April 21, 2017

श्रध्देचे व्यवस्थापन

श्रध्देचे व्यवस्थापन   हा श्री. श्रीकांत कुलकर्णी  यांनी लिहिलेला  शेगाव संस्थानवरचा एक छान लेख त्यांच्या परवानगीने  आहे तसा ' देवा तुझ्या द्वारी आलो' या  अनुदिनीवर देत आहे .
त्यांना अनेक धन्यवाद 


श्रध्देचे व्यवस्थापन करणारे विश्वस्त

“मी महाराजांची पोथी वाचते आणि तुला महाराज बोलावतात. हे काय चाललं आहे?” बायकोला कामानिमित्त मी शेगावला जाणार आहे, असे सांगितल्यावर तिने सात्विक राग व्यक्त केला. मग म्हणाली “जा जा तुम्हाला महाराज बोलावतायत दर्शन करून या.” क्षेत्राच्या ठिकाणी बोलावणे यावे लागते, ही मनाची घट्ट धारणा. अर्थात या समजुतीला चॅलेंज करण्यात काहीही अर्थ नसतो. व्यवसायात देखील कस्टमर शोधता शोधता दमछाक होणारे आपण, जर कस्टमरने आपण होऊन बोलावले तर त्यासारखे भाग्य नाही असे समजतोच की. व्यवसायात असे भाग्य नेहमी नेहमी मिळत नाही पण क्वचित आणि अवचित घडून येते. इथे तर  श्री. संत गजानन महाराज इंजिनीरिंग कॉलेजने आम्हाला आमचं software घेण्यासाठी बोलावले आणि त्यातच महाराजांचे दर्शन हा अलभ्य लाभ. दुधात साखर म्हणा वा सुनेपे सुहागा म्हणा पण हा योग जुळून आला होता. हा योग जुळून आला श्री.उमेश कौल या महाराजांच्या भक्तामुळे. त्यांची ७-८ महिन्यांपूर्वी अशीच अवचित ओळख झाली. एका Multinational मध्ये उच्चपदस्थ असलेले उमेश कौल महाराजांचे नावाने स्थापन झालेल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या १९८७च्या पहिल्या batchचे विद्यापीठात पहिले आलेले विद्यार्थी. काश्मीरमध्ये मूळ असलेले कौल पूर्ण महाराष्ट्रीय झालेत. शेगांवशी ऋणानुबंध जुळले. SAP या जगप्रसिद्ध software प्रणालीचे तज्ञ असलेले आणि त्या निमित्त जग फिरलेले कौलसाहेब महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात आणि इथे वारंवार येण्यासाठी संधी मिळावी म्हणून त्यांनी स्वत:ला कॉलेजशी आणि गजानन महाराज संस्थानशी जोडून घेतले आहे. त्यांच्या या भेटीचा योग त्यांचेच एक सहकारी श्री.मिलिंद निघोजकर यांच्यामुळे आला त्यांची ओळख देखील अगदी अलीकडची. तर या दर्शनाचा योग येण्याच्या मागच्या योगायोगाची ही कहाणी. आयुष्यातील काही चांगले योग देखील योगायोगाने घडून येतात हे मान्य करावेच लागेल. असो. हा लेख लिहिण्याचा उद्देश केवळ महाराज दर्शनयोग नसून एक अतिशय उत्तम इंजिनीरिंग शिक्षण संस्था व देवस्थान संस्थान बघावयास, अनुभवयास मिळाले हा आहे.   
