पत्रिका काढून हवी असल्यास

पत्रिका काढून हवी असल्यास
इथे माहिती भरावी

सिंहस्थ पर्व

कुंभमेळ्याच्या बाबतीत पुराणात काही कथा आहेत. प्रामुख्याने स्कंदपुराणात याचा विशेष उल्लेख आढळतो.
देव-दानवांनी समुद्रमंथन केले तेव्हा समुद्रातून इतर रत्नांबरोबर अमृतकुंभही निघाला. हा अमृतकुंभ सुरक्षितपणे स्वर्गात पोहोचविण्याची जबाबदारी इंद्राचा पुत्र जयंत यांच्याकडे सोपविण्यात आली. सूर्य, चंद्र, गुरू हे त्याच्या मदतीला होते. तो अमृतकुंभ स्वर्गात नेत असता चार वेळा हल्ला करून दैत्यांनी तो कुंभ मिळविण्याचा प्रयत्न केला. त्या चारही वेळा तो अमृतकुंभ देवांनी पृथ्वीवर ज्या ज्या चार ठिकाणी ठेवला तेथे कुंभमेळा भरत असतो.
वर सांगितल्यानुसार कुंभ राशीत गुरू असता हरिद्वार येथे,
वृषभ राशीत गुरू असता प्रयाग येथे,
सिंह राशीत गुरू असता त्र्यंबकेश्‍वर येथे,
गुरू सिंह राशीत परंतु मेषेचा सूर्य, तूळेचा चंद्र, वैशाखी पौर्णिमा असता उज्जैन येथे कुंभमेळा असतो.

यावेळी १४ जुलै २०१५ ते ११ ऑगस्ट २०१६ पर्यंत सिंहस्थ आहे. याच अवधीत चालू वर्षी श्रावण कृष्ण अमावास्या रविवार, १३ सप्टेंबर २०१५ रोजी महाकुंभपर्व आहे

