July 31, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३१ जुलै २०१४

३१ जुलै

आपण भगवंताचे झालो तरच सुखी होऊ. 

 

 



आपल्याला साधायचे काय हे ध्यानात धरले पाहिजे. परमात्मा साधायचा आहे, आणि शरीर आणि प्रपंच ही साधने आहेत, हे पक्के समजावे. आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो, म्हणून आपले चुकते. एका गृहस्थाला मुलाबाळांसह मुंबईला जायचे होते. आता आगगाडीत बसायला मिळेल या आनंदात मुले गाडीत बसली, पण मुंबईस जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला. गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटले, त्या गृहस्थाला नाही तसे वाटले.
वसिष्ठांनी रामाला सांगितले की, "रामा, तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निःसंग रहा." 'मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे, निःसंग आहे,' ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा. जमीन सोडून कुणाला राहता येत नाही, त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही. पण त्यात 'राम कर्ता' मानून वागणारा तो पारमार्थिक, 'मी कर्ता' असे मानून वागणारा तो प्रापंचिक. 'मी कर्ता' असे म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो, सुखरूप होत नाही, तर त्याचा कर्ता मी नाही हे सिद्ध झाले ! प्रपंच हा अर्धवट आहे, पूर्ण फक्त राम आहे. मिठाचे पोते कितीही धुतले तरी त्याचा खारटपणा जात नाही, तसे प्रपंचाचे आहे. म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असे साधन जे नामस्मरण, ते अखंड करावे. प्रपंचात आपण किती कष्ट करतो ! तितका मोबदला मिळत नाही, तरीही कष्ट करतो. परमार्थात तसे नाही. परमार्थ जितका जितका करावा तितके तितके समाधान अधिकाधिक असते. आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्युमुखीही प्रपंचच आठवेल. म्हणून प्रपंचाचा हव्यास धरू नये. प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून, त्यांच्याबाबत अलिप्तपणाने वागावे. ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचाराने वाढवावी. प्रपंचात, प्राप्त झाले त्याचा हर्ष न करावा, गेल्याचा शोक न करावा. देह प्रारब्धावर टाकावा. हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ति आहे; आपण रामाचे व्हावे. राम ठेवील तसे समाधानाने राहावे. हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे; तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळे व्हावे.
सर्व ईश्वराचे आहे, माझे काही नाही, असे समजणे म्हणजे ईश्वरार्पण करणे आहे. आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ, नाहीतर दुःखी होतो. धान्यातले दगड, माती, पाकड, निवडून बाजूला काढून, धान्य जे सार, ते घ्यावे; त्याचप्रमाणे, अहंकाराचे खडे, ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड, आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखरूप प्रपंच होतो. ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल ते सारे सुखच !

२१३. 'रामा, सर्व तुझेच आहे, तू देशील ते घेईन.' अशी भावना ठेवावी. यानेच अत्यंत समाधान होते.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 30, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० जुलै २०१४

३० जुलै

राम कर्ता हे जाणून चित्तीं । जगांत संत ऐसें वर्तती ॥

 




जेथे मीपणाचे ठाणें । तेथें दुःखाचें साम्राज्य असणे ।
हा आहे नियम । म्हणून मी सांगतो राखावा नेम ।
सर्वस्वी व्हावें भगवंताचें । 'मी, माझें' सोडून साचें ॥
बाह्य मीपणानें जरी सोडलें । पण अभिमानानें वृत्ति बळावली । तेथें घाताला सुरुवात झाली ॥
बुद्धि करावी स्थिर । नामीं असावें प्रेम अनावर ।
राम कर्ता जाणूनि चित्तीं । जगांत संत ऐसें वर्तती ॥
साधनीं सावधान जाण । हेंच साधकाचे मुख्य लक्षण ॥
बाह्य वेषानें कसाहि नटला । जगाला भुलविता झाला ।
तरीं जोंवरी नाहीं चित्त स्थिर । कसा पावेल रघुवीर ? ॥
आजवर केल्या गोष्टी फार । भल्या बुर्‍या असतील जाण ।
त्याचा न करावा विचार । पुढें असावें खबरदार ॥
मानावी परस्त्री मातेसमान । दुसर्‍याचें न पाहावें उणेपण ।
परनिंदा टाळावी । स्वतःकडे दृष्टी वळवावी ॥
गुणांचे करावें संवर्धन । दोषांचे करावें उच्चाटन ।
याला एकच उपाय जाण । अखंड असावें अनुसंधान ॥

प्रपंच न मानावा सुखाचा । तो असावा कर्तव्याचा ॥
वृत्ति असावी स्थिर । चित्तीं भजावा रघुवीर ॥
असा करा कांही नेम । जेणें जवळ येईल राम ॥
प्रपंचाची धरितां कांस । दुःखचि पावे खास ॥
प्रपंच हाच आधार । प्रपंचाविण निराधार ।
ऐशी होई ज्याची वृत्ति । समाधान न ये त्याचे हातीं ॥
तुम्ही सुज्ञ भाविक जाण । एवढें ऐकावें माझें वचन ॥
दुष्ट मतीची उत्पत्ति । ही दुर्जनाची संगति ।
भावें धरितां रघुपति । सर्व संकटें दूर जाती ॥
वृत्ति असावी खंबीर । ज्याचा आधार रघुवीर ॥
दुर्जनांचे जैसें मन । पाषाणास न फुटे द्रव जाण ।
तैसें प्रपंची इच्छी जो सुख । जें आजवर कोणास न मिळाले देख ॥
प्रपंचाचे दुःख जाण । तें मीपण असल्याची खूण जाण ॥
जगांत वर्तावें, घरांत असावें । व्यवहारांत व प्रपंचांत वागावे । परि न कोठे गुंतावें ॥
फार दिवसांचा वृक्ष झाला । घरांतील घडामोडी दिसती त्याला ।
जैसें तो न सोडी आपलें स्थान । तैसें वागावें आतां आपण ॥
ज्याचें घरी रामाचा वास । तेणें न राहावें कधीं उदास ॥
सदा राखावें समाधान । मुखीं भगवंताचें नाम ॥
आतां प्रेम ठेवा नामीं । कृपा करील चक्रपाणी ॥
आतां करा चित्त स्थिर । हृदयीं धरा रघुवीर ॥
रामावांचून न आणावा विचार । हाच माझा आशिर्वाद ॥


२१२. जेथे नाम तेथे राम । हा ठेवावा विश्वास । कृपा करील रघुनाथ खास ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 29, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ जुलै २०१४

२९ जुलै

मला कुणाचे दुःख पाहवत नाही. 

 



पुष्कळ मंडळी यावीत, आलेल्याला खायला घालावे, आणि भगवंताचे नाम घ्यावे, ह्या तीन गोष्टी मला फार आवडतात. त्या जो करील त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही. जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो, त्याच्या प्रपंचात मी आहे. माझ्या माणसाने प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडायची नाही. उलट, इतरांच्यापेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे. कमी आहे त्याची काळजी न करता, जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता, जो येईल तसा खर्च करतो, तो मनुष्य ते सर्व मला देतो. मला विकत-श्राद्ध घ्यायची सवय आहे. मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही; पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो. माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसे खूप होती; पण मी कधीही काळजी केली नाही. मी आजपर्यंत पैशासाठी कुणापुढे जीभ विटाळली नाही. उद्या जर कोणी एक लाख रुपये माझ्या नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले, तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमाचे चार आणे मिळवून पोट भरीन. मला आवडते की, एक लंगोटी घालावी, मारुतीच्या देवळात राहावे, भिक्षा मागावी, आणि अखंड नाम घ्यावे. हे करायला कोण तयार आहे ? मी आपला नामाचा हट्ट कधी सोडला नाही. मी जरी जास्त गरीबांचा आहे, तरी मला प्रपंचांत कधी दैन्यपणा आवडत नाही. दुसर्‍याकरिता निःस्वार्थीपणाने भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही.
व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे की, मला कुणाचे दुःख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही. माझ्यातले प्रेम काढले तर मग 'मी' नाहीच ! मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणार्‍या माणसाला माहेरी आल्यासारखे वाटले पाहिजे; तो परत जाताना त्याच्या डोळ्यांत पाणी आले पाहिजे. दुसर्‍याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही; ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात. पण आपण असण्यात एक आधार आहे असे इतरांना वाटावे. माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊक ! मी पुढे असो वा नसो, जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटीही सांगतो : तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका. रामरायाने तुम्हा सर्वांवर कृपा करावी, ही माझी त्याला प्रार्थना आहे. तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची जाणीव मला आहे. या कष्टांचा मोबदला रामरायच तुम्हाला देईल. तुम्ही सर्वजण आनंदात राहा, हा माझा तुम्हा सर्वांना आशिर्वाद आहे.


२११. माझा असा अनुभव आहे की, जो मनुष्य
आपले आहे ते रामाला देतो त्याला राम पुरवतो.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 28, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ जुलै २०१४

२८ जुलै

नाम घेणार्‍याच्या मागेपुढे मी उभा आहे. 

