.
.
'ज्योतिष पदवीसाठी' प्रवेश घेऊ इच्छिणा-या अभ्यासकास माझ्याकडून एक पत्र: -📝
ज्योतिष पदवी आता घेता येईल अशी आशा निर्माण झाली असली , अजून अभ्यासक्रम काय आहे , काय काय विषय समाविष्ट होणार याबाबत अजून विस्तृत माहिती नसली , नेहमीप्रमाणे विषय समजवून न घेताच अनेक संस्था विरोधासाठी उभ्या ठाकल्या असल्या, तरी या विषयात पदवी घ्यायची तुझी इच्छा झाली याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन 💐
ज्योतिष या विषयाची व्याप्ती एवढी प्रचंड आहे की दोन वर्षाच्या अभ्यासक्रमात आपण जेवढे ज्ञान घेऊ ते कमीच असणार आहे आणि हे मनात सुरवातीपासूनच पक्के ठेवावेस असे सांगावेसे वाटते .
खगोल शास्त्र , गणित , विज्ञान यातील अनेक सिध्दांत शिकून जेव्हा तुला पदवी मिळेल ती मात्र ' आर्ट'/ किंवा 'कला' शाखेची ( MA ) . ही गोष्टच मला विशेष वाटते आणि या शास्त्रासंबंधीचे अगदी संक्षिप्त वर्णन करायला पुरेसी ठरते .
असं म्हणतात की " सुखी सोनाराकडे आणि दु:खी ज्योतिषाकडे " . तेव्हा आपल्याकडे आलेल्या जातकाची मुळातच मनस्थिती ठीक नसते . अशावेळी मार्गदर्शनासाठी आलेल्या जातकाची अडचण समजवून घेणे ,संभाषणातून त्याला बोलते करणे ही एक कला आहे आणि यात प्राविण्य मिळवणे तसे सोपे नाही . अर्थात येणारा जातक इतके ज्योतिष असताना आपल्याकडेच येणे ही पण एक नियतीची योजना असते . कारण त्यावेळी त्या जातकाला भेडसावणा-या प्रश्नाचे योग्य उत्तर ( होकारार्थी किंवा नकारार्थी जे प्रत्यक्षात घडणार असेल ते ) आपणच योग्य प्रकारे देऊ शकणार असतो. तो जातक ही ज्या ग्रहस्थितीवर येतो , त्यावेळची ग्रहांची स्थिती प्रश्नाचे उत्तर शोधायला मदत करत असते. अर्थात हे सगळे तू शिकशीलच.
आणखी एक महत्वाची गोष्ट जस जस अधिक अधिक पत्रिका सोडवायला लागशील तसतस तुझ्या लक्षात येईल की पत्रिकेतील ग्रह ही आपल्याशी बोलत असतात. अर्थात ते सांकेतिक भाषेत. ती भाषा अवगत करणे ही पण एक ' कला आहे ' . पत्रिकेत दिसताना फक्त १२ राशीत , १२ स्थानात , १२ ग्रह असले तरी ग्रहांची एकमेकांशी असलेली केमेस्ट्री , कुणाची युती, कुणाची आघाडी , कोण कुणावर लक्ष ठेऊन आहे ? कोण कुणाच्या घरात भाड्याने आहे , वरवर न दिसणा -या नवमांश कुंडलीत हेच ग्रह कशा पध्द्तीने भूमिका पार पाडत आहेत , पत्रिकेतील निर्णायक घटक कोणता , वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात कोणता ग्रह महत्वाचा ठरणार हे सगळं
' कले कलेने' तुझ्या लक्षात येईलच.
तुझा जातक तुझ्याकडून योग्य मार्गदर्शन घेऊन समाधानाने जाऊन तू त्याच्यासाठी "फॅमिली ज्योतिष" होशील या सदिच्छा
हे शेवटचं सांगणं.वेळोवेळी तुला अनेक गोष्टीकडे दुर्लक्ष करावे लागेल. त्या गोष्टी कुठल्या हे मी तुला आता सांगणार नाही कारण त्या गोष्टींचा तू स्वतः सामना करून अनुभसिद्ध व्हावेस आणि अशा प्रसंगाला तोंड देण्यास तू खंबीर व्हावेस असे मला वाटते.
आता तुझ्या मनात आलेला सगळ्यात महत्वाचा प्रश्न. मी कोण हे सगळं लिहिणारा ?
तर मित्रा मी पण एक ज्योतिषी अभ्यासकच. आजपर्यत तरी कुठलीही ज्योतिष उपाधी/ पदवी नसणारा .
थोडक्यात मी जरा
' लिटील - जास्त - अभ्यासक ' तुझ्यापेक्षा
आता ते लिटिल चँम्प डायरेक्ट परीक्षक बनू शकतात तर
एवढा सल्ला देऊच शकतो ना भौ मी तूला 😜
( अजूनही लिटिलच पण चॅम्प नसणारा ज्योतिष अभ्यासक ) अमोल केळकर 📝
ज्येष्ठ कृ.पंचमी
२९ जून २१