त्याचा व्यवसाय असा होता की त्याला दररोज प्रवास करावा लागे. विशेषतः बसचा प्रवास.जेंव्हा जेंव्हा तो असे वाचत असे किंवा ऐकत असे , की अमुक एक बस अमुक एका नदीत पडली, काही लोक बुडाले, काही पोहून काठाशी आले. तेंव्हा तो मनातल्या मनात विचार करी की आता त्याने पोहणं शिकायला हवं . कोणती दुर्घटना कधी घडेल हे सांगता थोडचं येतय ? त्याला तर रात्रंदिवस बसने प्रवास करावा लागतो. पण त्याचा हा विचार दोन तीन दिवसापेक्षा जास्त दिवस टिकत नसे.पोहण शिकण्यास तो टाळाटाळ करत नाही.
त्या दिवशी तो बसने जात होता.बस नदीवरच्या पुलाशी अचानक थांबली. असं कळलं की काही वेळापुर्वीच एक बस नदीत कोसळली. गर्दी जमली होती. बचावकार्य सुरु होतं. पोलीस आले होते. अन्य प्रवाशांप्रमाणे तो ही खाली उतरुन ही भिषण दुर्घटना पाहू लागला. नदीत बुडणा-या, वाहून जाणा-या लोकांकडे पाहून भीतीने त्याचा थरकाप झाला. मनातल्या मनात पोहायला शिकायची त्याने प्रतिज्ञा केली.
दुसर्यादिवशी तो पोहायला शिकायला म्हणून गेला आणि नदीत बुडून मेला.
------------------------------------------------------------------------------------------------------------
’ आवाज आतला बाहेरचाही ’ मधून साभार ( ’अपने अपने सपने’ या घनश्याम अग्रवाल लिखित हिंदी लघुतम कथा संग्रहाचा अनुवाद )
अनुवाद : उज्ज्वला केळकर, सांगली
No comments:
Post a Comment