May 31, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३१ मे २०१४

३१ मे

भगवंताला शरण जावे. 

 



मी जे जे करतो ते ते भगवंताकरता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते. भगवंतप्राप्तीशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे, हे भक्ताचे लक्षण आहे. चांगले कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असते. याकरिता, कोणतेही कृत्य भगवंताला स्मरून करावे. भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसे म्हणावे ? जो काळ भगवंत स्मरणात जातो, तोच काळ सुखात जातो. विषयासाठी आपण स्वतःला विसरतो. मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू ? मला सगुणात प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते, तो पर्यंत सगुणभक्ति करावी. गुरूच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो, म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली ? यामध्ये अभिमान अनायासे मारला जातो. मीपणा टाकल्याशिवाय गुरुआज्ञा नाही पाळता येत. गुरुआज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरीसुद्धा ती आपले डोके मधून मधून वर काढतेच. पण तिला एकदा कळले की हा ऐकत नाही, की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते. देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली, तरी गुरुआज्ञा मोडू नये. देहातीत व्हायला, गुरुआज्ञेप्रमाणे वागणे यापरते दुसरे काय आहे ? 'मी देही नाही' असे म्हणत राहिला, तर माणूस केव्हातरी देहातीत होईल.
आपला धर्म आणि नीति सांभाळावी, आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्‍न करावा. संत आणि प्रापंचिक, दोघेही प्रपंच करतात; पण प्रापंचिक, कर्तेपणा आपल्याकडे घेतात, तर संत 'राम कर्ता' असे म्हणून प्रपंच करतात. कर्तेपण तुम्ही आपल्याकडे घेतलेत तर सुखदुःख भोगावे लागेल. बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वतःला विसरतो, मग भगवंताकरिता नाही का तसे करता येणार ? तळमळ असली पाहिजे मग सर्व काही होते. 'किती दिवसात मुक्ति मिळेल ?' याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे. 'ज्या क्षणी भगवंतस्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ति मिळेल.' स्वतःला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे. कृती करणार्‍याचाच वेदांत खरा असतो. मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते. याकरिता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा, सहवासाने माणसाचेसुद्धा प्रेम जर वाढते, तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचे प्रेम नाही का येणार ? भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे, यातच सर्व धर्माचे आणि शास्त्रांचे सार आहे.


१५२. देहाहून व मनाहून आपण निराळे आहोत, म्हाणून नाम घेत,
तसे वेगळे राहण्याचा प्रयत्‍न करावा. जे कशानेही साधले नाही ते नामाने साधेल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 30, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ३० मे २०१४

३० मे

सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा. 

 

 

अकर्तेपणे करीत राहावे कर्म । हाच परमात्मा आपला करून घेण्याचा मार्ग ॥ न करावा कोणाचा द्वेष मत्सर । सर्वांत पाहावा आपला रघुवीर ॥ परनिंदा टाळावी । स्वतःकडे दृष्टी वळवावी ॥ गुणांचे करावे संवर्धन । दोषांचे करावे उच्चाटन ॥ जेथे जेथे जावे । चटका लावून यावे ॥ याला उपाय एकच जाण । रघुनाथावांचून न आवड दुजी जाण ॥ देहाचे दुःख अत्यंत भारी । रामकृपेने त्याची जाणीव दूर करी ॥ मनावर कशाचाही न होऊ द्यावा परिणाम । हे पूर्ण जाणून, की माझा त्राता राम ॥ अभिमान नसावा तिळभरी । निर्भय असावे अंतरी ॥ जे दुःख देणे आले रामाचे मनी । ते तू सुख मानी ॥ देह टाकावा प्रारब्धावर । आपण मात्र साधनाहून नाही होऊ दूर ॥ मी असावे रामाचे । याहून जगी दुसरे न दिसावे साचे ॥ प्रपंचातील सुखदुःख ठेवावे देहाचे माथा । आपण न सोडावा रघुनाथा ॥ आपण नाही म्हणू कळले जाण । ज्ञानाचे दाखवावे अज्ञान ॥ दोष न पाहावे जगाचे । आपले आपण सुधारून घ्यावे साचे ॥ कोणास न लावावा धक्का । हाच नेम तुम्ही राखा ॥ एक रामसेवा अंतरी । सर्वांभूती भगवद्‌भाव धरी ॥
राम ज्याचा धनी । त्याने न व्हावे दैन्यवाणी ॥ नका मागू कुणा काही । भाव मात्र ठेवा रामापायी ॥ वाईटांतून साधावे आपले हित । हे ठेवावे मनी निश्चित ॥ भगवंताचे विस्मरण । हे वस्तूच्या मोहाला कारण ॥ म्हणून भक्ति व नाम । याशिवाय ऐकू नये कोणाचे ज्ञान ॥ परिस्थितीचा निर्माता परमात्मा जाणे । त्यातच त्यास पाहावे आपण ॥ सर्व कर्ता राम हा भाव ठेवता चित्ती । खर्‌या विचारांची जोडेल संगति ॥ व्यवहारातील लाभ आणि हानि । मनापासून आपण न मानी ॥ मी आहे रामाचा ही जाणीव ठेवून मनी । सुखाने वर्तत जावे जनी ॥ एकच क्षण ऐसा यावा । जेणे सर्वांचे विस्मरण करून रामच आठवावा ॥ रामाविण उठे जी जी वृत्ति । त्यासी आपण न व्हावे सांगाती ॥ मी रामाचा हे जाणून । वृत्ति ठेवावी समाधान ॥ धन्य मी झालो । रामाचा होऊन राहिलो । ही बनवावी वृत्ति । जेणे संतोषेल रघुपति । वृत्ति बनविण्याचे साधन । राखावे परमात्म्याचे अनुसंधान ॥ शरीरसंपत्ति क्षीण झाली । तरी वृत्ति तशी नाही बनली ॥ विषयाधीन जरी होय वृत्ति । तरी दुरावेल तो रघुपति ॥ संतांची जेथे वस्ती । तेथे आपली ठेवावी वृत्ति ॥ सतत विवेक अखंड चित्ती । रामनामी मनोवृत्ति । हेचि तुम्हा परम प्राप्ति ॥ नामामध्ये ऐसी सत्ता । जेणे जोडे रघुनाथा ॥ नामापरते न मानावे हित । हेच आजवर सांगत आलो सत्य ॥ भगवंताला आपले होणे आवडते फार । श्रीरामनामी राहावे खबरदार ॥

१५१. रघुनाथस्मरणात असावे आनंदात । तेथे न चाले कोणाची मात ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 29, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २९ मे २०१४

२९ मे

भगवंताची तळमळ लागायला पाहिजे. 

 

    

ज्याला जे आवडते ते आपण केले तर त्याला गोडी लागते. भगवंताला प्रेमाशिवाय दुसर्‍या कशाचीच गरज नसते. भगवंताचे प्रेम यायला त्याच्याशी आपलेपणा लावून ठेवावा. भगवंत जोडल्याशिवाय नाहीच राहणार, असे ठरवावे. भगवंत जोडावा हे ठरल्यावर, मला लोक नावे ठेवतील याचा कशाला विचार करावा ? निश्चय आहे तिथे सर्व काही सुचते. तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो. साधुसंत मार्ग दाखवायला सतत तयार असतात; मात्र आपण आपली देहबुद्धी बाजूला ठेवून त्यांना शरण जावे.
सर्व जग जर भगवंताचे आहे तर मग काळजीचे कारण काय ? उपाधी कोणी लावून घेतली ? माझी मीच ! मी निर्दोष होईन तेव्हाच लोक मला तसे दिसतील. आपल्या सर्व अवगुणांना कारण म्हणजे 'मी रामाला विसरलो' हेच आहे. परमात्म्याचा विसर पडतो हेच खरे पाप. कोणी पाहात नसेल तिथे वाईट कर्म आपण करतो; पण भगवंत चोहोकडे पाहतो आहे अशी जाणीव ठेवली, म्हणजे असे पाप घडणार नाही. कोणतेही कर्म करताना फळाची आशा धरली तर ते घातुक होते. ज्याने भगवंत जवळ आणला जातो तेच चांगले कृत्य. स्नानसंध्या केली आणि व्यवहार खोटा केला, तर त्या संध्येचा काय उपयोग ? मनात कोणताही हेतू न धरता परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वागावे. मन परमेश्वराला अर्पण करावे, व दुसरीकडे गुंतवू नये. एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुनः विषयाचा आनंद झाला, तर ते अर्पण झाले नाही असे समजावे. माझा प्रयत्‍न व्हायचा असेल तसा होवो, पण तुझा विसर पडू देऊ नको, असे अनन्य भावाने भगवंताला म्हणावे. प्रत्येक कृतीत, 'मी भगवंताचा आहे' ही जाणीव ठेवावी. पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भिती नाही वाटत. पांडवांच्याजवळ प्रत्यक्ष भगवंत असताना त्यांना कितीतरी संकटे सोसावी लागली ! संकटे येऊ देऊन मग त्यातून बाहेर काढण्यापेक्षा भगवंताने संकटे टाळलीच का नाहीत, याचे उत्तर देणे सोपे आहे. पुष्कळ वेळा, आपल्यावर येणारे संकट कुणी टाळले, तर ते संकट येणारच नव्हते असे आपण समजतो. खरे सांगायचे म्हणजे संकटे ही आपल्या कर्माचीच फळे असतात. संकटांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्याला समाधान देते. ज्यांना सर्व अनुकूल आहे त्यांनादेखील समाधान हे नसतेच; म्हणून ज्यांना तितकी अनुकूलता नाही त्यांनी त्याबद्दल असमाधान ठेवण्याचे कारण नाही, कारण समाधान हे त्यामध्ये नाहीच नाही. असमाधान हा रोग सर्वांचा एकच आहे, आणि भगवंताचे स्मरण हे औषधही सर्वांना एकच आहे.


१५०. ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे, त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकेल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 28, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २८ मे २०१४

२८ मे

प्रपंच भगवंताचा मानून करावा. 

 



अमुक एक हवे किंवा अमुक एक नको असे न वाटणे याचे नाव वैराग्य. संकटकाळी, हे संकट नसावे असे न वाटता, परमेश्वराचे स्मरण असावे आणि त्याच्याजवळ हे मागावे की, 'देवा तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा देऊ नको.' देहाला मुद्दाम कष्ट देऊ नयेत, पण जेव्हा ते आपोआप येतात, तेव्हा मात्र ते आनंदाने सोसावेत. पुरूरव्याने दुष्कृत्य केले आणि त्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त झाले; तेव्हा त्याला दुष्कृत्य म्हणावे की सत्कृत्य ? तरीही, वैराग्यप्राप्तीचा वास्तविक हा काही मार्ग नव्हे हे खरेच. आपण शास्त्रविरुद्ध कर्म करू नये. आणि दुसर्‍याने केले तर नावे ठेवू नयेत. न जाणो, परमात्म्याची इच्छा असेल तर त्यातूनच चांगले होण्याचा संभव आहे. प्रपंच मिथ्या मानावा आणि जो मिथ्या तो बरा असे वाटण्यात काय अर्थ ? तो जसा असेल तसा असू द्यावा. नाटकात नट जसे काम करतो, त्याप्रमाणे प्रपंचात आपण आपले काम करावे. तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही; सद्‍गुरूच तो तुमच्याकरिता करीत असतात; तेव्हा तुम्ही कशाचीही काळजी करू नये. जे होईल त्यात आनंद मानीत राहावे. सद्‍गुरुदर्शनाने पूर्वकर्मे, पापे, जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्‍गुरू घेतात. तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसून नये आणि काळजी करू नये, समाधानात आणि आनंदात असावे.
प्रपंच देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ. परमेश्वराचे स्मरण ठेवून तोच कर्ता आहे असे मानणे, आणि सर्व काही त्याच्याकरिता करणे, म्हणजे देवाला अर्पण केल्यासारखेच आहे. फक्त कर्माच्या शेवटीच कृष्णार्पण म्हणणे, म्हणजे इतर वेळ त्याला विसरला असे नाही का होत ? देवापाशी 'मला तू आपला म्हण. हे मन तुझ्या चरणी अर्पण केले. मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न होवो.' असे मागावे. नाही तर, जो राज्य द्यायला समर्थ आहे त्याच्याजवळ केरसुणी मागितल्याप्रमाणे होईल. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे, मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते. 'तू जे देशील ते मला आवडेल,' असे आपण भगवंताला सांगावे, आणि भगवंताचे अखंड स्मरण ठेवावे. यापेक्षा भगवंताजवळ जायला दुसरा मार्ग कोणता असणार ?


१४९. ज्याच्या प्रपंचामधे पाठीराखा परमात्मा आहे,
त्याचा तोच परमार्थ होतो; ज्याचा पाठीराखा अभिमान आहे तो प्रपंच समजावा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 27, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २७ मे २०१४

२७ मे
निरभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच. 

 



प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे अत्यंत जरूर आहे. पण तो कुणाला शक्य आहे आणि कुणी करावा, याचा विचार करायला पाहिजे. ज्या शेतात पाणी भरपूर पुरून उरत असेल त्याच शेतातले पाणी बाहेर टाकता येते, आणि ते हितावहही होते. इतर शेतांच्या बाबतीत ते होत नाही, अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचाच आधी विचार करणे जरूर आहे. हीच दृष्टी परोपकार करणार्‍या व्यक्तीने ठेवावी. ज्या महात्म्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला, जगाच्या कल्याणाकरिताच जन्म घेतला, त्यांनाच परोपकाराचा अधिकार. मग प्रश्न येतो की, इतरांनी परोपकाराची बुद्धी ठेवू नये आणि तसा प्रयत्‍नही करू नये की काय ? तर तसे नाही. परोपकाराची बुद्धी आणि प्रयत्‍न असणेच जरूर आहे. परंतु परोपकार म्हणजे काय, आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल, हे पाहणे आवश्यक आहे. भगवंताची सेवा या भावनेने दुसर्‍याकरिता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल, आणि त्यापासून नुकसान होण्याची भिती नाही. परंतु हे वाटते तितके सोपे नाही. कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की, थोडेसे काही आपल्या हातून झाले की, "ते मी केले, मी असा चांगला आहे," अशा तर्‍हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो. सबब, ज्या ज्या वेळी दुसर्‍याकरिता काही करण्याची संधी मिळेल त्या त्या वेळी तिचा फायदा घेऊन मनाला शिकवण द्यावी की, "देवा, तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही कृपा झाली. अशीच कृपा ठेवून आणखी सेवा करवून घे." ही विचारसरणी जागृत राहिली नाही, तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही. म्हणून अत्यंत जपून वागणे जरूर आहे. परोपकार याचा सरळ अर्थ पर-उपकार; म्हणजे दुसर्‍यावर केलेला उपकार. यावरून असे लक्षात येईल की, परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते. एक उपकार करणारा, आणि दुसरा उपकार करून घेणारा. जगातल्या सर्वसामान्य व्यक्ति पाहिल्या, तर आपल्या स्वतःवरून असे दिसते की, मी एक निराळा, आणि प्रत्येक व्यक्ति आणि वस्तुमात्र गणिक सर्व जग निराळे. मनाच्या या ठेवणीमुळेच जर आपल्या हातून दुसर्‍याचे कधीकाळी एखादे काम होण्याचा योग आला, तर 'मी दुसर्‍याचे काम केले' ही जाणीव होऊन अहंकार झपाट्याने वाढू लागतो. म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे. नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होते.



१४८. जगात परोपकारी म्हणून नावाजलेले, पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले
मोठेमोठे लोकसुद्धा मानाबिनात कोठेतरी अडकल्यावाचून राहणार नाहीत.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 26, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २६ मे २०१४

२६ मे
भगवंताचे स्मरण ही सद्‍बुद्धी. 




परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे, सर्व विश्व व्यापून आहे. मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येकाला का होत नाही ? ज्याची भावना प्रगल्भ झाली असेल, त्यालाच परमेश्वराचे अस्तित्व जाणवेल, इतरांना नाही. म्हणून तशी भावना असणे जरूर आहे, आणि ती उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराच्या स्मरणाची आवश्यकता आहे. मी नामस्मरण करतो असे जो म्हणतो, तो माझ्यावर उपकार करतो असे मला वाटते; कारण जी व्यक्ति नामस्मरण करते, ती स्वतःचा उद्धार करून घेत असते, म्हणजे पर्यायाने माझ्यावर उपकारच करीत असते.
बुद्धिवाद्यांना एक शंका अशी येते की, परमेश्वर हा जर बुद्धिदाता आहे, तर मग दुर्बुद्धी झाली तर तो दोष माणसाचा कसा म्हणता येईल ? याला उत्तर असे की, बुद्धिदाता परमेश्वर आहे हे अगदी खरे; पण त्या बुद्धीची सद्‍बुद्धी किंवा दुर्बुद्धी का होते हे पाहणे जरूर आहे. प्रकाश-काळोख या दोहोलाही कारण सूर्यच असतो. सूर्याचे अस्तित्व हे उजेडाला आणि नास्तित्व हे काळोखाला कारण आहे. तसे भगवंताचे स्मरण हे सद्‍बुद्धीला आणि विस्मरण दुर्बुद्धीला कारण आहे. म्हणून, बुद्धीदाता परमेश्वर हे जरी खरे असले, तरी सद्‍बुद्धी वा दुर्बुद्धी ठेवणे हे मनुष्याच्या हातात आहे. भगवंताचे स्मरण ठेवले म्हणजे दुर्बुद्धी होणार नाही. म्हणून नेहमी भगवंताच्या स्मरणात राहावे; आणि याला उपाय म्हणजे नामस्मरण. सर्व सोडून भगवंताच्या स्मरणात राहिले पाहिजे. परंतु व्यवहार नीट करून त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवणे, हे त्याहीपेक्षा श्रेष्ठ होय. भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला आजचा दिवस आपण त्याच्याकडेच लावणे जरूर आहे. भगवंताचे अनुसंधान ठेवले म्हणजे दिवस त्याच्याकडे लागतो. अशा रीतीने आजचा दिवस भगवंताच्या अनुसंधानात घालविला तर आपल्याला नित्य दिवाळीच आहे. अनुसंधानात स्त्री-पुरुष, श्रीमंत-गरीब, हे भेद नाहीत. इतर साधनांनी जे साधायचे, ते नुसत्या अनुसंधानाने साधते. हाच या युगाचा महिमा आहे. इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र करणे, याला अनुसंधान असे म्हणतात. भगवंताचे अनुसंधान हेच खरे पुण्य होय, आणि हीच आयुष्यात मिळविण्याची एकमेव गोष्ट आहे. एक भगवंताचे अनुसंधान ठेवा, म्हणजे इतर सर्व गुण आपोआप मागे चालत येतील. भगवंताला अनन्यभावे अशी प्रार्थना करावी की, "देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नको."


१४७. नाम व अनुसंधान चोवीस तास चालायला पाहिजे.
तेथे दुसरी एखादे गोष्ट वेळेवर न झाली तर त्याचा आग्रह नसावा.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 25, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २५ मे २०१४

२५ मे
आनंद मिळविण्यासाठी वासना भगवंताकडे वळवावी. 

 

घरामधे कसे हसूनखेळून मजेत असावे. आपली वृत्ती अशी असावी की, ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी. इतर संपत्ति कितीही दिली तरी पुरे पडत नाही. पण वृत्तीचा आनंद देऊन कधी संपत नाही. जीवन हे मूलतः आनंदमय आहे; सृष्टिक्रमावर सोडले तर ते सुखी होईल. आनंद अत्यंत विशाल आहे. देहबुद्धी मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते. आनंद मिळविणे हे सोपे आहे. पण हे समजून, आपण सोपे झाले पाहिजे. आपण उपाधीने जड झालो आहोत, म्हणून आपण हलके झाले पाहिजे. सर्व जगाला आनंद हवा असतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा. आनंद हा शाश्वत आहे. पण आपण विषयातच आनंद मानतो, त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही. फोड आला म्हणजे खाज सुटते, आणि खाजवल्यावर रक्त आले तरी एक प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो. पण म्हणून खाजवतच राहणे योग्य होईल का ? कुत्र्याच्या तोंडात हाड असताना, स्वतःच्या तोंडातले रक्तच तो चघळत असतो. त्यातले काही रक्त जमिनीवर पडून कमीही होत असते. परंतु तो हाडूक काही सोडीत नाही. विषयाचा आनंद हा असाच असतो. कोणतीही वस्तु अस्तित्वात नसतानाही होणारा आनंद, ते परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे.
वासना भगवंताकडे वळविली की मग आनंदाशिवाय दुसरा कोणता लाभ होणार ? खरोखर, वासना ही विस्तवासारखी आहे. ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करून कढत आणि ताजे अन्न खायला मिळते, तोच विस्तव जर घरावर ठेवला, तर घर जाळून टाकतो. त्याप्रमाणे वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरूप बनविते; पण ती जर विषयाकडे वळली तर त्याला दुःखामध्ये लोटते. वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखविते. म्हणजे खेळ जुनेच असतात, पण आपली वासना मात्र नवी असते. वासना म्हणजे अभिमान किंवा मीपणा, हा मनुष्याचा शत्रु असून तो त्याच्या आनंदावर विरजण घालतो. वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कळत असूनसुद्धा, वासनेचा जोर इतका विलक्षण असतो की तो शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही. ज्याने वासनेला जिंकले, त्याच्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून समजावे. वासनेला जिंकायला भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा उपाय नाही. वासना न ठेवता कर्म करणे याचेच नाव संन्यास. जिथे वासना संपली तिथे आनंदच आहे.


१४६. चिरकाल टिकणारा आनंद हा वस्तुरहित असतो.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 24, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २४ मे २०१४

२४ मे

नाम प्राणाबरोबर सांभाळावे. 

 



आपल्याला जिव्हा दिली आहे ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगले होईल का ? जे करण्याने देवाची प्राप्ती होते, ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालविला तर कसे चालेल ? तुम्ही अभ्यास करता; अभ्यासाकरिता जी पुस्तके घेतली ती जर नुसती उशाला घेऊ लागलात तर अभ्यास होईल का? म्हणून म्हणतो, आपल्याला जिव्हा दिली आहे, तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरिता करा. प्रकृती चांगली सुदृढ आहे; चांगले धट्टेकट्टे पाय आहेत; ते जर देवाच्या प्राप्तीकरिता वापरले नाहीत, तर पाय नसलेले काय वाईट ? तुमच्यापुढे ब्रह्मानंदबुवांचे प्रत्यक्ष उदाहरण असून असे का करता ? त्यांनी काय केले पाहा! त्यांनी नामस्मरणरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही. त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळले. तुम्हाला तितके जरी करता आले नाही तरी, जसे देहावर प्रेम करता तसे तरी नामावर ठेवा. आताच्या दिवसांत तर कलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालवायला कारण होतो; तरी ह्या वेळेस सांभाळा. अश्रद्धा उत्पन्न झाली तर आपले पापच आड येते असे समजा; आणि त्या वेळेस नामस्मरण करीत जा. माझ्यावर व्यवहाराबाबत पाहिजे तर विश्वास ठेवू नका, पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर विश्वास ठेवा.
नाम व्यवहाराकरिता उपयोगांत आणू नका. नामस्मरण नामाकरताच करीत जा; आणि काही वेळ तरी नामांत घालविण्याचा निश्चय करा; म्हणजे विश्वास वाढत जाईल. खरे समाधान तुम्हाला नामांतच मिळेल. भगवंताचे नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे. नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे. सर्व संशय आपोआप नाहीसे होतील. खरोखर, भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे. वेळप्रसंगी ते खास उपयोगी पडते. विकल्पांच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे नाम होय. भगवंताला अनन्य शरण जाऊन `तुझ्या नामाचे प्रेम मला दे' अशी काकुळतीने त्याची प्रार्थना करावी, म्हणजे नामाचे प्रेम आपोआप वाढेल आणि भगवंताचे खरे दर्शन घडेल.
वासनेमुळे माझ्या आनंदाचा भंग होतो; म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरीच करते. ज्या समाधानाकरता माझी खटपट चाललेली असते, ते समाधानच वासना हिरावून नेते. नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते. म्हणून, सदासर्वकाळ नामात राहिले, तर हळूहळू तिचा अंत हो‍ऊन केवळ आनंदच आपल्याजवळ राहील.

१४५. आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा.
पहिल्या पहिल्याने विसरेल, पण सवयीने आपोआप आठवेल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 23, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २३ मे २०१४

२३ मे

देवाकरिता स्वतःला विसरावे. 

 



तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही ? हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरिता विसरतो. स्वतःला विसरावे, पण ते विषयाकरिता विसरू नये. एखादे वेळेस असे होते की, एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपले आपल्यालाच समजत नाही. अशा वेळी देह भानावर नसतो हेच खरे. त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे होते. थोडक्यात म्हणजे, आपण जेव्हा विषयाच्या आधीन होतो, तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो. त्याचप्रमाणे क्रोधाचे होते. विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच; परंतु देवाकरिता जर आपण आपल्याला विसरलो, तर ते फारच उत्तम. भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे. आपण आता तसे करतो का ? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो; ते खरे भजन होत नाही. म्हणून भजन करावे आणि तशी सवय ठेवावी, म्हणजे देहभाव विसरता ये‍ईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा; म्हणजेच, विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वतःची आठवण ठेवून प्रंपच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही.
व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावे, पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता, त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे; म्हणजे देहभाव आपोआप नष्ट हो‍ऊन जाईल. हे सर्व साधायला, परमेश्वराला शरण जाणे हा एकच सोपामार्ग आहे; आणि त्याकरिता नामस्मरणात राहणे हेच साधन आहे. कोणी बारा अन बारा चोवीस वर्षे साधनात राहूनही काही काम झाले नाही असे म्हणतात, आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात; तेव्हा अशा लोकांतच अर्थ नसतो, की गुरूत काही नसते ? तर आपले आपणच याला कारणीभूत असतो हे पक्के समजावे. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का ? त्याप्रमाणे, विषय बरोबर घेऊन गुरूकडे गेलो, तर गुरूची खरी भेट होईल का ? ती शक्य नाही. याकरिता, ते सांगतील ते साधन आधी करावे म्हणजे चित्त शुद्ध होते, आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरे समाधान मागावे. आणि ते मिळाल्यावर आणखी काय मिळवायचे राहते ? मग तो ज्या स्थितीत ठेवील त्यातच समाधान होते. देहभोगाची अशा वेळी काहीच किंमत राहात नाही, आणि मग त्याला कंटाळण्याचेही कारण उरत नाही.


१४४. परमात्म्याचे स्मरण । यातच विषयाचे विस्मरण ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 22, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २२ मे २०१४

२२ मे

गुरूवर अत्यंत श्रद्धा ठेवावी. 

 



कुस्त्या खेळून, झगडून, शरीरबळ वाढते; अवघड उदाहरणे सोडवून बुद्धिबळ वाढते; तसेच, आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढते. आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुद्धी कमी होणे; आणि ते करण्याकरिताच परमेश्वर संकटे धाडतो; पण तुम्ही त्यांना भिता याला काय करावे ? अशा परिस्थितीत, संकटे परत घेणे म्हणजे तुमचे अनहित करणे होय. त्याला तुमचे हित कशात आहे हे उत्तम कळते. भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे. दुखणे आले असता औषध घ्यावे. पण औषधात गुण तरी परमात्म्यानेच ठेवला ना ? औषधाने तरी गुण हमखास येतोच असे थोडेच आहे ? एकाला येतो, एकाला नाही. ज्याचे ज्यात हित होणे असेल तसे तो परमात्मा करतो हे लक्षात ठेवावे. तुम्ही एकच करावे, परमात्म्याला शरण जाऊन, "हा भोग भोगण्याची मला ताकद दे, समाधान भंगू देऊ नकोस, तुझे सतत स्मरण व्हावे." असे मागावे. दुखणे भोगायचे आहे तर ते समाधानाने का नाही भोगू ? प्रारब्धाचे तुमच्या डोक्यावरचे ओझे, कर्ज, तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार ? दुखणे आले असता त्याची उपेक्षाच करावी, म्हणजे आपोआप ते कमी होईल.
मी म्हणजे अमुक एक, अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते, तशी देव आहे अशी खात्री पाहिजे. आपले सद्‌गुरू देवच आहेत अशी आपली खात्री झाली, म्हणजे आपल्या सद्‍गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल. माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली, तुम्हाला जे पसंत तसे तुम्ही केले. वास्तविक, माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे, माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्वांभूती भगवद्‍भाव ठेवून कुणाचे मन न दुखवणे, परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे, माझ्या सांगण्याचा परिणाम न होण्याची दोन कारणे असतील. एक कारण असे की, तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्तीच माझ्यामध्ये नसेल; किंवा दुसरे कारण असे की, तुम्ही अभ्यास करीत नसाल. पण परमार्थात एकदम फरक होणे बरे नव्हे. समजा, एखाद्याला आज १०५ ताप आहे आणि उद्या तो एकदम ९५ झाला, तर ते बरे नाही. तसेच, मनुष्य आज रागीट आणि उद्या एकदम शांत झाला तरे तेही बरे नव्हे. आपल्यामधे हळूहळू परिवर्तन व्हावे, आणि ते विवेकाने घडवून आणावे.


१४३. भजन, पूजन, नामस्मरण इत्यादि आपण जे करतो. ते आपल्या
मनापर्यंत पोहोचले पाहिजे. तरच त्याचा योग्य परिणाम लवकर दिसू लागेल.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 21, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २१ मे २०१४

२१ मे

अट्टाहासाने नामस्मरण करावे. 

 

 

नामाइतके सूक्ष्म आणि स्थूल साधन नाही. एखादी गोष्ट अगदी कळकळीने सांगायची झाली म्हणजे 'अगदी बेंबीच्या देठापासून सांगतो; असे आपण म्हणतो. त्याप्रमाणे नामही बेंबीच्या देठापासून घ्यावे, कारण सर्व वासनांचा उगम तिथेच अहे. आपण नामाची वस्ती तिथे ठेवून दिली म्हणजे आपोआप वासनाक्षय होईल. उगीच वरवर नामस्मरण करू नये. ते अट्टाहासाने आणि अंतःकरणपूर्वक घ्यावे, यातच खरे हित आहे. आता वासनाच मेली तर आम्ही विषय कसे भोगू, याची नाही काळजी करू.
भगवंताची सत्ता जाणली की त्याला सहज जाणता येते. जो जाणेल भगवंत त्याला म्हणावे संत. आपण खेड्यात गेलो की तिथले सभ्य आणि प्रतिष्ठित कोण याची चौकशी करतो. पाटील आम्हाला दिसतो, लोक सांगतात, म्हणून आम्ही त्याची भेट घेऊ शकतो. पण परमात्मा निर्गुण, निराकार, त्याची ओळख कशी करून घ्यावी कळत नाही. आम्हाला कळत नाहीत त्या सर्वच गोष्टी आम्ही कधी खोट्या मानतो का ? आपल्याला असणारी तळमळ ही भगवंताची म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे. नास्तिकाचासुद्धा पूर्णत्वाकडे ओढा असतो. तेव्हा या तळमळीला भगवंत हेच औषध आहे. कोणतीही गोष्ट तळमळी वाचून चांगली होत नाही. प्रत्येक जीवाला तळमळ आहे खरी,पण ती कशासाठी हवी ते चुकले. ती तळमळ विषयाकडे गेल्याने जीवाला खरे समाधान मिळत नाही. आपला जन्म वासनेत होतो, म्हणून वासनातृप्तीची तळमळ स्वाभाविक लागते. तिकडून काढून ती भगवंताकडे लावणे, यात माणसाची खरी कर्तबगारी आहे. काय केले तर मी भगवंताचा होईन, अशी तळमळ लागावी. ती न लागली तर आपले चुकले, वासनेच्या मागे जाणारी तळमळ भगवंताकडे लावण्यासाठीच सगळी साधने आहेत. तळमळ निर्माण झाली की भगवंत हात देतो.
जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही, की जे भगवंताच्या आनंदाला विरजण घालील. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे, आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे, तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन ? तर त्याचे कारण हेच, की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे. भगवंत हा प्रेममूर्ती आहे, म्हणून मंदिरात जिकडे तिकडे प्रेम भरून टाकावे. दुसरा काय करतो हे न पाहता, आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा.

१४२. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे.
भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप होते.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 20, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- २० मे २०१४

२० मे 

भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा.

 

  

दुःखाचे मूळ कारण । स्मरणांतून गेला रघुनंदन ॥
सर्व दुःखाचे मूळ । भगवंतापासून झालो दूर ॥
रामावाचून प्रपंचात नाही सुख । कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख ॥
कोळशाने हात काळा झाला । त्याने दुःखी कष्टी झाला ।
ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला । आपण मात्र नाही ओळखला ।
तैसा प्रपंच दुःखाचा झाला । भगवंतावाचून वाया गेला ॥
जगातील ऐश्वर्य, मानाची प्राप्ति । रामरायाविण समाधानाला न देती ॥
जे जे वैभव जगती । ते ते आले हाती ॥
वाया सर्व जाते । हाती न येता रघुपति ॥
परमात्म्याचे विस्मरण । हेच बीज जाणावे मूळ कारण ॥
काळजी, चिंता, अहंकार । भिती, तळमळ फार । हा झाला त्याचाच विस्तार ॥
तात्पर्य, कडू बी पेरले । त्याचे गोड फळ नाही आले ॥
काळजी आणि भिती । भगवंताच्या विस्मृतीत जन्मती ॥
म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानि । परमात्म्याला दूरच करतील दोन्ही ॥
व्यवहार, सद्वासना, सदाचरण । लौकिक, संतति, संपत्ति, शास्त्राचे मनन ।
सर्व काही वाटे रामाविण शून्य ॥ संतति, संपत्ति, लौकिकाची प्राप्ति ।
सर्व वैभव जरी आले हाती । तरी रामाविण आहे फजिती ॥
प्रपंची ठेवता दक्षता । न विसंबे रघुनाथा । तोच प्रपंची सुखी जाणा ॥
प्रपंच करावा सर्वांनी जपून । पण रामाचे स्मरण राखून ॥


सर्वस्वी व्हावे भगवंताचे । मी-माझे सोडोनि साचे ॥
भगवंताचे होऊन राहणे । याहून दुजे काही न करणे ॥
'मी कर्ता नव्हे' जाणून करी कर्म । त्याला बाधेना कलीचा मार्ग ॥
दुष्ट अभिमानाला न पडावे बळी । त्याचा मालक होईल कलि ॥
कलि जेथे शिरला । त्याने राम दूर केला ॥
भगवंताचे स्मरण सांभाळून । कोणताही करावा व्यवसाय जपून ।
हेच प्रापंचिकास मुख्य साधन ॥
कर्ता मी नव्हे, कर्ता राम । ही मनात जाणूनखूण । करावा व्यवहार जतन ॥
रामापरते हित । मानी त्याचा होई घात ॥
जोवर 'कर्ता मी' हे ध्यानी । तोवर मन न लागेल राघवचरणी ॥
मीपण टाकावा, अभिमान सोडावा ।
सुख येईल त्याचे मागे हा विश्वास बाळगावा ॥
ज्याने केले सर्वच रामास अर्पण । तेथे मीपणास नाही ठाव ठिकाण ॥
पापाचे न व्हावे आपण धनी । कर्ता राम जाणून मनी ॥
रामसेवेपरते हित । सत्य सत्य नाही या जगात ॥
म्हणून रामास व्हावे अनन्य शरण । दुःख दूर व्हावयास मुख्य साधन ॥
मनाने होऊन जावे भगवंताचे । त्याने खास केले सार्थक जन्माचे ॥
म्हणून त्याचे भाग्य थोर जाणा । ज्याने जोडला रामराणा ॥
ज्याने देह केला रामास अर्पण । धन्य धन्य त्याचे जीवन ॥

१४१. अखंड असावे भगवंताचे स्मरण । तो दूर करील दुःखाचे कारण ॥


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 19, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १९ मे २०१४

१९ मे

भगवंताचे प्रेम वाढविण्याची कृती करावी. 

 



जगात देवाणघेवाण हा नियमच आहे. लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकात बसवितात, आणि मग उत्तम रीतीने सांधा बसतो. त्याप्रमाणे, प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले, तर परस्परप्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल. याकरिता विचाराने आणि काळजीने वागणे जरूर आहे. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भितीचा धाक असू नये. जसे आई आणि मुलांचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लावावे आणि त्याप्रमाणे आपण वर्तन ठेवावे. असा नियम आहे की, ज्याला आतबाहेर भगवंताचे प्रेम आले, तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसर्‍याला झाला, की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो. भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे; ते ज्याला लाभेल तो भाग्याचा खरा ! एक भगवंताचे प्रेम लागले, की वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात. पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही. भगवंताचे प्रेम वाढले की ती आपोआप कळू लागते. एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर, पोटामध्ये भूक असूनसुद्धा, त्याला खाता येत नाही, किंवा अन्नाची चव लागत नाही. त्याचप्रमाणे, आतमध्ये भगवंताचे प्रेम असूनसुद्धा, आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही. तोंड बरे व्हायला जसे प्रथम औषध घ्यावे, त्याचप्रमाणे, नामाची गोडी यायला आपण प्रपंचाची आसक्ति कमी करावी. ही प्रपंचाची आसक्ति सोडणे किंवा कमी करणे, हे फार कठीण काम आहे. त्याकरिता भगवंताबद्दल आपलेपणा, अनुसंधान, आणि सत्संग हेच तीन उपाय आहेत. भगवंत हा बहुरूपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असा आहे, म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधने असली पाहिजेत. ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपले साधन करील, पण या सर्व साधनांच्यामध्ये भगवंताचे प्रेम हे सर्वसामान्य असले पाहिजे. भगवंताचे प्रेम येईल, तो सृष्टीकडे कौतुकाने पाहील. खरोखर, भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काहीही येऊ शकत नाही. भगवंताच्या नामाला नीति हे पथ्य आहे. ते सांभाळून जो वागेल, त्याचे भगवंतावरचे प्रेम वाढेल. भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंत हा कष्टसाध्य नसून सुलभसाध्य आहे. जो हीनाहून हीन आणि अडाण्यांतला अडाणी आहे, त्यालासुद्धा मिळणारा असा भगवंत आहे.




१४०. ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते, त्याने नाम घेणे हाच एक मार्ग आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 18, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १८ मे २०१४

१८ मे

वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी. 

 



माझा देह परमार्थाच्या आड येतो हे म्हणणे खरे नाही. तो मदत करतो किंवा आड येतो, या दोन्हीत विशेष तथ्य मानू नये. माझी वृत्ती कुठे गुंतते ते पाहावे. भगवद्‌भजनात दिवस घालवावा असे वाटू लागले, पण संगत मिळाली खेळ खेळणार्‍याची. तेव्हा त्याचे मन कशाला मोडा असे म्हणून खेळ खेळू लागाला, भगवंताच्या स्मरणात राहण्याच्या वृत्तीपासून ढळू लागला, तर कसे होणार ? आईने आजवर खस्ता खाल्ल्या, लहानाचे मोठे केले, तीच आई लग्न झाल्यावर विषयाच्या आड येऊ लागली आणि म्हणून वैर्‍यासारखी वाटू लागली ! वास्तविक, दोघांच्याही देहांत फरक होण्यासारखे असे काहीच झाले नाही; पण वृत्तीत बदल झाला. विषयातच मी गुंतून राहू लागलो, याला काय करावे ?
'मी सुखी कशाने होईन' हे आपण आपल्या कल्पनेनेच ठरवले; पण या जगात पूर्ण सुख किंवा पूर्ण दुःख असे काही आहे का ? जे खरे असेल किंवा खोटे असेल याची आपल्याला खात्री नाही, त्या बाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करीत बसतो. दुसरा मनुष्य ज्या वेळी आपल्याला त्रास देतो, त्या वेळी त्यामध्ये पन्नास टक्के आपली कल्पना असते. बाकी उरले पन्नास टक्के; त्याबद्दल 'त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही' ही वृत्ती असावी, म्हणजे संपले ! आपली वृत्ती सारखी बदलते आहे, आणि जगही सारखे बदलते आहे. त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक परिस्थितीमुळे दुःख होते हे वाटणे खरे नव्हे, कारण सुखदुःख अस्थिर असते. शास्त्रांचे नियम हे वृत्तीला स्थिर करतात. भजन, पोथ्यावाचन, मंदिर बांधणे वगैरे गोष्टी जर वृती सुधारण्यासाठी न केल्या तर ती नुसती करमणूक होते, त्यापासून खरा फायदा होत नाही. आगगाडी रोज काशीला जाते, पण तिला काही काशीयात्रा घडत नाही. यात्रा घडते ती आत बसलेल्या लोकांना. गंगास्नान, विश्वेश्वराचे दर्शन वगैरे आतल्या लोकांना घडते. त्याचप्रमाणे, देहाने नुसता पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही.. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. भगवंताचे रूप सारखे समोर ठेवता येणार नाही, पण त्याचे रूप लक्षात आले नाही तरी आपण त्याचे नाम घेतो हे लक्षात राहिले तर वृत्ती सुधारेल. आपल्या डोळ्यात अगदी बारीक कण गेला तरी तो खुपतो. त्याहीपेक्षा वृत्ती सूक्ष्म असते. ती भगवंताला कळते, म्हणजे त्याच्यापाशी लबाडी चालत नाही. विषयाचा भोग आला असता जो त्यामध्येच गुंतत नाही, त्याच्यावर भगवंताची खरी कृपा झाली असे समजावे. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या स्मरणात राहणे, त्याच्या नामात राहणे, यांत खरे समाधान, शांती आणि सुख आहे.



१३९. वृत्ती स्थिर होणे, शांत होणे, याचे नाव समाधान,
आणि भगवंताकडेच वृत्ती सारखी राहणे याचे नाव समाधी होय.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 17, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १७ मे २०१४

१७ मे

मी भगवंताचा आहे ही अखंड जाणीव ठेवावी. 

 

   

आपल्याला काही हवे असे वाटले आणि ते तसे झाले नाही, म्हणजे तळमळ लागते. परंतु सर्व परमात्माच करतो आहे असे मानले, म्हणजे काळजीचे कारण उरत नाही. आपण 'देव आहे' असे मानतो, पण आपला तो खरा विश्वास आहे का ? एकादा मनुष्य बुडायला लागला, म्हणजे दगड जरी त्याच्या हाताला लागला तरी हा आपल्याला तारील असा त्याला विश्वास वाटतो, आणि तो त्याला धरून आपणही त्याच्या बरोबर बुडतो. म्हणून म्हणतो, 'देव आहे' असा आपला खरा विश्वास नसतो, आपण नुसते तोंडाने म्हणतो एवढेच ! नाही तर आपल्याला काळजी का वाटावी ? प्रत्यक्ष देव पुढे उभा राहिला तरी आपल्या मागची काळजी आणि सुखदुःखे संपणार नाहीत. याचे कारण म्हणजे, परमेश्वरावरचा आपला विश्वासच डळमळीत असतो. वास्तविक, परमेश्वराची इच्छा प्रमाण मानल्यावर सुखदुःख मानण्याचे कारण नाही. परमेश्वर सर्वव्यापी आहे. तो जसा माझ्यात आहे, तसा दुसर्‍यातही आहे; म्हणून दुसर्‍याने काहीही केले तरी आपल्याला त्याबद्दल काही वाटण्याचे कारण नाही. तरी अशी भावना ठेवून वागावे की, मी देवाचा आहे, तो माझा पाठिराखा आहे, आणि म्हणून काही झाले तरी मला काळजी करण्याचे कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्याने साधते. म्हणून मी आजपासून सतत नामस्मरण करीत राहणार असा निश्चय करावा, आणि त्या दृष्टीने प्रयत्‍न चालू ठेवावा. परमेश्वराला शरण जाऊन 'मला तसे वागण्याची बुद्धी द्यावी' म्हणून त्याची प्रार्थना करावी. मनाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी लागेल. लहान मुलांना शाळेत जाण्याकरिता सुरुवातीला थोडी बळजबरी करावी लागते. मुलीला प्रथम सासरी पाठवितानाही तसेच करावे लागते. आपण थोडा तरी नियम करावा. उदाहरणार्थ, जेवायच्या आधी, रात्री निजताना, सकाळी उठताना नाम घ्यायचेच; भगवंताची आठवण करायचीच. असे केले तर ते आयुष्यात उपयोगी पडेल. प्रपंचाचा प्रयत्‍न आज जो चालू आहे तसाच करीत जावा, पण 'मला भगवंत हवा' असे म्हणत जावे. मनामध्ये भगवंताची आस ठेवावी, म्हणजे हळूहळू ती वाढत जाईल, आणि तिचे पर्यवसान ध्यासामध्ये होईल. समजा एखाद्या माणसाला घर बांधावयाचे आहे; 'मला घर बांधायचे आहे' असे तो म्हणत जातो, आणि त्यासाठी पैसे शिल्लक टाकतो. दागिने करायची वेळ आली तर ते नको म्हणतो, कारण पुढे घर बांधायचे आहे. हे जसे खरे, त्याचप्रमाणे 'भगवंत मला हवा आहे' असे नुसते म्हणत गेल्याने देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरफटून न राहता, विषय बेताने भोगेल. खरा ध्यास लागल्यावर, ती वस्तू मिळाल्यावाचून चैन पडणारच नाही.




१३८. ज्याचा भगवंतावर विश्वास, त्याला समाधान खास !


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 16, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १६ मे २०१४

१६ मे

देह हा परमार्थाचे साधन समजावा. 

 



संतांचे काम तुम्हाला देहबुद्धीपासून सोडविणे हे आहे; तुम्हाला मुलगा देणे, तुमचे दुखणे बरे करणे, म्हणजे विषय देणे हे नव्हे. जो जो परमार्थाला लागावे तो तो देहबुद्धी तिथून ओढण्याचा जास्त जास्त प्रयत्‍न करते. विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे; ती मारून आपण शुद्ध केली पाहिजे. याकरिता भगवंताच्या स्मरणासारखा दुसरा उपाय नाही. कुत्रा हा आपल्याला रात्रीच्या पहार्‍याकरिता उपयोगी पडतो. पण तो कितीही चांगला अणि उपयोगी असला, तरी आपण त्याला पानात जेवायला घेऊन बसत नाही. त्याप्रमाणे देहाचेही आहे. आतल्या खोबर्‍याच्या रक्षणाकरिता ज्याप्रमाणे करवंटी, त्याप्रमाणे देहाला परमार्थाकरिता साधन मानावे. पण मनुष्य 'हा देहच मी आहे' असे मानून व्यवहार करतो. वास्तविक, आपण देहापासून निराळे आहोत असे पदोपदी दाखवित असतो. माझा हात, माझा पाय, माझा डोळा, माझे मन, फार काय माझा जीव असेही म्हणतो; पण वागतो मात्र 'मी तोच आहे' असे समजून. देहाशी संबंध जास्त येईल असेच आपण भगवंताजवळ मागतो. असे न करावे.
आपल्या देहावरचे प्रेम कमी होण्यासाठी, दुसर्‍यावर प्रेम करायला लागावे. प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी लागतो. कुत्रे रडत असले तर आपल्याला नाही वाईट वाटत; पण एखादे लहान मूल रडत असले तर वाईट वाटते. देवावर प्रेम करायला, देवाला आपल्यासारखाच देहधारी कल्पावा लागतो. म्हणून, आपले देहावरचे प्रेम कमी व्हायला, देहबुद्धी कमी व्हायला, सगुणमूर्तीचे, सद्‌गुरूचे ध्यान करावे लागते. ते जसजसे दृढ होत जाईल, तसतसे आपण स्वतःला विसरून जातो; आणि आपण देहाच्या पलिकडे गेलो, म्हणजे सद्‌गुरूचे खरे स्वरूप हे देहातीत आहे असे प्रत्ययाला येते. देहबुद्धी नष्ट होईल तसतशी सद्‌गुरूची ओळख होईल. ज्याने देहाभिमान नष्ट केला त्याचा मोठा ज्ञानीसुद्धा हेवा करतो. 'मी देह' म्हणावे, यापलिकडे दुसरे अज्ञान कोणतेही नाही. मी भगवंताचा असून देहाचा म्हणणे यासारखे दुसरे खोटे नाही. प्रपंचात संकटे येतात, तरी पण तो सोडावासा वाटत नाही; याहून भगवंताची माया ती कोणती ? अतिसहवासामुळे देहाचे ममत्व सुटत नाही. परमात्म्याचा सहवास, उदाहरणार्थ, देवाला जाण्याचा वा जप करण्याचा नेम केला, म्हणजे देहाचे ममत्व थोडे कमी होते. देहाच्या सहवासाने आपण देहाचे होतो, नामाच्या सहवासाने आपण परमेश्वराचे होऊ.


१३७. भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचे मरण आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 15, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १५ मे २०१४

१५ मे

कोणाचेही मन न दुखवता सर्वांशी प्रेमाने वागावे. 