 

 

गूढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते. कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात. ते कुठून येतात हे कळत नाही. म्हणजे, केवळ दृश्यामध्ये असणार्‍या गोष्टींचेदेखील मूळ आपल्याला उकलत नाही. मग जे अदृश्यच आहे त्याचे मूळ आपल्याला कसे कळणार ? मो बोलतो कसा, माझे मन कुठून येते, हे देहबुद्धीत राहणार्‍यांना कळणे कठीण आहे. नामामध्ये जे स्वतःस विसरले त्यांनाच मी खरा कळलो. स्वतःच्या प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता. पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो, त्याप्रमाणे प्रपंचामधे कसेही केले तरी दुःखच पदरात पडते. आपण समजून उमजून ज्या चुका करतो, त्यांचा दोष आपल्याकडे असतो. न समजता जी चूक होते त्याचा दोष येत नाही. प्रपंचाच्या आसक्तिने दुःखपरंपरा येते हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ति ठेवतो, हा दोष नव्हे काय ? आपले कुठे चुकते ते पाहावे आणि जे चुकते ते सुधारावे. प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात ? त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसते. मग अमुक हवे किंवा नको असे कशाला म्हणावे ? रामाचेच होऊन राहावे म्हणजे झाले ! जो रामाजवळ विषय मागतो, त्याला रामापेक्षा त्या विषयाचेच प्रेम जास्त असते असे सिद्ध होते.
मी तुमच्याकडे येतो. पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवीत नाही. मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा; म्हणजे सतत नामस्मरणात रहा. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच. मला रामावाचून दुसरे जिवलग कोणी नाही. देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही. तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे यापलिकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही. रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका. जो माझा म्हणतो , त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे. जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका, आणि घ्यायचे झाले तर नामच घ्या. माझा नियम असा आहे की, परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल. माझ्या गावी पैसा पिकत नाही. पण भक्ति मात्र खास पिकते. ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागेपुढे मी उभा आहे. मी तुमच्याजवळ आहेच; तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो. शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे, मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे; ती मी सांभाळीन.

२१०. जेथे नाम तेथे मी । हा भरवसा बाळगून असावे तुम्ही ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 27, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ जुलै २०१४

२७ जुलै

आपण मागावे फक्‍त एका रामाजवळ. 

 



आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्याकरिता व्हावी. आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे. किंबहुना, लहान मुलाला जशी आई, मोठ्या मुलाला जसा बाप, बाईला जसा प्रेमळ नवरा, मुनीमाला जसा सज्जन मालक, नोकराला जसा त्याचा स्वामी, एखाद्याला जसा विश्वासू मित्र, तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने गोंदवल्यास यावे. भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन, त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा, हे सगुणोपासनेशिवाय सामान्य स्त्री-पुरुषाला समजणे अशक्य आहे. जगात घडून येणार्‍या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाची इच्छा काम करीत असल्याचे आपण जाणले पाहिजे. इतकेच नव्हे, तर व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्‍न केल्यानंतर जे चांगले वाईट फळ मिळेल, ते रामाच्या इच्छेनेच मिळते अशी श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते, त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही. सर्व काही राम करतो, खरे कर्तेपण रामाचे, हे नीट लक्षात आणून, भगवंताकडे कर्तृत्व द्यावे आणि आपण मीपणाने नाहीसे व्हावे. खरोखर, आपल्या रामाला काय कमी आहे ? आपण मागावे फक्त एका रामाजवळ ! तो देईल अथवा न देईल. जे देईल त्यांत समाधान मानावे. दुसऱ्या कोणाच्याही जवळ आपण कधी मागू नये. त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे. मात्र देणार्‍याने स्वखुशीने दिले तर ते टाकू नये.
माझ्या आयुष्यात मी नामाशिवाय दुसरे साधन केले नाही. माझ्या गुरूंनी मला नामच दिले, तेच नाम मी सर्वांना देत आहे. तुम्ही ते नाम घ्या, तुम्हाला राम खात्रीने भेटेल. तोंडाने नेहमी 'राम राम' म्हणत जा. भगवंताच्या नामामध्ये जीवाचे कल्याण आहे असा माझा अनुभव आहे. म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री-पुरुषांनी घ्यावे. कोणत्याही कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचे बळ ठेवा. गाईचे रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी, फक्त भगवंतासाठी असावी. आपण जे काही करीत आहोत ते सर्व भगवंतासाठी करीत आहो, जी जाणीव राहण्यासाठी त्याचे नाम सतत घेत असावे. ज्या वेळी समाजातली पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात, त्या वेळी कलियुग सुरू झाले असे समजावे. सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात. विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते. अशा वेळी, भगवंताच्या नामाचे माहात्म्य जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यायचेच; पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील, तो प्रत्येक संकटातून सहीसलामत पार पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिकटून असावे. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा.

२०९. राम कर्ता म्हणेल तो सुखी, मी कर्ता म्हणेल तो दुःखी.

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 26, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ जुलै २०१४

२६ जुलै

साधन - चतुष्टय. 

 



कोणतीही इमारत बांधीत असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्राने चार प्रकारचे साधन सांगितले आहे. प्रथम, नित्यानित्यवस्तुविवेक करावा. अनित्य जो विषय त्याच्या वाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे. नंतर, या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी. हे दुसरे साधन होय. आपले मन बाह्य विषयांकडे धाव घेते; तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे. आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे, गुरूच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा, हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावे; हे तिसरे साधन होय. शेवटी, भगवंताच्या भेटीची खरी तळमळ लागावी. ही सर्व साधनसामग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते. पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे. मनामधली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे. मोहाला बळी पडता कामा नये. नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्यजन्माचे ध्येय नव्हे. जनावरेदेखील आपापला प्रपंच करतातच. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही. खरोखर, भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठविलेले आहे. त्याचे नाव घेऊन जो जगात वावरेल, त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखील यात शंका नाही. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे. रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावे लागते, पण हे आपल्याला सर्वाच्या शेवटी आठवते, म्हणून सुखदुःख बाधते. म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू. यासाठी त्याच्या नामाची गरज आहे. प्रपंचाची तर्‍हा अशी असते की, आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले, की लगेच उद्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते. म्हणून, एका डोळ्यात सुखाचे अश्रू, तर दुसर्‍या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते, तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे ? शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे, आणि बरावाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे. जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे. नाम घेणार्‍याचे राम कल्याण करतो, एवढे माझे सांगणे शेवटर्यंत विसरू नका.

२०८. अती प्रेमाने नाम घ्यावे. नामात तल्लीन
झाल्यावर देहाची सुखदुःखे बाधणार नाहीत.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 25, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २५ जुलै २०१४

२५ जुलै

भगवंताचे नाम सोडू नका. 

 



संकल्प ही फार मोठी शक्ति आहे. इच्छा जर खरोखर अती प्रबळ झली, तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच, भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो. प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळविल्या, तरी त्या स्वभावतःच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही. याच्या उलट, भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे, आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात, आणि नंतर आपोआप नाहीशा होतात. म्हणून नेहमी 'भगवंत मला हवा' अशी इच्छा करीत जावे. त्याचे नाम घेणे, म्हणजे 'तू मला हवास' असे म्हणणेच होय. खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला, तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो. आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो, ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे, म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही.
नामात एक विशेष आहे. विषयाकरता जरी नाम घेतले तरी विषय प्राप्त होऊनही ते आपले काम, म्हणजे तुमचे मन निर्विषय करणे, ते करीतच असते, म्हणून कशाकरता का होईना, नाम घ्या. पण निर्विषय होण्याकरिता घेतले तर काम शीघ्र होईल. साधन तेच, आणि साध्यही तेच. नामच एक सत्य आहे, यापरते दुसरे सत्य नाही, यापरते दुसरे साधन नाही, असा दृढ भाव असावा. आपण कोणचेही कृत्य करीत असताना, ज्याकरता ते आरंभले ते जसे नेहमी आपल्या डोळ्यासमोर असते, त्याप्रमाणे नाम घेताना, ते आपण कशाकरता घेतो त्याची जाणीव अखंड असावी. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे, याचे नाव अनुसंधान. वास्तविक आपण भगवंताचेच आहोत, पण भ्रमाने मला 'मी विषयाचा आहे' असे वाटू लागले. संत 'तू विषयाचा नाहीस, भगवंताचा आहेस,' असे सांगतात. हीच संतांची खरी कामगिरी; आणि याकरता ते नाम सांगतात, नाम घेणे म्हणजे 'मी विषयाचा नाही, भगवंताचा आहे' असे मनाला सांगणे, मनात तशी जाणीव उत्पन्न करणे, आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुनः पुनः मनाला तेच सांगणे, म्हणजे तेच नाम सतत घेणे.
भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवा आहे, त्याचे काम झालेच पाहिजे. आपल्याला जगातला मान, लौकिक, पैसा, विषय इत्यादि काही नको असे वाटते का ? तसे नसेल तर, 'भगवंत मला हवा आहे' असे नुसते तोंडाने म्हणणे बरोबर नाही. ज्याला भगवंताचे प्रेम जोडायचे असेल त्याने जगाचा नाद सोडायला पाहिजे. जगाच्या मागे लागाल तर आपले साधन बुडवून बसाल. तुम्ही सतत भगवंताचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंताला आळवावे, तुम्ही कितीही पतित असला तरी पावन होऊन जाल, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे.

