आमच्याकडे रोज फुलपूडा येतो. म्हणजे आम्ही आमच्या फुलवाल्याला सांगितलंय रोज ५ रु चा फुलपूडा टाकत जा. जास्त फुले नसतात पण देवघरातील प्रत्येक देवाला एक फूल , विष्णूला तुळस, शंकराला बेल इतपत असतं आणि काम होऊन जातं. गवाकडे पहाटे लवकर उठून, फिरून येताना बागेतील विविध ताजी फुले पूजेत मिळण्याचे आमच्या देवघरातील देवांच्या तरी नशिबात नाही.
तर आमच्याकडे फुलपुड्याचे एक वैशिष्ट्ये सांगतो. जेंव्हा एखादा महत्वाचा दिवस असतो त्याच्या आदल्यादिवशी हा फुलपूडा रजा घेतो. फुलवाल्याला इतक्यांदा बजावून सांगितलयं की धार्मिक सणाच्या दिवशी तरी व्यवस्थित फुले मिळावीत म्हणून आम्ही तुझ्याकडून महिनाभर फुले घेतो. पण जेंव्हा पाहिजेत तेंव्हा मिळाली नाही तर काय उपयोग?
पण नाही.
आता बहुतेक आमच्या देवांनाही सवय झालीयं. कालचंच उदाहरण. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी बरोबर फुलपूड्याची रजा. कापसाचे वस्त्र , आणि अक्षता महादेवांवर वाहून आम्ही समाधान करुन घेतले.
पण आजच्या फूलपुड्यात संपूर्ण देव्हारा भरेल एवढा बेल. कालची उणीव भरून निघाली.
त्या त्या दिवसाचे महत्व वगैरे असते हे सगळं मान्य. पण आजही शंकराला बेल वाहताना तेवढाच आनंद वाटला जेवढा काल झाला असता.
आता आमचं ठरलय! वेगळंच करायचं. उदा. मंदिरात देव दर्शनाला जाताना ही देव जरा निंवात असेल तेंव्हाच जायचे. म्हणजे गुरूवारी दत्त महाराजांना अजिबात भरायचे नाही, शनिवारी मारूती राया नकोत, मंगळवारी गणपती बाप्पा नकोत
जरा दिवस बदलून गेलो तर मंदिरात निवांतपणे बसून गप्पा तरी होतील छान.
आज बुधवार आज परत विश्वेश्वराच्याच मंदिरात जाऊन आज निवांत असणाऱ्या महादेवांना भेटून येतो.
मोगरा फुलला.. मोगरा फुलला
अमोल 📝
माघी. अमावस्या
२/३/२२
No comments:
Post a Comment