१३ मे
स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करावा.
वास्तविक काही न करणे, आपण काही करतो आहोत किंवा आपल्याला काही करायचे आहे असे न वाटणे हाच परमार्थ. देहाने, मनाने एकसारखी चळवळ करायची आपल्याला सवय लागली आहे. देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण, मनाला स्वस्थ बसायला लावणे त्यापेक्षा कठीण, आणि देहाने कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसविणे हे अत्यंत कठीण. मनाला खरे म्हणजे स्वास्थ्य हवे; पण ते मिळविण्याकरता साधन, म्हणजे प्रयत्न करणे जरूर आहे. मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणे तीन, एक आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे; दोन, मागच्या बर्यावाईट कर्मांची आठवण होणे; आणि तीन, उद्याची काळजी लागणे. आता, जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार, मग सर्व तुमच्या इच्छेप्रमाणे कसे चालतील ? तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडू न देण्यासाठी, आपली इच्छाच नाहीशी करावी; अमुक गोष्ट मिळावी ही बुद्धीच नाही ठेवू; हाव सोडावी, लोकांची आस सोडावी; जे काही होते ते 'रामाच्या इच्छेने झाले' म्हणावे. प्रत्येक गोष्ट 'रामाने केली' म्हणणे, म्हणजे अखंड भगवंताच्या अनुसंधानात रहणे.
आपला अहंपणा किती खोल गेला आहे पाहा ! समोर दिसत असलेल्या गोष्टीकडे बेमालून डोळेझाक करून, आपण आपल्या दोषांचे खापर बिनदिक्कत दुसर्यावर फोडायला तयार होतो. अमक्या तमक्याच्या नादाने आपला मुलगा बिघडला असे आपण म्हणतो, कारण आपलाच मुलगा खराब हे म्हणवत नाही ! ते म्हणण्याची लाज वाटते, म्हणून दुसर्याच्या मुलाला आपण वाईट म्हणतो. आपला मुलगा आपल्या डोळ्यादेखत संगतीच्या योगाने एवढा बिघडतो, तर मग संगतीचा परिणाम केवढा असला पाहिजे ! संगतीचा परिणाम जर एवढा मोठा आहे, तर संतसंगतीत असताना आपल्यात सुधारणा का दिसू नये ? संतसंगतीने मग आपण निश्चित सुधारायला पाहिजे ! पण तसे तर दिसत नाही; मग नडते कुठे ? याचे मुख्य कारण म्हणजे, आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्नच करीत नाही. आपल्याला सर्व समजते, परंतु प्रयत्न करायला नको ! वासनेच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करीत नाही. त्यामुळे वासनेतच आपण जन्माला येतो, आणि वासनेतच आपला अंत होतो. याकरिता एकच खात्रीचा उपाय आहे, आणि तो म्हणजे भगवंताला अनन्यभावाने शरण जाणे. "रामा, तुझ्यावाचून माझी यातून सुटका नाही. तू ठेवशील त्यात मी आनंद मानीन. तुझे प्रेम मला लागू दे," असे कळकळीने रामाला सांगावे, आणि सदैव त्याचे नाम हृदयात ठेवावे. तो उदार परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री बाळगा.
१३४. वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे.
( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )
No comments:
Post a Comment