२०७. जो जो संकल्प उठेल तो तो रामस्मरणयुक्त असला पाहिजे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 24, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ जुलै २०१४

२४ जुलै

सद्‌गुरूला शरण जावे. 

 



प्रत्येकजण पोटाला खायला मिळावे म्हणून खटपट करीत असतो. परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळते का ? नाही. म्हणून, सांगायचे कारण असे की, जर आपण विषयांकरिता इतके झटतो, तर देवाच्या प्राप्तीकरता श्रम करायला नकोत का ? संत सांगतात तो मार्ग चोखाळून पाहावा. एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरू कल्पिला, तो सांगेल तेच साधन मानावे. गुरू देहातच असावा हे मानणे चूक आहे. गुरू हे देहात कधीच नसतात. गुरू प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागले पाहिजे. अशी भावना ठेवून वागले, म्हणजे गुरू कसाही असला तरी तिथे प्रत्यक्ष देवाला येणे भाग पडते. गुरू सांगेल तसे आपण नेहमी साधन करीत राहावे. तसे साधन करीत राहिले म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते. गुरू नामाशिवाय दुसरे काय सांगणार ? त्यातच आपण सदा राहावे. जो खरा साधनात राहतो, त्याला ह्या सर्व गोष्टी आपोआपच साधत असतात. म्हणून आपण गुरूला अनन्यशरण जाऊन, तोच सर्व करतो आहे हे मानून, जे होईल त्यात आनंद मानीत जावा. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरूला देखील आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. श्रीरामचंद्राची जिज्ञासू अवस्था पाहून वसिष्ठांना फार आनंद वाटला; आणि ते साहजिकच आहे. एकच देव, एकच साधन, आणि एकच गुरू मानला, त्याचप्रमाणे, आपण एका नामात राहण्याचा प्रयत्‍न करावा. मुलगा हसतखेळत असताना बाप त्याला घेतो, पण रडू लागला की खाली ठेवतो; याच्या उलट, मुलगा रडत असला तर आई त्याला घेते. हाच देवामध्ये आणि संतामध्ये फरक आहे.
बर्फामधले पाणी काढले तर काहीच उरत नाही. त्याप्रमाणे, संतांमधले भगवंताचे प्रेम जर काढून टाकले तर त्यांच्यामध्ये मग काहीच उरत नाही. साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती हा होय. आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो. नुसता हेतू काम करीत नसून संगत काम करीत असते. संगत दोन प्रकारची आहे; घातक आणि उत्तम. विषयी माणसाची संगत ही घातक होय, आणि सत्संगत ही उत्तम होय. सत्संगतीमध्ये असताना, आपल्या ठिकाणी दोष आहे असे ज्याला कळेल तो लवकर सुधारेल. आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेले मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्‍न केला, तरच त्याच्याशी खरी संगत केली असे म्हणावे. संताची प्रचीती पाहणे म्हणजे आपले प्रपंचातले काम मनासारखे होणे हे नव्हे. ज्या घटकेला आपले चित्त शुद्ध होते, त्या घटकेला संताची खरी प्रचीती आली असे समजावे.

२०६. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 23, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २३ जुलै २०१४

२३ जुलै

आधी श्रद्धा, मग कृती, नंतर अनुभव. 

 

    

गुरुआज्ञेप्रमाणे वागणार्‍याला कधीही नड येत नाही. राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते. तसे, गुरूचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणार्‍याला कसली नड असणार ? लांब उडी घेण्यापूर्वी चार पावले मागे जावे लागते, परिसापाशी सोने व्हायला रुप्याचे लोखंड व्हावे लागते; तसे, गुरूचा पाठीराखेपणा असून आपल्याला जी अधोगतीशी वाटते, ती पुढच्या महत्कार्याची पूर्वतयारीच होय. बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवीत असताना मधून मधून हात काढून घेतो, पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडू देणार नाही, तसा आपल्याला सद्‍गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी.
आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास ठेवतो, याचे कारण असे की, आपल्याला जगायची इच्छा आहे. तसे, भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. आधी श्रद्धा, मग कृती, आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव, असा व्यवहाराचा नियम आहे. परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे. व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जर भगवंतावर ठेवलीत, तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल. आगगाडीत ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्थ झोप घेतो, त्याप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्थ रहावे. ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे. परमार्थात अंधश्रेद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालावयाचे नाही. सांगणारा कसाही असला तरी ऐकणार्‍याची जर खरी श्रद्धा असेल; तर त्या श्रद्धेनेच त्याच्याअंगी पात्रता येईल. संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा असणे ही फार भाग्याची गोष्ट आहे. खरे म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली, तो लवकर सुखी झाला. आज आपल्यापाशी ती नाही, तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनू या. आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे, पण एकदा ते ठरले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या साधनात राहावे.
आपण परमात्म्याजवळ मागावे की, "तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. मला अमुक एक तुजजवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे, आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे."

२०५. श्रद्धेशिवाय कधी कोणाला परमार्थ साधायचा नाही.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 22, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २२ जुलै २०१४

२२ जुलै

गुरू आपल्याला अंतिम सुख दाखवितात.

 



एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता. त्याची एक वस्तू आत पडली होती. 'ती काढण्याकरिता मी आत उडी मारतो,' असे तो म्हणू लागला. त्यावर तिथे होता तो एक मनुष्य म्हणाला, 'तू असे करू नकोस, आत पडून बुडून जाशील.' तरीपण तो ऐकेना, एवढ्यात त्याचा बाप तिथे आला. त्यानेही मुलाला पुष्कळ सांगून पाहिले, पण तो ऐकेना, मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेले. आता, मुलाला मारले म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का ? "एकुलता एक मुलगा, नवस करून झालेला, त्याला जाऊ दिले असते तर काय झाले असते ?" असे म्हणाल का ? नाही ना ? तर मग गुरू करी काय करीत असतो ? आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहीत असते; म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचविण्यासाठी चार गोष्टी सांगून पाहतो. आपण तेही न ऐकले, तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवितो. आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढीतच असतो. आपण तर चांगले शिकले-सवरलेले; त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्कर; तरीसुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते. गुरूने सांगितले, 'लग्न करू नकोस', तर आपण 'लग्न कधी होईल' म्हणून त्याच्या पाठीस लागत असतो. आणि शेवटी तर 'गुरूला समजतच नाही' असे म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते ! सध्या दिसते तेच सुख आपण खरे असे मानीत असतो. पण अंतिम सुख काय, हे गुरूला कळत असते. म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करीत असतो. तेव्हा, आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे. तो जे साधन सांगेल तेच करीत राहावे, म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल. गुरू आज्ञा करतो म्हणजे काय करतो ? तर आपले मन जिथे गुंतले असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्‍न करतो.
भगवंत भक्ताची संकटे नाहीशी करतो, म्हणजे त्याची प्रापंचिक संकटे दूर करतो असे नाही. ती काय, सहज दूर करता येतात; पण भक्ताला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ति भगवंत देतो. भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो. असे भक्तच संतपदाला पोहोचतात. एकाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडे तरी विद्वान झाले पाहिजे, त्याप्रमाणे, संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे. संतांचा मुख्य गुण म्हणजे, ते भक्तिला चिकटलेले असतात. सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमानाने निरनिराळे असतात, पण आतले भगवंताचे प्रेम मात्र सर्वांचे एकच असते.

२०४. प्रापंचिक जन विषयप्राप्तीसाठी झटतात. पण विषय
मागूनही जो देत नाही, त्यापासून परावृत्त करतो, तो संत.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 21, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २१ जुलै २०१४

२१ जुलै

वेदाप्रमाणे नामही अनादी, अनंत, अपौरुषेय आहे. 

 



शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की, कृतयुगामद्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने आणि द्वापारयुगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते. परंतु कलियुगामध्ये त्यांपैकीं काहीच साध्य होणे शक्य नसल्याने, भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते. शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की, साडेतीन कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते; आणि तेरा कोटी जप केला असता, भगवंताचे दर्शन होते. मला आपण महत्त्व देऊ नका; पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो, ते ज्ञानेश्वरमहाराज, एकनाथमहराज, तुकाराममहाराज, आणि समर्थ रामदासस्वामी, यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील, हे शक्यच नाही. वेदांना जे परमात्मस्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्‌रूपाने जाणतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली आहेत, म्हणून संतांनी कळवळून 'नाम घ्या' असे सांगितले.
वेद भगवंताचे वर्णन करतात. नामदेखील भगवंताचेच अस्तित्व प्रकट करते. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी 'हरिः ॐ' असते, ते नामच आहे. जसा वेद हा अनादि, तसे नाम अनादि. जसा वेद हा अपौरुषेय, तसे नाम हे अपौरुषेय. जसा वेद हा अनंत, तसे नाम हे अनंत आहे. प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले, म्हणून ते अनादि साधन आहे. इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहाराविहाराची बंधने आहेत, भगवंताच्या नामाला ती नाहीत. नाम हे आगंतुक नाही. आदिनारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ॐ चा ध्वनी केला तेच नाम होय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की, आपण नाम घेत जावे. किंबहुना, आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करीत असताना, म्हणजे वेद म्हणत असताना, आपले लक्ष शब्दांकडे असावे. आपण नेमके तेवढेच विसरतो. नाम घेणार्‍या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये. आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. भगवंताला लबाडी खपत नाही. आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवितो. इतक्या तन्मयतेने नाम घ्या की, 'मी नाम घेतो आहे' हे सुद्धा विसरून जा.

२०३. इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा
उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 20, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २० जुलै २०१४

२० जुलै

नामांतच राहे समाधान । ही सद्‌गुरूची आहे खूण ॥ 

 



रामापायी ठेवावे मन । त्यासी कर्तव्य नाहीं उरले जाण ॥
देहभोग आजवरी नाही सुटला कोणाला । त्याचा त्रास मात्र नाहीं रामभक्ताला ॥
तुम्हाला आता करण्याचेंच नाही काही । भाव ठेवा रामापायीं ॥
नामांतच राहे समाधान । ही सद्‍गुरूची आहे खूण ॥
रामास जावें अनन्य शरण । कृपा करील तो दयाघन ॥
देह सोडावा प्रारब्धावर । ज्या ज्या वेळी जें जें होईल तो मानावा आनंद ॥
दृश्याते नाहीं मानूं सत्य । रामरूपीं ठेवावें चित्त ॥
विषयासी नाही देऊं थारा । दया येईल रघुवीरा ॥
नाहीं देवाजवळ मागूं दुजें जाण । तुमचे नामीं लागो मन ।
ऐसें प्रार्थिता जो झाला । राम कृपा करील त्याला ॥
नाहीं भंगूं द्यावें समाधान । रामापायीं ठेवावें मन ॥
लोभ्याच्या मनांत जसें वित्त । तसें साधकाचें नामांत चित्त ॥
एवढे ज्यानें केलें काम । त्याला नाहीं रामाचा वियोग ॥
पाण्यांवाचून जसा मासा तळमळतो । तसें नामाशिवाय व्हावें मन ॥
एक मानावी आज्ञा प्रमाण । नाहीं याहून दुसरें साधन जाण ॥
साधनाच्या आटाआटी । नाही देह करू कष्टी ॥
रामावांचून नाही कोणी सखा । त्याला नाहीं कोठें धोका ॥
प्रपंची ज्याचा राम सखा । भय चिंता दुःख नाहीं देखा ॥
रामसेवेपरतें हित । सत्य सत्य नाहीं या जगांत ॥
मनानें होऊन जावें भगवंताचे । त्यानें खास केलें सार्थक जन्माचे ॥
सर्व कर्ता राम । हा भरवसा ठेवावा ठाम ॥
राम कर्ता हा ठेवितां विश्वास । काळजीचें कारण उरत नाहीं खास ॥
रामरायाचें सान्निध्य राखता । भय, चिंता, शोक, यांची नाही वार्ता ॥
सतत करावें नामस्मरण । सर्व इच्छा राम करील पूर्ण ॥
नामाचें चिंतन, भगवंताचें ध्यान, गुरुआज्ञा प्रमाण ।
तीच गुरुपुत्राची आहे खूण । नाहीं यावांचून दुसरें स्थान । जिथें राहे समाधान ॥
रामापायीं व्हावें लीन । याहून नाहीं दुसरें लिहिणें जाण ॥
आतां याहून दुजे नाही करणें काहीं । असा भाव ज्यानें ठेविला हृदयीं । त्याला राम नाहीं राहिला दूर ॥
रामाविण न मानावे हित । त्यानेंच जोडेल भगवंत ॥
नाहीं करूं देहाचा कंटाळा । राम ठेवील त्यांत राहावें सदा ।
जे जे होतील देहाचे हाल । ते ते परमात्म्यापासून आले असें जाणावें ॥
नाहीं करूं काळजीला । मी नाही सोडलें तुम्हांला ॥
ज्याची वाटते महति । त्याचेंच चिंतन होय चित्तीं ॥
रामावांचून न ठेवा दुजा भाव । चित्तास येईल तेथेंच ठाव ॥
देहासकट माझा प्रपंच जाण । हा रामा तुला अर्पण ।
ऐसें वाटत जाणें चित्तीं । कृपा करील रघुपति ॥
सर्व ठिकाणीं पाहावें अधिष्ठान । तेणें मिळेल मनास समाधान ॥

२०२. रामापायीं ठेवा मन । नाम घ्यावें रात्रंदिन॥

( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 19, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १९ जुलै २०१४

१९ जुलै

साधनाची चार अंगे. 

 



मी जेव्हा भजन करीत असे, त्या वेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कुणीच दिसत नसे. तसे तुम्हाला व्हावे अशी माझी इच्छा आहे, आणि तसे तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच हे मी तुम्हाला सांगतो आहे. प्रपंचात वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत ते हुडकून काढावे आणि ते घालविण्याचा प्रयत्‍न करावा. माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत. प्रत्येकजण स्वतःच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून, दुसर्‍याच्या अवगुणांकडे किंवा दोषाकडे पाहतो. त्याला स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, पण दुसर्‍याच्या डोळ्यातले कुसळसुद्धा मुसळापेक्षा जास्त मोठे दिसते, हेच चुकते. आपण दुसर्‍याचे दोष सांगू नयेत, आणि परनिंदा करू नये. रोज निजण्याच्या वेळेस, आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केले आणे दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालवला याचा पाढा वाचावा, म्हणजे चित्तशुद्धी होत जाईल. रोज असे तुम्ही करीत जा, म्हणजे तीन महिन्यात तुमचे चित्त शुद्ध होईल. चित्तशुद्ध होण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग. सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत ? आपण पाहू गेलो तर संत आपल्याला ओळखता येतील का ? संत आपल्यासारखेच देहधारी असतात का ? हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणे कठीण आहे. अशा वेळी दासबोध हाच संत होईल. समर्थांनी सांगून ठेवले आहे की, जो विश्वासाने हा ग्रंथ वाचील त्याला माझा संग घडेल.
आपण संतांना देहात पाहू नये, तर ते जे साधन सांगतात, तेच ते होत असे समजावे. त्यांनी चार गोष्टी करायला सांगितल्या आहेत : एक, निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुणोपासना करावी. त्यानेच निर्गुणरहस्य कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता. अभिमानाने परमात्मा दुरावतो. सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो. तिसरी गोष्ट अन्नदान, कलियुगात यथाशक्ति अन्नदान करीत जावे. त्याचे महत्त्व फार आहे. चौथी गोष्ट म्हणजे भगवन्नामस्मरण अखंड ठेवणे. परमात्मप्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे. संत भेटल्यावर, काही करायचे उरले आहे असे आपल्याला वाटताच कामा नये. ज्यांना ते वाटते, त्यांना गुरू भेटूनही भेट न झाल्यासारखेच आहे. आज एक यात्रा केली, उद्या दुसरी करायची राहिली, अशी इच्छा का असावी ? गुरू एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरले नाही असे ज्याला वाटते, त्यानेच गुरू भेटल्याचे सार्थक केले असे होते. गुरुआज्ञेपरते दुसरे त्याला साधनच नसते. तोच परमार्थ, आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते. आणखी काही करायचे आहे असे त्याच्या ध्यानीमनीही येत नाही.

२०१. अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा, आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 18, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १८ जुलै २०१४

१८ जुलै

साक्षित्वाने राहाणार्‍याला दुःखाची बाधा नाही. 

 


देहबुद्धी आहे तोवर, म्हणजे 'मी देही आहे' ही भावना आहे तोपर्यंत, काळजी राहणारच. काळजी मनातून असते. जोवर संशय फिटत नाही, परमेश्वराचा आधार वाटत नाही, तोवर काळजीही मनाला सोडीत नाही.
कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच आहे. पैसा किती मिळेल हे त्यावरून सांगता येईल, भगवंताकडे किती कल आहे हे सांगता येईल, पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येणार नाही. मनुष्यजन्म येऊनही भगवंताची प्राप्ती नाही झाली, तर जिवाचे फार नुकसान आहे. भगवंताच्या प्राप्तीची मनापासून तळमळ लागायला पाहिजे. एकदा का अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो, आणि कोणी संत भेटला की निवांत होतो. संत आपल्यावर येणारी संकटे नाहीशी करीत नाहीत, तर त्या संकटांची भिती नाहीशी करतात. संकटापेक्षा संकटाची भितीच आपल्याला फार घाबरवून सोडते. 'आपल्याला हे कळले ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या,' असा संतांचा एकच हेतू असतो. संत विषयावर मालकी गाजवितात. जगाला जिंकणे एक वेळ सोपे, पण स्वतःला जिंकणे कठीण आहे. संत स्वतःला जिंकून जगात वावरत असतात. संत साक्षित्वाने जगात राहतात, आणि साक्षित्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा होत नाही. संतांच्या संगतीत राहून, त्यांच्या आज्ञेत राहून, आपण आपल्या मनातले सर्व संशय नाहीसे करावेत. वास्तविक, संतांच्या आज्ञेचे एकनिष्ठपणाने जो पालन करतो, त्याचे संशय आपोआप दूर होतात. जोवर संशय आहे तोवर असमाधान आहे. समाधान हे आपले आपल्यालाच घ्यायचे असते. म्हणून ज्याला समाधानी राहायचे आहे, त्याने फार धडपड करू नये.जशी स्थिती येईल त्या स्थितीत समाधानात राहावे.
कचेरीचे विचार आपल्याबरोबर घरी आणू नयेत; ते तिथेच ठेवावेत. घरातले वातावरण शुद्ध आणि निःसंशयाचे असावे. भोळेपण एकप्रकारे चांगले; ती भाग्याची गोष्ट आहे. जो योगभ्रष्ट असतो त्याच्या अंगी भोळेपण असते; जसे कल्याणस्वामींच्या अंगी होते. झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच आनंद आहे; पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता, भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे. म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते. त्या वेळी शरीरसुद्धा बरे राहायला, आनंद हे फार मोठे औषध आहे. हसावे, खेळावे, लहान मुलांत मिसळावे, थट्टा-विनोद करावा; काहीही करावे पण आनंदात राहावे. ज्याचा आनंद कायम टिकला, त्याच्याच जन्माचे सार्थक झाले.

२००. समाधान ही परमेश्वराची देणगी आहे. ती मिळविण्याचा उपाय म्हणजे भगवंताचे स्मरण होय.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 17, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १७ जुलै २०१४

१७ जुलै

गुरूने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे. 

 

 

एकदा एक बाई बाळंतीण झाली, आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले. पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली, तेव्हा मुलाला ही माझी आई, आणि त्या बाईला हा माझा मुलगा, हे ओळखता आले नाही. तशासारखे आपले झाले आहे. आपण इथे कशाकरिता आलो हेच विसरलो आहोत. खरे म्हणजे, आपण काही एका निश्चित कार्याकरिता जन्मलो आहोत; ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय. परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरतो, विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहिलो. पण विषयच जरे खोटे, तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार ? आणि जे सुख मिळते, तेही अंती खोटेच ठरते ! म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ति करता येते. जिथे विषयविरक्ति झाली तिथेच भक्तिला सुरुवात होते.
गुरु तरी काय करतो. तर विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवितो. म्हणून, तो जे सांगेल तसे वागणे यातच आपले हित असते. गुरूने सांगितल्या शिवाय जे जे साधन कराल, ते ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले, तरी ते व्यर्थ जातील. कारण, गुरू व्यतिरिक्त जी खटपट, ती फारशी उपयोगी नसते. गुरूने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते, म्हणजे गुरूला गौणपणा दिल्यासारखे झाले ! वास्तविक पाहता गुरू हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे, ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो, आणि गुरू सांगेल तेच साधन खरे वाटू लागते. गुरू तरी नाम हेच सत्य असे सांगतो, आणि नामस्मरणाला आणखी दुसर्‍या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो. नाम हेच साधन आणि तेच साध्य होय, हे अक्षरशः खरे आहे. गुरूने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते, त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे. जो असा अनन्यतेने वागतो, त्यानेच गुरुआज्ञा प्रमाण मानली असे होते, आणि त्यामुळेच त्याला खरे सुख होते. कुठेतरी आपले प्रेम असावे, कुणाला तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा. आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळविण्यासाठी धडपड करतो, तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही.

१९९. सद्‍गुरुआज्ञाप्रमाण । हेच साधनांतील साधन जाण ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 16, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १६ जुलै २०१४

१६ जुलै

गुरुआज्ञापालनाशिवाय दुसरे कर्तव्यच उरले नाही. 

 



परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. आपल्या गुरूंनी जो राजमार्ग दाखविला त्यानेच जावे. मध्येच दुसरा मार्ग घेतला, तर पल्ला कधीच गाठायचा नाही. एका वैद्याचे औषध सोडून दुसऱ्याचे घेतले, तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली. तरीही मी माझ्या माणसाला सोडीत नाही ही गोष्ट निराळी. ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटले, त्या दिवशीच सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरूवर सोपवून तुम्ही मोकळे झाला, गुरुआज्ञेशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्यच उरले नाही. पण तुम्हाला असे वाटते कुठे ?
विष हे आमटीत घातले काय किंवा भाजीत घातले काय, दोन्ही त्याज्यच; त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय किंवा पारमार्थिक साधनात असला काय, दोन्ही त्याज्यच. मी कोण हे आधी जाणले पाहिजे; परमात्मा कोण ते मग आपोआपच कळते. दोघांचेही स्वरूप एकच आहे, म्हणजे दोघेही एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे, आणि तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे. म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे. कोणतीही गोष्ट आपण 'जाणतो' म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तदाकार व्हावे लागते; त्याखेरीज जाणणेच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपणही नको का परमात्मस्वरूप व्हायला ? यालाच 'साधू होऊन साधूस ओळखणे' किंवा 'शिवो भूत्वा शिवं यजेत्' असे म्हणतात. आता, कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश असे संस्कार पाहिजेत. ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्याघातरूपाने उद्‍भूत होतात; नंतर त्या वस्तूचे ज्ञान होते. म्हणून परमात्मरूपाला विरोधी असे संस्कार घालवून, आपण आपले अंतःकरण पोषक संस्कारांनी युक्त केले पाहिजे. जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो, तर आपल्याला जगात पाप दिसणेच शक्य नाही.
देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल, पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वच्या सर्व मिळतो. म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे. आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे; त्यातच जीवनातले सर्व सुख सामावले आहे. याहून दुसरे काय मिळवायचे ? मी सुखाचा शोध केला, आणि ते मला सापडले. म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन. तो मार्ग म्हणजे, भगवंताचे अनुसंधान होय. मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्ही समाधानी रहा. जे मी सुरुवातीला संगितले तेच मी शेवटी सांगतो : तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. याहून दुसरे काय मिळवायचे ?

१९८. आपल्याकडून होईल तेवढे नाम घ्यावे. न होईल त्याचा राम कैवारी आहे.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 15, 2014

श्री सिद्धि विनायक नामावलि

प्रारंभी विनती करू गणपति , विद्या दयासागरा।
अज्ञानत्व हरुनि बुद्धि मति दे , आराध्य मोरेश्वरा।।
चिंता क्लेश दरिद्र दु:ख अवघे , देशांतरा पाठवी।
हेरंबा गणनायका गजमुखा , भक्ता बहु तोषवी।।

||श्री सिद्धि विनायक नामावलि ||

ॐ विनायकाय नमः | ॐ विघ्नराजाय नमः |


ॐ गौरीपुत्राय नमः | ॐ गणेश्वराय नमः |


ॐ स्कन्दाग्रजाय नमः | ॐ अव्ययाय नमः |


ॐ पूताय नमः | ॐ दक्षाध्यक्ष्याय नमः |


ॐ द्विजप्रियाय नमः | ॐ अग्निगर्भच्छिदे नमः |


ॐ इंद्रश्रीप्रदाय नमः | ॐ वाणीबलप्रदाय नमः |


ॐ सर्वसिद्धिप्रदायकाय नमः | ॐ शर्वतनयाय नमः |


ॐ गौरीतनूजाय नमः | ॐ शर्वरीप्रियाय नमः |


ॐ सर्वात्मकाय नमः | ॐ सृष्टिकर्त्रे नमः |


ॐ देवानीकार्चिताय नमः | ॐ शिवाय नमः |


ॐ शुद्धाय नमः | ॐ बुद्धिप्रियाय नमः |


ॐ शांताय नमः | ॐ ब्रह्मचारिणे नमः |


ॐ गजाननाय नमः | ॐ द्वैमातुराय नमः |


ॐ मुनिस्तुत्याय नमः | ॐ भक्त विघ्न विनाशनाय नमः |


ॐ एकदंताय नमः | ॐ चतुर्बाहवे नमः |


ॐ शक्तिसंयुताय नमः | ॐ चतुराय नमः |


ॐ लंबोदराय नमः | ॐ शूर्पकर्णाय नमः |


ॐ हेरंबाय नमः | ॐ ब्रह्मवित्तमाय नमः |


ॐ कालाय नमः | ॐ ग्रहपतये नमः |


ॐ कामिने नमः |


ॐ सोमसूर्याग्निलोचनाय नमः | ॐ पाशांकुशधराय नमः |


ॐ छन्दाय नमः |ॐ गुणातीताय नमः |


ॐ निरंजनाय नमः |ॐ अकल्मषाय नमः |


ॐ स्वयंसिद्धार्चितपदाय नमः |ॐ बीजापूरकराय नमः |


ॐ अव्यक्ताय नमः |ॐ गदिने नमः |


ॐ वरदाय नमः | ॐ शाश्वताय नमः |


ॐ कृतिने नमः | ॐ विद्वत्प्रियाय नमः |


ॐ वीतभयाय नमः | ॐ चक्रिणे नमः |


ॐ इक्षुचापधृते नमः | ॐ अब्जोत्पलकराय नमः |


ॐ श्रीधाय नमः | ॐ श्रीहेतवे नमः |


ॐ स्तुतिहर्षताय नमः | ॐ कलाद्भृते नमः |


ॐ जटिने नमः | ॐ चन्द्रचूडाय नमः |


ॐ अमरेश्वराय नमः | ॐ नागयज्ञोपवीतिने नमः |


ॐ श्रीकांताय नमः | ॐ रामार्चितपदाय नमः |


ॐ वृतिने नमः | ॐ स्थूलकांताय नमः |


ॐ त्रयीकर्त्रे नमः | ॐ संघोषप्रियाय नमः |


ॐ पुरुषोत्तमाय नमः | ॐ स्थूलतुण्डाय नमः |


ॐ अग्रजन्याय नमः | ॐ ग्रामण्ये नमः |


ॐ गणपाय नमः | ॐ स्थिराय नमः |


ॐ वृद्धिदाय नमः | ॐ सुभगाय नमः |


ॐ शूराय नमः | ॐ वागीशाय नमः |


ॐ सिद्धिदाय नमः | ॐ दूर्वाबिल्वप्रियाय नमः |


ॐ कान्ताय नमः | ॐ पापहारिणे नमः |


ॐ कृतागमाय नमः | ॐ समाहिताय नमः |


ॐ वक्रतुण्डाय नमः | ॐ श्रीप्रदाय नमः |


ॐ सौम्याय नमः | ॐ भक्ताकांक्षितदाय नमः |


ॐ अच्युताय नमः | ॐ केवलाय नमः |


ॐ सिद्धाय नमः | ॐ सच्चिदानंदविग्रहाय नमः |


ॐ ज्ञानिने नमः | ॐ मायायुक्ताय नमः |


ॐ दन्ताय नमः | ॐ ब्रह्मिष्ठाय नमः |


ॐ भयावर्चिताय नमः | ॐ प्रमत्तदैत्यभयदाय नमः |


ॐ व्यक्तमूर्तये नमः | ॐ अमूर्तये नमः |


ॐ पार्वतीशंकरोत्संगखेलनोत्सव
लालनाय नमः |

ॐ समस्तजगदाधाराय नमः | ॐ वरमूषकवाहनाय नमः |


ॐ हृष्टस्तुताय नमः | ॐ प्रसन्नात्मने नमः |


ॐ सर्वसिद्धिप्रदायकाय नमः |


||इति श्रीसिद्धिविनायकाष्टोत्तरश
तनामावलिः ||

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १५ जुलै २०१४

१५ जुलै

तळमळ लागल्यावर गुरुभेट निश्चित ! 

 




काय करावे हे मनुष्याला कळते, पण त्याचे मन त्याला आवरत नाही. विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्यामध्ये रंगून जाते, आणि त्याचे सुखदुःख निस्तरताना मात्र आपली भ्रमिष्टासारखी चित्तवृत्ती होते. आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला तीन गोष्टी आवश्यक आहेत : एक सद्विचार, दुसरी नामस्मरण, आणि तिसरी सत्संगती. संत ओळखणे फार कठीण आहे. आपण त्याच्यासारखे व्हावे तेव्हांच तो कळायचा. त्यापेक्षा सद्विचार बाळगणे सोपे. भगवंताचा विचार तोच सुविचार होय. भगवंताच्या कथा ऐकाव्यात, त्याच्या लीला वर्णन कराव्यात, त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत, पण याहीपेक्षा, आपल्याजवळ राहणारे असे त्याचे नाम घ्यावे. तुम्ही नेहमी नाम घेत गेलात, तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरूर न पडता, संतच - अगदी हिमालयातले संत, तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील. अहो, खडीसाखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको ! तुम्ही म्हणाल, 'आम्हाला ते करता येत नाही.' पण आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो, आणि तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला, तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीने ठेवतोच की नाही ? त्याला एखादी विद्या आली नाही, तर दुसरी कोणती येईल ती शिकवतोच की नाही ? आणि त्याने आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावे म्हणून आपल्याला तळमळ लागतेच की नाही ? तशी परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का ? तशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरू प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल. तो सारखा तुमच्याकरिता वाट पाहात असतो.
आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत, म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करील; पण गुरू हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे. त्याला देह नसला, तरी तो नाही असे समजू नका. तुम्ही दुश्चित्त झाला म्हणजे तो दुश्चित्त होतो. म्हणून तुम्ही केव्हांही दुश्चित्त होऊ नका. देहाचे भोग येतील-जातील, पण तुम्ही सदा आनंदात राहा. तुम्हाला आता काही करणे उरले आहे असे मानू नका. गुरुभेट झाली म्हणजे तुम्ही तुम्हीपणाने उरतच नाही. मात्र, गुरूला अनन्य शरण जा. एक शिष्य मला भेटला, तेव्हा तो आनंदाने नाचू लागला. मी त्याला विचारले, "तुला एवढा कसला आनंद झाला आहे ?" त्यावर तो म्हणाला, "मला आता आनंदाशिवाय दुसरे काही उरलेच नाही, कारण मला आज गुरू भेटले !" जो असा झाला, त्यालाच खरी गुरूची भेट झाली. तरी, तुम्ही गुरूला अनन्य शरण जा, म्हणजे तुम्ही आणखी काही करण्याची जरूरी नाही.

१९७. भगवंताची तळमळ हा साधकपणाचा प्राण आहे.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 14, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १४ जुलै २०१४

१४ जुलै

गुरू सांगेल तेच साधन. 

 


परमार्थ म्हणजे काय, हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचे जर काही मर्म असेल तर, आसक्ति सोडून प्रपंच करणे हे होय. ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले, म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदुःख बाधत नाही. हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे. गुरु कुणाला करावे ? जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद कुठेही एकच असते. गुरूला कोठे आडनाव असते का ? गोंदवलेकर गोंदवल्यास राहात असतील, दुसरा कोणी आणखी कोणत्या गावी राहात असेल. म्हणून लौकिक आडनाव जरी निराळे झाले तरी गुरुपद हे सर्वकाळी अबाधित असेच असते. तुमचे जिथे समाधान झाले त्याला गुरू समजा, आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा; त्याच्या देहाकडे पाहू नका. तो लुळापांगळा आहे की काय, हे पाहू नका. तो देहाने कसाही असला, तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा. त्याची लाज, जिथून गुरुपद निर्माण झाले, त्याला असते. गुरुआज्ञा हाच परमार्थ; तो सांगेल तेच साधन. तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करू लागलात, तर त्यात तुम्हाला यश येणार नाही. अभिमान धरून काही करू लागलात, तर ते साधणार नाही. म्हणून अभिमान सोडून गुरूकडे जा. गुरू सांगेल तेच साधन हे पक्के लक्षात ठेवा. खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वतःकरता आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल, तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकता नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे, हा तर मोठा घात आहे. एकाने कोळश्याचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेढ्याचे दुकान घातले; दुकान कशाचेही असले तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्त्व आहे. तसे, प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून, मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्त्व आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला, म्हणजे परमार्थ लवकर साधतो. खरोखर परमार्थ इतका सोपा आहे, की तो सहज रीतीने करता येतो. पण गंमत अशी, की तो सोपा आहे म्हणून कुणीच करीत नाही. प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही, तो परमार्थासाठीच आहे, हे पक्के लक्षात ठेवावे. साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून, मनाने मात्र ईश्वरोपासना करावी.

१९६. हृदयी ठेवा राम । मुखी सदा त्याचे नाम ।
हातात असावे प्रपंचाचे काम । हेच खरे परमार्थाचे मर्म ॥


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 13, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १३ जुलै २०१४

१३ जुलै

देव आणि नाम भिन्न नाहीत. 

 



आपल्या अनुभवाला येईल तेच खरे जरी असले, तरी आपण त्या प्रमाणे वागतो का ? पुष्कळ गोष्टी वाईट आहेत असे आपल्या अनुभवाला येते, परंतु त्या करण्याचे आपण टाळतो का ? हाच तर आपला दोष आहे. थोर पुरुषांचे मात्र तसे नसते. त्यांना जे अनुभवाला आले ते त्यांनी आचरणात आणून दाखविले, आणि म्हणूनच ते संत पदवीला गेले. खरोखर संतांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत ! जगातले सुख हे खरे सुख नव्हे, दुःखानेच सुखाचा घेतलेला केवळ वेष आहे तो, असे जेव्हां त्यांच्या अनुभवास आले, तेव्हा त्यांनी त्या सुखाकडे पाठ फिरविली आणि खर्‍या सुखाच्या शोधाला ते लागले. परमेश्वर प्राप्तीतच खरे सुख आहे, असे त्यांना आढळून आले. त्या प्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचे नाम. हेच, वेदकाळापासून तो आतापर्यंत सर्व साधुसंतांनी अनुभव घेऊन सांगितले आहे. सद्‍गुरूकडून मिळालेले ईश्वराचे नाम प्रेमाने, भक्तिने आणि एकाग्रतेने घेतले, तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो, असा सर्व संतांनी आपला अनुभव कंठरवाने सांगितला आहे. आपण तसे नाम घेतो का ? नामाकरिता नाम आपण घेतो का ? का मनात काही इच्छा, वासना ठेवून घेतो ? कोणतीही वृत्ती मनात उठू न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही. देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच; नाम म्हणजे देव आणि देव म्हणजेच नाम. एकदा मुखात आले म्हणजे देव हातात आलाच. मुले पतंग उडवितात, एखादा पतंग आकाशात इतका उंच जातो की तो दिसेनासा होतो. तरी तो पतंग उडविणारा म्हणतो, 'माझ्या हातात आहे पतंग.' कारण पतंगाचा दोरा त्याच्या हातात असतो. जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला.
आपल्या नामस्मरणाला एक गोष्टीची अत्यंत जरूरी आहे. आपल्या जीवनात परमेश्वरावाचून नडते असे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही, तो पर्यंत आपले नामस्मरण खरे नव्हे. परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार, त्याशिवाय आपण जगूच शकत नाही, अशी वृत्ती बाणल्यावर होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण. आपली स्थिती तर याच्या अगदी उलट ! परमेश्वरावाचून आपले कुठेच अडत नाही अशा वृत्तीने आपण नामस्मरण करतो. मग परमेश्वर तरी कसा येईल ? परमेश्वराचे नाम हेच आपल्या जीवनाचे सर्वस्व समजून नाम घेतले, तर जीवनाचे सार्थक झाल्यावाचून राहणार नाही. नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी. अशा नामालाच 'निष्ठेचे नाम' असे म्हणतात.

१९५. भक्त, भगवंत व नाम ही तिन्ही एकरूपच आहेत. जेथे नाम आहे तेथे भक्त आहे, व तेथेच भगवंत आहे.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 12, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १२ जुलै २०१४

१२ जुलै

सद्‍गुरू सांगेल त्याप्रमाणे वागावे. 

 




शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. भक्ति ही अशी निरपेक्ष असावी. देवालये बांधली, देवांचे पूजन-अर्चन केले, म्हणजे भक्ति निरपेक्ष केली असे नव्हे. देवाचे करीत असताना, जप करीत असताना, त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे. तुम्ही सर्व लोक भजन पूजन करता, परंतु हे सर्व कसे होऊन बसले आहे ? जसे भांडे कुठे ठेवावे, पळीताम्हन कुठे ठेवावे, वगैरे जे शास्त्रात लिहिलेले असते ते सर्व, माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करीत असतो. कारण त्यामुळे त्याला कृती करणे सोपे जाते. तसे आपण देवाचे करतो. परंतु ते केवळ केले पाहिजे म्हणून, ती आपल्या घरातली एक प्रथा आहे म्हणून; आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे. एक मुलगा होता, त्याला त्याच्या वडिलांची पत्रे येत असत. तो पत्र वाची आणि देव्हार्‍यात ठेवून देई. दुसरे पत्र आले की ते वाची, आणि मागले पत्र काढून टाकी. एकदा वडिलांनी पंचवीस रुपये मागितले. मुलाने ते पत्र वाचले आणि नेहमीप्रमाणे पूजेत नेऊन ठेवले. नंतर काही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला, "तुला तुझा वडिलांचे पत्र मिळाले का ?" त्यावर तो म्हणाला "हो." त्यावर त्या गृहस्थाने विचारले, "अरे, मग पैसे का पाठविले नाहीस वडिलांना ?" त्यावर तो म्हणाला, "तेवढेच राहिले बघा !" तसे आपले होते. आपण कृती करतो, पूज्यभाव वगैरे ठेवतो, परंतु सद्‍गुरूने सांगितलेले तेवढे करीत नाही. त्यामुळेच आपली सत्कर्मे ही आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता, उलट अहंपणा वाढवायलाच मदत करतात. म्हणून सद्‍गुरूने सांगितलेले साधनच आपण प्रामाणिकपणे, संशयरहित होऊन करावे. त्याकरिता व्यवहार सोडण्याची जरूर नाही.
आपण व्यवहाराला सोडू नये, पण व्यवहारात गुंतू नये. युद्धात सारथ्याच्या हाती सर्व काही असते. तो लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असतो, आणि योग्य वाटेल तेथे रथ नेऊन उभा करतो. युद्धकर्त्याचे काम फक्त बाण अचूक दिशेला किंवा व्यक्तीवर सोडणे. त्याप्रमाणे, आपले सर्व जीवन एकदा सद्‍गुरूच्या ताब्यात दिल्यावर, तो सांगेल त्याप्रमाणे वागणे हेच आपले कर्तव्य ठरते.
ज्याने जगाची आस टाकली त्याचे तेज पडणारच हे लक्षात ठेवावे. एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच येतात, त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच. परमार्थात भगवंताची गरज असते. ही भगवंताची गरज, सद्‍गुरू त्याचे 'नाम' देऊन भागवितात. आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणे आवश्यक आहे. अशा रीतीने नामात अखंड राहिले तर परमार्थ साधतो, भगवंताची गरज भासते, प्रपंचात समाधान मिळते, आणि जन्माला आल्याचे सार्थक होते.

१९४. गुरूवर विश्वास ठेवून चिकाटीने व आवडीने नाम घ्यावे.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 11, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ११ जुलै २०१४


११ जुलै
सत्पुरुष व त्यांचा अनुग्रह. 




सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाचीच सत्ता असते. सरकारच्या हातात सर्व सत्ता असते, आणि राज्ययंत्र सुरळीत चालण्याकरिता एकेका खात्याकडे एकेक कामगिरी सोपविलेली असते. कायद्याला धरून जोपर्यंत ते खाते आपले काम करीत असते, तोपर्यंत सरकार त्यात ढवळाढवळ करीत नाही. फक्त क्वचित् प्रसंगी आणि विशेष कारणामुळेच, हस्तक्षेप करून सरकार आपल्या सत्तेचा उपयोग करते, आणि इच्छेप्रमाणे गोष्टी घडवून आणते. तोच नियम इथेही लागू आहे. प्रापंचिक बाबतीत 'प्रारब्ध' हे एक खाते आहे, त्याचा संबंध देहापुरताच असतो. प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्यावाईट गोष्टी भोगाव्या लागतात. सत्पुरुष होता होईल त्यांत ढवळाढवळ करीत नाही. फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरिताच जर जरूर असेल, तर सत्पुरुष त्यात ढवळाढवळ करील. पण परमार्थाच्या बाबतीत त्याची सर्व सत्ता असते. आपण मात्र त्याने सांगितलेल्या साधनात राहून, त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा न येईल असे वागणे जरूर असते. हा अडथळा अनेक प्रकारचा असतो. एक म्हणजे, त्याने सांगितलेल्या साधनाबद्दल शंका घेणे; दुसरे, दुसर्‍याला अमुक एक दिवसात साधले, मला अजून का साधत नाही, असा विचार मनात येणे; आणि तिसरे, सांगितलेल्या साधनापेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्‍न करणे. थोडक्यात म्हणजे, एकदा संताच्या पायावर डोके ठेवल्यावर, आपला प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही त्याच्याकडे सोपवून, प्रपंचात घडणार्‍या गोष्टी त्याच्याच इच्छेने घडताहेत अशी भावना ठेवून, आपले कर्तव्य करीत, त्याने सांगितलेल्या साधनात एकनिष्ठेने राहणे, हाच खरा मार्ग आहे.
संताच्या देहाकडे पाहण्याचे कारण नाही; त्याचा देह आमचे काम करीतच नाही. तो परमात्मस्वरूप आहे ही जी आपली भावना, ती आपले काम करते. संत अत्यंत दयाळू असतात. सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो. म्हणून, सत्पुरुष हा देहाने या जगात राहतो असे दिसले, तरी अंतर्यामी तो भगवंतापाशीच असतो. म्हणून आपण सत्पुरुषाकडे जात असताना या जगातल्या वस्तूविषयी वासना धरून गेलो, तर ते योग्य नव्हे. सत्पुरुषाला त्याच्या लक्षणांवरून ओळखता येणार नाही. पुस्तकामध्ये दिलेली जी लक्षणे असतात, त्यांच्या पलीकडे संत असतो. त्याला ओळखायला आपल्या अंगी थोडे तरी भगवंताचे प्रेम आवश्यक आहे. भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे. जे ज्याला लागेल तो भाग्याचा खरा !

१९३. भगवंताच्या दास्यात जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीत नाही.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 10, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १० जुलै २०१४


१० जुलै

सद्‍गुरूस जावे शरण । संशयविरहित वृत्तीने घ्यावे नाम || 

 




राम ठेवील जी स्थिति । त्यात समाधान राखे ज्याची वृत्ति । त्या नाव खरी विरक्ति ॥
रामा‍आड जें जें कांही । तेथून दूर ठेवी वृत्ति । या नांव विवेकाची प्राप्ति ॥
वृत्ति न होऊं द्यावी विषयीं फार । चित्तीं चिंतावा रघुवीर ॥
जेव्हां वृत्ति होते विषयाकार । तेथें न राहे सारासार विचार ॥
वृत्ति राही अभिमानाला धरून । तेथें न कधीं अनुसंधान ॥
जें जें पाहावे तें तें रामच होईजे । ऐसी ठेवावी वृत्ति । रघुनंदन आणावा चित्तीं ॥
काळोख अत्यंत मातला । घालवावयास उपाय दुजा न सुचला ।
होतां सूर्याचे आगमन । काळोख जाईल स्वतः आपण ॥
तैसें 'राम कर्ता' हा भाव ठेवता चित्तीं । उपाधीरहित बनते वृत्ति ॥
वृत्ति असावी शुद्ध, संतसज्जनांना प्रमाण । त्याने संतुष्ट होईल नारायण ॥
जग स्वार्थमूलक खरें । हे आपले वृत्तीवरून ओळखणें बरे ॥
वृत्ति अलग करावी सर्वांहून । आलेली ऊर्मि करावी सहन । सर्व कर्ता जाणून रघुनंदन ॥
निःसंशय करावी वृत्ति आपण । सद्‍गुरूस जावें शरण ।
संशयविरहित वृत्तिने घ्यावें नाम । जें सुखाचे आहे धाम ॥
शुद्ध ज्याचे अंतःकरण । शुद्ध ज्याचे आचरण ।
परमात्म्याबद्दल शुद्ध ज्याची वृत्ति । त्याच्याहून दूर न राहे रघुपति ॥
सर्व कांही करावें आपण । पण वृत्तीनें त्यांत न गुंतावे आपण ॥
नामांत ठेवावें प्रेम । तेथें प्रकटेल पुरुषोत्तम ॥
देहाचें चलन ज्याचे सत्तेनें । त्या रघुपतीचें स्मरण असावे आनंदाने ॥
वासना नामापायीं जडली । धन्य धन्य सज्जनीं मानिली ॥
पाणी माती एक झाले । वेगळें नाही करतां आले ।
निवळी घालावी पाण्यांत । पाणी स्वच्छ होते जाण ॥
तैसा विषयांत राहून जगती । नामाची ठेवावी संगती ॥
विषयाचें विष शोषून घेई । ऐसी आहे नामाची प्रचीति ॥
शक्य तितकें राहावें नामांत । याहून दुसरे न आणावे मनांत ॥
परा पश्यंती वैखरी वाणी । याच्याही पलीकडे नाम ठेवा स्मरणीं ॥
नामापरती उठेल वृत्ति । तेथें सावध असावें तुम्ही ॥
जो नामांत राहिला दंग । त्याने लुटला रामरंग ॥
रामनाम बोलावें वाचा । काळ न येऊं द्यावा काळजीचा ॥
नामाविण राम । जैसें पाकळ्याविण फूल जाण ॥
नाम ज्यानें घेतले सर्वकाळ । जिंकला त्यानें एक अंतराळ ॥
भगवंत ठेवील त्यांत हित मानावें । अखंड नामस्मरण घ्यावें ॥
नामांत स्वतःचा विसर । हेंच देईल रघुवीर ॥
भगवंताची प्राप्ति, संतांची संगती, नामाचे प्रेम, । हे भगवत्कृपेवांचून नाही साधत जाण ॥
सतत करावे नामस्मरण । सर्व इच्छा राम करील पूर्ण ॥

१९२. त्राता राम जाणून चित्ती । निर्भय करावी आपली वृत्ति ॥

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 9, 2014

आषाढी एकादशीच्या शुभेच्छा


श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ९ जुलै २०१४

९ जुलै

नाम घेण्याचा निश्चय करावा. 

 

 




जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते. दृश्य हे स्वतंत्र नसते. भगवंताच्या अधीन असते. म्हणून, जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावे. आपला देह दृश्यच आहे, आणि त्याला चालविणारा भगवंत देहात आहे; त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्‍न केला पाहिजे. हे अनुसंधान राहणे भगवंताच्या नामाने साधते, म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा. आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. ही युक्ति ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख होत नाही. व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधी विसरू नये. आपल्या प्रयत्‍नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून, जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे. आपण प्रपंची लोक आहोत, म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्‍न केल्यावाचून कधी राहू नये. पण प्रपंच हेच आपले सर्वस्व आहे हे न समजता, त्यामध्ये भगवंताला विसरू नये. परमार्थाला सदाचरणाची फार जरूरी आहे. उगीच भलत्याच्या सांगण्याला भुलू नये, आणि अनीति-अधर्माच्या मार्गाला जाऊ नये. संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून, मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. असे जो वागेल त्याचे कल्याण राम खात्रीने करील हे मी सर्वांना वचन देतो. बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे असतो. खरोखर, हे सर्व हिंग-जिऱ्याचेच गिऱ्हाईक आहेत; देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कोणी भेटत नाही.
जो बरा होणार नाही अशा रोग्याला बरा करतो तो डॉक्टर खरा. अगदी विषयातल्या माणसांनासुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा. त्याच्याजवळ जाऊन नुसते 'मी शरण आलो आहे' असे म्हटले तरी पुरे होते. हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात तसा फरक नाही; पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत, अलिकडे ते जास्त संकुचित झाले आहेत. पूर्वी खेडेगावामध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावे अशी बुद्धी असायची, पण आता काळ पालटला आहे. तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान वाटते की, मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा.

१९१. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल.
दुःखाची जाणीव नसल्यावर, दुःख असले म्हणून बिघडले कुठे ?

 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

July 8, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ८ जुलै २०१४

ज्या गोष्टीचे अत्यंत प्रेम आहे तिचे अनुसंधान मनुष्याला आपोआपच राहते. ते इतके टिकते की ते अनुसंधान मला आहे ही जाणीवही राहात नाही. 'अनुसंधान ठेवतो' असे म्हणताना 'मी' त्याच्याहून वेगळा असतो; आणि प्रेमाचे जे अनुसंधान असते तिथे मी एकजीवच होतो. आपण कितीही गडबडित असलो तरी वाटेने जात असताना आपल्या नावाने कुणी हाक मारली की आपण वळून पाहतो. हे आपले अनुसंधान आहे; कारण या देहावर आपले इतके प्रेम आहे की मी त्याच्याहून वेगळा नाहीच ! असे देहाचे अनुसंधान कसे ठेवावे हे सांगावे लागत नाही. 'देहाचा विसर पाडा' म्हणून सांगावे लागते, 'देहाचे स्मरण ठेवा' म्हणून नाही सांगावे लागत !
आम्हाला भगवंताचे अनुसंधान ठेवायचे आहे. हा एक प्रकारचा अभ्यास आहे. भगवंताचे प्रेम वाढले तर अनुसंधान टिकेल. परिक्षा पास होण्याकरिता जसा अभ्यास करावा लागतो तसा भगवंताचे प्रेम वाढविण्याकरिता अभ्यास करणे जरूर आहे. यासाठी, जे जे काही मी करीन ते ते मी भगवंताच्या साक्षित्वाने करतो आहे ही जाणीव ठेवून करायला पाहिजे. आज आम्हांला नाना तऱ्हेचे उद्योग करावे लागतात. प्रपंच म्हटला म्हणजे किती गोष्टी कराव्या लागतात ! त्या सगळ्या करीत असताना भगवंताचे स्मरण ठेवून करणे, हे आपले खरे कर्तव्य आहे.
सर्कशीमध्ये आपण पाहतो ना ! वाघ, सिंह, घोडे, हत्ती जे काय प्राणी असतील ते खेळ खेळतात. घोडा कसा सुंदर नाचतो असे आपण म्हणतो ! पण त्या घोड्याचे लक्ष प्रेक्षकांकडे नसते. त्या घोड्याचे, त्या वाघाचे, त्या सिंहाचे लक्ष आतमध्ये चाबूक उगारणारा जो मनुष्य असतो त्याच्याकडे असते ना ? प्रेक्षक काय म्हणतील ते तो प्राणी पाहात नाही. आणि आपण काय करतो ? भगवंत काय म्हणेल हे पाहातच नाही, जग काय म्हणेल ते पाहतो ! हे जर आम्ही सोडले ना, तर भगवंताला काय हवे आहे ते आम्हाला बरोबर कळेल. भगवंताचे स्मरण ठेवून कर्म केल्याने त्याला काय हवे तेच आमच्या हातून घडेल. त्याचे संधान न सोडता कर्म करणे हे अनुसंधानाचे लक्षण आहे. हे कशाने होईल ? अत्यंत प्रेमाने होईलच.
एक बाई नुकतीच बाळंत होऊन सासरी आल्यावर तिने मूल पाळण्यात निजविले, आणि मागच्या परसामध्ये ती भांडी घाशीत होती. ते मूल थोडेसे कुठे रडले, घरात पुष्कळ माणसे होती, कुणाला ऐकू नाही गेले. ती पोरगी मात्र धावत पाळण्यापाशी आली, आणि 'मूल उठलेले दिसते आहे' असे म्हणाली. काम करताना तिचे कान जसे पाळण्याकडे होते, तसे प्रपंच करताना आपले लक्ष मात्र भगवंताकडे असले पाहिजे. याचे नाव अनुसंधान !

१९०. अखंड मुखी रामनाम, आत असावे अनुसंधान, देहाने करावे प्रपंचाचे काम.


 ( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या