आज संकष्टी चतुर्थी
वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची माहिती संकलीत करण्याच्या उद्देशाने चालू केलेल्या या लेखन मालेच्या पाचव्या भागात आज आपण माहिती घेऊ सांगलीच्या पटवर्धन संस्थानच्या गणपतीची :-
सांगली संस्थानचे पहिले अधिपती कै.आप्पासाहेब पटवर्धन यांनी हे मंदिर इ.स. १८४३ साली बांधले. " श्री गणपती " हे सांगली संस्थानचे आराध्य दैवत असून सांगलीकर नागरिकांचेही श्रध्दास्थान आहे.
कृष्णा काठावर असलेले एक दुमदार गांव म्हणजे सांगली ! पूर्वीचं एक छोटे संस्थान असलेले हे गांव आज महानगरीत रूपांतरित झाले आहे. गांव मोठं झालं, त्यातील श्रध्दासुध्दा अधिक गतीने विकसित होत आहेत.
सांगलीचा इतिहास म्हणजे पटवर्धन संस्थानचा इतिहास ! पूर्वी सांगली तसं एक सर्वसामान्य गांवच होतं. पण पुढे पटवर्धन जहागिरीतून फुटून पहिल्या चिंतामणरावांनी सांगली येथे आपलं वेगळं संस्थान / राज्य १८०१ मध्ये निर्माण केलं. अन् त्याचा सर्वप्रकारांनी विकास घडवून आणला. सांगलीची त्यावेळची वस्ती एक हजार होती. आज काही लाखांत झाली आहे.
पटवर्धन घराण्याचं मूळ दैवत गणपती ! त्यामुळे संस्थान स्थापनेबरोबरच गणपती मंदिर बांधण्याची कल्पना साकारू लागली. मिरज संस्थानातून विभक्त होताना श्रीमंत आप्पासाहेबांजवळ ताम्र धातूची सिहांसनारूढ धातूची गणपतीची मूर्ती होती. ``संस्थान चांगल्या प्रकारे वृद्धिंगत होऊ देत. मी तुझी एका मंदिरात प्रतिष्ठापना करेन `` असा विश्वास या मूर्तीसमोर व्यक्त करून संस्थानची उभारणी सुरू झाली. सध्याच्या माळबंगल्यातील " स्वानंद भुवनाजवळ" गणपती मंदिर बांधण्याचे निश्चित झाले होते. पण तेथे पाण्याची कमतरता आहे हे दिसून येताच, पाण्याची मुबलकता असलेल्या कृष्णाकाठावर गणपती मंदिर स्थापण्याचे निश्चित झाले.
कृष्णानदीचा परिसर सुंदर ! पाण्याची मुबलकता ! पण नदीकाठावर नेहमी पुराचा धोका अन् गाळाची जमीन त्यामुळे मंदिराचे बांधकामात वेगळाच विचार करावा लागला. गाळ मातीवर मंदिर उभारणी करताना प्रथम खोलगट भाग वाळू आणि चुन्याने भरून काढला आणि प्रत्यक्ष मंदिराचे बांधकाम भक्कम अशा पायावर केले गेले. त्यामुळे पूर्वी सांगलीत पुराचे पाणी जरी शिरले तरी मंदिर उंचावर बांधल्यामुळे पुराचा धोका राहिला नाही.
संस्थान निर्मितीनंतर बरोबर दहा वर्षांनी म्हणजे १८११ मध्ये गणपती मंदिराच्या बांधकामास सुरूवात झाली. यापूर्वी गणेशदुर्ग या भुईकोट किल्ल्याचे बांधकाम १८०४-०५ मध्ये सुरू झाले असल्यामुळे बांधकाम साहित्याबद्दल चोखंदळपणे चौकशी झाली. नदीकाठावरील मंदिर भक्कम असावे यासाठी गणपती मंदिर बांधकामासाठी ज्योतिबाचे डोंगरावरून काळा कठीण दगड आणला गेला. मंदिर बांधकाम ३०-३२ वर्षांत झाले. गणपती मंदिराचे आवारात मध्यभागी प्रशस्त असे श्री गजाननाचे मंदिर बांधले असून बाजूला श्री चिंतामणेश्वर, चिंतामणेश्वरीदेवी, सूर्यनारायण आणि लक्ष्मीनारायण अशी चार मंदिरे बांधली आहेत. यामुळे या रम्य परिसरात ``गणपती पंचायतन``, असा सहसा न दिसणारा एक मनोहारी अविष्कार साकारला गेला आहे. या पाचही मंदिरातील देवांच्या मूर्ती शुभ्र संगमरवरी आहेत. पुण्याचे चिंतामण दीक्षित यांच्याशी विचार विनिमय करून मूर्तीबाबतचे सर्व तपशील, मूर्ती कशा असाव्यात ठरविण्यात आले. स्थानिक कारागीर, मुकुंदा आणि भिमाण्णा पाथरवट यांनी अतिशय कौशल्यपूर्णरीत्या मूर्ती साकारल्या. मूर्तीच्या सिंहासनासाठी सोने, चांदी, पंचरत्ने इ. मौल्यवान गोष्टी वापरल्या आहेत. १८४४ मध्ये चैत्र शुध्द १० शके १७६९ या दिवशी गणपती मंदिर `अर्चा ` समारंभ अतिशय थाटात संपन्न झाला. अनेक शास्त्री पंडितांना मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित केले होते. पाचही मंदिरात अतिशय धार्मिकतेने आणि राजवैभवाच्या दिमाखात मूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली. पूर्वी आप्पासाहेबांजवळ जी ताम्रमूर्ती गणेशाची होती तिचीपण शेजारीच स्थापना करण्यात आली. अशा प्रकारे गणपती मंदिराची स्थापना झाल्यावर राहिलेली कामे अधूनमधून चालूच होती.
८ मार्च १९४८ ला सांगली संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. यानंतरही दुसर्या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धनांनी मंदिराच्या सभामंडपाचे व भव्य अशा महाद्वाराचे काम पूर्ण केले.
गजानन मंदिरात अष्टखांबी विशाल सभा मंडप असून गणपतीचा गाभारा काळया गुळगुळीत ताशीव दगडापासून बनविलेला आहे. मंदिरात श्री गजाननासमवेत ऋध्दीसिध्दींनाही पूजेचा मान मिळालेला आहे. सभामंडपात मध्यभागात असंख्य लोलकांचे झुंबर आहे. सभोवताली हंड्या तसेच अनेक फोटो विराजमान झाले आहेत.
सांगलीकर राजेसाहेबांनी `श्री गणपती पंचायतन संस्थान ` हा खाजगी ट्न्स्ट स्थापन केला. या ट्न्स्ट मार्फत नित्यनेमाने व पारंपारिक पध्दतीने मंदिरातील सर्व पूजा अर्चा होत असते. मंदिरात रोज सकाळी काकडआरती, सूर्योदय व सूर्यास्तानंतर एक तासाने आरती, शेजारती आणि मंत्रपुष्प असतो. पहाटे चौघडा सनईचे साक्षीत गायन असते. प्रत्येक महिन्यात विनायकी चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, शिवरात्र, शुध्द सप्तमी, शुध्द अष्टमी, शुध्द चतुर्दशी या सहा तिथींना छबिना असतो. पूर्वी मंदिराकडे अठरा हत्ती होते.
एकूणच गणपती मंदिराचा परिसर अतिशय रमणीय असून पूर्वीपासून तेथे स्वच्छता अन् मंगलमय वातावरण असल्याने मंदिर अतिशय प्रसन्न वाटते. मंदिराचे भव्य प्रवेशद्वार, राजस्थानी लाल-गुलाबी पाषाणापासून साकारल्याने मंदिराची शोभा अधिकच वाढविते.
मधेच काही काळ मंदिराचा परिसर काहीसा उदासवाणा दिसू लागला होता. जुन्याची डागडुजी करून मंदिर पूर्वीच्याच श्रध्देने सर्वांना बोलावित होतं. २००२ वर्ष उजाडलं ! अन् मंदिराचे नव वैभव अधिक तेजाळून निघाले. श्रीमंत विजयसिंह पटवर्धन यांनी कार्यबाहुल्यातून वेळ काढून सांगलीकडे दृष्टिक्षेप टाकला अन् पाहता पाहता मंदिर नवतेजाने उजळू लागले. पूर्वीच्या जुन्या झालेल्या वास्तूत नवलाईचा हात फिरू लागला. जुन्या पडक्या झालेल्या इमारतीचे जागी नवीन बदल साकारू लागले. सर्व परिसरालाच एक नवं चैतन्य लाभले. आता संकष्टी आणि वर्षातील सर्व सण समारंभाचे वेळेस मुख्य मंदिरातील फुलांची आरास सर्वांंची नजर खेचून घेते. मंदिराच्या आवारात कापडी मंडप, छत, स्वच्छता, कामगारांची नियुक्ती आणि नारळ वाढविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था झाल्याने सभामंडप अधिक देखणा झाला आहे. दर्शनासाठी स्त्री - पुरूषांसाठी स्वतंत्र ओळी तयार केल्याने सर्वांनाच दर्शनाचा उत्तम लाभ होतो. सुविधा केल्या आहेत. मंदिराच्या आवारात पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय इ. सोयी असून रोज अन्न छत्र चालू केले आहे त्यामुळे गरजूंची चांगली सोय झाली आहे. सर्व मंदिराचे कळसाचे रंगकाम केल्याने मंदिराला नवरूप प्राप्त झाले आहे. तसेच दर्शनी भागात रंगीत कारंज्याची रोेषणाई अन् पुष्करणी निर्माण केल्याने पूर्वीचा हा काहीसा उदास वाटणारा परिसर नवतेजाने उजळून निघाला आहे. आवारात सुंदर बाग, पाठशाळा, हेरंब कार्यालय, अशा सुविधा पण आहेत. मुंबईतील सिध्दी विनायक मंदिर व बालाजी मंदिराप्रमाणे इंटरनेटवरून मागणी केल्यास दर्शन, प्रसाद इ. सुविधा पुरविण्याचा ट्न्स्ट विचार करीत आहे.
पूर्वीपासूनच गणपती मंदिर हे सर्व जातीच्या लोकांना आपले श्रध्दास्थान वाटत असल्याने, मंदिराचा झालेला कायापालट पाहून सर्वांनाच आनंद होत आहे.
---प्रा. सौ. सरोज गोळे, विश्वस्त ज्ञानदीप फौंडेशन, सांगली
---- संकलन अमोल