११ मे
थोडे वाचावे पण कृतीत आणावे.
खूप समजून घ्यावे, ज्ञान संपादन करावे, असा पुष्कळ लोकांचा हव्यास असतो, आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हे एक प्रकारचे व्यसनच आहे. अफू खाणार्याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही. थोडी अफू पचनी पडली की, कैफ येत नाही म्हणून तो आणखी अफू कैफ येईपर्यंत खातो. असे होता होता अधिकाधिक अफू पचनी पडत जाते, आणि शेवटी इतकी अफू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत होतो. ज्ञान संपादनाचे असेच आहे; म्हणून थोडेच वाचून, समजून घ्यावे, आणि ते कृतीत आणावे. नाही तर जन्मभर ज्ञान संपादण्यात वेळ जातो, आणि कृति न झाल्या कारणाने पदरात काहीच पडत नाही. मनुष्याला पोटभर जेवायला पंचवीस-तीस मिनिटे पुरेशी होतात, पण जेवलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी पाचसहा तास जावे लागतात. मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन तब्येत बिघडेल, आणि त्यातच त्याचा अंत होईल. म्हणून नुसते वाचीतच बसू नये. थोडेच वाचावे, पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते. म्हणून केवळ समजावून घेण्यापेक्षा, ते कृतींत आणण्यावर भर असावा. आपले आकुंचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहोत ते निःस्वार्थी बनणे, हेच खर्या वेदांताचे मर्म आहे. नुसत्या विचाराने तत्त्वज्ञान निश्चित होणार नाही. त्यासाठी साधन करायला पाहिजे. जग सुधारायच्या नादी लागू नका; स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच. आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारले नाहीच !
वस्तू ही सुखाचे साधन असून आपण भ्रमाने तिलाच सुखरूप मानतो. याचा परिणाम असा होतो की, वस्तूच्या साहाय्याने सुख मिळविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण वस्तूच जास्त मिळविण्याच्या मागे लागतो, आणि शेवटे दुःखी बनतो. कर्माला सुरुवात करताना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होते; कर्म करीत असताना, फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते. कर्म संपून फळ मिळाले नाही तर दुःख होते; आणि फळ मिळालेच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन, फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दुःख होते. सारांश, अथपासून इति पर्यंत दुःखच पदरात पडते. यासाठी, फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होते. म्हणून परमार्थाकडे रोकडा व्यवहार आहे, उधारीचा नाही, असे सर्व संतांचे सांगणे आहे.
No comments:
Post a Comment