November 19, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १९ नोव्हेंबर २०१४

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १९ नोव्हेंबर २०१४

भगवंताजवळ काय मागावे ? 

 



परमात्मा कसा असतो म्हणून विचारले तर काय सांगता येईल ? तो तर नाम, रूप आणि गुण यांच्या अतीत आहे; म्हणून, आपल्या भावनेने जसा पाहावा तसा तो आहे असे सांगता येईल. म्हणजेच, सर्व काही आपल्या भावनेवर आहे. आपण त्याच्याजवळ काहीही मागितले तरी तो द्यायला तयार असतो. आपण विषय मागितले तर तो देत नाही असे नाही, पण त्याबरोबरच त्याचे फळ म्हणून सुखदुःखेही आपल्याला भोगावी लागतात. म्हणून, काही मागायचे झाले तर ते विचार करून मागावे. एक गृहस्थ दमून एका झाडाखाली बसला. ते झाड कल्पवृक्षाचे होते. तो सहज म्हणाला, 'इथे आता मला पाणी मिळाले तर फार बरे होईल.' असे म्हणताच त्याला पाणी मिळाले. पुढे, 'आता काही खायला मिळाले तर बरे.' असे म्हणताच त्याला खायला मिळाले. त्यावर, त्याला विश्रांती घ्यावीशी वाटली, आणि तसे म्हणताच त्याची निजण्याची सोय झाली. पुढे त्याला वाटले की आता इतके सर्व मिळाले, तेव्हां इथे माझी बायकोमुले असती तर मजा आली असती; असे म्हणताच ती तिथे आली. एवढे झाल्यावर त्याला वाटले, ' आपण जी इच्छा केली ते सर्व मिळाले. तर आता इथे मरण आले तर--' असे म्हणताच तो मरण पावला ! म्हणून काय, की विषय मागत गेले तर त्यापासून विषयच वाढत जातात. तेव्हां, ज्यापासून आपले कल्याण होईल असे मागावे. एका भिकार्‍याला राजा म्हणाला की, 'तुला काय मागायचे असेल ते माग.' त्याने आपल्याला पांघरायला घोंगडी मागितली. मागितले असते तर अर्धे राज्यही द्यायला तो राजा तयार होता, त्याच्यापाशी त्याने यःकश्चित् घोंगडी मागितली. समर्थ द्यायला भेटल्यावर त्याच्याजवळ काय मागायचे हे नीट विचार करून मागावे. म्हणूनच, भगवंतापाशी त्याच्या भक्तिची याचना करावी; ही मागितल्याने आपल्याला समाधान मिळते, आणि दुसरे काही मागण्याची इच्छा होत नाही.
भगवंताचे अवतार कसे झाले आहेत ? तर भक्तांकरिताच देवाला अवतार घ्यावे लागले आहेत. अवतार घेतल्यावर नुसते भक्तांचेच काम होते असे नाही, तर त्यामुळे इतरांनाही 'देव आहे' ही भावना निर्माण होते. आपण त्याला शरण जाऊन त्याचे होऊन रहावे, म्हणजे आपल्याला मग इतर कोणत्याही बाबतीत काळजी करण्याचे कारण उरत नाही. भगवंत हा अत्यंत दयाळू आहे. लोखंडाने परिसाला मारले तरी त्याचे सोनेच बनते. त्याप्रमाणे, भगवंताने भरताला भाऊ म्हणून तारला, बिभीषण शरण आला म्हणून त्याला तारला, आणि रावणाला शत्रू म्हणूनही तारला; पण त्याने सोडले कुणालाच नाही. असा भगवंत जोडायला नामाशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही.



३२४. भगवंताच्या नामाशिवाय मला काहीच कळत नाही, असे ज्याला कळले त्यालाच सर्व कळले.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या