वर उल्लेख केलेल्या कौलसाहेब यांनी संस्थेचे विश्वस्थ श्री.श्रीकांत पाटील यांची शनिवारची वेळ घेतली.  मी स्वत:, निघोजकरसर, कौलसाहेब आणि magic softwareचे नितीन भोसले यांनी शेगांवला शुक्रवारी दुपारी २ वा प्रयाण केले व मजल दर मजल करत रात्री ११चे दरम्यान कॉलेजच्या गेस्टहाउसवर पोहचलो. एव्हड्या रात्रीदेखील गेस्टहाउसचा स्टाफने मनापासून स्वागत केले. जेवण तयारच होते. फ्रेश होऊन जेवण घेतले आणि आपापल्या गेस्टरूममध्ये विश्रांती घेतली. एखाद्या कॉलेजचे गेस्टहाउस इतके स्वच्छ, सुंदर आणि  सुविधायुक्त असेल हा विश्वासच बसणार नाही. पण ९ तासाचा अखंड प्रवासाचा शिणवटा आल्याने आणि रूम AC असल्याने  लगेच झोपलो. म्हटले सकाळी बघू काय आहे ते. पहाटे सहा वाजतातच सातभाईंच्या कलकलाटाने जाग आली. म्हणून बाहेर आलो. २०-२५ सातभाई जमिनीवर उड्या मारताना दिसले. एकदम त्यांना काय वाटले कुणास ठाऊक सगळे ओरडत उडाले आणि झाडावर जाऊन बसले. फक्त पाच मिनिटेच काय ते स्थिरावले तोच परत कोलाहल करत जमिनीवर आले. उड्यामारणे सुरु झाले परत झाडावर बसले. झाडावर मग जमिनीवर असा १०-१५ वेळा हाच उद्योग चालला होता. मी मनापासून बघत होतो. असे करण्याचा त्यांचा काय उद्देश असेल हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पण काही हाती आले नाही. बहुदा तो त्यांचा खेळ असावा किंवा उगवत्या सूर्याचे स्वागत करण्याची त्यांच्यातली पद्धत असावी. पुण्यात सकाळी उठल्याउठल्या जी व्यवधानं सुरु होतात पक्षी बघायला कुठे वेळ आणि सातभाई तर पुण्यात दुर्मिळच झाले आहेत. गेस्ट हाउसच्या लाउंजमधून पक्षी बघता बघता हातात न मागता चहाचा कप आला. स्वर्गीय सुख म्हणजे काय ते हेच.
चहा घेऊन कॉलेजच्या आवारात एक चक्कर मारली. ४६ एकरांचे प्रचंड आवार. जागोजागी अतिशय जाणीवपूर्वक लावलेली आणि जोपासलेली विविध झाडे. सिमेंटचे उत्तम आणि रुंद रस्ते. संताची नावे दिलेल्या वेगवेगळ्या विभागाच्या इमारती. संत श्री गुलाबराव महाराजांच्या नावाने असलेली लायब्ररीची प्रचंड मोठी इमारत. पलीकडे उत्तम जोपासलेली हिरवळ असलेले क्रिकेटचे मैदान. टेनिस, व्हॉलीबॉल इत्यादीची अतिशय सुव्यवस्थित राखलेली मैदाने, संत रामदासांच्या नावे असलेले भव्य इनडोअर स्टेडीयम. १२०० खुर्च्यांचे एक आणि ४०० खुर्च्यांचे एक अशी दोन Auditoriums. डोळ्यांना सुखावणारी इमारतींची रंगसंगती. हे सगळं सकाळच्या फेरीत बघून घेतले. कॉलेजचे वेगळेपण जाणवले. ८ वाजता फिरून परत गेस्ट हाउसला आलो. कॉलेजचे एक जुने विद्यार्थी जे तिथेच उतरले होते त्यांची ओळख झाली. AIRTEL मध्ये अधिकारी असलेले मनीष कामानिमित्त अमरावतीस आले होते, या भागात आले की, इथे महाराजांचे दर्शन आणि कॉलेजला भेट देणे हा आवडीचा कार्यक्रम. इथे आले की मनास समाधान मिळते असे म्हणाले. त्यांचे सहाध्यायी असलेल्या श्रीकांत पाटलांना भेटून आणि श्रीदर्शन घेऊन मुंबईस जाणार होते. व्हरांड्यात सर्वजण जमले. तेव्हड्यात विश्वस्त श्री.श्रीकांत पाटील आले. ओळख करून देण्याचे सोपस्कार झाले. ते स्वत: याच कॉलेजचे विद्यार्थी आणि गजानन महाराज संस्थानाचे मुख्य विश्वस्त श्री शिवशंकर पाटील यांचे धाकटे चिरंजीव. अतिशय साधे, पण बोलके आणि अभ्यासू व्यक्तिमत्व. आमचे स्वागत करून आमच्या दिवसभराच्या आमच्या रुपरेखेची कल्पना दिली. ब्रेकफास्ट झाल्यावर कॉलेजची गाडी आणि संजय हा वाटाड्या बरोबर दिमतीला दिला आणि मंदिराकडे प्रयाण केले. मंदिरात सकाळपासूनच गर्दी होत असल्याने गर्दी व्यवस्थापन करणारे सेवक कार्यरत होते. संजयमुळे आम्हाला महाराजांचे दर्शन अतिशय सुलभ झाले. बाहेर देणगी स्वीकारणारे वेगवेगळे Counters होते. उत्साही उमेश कौल संस्थानविषयी भरभरून माहिती पुरवत होते. २००६ पासून संस्थानचे आर्थिक आणि इतर व्यवहार SAP या software प्रणालीशी जोडलेले आहेत. जगातले श्री गजाननमहाराज संस्थान हे अशी software प्रणाली वापरणारे पहिले NGO. संस्थानचे व्यवहार चोख आणि पारदर्शक असावेत म्हणून मुख्यविश्वस्त श्री शिवशंकर पाटील यांनी ही प्रणाली बसवून घेतली. मी पण देणगी देऊन रीतसर computerised पावती घेतली. आपल्याला पुण्यात संगणकावर काम करणारे कोट टाय घालून दिसतात. मंदिराच्या अकौंटस विभागात साधा पांढरा शर्ट, लेंगा व टोपी घातलेले अनेक कर्मचारी SAP प्रणालीवर काम करताना दिसत होते. हे चित्र डोळ्यांना जरा वेगळे दिसले. श्रीदर्शन झाल्यावर पुन्हा कॉलेजमध्ये आलो. छोट्या सभागृहात २५०-३०० विद्यार्थी जमले होते. नितीन भोसलेंनी तिथे जमलेल्या IT व computer विषयाशी संबधित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना Magic software या प्रणालीविषयी दीड तास माहिती दिली. हे सर्व करताना एक इतर कॉलेजमध्ये अभावाने आढळणारी शिस्त तिथे अनुभवत होतो.
प्रेझेन्टेशन झाल्यावर विश्वस्त श्री. श्रीकांत पाटील आणि प्रिन्सिपॉल डॉ.सोमाणी यांनी कॉलेजचे वेगवेगळे विभाग दाखवले. १ लाख पुस्तके आणि ७०० मुले एकावेळी बसू शकतील एव्हडी मोठी लायब्ररी इथे आहे. या लायब्ररीची इमारत इकोफ्रेंडली आहे. बाहेर कितीही उन्हाळा असला तरी आत नैसर्गिक गारवा राहील याची व्यवस्था केलीय. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संख्येने लायब्ररीचा वापर करतात. विविध विषयांची टेक्नीकल मासिके, catelog इथे उपलब्ध आहेत. IT व computer विभागात संस्थेचे आणि संस्थानचे web server, SAP servers आहेत. बाराही महिने आणि २४ तास कॉलेज व्यवस्थापन स्वत: त्यांची निगा राखते. संस्थानचा पैसा म्हणजे भक्तांचा पैसा ही धारणा असल्याने प्रत्येक बाबतीत स्वनिर्भर राहण्याचा प्रयत्न दिसून आला. महागडी AMC देण्यापेक्षा शिक्षकांनी स्वत:च शिकून घेणें cost effective ठरते याची जाणीव प्रत्येकास आहे. विदर्भात कमालीची उष्णता असल्याने प्रत्येक इमारतींच्या उभारणीत आत नैसर्गिकरीत्या गारवा राहील अशी व्यवस्था केली आहे. विश्वस्थ श्रीकांत पाटील यांनी प्रत्येक ठिकाणी अभ्यासपूर्वक संस्थेची उभारणी केली आहे हे जाणवते. विदर्भासारख्या भागात चांगले शिक्षक यावेत यासाठी कॉलेजच्या आवारातच त्यांना सहकुटुंब राहता येईल अशा क्वार्टर्स बांधल्या आहेत.
