December 21, 2015

गीता जयंती

आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजे गीताजयंती, म्हणजे आपण हिंदू ज्या ग्रंथाला आपला धर्मग्रंथ म्हणतो त्या भगवद्गीतेची जयंती.कुरुक्षेत्रावर याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला वेद आणि उपनिषदे यांचे सार सांगितले, आणि ते तत्वज्ञान म्हणजे 'भगवद्गीता' हिंदू समाजाने धर्मग्रंथ म्हणून स्विकारला आहे...!


आज परिस्थिती अशी आहे की शाश्वत तत्वज्ञान सांगणाऱ्या आपल्या संस्कृतीचा आणि पर्यायाने भगवद्गीतेचा अभ्यास जगभरात अनेक विद्वान करतात आणि इथे अनेक हिंदुंनाच गीतेमधे किती श्लोक आहेत ह्याचासुद्धा पत्ता नाही...! त्यात अगदी हिंदुत्वाचे डिंडिम वाजवणारे सुद्धा अनेक जण असतील !
आपला समाज आपल्याच अमूल्य तत्वज्ञानाकडे सोईस्कर दुर्लक्ष करतो हे आपल्या समाजाचे पर्यायाने देशाचे दुर्दैव ! एक रूढ़ असलेला गैरसमज म्हणजे हे वृद्धापकाळात वाचन करायचे तत्वज्ञान आहे; हा समज फ़क्त आपल्या हिंदू समाजातच रुजला आहे !
खरे तर तरुण वयातसुद्धा भगवद्गीते सारखा अनमोल मार्गदर्शक  ग्रंथ नाही हे निखळ सत्य आपण तरुणांनी समजून घेणे अत्यावश्यक आहे !
त्या दृष्टीने शाळा आणि कॉलेज जीवनात आणि नंतर सुद्धा भगवद्गीतेचा सार्थ* ग्रंथ अभ्यासल्यास आपल्या व्यक्तिगत आणि सामजिक अनेक समस्यांचे निराकरण सहज शक्य होईल !
केवळ ७०० श्लोक असलेला हा ग्रंथ आपल्या समाजाने अभ्यासणे हे भारताला उन्नतीकडेच नेईल हे निश्चित !
**
पुढल्या आठवड्यात ज्या संख्येने आवड,फॅशन म्हणून लाल टोप्या घातलेले छोटे आणि मोठे हिंदू बघायला मिळतील तितकेच किंबहुना त्याहुन जास्त भगवद्गीता वाचणारे अभ्यासणारे भारतीय जेंव्हा बघायला मिळतील तो सुदिन !
सण हवे ते साजरे करा पण आपल्या संस्कृतीची मुळं जिथे आहेत ती घट्ट राहतील हे सुद्धा बघणं आवश्यक आहे !
त्यात लज्जास्पद काहीही नाहीच उलट आपण गीता अभ्यासतो हे अभिमानाने सांगण्यासारखे आहे.
भगवद्गीतेचे लहानसे पुस्तक घेतल्यास त्यातही श्लोकाखाली संशिप्त अर्थ असतो आणि पुढे अभ्यासण्यासाठी विस्तृत अनेक विद्वांनाची विवेचने भाष्ये उपलब्ध आहेत !
भगवद्गीता संत ज्ञानेश्वरानी (ज्ञानेश्वरी) विस्तृतरूपात मराठी माणसासाठी लिहीली तशीच एका संस्कृत श्लोकाला एक मराठी श्लोक या साच्यात विनोबा भावे यांनी गीताई सुद्धा लिहीली !
अगदी शंकराचार्य आणि लोकमान्य टिळक या दोघांनी याच भगवद्गीतेवर  आपापली भाष्ये लिहिली आहेत ! लोकमान्य टिळकांनी तर आपली मंडाले येथील तुरुंगवासातील वेळ या गीतारहस्य लेखनासाठी उपयोगात आणला !
आपण भारतीयांनी हा अनमोल ठेवा अभ्यासला पाहिजे.. नित्य जीवनात तो आपोआपच उपयोगात येईल  !
गीताजयंती निमित्ताने भारतियांनी गीताभ्यास चालू केला गेला तर गीताजयंती आपोआपच साजरी होईल !
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दन: |
पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ||
(सर्व उपनिषदे ह्याच गाई, श्रीकृष्ण हाच त्यांचे दूध काढणारा, अर्जुन(आणि गीताभ्यास करणारे) हा ते दूध प्राशन करणारा भोक्ता (जणु वासरुच) आणि त्या गाईंचे दूध म्हणजे गीतारूपी अमृत.)
सर्वांना भगवद्गीता जयंती निमित्त शुभेच्छा !


हर्षद बर्वे.

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या