श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३१ डिसेंबर २०१४
नाम हे चिरंतन आहे, त्याला समाप्ति नाही.
[तेरा कोटी रामनामाच्या जपाच्या समाप्तीच्या दिवशी झालेले निरूपण]
खरे पाहिले म्हणजे आपण जपाची जी समाप्ती करतो ती केवळ अज्ञानामुळेच; कारण नाम हे चिरंतन आणि काळापलीकडचे आहे. त्याचे माहात्म्य कळायला फार कठीण आहे. देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचे नाम. ते घेतल्याने तो आपलासा होईल. देव नामाशिवाय राहू शकत नाही. त्रिवेणीसंगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव, भक्त आणि नाम. जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असते; आणि जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव असतो.
तुम्ही लोकांनी सेवा फार केली. खरोखर, जपाची सांगता करून तुम्ही राजाला लाजवील अशा रीतीने उत्सव साजरा केलात. आता रामाजवळ असे काही मागा की पुन्हा काही हवेसे वाटणार नाही. आपण जर काही अगदीच क्षुल्लक मागितले तर तो हसेल, की मी एवढा दाता असताना हे क्षुल्लक काय मागतात ! तर आता त्याच्याजवळ, 'देवा, माझे समाधान निरंतर टिकू दे, आणि तुझ्या नामाचे प्रेम दे,' हेच मागणे मागा. भगवंताला पूर्ण शरण जाऊन सांगा, ' भगवंता, मी हा असा आहे, यात सुधारणा होणे माझ्या हाती नाही. रामा, मी तुझे नाम मरणापर्यंत घेईन तरच जगेन.' स्त्रियांनी एकच करावे, पति देवासमान मानून देहाने त्याचे व्हावे आणि मनाने देवाचे व्हावे. प्रपंच हा परमार्थाचा लाभ होण्यासाठी करावा. कुठेही गुंतून राहू नये, कोणत्याही उपाधीत सापडू नये. उपाधीरहित राहण्याचे साधन म्हणजे उपाधीरहित असलेले भगवंताचे नाम सतत घेणे. नाम घेतल्याने श्रद्धा दृढ होईल आणि नामाची गोडी लागेल. जसे पाणी गोठल्यावर बर्फ होतो, त्याचप्रमाणे नाम घेतल्याने श्रद्धा घट्ट होते. श्रद्धेमुळे देवाला तुम्हांला भेटावेच लागेल. तुम्ही अखंड नाम घेत राहा, देव तुम्हाला खात्रीने भेटेल या बद्दल शंका बाळगू नका.
परमार्थ आणि व्यवहार यांची उत्तम सांगड घालावी. परमार्थाबद्दल नसत्या शंका घेऊ नयेत. आजच्या या दिवसापासून, आपण आपल्या मुलाला जितक्या आपलेपणाने हाक मारतो, तितक्या आपलेपणाने देवाला हाक मारा; आणि आतापर्यंत जितक्या आवडीने भगवंताचे नाम घेतलेत तितक्याच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आवडीने आणि निष्ठेने ते घ्या. अंतकाळी अगदीच सगळ्यात शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे; नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबरच ते बाहेर पडावे. असे नाम जो घेतो त्याला देहाच्या सुख-दुःखाची जाणीवच राहणार नाही. तो आनंदात राहील . मला खात्री आहे, राम त्याचे कल्याण करील.
No comments:
Post a Comment