आज एकनाथ षष्ठी ( फाल्गुन कृ षष्ठी) . आजच्या तिथीला संत एकनाथ महाराजांनी देह ठेवला. आजच्या दिवसाच्या निमित्याने त्यांची एक मला आवडलेली विशेष रचना "अशी ही थट्टा" इथे देत आहे
यातील मेसेज ज्याने त्याने आपल्या पद्धतीने घ्यावा. समजायला तशी सोपीच आहे.
बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा
भलभल्यास लाविला बट्टा, अशी ही थट्टा
ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी
थट्टेने हरवली बुद्धी
केली नारदाची नारदी
अशी ही थट्टा
थट्टा दुर्योधनानं हो केली
पांचाळी सभेत गांजिली
गदाघावे मांडी फोडिली
अशी ही थट्टा
थट्टेने दुर्योधन मेला
भस्मासुर भस्म की हो झाला
वालीही मुकला प्राणाला
अशी ही थट्टा
थट्टा रावणाने त्या केली
सोन्याची लंका बुडविली
थट्टा ज्याची त्यास भोवली
बरी नव्हे थट्टा
थट्टेतून सुटले चौघेजण
शुक, भीष्म आणि हनुमान
चौथा कार्तिकस्वामी जाण
त्याला नाही बट्टा
एका जनार्दन सर्वांला
थट्टेला भिऊन तुम्ही चाला
नाहीं तर नरककुंडाला
अशी ही थट्टा
//
थोडं अवांतर: संत एकनाथ महाराजांनी ज्या अनेक रचना केल्यात त्या प्रत्येक रचनेत शेवटच्या कडव्यात ते स्वतःसाठी 'एका जनार्दनी' असा उल्लेख करतात. वरच्या रचनेतही तसा उल्लेख आहे. आणखी काही
उदाहरणे-
माझ्या मना
लागो छंद, गोविंद नित्य गोविंद!
यात शेवटी ते म्हणतात
गोविंद हा जनीं-वनीं
म्हणे एका जनार्दनीं !
//
काया ही पंढरी ,आत्मा हा विठ्ठल
नांदतो केवळ पांडुरंग!
देखिली पंढरी देही-जनी-वनीं
एका जनार्दनी वारी करी!!
//
संत एकनाथ महाराजांना विनम्र 🙏🌸
फाल्गुन कृ षष्ठी
(नाथषष्ठी)
२३/३/२२
Kelkaramol.blogspot.com 📝
देवा तुझ्या द्वारी आलो 🙏🌸