विशाखा फाटक , पुणे यानी लिहिलेले माऊलीच्या पालखी सोहळ्याचे वर्णन इथे देत आहे . वाचता वाचता आपण ही या सोहळ्याशी एकरूप होऊन जातो. आपणास ही आवडल्यास अवश्य कळवा
ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम
ज्ञानेश्वर माउली ज्ञानराज माउली तुकाराम
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
अखंड सुरु असलेल्या हरी नामाच्या गजरात आम्ही सामील झालो
हे तिसरं वर्षं... मी आणि माझी मैत्रीण जमेल तशी वारी करतोय, एकाच वर्षी आळंदी पासून पंढरपूर पर्यंत नव्हे, पण वारीतला एक एक टप्पा... शनिवार रविवारी असेल तोच टप्पा करायचा असं ठरवलं होतं... आणि योगायोग पहा पुढचे पुढचे टप्पेच आले...
२०१४ ला आळंदी पुणे झालं, २०१५ ला पुणे सासवड चाललो आणि या वर्षी सासवड जेजुरी...
माऊलींच्या कृपेने जण्यायेण्याची सोय अगदी उत्तम झाली , सासवड बस स्थानकापर्यंत गाडीने आलो...
सहा वाजले होते... काही दिंड्या निघाल्या होत्या ... आम्हीही त्यांच्याबरोबर चालू लागलो...
पहाटे ३.३० ला उठले तेव्हाही जोरात पाऊस पडत होता .. नवऱ्याने एकदा काळजीपोटी म्हणून पाहीलं कि cancel झालंय का बघ... पण माझ्या प्रबळ इच्छेपुढे तो बिचारा गप्प बसला...
सासवडला उतरलो गाडीतून तेव्हाही पाऊस होताच... पण अजिबात raincoat ना घालता , डोक्यावर टोपी ना घालता आम्ही चालायला सुरवात केली...
रस्त्याच्या एका बाजूने वारकरी आणि दुसऱ्या बाजूला दिंड्यांचे ट्रक... आम्ही त्यातच सामावून गेलो... पाऊस असल्यामुळे सगळे वारकरी ईरलं घेऊन चालत होते.. डोक्यावर सामानाचं बोचकं आणि त्यावरून ईरलं घेऊन ते भराभरा चालत होते.. आणि खोटं वाटेल किंवा अतिशयोक्ती तरी वाटेल पण शंभर जणांनी तरी विचारलं असेल आम्हाला कि माउली मेणकापड घ्यायचं कि... माउली डोक्यावर तरी काहीतरी घ्यायचं... सर्दी पडसं होईल डोकं भिजलं तर...
हे ना ओळखीचे ना नात्याचे.. पण सगळे इतके मायेने .. आपुलकीने विचारत होते... सगळ्यांना उत्तर देत होतो कि आम्ही एकच टप्पा करणार आहोत ... त्यामुळे भिजत जायचा आनंद घेतोय...
पण यामुळे खूप जणांशी संवाद झाला... थोड्या थोड्या गप्पा मारून आम्ही पुढे जात होतो.
पावसापेक्षाही आम्ही आनंदात, मायेत जास्त भिजत होतो...
बघावं तिकडं माणसंच माणसं... माणसांचा समुद्र... वारकऱ्यांच्या या ओळीची ना सुरवात दिसत होती ना शेवट... सगळे पांढऱ्या कपड्यातले वारकरी... या वर्षी रंगीत इरल्यांमुळे झाकले गेले होते... पांढरी पिवळी लाल चंदेरी सोनेरी... रंगीबेरंगी इरली... खूप मस्त दृश्य होतं हे...
गळयात तुळशी माळ, हाती टाळ... मुखाने हरिनाम म्हणत , भजनं म्हणत एक एक टप्पा पार करत त्या पंढरीच्या सावळ्या विठुच्या दर्शनाच्या ओढीने चालले होते... आम्ही मारे अगदी बूट मोजे सॅक असा जामानिमा करून चालत होतो.. आणि मधेच पाय दुखल्याची जाणीव होऊन विव्हळत होतो, पण हे लोक मात्र फाटक्या तुटक्या चप्पल घालून... काहीजण तर अनवाणी सुद्धा चालत होते.. गात- नाचत होते... फुगड्या खेळत होते... निर्मळ हास्य न प्रेमळ डोळे... कुठून आणत असावेत हे एवढं चालायचं अन वर नाचायचं बळ?
सगळे जण हसत मजेत एकमेकांची चेष्टा करत , अभंग ओव्या म्हणत चालत होते, ना पुढे जाण्याची घाई ना मागे उरल्याची खंत... नाही कुठे धक्काबुक्की ना चेंगराचेंगरी... काही बायकांच्या डोक्यावर छोटसं तुळशी वृंदावन.. प्रत्येक दिंडीचे आपापले झेंडे सुद्धा होते बरं का... सगळे भगवेच पण त्या झेंड्यांवर खुणेसाठी काही तरी लावलं होतं.. आंबा चंदन अशा झाडांच्या छोट्या डहाळ्या, काहींनी तर फुगेच लावले होते...
आम्हाला पालखीचं दर्शन काही झालं नाही पण चराचरात परमेश्वर असल्याची खूण मात्र पटली... अवघा परिसर विठ्ठलमय झाला होता... वाटेतले गावकरी सुद्धा हात जोडून माउली चला खाण्याची सोय केलीय असं सांगून बोलावत होते.. कुणी चहा कुणी पोहे- खिचडी... असं देत होते... वाटेतल्या राहुट्यांमध्ये तरुण मुलं सेवा म्हणून वारकऱ्यांचे पाय चेपून देत होते... काही सेवाभावी संस्थांच्या गाड्या औषध वाटप करत होत्या...
ज्याच्यात्याच्यात विठ्ठल दिसत होता, त्यामुळे पालखीचं दर्शन न झाल्याची हळहळ/ खंत जरादेखील वाटली नाही...
गेल्या दोन वर्षी कडक ऊन आणि यंदा मुसळधार पाऊस, दोन्हीतही समान श्रद्धा आणि विठ्ठल भेटीची समान ओढ वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती...
यांचे ट्रक पुढे जाऊन जेवणाची तयारी करत होते...
निघताना १८ किलोमीटर चालायचं असं माहित होतं पण प्रत्यक्ष आम्ही फक्त एक एक पाऊल चालत गेलो आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर झालं तरी कळलं पण नाही... मग थोडं थांबून चहा घेतला... एरवी mall मध्ये चालून पण पाय दुखतात पण इथे या भाविकांच्या मेळ्यात चालताना हे अंतर कधी पार केलं ते खरच कळलं पण नाही...
असे दोन चहाचे break घेत ,
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई
एकनाथ नामदेव तुकाsssराम
असं म्हणत म्हणत , टाळ्या वाजवत आम्ही बानू-खंडेरायाच्या जेजुरीत पोचलो पण...
लांबूनच गडावरच देऊळ दिसत होतं.. खुणावत होतं... पण इतकं चालून गेल्यावर आपण वर चढू शकू का याची जरा शंकाच वाटत होती... पण सगळ्यांच्या बरोबर वर जायचं ठरवलं आणि गेलो कि साडेतीनशे पायऱ्या चढून... आणि काय सांगावं माउली , चढ उतार केल्यावर चालून चालून दुखत असलेले पाय थांबले कि दुखायचे...
पावसामुळे सगळे डोंगर हिरवे झालेच होते पण वर डोंगरावरून दिसलेलं दृश्य जास्त सुंदर होतं.. अवर्णनीय होतं... भंडाऱ्यामुळं जेजुरी सोन्याची अन पावसामुळे डोंगर पाचूचे दिसत होते... दूरवर वावरात वारकऱ्यांच्या राहुट्या घातलेल्या दिसत होत्या, ढग खाली उतरलेले भासत होते...
घरी ओले मोजे मी इस्त्री करून वाळवले होते हे आठवून गंमत वाटली...
सासवडच्या अलीकडेच २ किलोमीटर चालायला सुरवात केली होती... १८ km चा टप्पा, जेजुरी ला पायर्यांपर्यंतचे अंतर आणि बेलसर फाट्याला गाडी येणार होती ... ते उलट चाललेलं अंतर अंदाजे ४ km, असं एकूण २६ किलोमीटर पावसात भिजत चालल्यावर सगळे कपडे मोजे आणि बूट अगदी चिंब भिजले होते...
आणि मन सुद्धा!
पायी चालण्याची मौज भारी
वारकरी बनण्याची गंमत न्यारी
आयुष्यात अनुभवावी एकदातरी
माउलीसंगे आषाढवारी 🏼
विशाखा फाटक
पुणे
For blog article on whatsapp contact on 9819830770