श्री गणेशाय नम :!
आज संकष्टी चतुर्थी
वेगवेगळ्या ठिकाणच्या गणेशाची माहिती संकलीत करण्याच्या उद्देशाने चालू केलेल्या या लेखन मालेच्या तिस-या भागात आज आपण माहिती घेऊ हेदवी ( गुहागर ) येथील गणपतीचे .
( यापूर्वीचा ' तासगावचा गणपती ' वरचा लेख इथे वाचू शकाल
पेशवे काळातील हेदवी येथील गणपती मंदिर वेळणेश्वरापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे . मंदिर हे एक टेकडीवर वसले असून गाडिने थेट तेथपर्यंत पोहचता येते पूर्वी हे गाव जास्त प्रसिद्ध नव्हते मात्र दहा हात असलेली सुंदर व दुर्मिळ अशी संगमरवरी मूर्ती व नवसाला पावणाऱ्या या गणेशाच्या दर्शनासाठी येणारे गणेशभक्त आणि पर्यटक यांच्यामुळे हा परिसर आता गजबजू लागला आहे.
श्री दशभुज गणेशाचे हेदवी गावात आगमन कसे झाले त्याबद्दल असे सांगण्यात येते कि, पेशवेकाळात केळकर स्वामी नावाचे एक गणेशभक्त येथे राहत होते. त्यांनी पेशवे यांची पुणे येथे भेट घेतली. केळकर स्वामींनी पेशव्यांच्याबाबतीत वर्तविलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे पेशव्यांनी त्यांना मंदिराच्या उभारणीसाठी त्याकाळी १ लाख रुपये दिले. त्या पैशातून केळकर स्वामींनी हेदवी येथे हे मंदिर उभारले. मंदिरातील मूर्ती हि काश्मीरमधील पांढऱ्या पाषाणापासून घडवलेली आहे. मूर्तीला दहा हात असून उजव्या बाजुला पहिल्या हातात चक्र, दुसऱ्या हातात त्रिशुळ, तिसऱ्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या हातात महाळुंग नावाचे फळ आहे. डाव्या बाजुच्या पहिल्या हातात कमळ, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात निलकमळ, चौथ्या हातात दात व पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. मूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धीपैकी एक सिद्धलक्ष्मी बसलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंडेमध्ये अमृतकुंभ धरलेला आहे. या गणेशमूर्तीची उंची साडेतीन फूट आहे व ती एका मोठ्या आसनावर विराजमान झालेली आहे. मूर्तीचे डोळे काळेभोर असून अत्यंत रेखीव आहेत. मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतले असता ती आपल्याकडेच पाहत आहे असे भासते. गळ्यात नागाचे जानवे परिधान केलेली अशी हि दशभुजा गणेश मूर्ती फक्त नेपाळ मध्येच पाहावयास मिळते असे म्हटले जाते.
अशी हि भक्तांच्या हाकेला धावणारी वैशिष्यपूर्ण मूर्ती संपूर्ण भारतात एकमेव आहे. अशा प्रकारच्या शस्त्रसज्ज मूर्ती पुजायचा अधिकार केवळ सेनेचे अधिपत्य करणाऱ्यानाच असतो असा पूर्वापार संकेत आहे. त्यामुळे पेशवेकाळात अशा मूर्त्या फार कमी तयार केल्या गेल्या. मंदिराच्या उजव्या कोनाडयात असलेली लक्ष्मी विष्णुची मूर्ती हि विशेष रुपातली आहे. मूर्तीच्या बाजुला जय-विजय असून मूर्ती गरुडारुढ आहे. याचा अर्थ असा कि श्री विष्णू भगवान भक्ताची हाक ऐकताच त्याच्या मदतीला जाण्यास सिद्ध आहे. टप्याटप्याने जिर्णोद्धार करण्यात आलेल्या या मंदिरात भाद्रपद व माघी गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. दर संकष्टी व विनायक चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी असते.
संकलीत माहिती : मायबोली संकेतस्थळ ( लेखक - भ्रमर )
संकलन : अमोल केळकर