान आहे त्यांच्यावरती ग्रहगोल काय परिणाम करणार ? अशा सिद्ध कोटीला पोचलेल्या महापुरुषांवरती ग्रहगोलांचे परिणाम होत नसतात. 



जातक रहस्य या पुस्तकात जोतिषी कै. राजे असं लिहितात " की, तिसरा वर्ग सिद्ध लोकांचा असतो. हे लोक ग्रह परिणामातीत असतात. ज्यांना सुख ,दुःख ,लाभ ,हानी ,जन्म मृत्यू सारखेच असतात. त्यांना त्रिविध तापाची बाधा होऊच शकत नाही. अशा लोकांनी आपल्या साधनेद्वारे मन जिंकलेले असते. अशा सिद्धांना गुरुचंद्राच्या शुभ युतीचे फायदे होत नसतात कि शनी रवी युतीचे अशुभ परिणाम होत नसतात किंवा राहू गुरु चांडाळ योग त्यांचे वाकडे करू शकत नाही, रवी मंगळ अंगारक योग त्यांना कुठली पीडा देऊ शकत नाही. रवी चंद्र यांचा अमावस्या योग त्यांचे काहीच बिघडवू शकत नाही. राहू केतू यांचा रवी चंद्राशी होणारा ग्रहण योग त्यांची होणारी दिगंत कीर्ती रोखू शकत नाही. अशा सिद्धांवरती फक्त नेपच्यून,हर्षल, गुरु आणि शनी या ग्रहांचेच थोडेफार परिणाम होत असतात. ते सुद्धा फक्त अध्यात्मिक बाबतीत. हे परिणाम सुद्धा हे सिद्ध आपल्या साधनेद्वारे त्यांना जर वाटले तर ते सुद्धा बदलवू सुद्धा शकतात अथवा त्यांचे होणारे परिणाम पुढे मागे करू शकतात. "आपण सुद्धा सामान्य आहोत असेच बरेचदा दाखवण्याचा सिद्धांचा प्रयत्न असतो आणि त्यातून त्यांच्या जन्मकुंडल्यांचा उगम होतो.

 एकदा चिंतोपंत टोळांच्या घरी स्वामी समर्थांचा मुक्काम असताना "श्रीं'ची स्वारी घराबाहेरील अंगणात बिछान्यावर पहुडली होती. मंडळींशी गप्पा सुरू होत्या. त्या नादात मध्यरात्र केव्हा झाली हे कुणालाच समजले नाही. तेवढ्यात श्रीसमर्थांनी खड्या आवाजात एक जुनी लावणी चालीवर म्हणावयास सुरुवात केली.
 गोरे ग रूप तुझे | 
 तुला पाहिले | 
 सात ताल माडीवरी || 

 श्रीं'च्या तोंडी ही शृंगारिक लावणी पाहून सर्वांनाच मोठे आश्र्चर्य वाटले. तेवढ्यात चिंतोपंतांनी थोडे धाडसकरून विचारले, " महाराज, आपण पूर्वाश्रमी गृहस्थ होता असे वाटते. आपण आपली जात कोणती हे कृपा करून सांगाल का?' त्यावर श्रीसमर्थ चटकन म्हणाले, "आमची जात चांभार, आई महारीण आणि बाप महार.' एवढे सांगून ते पोट धरधरून खो-खो हसत सुटले. पुढे मात्र एकदा कर्वे नावाच्या एका गृहस्थांनी या संदर्भात खुलासेवार सांगण्याची विनंती केल्यावर दत्तावधूत यतिराज त्यांना म्हणाले - "आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण. आमचे नाव नृसिंह, काश्यप गोत्र, आमची मीन राशी, पुन्हा विचारल्यास टाळक्यात पायपोस.' स्वामी समर्थांची जी पत्रिका नाना रेखी यांनी तयार केली तिला स्वामी समर्थांनी मान्यता दिली होती, त्या पत्रिकेवरही"नृसिंहभान' असेच टोपण नाव आढळते; मात्र श्रीसमर्थांनी आपली राशी मीन असे का सांगितले याचे कोडे उलगडत नाही. वास्तविक त्यांचे जन्म लग्न मीन आहे. त्यामुळे त्यांना आपली लग्नराशी अभिप्रेत असावी असे वाटते. कारण सदर पत्रिकेत त्यांची चंद्रराशी मेष दाखविली आहे. तसेच, सदर पत्रिकेत यजुर्वेदी ब्राह्मण, कश्यप गोत्र असेच लिहिले आहे. (ही पत्रिका पाहिल्यावर " नौबत बजाव " असे शब्द श्रीमुखातून बाहेर पडले व दक्षिणा म्हणून श्रीसमर्थांनीनानाजींच्या उजव्या हातावर आत्मलिंगाचा प्रसाद दिला. त्याच वेळी त्यांच्या हातावर नीलवर्णाचे लहानसे विष्णुपाद उमटले. ते मरेपर्यंत त्यांच्या हातावर होते असे म्हणतात.) श्री स्वामी समर्थ यांची स्वामी आदेशा वरून श्री .नाना रेखी यांनी तयार केलेली पत्रिका (मुळ प्रत) अशी आहे . अहमदनगरच्या मठात त्याचे दर्शन होते संवत्सर शके १०७१, चैत्र शुद्ध द्वितीया ,अश्विनी नक्षत्र,द्वितीय चरण ,प्रितियोग ,टोपण नाव नृसिंहभान ,आद्य नाडी,देव गण ,मेष राशी ,राशी स्वामी मंगळ,जन्म काळ सूर्योदयापूर्वी दोन घटिका, जन्म नाव-चैतन्यस्वामी,यजुर्वेदी ब्राह्मण,काश्यप गोत्र. 
🌹प्रस्तुती : श्री वामन रूपरावजी वानरे. मो.9826685695.


 

२८ डिसेंबर, २०२५

शनी देव, गुरुदेव

.(Whatsapp साभार)  
न्यायदेवता शनि महाराज म्हणजे कर्माचा न्याय. शनि देवांचा जन्मोत्सव सोहळ्यातील शनी महाराजांचे दर्शन. आपण जे करतो, जसं जगतो, ज्या भावना मनात ठेवतो त्याचं फळ शनि देतात. त्यामुळे शनि भीतीचा विषय वाटतो. त्रास, विलंब, अडथळे हे शनीशी जोडले जातात. पण खरं पाहिलं तर शनि शिक्षा देत नाहीत. ते शिकवतात

. माणसाला आतून मजबूत करतात, अहंकार झडवतात आणि संयम शिकवतात.

दत्त महाराज मात्र करुणेचा महासागर आहेत. ते फक्त कर्म पाहत नाहीत, तर त्या कर्मामागचा आपला भाव पाहतात. चुकांमध्ये अडकलेला भक्त असो वा संकटात सापडलेला मनुष्य दत्तगुरु त्याला एकटे सोडत नाहीत.जिथे शनि नियम आहेत, तिथे दत्त महाराज मार्गदर्शन आहेत. जिथे शनि थांबवतात, तिथे दत्त महाराज हात धरून पुढे नेतात.

म्हणून असं म्हणतात की शनीची साडेसाती किंवा अडचणीचा काळ सुरू झाला, की दत्त महाराजांची उपासना करावी. कारण दत्तगुरु शनीचा कोप टाळत नाहीत, पण त्या काळात माणसाला तग धरायला शक्ती देतात. त्रास कमी होतो असं नाही, पण त्रास सहन करण्याची ताकद येते. आणि तीच खरी कृपा असते.

शनि माणसाला बाहेरून शिस्त लावतात, तर दत्त महाराज आतून बदल घडवतात. शनीकडे गेलं की आपण कर्म सुधारायला शिकतो. दत्त महाराजांकडे गेलं की मन शुद्ध करायला शिकतो. दोघांचा मार्ग वेगळा असला तरी उद्देश एकच आहे माणसाला योग्य दिशेने नेण.

म्हणून दत्त भक्तांसाठी शनि भीतीचा नाही तर परीक्षेचा देव ठरतो. आणि त्या परीक्षेत पास होण्यासाठी दत्त महाराज हेच खरे गुरू ठरतात.
श्री शनि महाराज की जय ll
ll  जय गुरुदेव ll
©श्री दत्तरूप ll

६ डिसेंबर, २०२५

मार्गशीर्ष मास आर्द्रा नक्षत्र विशेष


🍀 मार्गशीर्ष मास आर्द्रा नक्षत्र विशेष 🍀 ( Whatsapp साभार) 

येणारी तारीख 06/12/2025 शनिवार हा मार्गशीर्ष महिन्यातील महा आर्द्रा नक्षत्र आहे. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान शंकर ब्रह्मा आणि विष्णू यांच्या समक्ष लिंगस्वरूपात प्रकट झाले होते आणि त्या दिवशीच भगवान ब्रह्मा व भगवान विष्णूंनी प्रथमच शिवलिंगाची पूजा केली होती. त्या दिवसापासून भगवान शंकराच्या लिंगस्वरूप पूजेची परंपरा सुरू झाली.

यावेळी हे नक्षत्र शनिवार, 06/12/2025 रोजी येत असल्याने सर्वांनी शिवपूजा करणे, शिवदर्शन घेणे, मंदिरात जाणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. या दिवशी शिवलिंगाच्या दर्शनाचे महत्त्व शब्दात वर्णन करता येणार नाही.

शक्य असल्यास संपूर्ण शिवपूजा, अर्चना, आरती करावी, महादेवांना प्रसाद अर्पण करावा आणि मंदिरात 11, 21, 51 किंवा 108 दिवे लावावेत. मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीही दिवे प्रज्वलित करावेत. या दिवशी दिवे लावण्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे.

या दिवशी शिवलिंगाची पूजा केल्यास शंभर महाशिवरात्रीच्या पूजेइतके पुण्य प्राप्त होते. त्यामुळे या दिवशी निश्चित शिवदर्शन व पूजन करावे आणि या महा आर्द्रा नक्षत्राविषयी सर्वांना माहिती द्यावी. तुम्ही जितक्या लोकांना ही माहिती पोहोचवाल, तितकी भगवान शिवांची कृपा तुमच्यावर अधिकाधिक होईल.

शंभर महाशिवरात्रीची पूजा केल्याएवढे पुण्य, फक्त या एका दिवसाच्या पूजेमुळे लाभते, आणि तो दिवस म्हणजे—
मार्गशीर्ष मास, आर्द्रा नक्षत्र.

🙏 जय भगवान शिव 🙏

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या