उत्तम उद्योजक निर्माण करण्यासाठी कॉलेजनेच स्वत:चे भव्य Incubation center काढले आहे. अतिशय देखणे असे हे सेंटर सर्व अत्याधुनिक सुविधायुक्त आहे. इथे नवउद्योजकास जागेपासून संशोधनाच्या सर्व सोयी दिल्या जातात. यासाठीचा सर्व खर्च संस्था आपल्या अंगावर घेते. संशोधन पूर्ण झाले तर उद्योजकास मार्केटिंगसाठी देखील मदत करते. तो लवकरात लवकर स्वनिर्भर होईल हे बघते. या ठिकाणी सोलर सिस्टीम वर संशोधन करून अनेक उत्तमोत्तम Products बनवली आहेत जी ग्रामीण भागात सहज वापरली जाऊ शकतात. यात सोलर lighting, सोलर पंप अशी अनेक products आहेत. ५-६ तरुण उद्योजक त्यांचे संशोधन इथे करत असताना दिसले. Mechanical विभागात २५ CNC machine simulators बसवले आहेत. हे simulators खास अमेरिकेतून आणले आहेत. याविभागात साधारण १० वी-१२ वी पास मुलांना CNCचे ट्रेनिंग दिले जाते. अशी ३५०० मुले शिकून तयार केली आहेत. त्यातील ७०% मुलांना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. इथेच एक workshop आहे. तिथे प्रेस्ड पार्टस साठी लागणारे डाय बनवले जातात. अशा प्रकारच्या डाय बनवण्यासाठी अत्यंत काटेकोरपणा लागतो. हे त्या विषयातील तज्ञ मंडळींना माहित असते. ह्या सुविधेचा फायदा अनेक मोठे उद्योग घेतात. हे सर्व विद्यार्थ्यांकडून करून घेतले जाते. इतर कॉलेजमध्ये शिक्षण-उद्योग नात्याची केवळ चर्चा होते. इथे ते प्रत्यक्षात आणले आहे, ते देखील पुण्या-मुंबईपासून दूर आडजागी. अभियांत्रिकी पदवी व्यतिरिक्त गरीब व कमी शिकलेल्या मुलांसाठी कुशलता निर्मिती हा मोठा कार्यक्रम कॉलेज व्यवस्थापन चालवते. कॉलेजमधील सुविधा इंजिनीरिंगच्या मुलांसाठी असल्या तरी, त्या वापरून इतर गरीब मुलांचा स्तर कसा उंचावता येईल हे विश्वस्त या नात्याने श्री पाटील  स्वत: बघतात. कॉलेजचे आवर फिरताना मुले मुली मोकळेपणाने हिंडत होती पण कुठेही पुण्यामुंबईत दिसणारा पोशाखी वाह्यातपणा दिसला नाही. हे वेगळेपण मुद्दाम नमूद करणे जरुरी आहे.  
