श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ८ डिसेंबर २०१४
देहाला भगवंतप्राप्ति करिताच सांभाळावे.
देहाला सांभाळणे जरूर आहे; परंतु भगवंतप्राप्ति करिता ते करावे, विषयासाठी नाही करू. बाहेरचा लौकिक सांभाळला पण होते नव्हते ते घालविले, यात काय मिळविले ? हा वेडेपणा म्हणायचा. आतल्या खोबर्याचे रक्षण करण्याकरिता करवंटीची जरूरी आहे. केवळ बाह्यांगाचीच जपणूक करणे हेच काही मनुष्याचे अंतिम उद्दिष्ट नाही. बाह्यांगाचे सुख हे काही खरे नाही. 'मी, माझे' यापासून आपण द्वैताला सुरुवात करतो, कल्पनेने जेवढे समजेल तेवढे पाहू लागतो; परंतु शेवटपर्यंत 'मी कोण' याचा आपल्याला पत्ता लागत नाही. आपली चूक झाली असे समजले म्हणजे दुरुस्त करण्याचा मार्ग पहावा. जिथून आपली वाट चुकली तिथे परत यावे लागते. 'मी देही' असे म्हणू लागलो, इथे वाट चुकली. असत्याला सत्य मानले ही आपली चूक झाली. विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली, त्याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतला, तरी अजून आपली ही कल्पना खरी का खोटी हे आपल्याला कळत नाही, हे मात्र और आहे. खरोखर, प्रपंच हा टिपर्यांच्या खेळाप्रमाणे आहे. टिपर्यांच्या खेळात एकाला टिपरी दिली की, तो लगेचच पुढच्या गड्यापाशी जातो, त्याप्रमाणे हा प्रपंच स्थिर नसून सारखा बदलणारा आहे. आपले जन्म आणि मरण एक प्रकारे रोज घडत असते. आपण निजलो, झोपी गेलो, की मरण समजावे; आणि उठलो, जागे झालो की आपला जन्म झाला असे समजावे.
एखाद्या तुरुंगात पुष्कळ कैदी असतात; कुणी काही, कुणी काही केलेले असते, हे खरे; तरी जे करू नये ते प्रत्येकाने केलेलेच असते ही गोष्ट निश्चितच आहे. त्याप्रमाणे, जगात जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागील जन्मी अमुक एक कर्म केले हे जरी समजले नाही तरी, जे करू नये ते त्यांनी केले आहे, ही गोष्ट निश्चित. परंतु त्यामध्ये भगवंताने एक मोठी सोय ठेवली आहे, ती ही की, जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही. जगातल्या दुःखाचा प्रश्न हा मानवी तर्काला समाधानकारकपणे न सुटणारा प्रश्न आहे. म्हणून त्याबद्दल फार विचार न करता जगातले दुःख शक्यतो कमी करण्याचा प्रयत्न करावा. ज्याला देवाची पूर्ण आठवण असते त्यालाच जगाचा, दुःखाचा विसर पडतो, जो स्वतःला पूर्णपणे विसरतो त्यालाच भगवंताची प्राप्ति होते. स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगून जाणे हा एकच उपाय आहे. जेवढ्या उत्कटतेने नाम घेऊ तितके अधिकाधिक आपण नामात गुंतले जाऊ; मग देहाची आठवण कशाला राहील ? आपण नाम घ्यावे तें आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी त्यात स्वतःला विसरून जावे हाच आनंदाचा मार्ग आहे.
३४३. नाम अंतरात शिरले की देहाचा विसर पडतो. मग मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळते.
( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )
No comments:
Post a Comment