June 24, 2010

म्हैस आणि टाईम्स

महाराष्ट्र टाईम्स मधे ( रविवार १३ जून २००९ ) रोजी माझे चुलत अजोबा श्री दामुअण्णा केळकर यांच्याबद्दलच्या आठवणी श्री। सुभाष भेंडे यांनी लिहिल्या होत्या. तो लेख इथे देत आहे. आम्ही लहान असतानाच अजोबांचे निधन झाले. त्यांच्याशी निगडीत आठवणी तशा नाहीतच. मात्र त्यांची मुर्ती अजुनही डोळ्यासमोर आहे. या लेखाच्या निमित्याने त्यांच्या संबंधीत हा लेख माझ्या ब्लॉगवर चढवून त्यांना आदरांजली !

अमोल

-----------------------------------------------------------------------------------------

केळकर सरांचं घर त्या व्यायामशाळेजवळ होतं. तास संपवून ते घरी जायचे आणि डोकीवरला रूमाल काढून कोट घरी ठेवून व्यायामशाळेजवळ घोटाळायचे. उघडेबोडके, धोतराचा काचा मारलेला. उजव्या हातात एक काठी आणि डाव्या हातात 'टाइम्स ऑफ इंडिया'! कुरणावर दोन म्हशी शांतपणे चरत असलेल्या... ... वयाची नऊ ते सोळा वर्ष सांगलीच्या 'सिटी हायस्कूल'मध्ये होतो. माणसाच्या आयुष्यातली ही महत्त्वाची वर्षं! या वयात मिळणाऱ्या संस्कारांची शिदोरी आयुष्यभर पुरते. ओल्या मातीला या काळात आकार दिला जातो. व्यक्तिमत्त्वाची जडणघडण याच कोवळ्या वयात होते. अनेक शिक्षक वेगवेगळे विषय शिकवत असतात. प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगळी, वेशभूषा वेगळी, बोलण्या-चालण्याची लकब वेगळी! पण या सगळ्यांत मला प्रकर्षानं आठवतात, ते दामुअण्णा केळकर सर! वेष अगदी साधा! पांढरा सुती सदरा, त्यावर निळा कोट, दुरांगी धोतर आणि डोईला गुंडाळलेला रूमाल. पायात कोल्हापुरी वहाणा।
आम्हाला भौतिकशास्त्र म्हणजे आवाजाचा प्रतिध्वनी कसा उमटतो हे शिकवताना त्यांनी प्रश्न केला, 'गोलघुमट कुणी पाहिलाय का?' मी उभा राहिलो. 'मी पाहिलाय सर।' '
शाबास! विजापूरला जाऊन पाहिलास की, चित्रात?' 'चित्रात नव्हे. मी विजापूरला गेलो होतो एकदा आईबाबांच्या बरोबर,' मी छाती फुगवून सांगितलं. सर्व मुलं थक्क! जणू विजापूर म्हणजे पॅरिस, रोम! '
तिथं भिंतीला तोंड लावून कुजबुजलास की नाही?' 'हो तर! घुमटाच्या एका बाजूला भिंतीला तोंड लावून कुजबुजलो. खूपच दूर दुसऱ्या बाजूला बहिणीनं भिंतीला कान लावला होता. तिला सगळं स्पष्ट ऐकूआलं. मग ती कुजबुजली आणि मी स्पष्ट ऐकलं.' 'शाबास! ध्वनी-प्रतिध्वनीचे हे उत्तम उदाहरण आहे,' त्यांनी विषय पुढं शिकवला।
दोन दिवसांनी आमचा इंग्रजीचा वर्ग चालू होता. शिपायानं येऊन सांगितलं, 'पलिकडच्या वर्गात केळकर सर तुला बोलवताहेत.' मी भीत भीत त्या वर्गात शिरलो. केळकर सर त्या तुकडीत ध्वनी-प्रतिध्वनीचा विषय शिकवत होते. आमच्या वर्गात गोलघुमटाविषयी जी प्रश्नोत्तरं झाली तीच पुन्हा त्या वर्गात झाली! आणि पुढल्या आठवड्यात तिसऱ्या तुकडीत तीच प्रश्नोत्तरं! गोलघुमटावरची अधिकारी व्यक्ती म्हणून माझी शाळेत ख्याती झाली. केळकर सरांना केवळ भौतिकशास्त्र येत होतं, असं नव्हे. कोणताही विषय त्यांना र्वज्य नव्हता. कधी एखाद्या विषयाचे शिक्षक गैरहजर असत. कॉलेजमधले प्राध्यापक गैरहजर असले की, मुलं बाहेर उंडारायला मोकळी! शाळेत ते नाही चालत. ऑफ पिरियडला दुसरे शिक्षक येत. मुलांना कथा सांगत, गाण्याच्या भेंड्या घेत. कधी येताना साठ-सत्तर पुस्तकंं आणत. मुलांना चाळीस-पंचेचाळीस मिनिटं ती वाचायला मिळत. मात्र केळकर सर आले की मुलांना प्रश्न करीत, 'कसला तास आहे?' 'जॉमेट्रीचा,' कुणीतरी सांगे. 'कोणते प्रमेय शिकता आहात?' 'पायथॅगोरसचं.' 'असं? मग वह्या उघडा. ते प्रमेय आपण नीट समजावून घेऊ. तर त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज...' आणि मग घंटा होईपर्यंत पायथॅगोरसचा सिद्धांत! कधी मराठीचा तास ऑफ असायचा. केळकर सर आले की, मनात यायचं, 'हे सायन्सचे सर. एकवेळ त्यांना अल्जेब्रा-जॉमेट्री येईल. भाषा विषय कसा येणार?' पण त्यांनी मराठीच्या तासाला केशवसुतांची 'झपुर्झा' उत्तम शिकवली. 'कंटकशल्ये बेथटरी! मखमालीचा लव उठवली! काय म्हणावे या स्थितीला।. झपुर्झा, गडे झपुर्झा।' ते इतके रंगून गेले होते की, आमच्या अंगावर काटा आला. केशवसुतांच्या बाकीच्या कविता सहज म्हटल्या त्यांनी. संपूर्ण केशवसुत मुखोद्गत होता त्यांना. संस्कृतच्या पिरियडला त्यांनी कालिदासाचं 'शांकुतल' शिकवलं, इतकं तन्मय होऊन की, 'हरिणशावकानं शकुंतलेच्या पदराचं टोक तोंडात धरलं, तेव्हा शकंुतला हळुवारपणे तक्रार करू लागली. कशाला माझ्या पदराला बिलगतंय?' हे वाक्य उच्चारताना सरांनी कोटाचं टोक ओढून धरीत मागं नजर टाकली! प्रत्यक्ष शकुंतलेला तरी इतका हळुवार आविर्भाव जमला असता की, नाही कोण जाणे!
आम्हाला आठवड्यातून दोनदा शारीरिक शिक्षणाचा तास असायचा. शाळेपासून पाचसहा मिनिटांच्या अंतरावर व्यायामशाळा होती. तिथं नातू सर सिंगलबार, डबलबार, मल्लखांब, कुस्ती शिकवायचे. कवायती घ्यायचे. केळकर सरांचं घर त्या व्यायामशाळेजवळ होतं. तास संपवून ते घरी जायचे आणि डोकीवरला रूमाल काढून कोट घरी ठेवून व्यायामशाळेजवळ घोटाळायचे. उघडेबोडके, धोतराचा काचा मारलेला. उजव्या हातात एक काठी आणि डाव्या हातात 'टाइम्स ऑफ इंडिया'! कुरणावर दोन म्हशी शांतपणे चरत असलेल्या. टाइम्स वाचता वाचता केळकर सर म्हशींवर लक्ष ठेवून असायचे! त्या बिचाऱ्या त्यांच्या शिस्तीत वाढलेल्या. इकडे तिकडे न भरकटता संथपणे कोवळं गवत फस्त करायच्या. सरांचा टाइम्स वाचून झाला की, म्हशी घराकडे कूच करायच्या. सर चहा-कॉफी घेत नसत. पहाटे उठून स्वत: म्हशीच्या धारा काढत. जोर-बैठका झाल्यावर धारोष्ण दूध पीत. शरीर गोटीबंद. सिंगलबार, मल्लखांब सहज येता जाता करायचे. पावसाळ्यात कृष्णा नदीला पूर यायचा. उसळणाऱ्या पाण्यात पुलावरून उड्या मारणं, हा सांगलीकरांचा आवडता छंद. मुलांची, तरुणांची अमाप गदीर्! गदीर्च्या अग्रभागी केळकर सर धोतराला काचा मारून उघड्या अंगानं तासन्तास पोहत राहायचे. माझ्यासारखी भित्री मुलं काठावरून मजा पाहत उभी राहिली की, ते ओरडायचे, 'नुसते बघत काय राहिलात! काढा कपडे आणि मारा उड्या!' आम्हाला तेवढं धैर्य कुठं? आम्ही हळूच तिथून काढता पाय घ्यायचो!
सांगली सोडूनमी पुण्याला आलो. सात-आठ वर्षांनी अचानक केळकर सर भेटले. मुंबईला गेलो होतो. पुण्याचा रेल्वेचा पूल ओलांडताना समोरून सर येताना दिसले. हातात भली मोठी पत्र्याची ट्रंक, पण ती सहज पेलत चालले होते. 'कुठं निघालात सर?' 'सांगलीला, तुझं कसं चाललंय?'
'उत्तम. मुंबईला गेलो होतो।' '
सामान दिसत नाही।' '
कुलीकडे दिलंय' छोटी सुटकेस घेऊन येणाऱ्या हमालाकडे अंगुलीनिदेर्श करत मी म्हटलं। '
कुलीकडे का? वा छान!' हातातली अवजड ट्रंक सावरीत ते निघून गेले।
मी मुकाट्याने कुलीमागून धावू लागलो. बराचसा शरमिंदा होऊन!
बऱ्याच वर्षांनंतर सांगलीला गेलो होतो. केळकर सर आजारी असल्याचं कळलं, म्हणून मुद्दाम त्यांना भेटायला गेलो. पडल्या पडल्या ते जी. एं. च्या कथा वाचत होते. पाचदहा मिनिटं गप्पा झाल्यावर त्यांनी विचारलं, अजून हमालाकडे बॅग देतोस की स्वत: उचलतोस?'
'त्या दिवसापासून स्वत:च।'
'ठीक ठीक! स्वत:चं काम स्वत: करावं।
अरे, अब्राहम लिंकन अमेरिकेचा अध्यक्ष झाला, तरी स्वत:चे बूट स्वत: पॉलिश करायचा'
तीच त्यांची अखेरची भेट...

------------------------------------------------------------------------------------------

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या