स्थान माहात्म्य- सिंहस्थात सर्व गोदावरी तीर पुण्यकारक असताना कुंभमेळा त्र्यंबकेश्‍वरीच का होतो व तीर्थविधी वगैरे त्र्यंबकेश्‍वरीच का करावे? अशी शंका येणे स्वाभाविक आहे. स्कंदपुराणात सांगितले आहे की, गोदावरीच्या उगमस्थानास शास्त्रकारांनी विशेष महत्त्व दिले आहे. याचे कारण असे आहे की, गौतमी गंगेस गोदा ही संज्ञा त्र्यंबकेश्‍वरी कुशावर्त तीर्थावरच प्राप्त झाली. गोदा या शब्दाचा अर्थ ‘गौतमस्य गां जीवनम् ददाति इति गोदा|’गौतम ऋषींच्या गायीस जीवनदान मिळून गौतम ऋषींना गोहत्येच्या पातकापासून जिने मुक्त केले, असा आहे.
गौतम ऋषींनी ज्या कुशावर्त तीर्थात स्नान केले ते तीर्थराज कुशावर्त येथेच आहे. येथून गौतमी गंगेस गोदा म्हणू लागले. (भगवान गौतम ऋषींनी पवित्र दर्भांनी गंगेचा ओघ अडवून स्नान केले म्हणून यास कुशावर्त म्हणतात.)
द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्‍वर हे एक अत्यंत जागृत स्थान आहे. अनेक संत महंतांचे आखाडेही येथे आहेत. सिंहस्थ पर्वकाळात मूळ गोदावरीच्या स्नानाचे महत्त्व शास्त्रामधून व पुराणांमधून वारंवार वर्णिलेले आहे. आणि यामुळेच सिंहस्थ पर्वकाळात मूळ गोदावरीचे अनादी जन्मपीठ श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथे हजारो साधू, संत, महंत, मंडलेश्‍वर आपल्या अनुयायांसह अत्यंत थाटाने व पवित्र अंतःकरणाने तीर्थराज कुशावर्तात स्नान करतात. तसेच लाखो यात्रेकरू याच वेळी स्नान, दान, श्राद्ध, मुंडनादी तीर्थविधी करतात. केवळ गोदावरी तीरापेक्षा मूळ गोदावरीचे महत्त्व विशेष आहे. म्हणूनच मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या वनवासाच्या वेळी जवळच गोदावरीच्या तीरावर पंचवटीत असूनही पितरांच्या उद्धाराकरिता यथाविधी श्राद्धादिक कर्मे त्र्यंबकेश्‍वर येथे कुशावर्त तीर्थावर जाऊन करण्यास महर्षी कश्यपांनी प्रभू रामचंद्रांस सांगितले. याविषयी सुंदर श्‍लोक स्कंदपुराणात सांगितले आहेत.
स्कंदपुराणाप्रमाणे महर्षी कश्यपांच्या आज्ञेवरून प्रभू रामचंद्रांनी त्र्यंबकेश्‍वर येथे जाऊन तीर्थराज कुशावर्तावर तीर्थविधी केले. या सर्व कारणांमुळे गोदावरी नदीचे उगमस्थान असे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथेच जाऊन सिंहस्थ निमित्तक यात्रा, तीर्थविधी श्राद्ध, मुंडन वगैरे करणे प्रशस्त व शास्त्रसंमत आहे. तसेच, गोदावरी नदीचे नाभिस्थान म्हणून नांदेड व मुखस्थान म्हणून राजमहेंद्री तसेच पैठणलाही महत्त्व आहे.
ज्यांच्या वडिलांचे निधन झाले असेल त्यांनाच हा तीर्थविधी करता येतो. भार्या गर्भिण असेल, घरात विवाह, उपनयनादी मंगलकार्य होऊन सहा महिने झाले नसतील तरीही सिंहस्थ निमित्तक तीर्थविधी करण्यास हरकत नाही. गुरू-शुक्रास्ताचा, मलमास व जन्मनक्षत्रदिकांचाही दोष नाही. ज्यांची आई मृत आहे पण पिता जिवंत आहे अशांनी हा तीर्थविधी करू नये. त्यांनी फक्त कुशावर्त तीर्थावर संकल्पपूर्वक स्नान करावे म्हणजे सकल पापांचा नाश होईल. ब्रह्मांड पुराणामध्ये नाशिक, प्रयाग, पुष्कर, नैमिष व गया ही पाच प्रमुख तीर्थक्षेत्रे सांगितली आहेत. या व्यतिरिक्त अन्य कुठेही सहावे तीर्थक्षेत्र नाही, असे लिहिले आहे.
पुण्यपावनी श्रीगोदावरी नदी तीरावर श्री सिंहस्थ तीर्थक्षेत्र नाशिक चार युगांपासून विराजमान आहे. या तीर्थक्षेत्राला कृतयुगामध्ये पद्मनगर, त्रेतायुगामध्ये त्रिकंटक, द्वापारयुगामध्ये जनस्थान व कलियुगामध्ये नाशिक या नावाने प्रसिद्धी आहे. कृतयुगाचे दोन लक्ष वर्षांनंतर मांधाता राजाच्या शक संवत्सर माघ शु १०, बुधवार या दिवशी (मध्यान्ही) दुपारी १२ वाजता भगवान श्री शिवशंकराच्या जटामंडलातून श्रीगोदावरी नदी पृथ्वीवरती अवतीर्ण झाली, असे ब्रह्मांड पुराणात सांगितले आहे.
वामन पुराणानुसार पश्‍चिम वाहिनी यमुना आणि उत्तर वाहिनी गंगानदी पुण्यकारक आहे, तशीच विशेष अत्यंत दुर्लभ अशी श्रीगोदावरी नदी नाशिक क्षेत्री आल्यानंतर दक्षिण वाहिनी झाली आहे. त्या नदीमध्ये परम पुण्यपावन स्नान, दान, पूजन केले असता मनुष्य जीवनातून मोक्षगती मिळविण्याचा हा महान योग आहे. (दि. १४ जुलैपासून आलेला आहे.)
साठ हजार वर्षे भागीरथी गंगेमध्ये स्नान केल्यानंतर जे पुण्यफल प्राप्त होईल तेवढे संपूर्ण पुण्यफल सिंहस्थ काळामध्ये श्रीगोदावरी नदीमध्ये एकदा स्नान केल्याने प्राप्त होते, असे पद्मपुराणामध्ये सांगितले आहे.
स्कंद पुराणामध्ये सिंहस्थ महात्म्याचे वर्णन करताना सांगितले आहे की, जोपर्यंत बृहस्पती (गुरू) सिंह राशीमध्ये असतो तोपर्यंत सर्व ३३ कोटी देवी-देवता नाशिक क्षेत्री श्रीगोदावरी तीरावर निवास व नित्य स्नान करतात..
- डॉ. अनिल वैद्य

May 4, 2012

श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम्
याच्या नित्य पठणाने सर्व पापांचा नाश होतो.

No comments: