श्रीस्वामी समर्थांसारखी असामान्य विभूती या ग्रहगोलांच्या कधीच अधीन नसतात उलट ग्रहगोलच त्यांच्या अधीन असतात. स्वामींच्या हातातली गोटी हे अखिल ब्रह्माण्डस्वरूप आहे. ज्यांना अखिल ब्रह्माण्ड एका गोटीसमान आहे त्यांच्यावरती ग्रहगोल काय परिणाम करणार ? अशा सिद्ध कोटीला पोचलेल्या महापुरुषांवरती ग्रहगोलांचे परिणाम होत नसतात.
जातक रहस्य या पुस्तकात जोतिषी कै. राजे असं लिहितात " की, तिसरा वर्ग सिद्ध लोकांचा असतो. हे लोक ग्रह परिणामातीत असतात. ज्यांना सुख ,दुःख ,लाभ ,हानी ,जन्म मृत्यू सारखेच असतात. त्यांना त्रिविध तापाची बाधा होऊच शकत नाही. अशा लोकांनी आपल्या साधनेद्वारे मन जिंकलेले असते. अशा सिद्धांना गुरुचंद्राच्या शुभ युतीचे फायदे होत नसतात कि शनी रवी युतीचे अशुभ परिणाम होत नसतात किंवा राहू गुरु चांडाळ योग त्यांचे वाकडे करू शकत नाही, रवी मंगळ अंगारक योग त्यांना कुठली पीडा देऊ शकत नाही. रवी चंद्र यांचा अमावस्या योग त्यांचे काहीच बिघडवू शकत नाही. राहू केतू यांचा रवी चंद्राशी होणारा ग्रहण योग त्यांची होणारी दिगंत कीर्ती रोखू शकत नाही. अशा सिद्धांवरती फक्त नेपच्यून,हर्षल, गुरु आणि शनी या ग्रहांचेच थोडेफार परिणाम होत असतात. ते सुद्धा फक्त अध्यात्मिक बाबतीत. हे परिणाम सुद्धा हे सिद्ध आपल्या साधनेद्वारे त्यांना जर वाटले तर ते सुद्धा बदलवू सुद्धा शकतात अथवा त्यांचे होणारे परिणाम पुढे मागे करू शकतात. "आपण सुद्धा सामान्य आहोत असेच बरेचदा दाखवण्याचा सिद्धांचा प्रयत्न असतो आणि त्यातून त्यांच्या जन्मकुंडल्यांचा उगम होतो.
एकदा चिंतोपंत टोळांच्या घरी स्वामी समर्थांचा मुक्काम असताना "श्रीं'ची स्वारी घराबाहेरील अंगणात बिछान्यावर पहुडली होती. मंडळींशी गप्पा सुरू होत्या. त्या नादात मध्यरात्र केव्हा झाली हे कुणालाच समजले नाही. तेवढ्यात श्रीसमर्थांनी खड्या आवाजात एक जुनी लावणी चालीवर म्हणावयास सुरुवात केली.
गोरे ग रूप तुझे |
तुला पाहिले |
सात ताल माडीवरी ||
श्रीं'च्या तोंडी ही शृंगारिक लावणी पाहून सर्वांनाच मोठे आश्र्चर्य वाटले. तेवढ्यात चिंतोपंतांनी थोडे धाडसकरून विचारले, " महाराज, आपण पूर्वाश्रमी गृहस्थ होता असे वाटते. आपण आपली जात कोणती हे कृपा करून सांगाल का?' त्यावर श्रीसमर्थ चटकन म्हणाले, "आमची जात चांभार, आई महारीण आणि बाप महार.' एवढे सांगून ते पोट धरधरून खो-खो हसत सुटले. पुढे मात्र एकदा कर्वे नावाच्या एका गृहस्थांनी या संदर्भात खुलासेवार सांगण्याची विनंती केल्यावर दत्तावधूत यतिराज त्यांना म्हणाले - "आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण. आमचे नाव नृसिंह, काश्यप गोत्र, आमची मीन राशी, पुन्हा विचारल्यास टाळक्यात पायपोस.' स्वामी समर्थांची जी पत्रिका नाना रेखी यांनी तयार केली तिला स्वामी समर्थांनी मान्यता दिली होती, त्या पत्रिकेवरही"नृसिंहभान' असेच टोपण नाव आढळते; मात्र श्रीसमर्थांनी आपली राशी मीन असे का सांगितले याचे कोडे उलगडत नाही. वास्तविक त्यांचे जन्म लग्न मीन आहे. त्यामुळे त्यांना आपली लग्नराशी अभिप्रेत असावी असे वाटते. कारण सदर पत्रिकेत त्यांची चंद्रराशी मेष दाखविली आहे. तसेच, सदर पत्रिकेत यजुर्वेदी ब्राह्मण, कश्यप गोत्र असेच लिहिले आहे. (ही पत्रिका पाहिल्यावर " नौबत बजाव " असे शब्द श्रीमुखातून बाहेर पडले व दक्षिणा म्हणून श्रीसमर्थांनीनानाजींच्या उजव्या हातावर आत्मलिंगाचा प्रसाद दिला. त्याच वेळी त्यांच्या हातावर नीलवर्णाचे लहानसे विष्णुपाद उमटले. ते मरेपर्यंत त्यांच्या हातावर होते असे म्हणतात.) श्री स्वामी समर्थ यांची स्वामी आदेशा वरून श्री .नाना रेखी यांनी तयार केलेली पत्रिका (मुळ प्रत) अशी आहे . अहमदनगरच्या मठात त्याचे दर्शन होते
संवत्सर शके १०७१, चैत्र शुद्ध द्वितीया ,अश्विनी नक्षत्र,द्वितीय चरण ,प्रितियोग ,टोपण नाव नृसिंहभान ,आद्य नाडी,देव गण ,मेष राशी ,राशी स्वामी मंगळ,जन्म काळ सूर्योदयापूर्वी दोन घटिका, जन्म नाव-चैतन्यस्वामी,यजुर्वेदी ब्राह्मण,काश्यप गोत्र.
🌹प्रस्तुती : श्री वामन रूपरावजी वानरे.
मो.9826685695.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा