February 28, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ फेब्रुवारी २०१४

२८ फेब्रुवारी

भगवंताजवळ नामाचे प्रेमच मागा. 

 



भगवंतापाशी मागणे मागताना काय मागाल ? तुम्ही त्याच्याजवळ नामाचे प्रेमच मागा; दुसरे काही मागू नका. देवाजवळ मागणे मागताना चूक होऊ नये. एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना वर्षभर उत्तम रीतीने शिकविले, परीक्षेच्या वेळी परीक्षक कोणते प्रश्न विचारण्याचा संभव आहे हे सांगून, त्यांची उत्तरेही सांगून ठेवली; पण परीक्षक परीक्षा घ्यायला आला असता प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनीच द्यायची असतात. तिथे शिक्षक हजर असला, आणि विद्यार्थी उत्तर चुकीचे देतो आहे हे जरी त्याला दिसले, तरी तिथे त्याला काही बोलता येत नाही. तशी माझी स्थिती आहे. म्हणून मागणे मागण्याचे काम तुम्हालाच करायचे आहे. तेव्हा त्या वेळी चुकीने काही भलतेच मागू नका, एवढयाचकरिता हा इशारा आहे.
कोणतीही परिस्थिती असली तरी त्यात भगवंताचे स्मरण ठेवावे, म्हणजे बऱ्यावाईट गोष्टींचा परिणाम मनावर कमी होतो. मनुष्यावर संकटे आली की तो घाबरतो. परंतु परमेश्वराचे अस्तित्व मानणाऱ्यांनी तरी असे करणे योग्य नाही. एखाद्या लहान मुलाच्या बापाने डोक्यावर पांघरूण घेऊन बागुलबुवा केला तर ते मूल भिते; पण पांघरूणाच्या आत आपला बापच आहे असे त्याला समजले की ते घाबरत नाही. त्याप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीने आपल्या बाबतीत घडणाऱ्या बऱ्यावाईट गोष्टी परमेश्वराच्या किंवा आपल्या गुरूंच्या इच्छेने होतात ही जाणीव ठेवावी. म्हणजे त्याला भिती वा दुःख वाटणार नाही, तसेच चांगल्या गोष्टी घडल्या तरी त्याबाबत आनंदातिरेकही होणार नाही. याकरिता सदासर्वकाळ भगवंताचे चिंतन करावे. आपल्या विचाराने ठरल्याप्रमाणे झाल्याने सुखच मिळते असे नाही. काही वेळेस आपल्या विचाराच्या उलट होऊनही मागाहून तसे झाल्यानेच बरे वाटते. म्हणजे कोणत्याही गोष्टीचे सुखदुःख तात्काळ कळत नाही हेच खरे. म्हणून जरा वेळ थांबून सुख किंवा दुःख मानू या.
कर्ज फिटताना जसा आपल्याला आनंद होतो तसा देहभोग भोगताना आपल्याला आनंद झाला पाहिजे. प्रारब्ध टाळणे म्हणजे लोकांचे कर्ज बुडविणेच होय. आपला म्हणजे 'मी' पणाचा नाश, आणि प्रारब्धाचा नाश, बरोबर होतो. 'भगवंता, प्रारब्धाने आलेल्या दुःखाचा दोष तुझ्याकडे नाही. जर त्या दुःखामुळेच तुझे अनुसंधान टिकत असेल तर मला जन्मभर दुःखामध्येच ठेव,' असे कुंतीने भगवंताजवळ मागितले. यातले मर्म ओळखून वागावे, आणि काहीही करून अनुसंधानात राहण्याचा प्रयत्‍न करावा.

५९. भगवंताला अशी प्रार्थना करावी की, 'देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत;
पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस.'


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 27, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ फेब्रुवारी २०१४

२७ फेब्रुवारी

नामाचे प्रेम का येत नाही ? 

 



आज इतकी वर्षे होऊन गेली तरीसुद्धा ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ रामदास, यांच्यासारख्या थोर संतांचे नाव टिकून राहिले आहे. याचे खरे कारण हे की, त्यांचे नामावर अत्यंत प्रेम होते. या सर्व संतांच्या वचनांवर आपण विश्वास ठेवतो. त्यांच्याप्रमाणे नामाचे प्रेम आपल्यालाही यावे असे आपल्याला वाटते. पण ते प्रेम आम्हाला का उत्पन्न होत नाही, याचा विचार आपण करायला पाहिजे. त्या नामाला उपमा देताना, ते अमृतापेक्षाही गोड आहे असे त्यांनी सांगितले. नामाला अमृताची उपमा देताना, त्या अमृताच्या पलीकडे दुसरी गोष्टच नाही असे आपण म्हणतो. मग त्या नामाचे प्रेम आम्हाला का बरे नसावे ? तर त्या नामाच्या आड काही तरी येत असले पाहिजे हे खास. ज्याप्रमाणे आपण तोंडात साखर घातल्यावर आम्हाला जर ती गोड लागली नाही, तर तो दोष साखरेचा नसून आमच्याच तोंडाला चव नाही असे आपण म्हणतो, त्याप्रमाणे नामाची गोडी आमच्या अनुभवाला येत नसेल, तर आमच्यामध्येच काही तरी दोष असला पाहिजे खास.
नामाचे प्रेम येण्याला बहुतेक लोक काही ना काही अडचणी सांगतात. कुणाला विचारले, 'नामाचे प्रेम का येत नाही ?' तर तो सांगतो, 'माझे लग्न झाले नाही. ते होऊन प्रपंच, मुलेबाळे, हे सर्व झाल्यावर मला नामाचे प्रेम येईल.' पण लग्न करून मुलेबाळे असलेल्या किती लोकांना नामाचे प्रेम लागले आहे ? कोणी म्हणतो, 'पैसा नाही म्हणून प्रपंचाची काळजी वाटते आणि नामाचे प्रेम येत नाही.' परंतु अगदी भरपूर पैसा असलेल्या किती लक्षाधीशांनी नामाचे प्रेम मिळविले आहे ? कोणी म्हणतो, 'या प्रपंचात बायकोमुले, आजारपण, शेतीवाडी, यांच्या व्यापामुळे आम्हाला नामाचे प्रेम लागत नाही;' तर कोणी म्हणतो, 'प्रपंचात राहून मला आता कंटाळा आला आहे; मी आता संन्यास घेतो, म्हणजे मला नामाचे प्रेम येईल;' तर कोणी प्रापंचिक दुःखाला कंटाळून अगदी आत्महत्या करायला निघतो. अशा रीतीने, सर्वजण ज्या परिस्थितीत असतात त्या परिस्थितीत नामस्मरणाला अडचणच सांगत असतात. नामाचे प्रेम न यायला खरोखरच परिस्थिती कारणीभूत आहे का, याचा विचार आपण करायला पाहिजे. मला वाटते, नामाचे प्रेम न यायला खरोखर कारण कोणते असेल, तर भगवंत हवा असे आम्हाला मनापासून वाटतच नाही. भगवंत हवा आहे असे वाटणे, हे खरोखर भाग्याचे लक्षण आहे. तुम्हाला खरोखरच भगवंत हवा आहे असे वाटू लागले म्हणजे त्या हवेपणातच त्याच्या प्राप्तीचा मार्ग दिसू लागेल.

५८. नामाची गोडी अशी विलक्षण आहे की, ज्याला ती लागली
त्याला स्वतःचे भान राहात नाही. म्हणून नामाला वाहून घ्यावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 26, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ फेब्रुवारी २०१४

२६ फेब्रुवारी

कोणत्याही परिस्थितीत नामस्मरण शक्य आहे ? 

 



मनुष्याची सर्व धडपड शाश्वत समाधान मिळविण्यासाठी चालू असते. ते समाधान फक्त भगवंताजवळ असल्याने समाधानासाठी प्रत्येक माणसाला भगवंताची गरज आहे. आपल्या सर्व धडपडीतून भगवंताच्या प्राप्तीचे समाधान आपल्याला मिळत नाही; आणि त्याला परिस्थिती कारणीभूत आहे, असे सर्वजण सांगतात. पण खरोखरच परिस्थिती आड येते किंवा काय हे आपण बघितले पाहिजे. परिस्थितीसंबंधी विचार करताना एक बाह्य परिस्थिती आणि दुसरी आंतर-स्थिती यांचा विचार करावा लागेल. बाह्य परिस्थितीचा विचार करताना प्रथम आपली शरीरप्रकृती आड येते. ही प्रकृती कशीही असली तरी भगवंताचे स्मरण आपल्याला करता येईल की नाही ? प्रकृतीला कितीही क्षीणत्व आले, देहाला कितीही विकलता आली, तरी अंतकाळी भगवंताचे स्मरण करता येते, असे भगवंताने गीतेत सांगितले आहे. देहाची अवस्था कोणतीही असली, तरी त्यामध्ये नामस्मरण करता येत नाही हे म्हणणे काही बरोबर नाही. तेव्हा, प्रकृती आड येते, असे म्हणणे कितपत सयुक्तिक ठरेल ?
पुष्कळ लोक आर्थिक अडचणींसंबंधी कुरकुर करतात. पैसा नसल्याकारणाने प्रपंचात काळजी उत्पन्न होऊन, भगवंताकडे लक्ष द्यायला सवडच मिळत नाही असे बरेचजण सांगतात. पण खरोखर तुम्ही मला सांगा, जगात भरपूर धन मिळवून वैभवाच्या शिखरावर पोहोचलेले कितीसे लोक नामस्मरण करतात ? आजपर्यन्त किती राजे लोक आपले राजवैभव लाथाडून भगवंताच्या प्राप्तीसाठी बैरागी झाले ? आपल्याजवळ पैसा नसणे हे भगवंताच्या प्राप्तीच्या आड येते, हे म्हणणे बरोबर नाही. उलट, पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो. पैसा असला की आपल्याला एक आधार आहे असे वाटते. म्हातारपणी आपल्याला उपयोगी पडावा म्हणून पैसा साठवायचा प्रयत्‍न करावा, तर मी म्हातारपणापर्यंत जगेन याची खात्री कोणी द्यावी ? सुख, समाधान, हे पैशावर अवलंबून नाही. प्रत्येकाची गोतावळी ठरलेली आहे. वेताळाची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर पिशाच्चे निघायचीच; आणि भगवंताची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर दया, क्षमा, आणि जिकडेतिकडे आनंदी वृत्ती, ही असायचीच. त्याचप्रमाणे पैसा आला की त्याच्याबरोबर तळमळ, लोभ, असमाधान, ही यायचीच. परस्त्री एखादे वेळी विषयभोगामध्ये आपल्याला सामील होणार नाही, पण पैसा मात्र आपण वापरू तसा वापरला जातो. बाप-मुलगा, भाऊ-भाऊ, भाऊ-बहीण, मित्र-मित्र, यांच्यामध्ये वितुष्ट आणायला कारण काही असेल तर पैसाच होय.

५७. आपण पैसा साठविला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 25, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २५ फेब्रुवारी २०१४

२५ फेब्रुवारी

मला जनप्रियत्व आवडते. 

 



इथून जाणार्‍या मंडळींना निरोप देताना मला खरोखरच फार वाईट वाटते. पुन्हा आपली भेट होईल की नाही ते काही सांगता येत नाही. तुम्ही सर्वांनी एकमेकांशी अत्यंत प्रेमाने वागा. प्रेमाने जग जिंकता येते. तुम्ही माझ्यापासून जनप्रियत्व शिका. मला जनप्रियत्व फार आवडते. कारण जो लोकांना आवडतो, तोच भगवंताला आवडतो. जो निःस्वार्थी असेल त्यालाच जनप्रियत्व येईल. जो भगवंताच्या इच्छेने वागेल त्यालाच जनप्रियत्व येईल. आपण आपल्यासाठी जे करतो ते सगळयांसाठी करणे, हे भगवंताला आवडते. आपण आपल्यापुरते न पाहता सर्व ठिकाणी भगवंत आहे असे पाहावे. प्रत्येकाला आपण हवेसे वाटले पाहिजे. असे वाटण्यासाठी लोकांच्या मनासारखेच वागले पाहिजे किंवा त्यांना आवडेल तेच बोलले पाहिजे असे नाही. प्रेम करायला कशाचीही जरूरी लागत नाही; पैसा तर बिलकूल लागत नाही, हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. जगात कुणी कधी भोगली नसेल एवढी गरिबी मी भोगली आहे. अशा गरिबीमध्ये राहूनही माझे अनुसंधान टिकले, मग तुम्हाला ते टिकवायला काय हरकत असावी ? मी जर काही केले असेल तर मी कधीही कुणाचे अंतःकरण दुखवले नाही. तेवढे तुम्ही सांभाळा. जो जो कोणी मला भेटला, तो तो मी आपलाच मानला. मी नुसता खेळ मांडला आणि तो खेळलो; त्यामुळे त्याचे सुखदुःख मला कधी बाधले नाही. नाम घ्यायची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून मी पुन्हा जन्मास आलो. मला तुम्ही सगळे रामरूप दिसत आहात. मला जे सांगायचे असेल ते मारूतीरायाला सांगावे म्हणजे ते मला कळते. माझा मनुष्य कुठेही असला तरी तो माझ्याकडेच येणार. मला दुश्चित्तपणा अगदी आवडत नाही. ज्यांनी माझी निंदा केली त्यांना तर मी कोण हे कळले नाहीच; पण ज्यांनी माझी स्तुती केली त्यांना मी कोण आहे हे त्याहून कळले नाही. प्रत्येकाला वाटते की आपल्याला लोकांनी चांगले म्हणावे, मी मात्र वागायचा तसाच वागेन; हे कसे शक्य आहे ? नाम घेतल्याने आपले सर्व अवगुण आपल्यालाच कळून येतील याची खात्री बाळगा, आणि अंतःकरणपूर्वक नाम घ्या.
एक भगवंताचे नाम घट्ट धरावे, त्यामध्ये अती उत्कटता ठेवून एकतानता करावी, आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे. 'मी नाम घेतो' हे देखील विसरून जावे. हाच खरा परमार्थ होय. नामामध्ये एकतानता होण्यासाठी भगवंताच्या साक्षित्वाने वागा; हवे-नकोपण टाकून द्या; राम कर्ता ही भावना ठेवा; विषय मालकीने भोगा; आपला गुण भगवंताकडे लावा; लहान मूल होऊन देवाकडे जा; रामाला आपले सुखदुःख सांगा; देहभोगाला कंटाळू नका; काळजी 'घ्या' पण काळजी 'करू' नका, आणि निर्भय बना, आणि अशा रीतीने जिवंतपणी आपले मरण पहा.

५६. जिथे नाम आहे तिथे मी आहे म्हणून खचित समजा.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 24, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ फेब्रुवारी २०१४

२४ फेब्रुवारी

भक्त आणि परमात्मा एकरूपच असतात. 

 



'आमच्या हातून वारंवार चुका होतात' असे तुम्ही म्हणता. लहान मुलगा चालताना अडखळतो, पडतो, किंवा बोलताना बोबडे बोलतो. त्याचे आईबापांना कौतुकच वाटते, त्याप्रमाणे तुमच्या चुकांचे मला कौतुक वाटते. चुका सावरण्याच्या तुमच्या प्रयत्‍नांचेही तसेच कौतुक वाटते. म्हणून त्याबद्दल तुम्ही काहीही मनात आणण्याचे कारण नाही. गुरूने एकदा सांगितले की, 'तुझे मागचे सर्व गेले, पुढे मात्र वाईट वागू नकोस,' तर शिष्याने ते श्रद्धेने खरे मानावे. आपल्या हातून होणाऱ्या चुकांचे परिमार्जन नामच करू शकते. भगवंताचे नाम हे सर्व रोगांवर रामबाण औषधच आहे. नामाचे हे औषध सतत थेंब थेंब पोटात गेले पाहिजे. ऑफिसमध्येसुद्धा ते आपण बरोबर घेऊन जावे. विद्वान, अडाणी, श्रीमंत, गरीब, सर्वांना हे औषध सारखेच आहे. जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला गुण लवकर येईल.
एखादा मुलगा 'मी विहिरीत उडी घेणार' म्हणून हट्ट धरून बसला तर बापाने त्याचा हट्ट पुरवायचा, का त्याला समजावून किंवा तोंडात मारून तिथून बाजूला काढायचे ? त्याप्रमाणे तुमचे विषय मागण्याचे हट्ट आहेत. खरा भक्त कधीही दुःखी-कष्टी असत नाही, आपल्या समाधानात असतो; मग तो कितीही दरिद्री किंवा व्याधिग्रस्त असेना ! अमुक एक हवे ते मिळाले नाही म्हणजे सामान्य माणसाला दुःख होते. भक्ताला कसलीही आस नसते, त्यामुळे त्याला दुःख नसते. तो आणि परमात्मा एकरूपच असतात. परमात्म्याची इच्छा हीच त्याची इच्छा असते. सगुणाची भक्ती करता करता त्याला 'मी' चा विसर पडत जातो. 'मी नसून तूच आहेस' ही भावना दृढ होत जाते. शेवटी 'मी' नाहीसा झाला की राम, कृष्ण, वगैरेही नाहीसे होतात आणि परमात्मा तेवढा शिल्लक उरतो.
आजारामधून उठलेल्या अशक्त माणसाने जसे काठीच्या आधाराने चालावे, त्याप्रमाणे प्रापंचिकाने सगुणभक्तीने तरून जावे. देहबुद्धी असणाऱ्या माणसाला सगुणावाचून भक्तीच करता येणार नाही. भगवंताला आपण सांगावे की, 'भगवंता, तुझी कृपा मजवर असू दे; आणि कृपा म्हणजे, तुझे स्मरण मला अखंड राहू दे.' यातूनच त्याची भक्ती उत्पन्न होईल. भगवंतावाचून कशातही समाधान नाही. त्याच्याशिवाय जगण्यात आनंद नाही. जो भगवंताचा झाला, म्हणजे त्याच्या नामात राहिला, त्याला जगण्याचा कंटाळा येणार नाही.

५५. परमात्म्याला प्रपंचरूप बनविण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मरूप बनवावे.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 23, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २३ फेब्रुवारी २०१४

 २३ फेब्रुवारी

साधक व नाम 

 

  प्रत्येक शब्दात रामच आहे असे ज्यांना वाटते त्यांची तयारी काही निराळीच असते. आपल्याला अमुक एका नावातच प्रेम येते; परंतु सिद्धांना मात्र कोणी कशाचाही उच्चार केला तरी नामाचाच केला असे वाटते. कोणत्या वाचेने नाम घ्यावे याचा नाही विचार करू. जसे होईल तसे नामस्मरण करा, पण नामाची कास सोडू नका. नाम घेऊन नामाचा अनुभव घ्या. विषयाचा घाला जेव्हा पडतो तेव्हा नामाची आठवण ठेवा. प्रल्हादाने नामाशिवाय दुसरे काय केले ? प्रल्हादाने नामावर जसे प्रेम ठेवले तसे आपण ठेवावे. आजवरच्या सर्व भक्तांनी हेच केले. एक नामस्मरण करा, हाच खरा मार्ग. स्मरणात रहा म्हणजे विषय आपोआप मरतील.
साधकाने लोण्यासारखे मऊ असावे. कोणाला कुठेही खुपू नये, आपण हवेसे वाटावे. आपण निःस्वार्थी झालो तरच हे साधेल. कोणी आपल्या पाया पडताना, 'मी या नमस्काराला योग्य नाही' असे साधकाने मनामध्ये समजावे, म्हणजे कुणी नमस्कार केल्याचा अभिमान वाटणार नाही, आणि न करणाऱ्याचा राग येणार नाही. सत्कर्मानंतर आपली स्तुती ऐकायला साधकाने तिथे उभेसुद्धा राहू नये. भगवंत ज्याला हवा आहे, त्याने असे समजावे की, आपण कुस्तीच्या हौद्यांत उतरलो आहोत, अंगाला माती लागेल म्हणून आता घाबरून चालायचे नाही. यासाठी चांगली माणसे पहिल्यानेच मातीत लोळतात, म्हणजे ती लाज जाते.
भगवंताच्या प्राप्तीचे दोन मार्ग आहेत : एक मार्ग म्हणजे, आजपर्यंत सर्व त्याच्या इच्छेने घडून आले, माझे जे सर्व आहे ते त्याचेच आहे, त्याचे तो पाहून घेईल, तो जे करील ते सर्वांच्या हिताचेच करील, उद्याचा दिवस त्याच्या इच्छेनेच यायचा आहे, असे मनाशी ठरवून आपण त्याच्या स्मरणात निश्चिंत राहणे, हा होय. दुसरा मार्ग म्हणजे, 'मी जगात कुणाचाच नाही, मी रामाचा आहे,' असे म्हणून कुठेही प्रेम न ठेवता त्याच्या स्मरणात राहणे हा होय. हा मार्ग जरा कठीण आहे. यामध्ये मनाने इतर ठिकाणचे प्रेम तोडून टाकायचे असते, कारण प्रेम एकाच वस्तूवर राहू शकते. मन जर आपले ऐकत नसेल तर न ऐकू द्या. आपण चांगले-वाईट शोधावे, आणि त्याप्रमाणे करू लागावे; मन आपोआप तिथे येईल. म्हणूनच, 'आपले मन मारा' असे न सांगता 'आपले मन भगवंताकडे लावा' असेच संत आपल्याला सांगतात.

५४. 'हेच माझे सर्वस्व आहे' असे नामात प्रेम असावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 22, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २२ फेब्रुवारी २०१४

२२ फेब्रुवारी

निर्हेतुक कर्मात भगवंत. 

 



खरोखर, आज आपल्याला आपले अंतरंग ओळखण्याची खरी गरज आहे. सत्कर्म असो किंवा दुष्कर्म असो, हेतूवर सर्व काही अवलंबून असते. पुष्कळ पुण्यकर्मे केली, आणि काही तरी विषयाचा हेतू मनात धरला, तर काय उपयोग ! काबाडकष्ट खूप केले, बायकापोरे टाकून बाह्यांगाने कितीही केले, तरी मन जोपर्यन्त तिथे नाही तोपर्यंत राम नाही भेटणार. मनाला भगवंताची तळमळ लागली तरच त्याचा उपयोग. निर्हेतुक कर्मात भगवंत असतो, म्हणून आपली कर्मे तशी करावीत. खरे पाहता प्रापंचिकाएवढे काबाडकष्ट साधकाला, पारमार्थिकाला नसतात. प्रपंचाच्या काबाडकष्टांपेक्षा निम्म्याने जरी भगवंताकरिता केले तरी खूप फायदा पदरात पडेल. ज्या स्थितीत भगवंताने आपल्याला ठेवले त्या परिस्थितीतून त्याला ओळखणे सहज शक्य आहे. पण आपण विषयाकडे दृष्टी ठेवून कर्मे करतो, आणि भगवंत भेटत नाही म्हणून दुःखी होतो, याला काय करावे ? दैत्यदानवांनी भगवंताची तपश्चर्या केली, आणि समर्थांनीही केली; याउलट, समर्थांना भगवंताशिवाय दुसरा कशाचाही लोभ नको होता. त्या लाभातच त्यांनी सर्वस्व मानले. उत्कट प्रेमामुळे भगवंताचा ध्यास लागतो. भगवंताला पाहून 'तू भेटलास, आता मला काही नको' , अशी वृत्ती झाली पाहिजे, तरच मीपणा मरेल. भगवंताचा हात तर पुढे आहेच; आपलाच हात त्याच्यापर्यंत पोहोचत नाही.
बुद्धीपेक्षा आणि पैशापेक्षा सदाचरणाचे वजन जास्त असते. सदाचरण असून भगवंताची निष्ठा असेल, आणि आहे त्या परिस्थितीत समाधान ठेवण्याची सवय असेल, तर प्रापंचिक सुख लाभते. सुख हे कुठून उत्पन्न करायचे नसून ते आपल्या वृत्तीमध्येच असते. 'मी' भगवंताचा आहे, तसेच 'सर्वजण' भगवंताचे आहेत. म्हणून भगवंतावर प्रेम केले की सर्व जगावर प्रेम बसेल.
ज्याप्रमाणे भगवंताच्या प्रसादामध्ये एखादा कडू बदाम आला तरी तो आपण खातो, त्याप्रमाणे भगवंताने एखादे वेळी दुःख दिले तर ते आनंदाने सोसायला पाहिजे. चिकित्सा थोडी बाजूला ठेवून भगवंताचे आपण स्मरण करावे. अंतःकरणाची शुद्धी नामाशिवाय नाही होणार. नामापरते काही नाही हे एकदाच ज्याच्या मनाने घेतले त्याला दुसरे काही सांगावे नाही लागत. मीठ म्हणून जरी साखर खाल्ली तरी साखरेची गोडी आल्याशिवाय राहात नाही; त्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत जरी नाम घेतले तरी ते आपल्याला तारकच ठरेल यात शंका नाही.

५३. ज्याच्यामागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरे काम करतो.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 21, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २१ फेब्रुवारी २०१४

२१ फेब्रुवारी

कर्तेपणाचा अभिमान नसावा. 




विषयात राहून परमात्म्याची भक्ती होईल का ? विषय सोडल्याशिवाय 'मी भक्ती करतो' असे म्हणणे चुकीचे आहे. विषय आहेत तिथे भक्ती नाही, आणि भक्ती आहे तिथे विषय नाहीत. भक्त म्हणजे भगवंताचे होऊन राहणे. त्याला शरण गेल्याशिवाय त्याचे होताच येत नाही. अभिमान ठेवून आपल्याला कधीच भक्त होता येत नाही. प्रथम अभिमान कसा नाहीसा होईल हे पाहावे, आणि तसे वागण्याचा प्रयत्‍न करावा. आपण प्रपंचात 'मी करीन तसे होईल' या भावनेने वागत असतो. परवाच एकजण आले होते, त्यांना त्या वेळी पाहून कोणीही म्हटले असते की, हे थोडयाच दिवसांचे सोबती आहेत. तरीही 'मी अमुक करीन, मी तमुक करीन,' असे ते म्हणतच होते; आयुष्याच्या शेवटच्या घटकेलाही केवढा तो अभिमान ! म्हणून सांगतो की, 'मी करतो' ही भावना टाकून देऊन, सर्व काही तोच करीत आहे, आणि त्याची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याकडून तो करवून घेत असतो, ही भावना ठेवून वागावे. त्याप्रमाणे वागू लागले म्हणजे आपोआपच विषयाची आसक्ती कमी होऊ लागते. 'मी कर्ता आहे.' ही भावना गेल्याशिवाय परमार्थ करता येणे शक्य नाही.
कोणतेही कर्म केले म्हणजे अमुक एक फळ मिळेल म्हणून वेदांत सांगितले आहे, त्यावरून, वेद हे विषयासक्ती वाढवतात असे काहीजण म्हणतात. पण वडील माणसे जसे औषध देताना गुळाचा खडा दाखवितात त्याप्रमाणे ते आहे. माणसाने फळाच्या आशेने तरी कर्म करायला लागावे. तो कर्म करू लागला म्हणजे आपोआपच फळावरची त्याची आसक्ती कमी होत जाते; आणि पुढे अभिमान जाऊन, मी कर्ता नसून तोच करवीत आहे असे वाटू लागते. मग तो जे कर्म करील ते देवाला आपोआपच अर्पण होते. संकट आले म्हणजे आपण देवाला नवस करतो, देवाने मनासारखे दिले नाही म्हणजे 'देवात अर्थ नाही' असे म्हणतो. पण देवाला फसविणे शक्य आहे का ? तो म्हणतो, 'हा सुखात असताना माझी आठवणही काढीत नव्हता, आणि आता आठवण करतो आहे!' वास्तविक देवाने आपल्याला पावावे असे आपण काय केले आहे ? म्हणून देवाला फसवू नये; कारण देव फसला न जाता आपलीच फसगत होते. आपण प्रपंचासाठी रोज इतके काबाडकष्ट करतो, परंतु दिवसातून एखादा तास तरी देवाकरिता खर्च करतो का हे आपल्याशीच विचार करून पाहावे.

५२. जोपर्यन्त विषयाची आस । तोपर्यन्त नव्हे भगवंताचे दास ॥

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 20, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २० फेब्रुवारी २०१४

२० फेब्रुवारी

कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण । 

 



आपले कर्तव्याला न विसरावे । भगवंताचे अनुसंधान राखावे ॥
व्यवहाराने योग्य ते कर्तव्य करीत जावे । बाकी रामावर सोपवावे ॥
कर्तव्यात परमात्म्याचे स्मरण । यातच सिद्धीचे बीज जाण ॥
असा करावा संसार । जेणे राम न होईल दूर ॥
देहाने कर्तव्याची जागृति । त्यात ठेवावी भगवंताची स्मृति । कर्तव्यात असते मनाची शांति ॥
कर्तव्याचा कधी न पडावा विसर । हृदयी धरावा रघुवीर ॥
ऐसे वागेल जो जनी । त्याने जोडला चक्रपाणि ॥
उद्योगाशिवाय राहू नये । कर्तव्याला चुकू नये । पण त्यात रामाला विसरू नये ॥
ठेवावा रामावर विश्वास । कर्तव्याची जागृति ठेवून खास ॥
देहाचा विसर पण भगवंताचे ध्यान । हेच भक्तीचे लक्षण ॥
देह करावा रामार्पण । स्वतःचे कर्तेपण सोडून ॥
शास्त्री पंडित विद्वान झाला । भगवत्पदी न रंगला । व्यर्थ व्यर्थ त्याचे जिणे ॥
भगवंतापाशी राहावे रात्रंदिन । हाच सुखाचा उत्तम उपाय जाण ॥
रामाचे चरणी घ्यावी गति । हाच विचार आणावा चित्ती ॥
सुटावी प्रपंचाची आस । तेथे परमात्म्याचे प्रेम खास ॥
सर्व कर्मांत अधिष्ठान असावे देवाचे । तोच कल्याण करील साचे ॥
भले बुरे जे असेल काही । ते सोडावे रामापायी ॥
चित्त असावे रामापायी । देहाने खुशाल संसारात राही ॥
आपण व्हावे रामार्पण । सुखदुःखास न उरावे जाण ॥
धन्य त्याची जननी । ज्याने राम आणिला ध्यानी मनी ॥
रामाविण दुजे काही । आता सत्य उरले नाही ॥
भाव ठेवावा चित्तात । सुखे आयुष्य घालवावे त्याचे सान्निध्यात ॥
ज्याने जिणे केले रामार्पण । त्यासी व्यवहार हेच खरे योगसाधन ॥
'माझे सर्व ते रामाचे' । मानून जगात वागणे साचे ।
अशास नाही कष्ट फार । मागे पुढे रघुवीर ॥
आपण व्हावे मनाने रामाचे । राम जे करील तेच घडेल साचे ॥
चित्त ठेवावे रामापायी । दुजे मनात न आणावे काही ॥
आता न सोडावी हरीची कास । होऊन जावे त्याचे दास ॥
दास्यत्वाचे मुख्य लक्षण । मालकावाचून न दुसऱ्याची आठवण ॥
भगवंताचा दास झाला । जग मानत त्याला ॥
म्हणून आपण सर्व आहो रामाचे दास । हे उरी बाळगावे खास ॥
'एकच जगती माझा रघुपति' । याहून दुजा न करावा विचार । हाच ठेवावा निर्धार ॥
भाव ठेवता रामापायी । तो कधी कमी पडू देणार नाही ॥
मनाने जावे भगवंताला शरण । जो चुकवील दुःखाचे कारण ॥
राम माझी मातापिता । बंधु सोयरा सखा ।
तोच माझे सर्वस्वाचे ठिकाणी । याहून दुजा विचार मनात न आणी ॥

५१. आता सांभाळावे सर्वांनी आपण । रामाविण जाऊ न द्यावा क्षण ॥

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 19, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १९ फेब्रुवारी २०१४

१९ फेब्रुवारी

नामात राहणे हा सरळ मार्ग आहे.

 



एका बाईला सासरी नामस्मरण करणे कठीण जाई, सासरच्या लोकांना ते आवडत नसे. मी तिला सांगितले, 'लोणी चोरून खाण्याचा परिपाठ ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच. तसे, नाम कुणाला नकळत घेतले तरी त्याचा उपयोग होतोच; म्हणून उघडपणे नाम न घेता आले तरी ते गुप्तपणे घ्यावे, आणि त्याप्रमाणे युक्तीने वागावे.' शरीराला अन्नाची जरूरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात, त्यामुळे ते लवकर पोटात जाते; तसे, भावनेच्या नळीने नाम घेतले तर ते फार लवकर काम करते.
एक मनुष्य बैलगाडीतून जातांना रस्त्यामध्ये पडलेला होता. एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेले आणि त्याच्यावर उपचार केले. तसे आपण भगवंताच्या नामात पडून राहावे; त्यात राहिले की कुणीतरी संत भेटतो आणि आपले काम करतो; आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे. नुसत्या विषयात राहणे हा आडमार्ग आहे; नामांत राहणे हा सरळ मार्ग आहे.
खरोखर, नाम किती निरूपाधिक आहे ! आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत, म्हणून आपल्याला नामाचे महत्त्व तितकेसे समजत नाही. संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळते. विलायत इथून हजारो मैल लांब आहे. तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल्या गोष्टी ऐकतो. तिथे आपण पायी जाऊ शकत नाही, कारण ते फार लांब आहे. शिवाय, वाहनामध्ये बसून जावे म्हटले तर मध्ये मोठा समुद्र आहे. तेव्हा, पायाला श्रम न होऊ देता, आपल्याला बुडू न देता, समुद्राचे पाणी पायाला न लागता, समुद्रपार नेणारी जशी आगबोट आहे, त्याचप्रमाणे भगवंताकडे पोहोचविणारे त्याचे नाम आहे. भगवंत कसा आहे तो आम्ही पाहिला नाही, पण संत त्याला पाहून आले आणि त्यांनी त्याचे वर्णन आमच्याजवळ केले. आम्ही आमच्या कष्टाने त्याला गाठू म्हणावे तर ते शक्य नाही. शिवाय, प्रपंचासारखा एवढा भवसागर मध्ये आडवा आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण नाम घट्ट धरले तर सुखाने भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू.
व्यवहारामध्ये जशी एकाच माणसाला अनेक नावे असतात, तो त्यांपैकी कोणत्याही नावाला 'ओ' देतो, तसे कोणत्याही नावाने हाक मारली तरी एकच भगवंत 'ओ' देतो. निरनिराळया गावी असलेल्या सर्व जिंदगीची मालकी खरेदीपत्रातल्या नामनिर्देशाने मिळते, तसे सर्वव्यापी असलेल्या देवाची प्राप्ती त्याच्या नामाने होते. खरोखर, नाम ही कधीही नाहीशी न होणारी जिंदगीच आहे.

५०. आपण सर्वांनी 'मी भगवंताकरिता आहे' असे मनाने समजावे आणि सदैव त्याच्या नामात राहावे.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 18, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १८ फेब्रुवारी २०१४


१८ फेब्रुवारी

नामाविषयी शुद्ध भाव आवश्यक 

   



ईश्वर सर्वांचा उत्पन्नकर्ता आहे, रक्षणकर्ता आहे, तसेच संहारकर्ताही आहे. परंतु तरी त्याला न्यायी आणि प्रेमी म्हणतातच, कारण तो निःस्वार्थी आहे. म्हणजे प्रेम हे निःस्वार्थातच असते. आपल्याला खरे म्हटले म्हणजे आपला स्वार्थच नडतो. आपला स्वार्थ प्रेमाच्या आड येतो. आपले विषय ईश्वर-प्रेमात व्यत्यय आणतात. ज्या ज्या गोष्टी या प्रेमाच्या आड येतात त्यांचा त्याग नको का करायला? तेव्हा विषयांची आसक्ती, त्यांच्यावरचे प्रेम, नाहीसे झाले पाहिजे. आपण ईश्वराचे, संतांचे झाले पाहिजे. त्याशिवाय आपल्याला कशाचीही गरज वाटता कामा नये.
एकाच मातीचा जसा गणपती, बाहुले किंवा मडके होते, त्याप्रमाणे ईश्वरही आपल्या भावनेप्रमाणे होतो. म्हणूनच आपला भाव नेहमी शुद्ध आणि निःस्वार्थी असावा. मुळाशी पाणी घातले की झाड वाढते, पण आपण मुळापर्यंत जातच नाही. तेव्हा, भाव शुद्ध कसा होईल ते पाहावे. उदाहरणार्थ, एकादशीच्या दिवशी उपवास करायचा एवढेच आपल्याला ठाऊक असते. पण एक गृहस्थ एकादशीला भगवंताचे नामस्मरण करायचे सोडून बारा वाजेपर्यंत अंघोळ न करता अंगण, मोरी झाडत बसला! असे आमचे चुकते. थोडक्यात म्हणजे, आपल्याला मुळात काय पाहिजे हेच कळत नाही. कावीळ झाली म्हणजे डोळयाला खरे रूप कसे कळणार? म्हणून, ज्याचे डोळे साफ आहेत तो सांगेल त्याप्रमाणे वागावे. याकरिता गुरू-आज्ञा प्रमाण मानून आपण वागत जावे. नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावाने घ्यावे म्हणजे मनात शंका येत नाहीत. या भगवंताच्या नामाची गोडी एकदा लागली म्हणजे भगवंत नाही आपल्याला सोडीत. नामाशिवाय दुसरे सत्यच नाही अशी दृढ भावना झाली पाहिजे. जितकी देहबुद्धी अधिक तितके नाम अधिक घेतले पाहिजे. आज इतके दिवस आपण विषयाचे चिंतन केले, त्याने आपल्या हातात काय आले? नामासारखे सोपे साधन नाही. प्रापंचिक लोक असे म्हणतात की, 'विषयाचा अनुभव तात्काळ येतो, पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे.' हे त्यांचे म्हणणे मला पटते. प्रापंचिक लोक प्रपंच सोडीत नाहीत याचे मला नवल वाटत नाही. पण ते सुख चिरकाल टिकणारे आहे ही समजूत करून घेऊन त्यामध्ये रमतात, याचे मला वाईट वाटते. मी असे म्हणतो की, तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरे आहे, तेवढेच तुम्ही खरे माना. विषयाच्या ध्यासापासून सुख नाही असे वाटू लागले म्हणजे नामाची गोडी येईल. आपल्या देहावर आपली सत्ता नाही, आपल्या माणसांवर आपली सत्ता नाही. म्हणून आपले कर्तव्य तेवढे करावे, आणि ते करीत असताना आपले मन दुश्चित्त होऊ देऊ नये.


४९. भगवत्‌प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी
त्याच्याभोवती फिरत असावे; म्हणजेच त्याच्या अनुसंधानात असावे.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 17, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १७ फेब्रुवारी २०१४

१७ फेब्रुवारी


नाम भावयुक्त अंतःकरणाने घ्यावे । 

  


मला आज देवाची गरज अशी वाटत नाही हे खरे, पण ती कशी वाटेल याचा तरी आपण विचार करावा. भगवत्‌चिंतनाने, नामाने ही गरज भासू लागते. गरज इतकी भासली पाहिजे की, अन्नपाणीसुद्धा गोड लागू नये. जितकी आग जोराची तितका पाण्याचा मारा जास्त हवा, तसे जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे. नामात प्रेम नाही म्हणून ते घेण्याचे सोडू नये. पाण्यात पडल्यावर पुढे पोहायला येते. काशीला गेले नाही तरी काशीस जायचे असे तरी म्हणावे; त्याप्रमाणे नामात प्रेम वाटत नसले तरी, नामात प्रेम आहे असे नित्य म्हणावे. नामाशिवाय दुसरे सत्य नाही, दुसरे साधन नाही, असा दृढ विश्वास झाला म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहवत नाही; आणि ते घेतल्याने, त्याच्या सहवासाने, त्याचे प्रेम येते.
संत देव आहे असे म्हणतात, मीही देव आहे असे म्हणतो; फरक इतकाच की, माझे म्हणणे अनुमानाचे असते. संत देहातीत असतात; त्यांच्याजवळ गेल्याने देहाभिमान कमी होतो. प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल; भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितके देहाच्या सहवासाने होत नाही. तीर्थास तीर्थपण, देवांस देवपण आणि गुरूंस गुरूपण आपण आपल्या भावनेने देतो. तीर्थास जाऊन जर 'आपण याने निष्पाप होऊ' अशी भावना असली तरच मला तीर्थाचे स्नान होईल, नाहीतर मला ते नुसते पाणीच आहे ! थोडक्यात म्हणजे, सर्व काही भावनेत आहे. नाम हे भाव उत्पन्न करते. भावयुक्त अंतःकरणाने आपण नाम घेतले म्हणजे आपले काम शीघ्र होते.
साधूंची अगर संतांची लक्षणे आपल्या अंगात ती बाणून घेण्याकरिता सांगितली आहेत. परंतु त्या लक्षणांवरून साधू ओळखता येणार नाही; साधू होऊनच त्याला ओळखले पाहिजे. प्रापंचिकाला त्याला ओळखायचे असेल तर त्याने आपल्यावर त्याच्या संगतीचा काय परिणाम झाला हे पाहावे; म्हणजे आपल्यावरून त्याला ओळखायचे. आपल्या मनाला काही वेळ तरी शांती मिळाली, आपला मीपणा थोडा तरी कमी झाला, मन निर्विषय राहावे असे वाटू लागले, तर ते साधूचे स्वरूप आहे असे समजावे. साधू सर्वांभूती भगवद्‍भाव किंवा सर्वत्र मीच आहे असे पाहतात. त्यामुळे सर्वांवर ते प्रेम करतात. सर्वत्र प्रेम करायचे म्हणजे निःस्वार्थ बुद्धीने योग्य ते करणे. आपण आपलेपणा काहींमध्येच पाहतो, सर्वत्र पाहात नाही, म्हणून द्वैतप्रचीती येते. साधूंचा मीपणा गेल्याने जगात त्यांना सर्वत्र अभेदप्रचीती येते. ते सर्वत्र भगवद्‍भाव पाहतात, आणि त्यांचे प्रेम अगदी निर्भेळ असते.

४८. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावे.
आपल्या बोलण्यामध्ये नव्हे, पाहण्यामध्येसुद्धा प्रेम असावे. 

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ ) 

February 16, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १६ फेब्रुवारी २०१४

 १६ फेब्रुवारी

संत सांगतील तसे वागावे.


   



ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा. प्रपंचातल्या दुःखाबद्दल वाईट वाटून घेऊ नये. आपण जगात वागताना सर्व 'माझे, माझे,' म्हणतो, पण प्रत्यक्ष आपल्या वाटणीला किती येते याचा कधी आपण विचार करतो का ? मिळण्याची आणि मिळविण्याची हाव वाढल्यामुळेच आपल्याला खरे दुःख होते. ही हाव नाहीशी व्हायला भगवंताच्या स्मरणात राहणे हा एकच उपाय आहे. मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवून वागावे. भगवंताकडे चित्त गुंतवून ठेवणे हाच खरा धर्म मानावा. जगाला फसवू नये आणि जगाकडून फसले जाऊ नये.
नामात जो राहिला तो सत्संगात राहिला. व्यवसाय आणि हौस याप्रमाणे आपण संगत धरतो. मनाची आणि नामाची संगत जोडून द्यावी. मालकाच्या बरोबर असलेला कुत्रा ज्याप्रमाणे धीट होऊन दुसऱ्यावर भुंकतो, त्याप्रमाणे आपण भगवंताच्या आधाराने राहावे; भुंकू मात्र नये, नेहमी लीनता ठेवावी. 'मी' साधन करतो हे विसरून जावे; त्याबद्दल अभिमान धरणे म्हणजे साधनाला कमीपणाच आणणे आहे. आपल्या कामात लक्ष ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावे. स्त्री दीराचा किंवा सासू-सासऱ्यांचा मान ठेवते, ते नवऱ्याला खूश करण्याकरिता; तसे, भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल, त्याप्रमाणे आपण वागावे. डॉक्टरला जर आपण 'त्या काळया बाटलीतले औषध मला का देत नाही ?' असे म्हटले तर तो ज्याप्रमाणे 'तुला तो रोग नाही' असे उत्तर देतो, त्याप्रमाणे संत ज्याची त्याची वृत्ति ओळखून मार्ग सांगत असतात. याकरिताच संतांची संगत धरून, ते 'सांगतील' तसे वागावे; ते 'वागतात' तसे नाही वागू. आपल्या पतंगाची दोरी आपण संतांच्या हातात द्यावी आणि खुशाल निश्चिंत रहावे. आपण गुरूने सांगितलेले साधन करीत जावे, म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो उभाच असतो. जिथे दोन वाटा फुटतात तिथे एक पंढरपूरची आणि एक गोंदवल्याची पाटी असते, तसे साधनात राहून, जिथे त्या दोन वाटा फुटतात, तिथपर्यंत या म्हणजे तिथे गुरू उभाच आहे. पण उगीच काही न करता 'पुढे काय आहे ?' हे विचारण्याने काय होणार ?
संतांनाच वेदांचा खरा अर्थ कळला. त्यांचे केवढे उपकार सांगावेत, की त्यांनी तो अर्थ आपल्याला सांगितला. म्हणून आपण वेद वाचण्याचे कारण नाही; आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे वागावे. त्यात आपलेच घुसडू नये. आपले काम खात्रीने झालेच पाहिजे. पाणी गोठून बर्फ बनते, बर्फाच्या आत-बाहेर जसे पाणीच असते, तसे जो आत-बाहेर भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेला असतो त्याला संत म्हणतात. असे संत फक्त नामस्मरणाने जोडता येतात.

४७. सदगुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते,
आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 15, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १५ फेब्रुवारी २०१४

१५ फेब्रुवारी

जेथे नाम, तेथे मी आहेच. 

 मला नामात पहा असे मी म्हणतो याचा अर्थ, मी देहात नसून माझी वस्ती नामातच असते; कारण आपले मन जिथे असते तिथेच आपण खऱ्या अर्थाने असतो. समजा तुम्ही यात्रेला गेला आहात; पण मन घराबद्दलच चिंतन करीत असेल, तर तुम्ही देहाने क्षेत्रात असलात तरी खऱ्या अर्थाने घरीच आहात असे नाही का होत ? त्याप्रमाणे, तुम्हांला जर कुणी विचारले की, 'तुम्ही नेहमी कुठे असता', तर आम्ही नेहमी विषयातच असतो, असेच सांगावे लागेल. ज्यांना जे जास्त आवडते त्यातच ते असतात, हे खरे ना ? मग तुमचा गुरू कुठे आहे असे जर कुणी विचारले तर तो नामात आहे असेच म्हणाल ना ? म्हणून, जिथे नाम चालू आहे तिथे मी आहेच; जो नामस्मरण करतो त्याच्या मागेपुढे मी उभा आहे.शास्त्री-पंडित म्हणतात की, आमच्याकरिता ज्ञानमार्ग आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही की तो अत्यंत कठीण आहे. त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचाच संभव जास्त असतो. 'ब्रहम सत्यं जगत्‌ मिथ्या' हे तत्त्व त्यांच्या बुद्धीला पटते. पण त्यांच्या अनुभवाला मात्र येत नाही. जग मिथ्या आहे असे ते म्हणतात. पण आपल्या देहाला मात्र सत्य मानतात. नुसत्या विचाराने देहाचे मिथ्यत्व अनुभवाला येणे अत्यंत कठीण आहे. कर्मठ लोक म्हणतात की, 'आम्ही आमच्या कर्ममार्गानेच जाणार. आमचा नामावर विश्वास नाही. आम्ही वेदांनी घालून दिलेली बंधने आणि नियम यांचे पालन करणार'; असे म्हणून ते बंधने आणि नियम यांचे इतके काही पालन करतात की ते बंधनालाच सर्वस्व मानतात. त्यांच्या हे लक्षात येत नाही की ईश्वरप्राप्ती हे साध्य असून बंधने आणि नियम हे साधनरूप आहेत. साध्य साधण्यापुरतीच बंधने पाळायला हवीत. फुलझाडांची बाग रक्षण करण्यापुरतेच तिचे कुंपण सांभाळायला हवे. पण ते कुंपणालाच सर्वस्व मानतात, त्याला खतपाणी घालून वाढवितात; आतल्या बागेकडे लक्ष देत नाहीत. वैदिक कर्माने चित्तशुध्दी होते हे मी मान्य करतो, परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुध्दी करायची त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल, तर कर्ममार्गाचे पर्यवसान कर्मठपणात होते. नामावर विश्वास नाही असे ते म्हणतात, पण संध्येच्या किंवा कोणत्याही वैदिककर्माच्या सुरूवातीला "ॐ केशवाय नम:" असे म्हणतात, ते नाम नव्हे काय ? वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करीत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे, त्यांच्या अर्थाकडे असावे; अर्थ न समजला तरी भगवंताकडे असावे.


४६. रामनाम हे ॐकाराचेच स्वरूप आहे. ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 14, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १४ फेब्रुवारी २०१४


१४ फेब्रुवारी


आनंद हवा असेल तर नाम घ्यावे.






शरीरस्वास्थ्याला लागणार्‍या शरीरातल्या द्रव्यांत जेव्हा कमी-अधिकपणा उत्पन्न होतो तेव्हा शरीरस्वास्थ्य बिघडते; त्यालाच आजार म्हणतात. सुंठ हे असे औषध की, ते शरीरात कमी झालेल्या द्रव्याची भरपाई करते आणि जास्त झालेले द्रव्य कमी करून आरोग्य राखते. नाम हे सुंठीसारखे आहे. पारमार्थिक प्रगतीच्या मार्गात प्रत्येक व्यक्तीतल्या ज्या ज्या गुणदोषांमुळे अडथळा येतो, ते गुणदोष दूर करून भगवंताचे नाम प्रगतीचा मार्ग मोकळा करते. म्हणून कोणात कोणतेही गुणदोष असोत, त्याने निष्ठेने नाम घेतले की त्याचे काम बिनचूक होऊन तो ध्येय गाठतो. आपल्यात तेलाचा नंदादीप लावण्याची पद्धत आहे. तो अखंड तेवत ठेवायचा असतो. त्यात तेलाचा पुरवठा करावा लागतो. तसे, ज्याला आनंदरूपी नंदादीप हवा असेल त्याने सतत नामरूपी तेलाचा पुरवठा करीत राहिले पाहिजे. थोडक्यात म्हणजे, ज्याला आनंद हवा असेल त्याने सतत नाम घेतले पाहिजे. आनंदाचा उगमच नामात आहे. केव्हाही आणि कुठेही पाहिले तरी बर्फामध्ये गारपणा हा असायचाच, त्याचप्रमाणे परमात्म्याजवळ नेहमी आनंद हा असायचाच असे समजावे. आपण जगामध्ये व्याप वाढवितो तो आनंदासाठीच वाढवितो; पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणांवर अवलंबून असल्याने, ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. म्हणून हा आनंद अशाश्वत होय. 'खावे, प्यावे आणि मजा करावी' हे तत्वज्ञान मला थोडेसे पटते, पण त्यामध्ये मोठा दोष असा की, ते देहबुद्धीवर आधारलेले असल्याने कायमचे म्हणजे टिकणारे नाही; कारण आजची चांगली परिस्थिती उद्या बिघडली, की याची मजा गेली ! उलट, येईल त्या परिस्थितीमध्ये आपण आनंद निर्माण करावा. रोज अगदी पाचच मिनिटे का होईना, भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या पाच मिनिटांचा आनंद शंभर वर्षे नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासन्‌तास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो, तसेच इथे आहे. जगण्यामध्ये आनंद आहे ही गोष्ट खरी, पण आनंदाचे जगणे नसेल तर ते मेल्यासारखेच आहे. ज्याच्याजवळ भगवंत आहे, त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल. म्हणून ज्याला जगायचे आहे त्याने नाम घ्यावे.
'सदा सर्वदा योग तुझा घडावा' असे श्रीसमर्थांनी मागितले. याचे कारण हेच की, जिथे भगवंत तिथे आनंदीआनंद असतो. व्यापारी लोक 'आज रोख, उद्या उधार' अशी पाटी लावतात. त्याप्रमाणे आपणही 'आनंद रोख, दुःख उधार' अशी वृत्ती ठेवावी. ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे.

४५. भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे. त्यात समाधान मानून त्याचा कधीही विसर पडू न द्यावा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 13, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १३ फेब्रुवारी २०१४

 १३ फेब्रुवारी 
नामाचे त्रिकालबाधित श्रेष्ठत्व ! 



नाम हे सच्चिदानंद स्वरूप आहे. शुद्ध परमात्मस्वरूपाच्या अगदी अगदी जवळ कुणी असेल तर ते फक्त नामच होय. नाम हे चिन्मय असल्यामुळे त्याचा आनंद ओसंडून येतो आणि ही सृष्टी तयार होते. अनेक रूपे घडविणे, ती मोडणे आणि नवीन तयार करणे, पण आपण स्वतः मात्र मूळ स्वरूपाने राहणे, ही केवढी विलक्षण लीला आहे ! खरोखर, तुम्हाला मी काय सांगू ! बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत मी नामाबद्दलच बोलत आहे, अजून नामाचे माहात्म्य संपत नाही. नामाचे माहात्म्य सांगून संपले तर भगवंताचे भगवंतपण लटके झाले असे समजावे. जो नामात 'मी' पणाने नाहीसा झाला त्यालाच नामाच्या माहात्म्याची कल्पना आली. असा पुरूष नामाविषयीं मौन तरी धरील, कारण त्याचे माहात्म्य कोणालाच सांगता येणार नाही; किंवा शेवटच्या श्वासापर्यंत नामाचे माहात्म्यच सांगत राहील, कारण ते कितीही सांगितले तरी संपणार नाही, आणि कितीही ऐकले तरी तृप्ती होणार नाही. नामाने सर्व पापे नाहीशी होतात. भगवंताला विसरणे हे सर्वांत मोठे पाप आहे. नामाने भगवंताचे स्मरण होते. नाम हे वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे, कसे ते पहा. वेदाध्ययनापासून फायदा होण्यासाठी चारी वेदांचा अभ्यास करणे जरूर आहे. त्यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात. नामाला श्रम नाहीत. दुसरे, वेदांचा अधिकार सर्व लोकांना नाही, पण नाम कुणीही घ्यावे. वेदांच्या मंत्रांचा आरंभ ॐकारानेच होतो, म्हणून वेदारंभी देखील नामच आहे. नाम हे तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे. अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते; पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती, वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम हे घरबसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते. पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचे जर न शिकला तर जाणे व्यर्थ गेले म्हणावे. नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणे जरूर आहे. नाम हे सर्व सत्कर्मांचा राजा आहे. सत्‌ म्हणजे भगवंत, त्याच्याकडे नेणारे जे कर्म तेच सत्कर्म. इतर कर्मे आडवळणाने भगवंताकडे नेतात, नाम हे साक्षात्‌ भगवंताकडे पोहोचवते. नामाने भवरोग नाहीसा होतो. भव म्हणजे विषय. विषयांची आसक्ती असणे हा सर्व रोगांचा पाया आहे. नाम घेतल्याने भगवंताकडे प्रेम लागते आणि इतर ठिकाणची आसक्ती सुटते. नामाने सर्व दुःखे नाहीशी होतात, कारण या दुःखाचे मूळ विषयांच्या आसक्तीमध्ये आहे, आणि नामाने ती आपोआप सुटते, म्हणून दुःख नाहीसे होते. शिवाय, भगवंत हा आनंदरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरला की दुःख त्या ठिकाणी कसे राहू शकेल ?

 ४४. प्रत्येक मनुष्याने भगवंताचे नाम घ्यावे, त्याचे ध्यान करावे, त्याच्या स्मरणात राहावे, आणि आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे. 

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 12, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १२ फेब्रुवारी २०१४

 १२ फेब्रुवारी
 नाम हे सत्स्वरूप आहे



. नाम हे रूपापेक्षा निश्चित श्रेष्ठ आहे; त्यामुळे रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम सोडू नये. पुढे रूप आपोआप येऊ लागेल. रूप हे जड आणि दृश्य असल्यामुळे उत्पत्ती आणि विनाश, वाढ होणे आणि घटणे, जागा व्यापणे आणि जागा बदलणे, कालमानाने फरक पडणे, इत्यादि बंधने त्याला असतात; पण नाम दृष्याच्या पलिकडे आणि सूक्ष्म असल्यामुळे त्याला उत्पत्ती आणि विनाश. वाढ आणि घट, देशकालनिमित्ताच्या मर्यादा, इत्यादि कोणतेही विकार नाहीत. नाम हे सत्स्वरूप आहे. नाम हे रूपापेक्षा व्यापक असते. व्यापक वस्तूचे क्षेत्र मोठे असल्याने तिच्यामध्ये शक्तीदेखील अधिक असते. जिच्यामध्ये शक्ती जास्त असते ती वस्तू अधिक स्वतंत्र असते. जी वस्तू अधिक स्वतंत्र असते तिला बंधने किंवा मर्यादा कमी असतात. म्हणून नाम हे रूपापेक्षा अधिक व्यापक, अधिक शक्तिमान, अधिक स्वतंत्र, आणि अधिक बंधनरहित असते. आपली ज्ञानक्रिया कशी चालते हे पाहू. आपण एका टेकडीवर उभे राहून सृष्टिसौंदर्य पाहिले. त्या पाहण्यात कोणकोणत्या क्रिया होतात पाहा. प्रथम डोळयांमधून प्रकाशकिरणे आत गेली. बाह्य सारासार विचार करून त्या वस्तूचे यथार्थ ज्ञान आपल्याला करून देते. पण मनुष्याच्या बुद्धीचा व्यापार इथेच थांबत नाही. टेकडीवरून आजूबाजूला पाहात असताना झाडे, वेली, घरे, बागा, माणसे, पक्षी, पाण्याचे तलाव, इत्यादि सर्व वस्तूंचे ज्ञान झाल्यावर पुन्हा त्यांचे एकीकरण होऊन, 'ही सृष्टीची शोभा आहे' असे ज्ञान आपल्याला होते. म्हणजे अनेकांत एकत्व शोधणे हेच मानवी ज्ञानाचे लक्षण आहे. या जगामध्ये कितीतरी विचित्रता आढळते. नाना तऱ्हेचे दगड, नाना तऱ्हेचे किडे, नाना प्रकारचे पक्षी, प्राणी, या सर्वांची नावे जरी भिन्न असली तरी त्या सर्वांमध्ये 'असणेपणाचा' गुण आहे; म्हणजे, सजीव प्राणी झाला तरी तो 'आहे', आणि निर्जीव वस्तू झाली तरी तीही 'आहे'. एवढेच काय, पण आनंदालासुद्धा 'आहेपणा'चा गुण आहे. या 'असणेपणा'च्या गुणाला 'नाम' असे म्हणतात. यालाच 'ॐकार' असे म्हणतात. 'ॐकारांतून' सर्व सृष्टी उगम पावली. ॐकार हे परमात्म्याचेच स्वरूप आहे. अर्थात्‌, नाम म्हणजे सत्‌ होय. म्हणूनच नाम हे सृष्टीच्या आरंभी होते, ते सध्या आहेच, आणि सृष्टीचा लय झाला तरी ते शिल्लक राहणारच. नाम म्हणजे ईश्वर होय. नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्यामध्येच ती लीन होतात. रूप हे नामाहून निराळे राहू शकत नाही. नाम हे रूपाला व्यापून पुन्हा शिल्लक उरते.

४३. नाम हे शाश्वत आहे. ते पूर्वी टिकले, आता आहे, आणि आपण गेल्यावर ते राहणार आहे.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 11, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ११ फेब्रुवारी २०१४

 ११ फेब्रुवारी
 मायेच्या तावडीतून सुटण्यास नाम हेच साधन.




 परमेश्वराची भक्ती करावी, त्याचे नामस्मरण करावे, असे पुष्कळ लोकांना मनातून फार वाटते, पण काही ना काही कारणाने ते घडत नाही. असे का व्हावे ? तर माया आड येते. मायेला बाजूला सारून भगवंतापर्यंत कसे पोहोचायचे ? माया ही भगवंताच्या सावलीसारखी आहे; "तिला सोडून तू ये" असे त्याला म्हणणे म्हणजे " तू येऊ नकोस" असे म्हणण्यासारखेच आहे; कारण एखाद्या इसमाला " तू ये, पण तुझी सावली आणू नको " म्हटले तर कसे शक्य आहे ? म्हणून माया ही राहणारच. आपण तिच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत पोहोचायचे कसे हाच प्रश्न आहे; आणि या प्रश्नाचे उत्तर एकच : भगवंताचे नाम घेणे. नामानेच मायेच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत जाता येते. जसे व्यक्तीशिवाय सावलीला अस्तित्व नाही, तसे मायेला स्वतंत्र अस्तित्व नाही. तसेच तिला स्वतंत्र शक्तीही नाही. एखादा इसम पूर्व दिशेला चालला आहे, तर त्याची सावली त्याच्यामागून त्याच दिशेने जाईल; त्या सावलीच्या मनात जर दिशा बदलून पश्चिमेकडे जाण्याचे आले तर तिला ते शक्य नाही. तो मनुष्यच जर पश्चिमेकडे जाऊ लागला तरच तिला त्या दिशेकडे जाणे शक्य आहे. याचाच अर्थ, माया भगवंताच्या अधीन आहे. सर्व विश्व हे मायारूप आहे; म्हणजे ते परमेश्वराची छाया आहे; याचा अर्थ, या विश्वाला आधार परमेश्वरच आहे. आता या मायेच्या तावडीतून सुटून परमेश्वराकडे कसे जायचे ? समजा, एखाद्या इसमाला एका मोठया व्यक्तीला भेटायचे आहे. पण त्याच्याकडे सरळ जाणे शक्य नाही, कारण त्याच्या घराच्या दारावर रखवालदार, कुत्रे वगैरे आहेत. त्यांच्या तावडीतून सुटून गेले तरच मालकाची भेट होणार. पण समजा, "मला अमक्या दिवशी येऊन भेटावे" अशा मजकुराचे त्या मालकाच्या सहीचे पत्र त्याला आले असेल, तर ते पत्र त्या रखवालदाराला दाखविताच तो त्याला बिनतक्रार आत सोडील आणि मालकाची भेट होईल. तसे भगवंताचे नाम, म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र जर आपण घेऊन गेलो तर मायारूपी रखवालदार ती सही पाहून आपल्याला आत सोडील आणि भगवंताची भेट होईल. म्हणून माया तरून जायला भगवंताचे नामस्मरण हाच रामबाण उपाय आहे. नामस्मरणात खूप तल्लीन व्हावे, देहाचा विसर पडावा. देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे. भगवंत जर कृपण असेल तर तो नामभक्ती देण्यात आहे. म्हणून त्याला आळवावे आणि 'तुझ्या नामाचे प्रेम दे' हेच मागावे. बाकी सगळे देईल, पण हे नामप्रेम तो फार क्वचित्‌ देतो. म्हणून आपण तेच मागावे. रामाचे अनुसंधान नित्य ठेवावे आणि आनंदात राहावे.

४२. विषयाची ऊर्मी हे मायेचे स्मरण होय; नामाचे स्मरण हे भगवंताचे स्मरण होय. 
( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 10, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १० फेब्रुवारी २०१४

 १० फेब्रुवारी
 अखंड समाधानाचा मार्ग : नामस्मरण: वृद्धांना उपदेश.



 अखंड रामसेवा ज्याला लाभली । धन्य धन्य त्याची माउली ॥
स्वार्थरहित रामसेवा । याहून दुजा लाभ न जीवा ॥
 वाचेने भगवंताचे नाव । कायेने भगवंतसेवा ।
चित्ती भगवंताचे ध्यान । आपण रहावे रामार्पण ।
याहून अन्य सेवा । कोणतीही नाही जाण ॥
जे जे दिसते ते ते नासते । हा बोध घेऊनि चित्ती ।
सज्जन लोक जगी वर्तती । तैसे तुम्ही आता वागा जगात ॥
मुलां-बाळांस सांभाळून राहावे । प्रपंचात उदास न व्हावे ॥
प्रपंचाची उपाधि । आता मनात न आणावी ॥
 उपाधिवेगळे झाला । ऐसे ऐकू द्यावे मला ॥
 उपाधीत राहिला । परि चित्ताला न वास दिला ।
ऐसे ठेवा मनी । राम आणावा ध्यानीं ॥
आता यापरतें हित । नाहीं दुसरे जगांत ।
हा माझा बोल । न मानावा फोल ॥
आता रामा तुझा झालो । कर्तेपणातून मुक्त झालों ।
 ऐसें आणावे मनांत । शक्य तितके राहावे नामात । याहून दुसरें न आणावे मनांत ॥
 लौकिकांतील मानापमान । यांचे सोडावें उदक । ध्यानीं आणावा रघुनंदन एक ॥
बायकोमुलांबाळांत राहावे । चित्त रामाकडे ठेवावें । होईल तेवढे नाम घ्यावें ॥
अंतरी परमात्मा त्यास । ठेवून साक्ष भावे भजावे रघुनाथास ॥
 न सोडावा मनाचा धीर । मागे आहे रघुवीर ॥
वृद्धपण आलें । शरीर क्षीण झालें । तरी आपण अभिमान घेऊनच राहिले । त्यास सोडावें दूर ॥
 प्रपंचांत वृद्धपणीं फारसें न पाहावें । मुलांस मार्ग दाखवून सुखी राहावें ॥
औषध पथ्यपाणी सांभाळावें । पण दुःखी कष्टी कधीं न व्हावें ॥
 शरीरसंपत्ति क्षीण झाली । तरी वृत्ति क्षीण नाही बनली ॥
 जोवर देहाची संगति । तोवर "मी-माझें" ही वृत्ति ॥
आता वृत्ति राखावी रामापाशी । दुजी उठू न द्यावी त्यापरती ॥
आजवर जें घडलें । ते प्रापंचिक पारमार्थिक असो भले ।
तें रामकृपेने झाले । हे ठेवावे चित्तीं । आता न सोडावा रघुपति ॥
 वयोमानानें शरीर होतें क्षीण । वागणें आहे फार जपून ॥
 देह आळशी न ठेवावा हे जरी खरें । तरी त्याची परिस्थिती ओळखून राहणे हे बरे ॥
आता आपण झालो शरीराचे अधीन । हे वयोमानानें दृश्य भासत ।
तरी भाव ठेवा रामापायीं । ज्याला क्षीणता कधीं आली नाहीं ॥
 चित्तीं राखावें समाधान । आनंदानें संसार करावा जाण ॥
समाधानाचें करावे जतन । ते नसावें कशावर अवलंबून ॥
 लाभहानींत न गुंतवता मन । राखता येईल समाधान ॥ स
माधानाला अडवणूक जाण । माझा मीच आपण ॥
देहाचे भोग ठेवावे देहाचे माथीं । समाधानांत राखावी वृत्ति ॥
सर्व कर्ता राम हा भरवसा ठेवावा ठाम ।
 मग काळजीचें उरलें नाहीं काम । हे सर्व जुळतें म्हणतां राम राम ॥
 तरी सर्वांनीं घ्यावे रामनाम । व्हावें परमात्म्याचे आपण । कृपा करील रघुवीर ॥

४१. मागणे तुम्हा एकच पाही । नामावाचून दूर कधीं न राही ॥ 

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 9, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ९ फेब्रुवारी २०१४

 ९ फेब्रुवारी 
नित्यनेम करणे म्हणजे काय ? 



 नित्यनेम करणे म्हणजे सर्वकाळ नित्यात राहणे. आपण मुळात स्वतःच नित्य असून अनित्यात राहिलो आहोत. नित्य जो परमात्मा त्याला विसरून, विषय जे अनित्य त्यांत पडल्यामुळे आपल्याला त्याची आठवण होईल असे जे करणे त्याला नित्यनेम म्हणतात. आपण नेहमीच नित्यनेमात असावे, पण तसे होत नाही; म्हणून दिवसातून थोडा वेळ तरी त्याची आठवण होण्याकरिता काही वाचन आणि वाचलेल्याचे मनन करावे, म्हणजे त्याची सवय होते. जो अखंड नामस्मरण करतो तो नेहमीच नित्यनेमात असतो. नित्यनेम खरा कोणी केला असेल तर तो ब्रह्मानंदबुवांनीच. आपल्याला सदा नामात कसे राहता येईल याचा आपण विचार करावा. याकरिता गुरूआज्ञा प्रमाण मानणे हेच खरे साधन आहे. गुरू सांगेल तोच नित्यनेम होय. त्याला शरण जावे. रोज थोडेसे वाचन, त्यानंतर मनन, मननानंतर त्याप्रमाणे आचरण, आणि शेवटी गुरूस अनन्यशरण, हाच साधकाचा साधनक्रम आहे, आणि हाच त्याचा नित्यनेम होय. आपले आयुष्य जसजसे वाढत जाईल तसतशी साधकाची भगवंताला भेटण्याची उत्सुकता वाढत गेली पाहिजे. केवळ नेम आहे म्हणून उगीच करू नये; साधकाने कोणतीही गोष्ट मनापासून करायला शिकावे. साशंक वृत्तीने परमार्थात बिघडते हे ध्यानात ठेवावे. श्रद्धा हे परमार्थाचे मुख्य भांडवल होय. समाधान हेच सर्वस्व आहे अशी श्रद्धा ठेवावी. ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपला ताप आपल्याला पाहता येतो, त्याप्रमाणे साधन करताना आपले आपल्याला समाधान किती झाले हे पाहिले पाहिजे. साधकाने जगातले दोष पाहू नयेत, कारण त्या दोषांचे बीज आपल्यामध्येच असते. लोकेषणा, मान, फार घातक आहेत. मोठमोठे साधकसुद्धा त्यांच्यापायी अधोगतीला जातात. तसेच, पैसा आणि कामवासना यांच्या मर्यादा ओलांडल्यामुळे मोठे साधनी लोकसुद्धा भगवंताच्या जवळ येऊन घसरतात. जगातले हे सर्व पाश आपल्याला बंधनात पाडतात. भगवंताचा पाश हाच खरा पाश. तोच आपल्याला सर्व बंधनांपासून मुक्त करून शाश्वत समाधानाचा लाभ मिळवून देतो. जगाच्या मान अपमानाला कधी भुलू नये. पैसा आणि कामवासना यांच्यापेक्षाही मान हा देहबुद्धीला जास्त चिकटून आहे. तिथे अगदी सावध असावे. जिथे आपल्याला मान मिळण्याचा संभव आहे तिथे जायचे टाळावे. टाळणे शक्य नसले तर "हे भगवंताचे देणे आहे" असे मनापासून समजावे. जो खरा मोठा असतो तो कधी मानाची इच्छा धरीत नाही, आणि मान त्याच्याकडे आला तर त्याची क्षिती बाळगत नाही. आपल्याला मान आवडतो का ते पाहावे, म्हणजे त्यावरून आपल्या अंगी खरे मोठेपण किती आहे हे आपल्याला कळेल. जाता-येता देवाला नमस्कार करावा, "राम, राम" म्हणावे. भगवंताचे प्रेम एकदा लागले की ते पुनः सुटणार नाही.

 ४०. भगवंताचा पाश हा पाशच खरा. पण तो आपल्याला बंधनापासून मुक्त करतो.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 8, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ८ फेब्रुवारी २०१४

 ८ फेब्रुवारी 
नामस्मरणापरते दुसरे हित नाही.



 एक गृहस्थ मला भेटले. ते म्हणाले, "मला देव पहावासा वाटतो. तुम्ही पाहिला आहे का ?" मी म्हटले, "पाहिला आहे." त्यांनी विचारले, 'तो मला दिसेल का ?' मी म्हटले, "दिसेल, पण या डोळयांनी दिसणार नाही. देवाला पाहण्याची दृष्टी वेगळी आहे." आज आमची विषयाची दृष्टी आहे. ती भगवंताची नाही. आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय : भगवंताच्या नामात राहावे. नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. सगळयांना माझे सांगणे आहे; हे ऐकणे अत्यंत जरूर आहे बरे ! ऐकणे कशासाठी ? तर मी बरोबर मार्गाने जातो आहे की नाही, ते कळण्यासाठी. पण नुसते ऐकून चालणार नाही; ऐकून कृती केली तरच साधेल. ती तुम्ही करा. आचरणात आणलेले तेवढेच कामाला येईल. सगळयांनी नामस्मरण करा. नामस्मरणासारखा कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. जे सहज आपल्याजवळ आहे, अत्यंत उपाधिरहित आहे, जे कुणावर अवलंबून नाही, असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम आहे. तेव्हा शुद्धतेने, शुद्ध आचरणाने जो ते घेईल, त्याचे राम खरेच कल्याण करील. आपल्या गुरूने जे सांगितले ते सत्य मानावे. "या मार्गाने शंभर पावले गेलास तर खजिना सापडेल." असे गुरूने सांगितले, तर दुसऱ्या मार्गाने दोनशे पावले जरी गेला तरी त्याचा काय उपयोग ? "मला सगुण साक्षात्कार व्हावा" असे म्हणतो, पण प्रत्यक्ष बोलणारा चालणारा सदगुरू पाहून समाधान होत नाही तर परमात्म्याचे दर्शन करून देऊन काय उपयोग ? आंबा हवा असेल तर कोय पेरल्याशिवाय कुठला मिळणार ? सदगुरूने जे सांगितले त्यापरते माझे काही हित आहे, हे मनातच येऊ नये. आपण खरोखरी सर्वस्वी त्याचे व्हावे. नामस्मरणापरते दुसरे हित नाही. माझ्या नामाने घरात आजारी पडलेला मनुष्य बरा व्हावा म्हणणे, म्हणजे त्या नामाचा विषयाकडे उपयोग नाही का केला ? बरे झाल्यावर ज्याप्रमाणे आम्ही बाटलीतले औषध टाकून देतो, त्याप्रमाणे गरज संपली की आम्ही देवाला विसरतो. अमुक एक घडावे असे जिथे वाटते तिथे साधनात कमतरता आली. एका सदगुरू वचनावर विश्वास ठेवला म्हणजे सुखदुःखाच्या गोष्टींचा मनावर परिणाम होत नाही. मोठा अधिकारी झाला तरी पोराबाळांबरोबर खेळताना ज्याप्रमाणे तो त्यांच्यासारखा होतो, त्या प्रमाणे व्यवहारात वागावे. आपण निर्लोभतेने वागावे. खेळात ज्याप्रमाणे आपण चुकू देत नाही, त्याप्रमाणे प्रपंचात करावे. प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा. त्याचा वास आत नसावा. आत फक्त भगवंताचा वास असावा.

३९. गुरूचरणी अत्यंत विश्वास । आणि साधनाचा अखंड सहवास । येथे प्रपंचाचा सुटला फास । हाच परमार्थाचा मार्ग आहे खास ॥

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 7, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ७ फेब्रुवारी २०१४

 ७ फेब्रुवारी 
रिकामा वेळ सगळा भगवंताकडे लावावा. 



साधारणपणे ज्या वस्तू देहाला सुख देतात त्या पुष्कळ मिळवणे हे आपल्या जन्माचे ध्येय आहे असे आपल्याला वाटते. परंतु अशा वस्तू ज्यांच्यापाशी पुष्कळ आहेत ती माणसे सुखी झालेली आढळत नाहीत. किंबहूना, अशा वस्तू जितक्या जास्त जमा कराव्या तितकी आपली हाव वाढतच जाते. पुढे वय झाल्यावर देह क्षीण होतो आणि त्याचे भोगण्याचे सामर्थ्य कमी होते. मग वस्तू असून देखील मनाची तळमळ कायम राहते. म्हणून शहाण्या माणसाने आत्तापासूनच आपले सुख बाहेरच्या वस्तूवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा. बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणे अवश्य असते. अशी वस्तू म्हणजे भगवंत होय. भगवंत हा नेहमी राहणारा, स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात. अर्थात्‌ मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाचे जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी. आपल्यासारखा व्यवहारी प्रापंचिक माणसांना भगवंताचे चिंतन करण्यात एकच अडचण येते. ती म्हणजे व्यवहार आणि साधन यांची जोड घालणे. आपली अशी कल्पना असते की भगवंताचे चिंतन करणारा माणूस व्यवहार करू शकत नाही. तुकारामबुवांसारख्या परमात्मचिंतनात बेभान झालेल्या पुरूषांची गोष्ट निराळी. आपल्यासारख्या माणसांना आपला व्यवहार अत्यंत बरोबर केल्यानंतर जो वेळ उरेल तितका भगवंताकडे तर आपण फारच प्रगती केली असे म्हणता येईल. खरे पाहिले असता सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावत नाही. म्हणून दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा आपण निश्चय करावा. नामाच्या आड सर्वच गोष्टी येतात, आपण स्वतःदेखील त्याच्या आड येतो, तेवढे सांभाळावे आणि जगाच्या नादी फारसे न लागता आपले नाम चालू ठेवावे. शिवाय, देवासंबंधीची फक्त संतांनी लिहिलेली पुस्तके रोज थोडी वाचावी, त्यावर मनन करावे, आणि ते आपल्या आचरणात कसे येईल याचा सूक्ष्म विचार करावा. अशा मार्गाने जो जाईल त्याची हां हां म्हणता प्रगती होईल आणि त्याला समाधान मिळेल.

३८. समाधान हीच खर्‍या आनंदाची खूण आहे.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 6, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ६फेब्रुवारी २०१४

 ६ फेब्रुवारी 
नामस्मरण, शरणागती, आणि भगवत्प्राप्ती.



 भगवत्प्राप्तीला शरणागतीशिवाय मार्ग नाही, आणि शरणागती म्हणजे, 'मी कर्ता ' हा अभिमान नाहीसा होऊन, 'सर्व कर्तृत्व परमेश्वराचे आहे' ही दृढ भावना होणे. नामाशिवाय इतर साधनांत 'कृती' आहे; म्हणजे 'मी कर्ता ' या अहंकाराला वाव आहे. स्मरण हा मनाचा धर्म असल्याने त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही, म्हणून त्यात अहंकाराला वाव नाही; शिवाय, स्मरण किंवा विस्मरण या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत; म्हणून नामाचे स्मरण झाले तरी त्यात स्वतःचे कर्तुत्व नसते, त्यामुळे 'मी कर्ता ' ही जाणीव टिकू शकत नाही. 'मी नामस्मरण करतो' हा शब्दप्रयोगसुद्धा बरोबर नाही, कारण नामाचे स्मरण 'होत असते,' ते 'करू' म्हणून जमत नाही. म्हणून शरणागतीला नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही. शरणागतीचा दुसरा अर्थ म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक क्रिया थांबविणे. क्रिया न करणे हे कृती करण्यापेक्षा केव्हाही जास्त सोपे आहे; म्हणजेच शरणागती ही सहज साध्य वाटली पाहिजे. पण अनुभव तसा येत नाही. जी गोष्ट अत्यंत सोपी वाटते ती करायला पुष्कळदा कठीण जाते असा अनुभव येतो. एखाद्याला मोटार वेगात चालव म्हटले तर तो ते सहज करील, पण अती हळू चालव म्हटले तर ते फार कठीण असते. गीतेत भगवंतांनी अर्जुनाला 'तू नुसता मला शरण ये' असे सांगितले आहे. देहबुद्धी गेल्याशिवाय शरणागती येत नाही. देहबुद्धी, वासना, अहंकार, ही सर्व एकच आहेत. जगातल्या वैभवाची आसक्ती आणि परमात्मप्राप्ती, या दोन्ही गोष्टी एकत्र असूच शकत नाहीत. म्हणूनच उद्धवाला श्रीकृष्णांनी एकांतात जाऊन हरिचिंतन करायला सांगितले, आणि असे केल्यानेच माझी तुला खरी प्राप्ती होईल असे म्हणाले. याचा अर्थ हाच की, जगाकडे पाठ फिरविल्याशिवाय भगवंत मिळत नाही. भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातल्या वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यांमध्ये फरक आहे. मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणे, हा व्यवहार होय. सूक्ष्म वासना देहाच्या साह्याने जड बनणे हे व्यवहाराचे खरे स्वरूप आहे. परंतु भगवंताचे याच्या उलट आहे. भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे, त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडाकडून सूक्ष्माकडे जाणे होय. तेव्हा त्याचे साधन हेही जडाकडून सूक्ष्माकडे पोहोचविणारे असले पाहिजे. जड देहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेले असे साधन असेल तर ते नामच होय.

३७. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही; त्यातच भक्ती जन्म पावते.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 5, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ५ फेब्रुवारी २०१४

 ५ फेब्रुवारी
 कळकळीचे नामस्मरण. 



आम्ही सुस्थितीत असलो म्हणजे आमचे नामस्मरण अधिक होते. त्यात काही बिघाड झाला तरी आपले स्मरण टिकून राहील ? द्रौपदीला आता आपला कोणी त्राता नाही असे वाटून जेव्हा तिने श्रीकृष्णाचा धावा केला, तेव्हा भगवान लगेच धावून आले. असे खऱ्या कळकळीचे स्मरण आपले असायला पाहिजे. जसे लहान मूल काहीही झाले तरी आपल्या आईलाच हाक मारते, दुसरे तिसरे कोणी जाणत नाही, तसे आपले परमेश्वर स्मरणाच्या बाबतीत झाले पाहिजे. आपली भिस्त खरोखर कोणावर आहे हे संकटकाळीच उत्तम कळते. नामस्मरणाच्या पायऱ्या अशा सांगता येतील पहिली, सुस्थितीतले वरवरचे स्मरण; दुसरी, परमात्म्याशिवाय आपले कोणी नाही ही जाणीव होऊन संकटसमय़ी त्याचे स्मरण; आणि तिसरी, हीच जाणीव दृढ होऊन पुढे अखंड होणारे नामस्मरण. यांपैकी वरवर स्मरण करणारा 'आम्हांला संकटेच नकोत असे म्हणतो, तर साधुसंत 'आम्हांला संकटे येऊ देत' असे भगवंताजवळ मागतात, कारण त्यावेळेसच त्याचे खरे स्मरण होते. आपण स्वत: आहोत याची आपल्याला आज जितकी खात्री आहे, तितकी खात्री भगवंत आहे अशी झाली पाहिजे. परमात्मा सर्व ठिकाणी आहे ही कल्पना केव्हा तरी आपल्याला होते खरी, पण ती कायम न राहिल्यामुळे दृढपणे आपल्या आचरणात येत नाही; आपली वृत्ती तशी झाली की ती आपल्या आचरणात येईल. भगवंत हा कर्ता आहे अशी आपली दृढ भावना झाली की आपण प्रत्येक गोष्ट त्याला सांगत बसणार नाही. 'भगवंताला माझे सर्व कळते' असे जर खरेच वाटले तर त्याला आवडेल असेच आपण वागू. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळयांसमोर आणून प्रार्थना करावी, आणि "तुझे विस्मरण जिथे होते, तिथे मला जागृत करीत जावे; नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा," असे म्हणून त्याला मन:पूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळेल. जो भगवंताचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही. विषयाचा आनंद हा दारूसारखा आहे; ती धुंदी उतरल्यावर जास्त दु:खी बनतो. 'मी भगवंताचा आहे' या भावनेने जो राहील त्यालाच खरा आनंद भोगता येईल.

३६. भोग व दुःख यांत वेळ न घालविता भगवंताकडे लक्ष दिले पाहिजे.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 4, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ४ फेब्रुवारी २०१४

४ फेब्रुवारी
 भगवंताच्या नामानेच वासनाक्षय ! 


आपण सर्व जीव वासनेत गुंतलेले आहोत, कारण आपला जन्मच वासनेत आहे. वासना म्हणजे 'आहे ते असू द्याच, आणि आणखीही मिळू द्या' असे वाटणे. आपण सध्या या स्थितीत आहोत. पण सुरूवात म्हणून आपण असे म्हणावे की, 'आहे ते असू द्या, आणि आणखी मागायचे ते परमेश्वराजवळ मागू या.' म्हणजे, मिळाले तर 'भगवंताने दिले', आणि न मिळाले तर 'त्याची इच्छा नाही', अशी जाणीव होऊन 'दाता परमात्मा आहे' ही भावना वाढू लागेल; आहे तेही त्याच्याच इच्छेचे फळ आहे असे वाटू लागून अस्वस्थता आणि आसक्ती कमी होऊ लागेल; आणि आसक्ती कमी होऊ लागली की 'हवे नको' कमी होऊन वासना ओसरू लागेल. केवळ आपल्या कर्तबगारीने वासनेच्या पलीकडे जाणे अशक्य आहे; त्याला शरणागतीशिवाय गत्यंतर नाही. याकरिता योग्य संगतीचाही फार उपयोग होईल. एखाद्या बैराग्याची संगती केली तर स्वाभाविकच कपडयाचे प्रेम कमी होईल, पण एखाद्या शेटजीच्या संगतीत राहिलो तर छानछोकी करण्याकडे प्रवृत्ती होईल. म्हणून अशा संगतीत राहावे की ज्यामुळे शरणागती यायला मदत होईल. शरणागती म्हणजे परमेश्वराला सर्वस्वी अर्पण होऊन राहणे; याचाच अर्थ, आपण उपाधिरहित बनणे. तर मग आपण अशाची संगती केली पाहिजे की जे अत्यंत उपाधिरहित आहे. हे साधन म्हणजे भगवंताचे नाम. काळ, वेळ, परिस्थिती, उच्च-नीच भाव, स्त्री,पुरूष, विद्वत्ता, अडाणीपणा, श्रीमंती, गरिबी, प्रकृतीची सुस्थिती-दुःस्थिती, वगैरे कोणतीही गोष्ट नामाला आड येऊ शकत नाही. तसेच, त्याला कोणतीही उपकरणे लागत नाहीत. ते हृदयात सतत आपल्याबरोबर बाळगता येते. नामात वैराग्याचे कष्ट नाहीत, आणि कुठेही, केव्हाही ते बरोबर नेता येते. त्यासाठी विषयाची तदाकारवृत्ती सोडली पाहिजे. 'भगवंत माझ्या मागे आहे' अशी श्रद्धा राखली की वृत्ती विषयाशी तदाकार होत नाही. मारूतीने दिलेली मुद्रिका पाहिल्यावर सीतेला रामाच्या स्वरूपाची आठवण झाली, त्याप्रमाणे नाम घेताना आपल्याला त्याची आठवण झाली पाहिजे. भगवंताच्या अनुसंधानात जो राहिला त्याने काळावर सत्ता गाजविली. अशा लोकांना मरणाचे भय कुठून असणार ? भगवंताला सर्वस्व दिल्यामुळे त्यांना वासना उरत नाही; आणि जिथे वासना उरली नाही तिथे काळाचा शिरकाव होत नाही. वासना नष्ट होणे म्हणजे देहबुद्धी नष्ट होणे होय. वासनेच्या क्षयामध्ये आपलेपणाचे मरण आहे, आणि हे मरण डोळयांनी पाहण्यासाठी आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे.

३५. वासनेचा क्षय भगवंताच्या नामात आहे हे अक्षरशः खरे आहे. 

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 3, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३ फेब्रुवारी २०१४

 ३ फेब्रुवारी
 नाम घेतल्याने आपले अवगुण कळून येतील. 



जगातली अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही, की मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागणे. जसजसे साधन वाढत जाईल तसतसे आपल्यातले अवगुण प्रखररूपाने दिसू लागतात, आणि त्या अवगुणांचा पुढे डोंगरच वाटू लागतो. 'हे परमेश्वरा ! इतक्या अवगुणांनी मी भरलेला असताना, तुझे दर्शन व्हावे अशी मी कशी अपेक्षा करू ? एवढया पर्वतप्राय अवगुणांच्या राशीतून मला तुझे दर्शन होईल हे कालत्रयी तरी शक्य आहे का ?' असे वाटू लागते. साधन करण्यापूर्वी, रागीट माणूस कधी त्या रागाची खंत बाळगत नाही; किंबहूना, तो अवगुण आहे हे मुळी त्याला पटतच नाही. तो म्हणतो, 'व्यवहारात असा दरारा पाहिजेच; त्याशिवाय कसे चालेल ?' एक साधक मला म्हणाला की, 'अलीकडे मला फार राग येऊ लागला आहे.' वास्तविक, तो राग आताच येऊ लागला असे नसून पूर्वीपासूनच त्याच्याजवळ होता, परंतु साधन करू लागल्यापासून त्याला जाणीव होऊ लागली आहे, किंवा क्रोध वाईट आहे हे आता त्याला कळू लागले आहे, इतकेच ! एक लग्नाचा मुलगा होता. त्याने बऱ्याच मुली पाहिल्या, पण एकही त्याच्या मनास येईना. त्याचे आईवडील कंटाळून त्याला म्हणाले, ' तुला मुलगी पसंत पडू दे, मग आम्ही पुढचे काय ते ठरवू.' ते काही मुलगी पाहायला बरोबर जात नसत. त्या मुलाची मोठी बहीण होती तीच त्याच्याबरोबर जात असे. एका ठिकाणाहून मुलगी पाहून आल्यावर मोठया बहिणीने त्याला विचारले, 'कशी वाटली रे तुला ?' त्यावर तो म्हणाला, 'नाही बुवा आपल्याला पसंत.' मोठी बहीण चाणाक्ष होती; तिने फक्त त्याच्या तोंडासमोर आरसा धरला आणि विचारले, 'या प्रतिबिंबापुढे कशी काय वाटते ?' तेव्हा स्वतःचे आणि मुलीचे रूप त्याच्या ध्यानी आले, आणि तो म्हणाला, 'पुष्कळ बरी आहे.' सारांश, जिथपर्यंत आपल्याला स्वतःचे खरे दर्शन होऊ शकत नाही, तिथपर्यंत दुसऱ्यांचे अवगुणच आपल्याला दिसतात. आपल्याला दुसऱ्यांचे जे काही अवगुण दिसतात, त्यांचे बीज आपल्यातच आहे, हे माणसाने ठाम ओळखले पाहिजे. तेव्हा, दुसऱ्याचे अवगुण पाहण्याची वृत्ती आपण प्रथम टाकून दिली पाहिजे. दुसऱ्याचे अवगुण पाहणे हा साधा नेहमीचा व्यवहार आहे, तो परमार्थ नव्हे. खरा परमार्थी जो असतो तो सतत आत्मपरीक्षण करीत असतो. त्याला दुसऱ्याचे अवगुण दिसतच नाहीत; त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की, त्या मानाने इतर सर्वजण त्याला परमेश्वररूपच भासतात; आणि हाच खरा परमार्थ.

३४. आत्मपरीक्षा करून स्वतःमधील अवगुणांच्या बीजाचे उच्चाटन करणे हे एक मोठे साधन आहे; आणि हे साधण्यास नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 2, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २ फेब्रुवारी २०१४

 २ फेब्रुवारी 
नामाने सद्‍बुद्धी उत्पन्न होते. 


कौरवांनी पांडवांना निदान पाच गावे तरी द्यावीत, म्हणजे युद्धाचा प्रसंग टळेल, म्हणून भगवान् श्रीकृष्ण स्वतः दुर्योधनाकडे शिष्टाई करण्याकरिता गेले. त्यावेळी दुर्योधनाने सांगितले की, 'देवा, तू म्हणतोस ते सर्व बरोबर आहे. न्यायाच्या दृष्टीने तू म्हणतोस तसे काहीतरी करणे जरूर आहे. पण तसे करण्याची मला बुद्धीच होत नाही, त्याला मी काय करू? तू सर्वसत्ताधीश आहेस, तर मग माझी बुद्धीच पालट म्हणजे सर्वच प्रश्न एकदम मिटेल!' परंतु तसे काही न होता पुढे युद्ध झाले हे प्रसिद्धच आहे. तीच स्थिती रावणाच्या बाबतीतही दिसते. म्हणून, सगुणरूपी अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही असे दिसते. सदबुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे. म्हणूनच त्रिकालबाधित असणाऱ्या नामावताराची आता जरूरी आहे. नाम म्हणजे भगवंतच आहे. ते नाम अनन्य होऊन आपण घेऊ या. एका माणसाची प्रकृती बरी होती पण त्याच्या पायामध्ये काहीतरी दोष उत्पन्न झाला. डॉक्टर म्हणाला की, 'जीव वाचवायचा असेल, तर पाय कापायला हवा.' आता, नुसता प्राण आहे पण हात हलत नाही, पाय हलत नाही, डोळयांनी दिसत नाही, कानांनी ऐकू येत नाही, पण प्राण आहे, तर उपयोग नाही. याउलट, बाकी सगळे आहे पण प्राण नाही, तरीही उपयोग नाही. प्राण आहे पण बाकीच्या गोष्टींपैकी एखादी नसली तर चालू शकेल. समजा, कानाने ऐकू येत नाही; नाही तर नाही ! कुठे बिघडले ? उपासना, अनुसंधान, हे प्राणासारखे समजावे; बाकी व्याप आहे तो शरीराच्या इंद्रियांप्रमाणे समजावा. यात भगवंताचे अनुसंधान चुकले तर प्राणच गमावल्यासारखे आहे; ते सांभाळून जे करता येईल तेवढेच करणे जरूर आहे. ते न सांभाळता बाकीच्या गोष्टी केल्या तर अंती निराशा आहे. आमच्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत म्हणून आम्ही दुःखी आहोत असे म्हणण्यापेक्षा, ती गोष्ट आमच्या मनात आहे हेच दुःखमूळ आहे. अमकी गोष्ट सुखदायक आहे ही जी कल्पना आहे, तीच दुःखमूळ आहे, हे समजून आपण वागले पाहिजे. मांजर उंदराशी खेळते; ते त्याला धरील, परत सोडील, पुनः धरील, पुनः सोडील, पण शेवटी प्राण घेईलच त्याचा. तसे काळ आपल्याशी करतो आहे; आशेत गुंतवून ठेवील, पुढे जाईल. आपण पहिल्यापासूनच हे ओळखून राहावे की असे गुंतून राहण्यात काही फायदा नाही, आणि अनुसंधान ठेवले तरच मनुष्याचे कल्याण होईल. नाही तर फार कठीण आहे. मी-मी म्हणणारे, दुसऱ्याला ज्ञान सांगणारे, विद्वान, शास्त्री, पंडित, सर्व खरे भ्रमातच आहेत. म्हणून म्हणतो, एक करा ' अनुसंधान टिकवून जेवढे करता येईल तेवढेच करा.

' ३३. आपल्या इच्छेनुसार गोष्टी घडत नाहीत ही भगवंताची कृपाच आहे 
 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

February 1, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १ फेब्रुवारी २०१४

१ फेब्रुवारी
 देहबुद्धीच्या विस्मरणाकरिता नाम. 



 आपली आपल्याला ओळख करून घ्यायला नामस्मरण हाच उपाय आहे. परमेश्वराचा अंश प्राणिमात्राच्या ठिकाणी आहे खरा, पण हे जाणण्याची बुद्धी मात्र मनुष्यप्राण्याच्याच ठिकाणी आहे. पण त्याची अधोगती कशी होत जाते पहा : जीव मुळात परमेश्वरस्वरूपच असल्यामुळे प्रथम तो म्हणतो, 'मी तो, म्हणजे परमेश्वरच आहे.' इथपासून घसरत तो म्हणतो, 'मी त्याचा आहे'; आणि अखेर 'त्याचा माझा काही संबंध नाही' इथपर्यंत तो खाली येतो. याला कारण, देहबुद्धीचा पगडा वाढत वाढत शेवटी देह म्हणजेच मी, अशी आपली पक्की भावना होते. पण असे असले तरी मनुष्य अजाणता का होईना, पण खरे आहे ते ओळखल्यासारखेच बोलतो. जसे, एखाद्या इसमाचा स्नेही वारला तर लगेच तो इसम काय म्हणतो, 'आमचे स्नेही गेले!' याचाच अर्थ, समोर असलेल्या देहाला तो स्नेही समजत नसून त्यात असणार्‍या चैतन्याला, ईश्वरी अंशाला, तो खर्‍या अर्थाने आपला मित्र समजतो. म्हणजे अजाणता का होईना, पण खरे तेच त्याच्या तोंडून बाहेर पडते. असे असले तरी स्वतःच्या बाबतीत मात्र तो ही जाणीव कायम राखीत नाही, आणि आपण म्हणजे देहच असे मानून तो वागत असतो. याला कारण, ज्याचा खरा 'मी' आहे त्याचा विसर पडून देहबुद्धी बळकट होत गेली. आता याला उपाय हाच, की ज्या मार्गाने मी खाली घसरत आलो त्याच मार्गाने उलट वर जाणे. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे, आता मी जो देहरूप बनलो आहे, तो मी त्याचा, परमेश्वराचा आहे अशी जाणीव जागृत करणे. याच जाणिवेची परमावस्था म्हणजे 'मी तोच आहे' ही भावना होणे. हे कसे साधावे ? तर ज्याच्या विस्मरणाने माझी ही अधोगती झाली त्याचे स्मरण करणे. स्मरणाला उत्तम साधन म्हणजे भगवंताचे नाव. म्हणजे, नामस्मरणाचा ध्यास ठेवला की मी खरा कोण हे कळेल आणि स्वतःची ओळख होईल. खरा परमार्थ हा असा अगदी सोपा आहे, पण तो योग्य मार्गाने केला पाहिजे. एखादी गाठ सोडविण्यासाठी कोणती दोरी ओढायची ते कळले पाहिजे, नाहीतर जास्तच गुंतागुंत होते, तसेच परमार्थाचे आहे. मी कोण हे जाणले पाहिजे, म्हणजे परमात्मा कोण हे आपोआप कळते. दोघांचे स्वरूप एकच आहे. म्हणजे दोघे एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे; तो जाणायला आपल्यालाही नको का निर्गुण, देहातीत व्हायला ? म्हणून देहबुद्धी सोडली पाहिजे. कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तुरूप व्हावे लागते; त्याखेरीज जाणणेच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपल्याला नको का परमात्मरूप व्हायला ? यालाच 'साधू होऊन साधूस ओळखावे', 'शिवो भूत्वा शिवं यजेत्', असे म्हणतात.

३२. नामस्मरणाची चांगली धुंदी आल्यावाचून 'मी' पण जात नाही.

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या