असं म्हणतात की जेव्हा तुम्ही एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्री जायचा विचार करता तेव्हा तिथल्या देवाचे / संतांचे बोलावणे यावे लागते त्याशिवाय जाणं होत नाही .
ब -याच दिवसापासून गोंदवले क्षेत्री जायचे ठरत होते. पण योग येत नव्हता . नवीन वर्षात पहिल्या शनिवारी योग जुळून आला. महाराजांनी नुसते बोलावले नाही तर संपूर्ण प्रवासात आपल्या बरोबर ते आहेत याची अनुभूती झाली.
मी आणि माझे कंपनीतले दोन सहकारी साधारण २ वाजता कळव्याहून निघालो . मागील दोन शनिवारी पुण्याला गेलो असल्याने आणि त्यावेळच्या वाहतूक कोंडीचा अनुभव असल्याने संध्याकाळी न निघता दुपारी निघावे असे ठरवले आणि कुठलीही अडचण न येता साधारण साडेपाच च्या सुमारास शिरवळ जवळ पोचलो. थोडा विसावा घेतला . त्याचवेळी पुण्याच्या एका मित्राने भक्त निवासातला नंबर दिलेला होता. तिथे फोन करून कळवावे म्हणून संपर्क केला पण फोन उचलला गेला नाही. पुण्याच्या मित्राला परत फोन केला असता तो म्हणाला ऑफीस बंद झाले असेल ८ पर्यत पोच आणि काही अडचण आल्यास ओळखीची नावे सांगितली. त्याला मजेने म्हणले असं कस ८ ला बंद करतात. महाराजाना सांगायला पाहिजे आम्ही एवढ्या लांबून येतोय
तिथून निघून साधारण ७ वाजता सातारा इथे पोचलो. हायवे वरून कोरेगाव कडे जाणारा रस्ता जिथे होता तिथे उड्डाण पुलावरून न जाता खालच्या रोडने गेलो . त्या सर्वीस रोडवर एक मोठा स्पीड ब्रेकर होता. तो न दिसल्याने गाडी जोरदार उडाली आणि खाली आली. हादरा जोरदार होता आणि लक्षात आले मागच्या बाजूचे चाक पंक्चर झाले आहे. सुदैवाने एका टायर वर्क शॉप पाशीच गाडी होती. पण त्यांनी पंक्चर काढत नाही असे सांगितले. गोंदवल्याला जायचे आहे ८ पर्यत पोचायचे आहे निदान चाक तरी बदलून द्या अशी विनंती केल्यावर मालक तयार झाले आणि त्यांनी तिथल्या एका कर्मच-याला सांगून चाक बदलून दिले .
या सगळ्या गडबडीत १०-१५ मिनिटे गेली. सातारा - गोंदवले साधारण ६० किलो मीटर अंतर. अपरिचित रस्ता, रात्रीची वेळ त्यात पंक्चर चाक तसेच घेऊन जायचे का पंक्चर काढून जायचे याबाबत द्विधा मनस्थिती. कारण परत थांबलो तर पोचायला उशीर होणार. पण मग न थाबता गोंदवले ला जाऊ आणि पंक्चर सकाळी काढू या विचाराने कोरेगाव रस्त्याला डावी कडे वळलो. एकदा हाच रस्ता ना ही खात्री करण्यासाठी एका सद्गृहस्थानां विचारता ते म्हणाले हाच रस्ता आहे आणि मलाही गोंदवलेच्या अलीकडे २० किमी जायचे आहे तर मी येऊ का ? त्यांना घेऊन आमचा पुढील प्रवास सुरु झाला.
रस्त्यावर कामे चालू असल्याने ठिकठिकाणे तयार केलेलं वळण मार्ग , कारखाना चालू असल्याने ऊस वाहतूक या सगळ्यात एकच समाधानाची गोष्ट म्हणजे पुढे रस्ता विचारावा लागला नाही कारण ते सद्गृहस्थ . गोंदवलेच्या आधी उतरल्यावरही पुढे कसे जायचे किती चौक येतील हे सगळं व्यवस्थित सांगून ते उतरले आणि आम्ही साधारण ९ वाजता पोहोचलो . भक्त निवासाची चौकशी करण्यासाठी जेव्हा कार्यालयात गेलो तेव्हा त्यांनी आधी ' प्रसाद ' घ्यायला सांगितले. प्रसाद घेऊन झाल्यावर भक्त निवासातील एक खोली मिळाली. वाहनतळावर गाडी लावण्यासाठी गाडी प्रवेशद्वारातून आत घेतली. बँगा उतरवण्यासाठी मित्र आला आणि मी त्याला सांगतोय अरे उजव्या बाजूचे मागचे दार घडत नाही आहे हे माहीत आहे ना तुला ? हे सांगत असतानाच त्याने दार ओढले आणि ते चक्क निघाले . गेले ५ -६ महिने बंद असलेले दार ( गँरेज मध्ये जाऊन दुरुस्त करण्यात वेळ न झाल्याने ) चक्क उघडले ? विश्वास बसत नव्हता ? पण जे घडले ते सत्य होते. माझ्या सारख्या धार्मिक, आस्तिक माणसासाठी हा चमत्कारच होता
रात्री समाधीस्थानाचे दर्शन घेऊन आल्यानंतर सहज विचार केला जर आपण नास्तिक असतो तर या घटनेची उकल आपण कशी केली असती. बरोबर मंदिरात गेल्यावरच दार कसे उघडले ? असा विचार करत असताना तो प्रसंग आठवला . साता-यात गतिरोधकावर उडून जेव्हा गाडी आपटली खाली तेव्हा त्या झटक्याने काही कारणाने आतील लॉक झालेले यंत्र चालू झाले असेल पण ते दार उघडण्याचा प्रसंग योगायोगाने मंदिरात गेल्यावरच आला
असो नास्तिक, विज्ञानवादी यांना हे वरचे विवेचनपटण्यासारखे आहे.
*पण महत्वाचा मुद्दा इथे मला सांगावासा वाटतो की अशी बुध्दी सुचणे / हा तर्कशुध्द्व विचार ( लॉजिकल विचार करणे ? ) करण्याचे सामर्थ्य ही आपल्याला या संत, महंतांच्या संगतीने मिळत असेल का ? मला वाटते नक्कीच
या संपूर्ण प्रवासात 'महाराज सोबत आहेत ' ही जाणीव वेळोवेळी होत गेली.
शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज , पावसचे स्वरुपानंद , नरसोबावाडीचे म्हादबा पाटील महाराज , अक्कलकोटचे स्वामी समर्थ , सज्जनगडचे रामदास स्वामी किंवा गोंदवल्याचे गोंदवलेकर महाराज .' आणी इतर. यांनी
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम जय राम जय जय राम किंवा गजानन महाराजांच्या पसायदानातील वाक्य ' महाराज माझे जवळी असावे '
हे सतत म्हणावयास सांगितले आहे
आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ही सगळी वेगवेगळी स्लोगन्स आहेत, सांगायचे मार्ग वेगवेगळे आहेत पण अंतिम उद्देश एकच भक्ती आणि भक्तीतून येणारे शहाणपण.
हा प्रवास चैतन्यदायी अनुभव देऊन गेला. या एकंदर प्रवासात ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केले त्या सर्वाचे आभार 🙏🏻