दुपारी श्रीकांत पाटील यांच्याशी पुन्हा मीटिंग झाली. त्यात त्यांनी आमच्या software मधील बारकावे समजून घेतले. अतिशय नेमके प्रश्न विचारून स्वत:च्या सर्व शंकांचे निरसन करून घेतले. समोरच्यावर कोणतेही दडपण येणार नाही अशी त्यांची एकंदर कामाची शैली जाणवली. पाच वाजता त्यांनीच आठवण केली आणि संस्थानचे स्वयंपाकघर आणि आनंदसागर बघून या असे सुचवले. शेगाव संस्थानचे स्वत:चे अत्याधुनिक किचन बघण्यासारखे आहे. दर ताशी ४०००० पोळ्या करणारे मशीन इथे आहे. हे मशीन जर बंद पडले तर तशी १०००० पोळ्या बनवणारी २ मशिने standby म्हणून आहेत. एका बाजूने कणिक घातली की दुसर-याबाजुने भाजलेली पोळी बाहेर पडते. एकावेळी १०० किलोचा भात, ७५ किलो भाजी, ५०किलो डाळ, १०० डीशेस शिरा, पोहे, उपमा ई. सर्व करणारी अवाढव्य मशीन्स अव्याहत भक्तांना अन्न पुरवतात. सर्व मशिनरी स्टेनलेस स्टीलमध्ये बनवली आहे. इथे कमालीची स्वच्छता आहे. अन्नगृहाला अव्याहत शुद्ध पाणी मिळण्यासाठी प्रचंड मोठे RO plants उभारले आहेत. इथे बनवलेले पदार्थ संस्थानच्या स्पेशल गाड्यातून गावातील वेगवेगळ्या भोजनगृहात, भक्त निवासात, कँटीन इत्यादी मध्ये तत्परतेने पोचवले जाते. या ठिकाणी येणाऱ्या भक्तांचा अंदाज घेऊन वेगवेगळ्या ठिकाणावरून डिमांड स्वयंपाकघरास मोबाईल वरून कळवली जाते. आणि त्या अंदाजाने अन्न बनवून पुरवले जाते. या कामाची अवाढव्यता वर्णन करता येण्यासारखी नाही. पण ही द्रौपदीची थाळी अव्याहत अन्नदान करत असते. इथले व्यवस्थापन भल्याभल्यांना (म्हणजे व्यवस्थापन तज्ञांना) तोंडात बोट घालायला लावणारे आहे. कुठेही गोंधळ नाही, अन्नाची नासाडी नाही, कुणीही उपाशी राहणार नाही. स्वयंपाकघराला लागून मोठी Laundry आहे इथे संस्थानाच्या भक्त निवासातील बेडशीटे, अभ्रे, सेवकांचे युनिफार्म धुवून वाळवून इस्त्री केले जातात. मोठमोठी वॉशिंगमशीन इथे आहेत. इथे देखील कमालीची स्वच्छता. मुख्य म्हणजे कोणताही कामगार (खरे म्हणजे सेवक) अवांतर टाईमपास करताना दिसला नाही. ३५०० सेवक व स्टाफ असलेले हे संस्थान आहे. सर्वजण आपले काम महाराजांची सेवा या भावनेतून करत असल्याने त्यात ओलावा  आहे. कुठेही मदत लागली तर हे सेवक आनंदाने, आत्मीयतेने मदत करताना दिसतात. आपल्या स्टाफ व कामगारांना शिस्त लावताना दमछाक झालेल्या उद्योजकांना संस्थानचा HR हा अभ्यास विषय आहे.
आता आनंदसागरकडे प्रस्थान केले. शेगावला गेलात की आनंदसागर बघाच असे अनेकांनी सांगितले. मनात एखादी बाग असेल अशी कल्पना केली. तिथे गेलो तर आपली कल्पनाशक्ती किती खुजी आहे याची जाणीव झाली. एका प्रचंड मोठ्या कृत्रिम तलावात कृत्रिम बेटं बनवली आहेत. रात्री दिव्यांची रोषणाई डोळ्याचे पारणे फेडते.  त्यातील एका टेकडीसदृश बेटावर देखणे ध्यानमंदिर केवळ अप्रतिम. मनोहारी landscape आणि waterscape  डोळ्याचे पारणे फेडते. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या भागात अडवलेल्या पाण्यातून साकारलेले हे लेणे बघण्यासारखे तर आहेच, पण अचंबित करणारे आहे. स्वच्छता तर शेगावला ठाईठाई आहे तशीच इथे देखील आहे. श्रीकांत पाटलांचे थोरले बंधू नीलकंठ पाटील यांनी हे साकारले आहे. आनंदसागराचे वर्णन मी करण्यापेक्षा ते बघणेच जास्त श्रेयस्कर ठरेल. आनंदसागर सागर बघितल्यावर परत दर्शन योग होता त्यामुळे महाराजांचे दर्शन झाले.
रात्री परत गेस्टहाउसवर आलो. श्रीकांत पाटील परत आमची खुशाली समजून घेण्यास आले. काही त्रास झाला नाहीना अशी विचारणा केली. फार लाजवतात हो ही मंडळी त्यांच्या अगत्याने आणि वर विचारतात काही त्रास तर झाला नाही ना? त्रास होण्यासारखे काही नाहीच आहे. शेगावचे पाणी आणि माती वेगळी आहे हे नक्की. संध्याकाळी पाटीलसाहेबांचे काही मित्र आले होते. शेगावच्या ‘श्री’ टॉकीजचे मालक श्री मोहंमद असिफ (आडनाव कदाचित वेगळे असेल) आले होते त्यांची ओळख झाली. ते देखील कॉलेजचे माजी विद्यार्थी व  विश्वस्त. त्यांच्या आजी महाराजांची भक्त. तिने महाराजांना प्रत्यक्ष बघितले होते. मशिदीत ते येत असत असा उल्लेख त्यांनी केला. गजानन महाराजांविषयी भरभरून बोलत होते. श्री गजानन महाराज फकिरी आयुष्य जगले. ही अवस्था सन्याश्याच्या पलीकडची. (आता तर काय संन्यासी राज्यकर्ते बनू लागलेत . असो.) इथे अंगावरचे कपडे देखील ‘विषय’ ठरतो. म्हणून त्याज्य.  माझं काहीच नाही अशी ही अवस्था. हे शरीर देखील त्याने दिलंय तो म्हणेल तोपर्यंत वापरणार. अशा फकिराच्या पश्चात त्याच्या नावे एव्हडे भावनेचे, श्रद्धेचे साम्राज्य उभे रहाते. खरचं अनाकलनीय आहे. जगात प्रत्येकाला आयुष्यातल्या कोणत्यातरी अनाकलनीय भीतीने ग्रासले आहे. माझं आज ठीक चाललं आहे, पण महाराज पुढे देखील माझे असेच सुरळीत चालू द्या. काही विघ्न नको. तर  काहींना काहीतरी विघ्न आहे, आजारपण आहे, धंद्यातली आर्थिक खोट आहे, मुलांचे प्रश्न आहेत आणि हे मलाच का? माझ्याच वाट्याला का? ह्या प्रश्नांची  उत्तरं मिळत नाही. महाराज उत्तर नाही दिले तरी चालेल पण सुटकेचा मार्ग दाखवा. मी १९८१ साली इथे आलो होतो. मंदिर तेंव्हा अतिशय लहान होते. जेमतेम रांग होती ५-१० मिनिटात दर्शन झाले. आता नेहमीच्या दिवशी एखादा तास लागू शकतो. सुबत्ता आली, technology आली तशी आयुष्यातली अनाकलनीयता, आकस्मितता,  अस्थिरता कमी न होता,  वाढली आहे. काही जण आपलं दुख: सांगण्यास इथे येतात. काही जण मनास बरे वाटते म्हणून येतात, काही संकटांशी सामना करण्यास शक्ती मागण्यासाठी येतात. काहींना काहीतरी मिळाले असते म्हणून महाराजांचं दर्शन हव असत. एकंदर आम्ही ‘विषयातच’ राहणार, पण हे फकीरा आम्हाला सुखी कर ही थोडी विसंगती आहे. पण एक लक्षात घ्या सामान्य माणूस असेच करणार त्याला संसारपण हवाय, विषयपण हवाय आणि सुख देखील हवंय. महाराज त्यासाठी मार्ग दाखवतात ही श्रद्धा. ज्या प्राण्याला बुद्धी आहे त्याला श्रद्धा असणारच. अगदी हार्डकोर नास्तिक कम्युनिस्टाची  देखील फक्त मार्क्सचच तत्वज्ञान माणसाला सुखी करेल अशी श्रद्धा असतेच की. पण एक सांगतो श्रद्धा ही इथली शक्ती आहे, Motivation आहे, भविष्याची आशा आहे. गजानन महाराज संस्थान हे अव्याहत चालणारे मशीन आहे. इथे श्रद्धेचा बाजार नाही तर इथे तुमच्या श्रद्धेचे व्यवस्थापन केले जाते. देशात आणि परदेशात आज अनेक महाराज आपले पॉश ५ स्टार आश्रम थाटून बसलेत. तुम्हाला मन:शांती हवीय मग मोजा पैसा, आम्ही तुमच्या श्रद्धेचे, सुखाचे आनंदाचे एकमेव एजंट आहोतच, आमच्या मोहमयी बोलण्यातून तुम्हाला आनंदाचा मार्ग दाखवतो. पण इथे असे मोहमयी बोलणारं कुणी नाही. महाराजांचं केवळ दर्शन आत्मिक आनंद देतं. देणगी देणे केवळ ऐच्छिक. पैसा न दिला तरी प्रसाद मिळेलच त्या बरोबर दर्शन आनंदही मिळेल अगदी फुकट. हे वेगळेपण आहे इथले.    

