श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ५ जानेवारी २०१४
५ जानेवारी
नामस्मरण व एकाग्रता
नामस्मरण करताना चित्त एकाग्र का होत नाही ? त्याकरिता काय करावे ? नामस्मरण करीत असताना हजार तर्हेचे विचार मनात येतात हे खरे. त्यांना आवरण्याचा पहिला उपाय म्हणजे त्या विचारांच्या मागे न जाणे. विचार मनात आले तर त्या विचारांना फाटे फोडून ते वाढवू नयेत; म्हणजेच मनोराज्य करू नये. विचार जसे येतील तसे जातील, तिकडे लक्ष देऊ नये. चित्त एकाग्र होण्याकरताच नामस्मरणाची गरज आहे. चित्ताची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे. चित्त चंचल आहे. त्याला कुठेतरी स्थिर करून ठेवल्याशिवाय भागत नाही, म्हणून ते नामात गुंतवून ठेवावे. नामस्मरण करीत असताना ते नाम आपल्या कानांनी ऐकावे, म्हणजे एकाग्रता व्हायला मदत होईल. एकाग्रता झाल्याशिवाय नाम घेण्यात अर्थ नाही, आणि नामाशिवाय एकाग्रता होणार नाही, या संशयात न पडता साधे, सोपे नाम घ्यावे म्हणजे आपोआप एकाग्रता येईल.
दुसरी गोष्ट अशी की, ज्याची आपल्याला आवड असते त्यात आपल्याला एकाग्र होता येते. आपल्याला विषयाची आवड असते म्हणून विषयाचे सेवन करताना आपण एकाग्र होतो; मग त्याचप्रमाणे विषयाच्या ऐवजी आपण परमात्म्याची आवड धरली तर त्याच्या ठिकाणीही एकाग्र होता येणार नाही का ? म्हणून, आज विषयाची जितकी आवड आहे तितकीच देवाच्या प्राप्तीबद्दलही आवड ठेवावी, म्हणजे आपल्याला त्याच्या ठिकाणी एकाग्र होता येईल. एकाग्र होणे म्हणजे त्या ठिकाणी समरस होणे. मीठ पाण्यात टाकले म्हणजे ते पाण्याहून वेगळे राहते का ? योग केल्याने एकाग्र होता येईल खरे, पण जोपर्यंत समाधी आहे तोपर्यंतच ती एकाग्रता टिकेल. सर्वांभूतीं भगवद्भाव पाहणे हेच खरे एकाग्रतेचे साधन. सर्व ठिकाणी तोच भरलेला आहे असे समजल्यावर द्वैत कुठे राहिले ? आणि जिथे द्वैत गेले तिथे आपोआप एकाग्रता आलीच. अशी एकाग्रता साधते तीच खरी समाधी होय.
मनुष्य अगदी एकटा असला किंवा एकांतात असला तरी आपल्या कल्पनेने तो अनेक माणसे आपल्या भोवती गोळा करतो. विशेषत: विद्वान लोकांना कल्पना जास्त असतात. तेव्हा कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करू या. भगवंत हा दाता आहे, त्राता आहे, सुख देणारा आहे, अशी कल्पना आपण करू या; त्यातच खरे हित आहे. कल्पनेच्या पलीकडे असणारा परमात्मा आपण कल्पनेत आणून सगुण करावा, आणि तिथेच आपले चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. ५. मन एकाग्र होत नसेल तर न होवो पण नामस्मरण सोडू नये. ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )
No comments:
Post a Comment