 



ज्याला चार पैसे शिल्लक टाकावेत असे वाटत असेल त्याने पहिली कोणती गोष्ट करायची ती ही की कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये. हे साधले की मग, खर्च थोडा कमी करण्याचा यत्‍न करावा, म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते. तोच नियम प्रेमाला लागू असतो. प्रेम वाढावे असे वाटत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला मूठमाती देणे जरूर आहे. नंतर प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे. चुकूनसुद्धा कोणाचे मन दुखावणार नाही अशी दक्षता घेणे जरूर आहे. एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तर्‍हेने देहाला दुखापत केली, तर ती थोड्याफार वेळाने भरून निघेल, आणि त्याच्या हातापाया पडून माफी मागितली तर तो मनुष्य क्षमाही करील; पण मन दुखविण्या इतकी वाईट गोष्ट दुसरी नाही. मन दुखविणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखविण्यासारखे आहे; कारण, भगवंताने ज्या आपल्या विभूती सांगितलेल्या आहेत त्यांत 'मी मन आहे' असे सांगितले आहे.
सत्याचे व्रत चांगले आहे हे खरे, पण सारासार विचार प्रत्येक ठिकाणी अवश्य लागतो. एखादा मनुष्य असे म्हणाला की, मी एक सत्य तेवढेच जाणतो, आणि सत्य बोलताना आई, बाप, माणसे, देव, गुरू वगैरे कुणालाच ओळखत नाही, तर त्याला काय म्हणावे ? एक सत्य पाळण्याच्या नावाखाली जर असल्या पूज्य विभूतींचे अवमान करण्याचे दहा गुन्हे होत असतील, तर त्या सत्याला चांगले तरी कसे म्हणावे ? चोरी करण्याकरिता आलेल्या चोराला, त्याला चोरी करू दिली नाही तर त्याचे मन दुखावेल म्हणून चोरी करू देणे हे योग्य म्हणता येईल का ? सारांश, प्रत्येक गोष्टीत सारासार विचाराची गरज आहे. समजा, एका बापाला चार मुलगे आहेत; त्या चारांपैकी एकाला गोड आवडते, दुसर्‍याला आंबट आवडते, तिसर्‍याला तिखट आवडते, आणि चौथ्याला तेलकट आवडते. आता प्रत्येकाच्या या रुचि वैचित्र्यामुळे, जर ते भांडू लागले, तर भांडण कधीच मिटणार नाही. म्हणून भांडण मिटवायचे असेल, तर चौघांनीही एकमेकांच्या रुचीकडे दुर्लक्ष केले पाहिजे हे पहिले काम; आणि पुढे प्रेम वाढविण्याकरिता, ज्या एका बापाची आपण चार मुले आहोत, त्याच्याकडे दृष्टी ठेवणे हे दुसरे काम; म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून, आपण सर्व बंधू आहोत ही जाणीव डोळ्यांसमोर राहून प्रेमाचे पोषण होईल. कशाही परिस्थितीत एकमेकांशी सलोख्याने आणि प्रेमाने राहणे, या सारासार विचाराचे पालन प्रत्येक भावाने केले, तर कोणाचेही मन न दुखविता कुटुंबात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल.


१३६. साधकाच्या घरात इतके प्रेम असावे की ते सोडून जाणार्‍याला
पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असे झाले पाहिजे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 14, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १४ मे २०१४

१४ मे

विषयाची व लौकिकाची आस सोडावी. 

 



आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते. आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच. आवडच मुळी आपण विषयाची आणि लौकिकाची ठेवतो. साहजिकच, एकाची आसक्ति ठेवल्याने दुसर्‍याची विरक्ति येते. नोकरीच्या वेळेस आम्ही बायकामुलांना बाजूला सारून कामावर जातो ना ? मग साधनेच्या वेळी बायकोमुले आड येतात हे कारण का सांगावे ? बायको आणि पैका या दोन गोष्टी आमच्या आड येत असतात; असे आजवर अनेक संतांनी सांगितले. मग या निर्माण तरी का केल्या असे कोणी विचारतील. त्याला उत्तर म्हणजे, काड्याच्या पेटीने विस्तवही पेटविता येतो आणि घरही जाळता येते; त्याचा जसा आपण उपयोग करावा तसा तो होतो. खरे म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळच लागत नाही. एकजण मला म्हणाला की, "मला प्रपंच टाकावासा वाटतो." मी त्याला म्हटले, "नुसता प्रपंच टाकण्याने तुला वैराग्य कसे येईल ? वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते. तू आपला मीपणा टाकलास तरी खूप झाले. "
चांगले कर्म आड येत नाही असे थोडेच आहे ? वाईट कर्म कुणाला सांगण्याची तरी आपल्याला लाज वाटते, पण सत्कर्म अभिमानाने ज्याला त्याला सांगत सुटतो. 'मागील जन्मी पाप केले होते म्हणून या जन्मी हे भोगतो' असे म्हणतो; आणि 'आता चांगले कर्मे करतो म्हणजे पुढल्या जन्मी सुख लागेल' असे म्हणतो. म्हणजे जन्ममरण्याच्या फेर्‍यातून सुटण्याऐवजी त्याच्यात गुंडाळले जाण्यासारखेच झाले ! दुष्कर्मामुळे पश्चात्ताप होऊन एकदा तरी भगवंताची आठवण होईल; परंतु सत्कर्माचा अहंकार चांगल्या माणसालाही कुठे नेऊन सोडील याचा पत्ता लागणार नाही.
राजासुद्धा योग्य मार्ग दाखविण्यासाठी आपल्या संगतीला चांगला माणूस ठेवतो. भगवंताने उद्धवालाही 'सत्समागम कर' म्हणून सांगावे, याहून अधिक काय पाहिजे ? कडू कारले खाल्ले तर कडूपणाचीच प्रचीती होते मग विषयाच्या प्राप्तीने जीवन गोड कसे होईल ? 'प्रेम येईल तेव्हा भगवंताची भक्ति करीन' असे म्हणू नये. विषयासाठी आपण मरमर काम करतो आणि तेवढे करूनही सुख लाभत नाही' मग भगवंताचे नाव न घेता, प्रेम येत नाही हे म्हणणे किती वेडेपणाचे आहे ! लग्नाआधी मुलीला दहापाच जणांना दाखविली तरी, लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे त्यांतला एकच नवरा असतो आणि बाकीच्यांची तिला आठवणही राहात नाही, त्याप्रमाणे, आम्ही एकदा रामाचे झालो, म्हणजे त्याच्याशी लग्न लावले, म्हणजे मग विषयांचे प्रेम कुठे आले ?

१३५. भगवंताच्या नामाची गरज दोन तर्‍हेने आहे :
एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी, आणि दुसरी, भगवंताच्या प्राप्तीसाठी.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 13, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १३ मे २०१४

१३ मे

स्वतःला सुधारण्याचा प्रयत्‍न करावा. 

 



वास्तविक काही न करणे, आपण काही करतो आहोत किंवा आपल्याला काही करायचे आहे असे न वाटणे हाच परमार्थ. देहाने, मनाने एकसारखी चळवळ करायची आपल्याला सवय लागली आहे. देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण, मनाला स्वस्थ बसायला लावणे त्यापेक्षा कठीण, आणि देहाने कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसविणे हे अत्यंत कठीण. मनाला खरे म्हणजे स्वास्थ्य हवे; पण ते मिळविण्याकरता साधन, म्हणजे प्रयत्‍न करणे जरूर आहे. मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणे तीन, एक आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे; दोन, मागच्या बर्‍यावाईट कर्मांची आठवण होणे; आणि तीन, उद्याची काळजी लागणे. आता, जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार, मग सर्व तुमच्या इच्छेप्रमाणे कसे चालतील ? तुमच्या इच्छेविरुद्ध गोष्टी होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडू न देण्यासाठी, आपली इच्छाच नाहीशी करावी; अमुक गोष्ट मिळावी ही बुद्धीच नाही ठेवू; हाव सोडावी, लोकांची आस सोडावी; जे काही होते ते 'रामाच्या इच्छेने झाले' म्हणावे. प्रत्येक गोष्ट 'रामाने केली' म्हणणे, म्हणजे अखंड भगवंताच्या अनुसंधानात रहणे.
आपला अहंपणा किती खोल गेला आहे पाहा ! समोर दिसत असलेल्या गोष्टीकडे बेमालून डोळेझाक करून, आपण आपल्या दोषांचे खापर बिनदिक्कत दुसर्‍यावर फोडायला तयार होतो. अमक्या तमक्याच्या नादाने आपला मुलगा बिघडला असे आपण म्हणतो, कारण आपलाच मुलगा खराब हे म्हणवत नाही ! ते म्हणण्याची लाज वाटते, म्हणून दुसर्‍याच्या मुलाला आपण वाईट म्हणतो. आपला मुलगा आपल्या डोळ्यादेखत संगतीच्या योगाने एवढा बिघडतो, तर मग संगतीचा परिणाम केवढा असला पाहिजे ! संगतीचा परिणाम जर एवढा मोठा आहे, तर संतसंगतीत असताना आपल्यात सुधारणा का दिसू नये ? संतसंगतीने मग आपण निश्चित सुधारायला पाहिजे ! पण तसे तर दिसत नाही; मग नडते कुठे ? याचे मुख्य कारण म्हणजे, आपण स्वतःला सुधारण्याचा प्रयत्‍नच करीत नाही. आपल्याला सर्व समजते, परंतु प्रयत्‍न करायला नको ! वासनेच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्‍न करीत नाही. त्यामुळे वासनेतच आपण जन्माला येतो, आणि वासनेतच आपला अंत होतो. याकरिता एकच खात्रीचा उपाय आहे, आणि तो म्हणजे भगवंताला अनन्यभावाने शरण जाणे. "रामा, तुझ्यावाचून माझी यातून सुटका नाही. तू ठेवशील त्यात मी आनंद मानीन. तुझे प्रेम मला लागू दे," असे कळकळीने रामाला सांगावे, आणि सदैव त्याचे नाम हृदयात ठेवावे. तो उदार परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री बाळगा.

१३४. वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 12, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १२ मे २०१४

२ मे

कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी. 

 



अमानित्व हा देहाचा धर्म आहे. दुसर्‍याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. दंभ हा मनाचा धर्म आहे. तो दुसर्‍याला फसविण्याकरिता नसावा. स्वतःचे कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही. अहिंसा हा देहाचा धर्म आहे. अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते. वाचेने कोणाचे मन दुखवू नये, आणि देहाने परपीडा करू नये. दुसर्‍याचे दोष सांगणे हे हीनपणाचे लक्षण आहे. लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो, पण दंभ आणि हिंसा अनेक जन्माचा घात करतात. द्वेषामुळे हिंसा घडते, म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये. कामक्रोधादि सर्वच विकार भगवंताच्या आड येतात, पण वैर आणि द्वेष यांसारखा नाश करणारा शत्रू नाही. स्वार्थामुळे द्वेष घडतो. स्वार्थ जायला नामासारखे दुसरे साधन नाही.
आपली वाचा दुसर्‍याला शिकविण्यासाठी आणि मोठेपणासाठी नाही. वाचेने म्हणजे जिभेने बोलता येते आणि खाता येते. नेहमी सत्य आणि गोड बोलावे, आणि खाण्याच्या बाबतीत जीभ आपल्या ताब्यात ठेवावी. स्वतःची चित्तशुद्धी करून घेऊन, संतांचे गुण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्‍न करावा. अभिमानाचे विष जिथे येते, तिथे नामाची आठवण ठेवावी. हिरण्यकश्यपूच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असे नाही; पण कुंपण फार वाढल्याने शेत दिसेनासे व्हावे, तसे हिरण्यकश्यपूचे झाले. स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्यकश्यपू अभिमानाने विसरला. त्यामुळे भगवंताला खांबात दिसावे लागले. अभिमान जरूरीपुरताच ठेवावा. 'मी रामाचा आहे' असा अभिमान धरावा. नामाची कास धरावी. 'नारायणाचे दर्शन व्हावे' असे नाही प्रह्लाद म्हणाला, 'नाम सोडणार नाही' असे म्हणाला.
लहानपणाची वृत्ती चांगली असते. लहानपणात चूक नाहीच, आणि सगळा फायदाच असतो. भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पान्हा फुटायचा नाही; म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावे. लहानपण हे वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून असते. कोणाविषयीही वाईट विचार मनात आणू नयेत; त्यापासून आपलेच मन गढूळ होते. 'माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा होवो, पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस,' असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे. मला खात्री आहे, तो तुमच्या साहाय्याला आल्यावाचून राहणार नाही.

१३३. वृत्ती स्थिर करण्यासठी तिला स्थिर वस्तूवर
चिकटवून ठेवली पाहिजे. भगवंत ही अशी एकच वस्तू स्थिर आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 11, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ११ मे २०१४

११ मे 

थोडे वाचावे पण कृतीत आणावे. 

 



खूप समजून घ्यावे, ज्ञान संपादन करावे, असा पुष्कळ लोकांचा हव्यास असतो, आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हे एक प्रकारचे व्यसनच आहे. अफू खाणार्‍याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही. थोडी अफू पचनी पडली की, कैफ येत नाही म्हणून तो आणखी अफू कैफ येईपर्यंत खातो. असे होता होता अधिकाधिक अफू पचनी पडत जाते, आणि शेवटी इतकी अफू खाण्याची वेळ येते की त्यातच त्याचा अंत होतो. ज्ञान संपादनाचे असेच आहे; म्हणून थोडेच वाचून, समजून घ्यावे, आणि ते कृतीत आणावे. नाही तर जन्मभर ज्ञान संपादण्यात वेळ जातो, आणि कृति न झाल्या कारणाने पदरात काहीच पडत नाही. मनुष्याला पोटभर जेवायला पंचवीस-तीस मिनिटे पुरेशी होतात, पण जेवलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी पाचसहा तास जावे लागतात. मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन तब्येत बिघडेल, आणि त्यातच त्याचा अंत होईल. म्हणून नुसते वाचीतच बसू नये. थोडेच वाचावे, पण ते कृतीत आणण्याचा प्रयत्‍न करावा. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते. म्हणून केवळ समजावून घेण्यापेक्षा, ते कृतींत आणण्यावर भर असावा. आपले आकुंचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहोत ते निःस्वार्थी बनणे, हेच खर्‍या वेदांताचे मर्म आहे. नुसत्या विचाराने तत्त्वज्ञान निश्चित होणार नाही. त्यासाठी साधन करायला पाहिजे. जग सुधारायच्या नादी लागू नका; स्वतःला सुधारा की त्या मानाने जग सुधारेलच. आपण सुधारलो नाही तर मग जग सुधारले नाहीच !
वस्तू ही सुखाचे साधन असून आपण भ्रमाने तिलाच सुखरूप मानतो. याचा परिणाम असा होतो की, वस्तूच्या साहाय्याने सुख मिळविण्याचा प्रयत्‍न करण्याऐवजी आपण वस्तूच जास्त मिळविण्याच्या मागे लागतो, आणि शेवटे दुःखी बनतो. कर्माला सुरुवात करताना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख होते; कर्म करीत असताना, फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते. कर्म संपून फळ मिळाले नाही तर दुःख होते; आणि फळ मिळालेच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन, फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दुःख होते. सारांश, अथपासून इति पर्यंत दुःखच पदरात पडते. यासाठी, फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की ते कर्म करीत असतानाच मनाला समाधान प्राप्त होते. म्हणून परमार्थाकडे रोकडा व्यवहार आहे, उधारीचा नाही, असे सर्व संतांचे सांगणे आहे.



१३२. अधिक वाचू नका, जे काही थोडे वाचाल, त्याचे मनन करा, आणि ते कृतीत आणा.



( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 10, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- १० मे २०१४

१० मे

देहमनाने व्हावे रामार्पण । 


   



भगवंताची उपासना । दूर करी सर्व यातना ॥
चित्ताची स्थिरता । भगवंताच्या उपासनेत निश्चितता ॥
देह जरी जीर्ण फार । तरी वासनेचा जोर अनिवार ।
हे जाणून चित्ती । एक भजावा रघुपति ॥
हृदयी करता भगवंताचे ध्यान । नामाविण उच्चार दुजा न जाण ।
त्यात व्यवहाराचे जतन । न दुखवावे कोणाचे अंतःकरण ।
असा नेम ज्याच्यापाशी । राम तेथील रहिवाशी ॥
मी रामाचा, रामा तू माझा । हाच अखंड असावा हव्यास ॥
ऐसे ध्यावे रामाला । की जे जीव प्यार झाले मला ॥
आता याहून दुजे न सांगणे काही । रामाविण जगू नाही ॥
जे जे होणार ते होतच जाते । ते भगवंताच्या इच्छेने घडते ।
ऐसे आणणे मना । याचे नाव उपासना ॥
अखंड रामसेवा ज्याला लाभली । धन्य धन्य त्याची माऊली ॥
स्वार्थरहित रामसेवा । याहून लाभ दुजा न जीवा ॥
राम ठेवा मनी । तो ध्यात जावा मानसपूजनी ॥
वाचेने भगवंताचे नाव । कायेने भगवंताची सेवा ।
चित्ती भगवंताचे ध्यान । आपण राहावे रामार्पण । याहून अन्य सेवा कोणतीहि न जाण ॥

उपासना असावी बळकट । तेथे नसावी कशाची अट ॥
उपासनेचा असावा जोर । ज्याने होईल मन स्थिर ॥
आपले जीवन ज्याचे हाती । त्याची नेहमी ठेवावी संगति ॥
जे जे काही मी करावे । त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे ॥
मनी न सोडावा धीर । आहे म्हणावे माझा रघुवीर ॥
करावे भगवंताचे चिंतन । होईल स्वतःचे विस्मरण ॥
सर्व आहे रामाधीन । आपण निमित्ताला कारण ॥
रामावर ठेवावे चित्त । जैसे प्रपंची असावे वाटते वित्त ॥
उपासनेचे नर । त्यांनी राहावे खबरदार ॥
आजवरे केली भगवंताची उपासना । पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा ॥
सर्वांचे ऐकावे । परी उपासनेपासून दूर न व्हावे ॥
राम माझा देता घेता । राम माझ्या भोवता ॥
रामाविण जगी दुजे । न ठेवावे आणिक परते ॥
एक सद्‍गुरुआज्ञा प्रमाण । हीच रामसेवा जाण ॥
थोर थोर ऋषिमुनि । यति संत साधु यांनी ।
एकच केले खास । रामावाचून न राहू दिले जीवास ॥
ठेवावा रामावर पूर्ण विश्वास । न करावे उपासतापास ॥
उपासनेत राहावे आपण । हेच रामाचे सान्निध्य जाण ॥
स्वार्थरहित सेवा । तीच पावे देवाधिदेवा ॥
जे जे होते काही । ते ते राम करतो पाही ।
हा एकच विश्वास । समाधानाचा मार्ग सत्य खास ॥
जेथे परमात्म्याची सत्ता । तेथे न चाले कोणाचे सर्वथा ।
म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये । समाधान राखीत जावे ॥

१३१. चित्ती भगवंताचे ध्यान । आपण राहावे रामार्पण ।
याहून अन्य सेवा कोणतीहि न जाण ॥



( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 9, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ९ मे २०१४

९ मे

शुद्ध वातावरण व पवित्र आचरण. 

 



आपल्या घरातले वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावे. आपल्याकडे येणार्‍या माणसाला परत जाऊच नये असे वाटावे. अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असे समजून, त्य प्रपंचात विद्या, वैभव, घरदार इत्यादि सर्व काही यश संपादन करा; अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐष आरामात राहून गाद्यागिरद्यांवर लोळा; पण हे करीत असताना तुमचे अंतःकरण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेले राहू द्या. कोणाशी वाद घालीत बसू नका. जगाचा मान फार घातक आहे. त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागे लागतो, नंतर मान मिळविण्याची कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो. जगातले अजिंक्य पुरुषसुद्धा कुठेतरी विषयात गुंतलेले असतात, तिथे त्यांचा घात होतो. जगाला ते भारी असतील, पण त्या विषयापुढे त्यांचे काहीच चालत नाही. प्रेमात गुंतू नका, तसे द्वेष मत्सरांतही गुंतू नका; दोन्ही सारखेच घातक आहेत. आपला प्रिय नातेवाईक मेला, आणि आपण ज्याच्यावर दावा लावला आहे तो भाऊबंद मेला; दोघेही मेल्याचे सुतक सारखेच ! त्याचप्रमाणे, मनुष्य प्रेमाने गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय, नुकसान सारखेच होते. भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही; मग प्रपंचात सुखसोयी असल्याने तो होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे होवो. ढोंग, बुवाबाजी, इत्यादींच्या भानगडीत तुम्ही पडू नका. अगदी काहीही न केलेत तरी चालेल, पण ढोंग मुळीच करू नका. आणि सर्वांनी माझ्यावर कृपा करा, अगदी अनुभवाने मी सांगतो, की बुवा होण्याच्या फंदात तुम्ही पडू नका. आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून, त्याचे अनुसंधान अखंड टिकू द्या. आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरूरी आहे. आपण सर्वजण सत्संगतीमध्ये आहोत असे म्हणतो, मग आमची वृत्ती का न सुधारावी ? तर संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरले नाही, म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही.
श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान देऊन त्याला गोपींकडे पाठविले. भगवंताच्या नामामध्ये त्या रंगून गेल्या होत्या. गोपींचे नामावरचे प्रेम पाहून उद्धवाला आश्चर्य वाटले. नामामध्ये त्यांना भगवंत दिसत असे; ते पाहून उद्धवाने देवाला सांगितले, "देवा, तू मला ज्ञान दिलेस खरे, पण तुझ्या भक्तीचे प्रेम त्याहून श्रेष्ठ आहे, ते तू मला दे." खरोखर, त्या नामाचे माहात्म्य देवाच्या वर्णनापेक्षाही कठीण आहे. तुम्ही सर्वजण इथे आला आहात; इथून रामाजवळून काही मागून न्यायचे असेल तर त्या नामाचे प्रेम तुम्ही सर्वांनी मागा. सर्वांनी नामस्मरण करा आणि आनंदात राहा. राम कृपा करील, हा भरवसा बाळगा.


१३० आपल्या जीवनात सहजता हवी. सहजतेमध्ये समाधान आहे.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 8, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ८ मे २०१४

८ मे

भगवंताचे अनुसंधान राखावे.

 

  

फार दिवस वापरून जोडा फाटला की तो कितीही दुरुस्त केला तरी पुनः पुनः फाटतोच. तसेच शरीराचे आहे. शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काही तरी होतच राहते. दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे लागते. तसे, आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे आणि त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. आपल्या आजाराचा, म्हातारपणाचा आपण फायदा करून घ्यावा. एखादी शहाणी सुगरण बाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते, त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचे अनुसंधान टिकवायला शिकले पाहिजे. अनुसंधानात असलो की प्रपंचात मजा आहे; अडचणी आणि संकटे यांचीसुद्धा मजा वाटेल. पोहायला येणार्‍या एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले तर आवडणार नाही. तो उड्या मारील, बुड्या मारील, वाकडातिकडा पोहेल, तसे भगवंताच्या अनुसंधानात राहिले तर प्रपंचाची मजा वाटेल. कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची भिती वाटत नाही. विषय जोवर ओळखले जात नाहीत तोवरच ते आपल्याला त्रास देतात. याकरिता, ज्या ज्या गोष्टी होत असतात, त्या त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत, ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्‍न करावा. परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो. आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे भगवंताची वस्ती असते. म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तिथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते. आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे. त्याच्या पायावर मस्तक ठेवावे, आणि त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की, "हे भगवंता, तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार. आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला. तुझ्या प्राप्तीशिवाय कशातही सुख नाही असे भासू लागले, तरी वृत्ती आड आल्याशिवाय रहात नाही. माझ्या अज्ञानाने मी आज स्वतःच्याच आड येत आहे. तरी तुझी, म्हणजे पर्यायाने माझीच, ओळख पटावी, आणि त्यात मी तुला पाहावे, हीच माझ्या जीवितातली शेवटची इच्छा आहे. ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणे शक्य नाही. तरी, हे भगवंता, माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर. यापेक्षा मला जगात दुसरे काहीही नको. आता मी तुझा झालो. यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन, आणि तुझे नाम घेण्याचा आटोकाट प्रयत्‍न करीन. तू मला आपला म्हण. "



१२९. वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागोमाग समाधान येतेच.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 7, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ७ मे २०१४

७ मे

देहबुद्धीचा त्याग करावा. 

 



मानाला कारण अभिमान होय. मी मोठा, असे मनाने घेतले म्हणजे मानाची गरज लागते. हा अभिमानच भगवंताच्या आणि आपल्यामध्ये आड येतो. हा अभिमान घालवायला, गुरुआज्ञेत राहणे, त्यांना शरण जाणे, आणि त्यांनी सांगितलेली साधने करणे, हे उपाय आहेत. पण ही साधने निरभिमानाने झाली पाहिजेत. हा अभिमान फार सूक्ष्म असतो. मी गुरुआज्ञेत राहतो, त्यांनी सांगितलेली साधने करतो, आता माझा अभिमान गेला. हे म्हणणे सुद्धा अभिमानाचेच बोलणे होय. खरे पाहता, अभिमान बाळगण्यासारखे आपल्याजवळ आहे तरी काय ? शक्ति, की पैसा, की किर्ती ? जगात आपल्यापेक्षा कितीतरी मोठे लोक आहेत. पण मौज अशी की, भिक्षा मागणार्‍यालासुद्धा मोठा अभिमान असतो. "मी अमक्याच्या इथे भिक्षेला गेलो होतो, त्याने मला हट्‌ म्हटले तेव्हापासून त्याचा उंबरठा नाही चढलो मी. " असे तो म्हणतो. तेव्हा हा अभिमान आणि अपमान, ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. याला अगदी मूळ कारण देहबुद्धी. ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे. एखाद्या झाडाला खत घालीत गेले तर ते मरेल कसे ? मला लोकांनी बरे म्हणावे, मान द्यावा, शिव्या दिल्या तर वाईट वाटते, हे देहबुद्दीला खत घालण्यासारखे आहे. चांगले-वाईट, मान-अपमान सर्व देवाला अर्पण करावे. वस्तुतः कर्तेपणच त्याच्याकडे सोपवावे. म्हणजे, त्या कृत्याचे परिणाम मनावर होऊ देऊ नयेत. व्यवहारात थोडा अभिमान लागतोच, पण तो केवळ कारणापुरता असावा. वरीष्ठाने नोकरांशी वागताना अभिमान पाहिजे. पण तो तितक्यापुरता, त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. ही देहबुद्धी, हा अभिमान, जायला सद्‍गुरूचे होऊन राहावे. निदान बळजबरीने तरी 'मी त्याचा अहे' असे म्हणावे. सद्‍गुरू तुम्हाला नकळत तुमचा अभिमान दूर करतील.
परमार्थांत संतांचे ऐकण्याला महत्त्व आहे. तेथे आईबापांचे का ऐकू नये ? जर ज्याचे मन त्याच्या ताब्यात आहे, ज्याचे मन स्थिर झाले आहे, किंवा ज्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे, अशाचेच ऐकण्यात विशेष आहे. आपल्या देहबुद्धीची तर्‍हा मोठी विलक्षण असते. सगुणोपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करीत नाही; फार सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही; आणि फुकट काय जेवायला घालायचे, म्हणून तो अन्नदान करीत नाही. असा मनुष्य फुकटच जायचा ! देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वाचनाची गरज आहे. पहाट झाली की थोडा उजेड, थोडा अंधार असतो, त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे; देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित्‌ उजेड आहे. हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला, भगवंताच्या अनुसंधानासारखा कोणता उपाय असणार ?


१२८. मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

May 6, 2014

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन- ६ मे २०१४

६ मे

स्वार्थ आवरल्याने परस्परप्रेम वाढते. 

 



परस्परांत प्रेम वाढविण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. एक, बारीकसारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी; म्हणजे द्वेष वाटणार नाही. दुसरी, सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी. तिसरी, कोणतीही सूचना सांगायची झाली, तर त्या व्यक्तीविषयक न बोलता, नम्रतेने आणि गोड शब्दांत सांगावी. चौथी, अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जीमध्ये या सर्वांचा बर्‍याच प्रमाणात अंतर्भाव होतो अशी बाब, म्हणजे स्वार्थाला आळा घालणे. म्हणजे मी स्वतः जितका माझ्याकरिता आहे असे वाटते, त्याच्याहीपेक्षा जास्त मी दुसर्‍याकरिता आहे असे वाटणे हे होय. आणि ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणे हेच प्रेम वाढवायला मदत करते. ज्या माणसाला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही. जिथे निःस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे.
आता स्वार्थाचा विचार करताना असे सहज वाटते की, मी कुठे स्वार्थी आहे ? मी कुठे कुणाजवळ काय मागतो ? पण एवढ्याने 'स्वार्थदृष्टी नाही' असे म्हणता येणार नाही. अहंकारा इतकाच स्वार्थ जबरदस्त आहे. त्याच्या मुळ्या इतक्या खोल आणि सूक्ष्म असतात की त्यांचा पत्ताच लागत नाही. स्वार्थ तीन प्रकारचा असू शकतो; कायिक वाचिक व मानसिक. देहाला दुसर्‍यानिमित्त कष्ट न होतील इतक्या काळजीने वागणे, हा कायिक स्वार्थ म्हणतात. माझ्या बोलण्याला सर्वांनी मान डोलवावी, मी काही कोणाला कमीजास्त बोललो तरी ते त्याने निमूटपणे सहन करावे, अशा तर्‍हेच्या वृत्तीला वाचिक स्वार्थ म्हणतात. आणि माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावे, माझे विचार बरोबर आहेत अशी जाणीव इतरांनी ठेवावी, अशा तर्‍हेची आपली इच्छा, त्याला मानसिक स्वार्थ म्हणता येईल. आता, मी माझ्याकरिता जितका असेन त्याहून जास्त मी दुसर्‍याकरिता आहे, असा विचार केला तर असे दिसून येईल की, मी जेवढी मला स्वतःला सवड ठेवतो, तेवढीच किंवा त्याच्याहून थोडी जास्त सवड दुसर्‍याला ठेवणे जरूर आहे. म्हणजेच, जे दुसर्‍याने आपल्या बाबतीत करणे आपल्याला बरे वाटत नाही, ते आपण दुसर्‍याच्या बाबतीत न करणे; आणि त्याच्याच उलट, जे दुसर्‍याने आपल्याला केले तर बरे वाटते तेच आपण दुसर्‍याच्या बाबतीत करावे. हेच सर्वाचे सार आहे आणि हाच खरा धर्म आहे. आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही. आपण पुष्कळांच्यावर प्रेम केले तर आपण एकटेच त्यांचे करतो, पण प्रसंगाला ते सर्व आपल्याला मदत करतात. जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला असे समजावे.


१२७. जो निःस्वार्थ बुद्धीने प्रेम करतो त्याला आनंद खास मिळतो.


( संदर्भ - सत्संगधारा डॉट नेट संकेतस्थळ )

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या