श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० डिसेंबर २०१४
शेवटी करावी प्रार्थना एक ।
सकाळी लवकर उठावे । भगवंताचें स्मरण करावे ।
हातपाय स्वच्छ धुवावे । मानसपूजा करावी ॥
हृदयांत ठेवावे रामाचे ठाण । षोडशोपचारे करावें पूजन ॥
गंध फूल करावे अर्पण । नैवेद्य करावा अर्पण । मनाने प्रसाद घ्यावा जाण ॥
शेवटी करावी प्रार्थना एक । 'रामा, तुला मी शरण देख ॥
वासना न उठों दुजी कांही । नामामध्यें प्रेम भरपूर देईं ॥
सदा राखावें समाधान । हें तुझें कृपेवांचून नाही जाण ॥
नीतिधर्माचे आचरण । तुझें कृपेने व्हावे जतन ॥
न मागणें आता कांही । मी तुझ्यासाठी जिवंत पाहीं ।
आतां द्या नामाचें अखंड स्मरण । देह केला तुला अर्पण ॥
रामा, जें जें कांही तूं करी । त्यांत समाधानाला द्यावें पुरी ।
आतां, रामा, एकच करीं । तुझा विसर न पडो अंतरीं ॥
तुझे नामाची आवडी । याहून दुजें मागणें नसावें उरी ॥
हेंचि द्यावे मला दान । दीन आलो तुज शरण ॥
रामा, मला एकच द्यावे । तुझें अनुसंधान टिकावें ॥
नको नको ब्रह्मज्ञान । काव्य-शास्त्र व्युत्पत्तीचें ज्ञान ॥
कामक्रोधाचे विकार । जाळताती वारंवार ॥
आतां तारीं अथवा मारीं । तुझी कास कधीं न सोडी ॥
आतां, रामा तुझा झालों । कर्तेपणांतून मुक्त झालों ॥
माझें सर्व ते तुझे पाहीं । माझें मीपण हिरोनि जाई ॥
रामा, आतां एकचि करी । वृत्ति सदा राहो तुझेवरी ॥
रामा, मी कोठें जावें ? । तुजवांचून कोठें राहावें ? ॥
देहबुद्धीची नड फार । ती करावी रामा तुम्ही दूर ॥
आजवर विषय केला आपलासा । न ओळखतां पडलों त्याच्या फांसा ॥
रामा सर्व सत्ता तुझ्या हाती । समाधान राहील अशी करावी वृत्ति ॥
तुझेजवळ मागणें दुजें नाहीं । हृदयांत तुझा वास अखंड राही ।
आतां तुझ्यासाठीं माझें जीवन । तुला तनमन केलें अर्पण ॥
तुमचें चिंतनीं लागावें मन । कृपा करा रघुनंदन' ॥
ऐसें करावें रामाचें स्तवन । रक्षणकर्ता एक भगवंत मनीं आणून ॥
ऐसें व्हावें अनन्य दीन । तात्काळ भेटेल रघुनंदन ॥
नामापरतें न माना दुजें साधन । जैसें पतिव्रतेस पति प्रमाण ॥
नामापरतें न मानावें सत्य । ज्यानें राम होईल अंकित ॥
हेच सर्व साधुसंतांचे बोल । कोणीही न मानावे फोल ॥
नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण । मनीं असो, नसो, करावें नामस्मरण ॥
नामाविण दुजें काहीं । सत्य सत्य त्रिवार नाहीं ॥
No comments:
Post a Comment