संस्थानचे इथे अनेक भक्त निवास आहेत. तिथे शेकडो खोल्या AC सारख्या सुविधांसकट आहेत. अत्यंत सवलतीच्या किमतीत इथे राहण्याची सुविधा मिळते. सुविधा इतकी की, कुठेही तक्रार करण्यास वाव नाही. येणाऱ्या भक्तास खात्रीने समाधान मिळते. कुठेही भक्तांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली जाते. शेगाव हे खऱ्या अर्थाने तीर्थक्षेत्र आहे हे जाणवते. यात प्रचंड मोठा वाटा श्रीकांत पाटील यांचे पिताश्री श्री. शिवशंकर पाटील यांचा आहे. ते आज नव्वदीच्या घरात आहेत. त्यांची गाठ पडू शकली नाही. पण लोकांच्या बोलण्यातून जे कळले ते असे की, शेगावचा हा कायापालट शिवशंकर पाटलांनी त्यांच्या कल्पनेतून साकारला. महाराजांच्या पोथीत उल्लेख असलेल्या भक्त श्री. महादजी पाटलांचे हे वंशज. त्यांना भेटू शकलो नसलो तरी श्री शिवशंकर पाटील यांच्या पुढे नतमस्तक झाल्याशिवाय रहावत नाही. खऱ्या अर्थाने विश्वस्त असलेले शिवशंकर आणि त्यांचे कुटुंबीय हे निस्वार्थीपणाची कमाल आहेत. लोकांनी श्रद्धेने दिलेल्या देणग्यांचे व्यवस्थापन “इदं न मम’ म्हणत करणे अवघड  आहे. इथे लोकांनी दिलेल्या प्रत्येक पैशाचा विनियोग केवळ लोकांसाठी केलेला आहे. मग गावातील रस्ते असोत, भक्त निवास असोत, शाळा-कॉलेज असो, भोजन व्यवस्था असो की आनंदसागर सारखे सौदर्यस्थळ असो. विश्वस्त कसे असावेत याचा वस्तुपाठ म्हणजे श्री. शिवशंकर पाटील व त्यांचे कुटुंबीय. आमचे स्नेही श्री. उमेश कौल सांगत होते की, शिवशंकर पाटील त्यांच्या ऑफिसमध्ये पाणी आणि चहाचा थर्मास देखील घरून घेऊन येतात. आधुनिक शेगावच्या या निर्मात्याचा किती हा निर्मोहीपणा. ‘गण गण गणात बोते.’ या महाराजांच्या उक्ती प्रमाणे गणांचा (भक्तांचा) पैसा गणात बोणाऱ्या (रुजवणाऱ्या) ह्या महाराजांच्या भक्तास त्रिवार नमस्कार. श्री गजानन महाराजांच्या आशीर्वादाने ही पाटील घराण्याची ही पाटीलकी अव्याहत चालू राहो, अशी इच्छा व्यक्त करून हा लेख इथेच संपवतो.
आवडला तर पुढे पाठवा.

श्रीकांत कुलकर्णी
९८५००३५०३७

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या