२४ जुलै
सद्गुरूला शरण जावे.
प्रत्येकजण पोटाला खायला मिळावे म्हणून खटपट करीत असतो. परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळते का ? नाही. म्हणून, सांगायचे कारण असे की, जर आपण विषयांकरिता इतके झटतो, तर देवाच्या प्राप्तीकरता श्रम करायला नकोत का ? संत सांगतात तो मार्ग चोखाळून पाहावा. एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरू कल्पिला, तो सांगेल तेच साधन मानावे. गुरू देहातच असावा हे मानणे चूक आहे. गुरू हे देहात कधीच नसतात. गुरू प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागले पाहिजे. अशी भावना ठेवून वागले, म्हणजे गुरू कसाही असला तरी तिथे प्रत्यक्ष देवाला येणे भाग पडते. गुरू सांगेल तसे आपण नेहमी साधन करीत राहावे. तसे साधन करीत राहिले म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते. गुरू नामाशिवाय दुसरे काय सांगणार ? त्यातच आपण सदा राहावे. जो खरा साधनात राहतो, त्याला ह्या सर्व गोष्टी आपोआपच साधत असतात. म्हणून आपण गुरूला अनन्यशरण जाऊन, तोच सर्व करतो आहे हे मानून, जे होईल त्यात आनंद मानीत जावा. भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरूला देखील आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. श्रीरामचंद्राची जिज्ञासू अवस्था पाहून वसिष्ठांना फार आनंद वाटला; आणि ते साहजिकच आहे. एकच देव, एकच साधन, आणि एकच गुरू मानला, त्याचप्रमाणे, आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा. मुलगा हसतखेळत असताना बाप त्याला घेतो, पण रडू लागला की खाली ठेवतो; याच्या उलट, मुलगा रडत असला तर आई त्याला घेते. हाच देवामध्ये आणि संतामध्ये फरक आहे.
बर्फामधले पाणी काढले तर काहीच उरत नाही. त्याप्रमाणे, संतांमधले भगवंताचे प्रेम जर काढून टाकले तर त्यांच्यामध्ये मग काहीच उरत नाही. साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती हा होय. आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो. नुसता हेतू काम करीत नसून संगत काम करीत असते. संगत दोन प्रकारची आहे; घातक आणि उत्तम. विषयी माणसाची संगत ही घातक होय, आणि सत्संगत ही उत्तम होय. सत्संगतीमध्ये असताना, आपल्या ठिकाणी दोष आहे असे ज्याला कळेल तो लवकर सुधारेल. आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेले मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, तरच त्याच्याशी खरी संगत केली असे म्हणावे. संताची प्रचीती पाहणे म्हणजे आपले प्रपंचातले काम मनासारखे होणे हे नव्हे. ज्या घटकेला आपले चित्त शुद्ध होते, त्या घटकेला संताची खरी प्रचीती आली असे समजावे.
२०६. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही.
( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )
No comments:
Post a Comment