३० सप्टेंबर
प्रपंचात असावी खबरदारी । मन लावावे रामावरी ॥
सर्वांचे राखावे समाधान । पण रामाकडे लावावे मन ॥
रामाला स्मरून वागावे जगात आपण । तेथे पश्चातापाला नाही कारण ॥
म्हणून कृतीस असावा साक्षी भगवंत । हा जाणावा खरा परमार्थ ॥
व्यवहार करावा व्यवहारज्ञानाने । परमार्थ करावा गुरूआज्ञेने ॥
कलि अत्यंत माजला । गलबला चोहोकडून झाला ।
चित्त ठेवावे रामावर स्थिर । कार्य घडते बरोबर ॥
स्वस्थ बसावे एके ठिकाणी । राम आणत जावा मनी ॥
प्रयत्नांती परमात्मा । ही खूण घालावी चित्ता । व्यवहारी ठेवावी दक्षता ॥
मागील झाले होऊन गेले । पुढील होणार ते होऊ द्यावे भले ।
त्याचा न करावा विचार । आज चित्ती स्मरावा रघुवीर ॥
आंतबट्ट्याचा नाही व्यापार । ज्याने घरी आणला रघुवीर ॥
नुसत्या प्रयत्नाने जग सुखी होते । तर दुःखाचे वारे न भरते ॥
म्हणून परमात्मा आणि प्रयत्न । यांची घालावी सांगड । म्हणजे मनी न वाटे अवघड ॥
जेथे वाटते हित । तेथे गुंतत असते चित्त ।
चित्त गुंतवावे भगवंतापाशी । देह ठेवावा व्यवहाराशी ॥
चित्ती ठेवावी एक मात । कधी न सुटावा भगवंत ॥
राम माझा धनी । तोच माझा रक्षिता जनी ।
हे आणून चित्ती । विषयाची योग्यतेने करावी संगति ॥
देह करावा रामार्पण । मुखी घ्यावे नामस्मरण ॥
संतांची संगति । रामावर प्रीति । तोच होईल धन्य जगती ॥
व्यवहार सांभाळून । करावा परमार्थ जतन ॥
राम ठेवावा हृदयात । जपून असावे व्यवहारात ॥
रामाचे चिंतन, नामाचे अनुसंधान । वृत्ति भगवत्परायण, साधुसंतास मान ।
आल्या अतिथा अन्नदान, । भगवंताला भिऊन वागणे जाण, ।
याविण परमार्थ नाही जाण ॥ प्रपंचात असावी खबरदारी । मन लावावे रामावरी ।
त्याचा राम होईल दाता । न करावी कशाचीहि चिंता ॥
करवंटीचे कारण । खोबरे राहावे सुखरूप जाण ।
तैसे आपले देहाचे संबंध ठेवून । चित्ती असावा रघुनंदन ॥
परमार्थ करावा जतन । मन करून रामाला अर्पण ॥
प्रपंची असावे सावध । कर्तव्यी असावे दक्ष । तरी न सोडावा रामाचा पक्ष ॥
प्रयत्नांती परमेश्वर हे सज्जनांचे बोल । मनी ठसवावे खोल ॥
पण आरंभी स्मरला राम । त्यालाच प्रयत्नांती राम ।
हा ठेवावा विश्वास । सुखे साधावे संसारास ॥
कर्तव्यात भगवंताचे स्मरण । हेच समाधान मिळवण्याचे साधन ॥
प्रयत्न करावा मनापासून । फळाची अपेक्षा न ठेवून ॥
कर्तव्यात असावे तत्पर । निःस्वार्थबुद्धि त्याचे बरोबर ॥
जोवर देहाची आठवण । तोवर व्यवहार करणे जतन ।
म्हणून प्रयत्न करावा कर्तव्य जाणून । यश देणे न देणे भगवंताचे अधीन ॥
२७४. दाता राम हे आणून चित्ती । आपण वर्तावे जगती ॥
( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )