August 23, 2012

॥ श्री मनाचे श्लोक ॥ १॥

 जय जय रघूवीर  समर्थ  !!

' श्री समर्थ रामदास स्वामी '  या नावाने फेसबूक वर   एक अत्यंत सुंदर पेज  आहे. समर्थांबद्दलच्या  माहितीचा खजीनाच या ठिकाणी मिळतो.  या पेजवर   ' मनाचे श्लोक ' च्या प्रतेक  ओवीचा / अध्यायाचा  सोपा अर्थ विषद केला आहे.

या पेजवरील उपयुकत माहिती  इथे ब्लॉगवर देऊ का ?  अशी विंनंती त्यांना केल्यावर त्यानी  ताबडतोब ही विनंती मान्य केली  ( त्यांनी अजूनही आपले नाव सांगीतले नसल्याने  त्यांचे नाव इथे लिहू शकत नाही )   त्यांचा मी शतशः आभारी आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------
॥ श्री मनाचे श्लोक ॥ १॥

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा॥१॥





अर्थ : - मनाचा मूलभत विचार भारतीय संस्कृतीने वेदापासून केला आहे. मनाचे श्लोक हे मनाबद्दल सूक्ष्म विचार करणारे एक अभिमानाचे स्थळ आहे. सूक्ष्म आणि भव्य. इंद्रियाचा मनावर परिणाम सांगणारे आणि मनाचा इंद्रियांवर परिणाम सांगणारे. भव्यता अशी की, मनाचे श्लोक दोनशे पाच आहेत. पण सूक्ष्मता अशी की, मनाचे सूक्ष्म रूप पहिल्याच श्लोकात सांगून संपले आहे. ओमकाराने उपनिषद सुरू झाले, असे म्हणतात. जाणत्याच्या लेखी ते तेथे संपलेही आहे. विनोबाजी ‘स्थितप्रज्ञ दर्शन’, पान पाचवर म्हणतात, ‘पातंजलाच्या एकशेपंच्याण्णव सूत्रांपैकी पहिल्या तीन सूत्रांतच सर्व शास्त्र सांगून संपले आहे.’ त्याच सूक्ष्मतेने मनाचे श्लोक पहिल्या श्लोकात संपले. त्यात त्यांनी काय सांगितले ते पहा. गुण हे निर्गुण झाले. मन हे आत्मरुप शुद्ध झाले. म्हणजे आरंभाचा शेवट झाला. ज्ञानाची, शारदेची उपासना हेच सांगेल. राममार्ग हीच गोष्ट सिद्ध करील. मनाच्या श्लोकाचा विस्ताराने अभ्यास ही एक आनंददायक आणि संस्कारमय गोष्ट आहे. त्याच्या पहिल्या श्लोकाचा हा साक्षात्कार सूक्ष्म आणि गोड आहे. मनाचे विकल्प बाजूला ठेऊन आनंद मिळवा. म्हणजे शांती मिळेल आणि रामदर्शनाचा दरवाजा उघडेल. रामदर्शनाचा दरवाजा उघडेल. राम हरिचे रहस्यसुद्धा पाहण्याजोगे आहे
गण = इंद्रियें. अधीश = स्वामी. गुण = त्रिगुण व त्यांचीं सारीं लक्षणें. ईश = स्वामी. मुळारंभ = मूळ पुरुष = ईश्वर. चत्वार – चार. गमणें = दर्शवणें, समजावून देणें. राघवाचा = ईश्वराचा.

इंद्रियांचा स्वामी व सर्व गुणांचें अधिष्ठान तसेंच निर्गुणाचा आरंभ असणारा मूळपुरुष असा जो गणेश त्यास आ
णि चारहि वाणींचें मूळ असणारी शारदा, या दोघांना मी नमस्कार करतो. अनंत ईश्वराच्या दर्शनाचा मार्ग मी समजावून देतों.

श्रीसमर्थांनी केलेले हे मंगलाचरण आहे. त्यांत ज्ञानस्वरुप ईश्वरास आणि शक्तिस्वरुप शारदेस वंदन केलें. ईश्वरस्वरुपाचा अनुभव तीन पातळींवर येतो. मन व इंद्रियें यांचा प्रेरक हृदयस्थ आत्मा हा पहिला अनुभव. विश्वभर पसरलेल्या त्रिगुणांच्या विस्ताराला जिवंत ठेवणारा विश्वात्मा हा दुसरा अनुभव. अनंत विश्वें निर्माण करण्याचें सामर्थ्य व स्वातंत्र्य असून हेंच विश्व निर्माण करण्याचा मूळ संकल्प करणारा मूळ पुरुष अथवा सच्चिदानंदस्वरुप ईश्वर हा तिसरा अनुभव. त्याच्यापुढें निर्गुणांचे क्षेत्र आरंभतें. येथे अनुभवाची भाषा संपते.

ईश्वराची अंगें दोन – ज्ञान आणि सामर्थ्य. सामर्थ्य शक्तिमय असते. परा, पश्वन्ती, मध्यमा, वैखरी या चार वाणींच्या रुपाने माणसांत ते प्रगटते. ग्रंथकाराला ग्रथंरचनेसाठी दोन्ही अंगाचीं आवश्यकता असते. ओंकाररुपाने सर्वां घटीं व्यापून राहणारी शारदा सर्व मानवी कतृत्वाचे मूळ आहे, तिचा हात धरुन माणूस अर्थमय जगतांत प्रवेश करतो आणि तिच्याच प्रेरणेने तेथून निर्गुणाची ओळखण करण्याइतका अनुभवसंपन्न होऊं शकतो,

श्री समर्थांचा अनंत राघव म्हणजे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, सगुणनिर्गुणपरमात्मा.

मानवीजीवनातील प्रवास व त्यांचे पंथ पुष्कळ आहेत. परंतु इंद्रियांपासून सुरु होणारा आणि हृदयस्थ आत्म्यापाशीं संपणारा आंतील प्रवास सर्वात अधिक लांबचा आहे. स्वसंवेद्य व आनंदमय अंतरात्म्यापर्यंत हमाखास पोचवणारा मार्ग श्रीसमर्थ येथें स्वानुभवाच्या आधारानें सांगत आहेत.

जय जय रघुवीर समर्थ !

No comments:

गणेश पुराण


उपासना खंड अध्याय
1 2 3 4 5 6
क्रिडाखंड अध्या 1

पत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या